दोन गझला

Submitted by वैवकु on 6 November, 2014 - 10:28

_____________________________________________________
गझल : माझ्या लक्षातच नाही

हा माल सुखाचा माझा का विकला जातच नाही
काय आज ह्या बाजारी कोणी दुःखातच नाही

नशिबाला पालटण्याचे केवढे यत्न केले पण
होणार कसे सांगा जर त्याच्या नशिबातच नाही

मी इथे जन्म घेण्याला झालीत कितीतर वर्षे
हे दुःख साजरे करणे माझ्या लक्षातच नाही

का नको त्यातिथे टाके घालत आहे हा शिंपी
आंधळाच आहे हा की काही पाहातच नाही

गावातिल सगळ्या शाळा आहेत मुलींच्या शाळा
हे पाहुन माझा मुलगा शाळेला जातच नाही

नेणिवबिंदूंतुन काही त्रिज्या खेचूया म्हटले
पण ह्या अमोघ परिघाला बहुधा संपातच नाही

________________________________________

गझल : ज्यामुळे जग ही नशीली रम्यता राखून आहे

ज्यामुळे जग ही नशीली रम्यता राखून आहे
ते तुझे अपसव्य कुठली सव्यता राखून आहे

येथले अस्तित्त्व जपणे हे खरे खोटारडेपण
बन अशी आख्यायिका जी सत्यता राखून आहे

तोडले केव्हाच आपण आपले नाते तरीही
का अशी , ते एक हल्की तन्यता राखून आहे

जीवघेण्या वेदनांवर हासणारी सांत्वने ही
पण तरी कळीज माझे सभ्यता राखून आहे

दाद द्यावी ह्या, मनाच्या एवढ्याश्या ओसरीला
एवढ्या दाटीतही जी , भव्यता राखून आहे

विठ्ठला तू ऐकशिल ना तर तुझ्या झरतील आर्ता**
आजही मन त्या गझलची शक्यता राखून आहे

_____________________________________________________

आर्ता = आर्त आहे अशी ती . आर्त करते अशी ती . अंतःकरणाच्या आर्ततेतून अस्फुटपणे ओठांवर येते ती "आह!" ही दाद .ह्या शब्दाचे अनेकवचनही मी आर्ता असे योजले आहे ( हिंदीत "आहेँ" ) ह्याच अनेकवचनी अर्थाने हा शब्द शेरात वापरला आहे.>>>>विठ्ठला तू ऐकशिल ना तर तुझ्या झरतील आर्ता <<<<
(हा शब्द मुलीचे नाव म्हणूनही खूप सुंदर नाव ठरेल असे वाटत आहे .असो ! )
धन्यवाद .

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रियाताईंशी १०० सहमतच ! एकापेक्षा एक शेर व्वा !

हा एक शेर मात्र बरोबर समजला बरका . तो आनंदयात्री नामक कोण गृह्स्थ आहे तो मागे एकदा तुमच्या एका हृदय पिळवटून टाकणार्‍या प्रतिसादावर कुत्सित हसला होता हे मला आठवत आहे . काय सण्सणीत टोलावले आहे त्याला वा वा ! बॉल अगदी ग्राउंडच्या बाहेरच !

जीवघेण्या वेदनांवर हासणारी सांत्वने ही
पण तरी कळीज माझे सभ्यता राखून आहे
<<< व्वा !!

एरवी कवी अबोल पाहिजे >>>> ही आदरणीय डॉ. कैलास गायकवाड सरांची ओळ आठवली अगदी

असो !! आर्ता हा अतीशय सुंदर व नेमका शब्द तयार केला आहेत बरका त्यासाठी अभिनंदनच आपले

धन्यवाद

'आर्ता' आणि 'तन्यता' या दोन शब्दाबद्दल अखिल मराठी जगत आपली 'धन्यता' मानत आहे. बाकी लिहित राहा.

