बाळांचा खाऊ

Submitted by दिनेश. on 19 August, 2011 - 10:00
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

खालीलप्रमाणे :-

क्रमवार पाककृती: 

लहान मूलांचा आहार हा अनेक आयांसाठी (आईचे अनेकवचन) डोकेदुखीचा भाग असतो. प्रत्येक मूल वेगळे, आवडीनिवडी वेगळ्या आणि गरजाही वेगळ्या.

आता मी काय खाऊ, असे विचारणारी गुणी बाळे अगदीच विरळा. बाळ पुढे धावतय, आई कालवलेला भात घेऊन मागे धावतेय, कार्टूनच बघत खाणार असा हट्ट करणारी बाळं, शाळेतला डबा जसाच्या तसा परत आणणारी बाळं, हेच नेहमी दिसतं.

मी आधी प्रसंगानुरुप बरेच लेखन इथे केले होते. आता ते पदार्थ बहुतेक विसरलोही. पण ते पदार्थ करुन बाळांना भरवल्याचा आठवणी, इथे अजून काही सभासद काढत असतात. काही जणी फोनवर विचारत असतात.

माझ्या परिचयात काही गुणी बाळं आहेत. ती जेवताना मी कौतूकाने बघत बसतो. त्या बाळांना मोठे करण्यात माझा किंचीत हातभार होता. त्यांनी मला जे शिकवलं, ते इथे मांडायचा प्रयत्न करतोय.

शक्यतो आहारदृष्ट्या योग्य असे पदार्थ सूचवीन, पण एखादा पदार्थ अयोग्य वाटला तर अवश्य कळवा. मी कुणी आहारतज्ञ नाही, त्यामूळे शास्त्रीय माहितीचे स्वागतच आहे.

तसेच हे पदार्थ लिहिण्याआधी यासंदर्भात काही मुद्दे लिहिले, तर ते अस्थानी वाटू नयेत अशी अपेक्षा करतो.

१) बाळाच्या गरजा
वाढत्या वयात चौरस आहार लहान मूलांना देणे आवश्यक असते. त्यासाठी आपल्या घरातच सर्व पदार्थ होत आहेत कि नाही, याकडे बघितले पाहिजे. बाळाला हळुहळु मोठ्या माणसांसोबत जेवायची सवय लावली पाहिजे, आणि घरात जे पदार्थ केले जातात ते सर्व त्याने खाल्लेच पाहिजेत, याकडे कटाक्षाने पाहिले पाहिजे.
बाळासाठी वेगळे जेवण, सहसा करुच नये. जर बाळाला काहि पदार्थ फार तिखट वाटत असतील, तर घरातील सर्वांनी थोडे कमी तिखट खाल्ले पाहिजे.

लहान मूलांना अनेक प्रकारची ऍलर्जी असू शकते. शेंगदाणे, चीज, मश्रुम, यीस्ट, काही प्रकारचे मासे. असे पदार्थ खाण्यात आल्यास त्यांच्या अंगावर पुरळ उठणे, खाज येणे, धाप लागणे अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो. अशावेळी डॉक्टरांना बाळाने काय खाल्ले होते, ते आवर्जून सांगावे. आणि ते पदार्थ बाळाच्या खाण्यात येणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. ते पदार्थ टाळणे, हाच बहुदा सर्वोत्तम उपाय असतो.

२) मॅगी

बाळांसाठी मॅगी हा शत्रु नंबर एक, असे मी मानतो. एकवेळ कणकेच्या मॅगी मी समजू शकतो, पण बाकीच्या प्रकारातल्या मैदा, तीव्र रसायने आणि वनस्पति तूप, बाळांसाठी निश्चितच योग्य नाही. आकाराने चौकोनी असणार्‍या नूडल्सही एकवेळ ठिक पण गोल असणार्‍या नूडल्स तर चक्क तळलेल्या असतात
(म्हणूनच तर त्या २ मिनिटात शिजतात )
जाहिरातीत दाखवल्या प्रमाणे घरोघरी मॅगी शिजवताना, त्यात क्वचितच भाज्या घातल्या जातात. (इथे मी मॅगी हा शब्द सर्वनाम म्हणून वापरलाय.)
नूडल्स सारखेरच दिसणारे पण जास्त योग्य पदार्थ सूचवतोच.

३) जंक फूड

अनावश्यक प्रमाणात तळलेले पदार्थ, चिप्स, क्रिस्प हे बाळाचे नुकसानच करत असतात. खरे तर बटाटा अजिबात वाईट नाही, पण तळलेल्या रुपात त्याचा काहिही फायदा होत नाही. बटाट्याचेही काही पदार्थ सूचवतोच.

कोलासारखी एअरेटेड पेये पण अजिबात नकोच. बाळाच्या नाजूक पचनसंस्थेचे ती नुकसान तर करतातच शिवाय त्यातून अनावश्यक साखरेशिवाय, दुसरे काहीही मिळत नाही.
बाळांना पेये आवडतात, म्हणून तशी काही पेये पण सुचवतोच.

४) टिव्ही

टीव्हीकडे एकटक बघत बसणारी लहान मुले बघून मला त्यांच्याबद्दल खुप वाईट वाटते. डिस्ने सारखी दर्जेदार कार्टून्स फ़ारच थोडी. त्यातले मनमोहक रंग, सुंदर कथानक बाकिच्या कार्टून्समधे क्वचितच दिसते.
डिस्ने एकेका सेंकदासाठी अनेक चित्रे काढून वापरत असे, बाकिच्या कार्टूनमधे एकाच चित्रावर भागवले जाते ( पात्रे जागच्या जागी उड्या मारताहेत, निव्वळ ओठ हलताहेत..) त्यातले चेहरे भयानक असतात आणि कथानकही.

निव्वळ मूल गप्प बसतय ना मग दे कार्टून लावून, अशी सुरवात होते. आणि आपणच त्यांचे नुकसान करतो. याबाबतीत सुरवातीपासुनच कठोरपणे वागावे लागते. कार्टून बघायला न मिळाल्याने हिंसक होणारी मूले मी बघितली आहेत.
आपण जरी कामात असलो तरी बाळाला आपल्या शेजारी बसवून, त्याच्याशी गप्पा मारल्यास बराच फ़ायदा होतो. शक्यतर बाळालाही कामात मदत करु द्यावी.

