किल्लीने उडविलेली खिल्ली

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 November, 2014 - 03:20

सोमवारची पहाट उजाडली आणि दिवाळीची ४ दिवसांची लागून आलेली सुट्टी संपुष्टात आली. तशी बर्‍याच दिवसांनी लागून सुट्टी असल्याने रूटीनची कामे करण्यासाठी मेंदू आणि शरीरावर थोडा आळसच चढला होता. पण ऑफिसला पोहोचायचे आहे ही गोष्ट भानावर येताच सगळा आळस खराट्याने झाडतात तसा झाडून टाकला. माझ्यातल्या विदाऊट लाइट, चार्जिंगच्या मानवी यंत्राने भराभर कामाचा रहाटगाडा आटोपायला सुरुवात केली.

ऑफिससाठी घराबाहेर पडताना निसर्गालाही अजून दिवाळीच्या सुट्टीचा आम चढल्याचे ढगाळ वातावरणामुळे जाणवत होते. ४ दिवस मुलींसोबत सतत जवळीक साधल्याने टाटा करताना मुलींचा रडवेला चेहरा अ‍ॅक्टीवाची चावी सुरू करताना अडथळाच आणत होताच.

हेल्मेट विसरून गाडीवर बसण्याचा व सासर्‍यांनी वा मुलींनी हाक मारून ते घेण्यासाठी पुन्हा गेटमधून धावत येण्याचा कार्यक्रम पहिल्या दिवशीही मी पार पाडला. हेल्मेट, सनकोट, रेनकोट, डब्याची पिशवी, मोबाईल ह्या गोष्टींपैकी काहीतरी विसरणे आणि घरातील कोणीतरी गेटपर्यंत गेल्यावर माझ्या लक्षात आणून देणे हाही माझ्या रूटीनचाच एक भाग Happy पण घरातल्या माणसांच्या माझ्यावर आज काय विसरली हे निघताना ठेवण्याच्या वॉच मुळे मी अजून एकही दिवस ह्यापैकी कुठली वस्तू ऑफिसपर्यंत नेण्यापासून वंचित राहिले नाही ह्याबद्दल माझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

तर गाडी सुरू केली आणि पेट्रॉलच्या काट्याकडे पाहिले तर तो लाल रंगाच्या रेषेबरोबर खेळत होता. घरापासून ७-८ मिनिटांच्या अंतरावर पेट्रोलपंप आहे पण ट्रॅफिक सिग्नलपेक्षा उच्च अडथळ्याचे काम करून तिथे पोहोचायला १५ मिनिटे लावतेच.
पेट्रोलपंपावरही आज पांगापांग होती. पेट्रोलपंपवाल्या मालकासाठी ही गोष्ट चिंताजनक असली तरी माझ्यासाठी चांगली गोष्ट होती कारण माझा नंबर लगेच दुसरा लागला. Happy (ही आनंदी स्मायली आहे) ऑफिसला उशीर होतोय ह्या जाणिवेने पटापट गाडीची चावी काढून डिकीला लवून डिकी उघडून चावी हातात घेतली. नेहमीच्या सवयी प्रमाणे उशीर होऊ नये म्हणून एकावेळी अनेक कामे करण्याची खुबी असल्याने डिकीत ठेवलेल्या पर्स मधून एकीकडे पैसे काढत होते तर एकीकडे पेट्रोलवाल्याला आपले लक्ष मीटरवर आहे हे धमकावण्यासाठी माशीनच्या काट्याकडे पाहत होते. पेट्रोल भरून होताच तिथल्या पेट्रोलपंप वरील माणसाने लगेच सुटे पैसे परत दिले ते पर्स मध्ये ठेवून आपल्याला किती घाई आहे हे स्वतःलाच बजावण्यासाठी धाडकन डिकी बंद केली. बंद करताक्षणीच डिकीला लावलेली चावी गायब झालेली दिसली. मी पेट्रोल भरणार्‍यालाच उलट पटकन विचारले चाबी किधर गयी? लगेच माझ्या लक्षात आले पर्स उघडताना चावी पर्समध्ये किंवा डिकीत राहिली. हे भगवान! इतरवेळी मी डिकीलाच चावी ठेवते पण आज नियतीने माझ्या स्मार्टनेसचा कचरा करायचा ठरवीला होता. कधी नव्हे ते पेट्रोल भरणार्‍या माणसाकडून मला लेक्चर ऐकावे लागले अरे मॅडम अशी कशी चावी गाडीत ठेवलीत? हातात ठेवायचीत ना ! आता पुढच्या प्रोसेस साठी त्यांचीच मदत लागणार होती म्हणून चिडीचूप ऐकले.

