खो... दहा पुस्तकांचा!!!!

Submitted by हर्ट on 31 August, 2014 - 02:33

तुम्हाला आवडलेली कुठल्याही भाषेतील दहा पुस्तकांची नावे इथे लिहायची आहेत. हे असे लिहिता लिहिता साधारणः

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
४) नक्की कुठल्या वयात वाचले?

ह्याबद्दल लिहू शकता.

इथे तुम्हाला "खो" मिळालाच पाहिजे असे नाही. कधी कधी आपण मित्रांच्या यादीत नसतो म्हणून आपल्याला खो मिळत नाही :(. पण म्हणून इथे लिहायचे नाही असे नाही. तुम्हाला आवडलेली दहा पुस्तके ह्याबद्दल इथे कुणीही लिहू शकतो.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

१. चौघीजणी
- लुइसा मे अलकॉटच्या 'लिटल वुइमेन'चा हा शान्ता ज. शेळकेंनी केलेला अनुवाद आहे. नंतर मी ते इंग्रजीतही वाचले.

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
Laurie Lawrence Proud

मी त्या पुस्तक सोबतच वाढले आणि जसं जसं वाचत गेले तस ते अजूनच समजायला लागले आणि दर वेळेस नवीन गोष्टी समजत गेल्या. I didn't just read it, I explored it.
२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
पाचवीत असताना एका ताईने सहज दिले.
३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
अमेरिकन क्लासिक
४) नक्की कुठल्या वयात वाचले?
११ वर्ष

२. The H-Bomb Girl
-Stephen Baxter

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
हि गोष्ट पण एका १४ वर्षाच्या मुलीचीच आहे त्यामुळे जवळचे वाटले आणि रोमांचक आहे फार!
२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
इंग्रजीच्या एका तासाला आमच्या बाई हे पुस्तक घेऊन आल्या आणि मग मी आणि माझी मैत्रीण मागेच लागलो कि याची गोष्ट सांगा म्हणून. त्यांना फार आवड होती सायन्स फिक्शन ची. त्यांनी थोडक्यात गोष्ट सांगितली व त्या नंतर मी त्यांच्याकडूनच वाचायला घेतले.
३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
Arthur C. Clarke Award साठी या पुस्तकाला निवडले (shortlisted) होते.
४) नक्की कुठल्या वयात वाचले?
१३ वर्ष

३. स्वामी
-रणजित देसाई

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
माधवराव आणि त्यांची रणनीती!
२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
तेव्हा फॅड होतं वर्गात स्वामी, मृत्युंजय, छावा वगरे वाचायचं. मला या पैकी फक्त स्वामीच झेपलं आणि आवडलं ही!
३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
या पुस्तकाला १९६४ मध्ये साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला.
४) नक्की कुठल्या वयात वाचले?
१४ वर्ष

४. The Hunger Games
-Suzanne Collins

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
वयानुसार ते जास्त जवळचे वाटले आणि खूप आवडले मला ते. Katniss, तिचे विचार, rebellion, Quarter Quell, आजूबाजूला दिसणारी गरिबी पण त्याच वेळी कॅपीटोल चे लोकांचं बोलणं, वागणं, द अल्टीमेट गेम, विट्टिनेस. सगळंच मस्त! पानेम टुडे, पानेम तोमोरोव, पानेम फोरेवर!
२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
9GAG आणि मूवी मुळे.
३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
dystopian, post-apocalyptic life
४) नक्की कुठल्या वयात वाचले?
१८ वर्ष

५. I’m not Butter Chicken, you can’t order me!
- Paro Anand

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
टीनेजर्स साठी मस्त आहे!
२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
आईने आणून दिले.
३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
माहित नाही.
४) नक्की कुठल्या वयात वाचले?
१३-१४ वर्ष

६. नेगल भाग १ व २
-विलास मनोहर व डॉ. प्रकाश आमटे

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
त्यांनी अभय दिलेल्या प्राण्यांच्या मस्त गोष्टी आहेत त्यात.
२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
एका प्रदर्शनात पहिले. आता नीटसे आठवत नाही कुठे ते.
३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
-
४) नक्की कुठल्या वयात वाचले?
नाही आठवत.

७. डेनिसच्या गोष्टी भाग १ व २
-THE ADVENTURES OF DENNIS by Victor Dragunsky Marathi translation.

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
यात न आवडण्यासारखे काहीच नाहीये! मजा, मस्ती, सगळं आहे यात.
२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
एका प्रदर्शनात पहिले. आता नीटसे आठवत नाही कुठे ते.
३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
माहित नाही.
४) नक्की कुठल्या वयात वाचले?
१३-१४ वर्ष

८. द लॉर्ड ऑफ द रिंग्स
-J. R. R. Tolkien

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
खूप ऐकलेलं याबद्दल. पण शाळेत जास्त कोणाला माहित नव्हते. सुट्टीत घरी यायचे तेव्हा माहिती घेतली.
३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
Legen... wait for it... dary!
४) नक्की कुठल्या वयात वाचले?
१६-१७ वर्ष

९. प्राणघातक कंठा
- विजय देवधर
१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
अतिशय रहस्यमय गोष्टी आहेत. बर्म्युडा ट्रॅंगल आणि अजून अशी २-३ पुस्तकं आहेत. सगळ्यांना एकत्रित ९ नंबर Happy
२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
मैत्रिणीने वाचायला दिले.
३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
-
४) नक्की कुठल्या वयात वाचले?
१५-१६ वर्ष

१०. नारळीकरांचे कथा संग्रह
`प्रेषित', `व्हायरस', `यक्षाची देणगी', `टाईम मशीनची किमया', `याला जीवन ऐसे नाव', वामन परत आला', `अंतराळातील भस्मासुर', `कृष्णमेघ'

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
Sci-fi. प्रेषित तर अक्षरक्षः तोंडपाठ झाले आहे.
२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
इंग्रजीच्या बाई Happy
३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
-
४) नक्की कुठल्या वयात वाचले?
१५-१६ वर्ष

हि नुसतीच १० आहेत. अजून भरपूर पुस्तक आहेत माझ्या top १० मध्ये Happy

झरबेरा, उत्तम पोस्ट!!!! एवढ्या लहान वयात वाचनाची इतकी उत्तम जाण असणं आणि ते असं व्यक्त करू शकणं या दोन्हींसाठी तुला शाबासकी!

