‘’भावस्थिराणि जननांतरसौहृदानि ‘’
Submitted by भारती.. on 26 September, 2014 - 05:41
भावस्थिराणि जननांतरसौहृदानि
असंख्यात संवादवेळा विराल्या जसे श्वास निश्वास हिंदोळती
ऋतूंच्या रित्या ओंजळीतून गेल्या तृषा वाहुनी जीवनासंगती
असे काय आता नव्याने घडावे बरी स्तब्ध होती जिवाची मठी
निरानंद एकांत तो शांत साठे मिटे वाटला गल्बला शेवटी
अकस्मात तो आर्तशी हाक आली नभाची घरे सात ओलांडुनी
कुणी ओळखीचेच आहे म्हणावे कसे कल्पनेनेच ओसंडुनी
जसा तीक्ष्ण वारा फटीतून येता घराला नवा गारवा लाभतो
सुखाशा तशी पाझरे अंतरंगी तमाच्या तळाशी दिवा लागतो
खरे काय आहे ? कशी ही असोशी ? कशाला हवी बाह्य आलंबने?
नव्या संहितेतील विस्थापितांशी जुने मौन सोडून संवादणे
विषय:
शब्दखुणा: