किल्लीने उडविलेली खिल्ली

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 3 November, 2014 - 03:20

सोमवारची पहाट उजाडली आणि दिवाळीची ४ दिवसांची लागून आलेली सुट्टी संपुष्टात आली. तशी बर्‍याच दिवसांनी लागून सुट्टी असल्याने रूटीनची कामे करण्यासाठी मेंदू आणि शरीरावर थोडा आळसच चढला होता. पण ऑफिसला पोहोचायचे आहे ही गोष्ट भानावर येताच सगळा आळस खराट्याने झाडतात तसा झाडून टाकला. माझ्यातल्या विदाऊट लाइट, चार्जिंगच्या मानवी यंत्राने भराभर कामाचा रहाटगाडा आटोपायला सुरुवात केली.

ऑफिससाठी घराबाहेर पडताना निसर्गालाही अजून दिवाळीच्या सुट्टीचा आम चढल्याचे ढगाळ वातावरणामुळे जाणवत होते. ४ दिवस मुलींसोबत सतत जवळीक साधल्याने टाटा करताना मुलींचा रडवेला चेहरा अ‍ॅक्टीवाची चावी सुरू करताना अडथळाच आणत होताच.

हेल्मेट विसरून गाडीवर बसण्याचा व सासर्‍यांनी वा मुलींनी हाक मारून ते घेण्यासाठी पुन्हा गेटमधून धावत येण्याचा कार्यक्रम पहिल्या दिवशीही मी पार पाडला. हेल्मेट, सनकोट, रेनकोट, डब्याची पिशवी, मोबाईल ह्या गोष्टींपैकी काहीतरी विसरणे आणि घरातील कोणीतरी गेटपर्यंत गेल्यावर माझ्या लक्षात आणून देणे हाही माझ्या रूटीनचाच एक भाग Happy पण घरातल्या माणसांच्या माझ्यावर आज काय विसरली हे निघताना ठेवण्याच्या वॉच मुळे मी अजून एकही दिवस ह्यापैकी कुठली वस्तू ऑफिसपर्यंत नेण्यापासून वंचित राहिले नाही ह्याबद्दल माझे करावे तेवढे कौतुक कमीच आहे.

तर गाडी सुरू केली आणि पेट्रॉलच्या काट्याकडे पाहिले तर तो लाल रंगाच्या रेषेबरोबर खेळत होता. घरापासून ७-८ मिनिटांच्या अंतरावर पेट्रोलपंप आहे पण ट्रॅफिक सिग्नलपेक्षा उच्च अडथळ्याचे काम करून तिथे पोहोचायला १५ मिनिटे लावतेच.
पेट्रोलपंपावरही आज पांगापांग होती. पेट्रोलपंपवाल्या मालकासाठी ही गोष्ट चिंताजनक असली तरी माझ्यासाठी चांगली गोष्ट होती कारण माझा नंबर लगेच दुसरा लागला. Happy (ही आनंदी स्मायली आहे) ऑफिसला उशीर होतोय ह्या जाणिवेने पटापट गाडीची चावी काढून डिकीला लवून डिकी उघडून चावी हातात घेतली. नेहमीच्या सवयी प्रमाणे उशीर होऊ नये म्हणून एकावेळी अनेक कामे करण्याची खुबी असल्याने डिकीत ठेवलेल्या पर्स मधून एकीकडे पैसे काढत होते तर एकीकडे पेट्रोलवाल्याला आपले लक्ष मीटरवर आहे हे धमकावण्यासाठी माशीनच्या काट्याकडे पाहत होते. पेट्रोल भरून होताच तिथल्या पेट्रोलपंप वरील माणसाने लगेच सुटे पैसे परत दिले ते पर्स मध्ये ठेवून आपल्याला किती घाई आहे हे स्वतःलाच बजावण्यासाठी धाडकन डिकी बंद केली. बंद करताक्षणीच डिकीला लावलेली चावी गायब झालेली दिसली. मी पेट्रोल भरणार्‍यालाच उलट पटकन विचारले चाबी किधर गयी? लगेच माझ्या लक्षात आले पर्स उघडताना चावी पर्समध्ये किंवा डिकीत राहिली. हे भगवान! इतरवेळी मी डिकीलाच चावी ठेवते पण आज नियतीने माझ्या स्मार्टनेसचा कचरा करायचा ठरवीला होता. कधी नव्हे ते पेट्रोल भरणार्‍या माणसाकडून मला लेक्चर ऐकावे लागले अरे मॅडम अशी कशी चावी गाडीत ठेवलीत? हातात ठेवायचीत ना ! आता पुढच्या प्रोसेस साठी त्यांचीच मदत लागणार होती म्हणून चिडीचूप ऐकले.

