किम्ब

Submitted by अल्पना on 28 December, 2011 - 02:29
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३-४ किम्ब, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, २-३ चमचे भाजलेले तीळ, जीर्‍याची पुड, गरम मसाला (नाही वापरला तरी चालतं), मीठ, थोडी शक्कर (खांडसरी साखर, ही नसल्यास थोडा गुळ पण वापरता येतो)

क्रमवार पाककृती: 

किम्ब हे लिंबूवर्गातले मोसंबीच्या आकारातले हिमाचल प्रदेशात आढळणारे फळ आहे. इथे या प्रकारची दोन फळं दिसतात एकाचं नाव किम्ब तर दुसर्‍याला खट्टा/गलगल (म्हणजे बहूदा ईडलिंबू) म्हणतात.

kimb.JPG

मोसंबीची जशी सालं काढतात, त्याप्रमाणे किम्बची सालं काढायची. नंतर त्याचे मधोमध चिरुन दोन तुकडे करून एका भांड्यात थोडासा रस हाताने पिळून काढायचा. किम्बचे छोटे छोटे तुकडे करायचे.

kimb 1.JPG

हे तुकडे करत असतानाच दुसरीकडे मसाला तयार करायचा. मसाल्यासाठी लिहिलेले सर्व जिन्नस (हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, पुदिना, तीळ, मीठ, जीरे इ) ओबडधोबड वाटून घ्यायचे. खलबत्त्यामध्ये किंवा पाटा वरवंट्यानी वाटले तर जास्त छान चव येते.

kimb masaala.JPG

हा तयार मसाला

एका भांड्यामध्ये किम्बचे तुकडे, मसाला एकत्र करायचा. त्यात चवीप्रमाणे शक्कर /गुळ घालायचा. गरजेप्रमाणे आंबटपणा वाढवायला आधी काढून ठेवलेला रस घालायचा. किम्ब तय्यार.

वाढणी/प्रमाण: 
२-४ जण
अधिक टिपा: 

ही फळं फक्त हिवाळ्यात मिळतात. दिवाळीच्या वेळी गावाकडे गेलं की एखाद्या दुपारी उन्हात बसून किम्ब खायचा साग्रसंगित कार्यक्रम ठरलेला असतो. हा पदार्थ दुपारीच खातात, दुपारी उन्हाच्या वेळी खाल्लं की किम्ब बाधत नाही असं म्हणतात.

किम्ब नेहेमी केल्या केल्या लगेच खातात. थोड्यावेळाने त्याची चव कडवट व्हायला लागते. म्हणूनच किम्ब चिरुन होईपर्यंत मसाला तयार असावा लागतो.

आणखी चांगल्या चवीसाठी, किम्बमध्ये मसाला मिसळल्यानंतर खायच्या आधी २-३ निखारे त्या भांड्यात ठेवून त्यावर थोडेसे सरसोचे तेल टाकून १-२ मिनीट झाकून ठेवतात. भन्नाट चव येते याने.

हा प्रकार वाटीत घेवून नुसताच खायला छान लागतोच पण यात मक्याची भाकरी (मक्कई की रोटी) चूरून खायला पण छान लागते.

माहितीचा स्रोत: 
सासर
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

आमच्याकडे असे एक फळ मिळते, नाव काहीतरी वेगळे असणार, स्थानिक लोकच खातात. मी एकदा फळ म्हणून आणले पण खाववले नाही, आता हा प्रकार करुन बघणार.
(फोटोमूळेच हे कळले)

आमच्या कुर्गी शेजारी, अश्याच एका फळाची कढी करायच्या. ते फळ भाजून त्याची साल काढायच्या. मग त्यात हिरवी मिरची आणि खोबरे घालून चुरायच्या आणि मोहरीच्या फोडणीवर ते गरम करायच्या.

मला फक्त गाडीला बंपर असतं हेच माहितेय. Happy

याला अजून काही म्हणत असतिल तर माहित नाही. आमच्या भागात याला किम्ब म्हणतात आणि गलगल (ईडलिंबू? ) ला खट्टा. आमच्या गावी गलगलचं लोणचं पण बनवतात. या फळांचं मात्र ही नंतर कडवट पडत असल्याने लोणचं नाही घालत. यांचा रस मुळ्याच्या कीसामध्ये घालून कोशिंबीर बनवतात. पालमपुर साइडला यालाच खट्टा म्हणतात.

सुखदा, किन्नु संत्र्यासारखं दिसतंय नेटवर.

आता जानेवारीत गावी जाईन तेव्हा झाडाचा फोटो काढेन. गावाकडे शेजारी-पाजारी आणि आमच्या घरी मिळून बरीच झाडं आहेत. किम्ब खायचं असलं की पोरं झाडावरुन घेवून येतात.

छान.

साधारण कवठापेक्षा मोठ्या आकाराचे असते का हे फळ.. पपनस पण असेच असते साधारण.. कापलेल्या फळाचा फोटो असता तर लक्षात आले असते... पपनस पण फोडल्यानंतर लवकर संपवावे लागते नाहीतर कडू होते.. तसेच साल पण कडवट असते... सोलताना काळजी घ्यावी लागते.. नाहीतर आधीच कडवट लागू शकते..

http://www.trekhimachal.com/newsite/food-and-drink/khatta

इथे मला अजून माहिती मिळाली.

हो, कवठापेक्षा किंचित मोठं असतं. पण पपनस जर संत्र्यासारख्या चवीचं असेल तर ते हे नक्कीच नाही. हे संत्र्यापेक्षा मोसंब्यासारखं/ मोठ्या लिंबासारखं जास्त वाटतं. आंबट्टढाण असतं, आतून रंग पिवळा असतो.

अल्पना, मग मी कुर्ग मधले म्हणतोय ते हेच फळ.
तो प्रकार मी बर्‍याच वेळा खाल्लाय, कडवट आंबट लागतो खरा, पण भाताबरोबर छान लागतो.