Submitted by भारती.. on 26 September, 2014 - 05:41
भावस्थिराणि जननांतरसौहृदानि
असंख्यात संवादवेळा विराल्या जसे श्वास निश्वास हिंदोळती
ऋतूंच्या रित्या ओंजळीतून गेल्या तृषा वाहुनी जीवनासंगती
असे काय आता नव्याने घडावे बरी स्तब्ध होती जिवाची मठी
निरानंद एकांत तो शांत साठे मिटे वाटला गल्बला शेवटी
अकस्मात तो आर्तशी हाक आली नभाची घरे सात ओलांडुनी
कुणी ओळखीचेच आहे म्हणावे कसे कल्पनेनेच ओसंडुनी
जसा तीक्ष्ण वारा फटीतून येता घराला नवा गारवा लाभतो
सुखाशा तशी पाझरे अंतरंगी तमाच्या तळाशी दिवा लागतो
खरे काय आहे ? कशी ही असोशी ? कशाला हवी बाह्य आलंबने?
नव्या संहितेतील विस्थापितांशी जुने मौन सोडून संवादणे
जिवाला जणू मंत्र घाले अशी गूढ ही ओढ आत्मीयतेची किती
कळे कालिदासास – जन्मांतरीच्या स्मृती या विभासांमध्ये खेळती..
-भारती बिर्जे डिग्गीकर
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अकस्मात तो आर्तशी हाक आली
अकस्मात तो आर्तशी हाक आली नभाची घरे सात ओलांडुनी
कुणी ओळखीचेच आहे म्हणावे कसे कल्पनेनेच ओसंडुनी
जसा तीक्ष्ण वारा फटीतून येता घराला नवा गारवा लाभतो
सुखाशा तशी पाझरे अंतरंगी तमाच्या तळाशी दिवा लागतो <<<
व्वा वा
वा !!!
वा !!!
व्वा..मस्त..
व्वा..मस्त..
मस्त रचना ! आवाडली !
मस्त रचना ! आवाडली !
फार अवघड रचना आहे, नीट
फार अवघड रचना आहे, नीट समजण्यासाठी नेहमीप्रमाणे अनेकदा वाचावी लागली.
पण फार सुरेख आहे कविता! दंडवत!
अगदी खरं सांगायचं तर सुरुवातीच्या ओळीत पहिल्या दोन शब्दातच अडकलेले.. ती ओळ तिथेच सोडून नेटाने पुढे सगळी वाचून पुन्हा मागे येऊन पहिल्यापासून पुढे असं केलं. मग हळूहळू कळत गेली.
आणि हे सगळं करून मग कविता समजल्याचा आनंद मी काय सांगू तुम्हाला 
तुमच्या रचनांवर जाता जाता ओझरती नजर टाकून पुढे होणं ही शक्यता नसतेच ताई
अहाहा... एकेक शब्द पुन्हा
अहाहा... एकेक शब्द पुन्हा पुन्हा वाचावा असा.
खुप आवडली!
हे असं नेमकं आणि उत्कट केवळ
हे असं नेमकं आणि उत्कट केवळ भारतीताईच लिहू जाणे.
खूप आवडली कविता.
बेफींनी क्वोट केलेलं कडवं खूप आतपर्यंत पोहोचलंय.
भारती.... गारूड करतेस तू
भारती....
गारूड करतेस तू मनावर.....तू आणि तुझे शब्द ! शब्दातील ऊर्जा आणि ते चैतन्यमय रूप यांच्यातील नाते पाहाताना मनी होणारी गुंतागुंत विचारात घ्यावी वा न घेतली तरी कवितेचे आकलन करणे किती कष्टदायक काम आहे इतकीशी तरी जाणीव झाली की समजून येते आपण एका श्रेष्ठ कवयित्रीच्या प्रतिभेसमोर थक्क होत आहोत. "...निरानंद एकांत तो शांत साठे मिटे वाटला गल्बला शेवटी..." ~ थबकलोच मी इथे कितीतरी वेळ. निरानंदात एकांत आहे... तर एकांतात शांती आहे.... शांतीत गलबल्याची जाणीव शून्य झाली आहे तरीही अगदी नभाची सातही दारे उघडून तुला हाक ऐकू येते....ज्याची असावी असे वाटते ती त्याचीच आहे का ? हे प्रश्नचिन्हही सतावणारे आहेच शेवटी.....भाळी तो भोग आहे. तरीही "...तुझ्याही घरी दूर मी सूर होऊन येतेच ना.." म्हणत ती चेतना पुन्हा जागी करण्याचा यत्न आहे....यातून काय निष्पण्ण होईल....? आत्मियतेची व्याख्या करायचीय ? ती तूच करू शकशील....निसर्गशक्तीच्या अपरिहार्य नियमांना सामोरे जाताना किती वेदना सहन कराव्या लागतील याची जाण तुझ्यातील कवयित्रीला निश्चित्त आहे.
