आता कशाला शिजायची बात- तृप्ती - ...आधी 'केल'ची पाहिजे!

Submitted by तृप्ती आवटी on 2 September, 2014 - 10:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बारीक चिरलेली केल किंवा बेबी केलची पानं साधारण दोन कप भरून, अर्ध्या अ‍ॅवोकाडोच्या फोडी, बोगातु किसून, अर्धी वाटी एडमामे बीन्स (दाणे), ७-८ कृटॉन्स, १ टे स्पून ऑलिव्ह ऑइल, काळी मिरी पावडर, मीठ, लिंबाचा रस.

fxkx44t.JPG

क्रमवार पाककृती: 

एकदा इथल्या लोकल फार्मर्स मार्केटात गेले असता चुकून की मुद्दाम की उगीच आपलं सगळे आणतात म्हणून मी पण केलची जुडी घेऊन आले. त्याचं नक्की काय करायचं लक्षात न आल्याने तिला बिचारीला फ्रीझमध्ये वीरगती प्राप्त झाली. बाप्पा कृपेने आमच्या तशरिफेची प्रतिष्ठापना कंपनीच्या ज्या इमारतीत झाली होती तिथला कॅफेटेरिया तोडफोड-फाइव्ह स्टार होता. खरं तर तिथे पहिल्याच दिवशी उकडीचे मोदक बघून बाप्पाच प्रसन्न झाले की काय असं वाटलं पण ते उकडीचे मोदक नसून स्टीम्ड बन्स असल्याचे कळाल्यावर आपले बाप्पा पण मेड इन चायनाच्या नादी लागले असावेत अशी शंका आली. तर अमेरिकेत आल्यापासून पहिल्यांदाच एकापेक्षा अधिक शाकाहारी पदार्थ- अतिशय चविष्ठ शाकाहारी पदार्थ- तयार करणारं ठिकाण असं हाताच्या अंतरावर गवसलं होतं. तिथेच पहिल्यांदा खाल्ल केल सीझर सॅलड. मायबोलीकर वैद्यबुवांनी केलेली तारीफ ऐकूनच केलला हात लावायचं धाडस केलं होतं. पण धाडस एकदम 'वर्थ इट' झालं. तेव्हापासून कॅफेटेरियात केल-सॅलड असलं की दीपचे समोसे असलेला काउंटर सुद्धा ओलांडून सॅलड घ्यायची सवय लागली. ती नोकरी सोडल्यावर मात्र त्या केल सेझर सॅलडची आणि आमची ताटातूट झाली. विरह सहन न झाल्यावर शेवटी बाजारात जाऊन केलची एक जुडी घेऊन आले आणि सॅलड केलं. त्यानंतर बरेच वेळा केल आणि बेबी केल आणून बरेच वेगवेगळे प्रयोग करून खालील कृतीवर स्थिरावले आहे. म्हणतात ना केल्याने होत आहे रे....

क्रुटॉन्स, तेल, काळी मिरी, लिंबाचा रस आणि मीठ वगळता सर्व घटक पदार्थ एकत्र करून हलक्या हातानं मिसळून घ्यावेत. ऑऑमध्ये बेताचं मीठ आणि लिंबाचा रस घालून ते सॅलडमध्ये घालून सॅलड हलवून घ्यावे. वरून काळी मिरपूड शिंपडून कृटॉन्स घालावेत. संयोजकांचा डोळा चुकवून किसलेले पार्मेजा चीझ घातले तरी चालेल. सॅलड तयार आहे.

whre3cp.JPG

गणपती बाप्पा मोरया!

वाढणी/प्रमाण: 
एक
अधिक टिपा: 

_एडमामे बीन्स नसल्यास ताजे मटारचे दाणे घालावेत. गणेशोत्सव संपल्यावर कॅन्ड ब्लॅक बीन्स घातले तरी चालतील.
_केल उपलब्ध नसल्यास पालकाची पानं घालावीत.
_सॅलड करायच्या काही तास आधी उभी चीर देऊन लाल मिरची आणि लसूण पाकळ्या ऑऑमध्ये टाकून ठेवल्या तर फार छान चव येते.
_सॅलडच आहे त्यामुळे यात भाजलेली/कच्ची ढब्बु मिरची किंवा ब्रोकोलीचे तुकडे इ. भाज्या आवडीप्रमाणे घालू शकता.

केल ही एक पौष्टिक मुल्यांनी भारलेली चविष्ठ भाजी आहे. प्रोटिनचं बर्‍यापैकी प्रमाण असलेली पालेभाजी ही एकच असावी. केल, बीन्स, गाजर आणि क्रुटॉन्स घालून अतिशय झटपट तयार होणारं हे सॅलड एक संतुलित आहार म्हणून गणला जायला हरकत नसावी.

अधिक माहितीसाठी:
केलः http://en.wikipedia.org/wiki/Kale
अ‍ॅव्होकाडो: http://en.wikipedia.org/wiki/Avocado
एडमामे बीन्सः http://en.wikipedia.org/wiki/Edamame
कृटॉन्सः http://en.wikipedia.org/wiki/Crouton
ऑऑ: http://en.wikipedia.org/wiki/Olive_oil

फोटो काढताना सॅलडशेजारी बोलमध्ये ऑऑ + मिरपूड आणि ब्रेड ठेवला आहे.

wsgwsqy.JPG

माहितीचा स्रोत: 
ऑफिसमधला कॅफेटेरिया आणि माझे बदल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप आकर्षक दिसतेय फायनल कृती. हे असं पोटभर खाल्ल्यावर पोटात आणि मनात पण फ्रेश फ्रेश वाटेल एकदम. मस्त डिश तृप्ती!

हा उपक्रमातला फोटो .. तेही बाप्पाच्या ..आमची काय बिशाद नावं ठेवण्याची ? Happy

तसंही छोड आए हम वो गलियाँ ..

मस्त दिसतंय.
केल म्हणुन नेटवर सर्च केल्यावर विविध प्रकारची पानं समोर आली त्यामुळे हे केल खाल्लेलं आहे की नाही ते कळत नाहीये.

Pages