माझे कॉफी डूआयडी

Submitted by दाद on 5 November, 2014 - 21:54

ऑस्ट्रेलियात, इथल्यांसारखं बोलायचं झालं तर भारी तोंड वेंगाडावं लागतं.
हॅय म्यॅयट... म्हणजे हाय मेट... (mate).
सॅन्ड्येय... मॅन्डॅय.. सॅट्टॅड्यॅय...
पॅरामाटा... स्पेलिंग आहे - parramatta.. अगदी डब्बल र आणि डब्बल ट जड जाईल पण म्हणून .. पॅय्मॅटॅ? असं बोबड्यात काय म्हणून शिरायचं? मी म्हटलेलं त्यांना पॅरमिटर पासून परमात्मा पर्यंत काहीही ऐकू येतं.
नको तिकडे शब्दं तोडतात ते एक... चांगलं घसघशीत 'सेन्ट लिओनार्डस' म्हणावं तर्खडकरीत तर नाही... सॅन्टलिनर्डस... मला बाजूचा नकाशा घेऊन ’इथे इथे नाच रे मोरा’ करीत ते स्टेशन दाखवावं लागलं होतं तिकिट खिडकीतल्या म्यॅयटला.

आपल्या भारतीय नावांची तर छान विल्हेवाट असते.
लवान्न्या... मला हिला भेटण्यापूर्वी कुणी स्पॅनिश वगैरे असल्यासारखं वाटलं... निघाली लावण्या. तेच मग हिरान्न्याचं.... ज्याला राम्या म्हणत होते ती निघाली रम्म्या.
मग्डा... म्हणजे मुग्धा... शीटॉल, म्हणजे शीतल.. मकेश म्हणजे मुकेश... निटिंग म्हणजे नितिन...

एक आहे 'देव देव'... ते खरा आहे 'देव दवे'. नेवाळकर स्वत:च स्वत:ची ओळख 'नेवॉकर' म्हणून करून देतात. टकलेबाईंना टॅकल म्हणतात, आणि थिटेंची मुलगी स्वत:चं आडनाव 'थाईट' सांगते. आपटे महद्प्रयत्नांती 'ऍप्ट' पर्यंत तरी येतात. फ़ाटक... 'फ़टॅक' झालेत.

आमच्या प्रोजेक्टवर चेन्नईमधून माणसं घेण्याची थोर परंपरा आहे. खूपसे कुमार, श्रीनी, शंकर आहेत... झालच तर नील (नीलेन्द्रस्वामी), थंबी (ह्याचं नाव खरतर मोहम्मद मरिका थंबी आहे... पण मोहम्मद आहेत अजून तीनेकतरी... मरिका त्याला नकोय.... मग उरेल ते), मो( मोहम्मदच... अती तिथे माती झालीये ह्या नावाची इथे)... पुढल्या मोहम्मदला काय म्हणणारेत कुणास ठाऊक.
शॅम (वसुधैवम शामसुंदरम).. वॅसू (वासुदेवम संबंधंम), सम (अजून एक वासुदेवम संबंधंम).

एकदा गोविन्दप्रसादम शण्मुगवेलयुदम नावाचा कुणी टीमवर येणार म्हणताना मॅनेजरची पाचावर धारण.. हे कसं म्हणायचं? ह्यातलं काय म्हणायचं? किती म्हटलं तर चालेल?
त्याचा कोटी जप करूनही त्याला वाचासिद्धी सोडाच... ते नावही सरळ घेता आलं नसतं.

’.. आपण ह्याला कुमार म्हणूया?’ ह्या त्याच्या प्रश्नावर माझ्या नकळत मी कपाळावर हात मारून घेतल होता... ’व्हॉट? व्हॉट? डज इट मीन समथिंग रॉन्ग?’ ह्यावर काय बोलणार?