मला वाटते तुझ्या प्रतिभेवर काही....वेडेवाकडे असले तरी...लिहायचे झाल्यास ते लिहिण्यापूर्वी मनाची काय घालमेल होते याचा अनुभव एक साधा वाचक म्हणून भारती बिर्जे डिग्गीकर हिने कधीतरी घ्यावा....सुन्न होऊन बसशील.
वा!
वा!
वा ! सुरेख .. हे असं नेमकं
वा ! सुरेख ..
हे असं नेमकं आणि उत्कट केवळ भारतीताईच लिहू जाणे. खूप आवडली कविता.>>>>+१००००००
खूप आभार्स सर्व आत्मीयांचे!
खूप आभार्स सर्व आत्मीयांचे! रचनेत सम-रस होऊन जर वाचणारे ती अनुभवू शकत नसतील तर ती एक शोकांतिकाच.
अशोक, मर्मस्थळावर टिप्पणी असते तुमची नेहमीच, मर्मग्राही शब्दात. घालमेल हा असाच एक शब्द,कवितेवर प्रतिक्रिया देतानाची नेमकी मन:स्थिती वर्णन करणारा.
"कळे कालिदासास ‘’या खोल भावात
"कळे कालिदासास ‘’या खोल भावात दाटे स्मृती पूर्विच्या जन्मिची’’ .."
बहोत खूब!!
विल्यम भाऊ वर्डस्वर्थ यांच्या 'Poetry is the spontaneous overflow of powerful feelings: it takes its origin from emotion recollected in tranquility.' ची आठवण करुन दिलीत..
उफ्फ! हे केवळ स्वर्गीय आहे!
उफ्फ! हे केवळ स्वर्गीय आहे! भारती ताई! सलाम!
आवडली
आवडली
दीदी.. तू काही शब्द इतके
दीदी..
तू काही शब्द इतके सुरेख निर्माण करतेस आणि ते इतके चपखल असतात ना..
सुखाशा,निरानंद हे शब्द मला खूप आवडले. 'निरानंद' हा शब्द तर अतिशय आवडला. किती साधासाच शब्द पण त्यातील भावार्थ कीती खोल गहीरा..
कविता खूप आवडली...
धन्यवाद सर्किट , जिज्ञासा ,
धन्यवाद सर्किट , जिज्ञासा , वरदा , श्रीयु
जबरदस्त नेहमीप्रमाणेच. आलंबना
जबरदस्त नेहमीप्रमाणेच. आलंबना म्ह्णजे काय? ते मठी वगैरे एकदम अगदी अगदी.
अश्विनी आलंबना हे अवलंबन याच
अश्विनी आलंबना हे अवलंबन याच शब्दाचं एक काव्यात्म रूप
जी एंनी एके ठिकाणी..बहुधा
जी एंनी एके ठिकाणी..बहुधा ग्रेसांना लिहिलेल्या एका पत्रात... म्हंटलेय की वाचकालाही थोडी "equipment" असली पाहिजे.
तुमचे लेखन वाचताना मला हे वाक्य कायम आठवत आले आहे(आणि ही equipment येण्यासाठी किती अभ्यासायचे आहे याची जाणीव नेहेमी होते, तुमच्या अफाट range मुळे). केवळ शब्द व रुपाकडे लक्ष दिले तरीही अनोखे समाधान मिळतेच पण त्याबरोबर आशयाशी तार जुळली तर मात्र मिळणारा आनंद अवर्णनीय असाच असतो.
फार आवडली रचना. कालिदासाने ज्या स्मृतींसाठी "अबोधपूर्वा" असा सुरेख शब्द योजलाय त्यांबद्दल अप्रतिम शब्दांत व्यक्त झालेली ही रचना फार समृद्ध करून गेली.