झरबेरा, खुपच छान लिहीलं आहेस. तुझ्या लिस्ट मधली पुस्तकं नक्की वाचणार (teenager नसले तरी Wink ) नेगल माझेही आवडते पुस्तक आहे! (मुलींना वाचुन दाखवता येइल हे तुझी पोस्ट वाचुन सुचले!)

झरबेरा
दे टाळी......चौघीजणीबद्दल. माझं ऑल टाइम फेव्हरेट!
आणि तो लॉरी कसला गोड आहे गं..! हो माझंही टीन एजात तेच कारण होतं पुस्तक आवडण्याचं. Wink
"पाडस" वाचलंस का? द यर्लिन्गचं राम पटवर्धनांनी केलेलं भाषांतर.
नसलंस तर नक्की वाचच!

झरबेरा झकास लिस्ट !

माझा खो -

१. तोत्तोचान
तेत्सुको कोरियानागी

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?

माझी शाळा मला अजिबात आवडायची नाही. मग स्वप्नरंजन करायला 'तोमोई' हे आदर्श चित्र मिळाले !!!!

२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?

आमच्या घरी एक जेष्ठ शिक्षणतज्ञ यायचे. त्यांनी दिले वाचायला. आयुष्यातली पहिली कादंबरी !!

३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
मुलांचे मानसशास्त्र, शाळा, शिक्षण यात जे जे चांगले असावे असे वाटते ते सर्व या पुस्तकात आहे.

४) नक्की कुठल्या वयात वाचले?

११ वर्षांची असेन.

२. चौघीजणी
लुइसा मे अल्कॉट

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
लॉरी आणि ज्यो आणि बाकी तिघी. पुस्तक वाचले तेव्हा सेम सिचुएशनमध्ये होते Wink मी ज्यो !

२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
माझ्यात ज्यो पाहणार्‍या एका लॉरीने मला वाचायला दिलं. तेव्हापासून आजही मी या पुस्तकाच्या प्रेमात आहे.

३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
उत्तम अनुवाद, क्लासिक्स मधलं लाडकं.

४) नक्की कुठल्या वयात वाचले?
१५-१६ वर्ष

३. इन्कलाब ( भगतसिंगांचे चरित्र)
मृणालिनी जोशी
१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
ध्येयवाद बाळगण्याच्या वयातली व्यक्तिपूजा !

२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
घरी एक संघाचे प्रचारक यायचे. त्यांनी दिलं.

३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
चरित्र म्हणून उत्तम.

४) नक्की कुठल्या वयात वाचले?
१८-१९ वर्षे

४. जोहड
( राजस्थानातेल राजेन्द्रसिंहजींनी केलेल्या जलसाक्षरता प्रयोगाबद्दल)

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
एकूणच सामाजिक कार्य करणारे वेडे लोक आणि त्यांनी उभ्या केलेल्या कामाबद्दल प्रचंड आकर्षण, आदर आणि कुतुहल आहे म्हणून.

२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
एका प्रदर्शनात हाती लागले.

३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
पर्यावरणप्रेमींसाठी उत्तम प्रेरणादायी.

४) नक्की कुठल्या वयात वाचले?
२२

५. गौरी देश्पांडेची सर्व पुस्तके. सॉरी मी कोणतेही एक निवडू शकत नाही.

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
स्त्रीवादाचा अर्थ समजून घेताना याच पुस्तकांसोबत वाढले.

२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?

स्त्रीवादी साहित्याचा अभ्यास करताना हाती लागले आणि या पुस्तकांनी झपाटले.

३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
स्त्रीवादी साहित्य.

४) नक्की कुठल्या वयात वाचले?
१९-२०

६. तत्त्वमसि
ध्रूव भट्ट अनुवाद- अंजली नरवणे

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
नर्मदेच्या प्रेमात म्हणून, धार्मिकतेचा अर्थ उमगल्यासारखा वाटला म्हणून, अशीच एक सुपरिया माझ्या परिवारात आहे म्हणून्,आणि अनेक कारणं आहेत..

२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
मला नास्तिक समजणार्‍या व त्यामुळे त्रास करून घेणार्‍या एका मित्राने दिले.

३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
उत्तम कादंबरी, गुजरातीतून मराठीत अनुवाद पण उत्तम झाला आहे असे वाटते.

४) नक्की कुठल्या वयात वाचले?
२८

७. पाडस
अनु. राम पटवर्धन
१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
ज्योडीचं मोठं होणं ही प्रोसेस अतिशयच सुंदर !

२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
उत्तम अनुवाद मध्ये पुस्तकपरिचय वाचला. मग विकत आणलं.

३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
पुन्हा एकदा क्लासिक !

४) नक्की कुठल्या वयात वाचले?
२५-२६

८.रथचक्र
श्री ना पेंडसे
१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
उत्तम कथाबीज म्हणून. कोकणची पार्श्वभूमी म्हणून.

२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
मराठी एम ए करताना कादंबरी हा फॉर्म अभ्यासताना..

३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
उत्तम प्रादेशिक कादंबरी

४) नक्की कुठल्या वयात वाचले?
२१

९. बोरकरांच्या कविता

१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
कविता आवडतात. निसर्गकविता आणि प्रेमकविता तितक्याच सशक्त पणे ज्यांच्या लेखणीतून आली ते पोएट बोरकर ! या कवितांच्या हाताला धरून कवितांच्या जंगलात मनसोक्त बागडता आलं !