-दिलीप बिरुटे

नशिबाला पालटण्याचे केवढे यत्न केले पण
होणार कसे सांगा जर त्याच्या नशिबातच नाही

मी इथे जन्म घेण्याला झालीत कितीतर वर्षे
हे दुःख साजरे करणे माझ्या लक्षातच नाही<<< वा वा

=====================================

येथले अस्तित्त्व जपणे हे खरे खोटारडेपण
बन अशी आख्यायिका जी सत्यता राखून आहे

दाद द्यावी ह्या, मनाच्या एवढ्याश्या ओसरीला
एवढ्या दाटीतही जी , भव्यता राखून आहे<<<

मस्त!

=====================================

आले आले!

व्वा !

आभार सर्वांचे Happy

इतके प्रतिसाद येतील असे वाटले नव्हते पुनश्च आभार सर्वांचे

___________________________________________________

बिरुटे मास्तर इतके दिवस कुठे खपलेलात ते सांगा आधी !!!!!!
आणि काय हो तुमचे गुरुवर्य गझलपूअरकर डच्चू स्वीकारून मायबोलीला पारखे होतात तेव्हाच तुम्ही कसे उगवता ??
असो घ्या मजा घ्या !!!

मी इथे जन्म घेण्याला झालीत कितीतर वर्षे
हे दुःख साजरे करणे माझ्या लक्षातच नाही

ह्या दोन ओळी वाचल्यानंतर तुम्ही संवेदनशील व्यक्तिमत्व असाल अशी अटकळ बांधावीशी वाटली. बाकी काव्यसौंदर्याच्या अनुषंगाने अधिकाधिक सुधारणा कशा करता येतील हे पाहिल्यास उत्तम.

शुभेच्छा!

बेफिकीर,

विषयातल्या आपल्या रूचीबद्दल मनःपूर्वक आभार. कवीचे स्वतःचे ह्यावर काय मत आहे हे जाणून घेऊयात म्हणजे नि:संकोच लिहायला मला बरे!

जशी आपली इच्छा! आधीचा प्रतिसाद संकोचून लिहिलेला आहेत हे लक्षात आले नव्हते.

>>>> बिरुटे मास्तर इतके दिवस कुठे खपलेलात ते सांगा आधी !!!!!!

कुठे जाणार बाळा वैवकु. मायबोलीवर चांगल्या कविता आणि काही सुंदर शेर शोधायला येतो. मायबोलीवरच्या अनेक लेखांना /चर्चांना वाचून जातो. वाचायचं कंड आहे. बाकी, मी शोधत असतो अस शेर जो साला मला म्हणायला लावेल वाह उस्ताद वाह. दुर्दैवाने आपल्या रचना ज्याला मी गझला म्हणायचं धाडस करणार नाही. कारण आकृतीबंध गझलेचा असला म्हणजे ती उत्त्म गझल असते असं समजणार्‍यांपैकी मी नाही. बाकी, आपल्या लेखनात काही ओळीमधे जे काही खुप थोर शब्द नवीन शब्दांच्या थाटात देवदर्शनाची रांग सोडुन मधेच घुसणा-या लोकांसारखे येतात त्याची मोठी गम्मत वाटते. उदा. ’तन्यता’ या शब्दाचा काय अर्थ लावायचा ? म्हणुन अशा शब्दांनी माझी खुप करमणुक होते. दोन क्षण आनंदात जातात. हहपुवा होते.

उदा. पाहा.
ज्यामुळे जग ही नशीली रम्यता राखून आहे
ते तुझे अपसव्य कुठली सव्यता राखून आहे

ते तुझे ''अपसव्य '' कुठली ''सव्यता'' राखून आहे. साधी सरळ ओळ करता आली असती. पण लक्षवेधक शब्द रचना करण्याच्या नादात कशाचा कशाला मेळ लागत नाही. आता अपसव्य म्हणजे 'उजवे' आणि 'सव्य' म्हणजे डावा (चुभुघेदे) आता कसा अर्थ लावायचा. डोक्याला झेंडुबाम लावायची वेळ आली मला.

>>>> आणि काय हो तुमचे गुरुवर्य गझलपूअरकर डच्चू स्वीकारून मायबोलीला पारखे होतात तेव्हाच तुम्ही कसे उगवता ?? असो घ्या मजा घ्या !!!

हाहाहा कै च्या कै शोध. अहो, तुम्ही मला कधीही हाक मारा. तुम्ही दळण आणलं दळायला की मला सांगा मी वाचायला येईनच येईन.

