पूर्व युरोप भाग १ - व्हिएन्ना आणि बुडापेस्ट

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

मागच्या वर्षी ऑक्टोबरमधे युरोपच्या या टर्म मधली पहिली ट्रीप करायचे ठरवले. स्वाती आणि मुलींचे बेल्जियमचे रेसिडंट कार्ड अजून आले नव्हते त्यामुळे शेवटच्या दिवसापर्यंत जायचे की नाही आणि गेलो तर कधी आणि कुठे जायचं ते ठरत नव्हते. शेवटी कुठेच जायचं नाही आणि डिसेंबरच्या सुट्टीत जाउ असं ठरवलं. तोच मुलीच्या शाळेला एक आठवडा सुट्टी लागायच्या बरोबर ३ दिवस आधी अनपेक्षितपणे तिघींचेही कार्ड आले आणि मग परत एकदा प्लॅनिंगला लागलो. खरंतर पोर्तुगालचा प्लॅन करत होतो पण व्हिएन्ना, ऑस्ट्रियाचे फ्लाइटचे चांगले डील दिसले आणि तिकीटं बूक करून टाकली. व्हिएन्ना, ऑस्ट्रिया आणि बुडापेस्ट, हंगेरी असा प्लॅन बनवला आणि हॉटेल्स बूक केली आणि निघालो. ही आमची पहिलीच मोठी ट्रीप जी आम्ही अशी अलमोस्ट "ऑन द फ्लाय" ठरवली. ब्रसेल्सहून व्हिएन्नाला विमानाने गेलो. व्हिएन्नात थोडा वेळ घालवून त्याच दिवशी ट्रेननी बुडापेस्टला जायचे होते. व्हिएन्नाच्या विमानतळावरून शटल बसनी रेल्वे स्टेशनला गेलो. तिथल्या सार्वजनिक लॉकरमधे बॅगा ठेवल्या आणि तिथून ट्रामनं व्हिएन्नाच्या सिटी सेंटरला गेलो. आमच्याकडे साधारण ४ तास होते तर सेंट स्टिफान्स कॅथेड्रल बघायचे ठरवले. शहराच्या एकदम मध्यवर्ती भागात हे भव्य कॅथेड्रल आहे.

कॅथेड्रलचे बांधकाम ११३७ मधे सुरू झाले आणि ११६० मधे पूर्ण झाले. याचे रंगीबेरंगी टाइल्सचे छप्पर हे आता व्हिएन्नाची ओळख बनले आहे.

चर्च आतूनही पाहण्यासारखे आहे. नंतर आजूबाजूच्या परीसरात थोडावेळ फिरलो आणि व्हिएन्ना स्टेशनला परतलो. लॉकरमधून बॅगा घेतल्या आणि बुडापेस्टला जाणार्‍या रेलजेट ट्रेनमधे बसलो. या रेलजेट ट्रेन २०० किमी/तास वेगाने धावू शकतात आणि एकदम आरामदायी आहेत. ३ तासात बुडापेस्टला (३०० किमी) घेउन जातात. "बुडापेस्ट केलेती" स्टेशनवर उतरल्यावर पश्चिम युरोपातून पूर्व युरोपात आल्याचे लगेच जाणवते. स्टेशन बरेच जुने आहे शिवाय स्टेशनवर उतरल्यावर लगेचच एक कुली बॅगा उचलण्यासाठी आला जे पश्चिम युरोपात कुठंच नाही बघायला मिळत. स्टेशनवरून बसनं हॉटेलपर्यंत जायचं होतं. जायच्या आधीच बसचा रूट आणि स्टॉप माहित करून घेतला होता. बुडापेस्टमधे बस किंवा ट्राम मधे तिकीट मिळत नाही, ते दुकानातून (टोबॅको शॉप्स) आधीच घ्यावे लागते आणि बसमधे व्हॅलिडेट करावे लागते. व्हॅलिडेट करण्यासाठी आपल्याकडे कंडक्टरकडे पंच करायचे मशीन असते तसले मशीन बसमधे लावलेले असते. जर विना-तिकीट पकडलं तर खूप मोठा दंड लावतात. हे सगळं आधीच वाचलं होतं म्हणून स्टेशनवरच्या दुकानातून तिकीट घेतलं आणि बस पकडली. बुडापेस्टमधे २ किंवा ३ दिवसांचा पासपण मिळतो तो घेउन फिरण स्वस्त आणि सोपं पडतं.
दुसर्‍या दिवशी सकाळी व्होरोस्मार्ती तेर (Vörösmarty tér ) ला गेलो जिथून बुडापेस्ट फ्री वॉकिंग टूर चालू होते.