२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
एका वक्तृत्व स्पर्धेत बक्षिस मिळाले.
३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
उत्कृष्ट कविता
४) नक्की कुठल्या वयात वाचले?
लहानपणापासून..

१०.प्रेषित
जयंत नारळीकर
१) ते पुस्तक तुम्हाला का आवडले?
उत्तम विज्ञानकथा म्हणून
२) त्या पुस्तकाची आणि तुमची ओळख कशी झाली?
ग्रंथालयातून कुतुहल म्हणून आणले.
३) त्या पुस्तकाचे साहित्यिक मुल्य काय?
उत्तम विज्ञान कादंबरी
४) नक्की कुठल्या वयात वाचले?
१४-१५ वर्ष

खरंच १० च पुस्तकं निवडणं कठीण आहे. मी माझ्या निवडक १०० बद्दल फार तर समाधानाने लिहू शकेन Happy

बी तुमचे खूप खूप आभार! ह्या धाग्यावर लिहिण्याच्या निमित्ताने मी खूप सुंदर आठवणींच्या प्रदेशात सैर करून आले!

झरबेरा, मितान खूप मस्त!

हा माझा खो! दहा पुस्तकं निवडणं अवघड काम आहे. अनेक सुंदर पुस्तकं राहून गेली आहेत याची जाणीव आहे. पुस्तकं निवडताना मी हे दोन निकष लावले: एक मला श्रीमंत करणारी आणि दोन वाचून झाल्यानंतरही माझ्या बरोबर राहिलेली पुस्तकं. ही दहा हे निकष सर्वार्थाने पूर्ण करतात! निवडीचे कारण देताना पुस्तकाचे साहित्यिक मूल्य काय ह्या ऐवजी मी माझ्यासाठी ह्या पुस्तकाचे मोल काय ह्या प्रश्नाचे उत्तर दिले आहे. आणि हो, पुस्तकांच्या क्रमाचा आणि निवडीचा काहीही संबंध नाही!

१. कार्यरत - अनिल अवचट
तुमच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारे एक पुस्तकं कोणते असा प्रश्न असेल तर माझ्यासाठी निःसंशयपणे त्याचे उत्तर आहे कार्यरत. मी दहावीत असताना हे पुस्तक वाचलं आणि झपाटून जाणे म्हणजे काय याचा अनुभव घेतला. मी इतकी पारायणं केली या पुस्तकाची की मला जवळपास पाठ झालं होतं हे पुस्तक! मी आयुष्याचा, जगाचा जसा विचार करते त्याच्यावर ह्या पुस्तकाचा फार मोठा ठसा आहे. I owe my value system to this book!

२. मृत्युंजय – शिवाजी सावंत
६वी-७वी च्या स्वप्नाळू वयात भान हरपून वाचलेलं हे पुस्तक! आणि त्या नंतर पुन्हा पुन्हा, कधी त्यातल्या चिरंतन नाट्यासाठी, कधी सुंदर लखलखत्या भाषेच्या सौंदर्यासाठी तर कधी कर्ण ह्या माझ्या मनातल्या हिरोसाठी! फार high standards set केली कर्णाने त्याबाबतीत! भान हरपून म्हणजे इतकं की एकदा हे पुस्तक वाचताना आईची पस्तिसावी हाक ऐकून तिरमिरीत उठले आणि घरात जाण्यासाठी दरवाजातून आत जायच्या ऐवजी भिंतीला जाऊन धडकले!! चांगलं टेंगुळ आलं होतं डोक्याला!

३. रारंगढांग – प्रभाकर पेंढारकर
असंच ७वी-८वीत वाचलेलं पुस्तक! आजही डोळे मिटले की ज्या पुस्तकाच्या पानांवरची वाक्यं डोळ्यासमोर नाचायला लागतात असे पुस्तक! हे फिक्शन आहे की आपण चित्रपट बघतो आहोत हे कळत नाही कधी कधी! जर आयुष्यात पुढे कधी संधी मिळाली तर ह्या पुस्तकावर चित्रपट/मालिका बनवण्याचे माझे स्वप्न आहे. पण असे ही वाटते की जे माझ्या मनाच्या डोळ्यांना पुस्तक वाचताना दिसत असते ते मी कॅमेरामध्ये पकडू शकेन का? कोण असेल विश्वनाथ मेहेंदळे? कॅप्टन मिनू खंबाटा? मेजर बंबा? उमा? अमर, बहादूर, ग्यानचंद, सर्जेराव, शांतारानी? ही सगळी माझ्या मनातली मंडळी कोण जिवंत करू शकेल? आणि तो कथानायक रारंगढांग, ती नायिका सतलज? चित्रदर्शी भाषा म्हणजे काय याचे उत्तर महणजे हे संपूर्ण पुस्तक! “जब आदमी मर जाता है तो उसका क्या रहता है?”

४. वनवास, शारदा संगीत, पंखा, झुंबर - प्रकाश नारायण संत
कथानायक लंपनचं पोटात गडबड होत्येय असं वाटणारं माझं वय उलटून गेल्यावर मी वनवास वाचलं! पण ते एका परीने बरंच झालं! ह्या चार पुस्तकात माझं एक स्वतंत्र बालपण दडलेलं आहे! दुसऱ्या जगातलं! मला जेव्हा इथे नसायचं असतं तेव्हा मी लंपनच बोट धरून त्याच्या गावी जाते. ललित लेखनाला कवितेच्या इतकं जवळ नेणारं दुसरं पुस्तक मला अजून माहिती नाही.

