"ठो उपमा" - प्रसंग-१

Submitted by संयोजक on 28 August, 2014 - 01:50

गणपती बाप्पा मोरया!
या उपक्रमाविषयी अधिक महितीसाठी येथे टिचकी मारा - http://www.maayboli.com/node/50546

प्रसंग :

आज पहाटे पहाटेच्या गुलाबी थंडीत अंजूला एक तलम स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नानं तिच्या मनाचा तळ पार ढवळून निघाला होता. कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे फुलपाखरांसारखी उडून गेली तरी बोटांवर फुलपंखी रंग मागे उरावेत तशा त्या आठवणी तिची पाठ सोडत नव्हत्या. म्हणून शेवटी ती उठून बसली. तरी आठवणींनी तिच्याभोवती फेर धरलाच. समोर घडी करायची चादर दिसत असताना 'मी स्वप्नात तर नाही ना?' असले वेडगळ प्रश्न स्वतःला आणि त्याहून मूर्खासारखे दुसर्‍याला विचारायला अंजू म्हणजे कुणी कथानायिका नव्हती. मनाचा हिय्या करुन ती उठली, तेव्हा 'वजन वाढलेय की काय?' अशा शंकेची पाल तिच्या मनात चुकचुकली. ती अभद्र शंका या सुखस्वप्नात कशाला? वैतागून तिने पटपट आवरले आणि हातात कॉफीचा वाफाळता कप घेऊन बाल्कनीतल्या झोक्यावर निवांत बसली. जणू ती वर्तमान आणि भूतकाळाच्या हिंदोळ्यावर झुलत होती. बाल्कनीत लावलेल्या मोगर्‍याचा सुगंध तिच्या कॉफीच्या घमघमाटाला छेद देत होता. तरी तिने हट्टाने दोन्ही सुवासांचा आल्हाददायक अनुभव घेतला. कॉफीचे गरम गरम घोट घशाखाली उतरल्यावर तिच्या मनाला जरा तरतरी आली. आज काहीही झाले तरी त्याची भेट घ्यायचीच असे तिने मनोमन ठरवले. इतक्यात आकाशात ढगांची अचानक गर्दी झाली. तिच्या आरस्पानी मनावर पावसाचे थेंब उमटले. मनाचा मोर थुई थुई नाचू लागला. अंजू झोक्यावरून उठली व भराभर आवरायला घेतले. मोर, पाऊस, ढग इकडेतिकडे विखुरले. स्वप्न तलम पडद्यासारखे नजरेसमोर एकसंध होते. तिने एकीकडे भाजी फोडणीला टाकून पोळ्या करायला घेतल्या. सकाळी एवढा टाईमपास झाल्यावर घाई होणारच. तेवढ्या घाईत हलकासा मेकप करून 'त्याच्या' आवडत्या रंगाची शिफॉनची साडी, हलकी लिपस्टीक आणि मोत्यांचा "एकच" सर गळ्यात घालून मंद सुवासाचा पर्फ्यूमही स्प्रे केला. डबा भरून, पर्स घेऊन, चपला घालून ती निघाली आणि बाहेरून दरवाजा खाडकन ओढून घेतला. ऑफिसमध्ये हसर्‍या चेहर्‍याने अंजूने पाऊल टाकले तेव्हा साहजिकच सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. मिस अंजलिका देखणे - नावाप्रमाणेच देखणी होती. सहसा पंजाबी सलवार कमीज मध्ये वावरणारी अंजू आज साडी नेसल्यावर जास्तच आकर्षक दिसत होती. तिचे काळेभोर लांबसडक केस आणि हरणासारखे टपोरे पाणीदार डोळे तिच्या मादक सौंदर्यात भर घालत होते. ऑफिसमधल्या तरुण मुलांना अंजूशी मैत्री व्हावी असे वाटायचे तर मुलींना तिच्या दैवी सौंदर्याचा आणि विलक्षण हुशारीचा हेवा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आज पहाटे पहाटेच्या एक थर लोकरीच्या थंडीत अंजूला एक तलम