आता कशाला शिजायची बात- तृप्ती - ...आधी 'केल'ची पाहिजे!

Submitted by तृप्ती आवटी on 2 September, 2014 - 10:54
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

बारीक चिरलेली केल किंवा बेबी केलची पानं साधारण दोन कप भरून, अर्ध्या अ‍ॅवोकाडोच्या फोडी, बोगातु किसून, अर्धी वाटी एडमामे बीन्स (दाणे), ७-८ कृटॉन्स, १ टे स्पून ऑलिव्ह ऑइल, काळी मिरी पावडर, मीठ, लिंबाचा रस.

fxkx44t.JPG

क्रमवार पाककृती: 

एकदा इथल्या लोकल फार्मर्स मार्केटात गेले असता चुकून की मुद्दाम की उगीच आपलं सगळे आणतात म्हणून मी पण केलची जुडी घेऊन आले. त्याचं नक्की काय करायचं लक्षात न आल्याने तिला बिचारीला फ्रीझमध्ये वीरगती प्राप्त झाली. बाप्पा कृपेने आमच्या तशरिफेची प्रतिष्ठापना कंपनीच्या ज्या इमारतीत झाली होती तिथला कॅफेटेरिया तोडफोड-फाइव्ह स्टार होता. खरं तर तिथे पहिल्याच दिवशी उकडीचे मोदक बघून बाप्पाच प्रसन्न झाले की काय असं वाटलं पण ते उकडीचे मोदक नसून स्टीम्ड बन्स असल्याचे कळाल्यावर आपले बाप्पा पण मेड इन चायनाच्या नादी लागले असावेत अशी शंका आली. तर अमेरिकेत आल्यापासून पहिल्यांदाच एकापेक्षा अधिक शाकाहारी पदार्थ- अतिशय चविष्ठ शाकाहारी पदार्थ- तयार करणारं ठिकाण असं हाताच्या अंतरावर गवसलं होतं. तिथेच पहिल्यांदा खाल्ल केल सीझर सॅलड. मायबोलीकर वैद्यबुवांनी केलेली तारीफ ऐकूनच केलला हात लावायचं धाडस केलं होतं. पण धाडस एकदम 'वर्थ इट' झालं. तेव्हापासून कॅफेटेरियात केल-सॅलड असलं की दीपचे समोसे असलेला काउंटर सुद्धा ओलांडून सॅलड घ्यायची सवय लागली. ती नोकरी सोडल्यावर मात्र त्या केल सेझर सॅलडची आणि आमची ताटातूट झाली. विरह सहन न झाल्यावर शेवटी बाजारात जाऊन केलची एक जुडी घेऊन आले आणि सॅलड केलं. त्यानंतर बरेच वेळा केल आणि बेबी केल आणून बरेच वेगवेगळे प्रयोग करून खालील कृतीवर स्थिरावले आहे. म्हणतात ना केल्याने होत आहे रे....

क्रुटॉन्स, तेल, काळी मिरी, लिंबाचा रस आणि मीठ वगळता सर्व घटक पदार्थ एकत्र करून हलक्या हातानं मिसळून घ्यावेत. ऑऑमध्ये बेताचं मीठ आणि लिंबाचा रस घालून ते सॅलडमध्ये घालून सॅलड हलवून घ्यावे. वरून काळी मिरपूड शिंपडून कृटॉन्स घालावेत. संयोजकांचा डोळा चुकवून किसलेले पार्मेजा चीझ घातले तरी चालेल. सॅलड तयार आहे.

whre3cp.JPG

गणपती बाप्पा मोरया!

वाढणी/प्रमाण: 
एक
अधिक टिपा: 

_एडमामे बीन्स नसल्यास ताजे मटारचे दाणे घालावेत. गणेशोत्सव संपल्यावर कॅन्ड ब्लॅक बीन्स घातले तरी चालतील.
_केल उपलब्ध नसल्यास पालकाची पानं घालावीत.
_सॅलड करायच्या काही तास आधी उभी चीर देऊन लाल मिरची आणि लसूण पाकळ्या ऑऑमध्ये टाकून ठेवल्या तर फार छान चव येते.
_सॅलडच आहे त्यामुळे यात भाजलेली/कच्ची ढब्बु मिरची किंवा ब्रोकोलीचे तुकडे इ. भाज्या आवडीप्रमाणे घालू शकता.

केल ही एक पौष्टिक मुल्यांनी भारलेली चविष्ठ भाजी आहे. प्रोटिनचं बर्‍यापैकी प्रमाण असलेली पालेभाजी ही एकच असावी. केल, बीन्स, गाजर आणि क्रुटॉन्स घालून अतिशय झटपट तयार होणारं हे सॅलड एक संतुलित आहार म्हणून गणला जायला हरकत नसावी.