५. Harry Potter series – J. K. Rowling
कॉलेजच्या सेकंड इयरला असताना मी पहीलं पुस्तक वाचलं आणि माझ्यावर जादू झाली! पुस्तकांची पारायणं झालेली नाहीत माझी अजून, सगळी विकत घेतलेली देखिल नाहीत पण मला माझ्या जागेवरून अदृश्य करून दुसऱ्या दुनियेत नेणारं प्रत्येक पुस्तक. जादुगार जादू करतो आणि आपण चकित होऊन पाहात राहतो तसं गारुड केलं या पुस्तकांनी! जे के रोलिंगच्या अफाट आणि अचाट प्रतिभेला आणि बुद्धीला माझा साष्टांग नमस्कार!! ह्या पुस्तकांतून मला अजून बरेच काही मिळवायचे आहे.

६. Atlas Shrugged – Ayn Rand
मास्टर्सला असताना युनिव्हर्सिटीच्या समोरच्या फूटपाथवर एक पुस्तकवाला बसायचा. रु. ७० डिपॉझिट वर रु.१० ला महिन्याभरासाठी पुस्तकं द्यायचा. सगळी pirated english पुस्तकं! त्यात आधी Fountainhead वाचलं आणि Ayn Rand मय झाले! मग लगोलग हे उचललं. निम्मं वाचून झालं नाही तो दिवाळीची सुट्टी लागली. सुट्टीहून परत येईस्तोवर महिन्याहून अधिक उलटणार होता म्हणून नाईलाजाने पुस्तक परत केलं. पण त्या पुस्तकाने माझी पाठ सोडली नाही. कोणतीही सस्पेन्स स्टोरी नसताना, अत्यंत धीम्या गतीने चालणारं पुस्तक असतानाही मी सुट्टीहून परत आल्या आल्या पहिल्यांदा जाऊन ते पुस्तक ताब्यात घेतलं आणि जणू काल सोडलं होतं तिथून पुढे वाचावं तसं हे पुस्तक वाचलं! Through these books I was introduced to a radically different philosophy than what I was brought up with. I am very glad to have come across it and assimilated some of its virtues in my own.

७. कुण्या एकाची भ्रमणगाथा – गो. नि. दांडेकर
८वी- ९ वीच्या कोणत्या तरी उन्हाळ्याच्या सुट्टीत ह्या भ्रमणगाथेला सुरुवात झाली! वाचताना “दिसत राहणारे” गोनीदांचे चित्रदर्शी शब्द, इतकं सच्चेपण, जिवंतपण, इतका rawness, earthiness, आर्तता आणि तरीही एक कोवळा हळुवारपणा मी दुसऱ्या कोणत्याच पुस्तकात पाहिला नाहीये. ह्या पुस्तकाची अर्पणपत्रिका फार चपखल आहे. मला नक्की ओळी आठवत नाहीत पण कुंतीने कृष्णाकडे दुःखाचं वरदान मागितलं होतं त्या अर्थाची अर्पणपत्रिका आहे (नेटवरून साभार: http://www.bookganga.com/Preview/Preview.aspx?BookId=5490308184900614821...). कधीही न अनुभवलेल्या दुःखाची सहानुभूती देणारं हे पुस्तक! या पुस्तकाने मला श्रीमंत केलं!

८. अनुहार – सुमती क्षेत्रमाडे
नववीत असताना हे पुस्तक माझ्या हाती लागलं. मला माहिती नाही मी हे का उचललं! त्या वेळी मी वाचनाच्या बाबतीत बकासुर होते त्यामुळे असेल कदाचित! आता वाटतं की नास्तिकतेच्या कल्पनेच्या इतक्या जवळ जाऊन सुद्धा मी नास्तिक नाही याचं श्रेय या पुस्तकाला आहे. आस्तिक असण्याच्या कल्पनेतली सगळ्यात सुंदर भावना म्हणजे भक्ती! त्या भक्तीची ओळख मला अनुहार मुळे झाली. बंगालमधील मोठे संत श्री चैतन्य महाप्रभू यांच्या पत्नीची विष्णूप्रियेची ही कहाणी! एका संन्याशाची पूर्वाश्रमीची पत्नी ते एक योगिनी असा तिचा प्रवास. अनुहार म्हणजे सावली. ह्या पुस्तकाने एक स्त्री म्हणून मला श्रीमंत केलं! जेव्हा एक स्त्री परमेश्वराच्या भक्तीमध्ये संपूर्ण शरणागता होते तेव्हा ती vulnerable नसते तर सर्वात कणखर असते. संपूर्ण शरणागत होणाऱ्या व्यक्तीचा देवावर जितका विश्वास असतो त्याहून अधिक विश्वास हा स्वतःवर, स्वतःच्या तत्वांवर असतो. जर तुमचा स्वतःवर विश्वास नसेल तर तुम्ही चांगले भक्त होऊ शकत नाही. हे सारं अनुहार ची देन!
माझ्या अस्तित्वाच्या जाणीवेत मोलाची भर टाकणारं हे पुस्तक. अनुहार वाचल्यानंतर भारावून जाऊन मी सुमती क्षेत्रमाडे यांना लिहिलेलं (आणि कधीच पोस्ट न केलेलं) पत्र मी अजूनही जपून ठेवलंय!

९. आहे मनोहर तरी – सुनिता देशपांडे
मी माझी दहावीची बक्षिसाची सर्व रक्कम पुलंची पुस्तकं घेण्यात खर्च केली. त्यावेळी घेतलेलं हे पुस्तक! अगदी आतून मी कोणासारखी आहे हे मला आहे मनोहर तरी वाचल्यावर कळलं! एकदा सुनीताबाईंची आणि माझी जन्मपत्रिका जुळवून बघण्याची फार इच्छा आहे! ह्या शास्त्रात जर काहीतरी तथ्य असेल ना तर त्यांच्या आणि माझ्या पत्रिकेत स्वभावाच्या राशीत सेम ग्रह असले पाहिजेत! काही ऋणानुबंध बिननावाचे असतात. जसा माझा आणि सुनिताबाईंचा! आणि तो ऋणानुबंध ज्या पुस्तकामुळे जुळला ते अर्थात माझ्या हृदयाच्या अगदी जवळचं!