माझ्यामते बुडापेस्ट बघायला जाणार्‍या प्रत्येकानं ही टूर घेतलीच पाहिजे. नावाप्रमाणे ही खरेच फुकट आहे. जर आवडली तर गाइडला टीप द्यायची. यांचे सगळे गाइड स्थानिक आणि बुडापेस्ट आणि त्याच्या इतिहासाचा चांगला अभ्यास असलेले आहेत. तर त्यांच्याबरोबर आमची भटकंती चालू झाली. मुळात बुडापेस्ट हे एक शहर नसून बुडा आणि पेस्ट (स्थानिक उच्चार पेस्त) अशी दोन वेगळी शहरं आहेत. दोन्हीच्या मधून डॅन्यूब नदी वाहते. बुडा हे एका डोंगरावर वसलंय आणि पेस्ट बर्‍यापैकी सपाट प्रदेशावर आहे.

दोन्ही शहरांना जोडणार प्रसिद्ध चेन ब्रिज

हॅब्सबर्ग घराण्याच्या राजा फ्रान्झ जोसेफचा पुतळा.

याच्या काळात पेस्ट शहर पुरामधे उध्वस्त झाले होते. फ्रान्स जोसेफने ते पुन्हा व्यवस्थित नियोजन करून वसवले.

सेंट स्टिफान्स कॅथेड्रल (हो बुडापेस्ट मधे पण आहे).

स्टिफान हा हंगेरीचा पहिला ख्रिश्चन राजा. त्यानं राज्यकालात हंगेरीमधे शांतता प्रस्थापित केली. शिवाय ख्रिश्चन धर्माचा खूप प्रसार केला (काही वेळा जबरदस्तीनं). त्याच्या या कर्तुत्वामुळं १०८३ मधे त्याला संतपद बहाल करण्यात आलं. हंगेरियन संसद आणि हे कॅथेड्रल या दोघांची उंची ९६ मीटर्स आहे. बुडापेस्टमधल्या नियमांनुसार याच्यापेक्षा उंच बांधकामाला परवानगी नाही.

डॅन्यूबच्या किनार्‍यावरची हंगेरियन संसद ही जगातली दुसर्‍या क्रमांकाची मोठी संसदेची इमारत आहे (सगळ्यात मोठी इमारत रोमानियन संसदेची आहे)

चेन (Szécheny) ब्रिज (बुडाच्या बाजूनं). बुडा आणि पेस्त मधला हा सगळ्यात पहिला बांधलेला पूल.

बुडा किल्ल्यावरच्या राजप्रासादाचा एक भाग

बुडा किल्ल्यावरचे मथायस चर्च

या चर्चच्या छतावरच्या मोझाइक टाइल्स

बुडा किल्ल्यावरच्याच फिशरमन बॅशनच्या (Fisherman's Bastion) सात मिनारांपैकी एक

बुडा किल्ल्यावरच्याच एका प्राचीन चर्चमधे ही फ्री टूर संपली. तिथून आम्ही परत पेस्त मधे आलो.

हंगेरीयन पोलिसाचा पुतळा. चांगल्या हंगेरीयन खाण्याची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून पर्यटक याच्या पोटावरून हात फिरवतात.

त्यानंतर डॅन्यूबवरती एक नाइट क्रूझ घ्यायची ठरवलं जी इथून जवळच्याच ठिकाणावरून सुटनार होती. तोपर्यंत स्टिफान कॅथेड्रलला भेट देउन आलो.

या कॅथेड्रलमधे येशूपेक्षा सेंट स्टिफानची जागा मध्यवर्ती आहे. असे जगात मोजकेच कॅथेड्रल्स आहेत.

तिथून मग क्रूझवरती गेलो.

क्रमशः

भाग दुसरा: http://www.maayboli.com/node/50544
भाग तिसरा : http://www.maayboli.com/node/51991

मस्तच!

बुडा आणि पेस्ट - हे माहितीच नव्हतं. आजच कळलं!

"बुडापेस्ट केलेती" स्टेशनवर उतरल्यावर पश्चिम युरोपातून पूर्व युरोपात आल्याचे लगेच जाणवते. >>> याची काही उदाहरणं वाचायला आवडली असती.

धन्यवाद मंडळी.