मी ह्या टीममधे आल्यावर सगळ्यांची ओळखपरेड झाली. आणि दुसर्‍याच दिवशी मॅनेजरने मला टीम मिटिंग भरवायला सांगितली. मी मिटिंग इन्व्हाईट ड्राफ़्ट करून त्याला दाखवलं.
’गंजा? गंजालापण घाल ह्यात’

मला काही केल्या टीममधे टकलू कोण ते आठवेना... खूप विचार करून शेवटी मलाच गंजत्वं प्राप्तं होणार असं ध्यानी आल्यावर एका देसीची मदत मागितली...’अरे, टकलू कौन है अपने टीम मे?’
’... अरे क्या बात... आपुनका बॉस हैना.. रॉड’. आता तो स्वत:ला टकलू म्हणवून घेईल इतका सहृदयी, उदार वगैरे मुळीच नव्हता.
’नही रे... वही बोल रहा था.. किसी गंजा को ऍड करनेको’...

(इथे फ़क्तं देसीच मारू शकेल असला सणसणित हात कपाळावर मारून घेत)’.. अरे टकलू टकलू क्या फ़िर? गंजा बोलो ना’ मला हा गांजा पिऊन आल्यासारखा दिसायला लागला होता.

’गंजा याने टकलू नही?’ हा आपल्याला मदत करणारय हे विसरून मी त्याला जितकं वेड्यात काढत येईल तितकं वेड्यात काढत म्हटलं.

’नही... बोले तो है... लेकिन वो... गंगा सुब्रमण्यम है ना.. उसको सब गंजा बोल्तेय’...इथे मी त्याच्याहीपेक्षा मोठ्ठा जबरी फ़टाका कपाळावर फ़ोडला. ती गंगा पोटरीपर्यंत शेपटा मिरवून होती... तिला गंजा म्हणतायत येडे.

’... ये आउझी लोग गंगा नै बोल सकते ना.. तो गंजा हो गया... अरे... गॅन्जेस नै बोल्ते क्या आपुनके गंगामैया को? तुम भी एकदम अन्नड की त‍र्हा क्या...’
तरी मी उगीच गोंधळ नको म्हणून तिला फोन लावला. तर तिचा व्हॊइस मेल वर गेला ,... हॅलो धिस इज गंजाज व्हॊइस मेल...’
माझ्या कपाळावर लवंगी फ़ोडली मी.

शलाका हे नाव तोंड वेंगाडत वेंगाडत श्यॅल्यॅक्यॅ असं घ्यायला... घेऊन होईपर्यंत लकवा भरेल इतकं वेंगाडावं लागेल... म्हणून कदाचित बरं घेतात. पण ते मी तंबी दिलेले किंवा मला ओळखून असणारे... बाकिच्यांचं काय?

शकाला.. शलाला, शाकाल, शाकालाका.. इथे मला बुम असं ओरडावसं वाटतं... इथवर ठीकय.
श्रीलंका? "that indian lady.. name shrilanka". काय लॉजिकै का?

गिहान्था कनगहपिटया... हे एक श्रीलंकन पात्रं आहे टीममधे. मधे एक दिवस अख्ख्या टीमने धाड घातली खाली कॅफ़ेवर. ह्याच्या नावाचा गोंधळ माझ्या नावापेक्षा भारी घालतात. ऑर्डरवर घालायला त्याचं नाव विचारणार्‍या रजिस्टरमागच्या चवळीच्या शेंगेला त्याने सांगितलं.. जस्ट पुट ’जी’.
थोड्यावेळाने त्याची ऑर्डर घेऊन जी ओरडत आली ती... ’पुट्जी... पुट्जी... पुट्जी....’. आम्ही हसून हसून मेलो.

मी शहाणी झाले होते. म्हणून पुढल्यावेळी ऑर्डरवर नाव विचारल्यावर मी नीट म्हटलं... ’एस’... तिनं चमकुन बघितलंही माझ्याकडे. मी परत मान हलवत सांगितलं ’एस्स’... हवेत दोन वेळा इंग्रजी एस काढून दाखवला.
पुटजीने अंगठा वर करून दाखवलाही.