१०. ह(फ)सवणूक – पु. ल. देशपांडे
मला महाराष्ट्रात, मराठी कुटुंबात जन्माला घातलं ज्यामुळे मला मराठी भाषा वाचता/लिहिता/बोलता येते ह्याबद्दल त्या परमेश्वराचे आभार मानावे असं वाटायला लावणारं एक नाव म्हणजे पु. ल. देशपांडे! त्यांची सगळीच पुस्तकं पारायणं करून खिळखिळी झालेली! मराठी असण्याचा लसावि म्हणजे पु.लं.!! त्यांच्या सर्व पुस्तकांमधून निवडक दहात कोणतं निवडावं यासाठी सगळ्यात सोपा निकष लावला: ज्याने सर्वाधिक हसवलं ते! अर्थात ह(फ)सवणूक!! माझे पौष्टिक जीवन वाचताना मी गडबडा लोळले होते. ROFL अस्तित्वात आलं नव्हतं तेव्हा! हसण्याने आयुष्य वाढते म्हणतात. माझ्या आयुष्यात सर्वाधिक भर घालणारे पुस्तक!

झरबेरा, मितान मस्त लिस्ट. जिज्ञासा भारी लिहिलेत.

शाळकरी वयात पुस्तकांची निवड करायची असते हे माहीतच नव्हते. समोर जे येईल ते वाचायची सवय होती. तेव्हा साने गुरुजींची पुस्तके, शाळेच्या वाचन उपक्रमात 'माझी जन्मठेप'सारखी काही पुस्तके जी वाचून त्यावर आम्हाला लिहायचेही होते, घरातली हरिविजय, नवनाथकथासार, गणेशपुराण ही त्यातल्या गोष्टींसाठी वाचली होती.

नेमकी दहा पुस्तके काढणे फार कठीण आहे. म्हणून १) अगदी एका बैठकीत नाही तरी शक्य तितके सलग वाचले (२) पुन्हा पुन्हा वाचाविशी वाटलेली (३) अक्षरशः झपाटून टाकणारी पुस्तके (४) त्या लेखकाची अन्य पुस्तके वाचायला उद्युक्त केले असे काही निकष लावलेत. यातली कोणतीही पुस्तके शाळकरी वयात वाचलेली नाहीत. गंमत म्हणजे कॉलेजात असताना वाचलेलीच अधिक पुस्तके या यादीत आहेत.

१) नक्षत्रांचे देणे : आरती प्रभू .पुस्तकाचे नाव प्रातिनिधिक आणि त्यांच्या लेखणीतून उतरलेल्यातला मुकुटमणी म्हणून. गणुराया आणि चानी, कोंडुरा (कादंबर्‍या) एक शून्य बाजीराव, अजब न्याय वर्तुळाचा, कालाय तस्मै नमः (नाटके) आणि तिन्ही कवितासंग्रह. नक्षत्रांचे देणे मधल्या अनेक ओळी अचानक ओठांवर येत असतात.
२) गोंदण : शांता शेळके. मला अतिशय जवळची वाटणारी ही कविता. त्यातली भाषा, अनुभवापेक्षा त्याच्या मनात उमटलेल्या तरंगांची अभिव्यक्ती. त्यानंतर शांताबाईंचे मिळेल ते ते वाचायची सवयच लागली. कॉलेजात असताना आपल्याला कविता लिहिता येतात असा एक गैरसमज व्हायलाही शांताबाईच कारण. आज माझ्या त्या कविता वाचताना त्यात शांताबाईंच्याच कोणत्या ना कोणत्या कवितेचे बिंब दिसते.
३) धूळपाटी आणि पावसाआधीचा पाऊस : शांताबाई.: वाचना-लेखनाबद्दलचे मनोगत इतक्या हृद्य शब्दांत अन्य कोणा लेखकाने व्यक्त केलेले आढळले नाही.
४) धृपद : विंदा करंदीकर : भव्य, दिव्य. थेट भिडणारं, नक्की काय ते कळलंच असेल असं नाही तरी त्यांच्या तेजाने डोळे दिपत राहावेत असं वाटणारं.
५) प्र्वरंग : बहुतेक जण म्हणतात, तसे समग्र पु.ल.च पण त्यात सर्वप्रथम वाचलेलं आणि सर्वाधिक वेळा वाचलेलं ते अपूर्वाई.
६) एक होता कार्व्हर : वीणा गवाणकर : वाचलेल्या अनेक चरित्रांपैकी this one has stayed with me till now.
७) हॅरी पॉटर सिरीज : No explanation needed. अजूनही कोणतंही पुस्तक पुन्हा वाचायला घेतलं तरी रात्रभर जागरण घडतं.
८) पाडस : राम पटवर्धन कृत अनुवाद. ओरिजिनल पुस्तक आणलंय आणि ते वाचायचा मुहूर्त लागत नाही आहे.
९) माणसाच्या ऐहिक सुखाची गोष्ट : Man's Worldly Goods: The Story of the Wealth of Nations by Leo Huberman या पुस्तकाचा अनुवाद. माझ्या अर्थशास्त्राच्या प्राध्यापिका नलिनी पंडित यांनी त्यांच्या संग्रहातलं हे पुस्तक वाचायला दिलं होतं. (and thus she converted me) इतिहास, समाज आणि अर्थशास्त्र या तिन्हीची सांगड घालून पाहण्याचा दृष्टिकोण दिला. मूळ इंग्रजी पुस्तक वाचायचा योग अजूनही येत नाही.
१०) कादंबर्‍यांमधलं एक प्रतिनिधिक नाव म्हणून तुंबाडचे खोत.: श्री.ना.पेंडसे. झपाटून टाकणारं कथानक, व्यक्तिचित्र, परिसर चित्रण.
१० अ) This will be counted as cheating. But can't help. Not a penny more, not a penny less by Jeffry Archer. अर्थक्षेत्रातच काम केल्याने यातले कंगोरे पकडण्याचे लेखकाचे सामर्थ्य जाणवले.