"हे सर्व कोठून येते?" ह्या अनेक कलाकारांना पडणार्या/छळणार्या प्रश्नाचे आणि साकार होणार्या कलाकृतींच्या रहस्याचे उत्तर या "अबोधपूर्वेत"च असावे कदाचित
अवांतर:
सौहृदाणि की सौहृदानि?
सुरेख
सुरेख
अमेय, नेहमीप्रमाणे सूक्ष्मात
अमेय, नेहमीप्रमाणे सूक्ष्मात जाणारा प्रतिसाद .आणि हो, सौहृदानि बरोबर आहे, चूक दुरुस्त करतेय.काही शब्द मनात अनेक वर्षे रुंजी घालत असतात त्यात कालिदासाचे हे शब्द येतात..स्मरणात आहेत, पण मूळ वाचनाचं revision करणं राहून जातं खरं .
आभार अतुल
मस्त.
मस्त.
अप्रतिम! सईला अनुमोदन.
अप्रतिम! सईला अनुमोदन.
भारती ताईंनी कोणत्या
भारती ताईंनी कोणत्या दिक्कालातल्या ऋणानुबंधाच्या अलगद गाठींच्या वर्णनाची कविता लिहिली आहे ते त्यांनाच ठाऊक.आयुष्यात अश्या कानाशिवाय ही ऎकू येणार्या बिन शब्दांच्या, आवाजाच्या गुढ हाका ,साद प्रत्येकालाच ऎकू येत असतील असं नाही.आणि आल्या तरी परत त्या अश्या व्यक्त नादात ,शब्दात मांडणं कठिण. हे काम भारती ताई आणि फ़क्त भारती ताईच करू जाणे..
ह्या अपेक्षित हाकांची उत्कट प्रतिक्षा किंवा त्यांची सुचना पहिल्या कडव्यात दिसतेय. सुचना,प्रतिक्षा, अपेक्षा ह्यापैकी नक्की काय आहे ते मला कळालं नाही म्हणून हे तिन्ही शब्द वापरले आहेत. पण बहुतेक अपेक्षित प्रतिक्षा च असावी. आणि ह्या प्रतिक्षेत, वाट पाहण्यात घडलेला तगमगीचा स्वसंवाद आहे.पण ह्या आधी न ऎकलेल्या आवाजाची प्रतिक्षा आली तरी कुठून? त्याचं माझ्या परीनं मला सापडलेलं उत्तर मी शेवटी लिहिलं आहेच.
दुसया कडव्यात प्रतिक्षा संपून त्या दुरस्थ हाकांची चाहूल आहे. पण ही हाक आपल्यासाठीच आहे, जिची प्रतिक्षा केली, नेमकी तीच आहे हे ओळखायचे तरी कसे ? ह्या ओळख निश्चिंतीच्या खुणाही भारती ताईंनी लिहिल्या आहेत .जे फ़क्त तुमच्या साठीच असतं ते तुमची ही पर्वा न करता, बंद कवाडांची तमा न बाळगता तुमच्या अंतरंगात शिरून तुम्हाला सुखावतं.ही सुखाची शीतल भावनाच त्याची ओळख पटवायला पुरेशी असते..
आता ओळख पटल्या नंतरचा त्या हाकांशी संवाद तिसया कडव्यात आहे.ज्याची आता आपल्याला ओळख पटली आहे त्याला ही आपली तशीच ओळख पटली आहे का ही उत्सुक खात्री तर तिथे आहेच.शिवाय ओळख पटली तरी कार्यकारण भावाचा अंतिम प्रश्न तिथे शिल्लक आहे.
नकळत्या प्रश्नाचं उत्तर शोधण्याचा अट्टाहास , सुसंगतीचा हव्यास आपल्याला कार्यकारण भावावर अवलंबून राहायला भाग पाडतो. कार्यकारण भाव असमर्थ ठरला की मग विसंगतीच्या झोकांड्यातून तोल सांभाळायला, हे प्रश्न गुंडाळून ठेवायला योगायोग, चमत्कार, आश्चर्य, गुढता ह्या आधाराच्या काठ्या उपयोगी पडतात.पण भारती ताईंनी हा शोध कवितेच्या शेवटच्या ओळीत फ़ारच वेगळ्या प्रकारे घेतला आहे. रांगोळीतला एक ठिपका दुसया **रांगोळी**तल्या ठिपक्याला “हा माझ्या जातीचा” म्हणून ओळखतोच.भारती ताईंनी बाकी काहीच न करता फ़क्त कालिदासाच्या काव्यातल्या रांगोळीचा एक ठिपका फ़क्त शोधला आहे. ग्रेट !
