चला, भाषासमृद्ध होऊया !!!

Submitted by दक्षिणा on 24 September, 2014 - 08:27

महाराष्ट्रात दर मैलागणिक मराठी भाषा बदलते असे म्हटले जाते. यात अतिशोयोक्ती नाही हे महाराष्ट्राच्या भटकंतीत लक्षात येतेच. मराठी भाषा आपल्या या अनेक सख्ख्या, चुलत, मावस, सावत्र बहिणींच्या प्रभावामुळे वेळोवेळी बदलत गेली आहे. हिंदी, इंग्रजीसह महाराष्ट्रातल्या अनेक बोलीभाषातील शब्द विनासायास मराठीच्या पंक्तीत मानाने जागा अडवून आहेत.

चला तर मग या शब्दांना जाणून घेऊ या आणि त्यांचे नेमके मराठी अर्थ शोधूया.

उदाहरणार्थ, पेन या शब्दाचा मराठी शब्द तुम्हाला माहीत असेलच, पण रिफिलला मराठीत काय म्हणतात ?
ताबडणे, खुंदलणे ही क्रियापदे किती जणांना माहीत आहेत ?

आपण सर्रास टेबल खुर्ची म्हणतो. पण टेबल चेअर म्हणत नाही. का बरे ?
विदर्भात तर हिंदीभाषिक मराठी की मराठी भाषिक हिंदी हा वेगळाच घोळ आहे.
अनवट, विमल, उन्मन, कैवल्य, अद्वैत असे शब्द कवितेत जागोजागी बागडत असतात. पण साध्या सरळ मराठी भाषेत यांचे अर्थ काय आहेत, हे प्रत्येकाला माहीत आहे का ? या शब्दांनी कविता उच्च होत असली तरी ती सर्वसामान्यांना कळत नसली तर काय उपयोग ?

इथे कुणाला कमी लेखायचा किंवा हिणवण्याचा विचार मनात नाही. फक्त मराठी बोलीभाषेत येणार्‍या शब्दांची नव्याने ओळख करून घेण्याचा एक प्रयत्न आहे.

असेही जे शब्द आपण इंग्रजी असूनही सर्रास वापरतो आणि त्यांचे मराठी अर्थ आपल्याला पटकन आठवतात का?

कोणताही मराठी शब्द जो नेहमी सहजपणे वापरला जात असेल पण शब्दकोषात सापडणार नाही असा.

चला तर मग करायची का सुरुवात ?

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेल...डॉक्टर....तशा माझ्याकडे पाचसहा डिक्शनरीज आहेत. चाऊस अशीच एकाकडून सप्रेम भेट अंतर्गत आली होती....त्यामुळे राहिली आहे. मी स्वतः घेतलेली नाही. आता प्रेझेन्ट आलेले पुस्तक अन्य पुस्तकांसमवेत सुखाने नांदत आहे इतकेच म्हणतो. तसे पाहिले तर वीरकर आहेच, पण त्याचा फॉण्ट फार लहान असल्याने (पानेही जीर्ण झाली आहेत) तिकडे हात जात नाही. शासन व्यवहार कोश मात्र आहे सुरेख, मात्र बहुतांशी तिथे शासकीय व्यवहारच चालतो.

डांबरट हा Damn Rat आणि डँबिस हा Damn Beast वरून मराठीत आलाय, हे पण अलिकडेच मला कळले. अगदी सर्रास हे शब्द वापरतो आपण पण त्या मूळ ब्रिटीश लोकांनी नेटीव्ह लोकांना घातलेल्या शिव्या आहेत.
>>>>>>
ओह, छान !
असाच डँबिस शब्द आहे तो याचाच अपभ्रंश का?

अरबट चरबट, टंगळमंगळ, सटरफटर, चटकमटक ... वगैरे एका लयीत असलेल्या जोडशब्दांवर कोणाला प्रकाश टाकता येईल का? हे मूळ मराठी भाषेतूनच आले की बोलता बोलता बनले.

ओक्के...ओक्के....नाही म्हणत....! शब्द मागे घेतो....उगाच इथले एका चांगल्या विषयावरील वातावरण बंबातील पाण्याप्रमाणे गरम व्हायला नको.

गोव्यात, दारूच्या दुकानाला पुर्वी बंब म्हणत असत. कारण पोर्तुगीजमधे पंपाला "बोंबा" असा शब्द आहे. ( जो आजकाल मी नेहमीच वापरतो. ) आता पंप आणि दारुचे दुकान याचा काय संबंध ते मला माहीत नाही.

अतिशय अर्धवट, मन न लावता, वरवर कामं उरकली. काहीही नीट करता येत नसलं की आमचे बाबा त्यांच्या आईचा पेटन्ट शब्द उच्चारतात 'धगुरडी कार्टी आहेत'
नक्की अर्थ शोधला नाहीये कधी Happy

मस्त धागा दक्षिणा.

नारळ फोडणे याला "नारळ वाढवणे" असा शब्द कोल्हापूर भागात वापरतात. त्या मागे काय कारण असावे? मला ऐकायला फार वेगळे वाटते.

..

वरदा, आमची आई 'हगरं काम' करून ठेवलंय म्हणते.
आज्जी 'काय हगरड करून ठेवलीय ' म्हणाय्॑ची.
मागच्या पिढीप्॑र्यंत हगणे, मुतणे, नागडे, उघडे हे इतके ऑफेन्सिव्ह शब्दं नव्हते.
आणि नेहमीच्या वापरात असतं.

