राधे ... २. पूर्णपुरुष

Submitted by अवल on 4 November, 2014 - 08:55

अन तोही दिवस आठवतो
किती चित्र विचित्र घटनांचा दिवस!
दुर्योधनाने आयोजलेला द्युताचा समारोह.

कधी नव्हे ते युधिष्ठिराच्या हातून घडलेला अपराध, द्युताच्या मोहाने केलेला घात. पांडवांचे राज्य, संपत्ती इतकेच नव्हे तर स्वतः पांडव, त्यांची आई कुंती आणि पत्नी द्रौपदी त्याने पणाला लावली. पणाला लावले सारे अन हरला तो.
तो हरला की जगातील चांगुलपणाचा पराभव होता तो? कलियुगाची सुरुवात तर नव्हती ती ?

सभागृहात महामह भीष्म, महाराज धृतराष्ट्र, अनेक देशोदेशीचे रथी महारथी उपस्थित होते. पण एकालाही द्रौपदीची दया आली नाही, एकही जण दुर्योधनाच्या विरुद्ध तिला मदत करू शकले नाहीत.
अगदी द्रौपदीचे पाचही पती माना खाली घालून तिची विटंबना सहन करत होते. कुंतीने घालून दिलेला नियम, युधिष्ठिराच्या आज्ञे वाचून कोणीही पांडव कोणावरही आक्रमण करू शकणार नाही हा नियम! अन युधिष्ठिर स्वतःच दास बनलेला, तो कोठून आज्ञा देणार ? सारे पांडव त्या क्षणी निष्प्रभप झाले होते.

अन त्या एका क्षणी कृष्णेने मला साद घातली, करुणपणे माझा धावा केला. आता मलाच कृष्णेची मदत करायला जाणे भाग होते. तिची मदतीची हाक, तिची विनवणी मी टाळू शकत नव्हतोच. माझी सखी, कृष्णा आज संकटात होती.

भर दरबारात दु:शासन एकामागून एक वस्त्र ओढत होता तिचे. शेवटी मीच एक एक वस्त्र तिला नेसवत गेलो. पण दु:शासनाची रग जिरत नव्हती. अखेर मी पितांबर नेसवले तिला. अन पितामहांना जाग आली. त्यांनी दु:शासनाला थांबवले. अन्यथा त्याचा अंत तिथेच झाला असता. राजसभेतील सराच प्रकार अतिशय निंदनीय घडलेला. फक्त द्रौपदीची लज्जा काही प्रमाणात तरी राखू शकलो मी एव्हढेच समाधान.

आता रात्री झोपताना सारे आठवतो आहे. जरी मी अनर्थ थोपवला असला तरी मनाला शांतता का नाहीये? काहीतरी चुकलेय असे का वाटतेय?

"राधे? तू ? किती दिवसांनी येते आहेस? ये अशी. बैस. कशी ..."

"माधवा, मी शिळोप्याच्या गप्पा करायला आलेली नाहीये. हे काय करून बसलास तू ?"

"राधे ?"

"तुला समजलही नाही ? तू काय करून बसलास ते? "

"राधे कशा बद्दल बोलते आहेस?"

"आज, आजच्या बद्दल बोलतेय. असा कसा वागू शकलास तू? तू असा कसा वागू शकलास? माझा विश्वासच बसत नाही."

तुझ्या डोळ्यात काय नव्हत? अविश्वास, वेदना, नाराजी, असहायता. आणि ते सारे भरून तुडुंब डबडबलेले डोळे तुझे, मला कसला जाब विचारत होते?

"कृष्ण म्हणवतोस स्वतःला आणि तुझ्या कृष्णेला असं वागवलस?"

"अग मी तर उलट वाचवलं तिला. मदत केली, लज्जा वाचवली तिची..."

"खरच का माधवा?
आठवतं तुला? एकदा भेटायला गेला होतास तिला. अचानक काही लागलं तुला, तुझ्या बोटाला धार लागली रक्ताची. आठवतं ? तुला स्वतःलाही त्या जखमेची कळ कळे पर्यंत कृष्णेने आपल्या पदराचा शेव फाडून तुझी जखम रोधली होती. एकही थंब सांडू दिला नव्हता तिने. आठवत? "

"हो राधे, लख्ख आठवतय मला. अजून जपून ठेवलीय मी ती चिंधी."