माझी ऑर्डर बाहेर घेऊन आली ती ओरडत आली... ’ऍssssस.. ऍssssस.... ऍssssस’. पुटजीच्या तोंडातून कॉफ़ीचा फ़वारा.
माझी काही हिम्मत झाली नाही ऑर्डर घ्यायची. कोण तो ’ऍssssस..’ पुढे न आल्याने पुढल्या खेपेला ती आतल्या पदार्थाच्या नावे ओरडत आली. तेव्हा कुठे धीर आला मला हात वर करण्याचा.

आता मी निर्ढावलेय... काय वाट्टेल ती नावं सांगते. जेनी, फ़ेनी... हे माझे कॉफ़ी डूआयडी आहेत.. प्रत्येकवेळी रजिस्टरमागची डोळे वटारुन बघते. प्रत्येकवेळी मी तिला हसून ’ आय होप दे प्रोनाउन्स इट बेटर टुडे’ असं म्हणते.

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

भारीय हे.
तू दाद सांगत जा. म्हणजे डॅड नावाची बाई बघून ते लोक झीट येऊन पडतील.
शॅला किंवा सॅली सोप्पं नाही का?

हाहाहा... आमच्या पोलिश आणि बेल्जियमकर मित्रांना माझे नाव शिकवायला थोडीफार मेहनत घ्यावी लागली. त्यांच्यासाठी प्रथमेशचे officially प्रथम करावे लागले.
बाकी काही बिजयानंद, कुमारास्वामी ई. मंडळींना ज्यांना नाव छोटे करणे आवडत नाही, त्यांचे रोज नविन नामकरण होते. Proud

Lol
तू दाद सांगत जा. म्हणजे डॅड नावाची बाई बघून ते लोक झीट येऊन पडतील. >> Proud
अर्चनाची बरीच वाट लावतात इथेही .. अरचना, अर्काना! बरं दोनदा सॉरी वर की तुझं नाव नीट घेता येत नाही म्हणुन..

आमच्या Bupa क्लाएंट कडुन एक ईमेल आली - आयडी होती - Rasalkar
सगळे ऑझी अ‍ॅक्सेंट मधे शोध लावताय .. रॅसल्कर, रझॅलकर वगैरे वगैरे.. नंतर साक्षात्कार झाला की अरे हा तर रसाळकर आहे !!

मस्त,

एका जमान्यात मी खुप उंच ( आजही आहे ) आणि वजन फार नव्हत तेव्हा एक मित्र निथिन म्हणायचा.

निटिंग म्हणजे नितिन.. आणि माझ्या आडनावाची काय वाट लागेल कुणास ठाउक ?

Biggrin
स्वानुभवाचे गल्फ मधले बोलः-
सायरस = सिरियस
प्रमोद = परमोद
प्रविण = परविन
अरबी लोकात सरसकट 'ज' ला 'ग' म्हणतात त्यामुळे,
राजेश = रागेश
खिमजी = खिमगी वगैरे वगैरे...
.. आणि मला अमित = हमीद, अहमद असं काहीही Uhoh

आपणही त्यांच्या नावाची वाट लावतोच ना.. Wink
फ्रेंच clement नावाचा उच्चार आपण 'क्लेमेंट' असा करतो (जो की आपल्याला बरोबर वाटतो) पण फ्रेंच लोक्स 'क्लेमॉन' असा करतात (खरेतर 'क्लेमाँ' असा).
martin नावाचही असच, आपला उच्चात 'मार्टिन' असा तर, तिथले लोक्स त्याचा 'माह्टान' असा करतात (जो त्यांच्या दृष्टीने बरोबर आहे)
बाकी ही बरिच उदाहरणे आहेत, मेट्रो आणि बस मध्ये तर मज्जाच मज्जा, Robinson RER हे स्टेशनच नाव फ्रेंच मध्ये 'रोबॅस्सन एहरेर', 'Bagnuax' चा उच्चार 'बान्यु'.