पाठी एक २०-२५ शीतला मुलगा पेट्रोल भरण्यासाठी उभा होता. त्याचे पेट्रोल भरून झाल्यावर पेट्रोल भरणार्‍याने त्याच्याकडील चाव्या डिकीला लावून पाहिल्या पण कुठलीही चावी लागली नाही. पाठीमागे असलेल्या मुलाने माझ्या बाजूला गाडी लावली आणि तोही इतर लोकांच्या चाव्या लावून पाहू लागला. त्या दिवशी एका चावी मुळे माझ्या सबलेची अबला अवस्था झाल्याने तो माझ्या मदतीसाठी स्वतःचे फोन कॉल अटेंड करत थांबला. माझी पर्सही आत अडकल्याने मोबाइलही बिचारा कावर्‍या-बावर्‍या अवस्थेत आतच राहिला. त्याच मुलाच्या हातातील मोबाईल मी मागितला त्याने बॅलंस नाही, रेंज नाही अशी कारणे न देता मदतीचा मोबाईल पुढे केला. आजकालची तरुण मुलं टवाळ असतात, त्यांना अजिबात माणुसकी राहिली नाही असे शेजारी-पाजारी इतर लोक किती खोट्ट बोलतात याचा प्रत्यय मला ह्या मुलाकडे पाहून आला. सगळीच नसतात बरे तशी मुले अस सगळ्यांना सांगावस वाटलं. मोबाइलवरून लगेच नवर्‍याला फोन लावला व झाला प्रकार सांगून घरातून दुसरी किल्ली आणण्यासाठी सांगितले. अशा वेळी नवरा आपली वकिलीमुळे उरण मध्येच जास्त असतो दूर नोकरी निमित्त जावे लागत नाही व तो अशा संकटकाळी दत्त म्हणून उभा राहतो ह्याचे मला फार भाग्य वाटले आणि नेहमीच वाटते. :स्मितः