"आणि तरीही, तरीही तू तिचा एक एक अपमान होऊ दिलास? राजसभेत पणाला लावलं गेलं तिला, तुला कळलच नाही ? कळलं नाही असं कसं म्हणू? तुला कळत होतं सारच.
दु:शासनाने तिला, रजस्वला तिला फरफटत ओढून आणलं, राजसभेत. ती प्रत्येकाकडे न्याय मागत होती. तुला ऐकू आलच नाही तिचं न्याय मागणं?
न्यायदेवतेची पट्टी सा-यानी; अगदी सा-यांनी बांधली डोळ्यांवर. भीष्म, ध्रुतराष्ट्र, कर्ण, सारे सारे आंधळे झाले, पण माधवा तू ? तू तर सर्वसाक्षी ना? तू का ओढून घेतलीस डोळ्यावर पट्टी.
इतर कोणी फसेल, मी नाही. माधवा
तू जाणून बुजून गप्प राहिलास. कारण असेल; भावी काळातल्या घटनांना बांधील.
पण कृष्णेचा सखा नाहीच राहिलास तू. ना तिचा, ना माझा...
अन जाणतोस तू हे. म्हणूनच मन खातय तुला तुझच."

"अग पण मी प्रयत्न केलाच ना? एका मागून एक वस्त्र नेसवत गेलो ना तिला, अगदी पितांबरही... "

"केलास, हो हो केलास प्रयत्न. पण कधी ?
अरे जिने तुझ्या रक्ताचा एक थेंब सांडू दिला नाही जमिनीवर,तिचे इतके अश्रू कसे सांडू दिलेस राजसभेत? जिने तुला कळ समजण्याआधी तुझी वेदना समजून घेतली, त्या कृष्णेची कळ, वेदना कधी पोहोचली तुझ्या पर्यंत ?
तिने याचना केली, मदतीची भीक मागितली, दयाघना म्हणून साद घातली तेव्हा?
ती मदत होती ? की केवळ तुझ्यातल्या देवत्वाचा तो दिखावा होता माधवा? "

"नाही नाही राधे, मी तिची लज्जा राखण्यासाठीच गेलो होतो..."

"माधवा, अरे लज्जा तिची नाही गेली रे, लज्जा गेली तुझी, सा-या मानव जातीची. तुझ्या देवत्वाचा पुरावा द्यायला गेलास पण तो पुरावा नव्हता रे, तो तुझ्या देवत्वाचा अंत होता.
आता तू उरलास फक्त पूर्णपुरुष - फक्त पूर्णपुरुष! जाते माधवा, हा माझा कृष्ण नव्हे, हा माझा सखा नव्हे... हा माझा कृष्ण नव्हे..."

"सखे थांब, राधे, राधे ... "

-------

राधे...१. http://www.maayboli.com/node/51393
राधे...३. http://www.maayboli.com/node/51543
राधे...४. http://www.maayboli.com/node/51594
राधे...५. http://www.maayboli.com/node/51968
राधे...६. http://www.maayboli.com/node/52356
राधे... ७. http://www.maayboli.com/node/54215

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर अवल. हा कृष्ण कायमच कोड्यात टाकतो. तो या वेळी असा का वागला त्या वेळी त्याच्या वागण्यामागे नक्की कारण असावे? मग नरकासुराच्या बंदितांशी लग्न असू दे किंवा राधेला सोडून द्वारकेत एकट्याने राहणे असू दे.

धन्यवाद हर्मायनी, चनस
हर्मायनी, त्या दोन घटनांवर पण काही लिहायचा विचार आहे, बघूजमतय का
डिसक्लेमर : हे सर्व लिखाण केवळ आणि केवळ माझ्या विचारांतून आलेय. याला कोणातेही वाड:मयीन पुरावे नाहीत.

