"ठो उपमा" - प्रसंग-१

Submitted by संयोजक on 28 August, 2014 - 01:50

गणपती बाप्पा मोरया!
या उपक्रमाविषयी अधिक महितीसाठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50546

प्रसंग :

आज पहाटे पहाटेच्या गुलाबी थंडीत अंजूला एक तलम स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नानं तिच्या मनाचा तळ पार ढवळून निघाला होता. कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरांसारखी उडून गेली तरी बोटांवर फुलपंखी रंग मागे उरावेत तशा त्या आठवणी तिची पाठ सोडत नव्हत्या. म्हणून शेवटी ती उठून बसली. तरी आठवणींनी तिच्याभोवती फेर धरलाच. समोर घडी करायची चादर दिसत असताना 'मी स्वप्नात तर नाही ना?' असले वेडगळ प्रश्न स्वतःला आणि त्याहून मूर्खासारखे दुसर्‍याला विचारायला अंजू म्हणजे कुणी कथानायिका नव्हती. मनाचा हिय्या करुन ती उठली, तेव्हा 'वजन वाढलेय की काय?' अशा शंकेची पाल तिच्या मनात चुकचुकली. ती अभद्र शंका या सुखस्वप्नात कशाला? वैतागून तिने पटपट आवरले आणि हातात कॉफीचा वाफाळता कप घेऊन बाल्कनीतल्या झोक्यावर निवांत बसली. जणू ती वर्तमान आणि भूतकाळाच्या हिंदोळ्यावर झुलत होती. बाल्कनीत लावलेल्या मोगर्‍याचा सुगंध तिच्या कॉफीच्या घमघमाटाला छेद देत होता. तरी तिने हट्टाने दोन्ही सुवासांचा आल्हाददायक अनुभव घेतला. कॉफीचे गरम गरम घोट घशाखाली उतरल्यावर तिच्या मनाला जरा तरतरी आली. आज काहीही झाले तरी त्याची भेट घ्यायचीच असे तिने मनोमन ठरवले. इतक्यात आकाशात ढगांची अचानक गर्दी झाली. तिच्या आरस्पानी मनावर पावसाचे थेंब उमटले. मनाचा मोर थुई थुई नाचू लागला. अंजू झोक्यावरून उठली व भराभर आवरायला घेतले. मोर, पाऊस, ढग इकडेतिकडे विखुरले. स्वप्न तलम पडद्यासारखे नजरेसमोर एकसंध होते. तिने एकीकडे भाजी फोडणीला टाकून पोळ्या करायला घेतल्या. सकाळी एवढा टाईमपास झाल्यावर घाई होणारच. तेवढ्या घाईत हलकासा मेकप करून 'त्याच्या' आवडत्या रंगाची शिफॉनची साडी, हलकी लिपस्टीक आणि मोत्यांचा "एकच" सर गळ्यात घालून मंद सुवासाचा पर्फ्यूमही स्प्रे केला. डबा भरून, पर्स घेऊन, चपला घालून ती निघाली आणि बाहेरून दरवाजा खाडकन ओढून घेतला. ऑफिसमध्ये हसर्‍या चेहर्‍याने अंजूने पाऊल टाकले तेव्हा साहजिकच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. मिस अंजलिका देखणे - नावाप्रमाणेच देखणी होती. सहसा पंजाबी सलवार कमीज मध्ये वावरणारी अंजू आज साडी नेसल्यावर जास्तच आकर्षक दिसत होती. तिचे काळेभोर लांबसडक केस आणि हरणासारखे टपोरे पाणीदार डोळे तिच्या मादक सौंदर्यात भर घालत होते. ऑफिसमधल्या तरुण मुलांना अंजूशी मैत्री व्हावी असे वाटायचे तर मुलींना तिच्या दैवी सौंदर्याचा आणि विलक्षण हुशारीचा हेवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज पहाटे पहाटेच्या नवऱ्याच्या घोरण्याच्या तालावर अंजूला एक तलम स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नानं तिची झोप पार उडाली होती. हाताच्या बोटाला च्युइंगगम चिकटून रहावं, निघूच नये तशा त्या आठवणी तिची पाठ सोडत नव्हत्या. म्हणून शेवटी ती उठून बसली. तरी डोक्यातले विचार संपत नव्हते. समोर घडी करायची चादर दिसत असताना 'चादर मशिनला लावून किती दिवस झाले?' असले वेडगळ प्रश्न स्वतःला आणि त्याहून मूर्खासारखे दुसर्‍याला विचारायला अंजू म्हणजे कुणी कथानायिका नव्हती. मनाचा हिय्या करुन ती उठली, तेव्हा 'वजन वाढलेय की काय?' असा विचार रोजच्याप्रमाणे आजही तिच्या मनात आला. ती अभद्र शंका या सुखस्वप्नात कशाला? वैतागून तिने पटपट आवरले आणि हातात इन्सन्ट कॉफी घेऊन बाल्कनीतल्या झोक्यावर निवांत बसली. जणू ती कॉफी विथ करणमध्ये मुलाखतीलाच बसली होती. बाल्कनीत लावलेल्या मोगर्‍याचा सुगंध तिच्या कॉफीच्या घमघमाटाला छेद देत होता. तरी तिने हट्टाने दोन्ही सुगंध घ्यायचा प्रयत्न केला पण सर्दीमुळे नाक बंद असल्याने तिला कसलाच सुगंध येत नव्हता. कॉफी पिताना व्हॉट्सॲपवर ’त्याचे’ काल रात्री ती झोपल्यावर पाठवलेले मेसेजेस वाचून तिच्या मनाला जरा तरतरी आली. आज काहीही झाले तरी त्याची भेट घ्यायचीच असे तिने मनोमन ठरवले. इतक्यात आकाशात ढगांची अचानक गर्दी झाली. तिच्या कपाळावर आठया पडल्या- पाऊस आला तर चिखल, खड्डे- नको रे नको. अंजू झोक्यावरून उठली व भराभर आवरायला घेतले. चिखल, पाऊस, खड्डे इकडेतिकडे विखुरले. स्वप्न तलम पडद्यासारखे नजरेसमोर एकसंध होते. तिने एकीकडे नवऱ्यासाठी चहा ठेवून कामवाल्या बाईंना दार उघडून घरात घेतले व त्यांना परवा उकडून ठेवलेल्या बटाटयाचे पराठे करायला सांगितले. सकाळी एवढा टाईमपास झाल्यावर घाई होणारच. तेवढ्या घाईतही व्यवस्थित आवरुन, ट्रॅडिशनल डे असल्यामुळे मागच्या महिन्यात चुलतदिराच्या लग्नात मिळालेली साडी नेसून ती तयार झाली. डबा भरून, पर्स घेऊन, चपला घालून ती निघाली आणि बाहेरून दरवाजा खाडकन ओढून घेतला. ऑफिसमध्ये हसर्‍या चेहर्‍याने अंजूने पाऊल टाकले तेव्हा साहजिकच सर्वांच्या नजरा तिच्याकडे वळल्या आणि सगळ्यांना हसू कोसळलं. मिस अंजलिका देखणे - नावाप्रमाणेच देखणी होती. सहसा टीशर्ट्स व विटक्या जीन्समध्ये वावरणारी अंजू आज साडी नेसल्यावर जास्तच आकर्षक दिसत होती. त्या दिवशी कॅज्युअल डे असल्यामुळे सर्वजण कॅज्युअल कपडयात होते, ती मात्र दोन दिवसांनी असलेल्या ट्रॅडिशनल डेसाठी आजच तयार होऊन आली होती आणि तिच्या चेहऱ्यावरचे वैतागलेले ’ओह नो शिट आज नव्हताच ट्रॅडिशनल डे’ हे भाव सर्वांना हसवण्यात आणखीच भर घालत होते. ऑफिसमधल्या तिच्याकडे बघून हसणाऱ्या तरुण मुलांकडे बघून अंजूला पुन्हा ’त्याची’ आठवण झाली, ’हे सगळं त्याच्यामुळेच होतंय, एकाच घरात राहूनपण दोघांच्या सूर्यचंद्रासारख्या शिफ्टमुळे सख्ख्या नवऱ्याशी पाच मिनिटं बोलता पण येत नाही- आज त्याला- आपल्या नवरोबाला संध्याकाळी घरी गाठायचंच-" असा निर्धार करुन ती कामाला लागली.