५) भूक न लागणे

बाळाला भूकच न लागणे हि कायमची समस्या. डॉक्टर अशावेळी पुर्वी बाळ नीट खेळतोय ना, मग काळजी करु नका, असे सांगत असत. पण आता पालक हट्टच करत असल्याने नाईलाजाने एखादे टॉनिक लिहून देतात.
क्वचितच एखदया मूलाला तशी गरज असते. दुसरे म्हणजे टॉनिकमधले घटकपदार्थ सगळेच्या सगळे शरीराला उपलब्ध होत नाहीत, आणि तेच घटक जर आहारातून मिळाले, तर जास्त फ़ायदेशीर ठरतात.

भूक न लागण्याची इतरही कारणे असू शकतात. अपचन, जंत हिदेखील कारणे असू शकतात. खाण्याच्या वेळा पाळणे, अधलेमधले अरबट चरबट खाणे बंद करणे, आणि बाळ भरपूर खेळेल याकडे लक्ष दिले तर बाळाला नक्कीच भूक लागेल.

लिंबाचा रस त्यात तितकाच आल्याचा पाणी न घातलेला रस, त्यात चवीपुरते काळे मीठ आणि साखर घालून केलेले पाचक, जेवायच्या आधी अर्धा चमचा बाळाला दिले तर नक्कीच भूक लागते. पण हा प्रयोग रोज करु नये.
पोषक आहार नाही, म्हणून पचनशक्ती कमी, म्हणून भूक कमी, असे दुष्टचक्र असेल तर ते मोडावेच लागेल.

६) खाण्याविषयी नावड

भूक तर असते पण समोर आलेला पदार्थ आवडता नसतो, म्हणून खाल्ला जात नाही, असेही अनेकवेळा होते.
प्रत्येक लहान मूलाच्या स्वत:च्या आवडीनिवडी असतात. पदार्थ नव्या रुपात आलेला त्यांना आवडतो. त्यामुळे सतत काहितरी नवनवीन द्यायचा प्रयत्न केला पाहिजे. आवडणारे पदार्थ हेरुन ते जास्तीत जास्त पोषक कसे होतील ते बघितले पाहिजे

कधी कधी निव्वळ आपण नाही म्हणू शकतो, याचा प्रयोग आईवर होत असतो. त्याला खास असे कारणही नसते. लक्ष वेधून घ्यायचाही प्रयत्न असतो. अशावेळी कधीतरी त्या खेळाला प्रतिसाद देत तर कधीतरी डाव
उलटत कार्यभाग साधायचा. म्हणजे एखादे दिवशी खायला नकार दिल्यावर, आग्रहच सोडून द्यायचा. थोड्या वेळाने भूक लागल्यावर बरोबर गाडं रुळावर येतं.

७) ह्ट्ट

कधी कधी अमूकच पदार्थ हवा असा हट्ट असतो. शक्य असेल तर तो हट्ट पुरवायचा पण प्रत्येकवेळी नाही. तसेच तो पदार्थ आरोग्याला घातक नाही ना, याचा पण विचार करायला पाहिजे.
कधी कधी तर चक्क, अटी घालायच्या. म्हणजे नीट जेवलास / जेवलीस तरच आइसक्रीम मिळेल, वगैरे. काहि दिल्याशिवाय काही मिळत नाही, हा धडा लहान मूल जितक्या लवकर शिकेल, तितके चांगले.

बाळासाठी काय करायचे, हा प्रश्न चक्क त्याच्याच मदतीने सोडवायचा. उद्या काय करु असे विचारत रहायचे. कधी कधी अफ़लातून कल्पना सुचवल्या जातात. शिवाय आपले मत विचारले जातेय, याचाही आनंद असतोच.

मला वाटतं इतकं बास, नाही का ? इथले अनुभवी पालक आपल्या परीने यात भर घालतीलच.

आता काही पदार्थ बघू या.

१) गुळपापडी

अगदी नुकत्याच दात येत असलेल्या बाळापासून वाढत्या वयातल्या मूलांना देता येण्यासारखा हा प्रकार आहे. यासाठी पाकच करायला पाहिजे असे नाही. आवडीप्रमाणे कणीक, बेसन, नाचणीचे पिठ, सोयाबीनचे पिठ यांचे मिश्रण घ्यावे.
पण हि पिठे आधी एकत्र न करता, वेगवेगळी भाजावी. या मिश्रणाच्या निम्मा ते पाऊणपट गूळ, आधीच बारिक चिरुन तयार ठेवावा. तेवढीच लिसा (म्हणजेच ब्राऊन)साखर घेतली तरी चालेल.
पिठे वेगवेगळी तूपावर भाजून मग एकत्र करावी. त्यात थोडे भाजलेले तीळ मिसळावेत. ज्या भांड्यात भाजले त्याच भांड्यात पिठे व तीळ एकत्र करावेत. आणि भांडे गरम असतानाच त्यात गूळ वा साखर घालून मिश्रण भरभर एकत्र करावे. त्या उष्णतेने गूळ पातळ होतो. मग मिश्रण तेल लावलेल्या ताटात पसरावे, आणि वड्या कापाव्यात. वासासाठी वेलची वापरावी. अगदी कधीही तोंडात टाकायला आणि चघळायला मस्त पदार्थ.

२) चपातीचा लाडू

चपात्या मिक्सरमधून काढून घ्याव्यात. त्यात गरम केलेले तूप आणि गूळ वा साखर घालावी. आवडीप्रमाणे बेदाणे घालावेत आणि त्याचे लाडू वळावेत. चपाती न खाणारी मूले पण हे लाडू आवडीने खातात.