आवडत्या १० पुस्तकांची नाव आणि ती का आवडली याची थोडक्यात मीमांसा करून ती आपल्या wall वर डकवणे आणि आपल्या इतर वाचक मित्रांना त्या पोस्ट मध्ये tag करून त्यांच्या wall वर त्यांच्याआवडत्या पुस्तकावर लिहायला उद्युक्त करणे हा facebook वरचा नवीन ट्रेंड मला आवडला . मी पण हा प्रयत्न करून बघायचं ठरवलं आहे .

आवडती पुस्तक आणि लेखक यांची यादी वयानुरूप सतत बदलत गेली . म्हणजे काही वर्षापूर्वी आवडणारी पुस्तक आता आवडतातच अस नाही . काही वर्षापूर्वी ज्या पुस्तकांची पारायण करायचो ती आता हातात धरावीशी पण वाटत नाहीत . म्हणजे एका टोका कडून दुसरे टोकच . अधे मध्ये काहीच नाही . ; ) So let's begin.

1) कोसला - प्रत्यक्षात कोसला वाचायला मुहूर्त लागला तेव्हा आयुष्यात काही बर चालू नव्हते. बहुदा १८ वा जॉब सोडून मी घरी बसलो होतो. नुकताच एका प्रेमप्रकरणातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत होतो. आपल्या सामान्यत्व नुकतच जाणवायला लागल होत. मी बर्यापैकी पांडुरंग सांगवीकर शी रिलेट झालो. गावात असताना शाळेत शिकत असताना कुणाच्यातरी अनामिक दहशतिखाली गेलेले बालपण, पुण्याला शिक्षणासाठी केलेल बहिर्गमन, तिथे व्यक्तिमत्व मिळवण्यासाठी केलेले हास्यास्पद प्रयत्न, मग सगळ सोडून गावी येऊन एकदम खेडुत बनून राह्ण ह्या सगळ्या मधून मी पण गेलो असल्याने कोसला ही मला माझीच कहाणी वाटायला लागली. पण सगळ्यात महत्वाच म्हणजे कोसला आणि पांडुरंग ने मला घडवलेला आयुष्यातील निरंतन निरर्थकतेचा आणि आपण करत असलेल्या हजारो निरर्थक कृतींचा साक्षात्कार.

२) बदलता भारत - हे पुस्तक म्हणजे डाव्या विचारसरणी कडे झुकलेल्या एका माणसाने जागतिकीकरण आणि त्याचा भारतावर झालेला परिणाम याचा वेध घेण्याचा केलेला प्रयत्न आहे . बंगलोर मधली आय टी city , आसाम चे चहा मळे , दिल्ली मधल्या corporate conferences , झारखंड मधले शेत तळे , मोदी राज्यातलं अहमदाबाद आणि अनेक विरोधाभासांनी भरलेल्या जागांना काळे यांनी भेट दिली . काळे यांची लेखन शैली अतिशय प्रवाही आहे . त्यांनी संदर्भ म्हणून दिलेले विविध quote , उतारे पण अतिशय वाचनीय आहेत . मुख्य म्हणजे साम्यवादी विचारसरणीचे असून पण अतिशय निष्पक्ष आढावा काळे यांनी घेतला आहे .

३) इन द लाईन ऑफ फायर - पाकिस्तानचा माजी लष्करी हुकुम शहा परवेज मुशर्रफ याच आत्मचरित्र . पाना पाना मधून भारत द्वेष टपकत असला तरी पुस्तक वाचनीय आहे . आणि 'शत्रू ' च्या गोटात काय चालत हे कळायला मदत होते .

४) ओपन - आंद्रे आगासी आणि पिट साम्प्रास या rivalry मध्ये मी कायम पिस्तुल पीट चा पाठीराखा होतो . पण आगासी कायम पीट पेक्षा लोकप्रिय का राहिला याच उत्तर हे पुस्तक वाचून मिळत . आगासी ने कायम tennis चा आणि त्याला खेळायला भरीस पाडणाऱ्या बापाचा तिरस्कार केला हे कळल्यावर धक्का बसतो . शिवाय त्याची पीट सोबतची स्पर्धा , drug च्या नादी कसा लागला याची कहाणी , ग्राफ सोबत जुळलेली कहाणी सगळच मुळातून वाचण्यासारख आहे .

५) शुभ्र काही जीवघेणे - अंबरीश मिश्र यांनी लिहिलेलं पुस्तक म्हणजे भारतीय चित्रपट संगीताचा आणि शास्त्रीय संगीताच्या सुवर्ण काळाच्या शिलेदारांना दिलेली आदरांजली आहे . यातलं ओपी नय्यरवर लिहिलेलं प्रकरण तर लाजवाब . मिश्र यांची लेखन शैली घायाळ करणारी आहे . हे पुस्तक वाचून मिश्र जास्त लिखाण का करत नाहीत हि जुनी तक्रार पुन्हा पुन्हा तोंड वर काढते .

६) हंस अकेला - प्रामाणिक पणे सांगायचं तर हे पुस्तक वाचण्यापूर्वी माझ्या मनात स्त्री लेखकांबद्दल काही पूर्वग्रह होते . पण मेघना पेठे ने मी किती चुकीचा होतो हे मलाच सांगितले . तिचा हा कथा संग्रह मला बेहद्द आवडला . नंतर तिची नातिचरामी आणि आंधळ्या च्या गायी हि पुस्तक पण अधाशीपणे वाचली आणि आवडली .