आज पहाटेच्या, एरवी जाग आणून चारदा बाथरूम वार्‍या घडवणार्‍या नाठाळ थंडीत अंजूला एक तलम स्वप्न पडलं. त्या स्वप्नाच्या कालथ्यानं तिच्या मेंदूच्या रबडीचं भांडं बुडापासून खरवडून काढलं होतं. तुपात थबथबलेला, कळकट केळी घातलेला शिरा खाऊन हात धुतल्यावरही बोटांना एक ओशटपणा आणि मिचमिचीत चव उरावी तशा त्या आठवणी तिची पाठ सोडत नव्हत्या. म्हणून शेवटी ती उठून बसली. तरी तो तुपकटपणा निथळत राहीलाच. समोर घडी करायची चादर दिसत असताना 'मी खरोखर शिरा तर खात नाहीये ना?' असले वेडगळ प्रश्न स्वतःला आणि त्याहून मूर्खासारखे दुसर्‍याला विचारायला अंजू म्हणजे कुणी कथानायिका नव्हती. मनाचा हिय्या करून ती उठली. तेव्हा, 'वजन वाढलेय की काय' अशा शंकेचं वटवाघूळ तिच्या मनात क्षणभर स्वतःला उलटं टांगून गेलं. ती अभद्र शंका या सुखस्वप्नात कशाला? वैतागून तिने पटपट आवरले आणि आवोकाडो मास्कसाठी पिकलेले आवोकाडो बाजूला काढायचं विसरल्यामुळे आधल्या रात्रीच्या पार्टीत उरलेलं ग्वाकामोले डिप आणि कॉफिपावडर एकत्र करून, चेहर्‍यावर फासून घेऊन ती बाल्कनीतल्या झोक्यावर निवांत बसली. जणू ती सुरकुतलेलं वर्तमान आणि टवटवीत भूतकाळाच्या टोकांमधलं पेंडुलम् झाली होती. बाल्कनीत लावलेल्या मोगर्‍याचा सुगंध तिच्या कॉफीच्या घमघमाटाला छेद देत होता. तरी तिने हट्टाने दोन्हीचा वास, शिलगवलेली बंदरी बीडी आणि मार्लबरो आलटूनपालटून हुंगाव्या तसा ऊर भरून घेतला. ग्वाकामोले लेपाचा थर सुकून त्यातले कांदा टोमॅटोचे काप गालांवरून ओघळायला लागले तशी ती भानावर आली. आज काहीही झाले तरी त्याची भेट घ्यायचीच असे तिने मनोमन ठरवले. इतक्यात, मायबोलीवर सोनिया, नमो, राहुल, सावरकर, गांधी म्हंटल्यावर विशिष्ट आयड्या, डु-आयड्या, रोमित आयड्या यांची झुंड यावी तशी ढगांची गर्दी झाली. चष्म्यावर पावसाचे थेंब आदळले. मनाचा कावळा वळचणीची जागा शोधत कावकाव करू लागला.