३) नाचणी किंवा बाजरीच्या वड्या

नाचणी किंवा बाजरी रात्रभर भिजत घालावी. मग सकाळी मिक्सरमधे बारीक वाटावी.
मग ती जरा जास्त पाण्यात खळबळावी आणि ते मिश्रण गाळून घ्यावे.गाळलेले मिश्रण तसेच ठेवावे दोन चार तासानी त्याचा साका खाली बसेल, मग वरचे पाणी अलगद ओतून टाकावे.
आता या साक्यात निम्मे नारळाचे दूध आणि पाऊणपट साखर घालावी. दोन कप मिश्रणाला चमचाभर तूप घालून जाड बूडाच्या पातेल्यात ते शिजत ठेवावे.
सतत ढवळून घट्ट करावे. मग ताटात ओतून त्याच्या वड्या कापाव्यात. हवे तर वरुन काजू घालावेत. जरा जास्तच घट्ट शिजवले तर या वड्या दोन तीन दिवस फ़्रिजमधे राहतील. नाचणीच्या वड्यात थोडी कोको पावडरही घालता येईल.

४) चपातीच्या नुडल्स

चपात्या घेऊन त्याच्या घड्या घालाव्यात. मग कात्रीने तिचे लांबलांब तूकडे करावेत.
लांब कापलेला कोबी, गाजर आदी भाज्या तेलावर परताव्यात. त्या शिजल्या कि त्यावर हे तूकडे घालून भरभर परतावे. आवडीप्रमाणे केचप, सोया सॉस वगैरे घालावे. नूडल्स साठी हा सोपा आणि आरोग्यपूर्ण पर्याय आहे.

५) एग नूडल्स

एक अंडे फ़ोडून त्यात मीठ व थोडे तेल घालून त्यात घट्ट भिजेल तेवढी कणीक भिजवावी. मग त्याच्या पातळ चपात्या लाटून जरा वा-यावर सुकू द्याव्यात. मग धारदार सुरीने त्याच्या वरीलप्रमाणे पट्ट्या कापाव्यात. त्या आवडीप्रमाणे कमी जास्त जाडीच्या करता येतील. मग भरपूर पाणी उकळत ठेवून त्यात थोडे मीठ व तेल घालावे. पाण्याला उकळी फुटली की त्यात या नूडल्स पसरुन घालाव्या. अंड्यामूळे त्या विरघळत नाहीत. त्या शिजल्या कि वर तरंगतात. मग त्या झार्‍याने निथळून घ्याव्यात.
आवडीप्रमाणे सॉस वा सुप करुन त्यात या नूडल्स घालून द्याव्यात. यांना आवडीप्रमाणे आकारही देता येतो. सूपमधे भाज्या असतील, याकडे लक्ष द्यावे.

६) आलू चाट

लहान मूलांना बटाट्याची साले, कोथिंबीर वगैरे खायची सवय लावावी. बटाटे सालीसकट उकडून किंवा मावेमधे भाजून घ्यावेत. मग त्याचे सालीसकटच तूकडे करुन त्यावर चाट मसाला, कोथिंबीर व थोडे तेल टाकावे. कोथिंबीर अगदीच चालत नसेल तर मिरची कोथिंबिरीची चटणी वाटावी. त्यात पुदीना व आलेही घालावे. लिंबाचा रस घालावा व हे सगळे एकत्र करुन खायला द्यावे. वरुन थोडा मध किंवा चिंच खजूराची चटणी घालावी. बटाट्याबरोवर रताळी पण घेता येतील.

७) चना मसाला

काबुली चणे रात्रभर भिजवून त्यात मीठ व थोडे मिरिदाणे घालून कूकरमधे शिजवून घ्यावेत.
पाणी निथळून त्यावर चाट मसाला घालावा. थोडे केचप घालावे व लिंबू पिळावा. लगेच खायचे असेल तर त्यावर कांदा, टोमॅटो बारिक कापून घालावा.

असेच चण्याच्या डाळीचेही करता येते. पण चण्याची डाळ रात्रभर भिजवायची गरज नाही. आणि ती शिजवताना, हळद आणि हिंग अवश्य घालावा.

८) मिनी इडली.

आता कॉकटेल ईडल्यांचे स्टॅंड मिळतात. त्यात ईडल्या करणे जरा कटकटीचे असते खरे पण मूलांना अशा इडल्या खुपच आवडतात. त्यात त्या जरा रंगीत केल्या तर आणखी छान. रंगीत करण्यासाठी त्यात गाजराचा किस, पालक + मेथी, बीटाचा थोडा रस असे वापरता येईल. ईडलीच्या पिठातच थोडे खोबरे घालायचे.
बरोबर खोबर्‍याची चटणी डब्यात देता यायची नाही. त्यासाठी कोरडी चटणी, ज्यात डाळे, शेंगदाणे, तेलात परतलेला कढीपत्ता, मीठ व हिंग घेऊन कोरडे़च भरड वाटावे आणि ते थोड्या तेलात वा तूपात मिसळून द्यावे.

९) वाफ़वलेली फ़रसबी

शक्यतो कोवळी फ़रसबी घ्यावी. आणि ती ऊभी ऊभी बारिक कापावी. भरपूर पाणी उकळून त्यात ते तूकडे दिड मिनिटच शिजवून घ्यावे. मग निथळून घ्यावेत. थोड्या लोण्यावर ते तूकडे जरा परतावेत. मग त्यावर पावाचा वा चपातीचा चुरा टाकावा. मीठ मिरपुड टाकावी. मग यावर उकडलेल्या अंड्याचा चुरा टाकून खायला द्यावे.

१० ) वाफवलेली गाजरे.

गाजराचे सारख्या आकाराचे लांबट तूकडे करावेत. त्यात चवीप्रमाणे मीठ, साखर, मिरपुड व थोडे तूप टाकून पॅनमधे, मंद गॅसवर ठेवावे. वर झाकण ठेवावे. थोड्यावेळाने झाकण काढून सूटलेले पाणी आटू द्यावे. तूप दिसू लागले कि त्यात थोडी कणीक घालून परतावे.

११ ) डाळ्याचे लाडू

पंढरपुरी डाळॆ आणून ते किंचीत गरम करावे. मग मिक्सरवर त्याची बारीक पूड करावी. त्यात थोडे तूप, पिठीसाखर आणि वेलचीपूड टाकून त्याचे लाडू वळावेत.