तिने याचना केली, मदतीची भीक मागितली, दयाघना म्हणून साद घातली तेव्हा?
ती मदत होती ? की केवळ तुझ्यातल्या देवत्वाचा तो दिखावा होता माधवा? " >>>>>>> त्यावेळेस कृष्ण शण्खासूराशी युद्ध करत होता...... त्यामुळे तो हस्तिनापुरात नव्हता.........

धन्यवाद सर्वांना.
सुम, हो हस्तिनापुरात नव्हता तो, पण तरीही हीच मदत तो आधी, दौपदीला राजदरबारी आणण्या आधीही करू शकला असता न, तसही शेवटी त्याने मदत केली तीही तिथे नसतानाच की Happy

अवल... मलाही असे वाटते तो महाभारतात हाती शस्त्र न घेता युद्धच लढला. त्यासाठी कुणाचेही प्यादे वापरले त्याने.
गोकुळातला कृष्ण आणि महाभारतातला कृष्ण यांची संगती लागत नाही... आणि तसेही ते पुराण नंतर जोडले गेले.

अरे खूप सुंदर, सोबत वेगळाच विचार ..

पण देवाने तरी आपले देवत्व पहिल्याच क्षणापासून का दाखवावे? अन्यथा इतरांचे अवलोकन होणार कसे .. अंतिम क्षणापर्यंत थांबला हेच नाही का देवत्वाला सिद्ध करत ..

हर्मायनी... अनुमोदन!!
कृष्ण हा बर्‍याचदा अगम्य, गूढ... आता थोडा समजला असे वाटेपर्यंत अलगद निसटून जाणारा... हातातल्या वाळूसारखा... म्हणूनच कदाचित हवाहवासा... मोहक वाटणारा...!
दिनेशदा... अनुमोदन!
तुझी दोन्ही ललिते वाचताना वाटले अवल, काळ बदलला... संदर्भ मात्र फारसे बदलले नाहीत!
तुझ्या लेखणीतून उलगडला जाणारा कृष्ण आवडतोय... नक्की लिही इतर प्रसंगांवरही!!

सुंदर... कृष्णचरित्राचे अनेक पदर आहेत. अनेक प्रसंगात त्याचं वर्तन हे आपल्याला काहीसं अनाकलनीय असलं तरी काही विशीष्ट दृष्टीकोनातून झालेलं आहे.

सुम, हो हस्तिनापुरात नव्हता तो, पण तरीही हीच मदत तो आधी, दौपदीला राजदरबारी आणण्या आधीही करू शकला असता न, तसही शेवटी त्याने मदत केली तीही तिथे नसतानाच की स्मित>>>>>>>>>>>ह्मम यावरून हे दिसत की देवाला सुद्धा मर्यादा असतात तो मनात येइल तस आणि तेव्हा वागू शकत नाही.....आणि कृष्णाने सुभद्रेच्या प्रश्नाला उत्तर देताना सान्गितले होते की ( प्रश्न : तुझ आपल्या रक्ताच्या बहिणीपेक्षा (सुभद्रा) मानलेल्या बहिणीवर (द्रौपदी )जास्त प्रेम का ?) मी निर्विकार आहे..ज्याचे माझ्यावर प्रेम (भक्ती) जास्त ति़कडे मी जास्त ओढ्ला जाणार

पावा असा वाजवावा की सूर तर निघावा हवा तसा, पण वेदना आत - आत आवरून, सावरून रुजू द्यावी. >>> हे तुझे म्हणणे नव्हते पटले मागच्या भागात. पण या भागाने ते पटवून दिले. मीरेच्या हातचा रिचवलेला विषाचा प्याला पहिला नव्हता त्याच्यासाठी. त्या आधी त्याने अनेक वेदनांचे प्याले रिचवले होते. पण ओठावर सतत लोकांना रिझवणारे मोहक हसू. रिचवणे, रिझवणे - फक्त एकाच अक्षराचाच तर फरक पण अर्थ किती वेगळा आहे दोन्ही शब्दांचा! का वेगळा नाहीच आहे? रिचवल्यावरच रिझवता येतं ना?

तुझ्या लेखाबद्दल काय बोलू? दुर्गा भागवतांचे एक वाक्य आहे - 'अनुभवातला कोवळेपणा, सच्चेपणा, लसलशीतपणा जेंव्हा लेखनात उतरतो तेंव्हा ते लेखन श्रेष्ठ असते'. तुझ्या लेखाने त्याची प्रचिती दिली.