फोन करून झाल्यावर थांबलेल्या त्या गुड बॉय सारख्या मुलाला मी जायला सांगितले व मी गाडी पंपच्या एका बाजूला लावली. ह्या वेळी पेट्रोलपंप वरील माणसेही मधून मधून बर्‍याच चाव्या लावून पाहत होती. आता मला सगळी दुनियाच चांगली, सेवाभावी वृत्तीची वाटू लागली. Happy जिथे उभी राहिले तिथला निसर्ग माझे मन रमविण्यासाठी चांगला बहरला होता. रानगवतावर रानफुले फुलली होती, त्यावर फुलपाखरे कदाचित मला बरे वाटावे म्हणून इकडून तिकडे पळत होती. पण आज चक्क माझे त्यात मन रमत नव्हते. आज माझी निसर्ग सौंदर्याची पूर्ण नजर अ‍ॅक्टीवाच्या चावीवर खिळली होती. नवर्‍यालाही माझ्यासारखाच ट्रॅफिक चा अडथळा आला असणार हे कळत होते. पण अजून शंका येत होत्या जर दुसरी चावी घरातून पण हरवली अ सेल तर? किंवा तिही चुकून माझ्या पर्समध्येच असेल तर? असे झाले असेल तर नवर्‍याचा हेंडसाळपणावर ओरडा खावा लागणार, घरी गेल्यावर घरातील व्यक्ती अजून सल्ल्यांचा भडिमार करतील, शिवाय ऑफिसला उशीर होतोय म्हटल्यावर खोटे कधी बोलू नये हे मनामध्ये बालपणापासूनचे रुजवलेले ब्रीदवाक्य पाळत असल्याने ऑफिसमध्ये बॉस मॅडम, कलीग्जमध्ये किल्ली आपली खिल्ली उडवणार ह्याचे वेगळे टेन्शन. अशी सगळी विचारधारा मनात वाहत असताना नवर्‍याची गाडी लांबूनच दिसली आणि एकदम दिलसे हायसे वाटले. नवर्‍याने हसतच माझ्या हातात किल्ली दिली वरून पेट्रोल भरलेस का अशी विचारपूस केली. मी त्या किल्लीने डिकीत पडलेली किल्ली काढली आणि ती किल्ली मला एखादी नकाशावरून शोधून काढलेल्या मौल्यवान वस्तूसारखी वाटली. पुन्हा नवर्‍याने आणलेली चावी मी नवर्‍याकडेच देऊन वर पुन्हा अशा प्रसंगी उपयोगी येईल अशा अविर्भावात नवर्‍याला दिली Lol आणि नवरा घाईघाईत कामासाठी निघून गेला. खरे हाशहुश काय असते ते त्या क्षणी समजले. Happy आता बंद निसर्गमय मनही ह्या किल्लीने उघडले आणि निसर्गातली फुले, फुलपाखरे मला बागडताना सुंदर दिसू लागली. ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर झाला पण बॉस मॅडम मीटिंगमध्ये बिझी असल्याने घडलेली मूर्खपणाची हकीकत सांगावी लागली नाही.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा स्वतःच्या चुकीमुळे कधी ना कधी अशा घटना घडत असतात. पण आपण शक्य तितके सतर्क राहावे असा वरून माझ्याकडून तुम्हा सर्वांना सल्ला Lol

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या नेहमी माझ्या कन्सल्टन्सीतून काम करून घ्यायच्या आणि शुल्क द्यायची वेळ आली की आधी घासाघीस मग टाळाटाळ मग विलंब आणि शेवटी ठरल्यापेक्षा रक्कम कमीच देणार हे नक्की << ?? काम करुन घेतेय की भाजी खरेदी करते?

मस्त लिहील आहे.

आता घर, गाडी, २/४ व्हीलर, कपाट, ऑफिस ह्या सगळ्यांसाठी एक मास्टर की करुन त्याच्या अ‍ॅडिशनल कॉपीज करु नठेवायला पाहीजे Lol

हा चावीचा किस्सा बर्‍याचदा घडतो आमच्याकडे. नवरा कामावर लवकर पहाटेच जातो तेव्हा टेबलवर जे वरती सामान असते ते सगळेच खिश्यात टाकत जातो, जसे कि त्याचे पाकिट, फोन, कार्ड्स आणि त्याच बरोबर स्वतःच्या कारच्या चावीबरोबर माझ्याही कारची चावी खिशात टाकुन जातो आणि मग मी ती घरभर शोधत बसते. Happy

सायकलची किल्ली हरवली म्हणून सायकल उचलून नेउन दुकानातून कुलुप फोडून आणले व पैसे देण्याकरता खिशात हात घातला तर किल्ली खिशात.. असा किस्सा आमच्या शालेय जीवनात घडला होता.

मस्त लिहिलंस जागू..................माझीही झालेली होती अशी गंमत!

'मी केलेला वेंधळेपणा' या बीबीवर फिट्ट बसेल हे... Happy

(माझा असाच एक किस्सा मी तिथे लिहिला होता :हाहा:)

घराच्या बाबतीत तरी मी लॅच वापरत नाही, ते ऑटोलॉकवाले कुलुपं पण हद्दपारच केलेल. किल्ली फिरवल्याशिवाय काम होता कामा नये असं पाहातो. पण या स्कूटरेट्स मध्ये तरी काही पर्याय नाही.