७) बाकी शून्य - कमलेश वालावलकर च्या या पुस्तकाच कोसलाशी अनेक बाबतीत साधर्म्य आहे . पण तरी हे पुस्तक मला आवडत .

८)नाझी भस्मासुराचा उदयास्त - हे पुस्तक बहुतेक मी लेखक कानिटकर यांच्यापेक्षा पण जास्त वेळा वाचल असेल . मला जेवताना हमखास हे पुस्तक वाचायला लागत . दुसऱ्या महायुद्धाचा मराठीतला सर्वोत्कृष्ट दस्तावेज .

९) पिंगळावेळ - हे पुस्तक वाचून जी अस्वस्थता आली होती ती अजून पण मध्येच तोंड वर काढते . जी ए कुलकर्णी हा जागतिक दर्जाचा लेखक का आहे हे पुस्तक वाचून कळत . जी ए ची माफी मागून हे पुस्तक माळ्यावर टाकून दिले आहे . पुन्हा हाती लागू नये म्हणून

१०) धर्मानंद - कोकणातील एका जमीनदार घराण्याची झालेली जबरदस्त वाताहत हे या कादंबरीचे मुख्य सूत्र . दळवी यांची शैली जबरदस्तच . एका काका , खानोलकर मास्तर , धर्मानंद , बाप्पा , आजी हि पात्र कायम अटळ शोकांतीकेकडे वाटचाल करतात . हे वाचत असताना अंगावर शहारे येतात .

या यादीत अनेक अजून पुस्तक येऊ शकतात . प्रकाश अकोलकरांच हा शिवसेना नावाचा इतिहास आहे , दादा कोंडके याचं आत्मचरित्र , अशी अनेक अजून पुस्तक आहेत . किरण नगर्कर यान्च सात सक्के त्रेचाळीस सारखी आणि वूड हौस ची पुस्तक अजून वाचायची आहेत हि खंत पण दाटून येत आहेच .

छान धागा.
झरबेरा, किती छान ओळख करून दिलीस तू पुस्तकांची.
'आजकालच्या काळात किशोरवयीन मुले पुस्तके, त्यातही मातृभाषेतली पुस्तके वाचतात तरी का?' या प्रश्नाचे तुझी यादी एक आश्वासक उत्तर आहे.
तुला वाचायची आवड लावणार्या पालक आणि शिक्षकांचेही अभिनंदन.

जिज्ञासा, तुमच्या यादीत माझी बरीचशी यादी होऊन गेली(आणि ते ते पुस्तक आवडण्याची कारणेही)
लंपन मी तर पी जी करताना वाचला.
पण आता तो मॅडसारखा सत्तत माझ्यासोबत असतो आणि क्षणोक्षणी माझ्या मुलात सापडत रहातो.
अगदी त्याच्या ़कानडीमिश्रित मराठी वातावरणासह!

खूप छान छान माहिती मिळत आहे नवीन पुस्तकांची. हाच एक उद्देश होता की ह्यातून नवीन काही वाचायला मिळावे.

मी वेळ मिळेल तेंव्हा माझी यादी देईल.

सविस्तर नाही लिहिता येणार आत्ता, पण आवडत्या पुस्तकांची नावं मात्र लिहिता येतील.

म्रुत्युंजय - शिवाजी सावंत
स्म्रुतिचित्रे - लक्श्मीबाई टिळक
भा रा भागवतांची सगळीच पुस्तके
प्रकाश नारायण संत - वनवास आणि इतर
आम्ही भगिरथाचे पुत्र - गो नी दा. त्यांची इतर सुद्धा
देवांसि जिवे मारिले - लक्श्मण लोढे
एक्झोडस - बाळ भागवत (अनुवादित)
शाळा - मिलिंद बोकिल
पार्टनर - व पु
मीठ नावाचा इतिहास

माझी यादी...
पटकन आठवली ती आणि मी वाचलेली आणि महत्वाची वाटणारी किंवा आवडलेली १० (च) पुस्तके. पुस्तकांचा क्रम ही पुस्तके माझ्या आयुष्यात ज्या क्रमाने आली त्या क्रमाने आहेत.

१. अरबी भाषेतील सुरस व चमत्कारीक कथा - चिपळूणकर (सर्व खंड) - हे मला अजूनही वाचायला आवडते. त्या शंभर-सव्वाशे वर्षापूर्वीच्या मराठीची गंमत औरच.

२. पण लक्षात कोण घेतो - ह ना आपटे - आजोबांच्या संग्रहामुळे खूप लहानपणीच हे पुस्तक हातात पडले(साधारण वय वर्षे ११-१२) आणि वाचल्यावर धक्का बसला. अभ्यासाचा कितीही कंटाळा असला तरी शाळा नको असे कधीही वाटले नाही त्यानंतर.

३. सत्याचे प्रयोग - महात्मा गांधी (अनुवादित) - सहावी की सातवीत शाळेत त्यातील काही भाग जास्तीच्या वाचनासाठी होता. तेव्हा पुस्तक घेतलं होतं. जो वाचनासाठी नेमलेला भाग होता तो सोडून सगळे वाचून काढले होते. शी काय हे वगैरेही झाले होते तेव्हा. मग कॊलेजात नंतर परत वाचले. खूप काही महत्वाचे हाती लागल्यासारखे वाटले.

४.निरगाठी - गौरी देशपांडे - अर्ली टीन्समधे वाचली. लय रडारड केली होती वाचताना. शमी आणि मिमीचे संवाद, मिमी आणि आईचे दूध पिण्याचे संवाद वगैरे फार आवडले होते तेव्हा. तेव्हा शेवटाचं नीटसं कळलं नव्हतं. नंतर वाचली तेव्हा कळलं.