काही प्रश्नांची उत्तरे कार्य कारणभावात नसतातच. अनेक गोष्टी अश्या की, ज्या तुमच्या पेशी जन्मायच्या आधीच पेशींच्या भिंती भेदून पेशीच्या केंद्रकाभोवती घट्ट मिठी घालून बसलेल्या असतात. पेशीतल्या घटकांच्या ह्या **रांगोळ्या** स्वत:च्या हुबेहूब प्रतिमा आपोआपच अंत:प्रेरणेने शोधतात. पण हे तुम्हाला कळावं तरी कसं? काही गोष्टी तुमचा तुमच्या पेशीशी संवाद असला तरच कळतात. प्रतिभा म्हणजे तरी काय.? नुसती अभिव्यक्ती नव्हे. ती तर नंतर् ची गोष्ट. ही कविता म्हणजे नुसती अभिव्यक्ती नाही.. अभिव्यक्तीच्या ही आधी जे काय असतं ते पण सगळं ह्या कवितेत आहे. कवितेतल्या ह्या Altrasonic sound च्या अस्तित्वाच्या पुराव्यासाठी विज्ञानाची अजिबात गरज नाही. भारती ताईची अनेक अज्ञात चाहुलींचा कानोसा घेणारी, एखाद्या अरण्यासारखी घनदाट प्रतिभा त्यासाठी पुरेशी आहे. अगदीच अदभूत !!
वा ! निपोज , सुरेख पोस्ट
वा ! निपोज , सुरेख पोस्ट
अविनाश..... मन फार प्रसन्न
अविनाश.....
मन फार प्रसन्न करून टाकले तुमच्या ह्या विवेचनपूर्ण प्रतिसादाने. याबद्दल मी भारतीचेच आभार मानले पाहिजेत. तिच्या प्रतिभेबद्दल लिहिताना तुम्ही घनदाट अरण्याची जी प्रतिमा वापरली आहे ती इतकी अचूक आहे की अरण्यात प्रवेश करण्याची किमान पात्रता आपल्या अंगी यावी असेच त्यांच्यावर प्रेम करणारा वाचक म्हणू शकेल. कवी असो वा लेखक त्याना तुम्ही आणि अमेय यांच्यासारखे वाचक भेटणे फार गरजेचे असते.....(ही बाब मी तुम्हाला प्रत्यक्ष संवादातही सांगून... किंबहुना तुम्ही फक्त वाचन करता, प्रतिसाद लिहित नाही याबद्दल तक्रारही केली होती, हे तुम्हाला स्मरत असेलच). वाचकांच्या प्रतिसादाची विजेरी कवीला त्याच जंगलात फिरताना मार्गदर्शकाची भूमिका बजावत असते.
निळ्या नभात विहंगणारा स्वमग्न पक्षी, दूरवर पसरलेले हिरवेगार रान, शेतातच बांधलेले एक टुमदार घर, शेजारी न थकता तरीही करकर करीत घुमणारी पवनचक्की, बाजूला असलेला जलाशय, तिथे डुंबत राहिलेली शेतकर्याची जनावरे, काठावर त्यासाठी नेमलेल्या राखणदार पोरांचा रंगात आलेला हमामा, बाजूच्या वातावरणातील निर्मम शांतता....ही दृष्ये कालिदासानेही टिपली होती.....त्याच्या प्रतिभेने या सार्यांचा आपल्या काव्यात प्रतीकात्मक मूल्य म्हणून वापर केला. त्या भावनांना वा त्याच्या अस्तित्व्याच्या पुराव्यासाठी तुम्ही म्हणता तशी विज्ञानाची अजिबात गरज नाही. त्यासाठी भारतीची अद्भुत प्रतिभा पुरेशी आहे. काव्य समीक्षकांच्या मते काव्यातील अनुभव भावना आणि भाव या दोन द्रव्यांनी मिळून तयार होतो. भाव आहेच एखाद्याकडे पण भावना नसेल तर वापरलेल्या शब्दांना झळाळी प्राप्त होत नाही...नसेल. भारतीने वापरलेल्या शब्दांत विलक्षण जादू दिसत्ये. ती जेव्हा कालिदासाबद्दल लिहिते...."‘’या खोल भावात दाटे स्मृती पूर्विच्या जन्मिची’...." त्यावेळी तिला निश्चित जाणीव आहे की त्या भावात भावना आहे म्हणूनच स्मृतीचे महत्त्व.