पाठी एक २०-२५ शीतला मुलगा पेट्रोल भरण्यासाठी उभा होता. त्याचे पेट्रोल भरून झाल्यावर पेट्रोल भरणार्‍याने त्याच्याकडील चाव्या डिकीला लावून पाहिल्या पण कुठलीही चावी लागली नाही. पाठीमागे असलेल्या मुलाने माझ्या बाजूला गाडी लावली आणि तोही इतर लोकांच्या चाव्या लावून पाहू लागला. त्या दिवशी एका चावी मुळे माझ्या सबलेची अबला अवस्था झाल्याने तो माझ्या मदतीसाठी स्वतःचे फोन कॉल अटेंड करत थांबला. माझी पर्सही आत अडकल्याने मोबाइलही बिचारा कावर्‍या-बावर्‍या अवस्थेत आतच राहिला. त्याच मुलाच्या हातातील मोबाईल मी मागितला त्याने बॅलंस नाही, रेंज नाही अशी कारणे न देता मदतीचा मोबाईल पुढे केला. आजकालची तरुण मुलं टवाळ असतात, त्यांना अजिबात माणुसकी राहिली नाही असे शेजारी-पाजारी इतर लोक किती खोट्ट बोलतात याचा प्रत्यय मला ह्या मुलाकडे पाहून आला. सगळीच नसतात बरे तशी मुले अस सगळ्यांना सांगावस वाटलं. मोबाइलवरून लगेच नवर्‍याला फोन लावला व झाला प्रकार सांगून घरातून दुसरी किल्ली आणण्यासाठी सांगितले. अशा वेळी नवरा आपली वकिलीमुळे उरण मध्येच जास्त असतो दूर नोकरी निमित्त जावे लागत नाही व तो अशा संकटकाळी दत्त म्हणून उभा राहतो ह्याचे मला फार भाग्य वाटले आणि नेहमीच वाटते. :स्मितः

फोन करून झाल्यावर थांबलेल्या त्या गुड बॉय सारख्या मुलाला मी जायला सांगितले व मी गाडी पंपच्या एका बाजूला लावली. ह्या वेळी पेट्रोलपंप वरील माणसेही मधून मधून बर्‍याच चाव्या लावून पाहत होती. आता मला सगळी दुनियाच चांगली, सेवाभावी वृत्तीची वाटू लागली. Happy जिथे उभी राहिले तिथला निसर्ग माझे मन रमविण्यासाठी चांगला बहरला होता. रानगवतावर रानफुले फुलली होती, त्यावर फुलपाखरे कदाचित मला बरे वाटावे म्हणून इकडून तिकडे पळत होती. पण आज चक्क माझे त्यात मन रमत नव्हते. आज माझी निसर्ग सौंदर्याची पूर्ण नजर अ‍ॅक्टीवाच्या चावीवर खिळली होती. नवर्‍यालाही माझ्यासारखाच ट्रॅफिक चा अडथळा आला असणार हे कळत होते. पण अजून शंका येत होत्या जर दुसरी चावी घरातून पण हरवली अ सेल तर? किंवा तिही चुकून माझ्या पर्समध्येच असेल तर? असे झाले असेल तर नवर्‍याचा हेंडसाळपणावर ओरडा खावा लागणार, घरी गेल्यावर घरातील व्यक्ती अजून सल्ल्यांचा भडिमार करतील, शिवाय ऑफिसला उशीर होतोय म्हटल्यावर खोटे कधी बोलू नये हे मनामध्ये बालपणापासूनचे रुजवलेले ब्रीदवाक्य पाळत असल्याने ऑफिसमध्ये बॉस मॅडम, कलीग्जमध्ये किल्ली आपली खिल्ली उडवणार ह्याचे वेगळे टेन्शन. अशी सगळी विचारधारा मनात वाहत असताना नवर्‍याची गाडी लांबूनच दिसली आणि एकदम दिलसे हायसे वाटले. नवर्‍याने हसतच माझ्या हातात किल्ली दिली वरून पेट्रोल भरलेस का अशी विचारपूस केली. मी त्या किल्लीने डिकीत पडलेली किल्ली काढली आणि ती किल्ली मला एखादी नकाशावरून शोधून काढलेल्या मौल्यवान वस्तूसारखी वाटली. पुन्हा नवर्‍याने आणलेली चावी मी नवर्‍याकडेच देऊन वर पुन्हा अशा प्रसंगी उपयोगी येईल अशा अविर्भावात नवर्‍याला दिली Lol आणि नवरा घाईघाईत कामासाठी निघून गेला. खरे हाशहुश काय असते ते त्या क्षणी समजले. Happy आता बंद निसर्गमय मनही ह्या किल्लीने उघडले आणि निसर्गातली फुले, फुलपाखरे मला बागडताना सुंदर दिसू लागली. ऑफिसमध्ये पोहोचायला उशीर झाला पण बॉस मॅडम मीटिंगमध्ये बिझी असल्याने घडलेली मूर्खपणाची हकीकत सांगावी लागली नाही.

आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात अशा स्वतःच्या चुकीमुळे कधी ना कधी अशा घटना घडत असतात. पण आपण शक्य तितके सतर्क राहावे असा वरून माझ्याकडून तुम्हा सर्वांना सल्ला Lol

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानेय किस्सा, आणि छान लिहिलाय. असे प्रसंग आयुष्यात घडत असतातच. माझ्याशी तर इतके घडतात की अरे मीच का असा प्रश्न दरवेळी कोणालातरी विचारावासा वाटतो. फुरसतीने शेअर करतो..

आणि हे ललितमध्येच योग्य आहे.
एक वै.म. - या लिखाणात Lol हि हलत्या जबड्याची स्माईली वाचताना त्रास देतेय, त्या जागी Happy हे उत्तम. ते ही कमीत कमी Happy

अरेरे काय त्रास ग हा तुला? बरे झाले डुप्लिकेट मिळाली लगेच. माझे काय होते पेट्रोल भरताना किल्ली
डिकीला लावली असते. मग पुढे गेल्यावर स्कूटर वर बसल्यावर लक्षात येते ती तिथेच आहे. मग विचित्र पण मागे हात करून ती काढून घ्यायची नाहीतर उतरून परत चाबी घेउन बसायचे.

लेख छान आहे.

हाय हाय.. माझी बहिण शोभतेस गं एकदम.. मी एकदा फोर व्हिलरमध्ये चावी ठेऊन मग दरवाजा लॉक केलेला (दरवाजामध्ये वर येणारे लॉक्स असतात ते खाली ढकलुन, तेव्हा ते टुक्टुक वाले लॉक लावले नव्हते.). नशिबाने गाडी घराखालीच उभी होती. दुसरी चावी भावाकडे होती, ती त्याच्याकडे जाऊन आणेतो एक आठवडाभर गाडी वापरता आली नाही Happy

वाशी ब्रिजखाली टु व्हिलर लावुन, चावी डिकीला लावुन ऑफिसला जायचा उद्योगही दोनदा करुन झालाय. नशिबाने दोन्ही वेळा गाडी वाचली. Happy

बाकी घराच्या तिनची चाव्या घरात ठेऊन मग घर बाहेरुन ओढुन घेऊन् लॉक करण्याचे उद्योग तर अनंत वेळा केलेत. नशीबाने घर पहिल्या मजल्यावर असल्याने कोणालातरी खिडकीवरुन गच्चीत चढवुन तिथुन चावी काढण्याचे उद्योग सोपे जातात. हल्ली कटाक्षाने तिनही चाव्या एकत्र घरात नसणार याची काळजी घेते. नेमके जेव्हा असे होते तेव्हा दार लॉक होते.