अंजू झोक्यावरून उठली व भराभर आवरायला घेतले. कावळा, पाऊस, ढग इकडेतिकडे विखुरले. घट्ट चिकटलेल्या साबुदाणापापड्या ओरबाडून काढल्यावरसुध्दा न फाटलेल्या मेणकापडासारखे स्वप्न एकसंध होते. तिने एकीकडे चेहर्‍यावरून ओघळलेल्या कांदा- टोमॅटोचा एक बारकासा तुकडा तोंडात घालत चेहरा धुवायला घेतला. सकाळी एवढा टाइमपास झाल्यावर घाई होणारच.

तेवढ्या घाईत तिने घोटून दोनदा दाढी करून, हिरव्या झालेल्या तोंडावर कन्सीलर आणि फाउंडेशनची पुटं चढवत, सिगरेट फुंकून काळपट झालेल्या ओठांवर कचकचून लिपस्टिक फासून, गळ्याचं हाडूक लपवायला ३-४ मोत्यांचे सर घालत, आफ्टरशेव्ह - ग्वाकामोले मिश्रणाचा वास घालवायला वर आणखी पर्फ्यूम स्प्रे केला. डबा भरून, पर्स घेऊन, चपला घालून ती निघाली आणि बाहेरून दरवाजा खाडकन ओढून घेतला. ऑफीसमधे हसर्‍या चेहर्‍याने अंजूने पाउल टाकले तेव्हा साहजीकच सगळ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. मिस अंजली देखणे नावाप्रमाणे देखणी होती. सहसा जीन्स आणि टीशर्टामध्ये वावरणारी अंजू आज साडी नेसल्यावर जास्तच आकर्षक दिसत होती. तिचे ब्लीचब्लाँड-थोटके केस आणि हेवी आय मेकअप, खोट्या पापण्यांमुळे जडावलेले बटबटीत डोळे तिच्या कन्फ्यूजिंग सौंदर्यात(?) भर घालत होते.

ऑफीसमधल्या बाप्यांना अंजूची मैत्री लई डँजर वाटायची तर मुलींना तिच्या वॉर्डरोब आणि मेकअपच्या साहित्याचा हेवा!