हा लेख वाचुन मला एक जुना किस्सा आठवला , भारतातलाच , माझ्या गावतलाच , माझ्या मैत्रीणीचा. आमच्या इथे वंजारी समाज भरपुर प्रमाणात आढळतो, त्यांची आडनावे .. वडे , पिंपळे , संखे अशी, ११ वीत असताना इंग्रजी शाळेतील एक मुलगी माझ्या वर्गात शिकायला आली होती, तिचे आडनाव विचारता ती नेहमी सँख अशी स्टाईल मधे म्हणायची मी विचारात पडले होते हि मुलगी तर मराठी आहे मग आडनाव सँख कसे असेल? तिला सांगितलं स्पेलींग लिहुन दाखव तर तिने लिहुन दाखवलं sankhe , मी म्हणाले अरेच्च्या तु तर संखे आहेस, वंजारी आहेस नं तर ती हो म्हणाली, तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता आणि बाकीच्या मुली आश्चर्याने पाहत होत्या कारण त्यापैकी काही गुजराथी , मारवाडी आणि पंजाबी होत्या म्हणुन त्यांना काही माहीतच नव्हते.

भारी आहे लेख
मास्टरशेफ बघून जरा आता या देशीय लोकांच्या उच्चारांचा अंदाज लावता येतो.
माझ्याही नावाचा सध्या राडा झालेला आहे. दर वेळी कष्टाने अ‍ॅनु रा (रा लांबवायचा) डा ....
बाकी श्रद्धाचे श्रीडा, अमृता चे अमहुता, राहुल चे र्‍हा ऊल हे नेहमीचेच.आम्ही पण बेन्वाचा बेनॉईट आणि पेर चा पियरी करुन आमचा सूड घेतोच.

>>>मी म्हणाले अरेच्च्या तु तर संखे आहेस, वंजारी आहेस नं तर ती हो म्हणाली, तिचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता<<<

जातीच्या उल्लेखाने कोणाला खाली मान घालावीशी वाटणे ह्याचे वाईट वाटले.

(दाद ह्यांच्या लेखावर अवांतर लिहिल्याबद्दल क्षमस्व)

Lol

डॅड >>> Biggrin

मस्तच ग Lol

अरे तु बाहेरचे सांगितले आमच्या साबा, प्रियंका ला श्रिलंका आणि सोहम ला सोमनाथ म्हणायच्या. प्रियंका कामवालीची मुलगी, तिला म्हणाले आजी आहे जाउ दे. पण सोहमचे आई-वडिल एकदम मॉड. म्हटाले त्यांना काय वाटत असेल Lol

जातीच्या उल्लेखाने मान खाली घालावी नाही लागली तिला, ति खोटं बोलत होती म्हणुन तिला मान खाली घालावी लागली, वास्तविक पाहता इथल्या वंजारी समाजातील लोकं खुप हुशार आणि सुशिक्षित (उच्च शिक्षित) आहेत , बहुतकरुन सर्वच शिक्षकी पेशात आहेत. पण ती असं भासवत होती की ती खुप हायफाय वस्तीतुन आलीये लोकल नाहीये, खुप फुशारक्या मारत होती आणि आमच्या भागात जात पात मानत नाही आणि मी वंजारी आहेस ना हे विचारले ते फक्त आडनाव तपासण्याकरता.

अगं ह्याला स्टार बक्स नेम म्हणतात न?
बरेच लोक तेच नाव वापरतात मग नंतर.. त्य देशात सोपं पडावं सगळ्यांना म्हणुन..

एक चक्रधर होता.. त्याचं झालं - chug
क्रीशानु- क्रीस
सत्यप्रकाष- सत्जा
काय बाई गोंधळ नावाचा..

मी जॉईन करणार होते .. नाव बघुन सग ळ्यांना वाटतय बापु येणार पण बाई आलेली बघुन लोकांच्या तोंडात बोटे..

ते अबोली .. अब्दुल शी साधर्म्यकर आहे असं म्हणाले नंतर गंमत सांगताना!

Pages