ह्या वटपोर्णिमेला पण माझ्याबरोबर हेच झाल्..पण समस्त बायकांनो चावी विसरणारा माझा नवराच होता...त्याच काये ऑफीसला जायच असल्यामुळे आणि दुसरीच वटपोर्णिमा असल्यामुळे मी सकाळि लवकर ऊठुन आवरुन नवर्याला घेऊन गेले वडाला आणि पुजा करुन येताना एटीम कडे गेलो पठ्याने पैसे काढ्ले ठेवले आणि बरोबर चावी आणि मोबाईल पन स्व्तःचा...
मग काय मीच सगळी सुत्रे हातात घेउन गॅरेजवाल्याला फोन करुन यायला सांगितल तो पण लगेच तयार झाला येताना की मेकर लाच घेउन आला १ तासाच्या आत गाडी चालु....वटपोर्णिमा होती नाहितर मी खुप चीडचीड केली असती...

अखि, गजानन, झकासराव, सृष्टी, वर्षा, अश्विनी, विजय धन्यवाद.

दिनेशदा Happy

ऋन्मेश तुमच्या सल्ल्यानुसार बर्‍याच स्माईलीज मध्ये बदल केला आहे. धन्यवाद सुचने बद्दल.

अमा हे तर माझ्या बाबतीत घरी पर्स ठेवण्यासाठी डिकी उघडल्यानंतर गाडीवर बसल्यावरही होते.

साधना दे टाळी. चावीबाबतचे तुझ्या बरोबर आणि अमा बरोबर झालेले किस्से माझ्या बरोबरही झालेत. मी ही एक्-दोनदा ऑफिसच्या आवारात गाडीला चावी ठेउनच आलेले. आता काय बोलावे सुचत नाही Lol

सीमा भारी किस्सा Lol

दक्षे मी पण इतर वेळी माझ्याच घरातील लोकांना चावी इथे तिथे ठेवण्यावरून सल्ले देण्याचे तोंडसुख घेत असते पण ह्या इन्सीडेंट पासून आता नाही असे करता येणार. आणि तुझ्या पोस्टमुळे मला अनेक समदु:खी की समघोळ घालणारे असल्याची जाणीव झाली. Happy

असं करणारी तु एकटीच नाहिस. अनेक लोक असतात. माझ्याच सर्कल मध्ये २-३ नग आहेत
>>>
ह्म्म्....ते तर आहेच्...कहर म्हणजे ज्या दिवशी माझा किस्सा झाला सेम त्याच दिवशी ब्रॅंचमध्ये पण एकजणीने तेच केल Lol
आणि संध्याकाळी नवरा पण चावी हरवुन आला...नशीब त्याची दुसरी चावी घरात होती भाऊजी गेलेले ऑफीसला चावी घेउन...खरतर त्या दिवसावर मी एक विनोदी लेखच लिहु शकते...त्या एकाच दिवशी चावी विसरण्याच्या तीन घटना माझ्याच लाईफमध्ये आल्या.

जागू, साधना हात मिलाव Happy
दक्षिणा, मला नग काय म्हणतेस ग Angry Proud
जंगली महाराज रोडवर पिझा हट पाशी दोन तास स्कुटरलाच लटकत होत्या चाव्या Lol

जागू, Lol
बहुदा गाडीला चावी तशीच आहे म्हणजे मालक गाडीजवळच कुठेतरी आहे असे वाटून धाडस केले नसेल चोराने.... कशीय आयडियाची कल्पना Proud

मस्त लिहीलंय ! मी एकदा एका कार्यक्रमाला उशीरा पोचले. द्यायचे प्रेझेंट डिकीत होते. हॉल्मधून घाईघाईत बाहेर येउन डिकी उघडली तर आत वेगळंच सामान !! दोन सारख्या गाड्या शेजारी शेजारी होत्या. पण एकाच चावीने दोन्ही ची डिकी उघडत होती Uhoh . तेव्हापासून मी डिकीत फार काळजीपूर्वक सामान ठेवते. आणि आठवणीने बाहेर काढते.

विसरायला नको अस मनात आल कि हमखास विसर पडतो असा माझाही अनुभव आहे.
भरिला आता श्रवणयंत्र ्वापरावे लागत आहे. कित्येकदा ते लावले आहे कि नाही कळत नाही आणि
समोरच्या बोलणार्‍याचा चेहरा-भावलक्शषात आले तर उलगडा होतो !

