ढस्का - सचित्र

Submitted by हर्ट on 25 November, 2014 - 04:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 
  1. कुठल्याही फळभाज्या. मी घेतलेल्या भाज्या म्हणजे: अ‍ॅस्परॅगस, ब्रोकुली. पण भारतात हे जर मिळत नसेल तर बेबी गाजर, बेबी कॉर्न, ढोबळी मिरची, शिमला मिरची, चेरी टमाटर, कोबी, गोबी, पण बटाटे आणि मुळा हे नकोत - हे घेता येईल,
  2. एखादे मोड आलेले कडधान्य. मी हिरवे चने घेतले होते मोड आलेले. पण, मुग, मटकी,चवळी, वाटाणे हेही चालतील.
  3. पाच ते सहा छोटे लिंबू.
  4. साखर पाऊन चमचा.
  5. चवीपुरते मीठ.
  6. जिरे पावडर,
  7. तेल - मी काळ्या तिळाचे तेल वापरले होते.
  8. एक दीड - उरलेली शिळी पोळी
  1. लसणाच्या अख्ख्या पाकळ्या सोललेल्या.
  2. बाळकांदे पाच ते सहा न कापलेले. (शॅलोट्स - हे जर मिळत नसतील तर कांदे वापरुच नका. चिरलेला कांदा नको. )

हिरवी मिरची दोन भागात कापलेली.

क्रमवार पाककृती: 

१) तुम्ही घेतल्या त्या भाज्या मध्यम आकाराच्या कापून घ्या. अ‍ॅस्परॅगस नेहमी बोटा इतके लांब कापावे. इतर भाज्या गाजर, बेबी कॉर्न, शिमला मिरचीचे तुकडे, ब्रोकुली मध्यम आकाराचे कापावे.
२) कापलेल्या भाज्या एखाद्या खोलगट पातेल्यात किंवा कटोर्‍यात ठेवा. ह्यात चवीपुरते मीठ घाला. पाची लिंबू पिळा. साखर घाला. आणि पातेल्यावर झाकण ठेवून पातेले वरखाली हलवा म्ह्णजे सगळे सहित्य एकमेकात मिसळले जाईल.
३) हे साहित्य १० मिनिटे झाकून ठेवा.
४) आता जाड बुडाचा तवा अथवा कढई घ्या. त्यात चार चमचे तेल ओता. तेल तापले की त्यात हिरवी मिरची, लसणाच्या पाकळ्या आणि बाळकांदे घालून सराट्याने अरतपरत करा.
५) आता पातेल्यातील भाज्या तव्यावर समांतर पसरवा आणि नीट अरतपरत करा.
६) आता भज्यांवर मोड आलेले धान्य पसरवा. जिरे पावडर शिंपडा. हे सर्व साहित्य अरतपरत करा.
७) आता पोळीचे तुकडे घालून परत एकदा अरतपरत करा. थोडे थांबा आणि आच विझवू नका. लागते तसे ताटात वाढून घ्या आणि हवे असेल तर परत थेट तव्यावरचे गरम गरम घ्या. आच विझवू नका. हा पदार्थ तव्यावरुन ताटातच छान लागतो.

पोळी घातल्यावर असे दिसते: आणि जरा निरखून पहा. काय दिसले? काहीच नाही! छे! रस काढलेले लिंबू दिसत आहेत ना?!

वाढणी/प्रमाण: 
माहिती नाही. तुमच्या भुके आणि आहारानुसार.
अधिक टिपा: 

१) भाज्या खूप शिजवू नका (This is most important!) आणि आच फार वाढवू नका. लिंबू कमी घालू नका आणि तेल फार ओतू नका. मीठ फार शिंपडू नका आणि साखर फार घालू नका. पदार्थ झाला म्हणून आच विझवू नका आणि पदार्थ खाताखाता तव्यावर असलेला पदार्थ अरतपरत करायल विसरू नका.
२) मी मलेय लिंबू वापरले. ते मी सालासहीत पिळून टाकले. मी कुठल्याही भाजी लिंबू पिळून टाकताना लिंबाची साल देखील टाकतो. त्याचे फायदे खूप आहेत म्हणून खाताना काही वाटत नाही.
३) छोटे कांदे मिळत नसले तर दुसरे मोठे कांदे घेऊ नका. कारण ते चिरावे लागतील. चिरलेले कांदे नकोत.

माहितीचा स्रोत: 
माझी एक बहिण
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काय फोटो आहेत! स्लर्प्प्प्प... लाळगळू बाहुली!

>>भाज्या खूप शिजवू नका (This is most important!) आणि आच फार वाढवू नका. लिंबू कमी घालू नका आणि तेल फार ओतू नका. मीठ फार शिंपडू नका आणि साखर फार घालू नका. पदार्थ झाला म्हणून आच विझवू नका आणि पदार्थ खाताखाता तव्यावर असलेला पदार्थ अरतपरत करायल विसरू नका.
<< हे वाचताना 'उतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका' याची आठवण झाली. Happy

मोड आलेले चणे उकडले होते का? कच्चे असतील तर नुसते परत्ल्यावर शिजतात का?

सही प्रकारेय,
पण खूअच वेजी वेजी आयटम असल्याने आवडणार नाही हे ही आलेच.