१२ ) कुरमुरे

कुरमुर्‍यांचा चिवडा करता आला तर छानच नाहीतर नुसते कुरमूरे घेऊन त्यात भरपूर चणे, शेंगदाणे घालावेत. त्यात थोड्या ज्वारीच्या व साळीच्या लाह्या मिसळाव्यात. त्यात थोडे खारकेचे तूकडे मिसळावेत. हा खाऊ पण येता जाता खायला छान.
बाळाला वेळ असेल तर त्यातच कैरी, कांदा, टोमॅटो यांचे तूकडे, चिंच खजुराची चटणी, शिजवलेली उसळ घालून द्यावे.

१३) फ़ुलवलेले पोहे

एका वेळी खायचे असतील तेवढे पोहे घेऊन ते साजूक तूपात जरा परतावेत. खायला देताना त्यात थोडी पिठीसाखर आणि स्वादासाठी खालीलपैकी काहीतरी एकच घालायचे. (वेलची, जायफ़ळ, केशर, दालचिनी, लवंग, सुंठ आदी) किंवा मीठ घालून स्वादासाठी यापैकी एकच (सुंठ, मिरपूड, हिंग, जिरेपूड, ओवापूड)
असा एकच स्वाद घातल्याने मूलांचे नाक तीक्ष्ण होते आणि त्यांना स्वादाची ओळख पटते.

१४) मेतकूट

मेतकुट हा आपला पारंपारीक पण सध्या विस्मरणात गेलेला पदार्थ. बाजारात मिळतोच पण जरा मेहनत घेऊन घरी केला तर भरपूर होतो. मेतकुट अनेक प्रकारे वापरता येते. तूपभात मेतकूट, ज्वारीची भाकरी आणि मेतकूट, टोस्ट ब्रेड आणि मेतकूट हे पदार्थ खुपच रुचकर लागतात.

मेतकूटाचे अनेक प्रकार प्रचलित होते असे दुर्गाबाई भागवतांनी लिहून ठेवले आहे.
कधीकाळी ते फक्त मेथीचे पिठ असावे पण आता त्यात नावालाही मेथी उरलेली नाही
सर्वसाधारण प्रमाण असे.
http://www.maayboli.com/hitguj/messages/103383/105396.html?1160916387

१५) कुरड्यांचा उपमा

गव्हाच्या कुरड्या आपल्याला माहितच आहेत. या कुरड्या करण्यासाठी खुप खटपट असते, पण शहरात त्या तयार मिळतात. त्याचे तूकडे करुन ते कोमट पाण्यात भिजत ठेवावेत. मग निथळून घ्यावेत. तेलाची हिंग, मोहरी, मिरची, कढीपत्ता घालून फ़ोडणी करावी, त्यावर हे तूकडे परतावेत. त्यावर मीठ, साखर व ओले खोबरे टाकावे.

१६) शेव नजाकती

हा पदार्थ मी अलिकडेच सविस्तर लिहिला आहे.

१७) पराठे / थालिपिठ

वेगळी भाजी बघून अनेक मुले नाक मुरडतात. अशावेळी भाज्या पराठ्याच्या पिठातच बारिक चिरुन घातल्या तर त्यांच्या लक्षात येत नाही. जरुर वाटली तर भाज्या शिजवून कुस्करुन मिसळाव्यात.
अनेक फ़ळांचेही पराठे करता येतात. साधारण पणे गर असलेली फळे (आंबा, पपई, फणस, चिकू, अवाकाडो, टरबूज, केळे, पेरू, अननस आदी ) घेऊन त्यांचा गर काढायचा. त्यात साखर घालून भिजेल एवढीच कणीक मिसळायची. पाणी अजिबात वापरायचे नाही.

१८) आइसक्रीम

वेगवेगळ्या फ़ळांचेच नाही तर भाज्यांचेही छान आइसक्रीम होते. लाल भोपळा, गाजर, कोहळा, बटाटा, कॉलिफ़्लॉवर, कोनफ़ळ आदी गर असणा-या भाज्यांचे उकडून गर घ्यावेत. ते थोड्या तूपावर परतून घ्यावेत. मग त्यात आटवलेले दूध, साखर आणि आवडीचा इसेन्स घालायचा. आणि नेहमीप्रमाणे फ़्रीज / बीट करत आईसक्रीम करायचे. कुणाच्या लक्षातही येत नाही.

१९) आस्पिक

आवडत्या जेलीचे किंवा अनफ़्लेव्हर्ड जिलेटीनचे पाकिट आणावे. अनफ़्लेव्हर्ड असेल तर टोमॅटोच्या पातळ रसात जेली करावी. या जेलीमधे वेगवेगळ्या भाज्या थोड्या शिजवून घालाव्यात. मग नेहमीप्रमाणे जेली सेट करावी. खायला देताना काकडी, सलाद ग्रीन आदींनी सजवून द्यावे.
आपल्याकडे पुर्वी जेलीमधे जिलेटीन वापरलेले असायचे ते प्राण्यांच्या हाडापासून केलेले असायचे.
आता समुद्री वनस्पतीपासून केलेला शाकाहारी पर्यायच वापरला जातो. (चायना ग्रास, अगर अगर,
कार्गीनान ) अगर अगर नुसते लांब लांब काड्यांच्या रुपातही मिळते. ते वापरुन खर्वस, मिल्क
जेली सारखे प्रकार करता येतात.
आस्पिक साठी ताजे टोमॅटो उकळत्या पाण्यात टाकून सोलून कुस्करुन घ्यावे. शक्यतो मिक्सर
वापरु नये. तारेच्या गाळणीवर रगडून रस काढावा. तो जरा गरम करुन त्यात बारिक चिरलेले
चायनाग्रास घालावे. त्यात चवीप्रमाणे, तिखट, मीठ, साखर वगैरे घालावे. मग गोठवावे.