बाकी, तुमच्या लेखनाला तुमचे गुरुवर्य सतत करंगळी लावतात तीही एक चांगली करमणुक असते. पहाटे पहाटे जात जा मॉर्निंग वाकला त्यांच्याकडे आणि काही कडवट औषध घेत चला काही फरक पडला तर पडला. हाहाहा.

-दिलीप बिरुटे

बिरुटेंच्या प्रतिसादात मी उहापोह करू इच्छित असलेल्या मुद्द्यांपैकी दोन तीन गोष्टी आपसूक आलेल्या आहेत त्यावर मेहेरनजर व्हावी बेफिकीर!

दिग्गज समीक्षकाचा आव कृपया आणू नये कोणीही!

काय म्हणायचे आहे ते स्वतः नि:संकोचपणे व नि:संदिग्धपणे म्हणावे नाहीतर उगी राहावे, दुसर्‍याचा प्रतिसाद वाचून बघा, तिसरा तेच म्हणतोय जे मी म्हणतोय वगैरे तारे तोडलेले पाहण्यात स्वारस्य नाही.

=============

बिरुटे,

तुमचे गझलेवरचे प्रतिसाद हे मनोरंजनाचे मोठे साधन आहे. तुमची ही ईश्वरदत्त प्रतिभा अबाधीत राहो.

बेफिकीर,

आधी तुम्ही घेतलेले वैवकुंचे वकीलपत्र खाली ठेवा बरे! ते आलेल्या प्रतिसादांवर काहीच बोलत नाहीत आणि तुम्हीच सरसावला आहात. तुमची मते आमच्याच आगामी प्रतिसादांवर देण्यासाठी राखून ठेवा जे तुमच्या आगामी साहीत्यावर येऊ घातलेले आहेत.

तुमच्या वरील प्रतिसादावरून हे स्पष्ट दिसून येत आहे की तुम्हाला काव्यसौंदर्यशास्त्रात काडीमात्र रूची नसून शिष्योत्तमाच्या कवितेवर आलेल्या तर्कसुसंगत परंतू तुम्हाला न आवडणार्‍या प्रतिसादांना खोडून काढण्यात जास्त रस आहे. किंवा बिरूटेसारख्यांची खिल्ली उडवून गंमत पाहण्यात, जी स्वतःच्या कुठल्या लेखनावर झाली तर तुमचा किती तिळपापड होतो हे मायबोलीवर गेली चार वर्षे अनेकांनी पाहिलेले आहे.

इतरांच्या प्रतिसादांतला प्रामाणिकपणा तुम्हाला दिसावा अशी अपेक्षा करणेच चूक आहे म्हणा.

>>>>>> तुमचे गझलेवरचे प्रतिसाद हे मनोरंजनाचे मोठे साधन आहे. तुमची ही ईश्वरदत्त प्रतिभा अबाधीत राहो.

बाळा बेफिकिर, कोणतंही लेखन मग प्रतिसाद असो किंवा अन्य कोणतंही लेखन ते लिहिल्याच जात असतं मुळी आनंदासाठी आणि मनोरंजनासाठी किंवा प्राचीन साहित्यकारांनी लेखनाचे अनेक विविध प्रयोजने सांगितली आहेत. आचार्य भामह, वामन, मम्मटांनी यावर खुप लेखन केलं आहे. कोणी म्हणालं लेखन करायचं ते आनंदासाठी , कोणी म्हणालं यशप्राप्तीसाठी, कोणी म्हणालं इच्छापुर्तीसाठी , कोणी म्हणालं भावनेच्या विरेचनासाठी असे बरेच..असो. (तुम्हाला काय सांगू उपयोग आणि सांगितलं तरी ते कळलं पाहिजे ना) आता आपलेच ''पत्नीशी वाद कसा काढावा - एक डझन उपाय'' हे लेखन किती पांचट असले तरी ते लेखन मनोरंजन करतेच ना, उगा का काही प्रतिभा असल्याशिवाय माणुस लेखन करतो आमचंही लेखन प्रतिसादाच्या बाबतीत तसंच आहे. असो, आपलीही मग पांचट असली तरी प्रतिभा अशीच बहरत राहो अशी मनःपूर्वक शुभेच्छा.