जागुतै, माझा अर्धा जीव याच टेंशन मधे असतो डिकी उघडल्यावर की मी चावी आत तर नाही टाकतेय Uhoh
मला स्वतःची ही सवय माहीत आहे Sad
मला अशिर्वाद दे की ही वेळ माझ्यावर कधीही न यावी Proud

जागू, तुम्ही सर्व गोष्टी एवढ्या निटनेटकेपणाने करताना, लिहिताना मायबोलीवर आढळता की थोडा सुद्धा धांदरटपणा असेल असे कधीही जाणवले नाही ☺

माझ्या अगदी शेजारी राहणार्‍या एक बाई आहेत. त्यांची आठवण झाली. त्या नेहमी माझ्या कन्सल्टन्सीतून काम करून घ्यायच्या आणि शुल्क द्यायची वेळ आली की आधी घासाघीस मग टाळाटाळ मग विलंब आणि शेवटी ठरल्यापेक्षा रक्कम कमीच देणार हे नक्की. शिवाय, प्रत्येक गोष्टीत घाई ठरलेलीच.. म्हणजे आधी स्वतः प्रत्येक गोष्टीत विलंब करायचा, मग दुसर्‍यापाशी आल्यावर त्याच्याकडून मात्र प्रतिसाद यांना त्वरेने हवा. हातातले काम सोडून यांचे काम करून द्या. शिवाय आपण यांना यांच्या मनाप्रमाणे काम करून द्यायचे. त्यातही यांचे नखरे हजार, अनंत सूचना. सर्व सूचना देखील सलग देणार नाहीत, कारण यांचा फोन मिनिटा मिनीटाला वाजत असतो. प्रत्येक फोनवर किमान पाच मिनीटे तरी बोलणारच (कमाल मर्यादा नाही). शिवाय अनेक संदर्भांकरिता यांना इतरांना फोन करावा लागणार. एवढ्या खटाटोपात त्या मोबाईलची बॅटरी उतरणार, त्यामुळे कुठेही गेल्या तरी आधी सॉकेट शोधून त्यावर चार्जर लावणार आणि त्याला मोबाईल जोडणार. तो वाजला की पुन्हा तिथे जाऊन बोलणार. आपण यांची प्रतिक्षा करंत तिष्ठत राहणार.

यावर कडी म्हणजे सौजन्य नावालाही नाही. मुलखाच्या फटकळ. यांचे पतिदेव, मुले, घरकामगार, इतर सहकारी, फॅमिल डॉक्टर, भाजीवाला, दूधवाला, किराणा दुकानदार, मॅकेनिक, इतकेच काय अगदी संपर्कात येणारा प्रत्येक माणूस यांच्या तोंडाळपणामुळे वैतागलेला.

तर एकदा अशाच माझ्याकडून घाई गडबडीने माझ्या मानगुटीवर बसून काम करून घेऊन गेल्या. वर्तमानपत्राच्या कार्यालयात तातडीने द्यायचे म्हणून.