व्हिएन्ना मधे अजून खूप आहे करण्या सारखे. >> हो अमा, आम्ही बुडापेस्टहून परत व्हिएन्नाला गेलो. ते तिसर्‍या भागात येइलच Happy

याची काही उदाहरणं वाचायला आवडली असती. >> एक उदाहरण (हमालाचे) वर दिलंयच. शिवाय, पश्चिम युरोपातली मोठी ट्रेन स्टेशन्स एकदम झगमगीत आणि बर्‍यापैकी ट्रेंडी असतात. केलेती स्टेशनवर असा झगमगाट नाही. स्टेशन बरेच मोठे आहे पण ते बरेच जुनाट आहे. स्टेशनवर उतरल्यावर एकदम थोडसं दडपण/वेगळेपण जाणवलं (मी योग्य शब्दात सांगू शकत नाहिये Happy )
हंगेरी हा बरीच वर्षं साम्यवादी देश होता. आता तो त्याच्या प्रभावातून हळूहळू बाहेर पडतोय. त्यामुळं तिथं पश्चिम युरोपात जशी भरभराट दिसते तशी अजून दिसत नाही अजून. जुन्या काळवटलेल्या इमारती अजूनही दिसतात. शिवाय, रस्त्यावरती भिकारीहीबरेच दिसतात. सार्वजनिक स्वच्छताही थोडी कमी आहे. असे असले तरी लोक एकदम चांगले आणि को-ऑपरेटिव्ह आहेत. आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे पश्चिम युरोपपेक्षा खूप स्वस्त आहे (मला बुडापेस्टमधे एकदम मस्त २ बेडरूम फर्निशड अपार्टमेंट ३ रात्रींसाठी फक्त ८० युरोमधे मिळाले होते) Happy

क्लास फोटोज आणि वर्णनही.
पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. Happy

मस्त सफर! फोटो आणि वर्णन दोन्ही छान.

२ बेडरूम फर्निशड अपार्टमेंट ३ रात्रींसाठी फक्त ८० युरोमधे मिळाले होते >> कूल!

वर मनिषने लिहिल्याप्रमाणे जर्मनी वा ऑस्ट्रिया (किंवा कुठल्याही पश्चिम युरोपातील देश) मधून बुडापेस्टमध्ये आल्यास थोडी अस्वच्छता जाणवेल (भारतातल्या सारखे नव्हे). रेल्वे स्टेशन पश्चिम युरोप इतकी चकाचक नाहीत. पण दडपून जाऊ नका. बुडापेस्ट छान स्वच्छ शहर आहे. मेट्रोसेवा, बससेवा, ट्रामसेवा उत्तम आहे. रात्री अगदी मोजके काही भाग सोडल्यास शहर अगदी सुरक्षित आहे. मी आणि बायको बुडापेस्टमध्ये कित्येकदा रात्री उशीरा पायी हिंडलो आहोत. खिशातल्या पाकिटावर मात्र लक्ष ठेवा, जमलं तर पासपोर्ट पाकीट हॉटेलमध्येच ठेवा. खिशात कॅश ठेवली की झालं. पाकीटमारी बुडापेस्टच नाही तर पश्चिम युरोपातल्या सगळ्या मोठ्या टुरिस्ट ठिकाणी आहे (रोम, पॅरिस, अ‍ॅम्स्टरडॅम इत्यादी).
बुडापेस्टचं एक दिवसाचं तिकीट केवळ १६०० फोरिंट म्हणजे पाच युरो. यात सर्व सेवा आल्या. चार लोकांचे एकत्र तिकीट (एकच तिकीट त्यामुळे सर्वांनी एकत्रच जायचे) तर मला वाटते फक्त ३००० फोरिंटला असते. बुडापेस्ट कार्ड घेतलेत तर अनेक म्युझिअम्समध्ये जावू शकता.

ज्युंचे होलोकॉस्ट म्युझिअम, हाउस ऑफ टेरर ही दोन बघाच.

टक्केवारीच्या हिशोबाने होलोकौस्टमध्ये सर्वात जास्त ज्यु हंगेरीतील मारले गेले. हा इतिहास सामान्य हंगेरिअन कधीच बोलताना आढळला नाही. सेगेडमध्ये एक अतिशय सुंदर सिनॅगॉग आहे. मी राहत असलेल्या शहरात फक्त एक दगड होता त्यावर १९४४ साली इथे सिनॅगॉग होते असे लिहिलेले आहे.

पाकीटमारी बुडापेस्टच नाही तर पश्चिम युरोपातल्या सगळ्या मोठ्या टुरिस्ट ठिकाणी आहे >>+१.
बाकी सार्वजनिक वाहतूक आणी सुरक्षितता यासाठी टण्याला अनुमोदन. आम्हाला असुरक्षित असं कुठं वाटलं नाही.

हंगेरी लेखमालिकेचं पुढे काय ? - याचे संबंधितांनी उत्तर द्यावे >> +१ Proud