ऐक जरा ना.. (वृत्त चम्पकमाला)

Submitted by स्वामीजी on 4 August, 2014 - 02:17

सांजसकाळी कातरवेळी
गूज मनाचे ऐक जरा ना..

झांजर वारा कातळमाळी
भोकर बोरे काजळजाळी,
चाखुन घेता माधुर ओठी
बोलत जाऊ लाघव गोठी..

पाउलवाटा आड मळ्याची
धून सजावी गोड गळ्याची,
मावळतीला सूर्य बुडावा
लाजत हाती हात धरावा..


भेट घडाया मुक्त मनाची
चाहुल ना हो दूर कुणाची,
तू बरसावे बावर गाणे
स्वप्न मनीचे गोजिरवाणे..

आवरताना सावरलेले
पाझर डोळे बावरलेले,
प्रीत उरीची व्याकुळ व्हावी

भाव मनी हे, भेट घडावी..

(वृत्त चम्पकमाला - गालल गागा गालल गागा)

- स्वामीजी
(काही ठिकाणी या वृत्ताचे नाव "रुक्मवती" असे सुद्धा दिलेले आहे)

संपादन...
वैवकु यांनी छन्दभंगाच्या चुका लक्षात आणून दिल्यावर रचनेत दोन ठिकाणी संपादन केले आहे.... तिथे तिरक्या अक्षरात (italic font) दिलेल्या मुळातल्या ओळी अशा होत्या...

मावळतीची सोनसाखळी
लाजत यावी सवे सावळी..

पाझर डोळे व्याकुळलेले,
प्रीत उरीची उधाण व्हावी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचली तेव्हाच ही कविता खूप आवडली होती, चंपकमाला हे एक सुमधुर वृत्त, पण कमी लिहिलं गेलं होतं यात मराठीत ,स्वामीजी, तुमच्यामुळे हे प्रचलित होत आहे..

सांजसकाळी गूज मनीचे ऐकण्यासाठी आर्जव करताना कवीनी योजलेले शब्द आणि त्यांची चंपकमाला वृत्तात केलेली रचना वाचकाला गुंगवून ठेवण्यात कमालीची यशस्वी झाली आहे. माधुर ओठी लाघव गोठी, मावळतीची सोनसाखळी लाजत यावी सवे सावळी....असे मनसोक्त गुंगवून ठेवणारे वर्णन केल्याने कवितेत असलेल्या जोडीचे मधुर असे विश्व आपसूकच त्रयस्थाच्या समोर येऊन ठाकते आणि तो स्वतःही "प्रीत उरीची उधाण व्हावी भाव मनी हे, भेट घडावी.." अशीच इच्छा व्यक्त करीत राहील. कोणत्याही ललितकृतीत "असेच झाले पाहिजे" असा प्रयत्न केलेला सहसा आढळत नाही, पण मनोमन प्रार्थना होत राहते....जी विशुद्ध रुपातच असते. भावपोषक वातावरणात सामोरी येणारी रंजकता आणि स्थिती यांचे सुंदर रुपांतर या "ऐक ना जरा...." असे लाघवी शीर्षक लाभलेल्या काव्यात आले आहे, ते फार मोहक आहे.

सोनसाखळी
सवे सावळी..
उधाण व्हावी<<<< ह्या जागी वृत्त तपासावे लागेल असे वाटते

कविता कमी आवडली . जुळवाजुळव जास्त जाणवली कदाचित ह्या वृत्ताचा तुमचा सराव कमी झाला असावा असे वाटले

वैवकु
खरं तर दि. २८ जुलै २०१३ रोजी ही रचना अन्यत्र एका समूहावर पोस्ट केली, त्यानंतर आजतागायत कोणीही वृत्ताच्या लगावलीनुसार अशी तपासणी केली नव्हती... आपण इतक्या बारकाईनं रचना वाचून नेमके छन्दभंग दाखवून दिलेत, याबद्दल मन:पूर्वक धन्यवाद.

रचना लिहिल्यानंतर ती पोस्ट करताना सुद्धा हे छन्दभंग माझ्या लक्षात आले नव्हते..... वृत्ताच्या लयीत गुणगुणत गेलो, एकटाकी रचना लिहीली... मात्रा जुळत असल्याने लयीचा भंग होत नव्हता आणि २-३ शब्दांची लगावली हुकली याचं अवधान त्यावेळी राहिलं नव्हतं.

त्यानंतर सासवड साहित्य संमेलनातील कार्यक्रमात सादर करण्यासाठी निवडलेल्या रचनांमध्ये ही रचना सुद्धा होती.... त्यावेळी माझ्याबरोबर क्रान्ति, भारती, रणजित, अमेय व अनिल मंचावर बसलेले असताना तिथे पुन: एकदा सहज नजर फिरवली असता अचानक हे छन्दभंग माझ्या लक्षात आले आणि अगदी आयत्या वेळी मी ही रचना वगळून दुसरीच रचना सादर केली !
त्यानंतर पुन: दुर्लक्ष झालं आणि रचनेवर नव्याने हात फिरवायचं राहूनच गेलं... आज आपल्या सूचनेमुळे सुधारणा करण्याचं मनावर घेतलंच ! त्यानुसार वरील रचनेत संपादन केलं आहे.

मुळात ही रचना लिहिली तेंव्हा सुद्धा सुमारे अर्ध्या तासात एकटाकी लिहिली होती, त्यामुळे माझ्या मते मी तरी कसलीच "जुळवाजुळव" केली नव्हती..... आपल्याला अशी जुळवाजुळव नेमकी कुठे आणि कोणत्या स्वरूपात जाणवली ते थोडं स्पष्ट झालं तर बरं होईल. काहीतरी सुधारणा होऊ शकेल.

स्वामीजी,लयीवर गुणगुणत लिहीत जाताना वृत्तदोष राहून जाऊ शकतो, ही एक नैसर्गिक प्रक्रिया असल्यामुळेच त्रुटी रहातात.अर्थात त्यावर आपण पुन; नजर फिरवतोही, पण कधीकधी आपल्याच चुका आपल्याला कळतही नाहीत किंवा आपण त्या विसरून जातो , जसं इथे तुमचं झालं .पण तसं झाल्यास इथे मायबोलीवर इतके चोखंदळ आणि चिकित्सक कवी/वाचक आहेत की तशी ती राहिलीच तर ते निदर्शनास आणून देतात.आणि खरोखरच कौतुक वाटतं.
सासवडच्या संमेलनीय मंचावर तुम्ही आयत्यावेळी ही रचना का वगळली त्याचा या निमित्ताने उलगडा झाला ..

वा !....सहज आविष्कार.

"पाउलवाटा आड मळ्याची
धून सजावी गोड गळ्याची,
मावळतीला सूर्य बुडावा
लाजत हाती हात धरावा.." >>> या ओळी सर्वात विशेष वाटल्या.