मामी, अकु लय भारी. रिया शेन्गदाण्याचा अर्थ आता कळला.:फिदी:

ए खरच कुणीतरी हे आगरी नाहीतर मालवणीत करा.( मला दिगम्बर नाईक आठवला.:फिदी: तोच नारायण राणेन्ची नक्कल करणारा)

उदाहरर्णार्थः-आज फटफटाच्या गुलाबी थन्डीच्या येळोत अन्जुक याक सपान पडलो असा. त्या सपनाने अन्जुक आठवला, की मायबोलीवर त्येका मालवणी शिकुक बराच येळ झाला, तरी अद्याप त्येका मालवणी फर्मास जमलो न्हाय. थय जाऊक जाउक टायपुन तिच्या बोटाक रग लागली असा.:खोखो:

माझा प्रतीसाद गम्भीरपणे घेऊन कुणी हल्लाबोल करु नका रे.:दिवा:

मृण्मयी,

गळ्याचं हाडूक लपवायला ३-४ मोत्यांचे सर घालत Lol

तुपात थबथबलेला, कळकट केळी घातलेला शिरा खाऊन हात धुतल्यावरही बोटांना एक ओशटपणा आणि मिचमिचीत चव उरावी >>>>>>>>> मस्त शिरा-उपमा Happy
ओवरऑल मस्तच !

रश्मी, शेंगदाण्याच्या भावना समजून घेतल्याबद्दल धन्यवाद Wink

आज पहाटे पहाटेच्या मरतुकड्या गार वार्‍यात अंजूला एक तलम स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नानं तिच्या मनाचा पार हापसा झाला होता. यस्टी पार टेकाडावर पोचली तरी धुराळा मागं सोडती तशा कॉलेजच्या आठवणी तिची पाठ सोडत नव्हत्या. म्हणून शेवटी ती उठून बसली. संमदा धुराळा अंगावर बसला. समोर घडी करायची चादर दिसत असताना 'बस गेली का मिळाली?' असले वेडगळ प्रश्न स्वतःला आणि त्याहून मूर्खासारखे दुसर्‍याला विचारायला अंजू म्हणजे कुणी कथानायिका नव्हती. मनाचा हिय्या करुन ती उठली, तेव्हा 'वजन वाढलेय की काय?' काय कळंना झालंय आसं तिला वाटलं. ती अभद्र शंका या सुखस्वप्नात कशाला? वैतागून तिने पटपट आवरले आणि हाडाला चटका बसल येवड्या गर्मागरम कॉफीचा कप घेऊन बाल्कनीतल्या झोक्यावर निवांत बसली. जणू ती विळद घाटात नाठाळ बैलांनी वढत चाल्लेल्या बैलगाडीत बसणार्‍या धक्क्यांनी वर-खाली झुलत होती. बाल्कनीत लावलेल्या मोगर्‍याचा सुगंध तिच्या कॉफीच्या घमघमाटाला छेद देत होता. तरी तिने हट्टाने दोन्हीचा वास भारीपैकी नाकात भरून घेतला. गर्मागरम कॉफीनं घसा भाजून काढल्यावर तिला जरा माणसांत आल्यागत झालं. आज काहीही झाले तरी त्याची भेट घ्यायचीच असे तिने मनोमन ठरवले. आन तितक्यात ढगच ढग जमले. ते ढग आन पाण्याचं थेंब बगून तिला काय आटवलं तर हापिसाला जाताना छत्री न्यायला हवी. अंजू झोक्यावरून उठली व भराभर आवरायला घेतले. मोर, पाऊस, ढग इकडेतिकडे विखुरले. तरी समदं जनु पिच्चर चाल्ल्यगत डोळ्यांसमोर दिसत हुतं. ब्रेडला बटर आन ज्याम फासून तिनं निमूट गिळलं. सकाळी एवढा टाईमपास झाल्यावर घाई होणारच. तेवढ्या घाईत तिनं हाताला लागल तेवढा फुफाटा तोंडावर मारून, लाली फासून, दिसल ती 'वॉश अन वेअर' साडी गुंडाळून एकुलता एक सर गळ्याभोवती टाकून आन पर्फ्युमऐवजी रुम फ्रेशनर फवारला. डबा भरून, पर्स घेऊन, चपला घालून ती निघाली आणि बाहेरून दरवाजा खाडकन ओढून घेतला. ऑफिसमध्ये हसर्‍या चेहर्‍याने अंजूने पाऊल टाकले तेव्हा साहजिकच सगळे मेले डोमकावळे तिच्याकडंच टकामका बघत व्हते. मिस अंजलिका देखणे - नावाप्रमाणेच देखणी होती. सहसा पंजाबिणीसारखी वावरणारी अंजू आज साडी नेसल्यावर जास्तच आकर्षक दिसत होती. तिचे मोट वढतील एवढाल्ले जाडे केस आणि भोकरावाणी डोळे तिच्या लै भारी दिसण्यात लैच भर घालत होते. हापिसातली समदी पोरं तिला फ्रेंडशिप मागू मागू बेजार व्हायची तर पोरी निस्त्या जळायच्या.

अकु
donald-duck-022007-3.gif

Pages