स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नानं तिच्या मनाच्या तळाला ड्रिलिंग मशीनने खडकाला खड्डे पडावेत तसे खड्डे पडले होते. कॉलेजची ती रंगीबेरंगी वर्षे उडून गेली तरी फ्युमिगेट केल्यावर डास निघून जावेत पण साचलेल्या पाण्यांवरची त्यांची अंडी तशीच रहावीत तशा त्या आठवणी तिची पाठ सोडत नव्हत्या. म्हणून शेवटी ती उठून बसली. तरी आठवणी तिच्या मनात पुन्हा पुन्हा copy-paste होत राहिल्या. समोर घडी करायची चादर दिसत असताना 'कॉलसेंटर मध्ये नोकरीस असूनही फक्त दिवसपाळी तर करत नाही ना?' असले वेडगळ प्रश्न स्वतःला आणि त्याहून मूर्खासारखे दुसर्‍याला विचारायला अंजू म्हणजे कुणी कथानायिका नव्हती. मनाचा हिय्या करुन ती उठली, तेव्हा 'वजन वाढलेय की काय?' अशा शंकेचा मिक्सर तिच्या मनात घुर्रकन फिरला. ती अभद्र शंका या सुखस्वप्नात कशाला? वैतागून तिने पटपट आवरले आणि हातात आवळा रस आणि जांभळाचा मध घातलेलं गरम पाणी घेऊन बाल्कनीतल्या झोक्यावर निवांत बसली. जणू ती वर्तमान आणि भूतकाळाच्या एलिप्टिकलवर चारच्या स्पीडनं चालत होती. बाल्कनीत लावलेल्या मोगर्‍याचा सुगंध तिच्या पेयाच्या घमघमाटाला छेद देत होता. तरी तिने हट्टाने दोन्ही सुवासांचा आल्हाददायक अनुभव घेतला. पेयाचे गरम गरम घोट घशाखाली उतरल्यावर तिच्या मनावरील चरबी काही प्रमाणात हटल्याने तिला उत्साहीत वाटले. आज काहीही झाले तरी त्याची भेट घ्यायचीच असे तिने मनोमन ठरवले. इतक्यात आकाशात ढगांची अचानक गर्दी झाली. तिच्या काही औंस हलक्या झालेल्या मनावर पावसाचे थेंब पडले आणि मन दोरीच्या उड्या मारू लागले. अंजू झोक्यावरून उठली व भराभर आवरायला घेतले. पाऊस, दोर्‍या, उड्या इकडेतिकडे विखुरले. स्वप्न ७२" LED टिव्हीच्या स्क्रीनप्रमाणे तिच्या मनाची भिंत व्यापून राहिले होते. होते. तिने एकीकडे ओटस मावेमध्ये शिजायला ठेऊन दाराबाहेर नुकताच आलेला जेवणाचा डबा आत आणला. सकाळी एवढा टाईमपास झाल्यावर घाई होणारच. तेवढ्या घाईत आंघोळीची गोळी घेऊन, आजच्या दिवसाच्या रंगाचा बिझिनेस सुट घालून खोट्या पापण्या, ओठ, नाक आणि नखे डकवून सुटच्या रंगाचा विग परिधान केला. डबा भरून, पर्स घेऊन, चपला घालून ती निघाली आणि बाहेरून दरवाजा खाडकन ओढून घेतला. ऑफिसमध्ये हसर्‍या चेहर्‍याने अंजूने पाऊल टाकले तेव्हा साहजिकच सर्वांच्या नजरा तिला स्कॅन करून आपल्या मेमरीत भरू लागल्या. मिस अंजलिका देखणे - नावाप्रमाणेच देखणी होती. सहसा जीन्स टॉप मध्ये वावरणारी अंजू आज पेन्सिल स्कर्ट घातल्यावर जास्तच आकर्षक दिसत होती. तिचे जांभळ्या हिरव्या रंगाची ड्युअल शेड असलेले चकचकीत स्टील ग्रे केस आणि तब्बल पाव इंच लांबीच्या पापण्या असलेले सोनेरी डोळे तिच्या मादक सौंदर्यात भर घालत होते. ऑफिसमधल्या तरुण मुलांना अंजूच्या इन्स्टाग्रामवर अ‍ॅड व्हावेसे वाटायचे तर मुलींना तिच्या ड्रेस आणि अ‍ॅक्सेसरीजचा हेवा वाटायचा.