मागे एकेठिकाणी गाडीवर मी असले पाहिले होते, तव्यावर भाज्या आणि कडधान्ये परतून ते एका वाडग्यात सर्व्ह करत होते. बहुतेक मुसलमानाची गाडी होती. साधारण दिसायला असेच होते, पण शेजारीच खिमापावची गाडी असल्याने मी हे खाल्ले नाही.

मस्तच .हे मला वन मील डिश किंवा सिजलर सारखेच वाटते आहे. हे खुप हेल्दी आहे व डायबेटीक लोकांसाठीही चालेल(साखर न घालता). फोटो यमी आहे एकदम लाळगाळु. Happy तुमच्या बहीणीला धन्यवाद सांगा.मी नक्की करेन ही रेसिपी.

फोटो भारी... ढस्का (धसका लिहिलं जातंय.. Happy ) हे नाव कुठलं आहे? मस्त दिसतोय.
सालासकट लिंब न घालता करून बघणार. धन्यवाद.

संपदा, पोळिचे तुकडे न करता, पोळी वापरून रॅप करता येईल.
मला तरी आतली भाजी तशीच वाटली. ग्रील केल्यासारखे.
बी, ढस्का नाव कुठून आले? व्हिएतनामीज आहे का ही रेसीपी?

वेगळीच रेसिपी .. पण छान हेल्दी वाटत आहे .. पोळी मलाही बहुतेक आवडणार नाही .. करून बघायला हवं ..

चिरलेले कांदे का नको ह्याला काही विशेष कारण आहे का?

("हे नको ते नको" फारच जाचक वाटत आहे .. :दिवा:)

धन्यवाद सगळ्यांचे.

आमच्या घरी गावी अकोल्याला बालपणी माझी बहिण हा पदार्थ करायची तेंव्हा तिथल्या भाज्या असायच्या. ती ह्याला ढस्काच म्हणायची. तिला विचारावे लागेल हे नाव तिला कसे माहिती. पण तिचा शब्दकोश अफाट आहे. खूप सुंदर लिहिते आणि बोलतेही तितकेच प्रवाही आणि प्रभावी.

मी हा पदार्थ ब्रन्च म्हणून केला. संध्याकाळपर्यंत भुक लागली नाही. जर पोळीचा रोल करुन आतमधे हे सारण म्हणून भरायचे असेल तर मला वाटत तो खायला त्रास होईल. खूप मोठा आ करुन खाणे मला आवडत नाही.. जमतही नाही.

दिनेशदा, इथे १७६० प्रकारचे कडधान्य मिळतात. हिरवे हरभरे माझ्या अत्यंत आवडीच. आणि एकदा भिजवले की मला महिनाभर पुरतात. मी दोन दिवस मोड यायला वव्र ठेवतो आणि एकदा मोड आले की फ्रिजमधे मागे लोटतो. मोड अजून मोठे मोठे होत जातात.

लिंबू कमी घालू नका>>>>>> ५ लिंबाचा रस भाजीत टाकला तर भाजी आंबट नाही होत?>>>> बी, मला पण ही शन्का आली होती. पण मग मी विचार केला तुम्ही भलतेच आम्बट शौकीन दिसता आहात Lol

Light 1 दिवे घ्या हे सांगणे न लगे

लिंबू कमी घालू नका>>>>>> ५ लिंबाचा रस भाजीत टाकला तर भाजी आंबट नाही होत?>> मी जे लिंबू घेतलेत ते बोरापेक्षा थोडे मोठे होते. फार मोठे असतील तर दोन पुरे. साखर असतेच त्यामुळे आंबटपणाला वेगळी चव येते.

नावावरुन हा पदार्थ इतका ढासू (चांगल्या अर्थाने) असेल असं वाटलं नव्हतं. फोटो वर्णासहीत हेल्दी वन डीश मील आवडली.
<< हे वाचताना 'उतू नका मातू नका, घेतला वसा टाकू नका' याची आठवण झाली. स्मित +१

अरेछानच आहे रेस्पी.. पोळी न घालता सुद्धा वन डिश मील म्हणून करण्यात येईल Happy

चायनीज स्टर फ्राय भाज्या ,इंडिअन स्टाईल मधे.. मस्त!!

मुंबईत तू दिलेल्या सर्व भाज्या मुबलक मिळतात...

१७६० प्रकारची कडधान्ये >>

ही उपलब्धता तिथे स्थायिक झालेल्या भारतीयांमुळे की स्थानिक आहारात कडधान्ये खूप वापरली जातात?

टण्या, मी येवढे संशोधन केले नाही. पण इथे अनेक प्रकारचे कडधान्य सहज मिळतात. चिनी लोकांचे अनेक डीझर्ट्स हे कडधान्यापासून बनवलेले असतात. हे एक कारण. आणि, भारतीय, बांगला, पाकिस्तानी लोकही कडधान्य भरपुर वापरतात. गोर्‍या लोक सुप हवे असते म्हणून कडधान्य वापरतात. ऑस्ट्रेलियातून इथे वेगळ्या प्रकारची कडधान्ये येतात.

खूप छान प्रतिक्रिया मिळाल्यात. धन्स.