अश्या प्रकारे कुळलेही सरबतही गोठवता येते. लिंबूफ़ूल वापरून लिंबाचे सरबत केले तर
मिश्रण काचेसारखे पारदर्शक होते.
आत घालण्यासाठी पांढरा कोबी, गाजर आदी भाज्या किंचीत वाफ़वून घ्याव्यात. जेलीचे मिश्रण
थोडावेळ फ़्रिजमधे ठेवावे. ते अर्धवट सेट झाले कि त्यात भाज्या मिसळून पूर्ण सेट करावे.
आयत्यावेळी डिशमधे मोल्ड उपडा करुन, काकडीच्या चकत्या, पातीचा कांदा, सलाद ग्रीन यांनी
सजवावे.

२०) फळे

सर्व प्रकारची मोसमी फळे मूलांना आवर्जून खायला लावावीत. यामधे आपल्याकडे मिळणारी जांभळे, करवंदे, बोरे, आवळे यांचा आवर्जून समावेश करावा. शक्यतो ज्यूस पिण्यापेक्षा चावून फ़ळे खाण्याचा आग्रह धरावा.

२१ ) सरबत

बाजारातील तयार सरबते देण्यापेक्षा घरगुति ताजी सरबते देणे कधीही चांगले. आपल्याकडे सरबतात लिंबाचे, कैरीचे, कोकमाचे, बेलफळाचे, भोकराचे, चिंचेचे, फ़ालसांचे असे अनेक प्रकार आहेत. हि सर्वच सरबते आरोग्यपूर्ण अशी असतात. मूलांना शाळेतही अशी घरगुति सरबते देता येतील.

२२ ) थालिपिठ

थालिपिठ हा पण आपल्याकडचा एक आदर्श प्रकार. नुसते करण्यापेक्षा त्यात एखादी भाजी चिरून घातली तर आणखी छान. भाजणी असली तर उत्तमच, ती नसेल तर घरी असतील ती सर्व पिठे मिसळून घ्यावीत. त्यात कच्च्या वा शिजवलेल्या भाज्या घालाव्यात. वरण घातले तरी चालते. मग त्याचे थालिपिठ लावावे.

२३ ) फ्रॅंकी रोल्स

अंड्याचे पातळ ऑमलेट करुन ते शिजायच्या आधीच त्यावर एक तयार चपाती टाकावी मग उलटून चपाती भाजून घ्यावी. त्यावर भाज्यांचे लांबट तूकडे, भानोल्याचे लांबट तूकडे, केचप वगैरे घालून रोल करावा. चिकनचे तूकडे पण वापरता येतील. अंडे चालत नसेल तर बेसनाचा पोळाही वापरता येईल.

२४) उकडलेल्या भाज्या
तुरीच्या शेंगा, भुईमूगाच्या शेंगा, फ़रसबी, पावट्याच्या शेंगा, बीट, बटाटे अशा काही भाज्या नुसत्या उकडून, मीठ मिरपुड घालून खाता येतात. डब्यात द्यायच्या असतील तर दाणे काढून आणि बाकीच्या भाज्या थोड्या लोण्यात परतून देता येतील. काही धान्येदेखील (ज्वारी, मका) अशी उकडून घेऊन खाता येतात.

२५) खिचडा

बाजरी घेऊन ती पाण्याचा हात लावून जरा भरडायची. मग ती भिजत घालून कुकरमधे मऊ शिजवायची. त्यात सोबतीने तांदळाच्या कण्या, लापशी, चण्याची डाळ, दाणे पण वापरता येतील. हे सगळे मऊ शिजले कि त्यात तूप आणि मीठ घालून खायचे.

२६) मोमोज
ओली फेणी किंवा सालपापडी या नावाने आपल्याकडे हा प्रकार होत असे. आता त्याला मोमो
नाव दिले तर मूले आनंदाने खातील.
सारण म्हणून लांब चिरलेली कोबी, गाजर, मॅश केलेले स्वीट कॉर्न, मश्रुम, सोया मिन्स (भिजवून
आणि निथळून) असे सगळे कोरडे शिजवून घ्या. फक्त मीठ घाला. चिकन श्रेड्स पण चालतील.
(चिकन पाण्यात शिजवून त्याचे लांबट तूकडे करायचे. पाणी स्टॉक म्हणून वापरायचे.)
एक कप तांदुळ आणि एक टेबलस्पून गहू तीन दिवस एकत्र भिजत ठेवा. रोज पाणी बदला.
करायच्या दिवशी मिक्सरवर बारिक वाटा. थोडे पाणी वापरा पण तयार मिश्रण बासुंदीएवढे
दाट ठेवा. हे मिश्रण गाळून घ्या. त्यात मीठ घाला व थोडी खसखस घाला.
मोदकपात्र वापरा किंवा एका मोठ्या भांड्यात पाणी उकळत ठेवा व त्यात अधांतरी एक
चाळणी ठेवा. त्यात बसतील अशा दोनतीन ताटल्या, तेलाचा हात लावून तयार ठेवा.
वरील पिठ अर्धा डाव भरुन ताटलीत टाका आणि ताटली गोल फिरवून मिश्रण ताटलीभर
पसरवा. मग ताटली मोदकपात्रात ठेवून २/३ मिनिटे झाकण ठेवून वाफवा. त्यावर भाज्यांचे
मिश्रण घालून रोल करा. सोबत सोया सॉस, केचप द्या. आपल्याकडे हा प्रकार कच्चे तेल
व तिखट घालून खात असत.

२७) दूध मोगरा

कपभर सुवासिक तांदळाची पिठी घेऊन ती कपभर कोमट दूधात भिजवायची.
त्यातच दोन चमचे दही घालून रात्री विरजण लावायचे. सकाळी त्यात चमचाभर
पातळ तूप घालायचे. आवडीप्रमाणे यात साखर घालायची, किंवा मिरचीचे वाटण
आणि किसलेली एखादी भाजी घालायची. त्यात फ़्रूटसॉल्ट घालून ढोकळ्याप्रमाणे
वाफ़वायचे. अत्यंत चवदार पदार्थ तयार होतो.

२८) रव्याचे रुमझुम
रव्यामधे ताक घालून तो थोडावेळ भिजवून ठेवायचा. मग त्यात साखर, वेलची तूप आणि किंचीत
खायचा सोडा घालून जाडसर पॅनकेक करायचे.