आज पहाटे पहाटेच्या गुबगुबीत अंधारात अंजूला एक तलम स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नानं तिच्या झोपेचं पार शिळं भरीत झालं होतं. विनाकारण आपल्या हाताने स्वत:लाच थोबाडात माराव्यात तशा त्या आठवणी तिची पाठ सोडत नव्हत्या. म्हणून शेवटी ती उठून बसली. तरी आठवणींनी तिचा चावा घेतलाच. समोर घडी करायची चादर दिसत असताना 'माझं डोकं तर बिघडलं नाही ना?' असले वेडगळ प्रश्न स्वतःला आणि त्याहून मूर्खासारखे दुसर्‍याला विचारायला अंजू म्हणजे कुणी कथानायिका नव्हती. मनाचा हिय्या करुन ती उठली, तेव्हा 'वजन वाढलेय की काय?' अशा विचाराने तिच्या हळूवार, पोलादी मनावर घाला घातलाच! ती अभद्र शंका या सुखस्वप्नात कशाला? वैतागून तिने पटपट आवरले आणि हातात डास मारायची रॅकेट घेऊन बाल्कनीतल्या झोक्यावर निवांत बसली. जणू ती युध्दाला निघालेली एक झुंजार शिपाई होती. बाल्कनीत लावलेल्या मोगर्‍याचा सुगंध तिच्या कॉफीच्या घमघमाटाला छेद देत होता. तरी तिने हट्टाने दोन्ही सुवासांवर मात करण्यासाठी डास मारायची कॉईल पेटवलीच. त्या कॉईलमधून निघणाऱ्या धुराचा ऊर भरून वास घेतल्यावर तिच्या मनाला जरा तरतरी आली. आज काहीही झाले तरी त्याची भेट घ्यायचीच असे तिने मनोमन ठरवले. तो पेस्ट कंट्रोल करणारा माणूस कितीतरी दिवस तिची भेट टाळत असल्याचा तिला खरपूस संशय होता. तिने मनातले विचारांचे गुंतवळ झटकून टाकायचे ठरविले. अंजू झोक्यावरून उठली व भराभर आवरायला घेतले. मोर, पाऊस, ढग इकडेतिकडे विखुरले. डासांचा मनाला चरफडायला लावणारा अर्धस्फुट गोंगाट तिच्याभोवती कोळीष्टके विणू लागला. तिने हलकेच डासांच्या रॅकेटची तलवार उपसून डझनभर डासांचा खातमा केला. सकाळी एवढा टाईमपास झाल्यावर घाई होणारच. तेवढ्या घाईत तिने कचऱ्याचे डबे बाहेर नेऊन ठेवले, जुनी पोतेरी धुवून वाळत घातली. डबा भरून, पर्स घेऊन, चपला घालून ती निघाली आणि बाहेरून दरवाजा खाडकन ओढून घेतला. ऑफिसमध्ये हसर्‍या चेहर्‍याने अंजूने पाऊल टाकले तेव्हा साहजिकच सर्वांनी आपले डोळे गपकन् मिटून घेतले.  मिस अंजलिका देखणे - नावाप्रमाणेच देखणी होती. सहसा चुरगळलेला टीशर्ट व सैल जीन्स मध्ये वावरणारी अंजू आज साडी नेसल्यावर जास्तच आकर्षक दिसत होती. तिचे जेलने चपचपलेले केस आणि तोंडावरचे माशी न उडणारे भाव तिच्या मादक सौंदर्यात भर घालत होते. ऑफिसमधल्या चपराशांना तिच्या दरदरून येणाऱ्या घामासारख्या नियमित येण्याची धाकधूक असायची तर तमाम मुलींना तिच्या नजरेचा अणकुचीदार चाबूक आपल्यावर उगारला जाईल याची भीती!