-दिलीप बिरुटे

बिरुटे,

माझा वरील प्रतिसाद नव्याने शब्दबद्ध करतो म्हणजे मग तुम्हाला तो अचूकपणे समजेल. ह्यापेक्षा अधिक प्रयत्न करायला लावू नका अशी विनंती!

"तुमचे गझलेवरचे प्रतिसाद हे तुमच्या नकळतच अतिशय मनोरंजक प्रतिसाद असतात, ही तुमची तुमच्या नकळत तुम्हाला अवगत झालेली ईश्वरदत्त प्रतिभा अशीच अबाधीत राहो'

बाळा बेफिकीर, मलाही खुप लिहायला लावू नका, ही विनंती. आपल्याला जेवढं कळतं तेवढंच लिहा. उगा दळण दळू नका. आपली नसलेली पण खुप गाजावाजा झालेली छोटीशी प्रतिभा अशीच आबाधित राहो.

-दिलीप बिरुटे

वरील बिरुटे आणि आत्ममग्न यांचे प्रतिसाद वाचून मोठी गम्मत वाटली पण मी प्रतिसाद मात्र सीरीयसली देणारय
ह्या पुस्तकी पंडितांचे म्हणणे मनावर मी का घ्यावे ह्यांनी माझ्या गझलेला आजवर दिलेच काय आहे ? घंटा !!!

बिरुटे महाशय नेहमी माझ्या व बेफीजींच्या गझलेवर तोंडसुख घेतात आमच्या गझलांनी ह्यांचे काय घोडे मारलेय काय माहीत

आत्ममग्न कोण आहे काय माहीत पण त्याच्या "काव्यसौंदर्यशास्त्र" ह्या शब्दाला देवपूरी तंबाखूचा वास येतोय . हा देवपूरकरांचा सातवा अवतार वगैरे असेल तर ह्याच्याशी बोलताना विशेष काळजी घ्यायला हवी इतकेच कळत आहे

बाकी मी फक्त एका विधानाचा निषेध मात्र करीन >>दुर्दैवाने आपल्या रचना ज्याला मी गझला म्हणायचं धाडस करणार नाही. कारण आकृतीबंध गझलेचा असला म्हणजे ती उत्त्म गझल असते असं समजणार्‍यांपैकी मी नाही. << तुमची हिम्मत वाखाणण्याजोगीच बघा बिरुटे !! मराठी गझलेचे पिता सुरेश भट देखील असे म्हणताना कचरावेत असे विधान इतक्या लीलया करू धजणे खायची गोष्ट नव्हेच ! (इतक्या विनंत्या केल्या पण स्वतःच्या गझलेची साधी एक ओळ कधी आमच्यापुढे आणली नाहीत . लिहितातरी का हेही माहीत नाही . असो मरो !)

एक बाब शिकवावी म्हणतो बिरुटे तुम्हाला ...काय निंदा करायची ती शायराची करावी गझलेची नव्हे
गझलेची निंदा करू शकणारा कधीच गझलला समजू शकणार नाही हे मात्र खरे

असो हेही मरो !!

_______________________________________________

बीफीजी आभार मानून मी आपल्या प्रगल्भ गझलभावनेला ठेच पोचवू इच्छित नाही पण आज माझ्या एका शेरासाठी माफी मात्र मागीन ..
मध्यंतरी आपले प्रतिसाद माझ्या गझलेला लाभत नसत तेव्हा मला वाटे की आपल्याला माझ्या गझलेची चिंता नाही वगैरे आणि मी फार व्यथित होत असे मी हा राग एका शेरातून काढावा म्हटले तो शेर असा होता

स्वतःच्या बाबतीमध्ये म्हणे तो बेफिकिर आहे
खरे तर हेच की त्याला कुणाची काळजी नाही

ह्या शेरासाठी क्षमस्व बेफीजी !!
तुम्हाला माझ्या गझलेची काळजी करताना आज पाहून मनाला बरे वाटले खूप
मुळात तुमच्या इतकी गझलची काळजी घेताना मी आजवर कुणाला पाहिले नाही आहे