खारूताई, ज्या गोष्टी पवित्र किंवा शुभ मानल्या जातात त्यांच्याविषयी वाईट बोलायचे नाही असा एक अलिखित नियम असल्यासारखा असतो. बांगड्या, मंगळसूत्र तुटत-फुटत नाहीत तर 'वाढवतात'. नारळाचंही तसंच असणार.

साधी गोष्ट - आपण कोणाकडून निघत असलो, घरातून बाहेर पडत असलो तरी मी 'येतो/ते' असं म्हणतो. मी जातो/ते असं पारंपरिक शब्दप्रयोगात वापरलं जात नाही.

'धगुरडी कार्टी आहेत'
>>
धेडगुजरी शब्दही याच आशयाचा ना .. तसे असेल तर वरचा अप्रभंश असावा.

वरदा,

तुम्ही म्हणता आहात त्यात तथ्य आहे..<<ज्या गोष्टी पवित्र किंवा शुभ मानल्या जातात त्यांच्याविषयी वाईट बोलायचे नाही असा एक अलिखित नियम असल्यासारखा असतो. बांगड्या, मंगळसूत्र तुटत-फुटत नाहीत तर 'वाढवतात'. नारळाचंही तसंच असणार>> नागपूरात आमचे एक व्यवसाय-मित्र आहेत, ते हिंदी भाषिक आहेत, ते दुकानाच्या बाबतीत ही असेच म्हणतात " मै अभी दुकान बढा के आया" म्हणजे मी आत्त्ताच दुकान बंद करुन आलो.
आपण मराठी मध्ये असे म्हणतो का ??

गरम चहा थंड होत जेमतेम कोमट /कोंबट झाला की तो मांजरमुतवणी झालाय जरा कढत कर.
दोन कप पाण्याला चुकून एका कपाची साखर, चहाबुकी टाकली की ते होते "चहा कसला तो नुसते फुळकवणी."

घाईत उठताना वरच्या शेल्फाचा कोपरा डोक्यात लागला की खोंभारा लागला. सिल्कच्या कपड्यांना खोंभारा लागून एखादा धागा ओढला जातो.
परिटाकडे धुवायला दिलेले कपडे जास्ती सोडा झाल्यावर गोल भोके पडतात. दिसतंय पण पटकन काही करत नाही म्हणजे डोळे हैत का परटाची भोकं?
यस्टीत झोप अनावर झाली, खिडकीवर डोस्क बडवत हुतं.

मला वाटते की अडकून फाटणे ला खोंबारणे बरोबर नाही. माझ्या माहीतीनुसार खूप वर्षे एखादा कपडा, साडी घडी करून कपाटात ठेवली असेल आणि ती घडीवर विरून विसविशीत होऊन फाटण्याच्या आधीच्या टप्प्यावर असेल तर त्याला खोंबारा लागलाय म्हणातात.

गदमदणे - याचा वापर आमच्याकडे सर्रास होतो पण बाकीचे लोक कुठला परकिय शब्द असल्यासारखे बघतात. उकाड्याने लाही लाही होत असेल तर गदमदते आणि दुखाने गदगदणे...यात अनेकदा गोंधळ करतात.

कोल्हापूरचे काही शब्द तर फार भारी - काय तुंब्या पाऊस पडायलाय....

ईसन - बहूतेक विसण चा अपभ्रंश. कडकडीत गरम पाण्याला कोमट करण्यासाठी त्यात थंड पाणी घालतात त्याला म्हणतात विसण /ईसण.

मला वाटते की अडकून फाटणे ला खोंबारणे बरोबर नाही. माझ्या माहीतीनुसार खूप वर्षे एखादा कपडा, साडी घडी करून कपाटात ठेवली असेल आणि ती घडीवर विरून विसविशीत होऊन फाटण्याच्या आधीच्या टप्प्यावर असेल तर त्याला खोंबारा लागलाय म्हणातात.

>>>
ईरने असे पण म्हनतात...

वरदाने सांगितलेलं बरोबर आहे. पवित्र गोष्टी तुटत फुटत नाहीत. वाढतात्/वाढवतात
तसंच समई मालवतात. विझवत नाहीत.

वाढवणे वरून मला एक गंमत आठवली. परवा मला ओलं खोबरं हवं होतं म्हणून मी नारळ वाल्याला म्हणलं. मला एक नारळ वाढवून द्या. तर तो म्हणाल कितीला?
मी - कितीला? ?? अहो वाढवून द्या
ना. - अहो २० ला आहे किती वाढवून देऊ?
मी - एकच
ना - (कुठून ही चक्रम बाई आली ??? या आवेशात.
मी - माझ्या लक्शात चूक आली, अहो वाढवून म्हणजे फोडून.
ना - नाक वाकडं तिक्डं करून न जाने कहासे आ जाते है टाईप एक्स्प्रेसन्स Proud

कोकणात ला एक शब्द
रूंगूरूंगू - चेंगट पणे काम करणे ह्या अर्थाने.
रोंबाट- कळकट पसारा , खासक्रून स्वैपाकघरातला.

मांजरमुतवणी >>> अगो, हे टेंपरेचरला उद्देशून आहे. चहा गरमागरम नसेल, फक्त कोमट असेल तर तो मांमु आहे.

दक्षे, मस्त धागा.

सापावरून परत कोकण आठवल, जनावर म्हणतात सापाला , माझा मुलगा लहान असताना वाघ, सिंह, गेलाबाजार हरिण तरी दिसेल ह्या आशेवर असायचा. Lol

हो इन्ना सापाला जनावर म्हणतात, माझे बाबा अजूनही म्हणतात.

गवारीला बावचा म्हणतात बरेच जण कोकणात.

Pages