धन्यवाद पराग.

संयोजक, थोडे छोटे परिच्छेद दिलेत (साधारण चार-पाच ओळींचे) तर जास्त लोकं भाग घेतील असं वाटतं.

आज भर दुपारच्या वातानुकूलनयंत्रनियंत्रित थंडीत अंजूला एक तलम स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नानं तिचं आयुष्य तिला करपलेल्या भांड्याच्या तळासारखं वाटू लागलं होतं. ग्लॅमरवर्ल्डमधले ते चकचकाटी दिवस ड्रॅगनसारखे उडून गेले होते तरी त्यांच्या विषारी फूत्कारांचे प्रतिध्वनी, तशा त्या आठवणी तिची पाठ सोडत नव्हत्या. म्हणून शेवटी ती उठून बसली. तरी फ्लॅशलाइट्सनी तिच्यावर फोकस मारलाच. समोर घडी करायची चादर दिसत असताना 'मी रँपवर तर नाही ना?' असले वेडगळ प्रश्न स्वतःला आणि त्याहून मूर्खासारखे दुसर्‍याला विचारायला अंजू म्हणजे कुणा मालिकेची माजी नायिकाच तर होती. मनाचा हिय्या करुन ती उठली, तेव्हा 'वजन वाढलेय की काय?' असा 'कट कट' असा चिडका स्वर तिच्या मनात चिरकला. ती अभद्र शंका या सुखस्वप्नात कशाला? वैतागून तिने पटपट आवरले आणि हातात व्हिस्कीचा गार प्याला घेऊन बाल्कनीतल्या झोक्यावर निवांत बसली. जणू ती मॉडेलिंग आणि अ‍ॅक्टिंगच्या हिंदोळ्यावर झुलत होती. बाल्कनीत लावलेल्या मोगर्‍याचा सुगंध तिच्या व्हिस्कीच्या इथॅनी घमघमाटाला छेद देत होता. तरी तिने हट्टाने दोन्ही सुवासांचा कॉकटेल अनुभव घेतला. व्हिस्कीचे म घोट घशाखाली उतरल्यावर तिच्या मनाला जरा तरतरी आली. आज काहीही झाले तरी त्याची भेट घ्यायचेच असे तिने मनोमन ठरवले. इतक्यात अचानक कर्कश हॉर्न्स वाजू लागले. समोरच्या रस्त्यावर ट्रॅफिकजाम झाला. तिच्या सरावलेल्या मनावर घड्याळाचे काटे उमटले. मनाची BMW सुसाट धावू लागली. अंजू झोक्यावरून उठली व भराभर आवरायला घेतले. हॉर्न्स, कार्स, रस्ते सगळे तिथेच होते. सत्य फ्लॅशबल्बसारखे क्रूर नजरा रोखून उभे होतेते. तिने एकीकडे प्रोटीन शेक काढत ती न्युट्री बार शोधत होती. दुपारी एवढा टाईमपास झाल्यावर घाई होणारच. तेवढ्या घाईत लेटेस्ट ट्रेण्डचा मेकप करून मागच्या शूटमधून उचलेला शोल्डरलेस गाऊन, निळी लिपस्टीक आणि फक्त नाकात नथनी घालून उग्र सुवासाचा पर्फ्यूमही स्प्रे केला. व्हॅनिटी बॉक्स, पर्स घेऊन, पेन्सिल हील्स घालून ती निघाली आणि बाहेरून दरवाजा खाडकन ओढून घेतला. सेटवर चिडक्या चेहर्‍याने अंजूने पाऊल टाकले तेव्हा साहजिकच कोणाच्याच नजरा तिच्याकडे वळल्या नाहीत. मिस अंजलिका देखणे - नावाप्रमाणेच देखणी होती. सहसा मिनीस्कर्टमध्ये वावरणारी अंजू आज पायघोळ गाऊन घातल्यावर जास्तच विचित्र दिसत होती. तिचे क्रूकट हायलाइटेड केस आणि हिरव्या लेन्स घातलेले डोळे तिच्या टेरर सौंदर्यात भर घालत होते. सेटवरच्या तरुण मुलांना अंजूने आपल्या मॉमचा रोल करावा असे वाटायचे तर मुलींना तिच्यासारखी वेळ आपल्यावर इतक्यात येऊ नये अशी कीव.