अधिक माहितीसाठी:
केलः http://en.wikipedia.org/wiki/Kale
अ‍ॅव्होकाडो: http://en.wikipedia.org/wiki/Avocado
एडमामे बीन्सः http://en.wikipedia.org/wiki/Edamame
कृटॉन्सः http://en.wikipedia.org/wiki/Crouton
ऑऑ: http://en.wikipedia.org/wiki/Olive_oil

फोटो काढताना सॅलडशेजारी बोलमध्ये ऑऑ + मिरपूड आणि ब्रेड ठेवला आहे.

wsgwsqy.JPG

माहितीचा स्रोत: 
ऑफिसमधला कॅफेटेरिया आणि माझे बदल
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काळी मिरी , मीठ आणि लिंबु

इतकच माहीत आहे.

उरलेले पदार्थ आजच पहिल्यांदा ऐकले ! त्यांचे दर्शन तरी घडवा

ऑऑमध्ये उभी चीर कशी द्यायची असा भाबडा प्रश्न पडला.
मी केल(लं) आहे हे सॅलड. थोडं पार्मेजान घालून चव चांगली येते. थोडा पालक घालूनही चांगलं लागेल.

रुनी, तुम बोगातु नही जानती?

श्रीयू, लोकल ग्रॉसरीत मिळतो बेबी केल. सॅलड ग्रीन्स असतात तिथेच मिळेल.

श्रीयू, कॉस्ट्को ला मस्त मोठ पॅक मिळतं.

मी केलची भाजी अगदी आपल्या मेथीच्या भाजी सारखी करते. I love it! मेथी आवडत होतीच आता केलही माझी अतिशय आवडीच्या भाज्यांपैकी एक झाली आहे.

तृप्ती छान रेसीपी!

थँक्स तृप्ती,अदिती..
सध्या संध्याकाळ सॅलड्स वरच आहे त्यामूळे नक्की करुन बघेन. आमच्या खेड्यात कॉस्ट्को नाही..सॅम्स ला बघेन मिळतय का..

ओह गाजर का, ओके.
मी नेहमी स्वतःला बजावते की केल आणायला/खायला हवे पण दरवेळी दुकानात दिसूनही घेतले जात नाही. एक दोनदा भाजी करून बघितली पण बात जमी नही. मग नाद सोडला. अदिती तुझी कृती लिही ना. एकदा या सॅलड साठी तरी केल आणायला पाहीजे.
श्रीयू कुठल्याही ग्रोसरीच्या दुकानात मिळते केल.

माझी कृती सोपी आहे. तेलावर (ऑ ऑ, थोड जास्त असत, भाजी हेल्दी आहे अस म्हणुन मी स्वत:ला माफ करते Happy ), बारीक कापलेला कांदा, लसुन, हिरवी मिरची परतवुन कांदा शिजला की त्यात बेबी केल टाकुन हलवुन सारखी करुन झाकण ठेउन शिजवुन घ्यायची. शेवटी चवीपुरते मिठ टाकुन सारखी करुन गॅस बंद करायचा. मेथी करतांना मिठ टाकल्यावर झाकण ठेवल तर भाजीचा रंग बदलतो अस सांगितल गेल असल्यामुळे ह्या भाजीतही मी झाकण ठेवत नाही. फुलक्यांबरोबर एक नंबर लागते.
केल कोवळीच घ्या नाही भाजी शिजायला वेळ लागतो आणि खातांना कचकच लागते.

तृप्ती आवटी ,

नियमाप्रमाणे फोटो देणे अनिवार्य आहे. तेव्हा मतदान सुरू व्हायच्या आत म्हणजेच अनंत चतुर्दशीपर्यंत फोटो टाकावा. अन्यथा नाईलाजाने प्रवेशिका बाद करावी लागेल.

छान वाटतेय वाचुन.

विकी लिंक दिल्या ते बरे केले.. नाहीतर काळी मिरी , मीठ आणि लिंबु सोडुन इतर परग्रहवासी कुठले ह्या चौकश्या करत बसावे लागले असते.

सॉरी विनोद झाला खरा पण तो उद्देश नव्हता. मायबोलीवर अनेक अपभ्रंश रूढ आहेत. एरवी काही पोस्ट करताना ते फारसे खटकत नाही. पण रेसिपी मध्ये वापर करावा का ह्यावर दुमत होईल. मी जर कधी रेसिपी लिहली तर शक्यतो अपभ्रंश वापरणार नाही कारण चांगली असेल तर रेसिपी मायबोलीच्या बाहेरचे लोक (किंवा इथे नियमित न येणारे इ.) पण वाचणार. त्यांना समजण्यास अडचण होईल अस सहसा माझ्याकडून लिहिले जाणार नाही. (अर्थात मी ही माणूस आहे, आज ही पोस्ट लिह्तीये, उद्या कदाचित काहीतरी अपभ्रंश वापरीन Wink तेव्हा हलके घ्या).

Pages