२९ ) टोमॅटो ऑमलेट
टोमॅटो ऑमलेट हाही थोडासा विस्मरणात गेलेला प्रकार आहे. हे करताना बेसनाच्या पिठाबरोबर
थोडी कणीक आणि तांदळाचे पिठ अवश्य घ्यावे. पिठात केचप आणि कोथिंबीरपण घालावी.
डोश्याच्या पिठाचा वापर करुन देखील टोमॅटो ऑमलेट करता येते. कोथिंबीरीबरोबरच एखादी
पालेभाजी पण ढकलावी. कच्चे पिठ चाखून बघावे, ते चविष्ठ झाले तर ऑमलेट पण छान
चवदार होतात.

३०) फोडणीची मूगाची डाळ.
मूगाची डाळ भिजवून फोडणीला टाकून खायला फ़ार रुचकर लागते. यात टोमॅटो, मिरच्या
खोबरे वगैरे घालायचे. भिजवलेली असेल तर पटकन शिजते. यात भरीला म्हणून एखादी
भाजी (भोपळा, दुधी, पडवळ, मूळा वगैरे) किसून टाकावे. पडवळ, मूळा तर शिजवायचीही
गरज नाही.

३१) खमंग काकडी
हा पण एक रुचकर प्रकार. यासाठी काकडी किसून न घेता, कोचवूनच घ्यावी. कोचवल्यावर
थोडी निथळून घ्यावी आणि त्यात थोडेसे साजूक तूप टाकावे तसेच दह्याच्या ऐवजी चक्का
वापरावा, म्हणजे फार पाणी सुटत नाही. दाण्याचे कूट, मिरची, कोथिंबीर, मीठ व साखर
घालावी.

३२) खजूराचे रोल
जागूने नुकतेच खजूराचे लाडू लिहिले आहेत ते किंवा, खजूराचा लगदा मंद आचेवर मऊ
करुन घ्यायचा आणि तो प्लॅस्टीकच्या कागदावर जाडसर थापायच्या, त्यावर भाजलेले
तीळ आणि दाणे किंवा काजू किंवा आक्रोडाचे भरड कूट पसरून हाताने दाबायचे.
आणि मग त्याचा रोल करुन चकत्या करायच्या.

३३) भाजलेल्या भाज्या

बटाटा, रताळे, लाल भोपळा, सिमला मिरच्या, कांदे असे सगळे बार्बेक्यू करुन,
किंवा चकत्या करुन लोखंडी तव्यावर मंद आचेवर भाजून खाता येते, भाजून
झाल्यावर थोडे तेल व चाट मसाला टाकायचा. हे सगळे तयार करण्यात मुलांचा
हातभार लागला, तर त्यांना फ़ार आनंद होतो.

३४) लापशीची खिचडी

रोज चपातीच खायला हवी असे काही नाही. रव्यापेक्षा लापशी वापरणे चांगले.
प्रेशरपॅनमधे ती तूपावर परतून त्यात दूध वा पाणी घालून शिजवावी. मग
साखर घालून जरा आठवावे.
किंवा लापशी व थोडे शेंगदाणे एकत्र भिजवत ठेवावे. दोन तासानी ते कूकरमधे
वाफ़वून घ्यावे. मग तूपाची जिरे व हिरवी मिरची घालून फ़ोडणी करुन त्यावर
हे मिश्रण परतून कोरडे करावे. मीठ, साखर व ओले खोबरे घालावे. हा प्रकार
साबुदाण्याच्या खिचडीसारखाच लागतो, पण त्यापेक्षा बराच आरोग्यदायी.

३५) उकडपेंडी

तेलावर हिंग, हळद मोहरीची फ़ोडणी करावी, त्यात बारिक चिरलेला कांदा
परतावा. मग जाडसर कणीक परतावी. त्यात मीठ व साखर घालावी. मग
चिंचेचे पातळ पाणी थोडे थोडे घालून परतत रहावे (असे केल्याने कणकेचा
गोळा होत नाही.) कोरडे रवाळ मिश्रण झाले पाहिजे.
चपातीच्या उठाठेवीपेक्षा कमी श्रमात होणारा पर्यायी पदार्थ आहे.
मोकळ भाजणी पण अशीच करता येईल.

३६ ) केळी टोमॅटो

राजेळी केळी आणि लाल घट्ट टोमॅटो किसून एकत्र करावे. त्यात निम्मी साखर
घालावी. आणि थोडे तूप टाकून मिश्रण शिजवावे. हवे तर यात ओले खोबरेही घालता
येईल. चपातीबरोबर खाण्यासाठी एक रुचकर प्रकार होतो.
साधी पण जरा कमी पिकलेली केळी वापरली तरी चालतील. किसणे जमणार नसेल
तर केळ्याच्या चकत्या आणि बारिक चिरलेला टोमॅटो एकत्र करुन शिजवायचा.

३७ ) टोमॅटोची भाजी.
आपण शक्यतो टोमॅटो पूरक म्हणूनच वापरतो. त्याची भाजीही रुचकर होते. तूपाची
जिरे घालून फ़ोडणी करुन त्यावर टोमॅटोच्या फ़ोडी टाकून शिजवाव्या. मग मीठ, साखर
आणि लाल तिखट घालावे. यातच ओले खोबरे किंवा पनीरचा चुरा घालावा.

कांदा लोण्यात परतून त्यावर टोमॅटो परतून, त्यावर थोडे क्रीम किंवा मिल्क पावडर
घालून मलाईका सागही करता येईल. या दोन्ही भाज्या मुलांना आवडतात.

३८) कडधान्यांची मिसळ

घरातील सर्व कडधाने (वाल सोडून) भिजत घाला व त्यांना चांगले मोड येऊ द्या.
मग प्रेशरपॅनमधे ती, हिंग, हळद, गोडा मसाला, लाल तिखट व थोडी चिंच घालून
शिजवून घ्या. मीठ घाला.
या उसळीवर उकडलेल्या बटाट्याचे तूकडे, बारिक चिरलेला कांदा, मिरची, कोथिंबीर,
टोमॅटो आदी घालून खा. शक्यतो फ़रसाण वापरु नका. त्याजागी भाजलेला पापड
घ्या. या दिवशी नेहमीचे जेवण घेतले नाही तरी चालेल.