हे केवळ विनोदनिर्मितीसाठी,पूर्णपणे कल्पनेचे खेळ. कोणत्याही प्रोफेशनचा अपमान करायचा अजिबात हेतू नाही.

व्वा ! वेगळ्या प्रकारचा धागा ..... छानच आहे.

मामी, अकु, भरत
मस्त कल्पना लढवल्यात .... मजा आली.
-------------------------------------------------------------------------------------------
संयोजक,
परिच्छेद लहान असावा या मामींच्या सूचनेला अनुमोदन.
लहान परिच्छेद आणि अधिक उपमा यामुळे रंजकता वाढेल.

संयोजक,
परिच्छेद लहान असावा या मामींच्या सूचनेला अनुमोदन.
लहान परिच्छेद आणि अधिक उपमा यामुळे रंजकता वाढेल.

जास्तीत जास्त उपमा देता याव्यात म्हणून परिच्छेदांची लांबी मोठी झाली आहे. शिवाय नवीन प्रसंग दर दोन दिवसांनी मिळणार आहे. त्यामुळे मायबोलीकर वेळ देऊन या खेळाचा आनंद लुटू शकतील. तरीही सूचनेचा जरुर विचार करु.

पराग , मी सकाळी टॅबवरून लॉगिन होते, तेव्हा भराभरा लिहिले... मोह आवरेना! डेस्कटॉपवरून लॉगिन झाले की वाक्ये बोल्ड करेन.

आज पहाटे पहाटेच्या हाडं गोठवणार्‍या थंडीत अंजूला एक भयाण स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नानं तिच्या मनाचा कोपरानकोपरा पार ढवळून निघाला होता. सकाळची गोड गुलाबी थंडीतली झोप फुलपाखरांसारखी कधीच उडून गेली तरी भितीने तिच्या अंगावर शहारलेला काटा मागे उरावा तशा त्या सुरुवातीच्या बेढब बांध्याच्या आठवणी तिची पाठ सोडत नव्हत्या. म्हणून शेवटी ती उठून बसली. तरी त्या आठवणीं आता तिच्याभोवती झिम्मा फुगडी घालायला लागलया. समोर घडी करायची चादर दिसत असताना 'मी स्वप्नात तर नाही ना?' असले वेडगळ प्रश्न स्वतःला आणि त्याहून मूर्खासारखे दुसर्‍याला विचारायला अंजू म्हणजे कुणी कथानायिका नव्हती. मनाचा हिय्या करुन तिने त्या वजनाला कमी केले होते. एक नजर लक्ख उजेडात आरशात स्वतःला पहायला ती उठली आणि पहाताच 'वजन किलोने वाढले की काय?' अशा विचाराने तिच्या काळजाचा ठोका चुकला. ती अभद्र शंका या सुखस्वप्नात कशाला?
वैतागून तिने पटपट आवरले आणि हातात तो अमृततुलय चहाचा वाफाळता कप घेऊन बाल्कनीतल्या झोक्यावर निवांत बसली तसे वर्तमान आणि भूतकाळाच्या आठवणीवर तिचे कोमल मन हिंदकळायला लागले. कुठुनशी आलेली मंद हवेची झुळूक तिच्या गालाला स्पर्शून तिला वेडावत होती. कपाळावर रुळलेल्या केसांच्या बटा मधूनच त्या झुळूकेबरोबर तिला नाजूक गुदगुल्या करत होत्या तर बाल्कनीत लावलेल्या मोगर्‍याचा बेधुंद करणारा सुगंध तिच्या एक कटींग चहाच्या घमघमाटाला छेद देत होता. तरी तिने हट्टाने दोन्ही सुवासांचा आल्हाददायक अनुभव घेतला. चहाचे गरम गरम घोट घशाखाली उतरल्यावर तिच्या मनाला जरा तरतरी आली. आज काहीही झाले तरी त्याची भेट घ्यायचीच असे तिने मनोमन ठरवले. इतक्यात आकाशात जसा काही ढगाचा गालिचा पसरावा तसे ढग दाटून आले. त्या कुंद हवेने क्षणार्धात तिच्या कोमल मनावर आठवणींचे प्रतिबिंब उमटले. तिच्या मनमोहोराचे कारंजे थुई थुई मोरासारखे नाचू लागले.
अंजू झोक्यावरून उठली व भराभर आवरायला घेतले. मोर, पाऊस, ढग इकडेतिकडे विखुरले. स्वप्न तलम पडद्यासारखे नजरेसमोर एकसंध होते. तिने एकीकडे भाजीला झणझणीत मिरचीची फोडणी देवून घडीच्या तलम पोळ्या करायला घेतल्या. मायबोलीवरचा पोळीचा बाफ आठवून तिने मनातल्या मनात उजळणी केली. टीम्म फुगलेली पोळी पाहून ती सुखावली आणि तिने सुटकेचा श्वास सोडला. इतके दिवस मायबोलीवरच्या स्वंयपाकाच्या बीबीवर पाट्या टाकल्याचे सार्थक झाले ह्या विचाराने तिचे डोळे टचकन भरून आले. चटदिशी तिने आपल्या नवीन आयफोनने एखाद्या मुरलेल्या कलाकारासारखा फुगलेल्या पोळीचा फोटो कॅमेरात बंद केला.