तासाभराने मला वर्तमानपत्राच्या कार्यालयातून फोन केला, मदत हवीये म्हणून.
मला म्हणू लागल्या, "आता जी रिपोर्ट फाईल (पीडीएफ) बनविली ती तातडीने मला ईमेल कर."
मी - "पण कशासाठी? ती तर तुम्ही पेन ड्राईव्ह मध्ये सोबत घेऊन गेलात ना?"
त्या - "होरे, पण पेन ड्राईव्ह पर्समध्ये, पर्स कारमध्ये आणि कार लॉक झालीये, किल्ली आतच राहिलीये."
मी - "ठीक लगेच ईमेल पाठवितो."
त्या - "बरं होईल, उद्याच्या वर्तमानपत्रात छापून तरी येईल."
मी - "ते ठीक आहे, पण तुम्ही तुमची कार कशी उघडणार? त्यात तुमचा फोन जिवाच्या आकांताने ओरडत असणार."
त्या - "अरे हो खूप अर्जंट कॉल येणारेत रे मला (यांना येणारे सगळेच कॉल तसेच असतात). शिवाय मला देखील अनेकांना करायचेत, बॅक अप नंबर डायरीत किंवा इतर कुठेच नाहीत."
मी - "तुमच्या घरून कारची दुसरी चावी घेऊन कुणाला तरी तिकडे पाठवू का?" (शेजारधर्म पाळायचा म्हणून मी सूचविले.)
त्या - "अरे म्हणजे काय? तू मला इतकी वेडी समजतोस? ते शक्य असते ना तर इतक्या वेळात तुला हक्काने बोलावले असते, काही केलं तरी सख्खा शेजारी आहेस तू आमचा. पण सध्या तरी ते शक्य नाहीये कारण कारची दुसरी चावी माझ्या कपाटात आहे. घरात नोकर माणसे असल्याने कपाटाला कुलूप आहे आणि कपाटाची चावी माझ्या पर्समध्ये आणि पर्स कारमध्ये आहे जी ऑलरेडी लॉक्ड आहे."
मी - "अरे वा! म्हणजे मोठाच डेडलॉक झालाय की."
एव्हाना मी इतका वेळ दाबून ठेवलेले हसू माझे नियंत्रण तोडून व्यक्त होऊ लागले होते. त्यांनाही ते ऐकू आलेच.
त्या - "हास तू! हास अजून मोठ्याने. तुला बरं वाटत असेल ना, तुझ्याशी भांडून मी इकडे आले आणि माझी अशी फजिती झाली म्हणून. अरे, आपल्या भांडणांचा हिशेब आपण नंतर चूकता करु पण आधी मला यातून काहीतरी मार्ग सूचव.
मी - "त्या कपाटाची दुसरी किल्ली?"
त्या - "ती आधीच हरवलीय."
मी - "मग ह्युंदै सर्विस सेंटरला फोन करा, तेच यातून सोडवतील."
त्या - "दोन हजार रुपये लागतील शिवाय चार तास तरी लागतील म्हणत आहेत.

माझ्या कामाच्या मोबदल्यात जितकी घासाघीस केली त्याच्या दुप्पट नुकसान झाले त्यांचे.

******

असो, तर असा वेंधळेपणा अनेकांचा स्वभाव असतो, तर काहींच्या कडून अनवधानाने असे होते. जर आपण इतरांसोबत कटूता ठेवली असेल तर आपण फजितीत सापडलो की त्या सर्वांना आनंदच होतो. आधी ते हा आनंद साजरा (कधी उघड, तर कधी गुपचूप) करतात आणि नंतर जमलं तर / नाईलाजाने मदतीला येतात.

तुमच्या उदाहरणात तुम्हाला इंधन पंपावरील कर्मचारी, इतर ग्राहक आणि मुख्य म्हणजे तुमचे पतीदेव या सर्वांनी अगदी तत्परतेने मदतीचा हात पुढे केला असे दिसते. तुम्ही स्वतः नेहमीच इतरांशी सौजन्याने वागत असणार, म्हणूनच या सार्‍यांनी तुमच्या चांगुलपणाची परतफेड केली असणार यात शंकाच नाही. तुमच्यावर पुन्हा अशी अडचणीची वेळ न येवो आणि जर आलीच तर तुम्हाला नेहमीच सर्वांचे सहकार्य लाभो हीच सदिच्छा.

मस्त लेख!
घराच्या बाबतीत तरी मी लॅच वापरत नाही, ते ऑटोलॉकवाले कुलुपं पण हद्दपारच केलेल. किल्ली फिरवल्याशिवाय काम होता कामा नये असं पाहातो. पण या स्कूटरेट्स मध्ये तरी काही पर्याय नाही.
चोरीच व्हायची असेल तर ती एवढं सगळं करूनही होतेच (हेमावैम)... साधे कुलुपं बरे पडतात.

वेधळेपणाचा बाफ होता ना इथे?
*
स्कूटीस्टाईल गाड्यांचे सीटचे कुलुप उघडायला एक थोडा लांबट स्क्रू ड्रायव्हर व थोडेसे ज्ञान आवश्यक असते. शून्य मिनिटात कुलुप उघडता येते.

मॅन्युअल कुलुप असलेल्या कारचे, व बरेचदा ऑटोलॉक वाल्याही कारचे डोअरलॉक काचेखालची प्लॅस्टीक पट्टी उचकवून काढून एका फुटपट्टी वा हँगर तत्सम कोणत्याही वस्तूने उघडता येते. पुन्हा, थोडेसे ज्ञान आवश्यक.

Pages