निसर्गनाते ㅤㅤㅤㅤㅤㅤ(पादाकुलक)

Submitted by स्वामीजी on 3 August, 2014 - 12:31

नव्हाळ हिरव्या पानावरती
दंवबिन्दूंचे हिरकणगोंदण,
अस्फुट उमलत कळ्या सुगन्धी
पहाटवाऱ्याकडून आंदण..

कविमन बघते रोज अनावर
प्रमुदित होउन निसर्गवाटा,
मन्थन होउन उसळत येती
शब्दसागरा भरती लाटा..

सहजी प्रगटे निसर्गनाते
यात नसे हो प्रयत्न कसला,
आवर्जुनिया बांधिलकीच्या
आवेशाचा विचार कुठला..

अंधाराचा विरून पडदा
उजेड कानी कुजबुज करतो,
विसावलेल्या गात्रांमधला
उरला आळस दूर ढकलतो..

गोड शिरशिरी अंगावरती
हवेत भूपाळी पाझरते,
उरलासुरला आळस झटकत
नव्या दिसाचे स्वागत करते..

भले रोजचा असतो अनुभव
नवीन म्हणुनी काही नसते,
चिरंतनाच्या नवेपणाचे
नित्य नवेसे रूप झळकते..

रोज दिसे ते सजून येते
नूतनतेच्या आभरणाने,
मनास छेडत एक गुदगुली
नवथरतेच्या शृंगाराने..

नाविन्याने रसरसलेल्या
उन्मेषाला मन ओळखते,
नैसर्गिक ही ओढ अनावर
सगळे त्यागुन मन हे थिरते..

याकरता ना शिकवण कसली
आवेशाची वा त्वेषाची,
निसर्गाकडे मन हे धावे
बालकास जणु ओढ कुशीची..

कुणा मनाचे भाव फुलूनी
उत्साहाने फेर नाचती,
पहाटवाऱ्या स्वागतओंजळ
शब्दफुले ती कविता बनती..

- स्वामीजी ७-३-१४

Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वामीजी,
''नव्हाळ हिरव्या पानावरती
दंवबिन्दूंचे हिरकणगोंदण,
अस्फुट उमलत कळ्या सुगन्धी
पहाटवाऱ्याकडून आंदण..''
हिमालयात थाटलेली निसर्गशोभा या शब्दात जिवंत झाली आहे असं मला वाटलं ..
''भले रोजचा असतो अनुभव
नवीन म्हणुनी काही नसते,
चिरंतनाच्या नवेपणाचे
नित्य नवेसे रूप झळकते..''
असं निसर्गानुभवातून परतत्व शोधणं हाही तुमच्या शैलीचा स्थायीभाव.

-हवेत पाझरणारी भूपाळी, कानात कुजबुजणारा उजेड अशा पवित्र , आशादायी प्रेरणा पेरणारी ही कविता खूप आवडली.
पण या निमित्ताने इथे पादाकुलक या तशा प्रचलित मानल्या गेलेल्या मात्रावृत्ताच्या वृत्तलक्षणांचे बारकावेही आमच्या ज्ञानात भर पडण्यासाठी कृपया अवश्य द्यावेत. यात ८+८ =१६ मात्रा असतात इतकेच माहिती आहे .

भारती,
तसं पाहता पादाकुलक मात्रावृत्ताच्या एका चरणात ८+८=१६ मात्रा असतात, यापलीकडे आणखी वेगळं कोणतंही लक्षण सांगितलं गेलेलं नाहीये.... परन्तु एकेका चरणात सोळाच मात्रा असल्याने सामान्यत: फारतर १०-१२ अक्षरे बसू शकतात... अशा या अल्पाक्षरी मात्रावृत्तात लयबद्ध गेयता तर आहेच, पण कमी शब्दात आशय मांडण्याचं मोठं आव्हान रचनाकारासमोर असतं ते वेगळंच ! वृत्ताच्या वृत्तिचा विचार करता विषयांचं फारसं बन्धन आढळत नाही.... कविवर्य मर्ढेकरांचं हे विशेष लाडकं वृत्त होतं, त्यांच्या अधिकांश रचना याच वृत्तातल्या आढळतात. त्यातही....
गणपत वाणी विडी पिताना
चावायाचा नुसतिच काडी,
म्हणायचा अन्‌ मनाशीच की
या जागेवर बांधिन माडी...

किंवा
दणकट दंडस्नायू जैसे
लोखंडाचे वळले नाग
काळ्याकभिन्न मांड्या जैशा
पोलादाचा चिरला साग.....

अशी विलक्षण व्यक्तिचित्रे याच वृत्तातली आहेत. मर्ढेकरांसारख्या सिद्धहस्त कविवर्यांनी आपल्या सगळ्या रचनाधर्मितेची आणि प्रयोगशीलतेची समर्थ अभिव्यक्ति पादाकुलकात केली, यातच या वृत्ताचा आवाका समजण्याजोगा आहे....!