सकाळी एवढा फालतु टाईमपास झाल्यावर घाई होणारच. तेवढ्या घाईत हलकासा मेकप करून 'त्याच्या' आवडत्या रंगाची सुळसुळीत शिफॉनची साडी, हलकीशी गुलाबी छटेची लिपस्टीक आणि टपोर्‍या पाणीदार मोत्यांचा "एकच" सर गळ्यात घालून मंद सुवासाचा पर्फ्यूमही स्प्रे केला. डबा भरून, पर्स घेऊन, चपला घालून ती निघाली आणि बाहेरून दरवाजा खाडकन ओढून घेतला. ऑफिसमध्ये हसर्‍या चेहर्‍याने अंजूने पाऊल टाकले तेव्हा साहजिकच सर्वांच्या कुतुहलाने भरलेल्या नजरा तिच्यावर रोखल्या गेलया . मिस अंजलिका देखणे - नावाप्रमाणेच देखणी होती. सहसा पंजाबी सलवार कमीज मध्ये वावरणारी कमनीय बांध्याची अंजू आज साडी नेसल्यावर जास्तच आकर्षक दिसत होती. तिचे तलम काळे लांबसडक केस आणि मृगनयनी डोळे तिच्या मादक सौंदर्यात भर घालत होते. ऑफिसमधल्या तरुण मुलांना अंजूशी मैत्री व्हावी असे वाटायचे तर मुलींना तिच्या कमनीय बांध्याचा आणि विलक्षण हुशारीचा हेवा.

आज पहाटे पहाटेच्या फाडू थंडीत अंजूला एक खत्रूड स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नानं तिच्या मनात फूल्ल टू उथ्थलपुथ्थल केली. उतारा घेतला तरी तोंडचा दारूचा वास काही जात नाही तशा त्या आठवणी तिची पाठ सोडत नव्हत्या. म्हणून शेवटी ती उठून बसली. तरी आठवणींचे ढेकर काही यायचे थांबत नव्हते.