तुमच्या सारखी गझलेची काळजी मला लागो !
अजून काय बोलू ? Sad

पुनश्च क्षमा !!
_________________________________________

इतर सर्व प्रतिसाददात्यांचे अंतःकरणपूर्वक आभार !! Happy

>>>आत्ममग्न कोण आहे काय माहीत पण त्याच्या "काव्यसौंदर्यशास्त्र" ह्या शब्दाला देवपूरी तंबाखूचा वास येतोय<<<

म्हणूनच वैवकु मीही वयाचा आदर ठेवूनच बोलत होतो त्यांच्याशी, मलाही तेच वाटत आहे. असो!

माझ्यासाठी विषय संपला. 'काव्यसौंदर्याच्या अनुषंगाने अधिकाधिक सुधारणा' इतक्याच शब्दप्रयोगाचा विस्तार जाणून घ्यायची इच्छा होती. आता बहुतेक तुमच्या जमीनीवर पर्यायी गझल करून त्याची उदाहरणेच दाखवली जातील. तेव्हा बघू.

बाळा वैवकु, माझ्या प्रतिसादात साधे प्रश्न विचारलेले होते ज्याची तुम्हाला उत्तरं देता आली नाही. आपल्या लेखनात आलेल्या या शब्दांचा नेमका अर्थ काय आहे, ते सोडून निरर्थक व्यक्तिगत लिहित आहात, लिहित राहा. मी तर आहेच. आपल्या अशा लेखनात येणार्‍या बट्बटीत, अघळपघळ, नावीन्याच्या थाटात जे काही कैच्या कै शब्द रचनेत येतात अशा लोकांच्या जमातीचा मर्ढेकरांनी खूप पूर्वीच समाचार घेतला आहे, त्यांच्या काळातही असे लोक होतेच होते. त्यांची 'इरेस पडलो' कविता माहितच असेल.

इरेस पडलो जर बच्चमजी
तर भाषेची ऐशीतैशी
उलटीसुलटी करीन मीहि
भव्य भयानक विराट कपबशी.

दैनंदिन जीवनातील शब्दांना अधिकाधिक अर्थवाही केलं पाहिजे. फुकट शब्दांचा बाजार करु नये, कारण लेखनाची भाषा आणि बोलण्याची भाषा यातलं अंतर कमी केलं पाहिजे आपण काहीतरी जगावेगळं लिहितोय असा आव आणून निरर्थक शब्द जे पूर्वीच जन्मले आहेत त्यांची कशाला विनाकारण मोडतोड करायची. खरं म्हणजे आडात नसलं तर पोहर्‍यात येणार कुठून. प्रतिभेचं देणं असावं लागतं.

कधी लागेल गा नख
तुझे माझिया गळ्याला
आणि 'सामर्थ्याचा स्वर'
माझिया गा व्यंजनाला.

सामर्थ्याचा स्वर झालेले शब्द लेखनात आले पाहिजेत. शब्दांवर, हुकुमत असावी लागते आणि अशा शब्दांना एक प्रतिभाही लागत असते. आणि अशी प्रतिभा कोणालाही लाभत नसते. उगाच-

'विठ्ठला पाहशील प्रतिसाद, झरतील आता नेत्र तुझे' असे म्हणुन त्या विठ्ठ्लावर सारखा अन्याय करण्यात काय मतलब आहे. अरे हो, मला गझल लेखन करता येत नाही. पण, स्वयंपाक येत नाही म्हणुने जे केलेलं असेल त्यात मीठ कमी जास्त कुठे आहे हे नक्कीच चांगल्या प्रकारे सांगता येतं कारण मी आहे चवदार आणि चवीने खाणारा. अजून एक जाता जाता फुकाचा सल्ला काही दिवस लेखन थांबवून आपण उभयंतांनी कुठे तरी निसर्गरम्य ठिकाणी जाऊन या. खुप वाचा, खुप पाहा, खुप अनुभवा आणि मग पाहु या खरेच का आपल्या प्रतिभेला धुमारे फुटतात म्हणुन. Happy

ह्याव अ गुड डे. धाग्यावर लक्ष आहेच.

-दिलीप बिरुटे

Pages