३९) बटाट्याचा पिझ्झा

बटाटे उकडून मॅश करुन घ्या. कांदा किसून घट्ट पिळून त्यात मिसळा. त्यात थोडासा
शेपू किंवा मेथी मिसळा. मग त्यात मिश्रणाच्या पावपट कणीक मिसळा म मऊसर मिश्रण
करा. नॉन स्टिक पॅनला तेलाचा पुसट हात लावून त्यावर हे मिश्रण अलगद पसरा. दाबू नका
मंद गॅसवर एका बाजूने भाजा. दुसरे पॅन घेऊन त्यावर हे उपडे करा. वरुन हवे ते टॉपिंग
घाला (चिकन, मश्रुम, भुर्जी, पनीर, कॉर्न, सिमला मिरची ) चीज किसून टाका, आणि परत
भाजा. पिझ्झाला हा एक चांगला पर्याय आहे.

४०) भाज्या घातलेले ऑम्लेट

ऑम्लेट करताना ते नुसते करु नका, त्यासोबत भाज्या अवश्य वापरा. कांदा, बटाटा, कोबी,
गाजर, सिमला मिर्ची, मुंबई मेथी, पातीचा कांदा, पातीचा लसूण, सेलरी, फ़रसबी, मश्रुम
आदी भाज्या लोण्यात परतून पॅनमधे पसरुन घ्या. त्यावर फ़ेटलेले अंडे पसरुन टाका,
आणि सगळे सेट झाले कि परता. यातच ब्रेडचे चौकोनी तूकडेही घालता येतील.

आणखी या पदार्थात इथे भर घातली जाईलच. याशिवाय चिक्की, गाजराचा केक, केळ्याचा केक, उकडलेले रताळे, उकडलेले राजेळी केळे, कणीस असे अनेक पदार्थ लहान मूलांना आवडण्यासारखे आहेत.

वाढणी/प्रमाण: 
एका बाळासाठी
अधिक टिपा: 

या बीबीवर प्रतिसादात पण अनेक पदार्थ सुचवले आहेत, तेही अवश्य वाचावेत.

http://www.loksatta.com/chaturang-news/preventing-obesity-in-children-86...

इथे डॉ. संपदा तांबोळकर यांचा एक छान लेख आहे, अवश्य वाचा.

माहितीचा स्रोत: 
माझे छोटे सवंगडी !
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे, हा धागा कसा काय मिसला होता मी?
उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी दिल्याबद्दल धन्यवाद, दिनेशदा.

माझे १४ महिन्याचे बाळ अजिबात गोड खात नाही Sad
मी ऑफिस ला जाते त्यामुळे मी तिला रोज सकाळी रव्याचा उप्मा, खिमटी , नाचणी ची पेज हेच देते मला
कमी वेळात बनलेले पदार्थ सांगा

प्रितीभुषण, गोड खात नाही, हे चांगलेच आहे कि. उगाच सवयही नका लावू.
थोडी तयारी आधी केली, तर वरचे बरेचसे पदार्थ पटकन होतात. मी कालच
पोस्ट केलेला, हिरव्या मूगाचा डोसा पण चांगला आहे.

काकडी कोचवणे हे इतकं चांगल्या प्रकारे समजावल्याबद्दल =d>...दिनेशदा तुम्ही वर म्हटल्याप्रमाणे सर्वेसर्वाच आहात....

चौदा महिन्यांचे बाळ दात आल्यामुळे सगळे पदार्थ खातात...मी माझ्या मुलाला सकाळी एक कापलेलं फ़ळही देते जसं सफ़रचंद किंवा पेअर..(साल काढून दिलं तरी) म्हणजे तुम्ही जो मुख्य पदार्थ देता आहात त्यात भर पडते आणि शिवाय हे फ़ळांचे तुकडे हाताने खायला मिळाल्यामुळे सुरूवातीपासून हाताने खायची सवय लागते...बाकी सगळे वर दिलेले पदार्थ मस्तच आहेत...

दिनेशदा, तुम्ही पोस्टल्याप्रमाणे नाचणीच्या पिठाचा भगरा केला होता. मस्त झाला. मी यात शिजवलेल्या भाज्या अ‍ॅड केल्या, तसेच फोडणीत कडीपत्ता आणि चण्या-उडदाची डाळ पण घातली. शेंगदाण्याच्या कुटाची चव सुरेख आली. मी गाजराचा कीस वापरला. थांकु! Happy

होल व्हीट झटपट पॅनकेक्स

एक अंडं फोडून त्यात साधारण तीन पॅनकेक्स होतील इतकी कणिक घालून मिक्स करून घ्यावी. त्यात थंड दूध घालत मिक्स करावं. गुठळ्या मोडून गुळगुळीत असं मिश्रण डोश्याच्या कन्सिस्टन्सीएवढं पातळ होईल इतपत ठेवावं. आवडीनुसार साखर आणि चिमूटभर मीठ घाऊन तव्यावर पॅनकेक्स बनवावे. बेकिंग पावडर, सोडा वगैरेची गरज लागत नाही. अंड्यांच प्रमाण जास्त असल्याने पॅनकेक उलटला की साधारण फुगतो. छान सोनेरी रंगावर दोन्ही बाजूंनी भाजून मग खायला द्यावे. सोबत मेपस सिरप अथवा मध द्यावा. मस्त लागतात हे पॅनकेक्स आणि अतिशयच झटपट होतात.

mala vatate maggi hi shev banvayachya sachyane banvata yeil Anjali kitchen press vaprun

वाह दिनेशदा... खुपच सुंदर माहिती तीही एकाच ठिकाणी... अनुमोद्न
सातुचे पिट म्हण्जे काय असते
सातु हे गव्हासारखे धान्य असते का ?