समोर घडी करायची चादर दिसत असताना 'मी अजून बारमध्ये तर नाही ना?' असले वेडगळ प्रश्न स्वतःला आणि त्याहून मूर्खासारखे दुसर्‍याला विचारायला अंजू म्हणजे कुणी कथानायिका नव्हती. मनाचा हिय्या करुन ती उठली, तेव्हा 'वजन वाढलेय की काय?' असा एक शंकेचा बुडबुडा तिच्या डोक्यात अवतरला.

ती अभद्र शंका या सुखस्वप्नात कशाला? वैतागून तिने पटपट आवरले आणि हातात डाएट कोकचा कॅन घेऊन बाल्कनीतल्या झोक्यावर निवांत बसली. जणू अजूनही कसलासा हॅंगओव्हर शिल्लक होता. कोक जसा घश्याखाली सरकत होता तशी हळूहळू ती चिल्ल मारू लागली. आज काहीही झाले तरी त्याची भेट घ्यायचीच असे तिने मनोमन ठरवले. अन तिच्या मनाची रिंगटोन वाजू लागली. तिच्या आवडीची धून आळवू लागली. सोबत अंजूचेही पाय थिरकू लागले.

अंजू झोक्यावरून उठली व भराभर आवरायला घेतले. तिच्या मनातली रिंगटोन अचानकपणे म्यूट झाली, आणि अंजू संपर्कक्षेत्राच्या बाहेर गेली. किचनमध्ये जात फ्रिजमधील चिल्लड बीअरचा घोट मारला, डेरी मिल्कचे अख्खे चॉकलेट तोंडात कोंबले, कंगवा मात्र केस न विंचरताच पर्समध्ये कोंबला, पण जाताजाता आरश्यात बघत ओठांवरून एक दांडी लिपस्टिक फिरवायला मात्र विसरली नाही. सकाळी एवढा टाईमपास झाल्यावर घाई होणारच. पर्स घेऊन, हाई हिल सॅंडल्स घालून ती निघाली आणि बाहेरून दरवाजा खाडकन ओढून घेतला. ऑफिसमध्ये हसर्‍या चेहर्‍याने अंजूने पाऊल टाकले तेव्हा तिला बघता सर्वांच्याच विकेट पडल्या.

मिस अंजलिका देखणे - नावाप्रमाणेच देखणी होती. सहसा स्लीव्हलेस सूट मध्ये वावरणारी अंजू आज मिनीस्कर्ट नेसल्यावर जास्तच आयटम दिसत होती. त्यात तिच्या भुवयांना लावलेली ओल्ड फॅशन रिंग आणि दंडावर काढलेला ढिंच्यॅक टॅटू, तिला आणखी रापचिक बनवत होते. ऑफिसमधील तरुण मुली आपण तिच्या जागी नाही म्हणून जळायच्या, तर मुलांची ती आपल्याबरोबर नाही म्हणून करपायची आणि जेव्हा एवढा भारी पीस ऑफिसमधील कोणाच्याही हाती न लागता शेजारच्या कंपनीतील ऋन्मेऽऽषने काढला तेव्हा तर एकेकाच्या पार धूर निघाला होता.

तळटीप - बोल्ड मुद्दामच केले नाही, उगाच ते काजूच्या चकण्यात शेंगदाणा आल्यासारखे वाटते.
Wink

उतारा घेतला तरी तोंडचा दारूचा वास काही जात नाही तशा त्या आठवणी तिची पाठ सोडत नव्हत्या. म्हणून शेवटी ती उठून बसली. तरी आठवणींचे ढेकर काही यायचे थांबत नव्हते.
>>
Rofl

शंकेचा मिक्सर तिच्या मनात घुर्रकन फिरला. >>
तो पेस्ट कंट्रोल करणारा माणूस कितीतरी दिवस तिची भेट टाळत असल्याचा तिला खरपूस संशय होता >>
तिच्यासारखी वेळ आपल्यावर इतक्यात येऊ नये अशी कीव >>
हाडं गोठवणार्‍या थंडीत >>
समोर घडी करायची चादर दिसत असताना 'मी अजून बारमध्ये तर नाही ना?' >>
अर्र! बाण बरोब्बर लागलाय! Lol