५. युगान्त - इरावती कर्वे - हे पण तसे तुलनेने लहानपणीच म्हणजे १५-१६ च्या वयातच हाताला लागले आणि तेव्हाच ते वाचून काढले. वेळोवेळी परत परत वाचत राह्यले. अजूनही वाचते. या पुस्तकाने दृष्टी साफ करायला सुरूवात केली. हे वाचून झाल्यावर मृत्यूंजय वाचायला घेतले आणि सुपर कंटाळा आला होता ते आठवतंय.

६. आहे मनोहर तरी - सुनीताबाई देशपांडे - प्रांजळ आणि बुद्धीमान. आजही आवडते परत परत वाचायला.

७. पंचतारांकित - प्रिया तेंडुलकर - किती वेळा वाचलंय पण तरी अजूनही परत वाचताना हातातून खाली ठेववत नाही.

८. वाडा चिरेबंदी - महेश एलकुंचवार - एकदा वाचलं आणि अजूनही परत परत परत वाचत असते.

९. कळ - श्याम मनोहर - आळेकर सरांनी हातात ठेवलं पुस्तक आणि वाच म्हणून सांगितलं. वाचत गेले. भाषेची, शैलीची मजा अनुभवत राह्यले.

१०. आयदान - उर्मिला पवार - अत्यंत प्रांजळ आणि तितकंच सकारात्मक. इतकं प्रचंड काय काय सोसून मांडणीत कुठेच आक्रोश नाही. जे आलं वाट्याला ते घेतलं, त्याचीही मजा घेतली पण अन्याय कधी सहन केला नाही. हे एक आणि आत्मचरीत्र लिहिताना अनेक जण स्वत:ची प्रतिमा घासून पुसून साफ करायचा जो प्रयत्न करतात तो कुठेही अजिबात नाही. मी थक्क आहे यांच्या लिहिण्यातल्या स्वच्छ आणि प्रांजळपणापुढे. सुषमा देशपांड्यांनी या कादंबरीचा नाट्याविष्कार दिग्दर्शित केलाय. कधी मिळायला बघायला तर जरूर बघा.

यात प्रकाश संतांची सगळीच टाकायची राह्यली आणि अजून बरीच राह्यली हे लिस्ट बनवल्यानंतर आठवले. Happy

वाडा चिरेबंदी पुस्तक आहे का? ते नाटक आहे ना? मला नाटक बघायचं होतं विजया मेहतांनी दिग्दर्शित केलेलं..ते काही शक्य नाहीये पण पुस्तक असेल तर पुण्याला गेल्यावर शोधेन पुस्तकांच्या दुकानात.

बावरा मन, अगदी अगदी!!! मी तयार केलेली यादी पुन्हा बघायला पाहिजे तुमची यादी बघितल्यावर

नाटक हे लिखित पण असते. नाटकाच्या प्रकाशित संहितेला पुस्तक मानले जाते.
वाडा चिरेबंदीची आत्तापर्यंत पाचवी आवृत्ती प्रसिद्ध झालेली आहे. पहिली आवृत्ती १९८५-१९८९ दरम्यान कधीतरी प्रसिद्ध झालेली आहे.

१. एक शुन्य मी (पु. ल. देशपांडे )

२. अॅनिमल फार्म

३. मराठी मुसलमानी आणि ब्रिटिश रियासत

४. इसापनीती

५. फास्टर फेणे

६. पॉलिटिक्स (अॅरिस्टॉटल)

7. राईट हो, जीव्हज (पी जी वूडहाऊस )

८. हा तेल नावाचा इतिहास आहे

९. शेरलॉक होम्स

१०. द सेल्फिश जीन

१. फाऊंडेशन सिरीज (आयझॅक अ‍ॅसिमोव ) + त्याची इतर पुस्तके

२. गॉड देमसेल्वज ( पुन्हा अ‍ॅसिमोव . पण वेगळं मेंशन करायलाच पाहिजे)

३. च्युसडेज विथ मॉरी

४. डोंगराएव ढा (शिवराम कारंथ)

५ फाऊंट न हेड (आयन रँड)

६. वॉल्ड्न (थोरो)
७. लविंग अ‍ॅन्ड लिविंग गुड लाईफ (हेलन निअरिंग) - फक्त कृष्ण मूर्ती वाला भा ग संपल्यानंतर. स्कॉट निअरिंगनी तिच्या आयुष्यात प्रवेश केल्या नं तरचा भाग

८. पेरी मेसन (अर्ल गार्डनर) च्या बहुतेक सगळ्या स्टोरस्टोरीज

९. अल्बर्ट श्वाईट्झर्चं चरित्र.

१०. १९८४

११. तोतोचान

१२. शारदासंगीत, वनवास - प्रकाश नारायण संत

१३. हॅरी पॉ टर सिरीज

१४. रेस्टोरंट अ‍ॅट द एंड ऑफ युनिवर्स
१५. सिद्धार्थ (Hermann Hesse )

माझी यादी. फारेंड यांचे खास आभार काही पुस्तकांची नावे आठवत नसताना 'उपलब्ध' करून दिल्याबद्दल.

१. पार्टनर - वपु
२. युगंधरा - सुमती क्षेत्रमाडे
३. दुनियादारी - सुहास शिरवळकर
४. असा मी असामी - पुस्तक - पुलं. त्यातील शंकर्‍या, स्काउट व तत्सम कालनिरपेक्ष भाग
५. मी माझा - चंद्रशेखर गोखले
६. अजुनी तुझीच आहे - शोभा राऊत
७. डार्लिंग - बाबा कदम
८. मृत्युंजय - शिवाजी सावंत
९. स्वामी - रणजित देसाई
१०. सावर रे - प्रवीण दवणे

काही पुस्तके न वाचताच काळजात घर करून राहिली: आईने अकबरी त्यात सर्वात प्रथम आहे.

टण्या, तुमचे वाचन फारच वैविध्यपूर्ण आहे, Happy मलाही असाच व्यासंग करायची इच्छा आहे.

आईने अकबरी पुस्तक वाचायला कुठं मिळेल?

Pages