पुर्वी सत्तू नावाचे धान्य वापरात होते, ( पुर्वी म्हणजे अश्वथाम्याच्या काळात Happy ) करड्या रंगाचे गव्हासारखेच दाणे असत. सध्या सत्तूचे पिठ म्हणजे गहू आणि चणाडाळ भाजून केलेले पिठ असा अर्थ आहे. यात वासाला वेलची व सुंठ घातलेले असते. गहू आणि चणाडाळ एवढी खमंग भाजलेली असते कि हे पिठ परत शिजवायची गरज नसते. नुसते दूधात वा पाण्यात भिजवून दिले / प्यायले तरी चालते.

दिनेश Happy सत्तु म्हणजे सातूच म्हणताय ना तुम्ही? आमच्याकडे सांगली जिल्ह्यात होत अजुन. शेतकरी घरच्या पुरत कोरटे(कारळे), सातू वगैरे पेरतात घरच्यापुरत. Happy

सातू साधारण किन्वा सारखे दिसते. भात करतात त्याचा. डायबेटिस वाल्याना चांगला पर्याय समजला जातो पांढर्‍या भाताऐवजी.

दिनेश, मी केलं सातू घरी... कोणी नाही तरी मुलं मिटक्या मारुन खात आहेत. पण डाळी मिक्सरमध्ये चांगल्या बारिक होत नाही, त्यावर काही उपाय आहे का?

विजय, डाळ जरा उन्हात सुकवून खमंग भाजली पाहिजे. दाताखाली धरून चावल्यास भुगा झाला पाहिजे पण करपता कामा नये. मावे मधे ओलसर डाळ, लो सेटींगवर भाजता येते.
भाजलेली डाळ मिक्सरमधे दळून, चाळून घेतली पाहिजे. वरचा भरडा भाजीत वगैरे वापरता येतो.
ते जमतच नसेल तर पंढरपुरी डाळं ( फुटाण्याची डाळ ) वापरायचे.

सीमा, मुंबईत फारच क्वचित दिसते दुकानात. तयार सातूचे पिठ ( गहू+डाळ्+वेलची+साखर ) मात्र मिळते.

दिनेश दा, माझी मुलगी २ वर्षाची होईल. ती नॉन वेज असेल तर भरपूर खाते पण वेज तर नकोच......!वेज असल्यावर कसे बसे दोन चार घास द्यावयाचे. पाजावयाचे नाहीतरआणि जबरदस्ती गाईचे दुध रात्री उठून बसते

ज्या पद्धतीने नॉन व्हेज करता त्याच पद्धतीने ( तोच मसाला वगैरे ) व्हेज करायचे. आधी न खाल्लेल्या / बघितलेल्या भाज्या तश्या करायच्या आणि ते नवीन प्रकारचे चिकन आहे / फिश आहे असे सांगायचे.
बरोबर खाईल. आवड नॉन व्हेजची असण्यापेक्षा त्या चवीची / स्वादाची असण्याची जास्त शक्यता आहे.
अर्थात नॉन व्हेज खाण्यात गैर काहीच नाही, आणखी काही महिन्यांनी हे खाल्लेस ( चपाती ) तरच नॉन व्हेज मिळेल अशा अटी घालायला सुरवात करा.

दूध नको असेल तर दही / लस्सी / पुडींग किंवा मी वर लिहिले आहे तसे आईसक्रीम देता येईल.

धन्यवाद दिनेश दा
चपातीत घालूनच बाव (मच्छी) मिळेल. बाव आणि भातच खावा लागेल असे मी सांगतो आणि ती खाते हि......
पण वेज डे च्या दिवशी काहीच खात नाही. मग केळे,सफरचंद अशी फळे मागे फिरून फिरून खावयास घालतो.
आता तुम्ही सांगितले ते करून पहातोच .........

जयदीप, शक्यतो मागे लागणं टाळा. एखादी जेवणाची वेळ टळली तर काही बिघडत नाही, खाऊ मात्र तिला दिसेल आणि हाताशी येईल असा ठेवून द्यायचा. भूक लागली कि बरोबर खाईल.

मुलांच्या खाण्यासंदर्भात एक छान लिंक सापडली. हा माझा आवडता धागा, तेव्हा म्हटलं इथे टाकता येईल Happy

अजून डिटेल्ससाठी: वरील लिंक या लेखामध्ये होती.

धारा, किती साधे सोपे नियम आहेत ना !
फ्रेंच लोक जेवताना फार रसिकपणे जेवतात. मी अनुभवलंय हे.

आपल्याकडे आपण त्याला उत्तेजन देत नाही.

पॉलीश मुळे असेल का.. कारण बार्ली राइस म्हणुन परवा आणला.. त्यात पांढर्यावर ब्राउन रेशा आहेत.. ग्व्हासरखा दिसतो.. पण राइस का लिहिलय देव जाणे!

मधुमेह वाले नेतात म्हणाला दुकानदार!

म्हणजे आधी लाल तांदुळ असायचा .. किवा ब्राउन.. मग पॉलीश करुन पांढरा शुभ्र मिळायला लागला.. तसंच हे असेल का?

असंच मनात आलं म्हणुन लिहीलं.. धागा भरकटला का??

वा ! काय उपयुक्त माहिती, आजच पाहिला हा धागा, माझ्य निवडक दहात.

दिनेशदा, एक अजुन पौष्टिक पदार्थ आठवला, सी.के.पीं.मध्ये थुली म्हणतात, म्हणजे गव्हाचे सत्व.
२-३ रात्री गहू भिजवून ठेवायचे, रोज पाणी बदलायचे, मग गव्हात पाणी पाणी घालुन मिक्सरमध्ये वाटायचे गाळून चोथा वेगळा करुन या पाण्यात थोडे साजूक तुप आणि या सत्वाच्या निमम्मा चिरलेला गूळ घालून मंद आचेवर ढवळत रहायचे, दाटपणा येवू लागतो. वरुन पुन्हा तूप घालायचे, यची कंसिस्टन्सी सेमी सॉलिडच असते.

लहानपणी थंडीच्या दिवसात भरपूर खाल्ली आहे मी.

Pages