आपले भाग्य मोठे की अशी एक कवयित्री की जिच्या साहित्य वाटचालीकडे आपण घरच्या आपुलकीने पाहात असताना अशी चर्चाही करू शकतो. त्याबद्दल भारतीचे आपण कायम ऋणी राहू.
व्वा ! छानच.
व्वा ! छानच.
अविनाश, सर्वप्रथम तुमच्या या
अविनाश, सर्वप्रथम तुमच्या या प्रतिसादाने मला आश्चर्यचकित केले आहे. कवितेबद्दलची जाण कधीकधी रसिकाच्या घट्ट मौनाचे रूप घेते- न-इति न-इति असं कवितेतून येणाऱ्या अनुभवाबद्दल वाटत असतं आणि तरीही त्यात आपली अनुभूती मिसळलेली असते. हे मौन मोडून आज तुम्ही व्यक्त झाले आहात हे खूप महत्वाचं आहे कारण प्रत्येक रसास्वादात रचनेचाही पुनर्जन्म होत असतो, ती एका वेगळ्या मना-संस्काराच्या तळ्यात डुंबून येते.कवितेच्या या अध्यात्माबद्दल काय बोलणार ! डॉ. अशोक केळकर यांच्या Being of a poem या निबंधातील मी दुसऱ्या एका कवितेत रचनाबद्ध केलेले विचार मला आठवत आहेत.
तर, ''काही प्रश्नांची उत्तरे कार्य कारणभावात नसतातच. अनेक गोष्टी अश्या की, ज्या तुमच्या पेशी जन्मायच्या आधीच पेशींच्या भिंती भेदून पेशीच्या केंद्रकाभोवती घट्ट मिठी घालून बसलेल्या असतात. पेशीतल्या घटकांच्या ह्या **रांगोळ्या** स्वत:च्या हुबेहूब प्रतिमा आपोआपच अंत:प्रेरणेने शोधतात'' जननांतराचं हे तुम्ही केलेलं विश्लेषण -(ज्यासाठी अमेय ने अबोधपूर्व हा कालिदासाच्या याच श्लोकातला इथे न आलेला शब्द वापरला आहे )- अगदी आधुनिक शब्दात पुनर्जन्माची थिअरी सांगतं.
कवितेच्या अर्थाचा असाच सुयोग्य धांडोळा तुम्ही घेतला आहे.
फक्त,''ह्या अपेक्षित हाकांची उत्कट प्रतिक्षा किंवा त्यांची सुचना पहिल्या कडव्यात दिसतेय. सुचना,प्रतिक्षा, अपेक्षा ह्यापैकी नक्की काय आहे ते मला कळालं नाही म्हणून हे तिन्ही शब्द वापरले आहेत'' असं तुम्ही पहिल्या कडव्याबाबत म्हणता त्या संदर्भात थोडं -
तर एका टप्प्यावर ,कोणत्याही घटनेची, व्यक्तीची प्रतीक्षा करणं सोडून दिलेली असते आपण , आनंद आणि दु:ख यापलीकड 'निरानंद' ( श्रीयुला म्हणूनच आवडला तो शब्द ) अवस्थेत आपण असतो, आणि अचानक काहीतरी आपल्यावर येऊन आदळतं.आयुष्य आपल्याला विस्मयचकित करतं. हे असं का घडतं ?
कालिदासाने कवयित्रीचं काम सोपं करून ठेवलं आहे
''निळ्या नभात विहंगणारा स्वमग्न पक्षी, दूरवर पसरलेले हिरवेगार रान.. '' अशोक यांनी एक अद्भुत वातावरणनिर्मिती कालिदासाच्या प्रतिमासृष्टीचा आधार घेत उभी केली आहे . या सर्व प्रतिसादांनी या कवितेला समृद्ध केलं आहे.
फार सुरेख!
फार सुरेख!
पुन्हा पून्हा वाचतेय ही कविता
पुन्हा पून्हा वाचतेय ही कविता जिचा नाद रुणझुणत रहातो नंतर नसानसातून...उजाड माळरानातून भटकताना अकस्मात् एखाद्या प्राचीन शिल्पजडीत सुंदर मंदिराचा शोध लागावा तसं वाटतय.
कुणीतरी कानाशी बोलून गेल्यसारखं ,
गत जन्मीची खूण सापडे...
ओळखले का मला ?....
Pages