अवल,

कथा आवडली. मात्र ती काल्पनिक आहे.

कारण ही द्रौपदी अगतिकपणे अश्रू ढाळणारी आहे. वस्त्रहरणप्रसंगी ती असहाय्य जरूर होती, पण अगतिक अजिबात नव्हती. पांडव दास झाले असतांना कौरवांसोबत द्यूत खेळू शकत नाहीत. तसेच ते जरी दास असले तरी मी दासी कशीकाय होऊ शकते, हे दोन प्रश्न तिने सभेला विचारले. धृतराष्ट्र, भीष्म, द्रोण, पांडव हे सारे अगतिक आहेत. ती नाही.

तिचे अश्रू संतापाचे आहेत, मुळूमुळू रडणाऱ्या बाईचे नाहीत. वस्त्रहरण चालू असतांना कुणाचीच डोकी ठिकाणावर नव्हती. अपवाद फक्त एकच. ती म्हणजे स्वत: द्रौपदी.

द्रौपदीचा अपमान का होऊ दिला, म्हणून श्रीकृष्णास राधा जाब विचारतेय. हे जर रास्त असेल, तर मग द्रौपदीला ऐनवेळी नेमके प्रश्न विचारायची कुशाग्र बुद्धीही त्यानेच दिली असं म्हणायला पाहिजे.

असो.

लेखाची दुसरी बाजू दाखवण्याचा माझा एक अल्पसा प्रयत्न! गोड मानून घ्या. Happy

आ.न.,
-गा.पै.

सर्वांना धन्यवाद !
ड्रिमगर्ल, >>>काळ बदलला... संदर्भ मात्र फारसे बदलले नाहीत! <<< अगदी ग Happy

सुम, मी कृष्णाला देव मानण्यापेक्षा त्याला एक सजग, जाणीव असणारे, भावना-व्यवहार यांचा समतोल साधणारे,... असे व्यक्तिमत्व म्हणून पाहते.

माधव, काय बोलू, शब्द नाहीत माझ्याकडे.... मनापासून धन्यवाद.
आणखीन एका गोष्टीसाठी धन्यवाद... मीरेचा विचार आता पर्यंत या लेखमालेसाठी केला नव्हता, आता करते Happy खूप छान काही सूचवलत Happy ( अर्थात मीरेवर वाचायला हवं आधी )

गामा, अगदी खरं. द्रौपदी नव्हती च मुळुमुळु रडणारी, पण तो प्रसंग भल्या भल्यांना हादरवणारा, द्रौपदीपण हलली असेलच... बहुदा माझ्या लिखाणात ते प्रकर्षाने उतरलं नाहीये...पुढच्या वेळेस अजून प्रयत्न करेन्, धन्यवाद.

खरे तर पहिल्या भागातच लिहायला पाहिजे होतं. पण पुढच्या कोणत्या तरी भागात ते आपसूकच वाचकांपर्यंत पोहचावं असा विचार आहे. पण मी फार हळु हळु लिहितेय त्यामुळे जरा जास्त उशीर होईल म्हणून इथे विचार मांडून ठेवतेय

माझ्या मनात राधा म्हणजे दुसरं तिसरं कोणी नसून कृष्णाचे अंतर्मनच आहे. भले- बुरे, नैतिकता- अनैतिकता, राजकारण- माणुसकी, ... या सा-यात एक तरल सीमा रेषा आखणारे त्याचे मन म्हणजे राधा. आणि म्हणून ही राधा त्याला त्याच्या सा-या आयुष्यभर भेटत राहतेय. खरी राधा गोकुळापुरती; पण ही त्याची मनसखी मात्र सतत त्याच्या सोबत, त्याला सजग ठेवणारी. भाष्य राधा करतेय पण त्या मागचा विचार कृष्णाचाच!
बघु कसे जमतेय ...

तुम्हा सगळ्यांच्या प्रतिसादातून एक उत्साह मिळतो. आणि हे सारे मायबोली मुळे. मायबोली चे पुन्हा एकदा मनापासून आभार !

Pages