आज पहाटे पहाटेच्या माफकथंडीत अंजूला एक अर्धवट स्वप्न पडलं होतं. त्या स्वप्नानं तिच्या मनातला आर्काइव्ह फोल्डर उघडला होता. कॉलेजची ती लोडेड वर्षे बॅटरीसारखी संपून गेली तरी बंद केलेल्या अकाउंटलाही नोटिफिकेशन्स येत रहावीत तशा त्या आठवणी तिची पाठ सोडत नव्हत्या. म्हणून शेवटी ती उठून बसली. तरी आठवणींनी तिला पोक (poke) करणं सोडलं नाही. समोर घडी करायची चादर दिसत असताना 'मी लॉग्ड इन तर नाही ना?' असले वेडगळ प्रश्न स्वतःला आणि त्याहून मूर्खासारखे दुसर्‍याला विचारायला अंजू म्हणजे कुणी कथानायिका नव्हती. मनाचा हिय्या करुन ती उठली, तेव्हा 'वजन वाढलेय की काय?' अशा शंकेचा पॉपअप तिच्या मनात उमटला. ती अभद्र शंका या सुखस्वप्नात कशाला? वैतागून तिने पटपट आवरले आणि हातात कॉफीचा आता गारढोण झालेला कप घेऊन बाल्कनीतल्या झोक्यावर निवांत बसली. जणू ती वर्तमान आणि भूतकाळाच्या चॅट विन्डोजमधे आलटून पालटून डोकावत होती. बाल्कनीत लावलेल्या मोगर्‍याचा सुगंध तिच्या कॉफीच्या घमघमाटाला छेद देत होता. तरी तिने हट्टाने दोन्ही सुवासांना नकोश्या पिंग्जप्रमाणे इग्नोअर मारलं. कॉफीचा गार घोट घशाखाली उतरल्यावर तिच्या जिभेवर बेक्कार चव रेंगाळत राहिली. आज काहीही झाले तरी त्याची भेट घ्यायचीच असे तिने मनोमन ठरवले. इतक्यात आकाशात ढगांचा ट्रॅफिक अचानक जॅम झाला. तिच्या कानात ऑलरेडी विजांचे हॉर्न्स वाजायला लागले. मनाचा अ‍ॅक्सलरेटर कामाला लागला. अंजू झोक्यावरून उठली व भराभर आवरायला घेतले. मोर, पाऊस, ढग इकडेतिकडे विखुरले. स्वप्न हॅन्ग झालेल्या स्क्रीनसारखे डोळ्यांसमोरून हलत नव्हते. तिने एकीकडे कॉफीचा कप मायक्रोवेव्हमधे गरम करायला ठेवून चार्ज झालेला मोबाइल उचलला. सकाळी एवढा टाईमपास झाल्यावर घाई होणारच. तेवढ्या घाईत जॅकेट अंगावर चढवत त्याने जुना टीशर्ट झाकला जातो आहे याबद्दल तिने हुश्श केलं. मोबाइल, पर्स घेऊन, शूज घालून ती निघाली आणि बाहेरून दरवाजा खाडकन ओढून घेतला. ऑफिसमध्ये निर्विकार चेहर्‍याने अंजूने पाऊल टाकले तेव्हा साहजिकच कोणीही तिच्याकडे पाहिलं नाही. मिस अंजलिका देखणे - नावाप्रमाणेच देखणी होती. सहसा फॉर्मल्समध्ये वावरणारी अंजू आज जीन्स-टीशर्टवर जास्तच रिलॅक्स्ड दिसत होती. तिचे टोपल्यासारखे वाढणारे कुरळे केस आणि चष्म्याआडून थेट बघणारे डोळे तिच्या नो-नॉन्सेन्स अ‍ॅटिट्यूडची साक्ष देत होते. ऑफिसमधल्या तरुण मुलामुलींचं तिच्याकडे कामाशिवाय लक्ष जायचं काही कारणच नव्हतं.

Pages