मीही आता लॅच हद्दपार केलेय पण कामवाली बाई मी घरात असताना येते आणि मी घरातुन बाहेर पडेतो तिचे काम होत नाही त्यामुळे तिची सोय व्हावी म्हणुन दाराला ऑटोलॉकवाले कुलुप लावलेय. तेही दोनदा एकदा किल्लीवाल्याला बोलावुन उघडावे लागले. त्यामुळे मी आता किल्लीच्या बाबतीत अतिशय सतर्क राहते.

चेतन गुगळे - सक्काळी सक्काळी मस्त हसले तुमचा किस्सा वाचुन.

चेतन गुगळे तुमच्या लिखाणातल्या बाईंची भुमीका करताना मी निर्मिती सावंतना डोळ्यासमोर धरल. मजा आली वाचताना Lol
सदिच्छां बद्दल धन्यवाद.

जाई, अमित, चनस, मानुषी, लली, कविता धन्यवाद.

रावी, लेले काका, रिया, योकू, पेरू, सुमेधा तुमचे अनुभव ही मजेशीर आहेत.

राजसी प्रत्येकाकडून काहीतरी वेंधळेपणा कधी ना कधी होतच असतो. Happy

इब्लिस ती पेट्रोल पंप वाली माणसे म्हणत होती की जुन्या गाड्यांना आधी काहीतरी टाकुन डिकी उघडता येत असे पण आता पेट्रोल चोरांपासून वाचण्यासाठी लॉकची नविन सिस्टीम केली आहे. Happy

आदिती पहा केल ना मी तुम्हाला जागृत Lol

जागु आज मी सकाळी गाडी काढली पार्किंग मधुन आणि डिकि उघडून बॅग आत टाकली तेव्हा डिकी बंद करण्यापुर्वी तुझं स्मरण केलं बै एकदा Proud

दक्षे Lol अग हे लिहील्यापासून मी पण खुप दक्ष झालेय आणि विशेष म्हणजे हेल्मेट, सनकोट काहीच विसरत नाही. Lol

कविन धन्स.

मी एकदा फोर व्हिलरमध्ये चावी ठेऊन मग दरवाजा लॉक केलेला (दरवाजामध्ये वर येणारे लॉक्स असतात ते खाली ढकलुन, कारण मुलाने सेन्ट्र्ल लोक काड्या घालुन खराब केलेले (वय ३.५) त्यामुळे आतुन मगिल दार उघडुन lock बन्द करावि लागते). त्यात गाडी कल्याणला घराखाली आणि दुप्लिकेट चावि पुण्याला.....त्यात नशिब इग्निशन चालु होते आनि मुलाने XYLO चि मागिल खिडकी चि flap उघडि ठेवलेलि पट्या सरकवुन काच उघडने सर्व प्रकार करुन झाले होते.शेवटि मोठि काठि खिडकितुन आत सरकऊन power window button press करुन खिडकि उघडली पण अन्दाजे २-३ तास गेले आणी गाडिच्या security चि खात्रि पट्ली कि काच फोडल्याशिवाय गाडित प्रवेश मिळने अवघड आहे.

खुसखुशीत फर्मास लेख ! नर्म विनोदी शैली आवडली ! तारांबळ वाचताना हसू आवरेना !
मजा आली वाचताना !

चेतन सुभाष गुगळे यान्नी त्यांच्या शेजारणीचे संवादा सहित उतरवलेले अर्कचित्रही अफलातूनच !

जागू बाई _____________/\_____________

जागु..मस्त मस्त लिहिलेस गं.. वाचताना दृष्ये साकार होत होती सगळी........

आता मज्जा वाटत असेल..पण तेंव्हा काय स्थिती झाली असेल याची कल्पना आली ना.. Happy

जागू | 4 November, 2014 - 13:05

<< चेतन गुगळे तुमच्या लिखाणातल्या बाईंची भुमीका करताना मी निर्मिती सावंतना डोळ्यासमोर धरल. मजा आली वाचताना हाहा >>

म्हणजे माझं वर्णन अचूक होतं तर. त्याही साधारण त्याच साईझच्या आणि तशाच आक्रमक आहेत.

Lol

Pages