भारतरत्न (?) विराट कोहली (??)

Submitted by अंड्या on 28 February, 2014 - 12:28

मास्टरब्लास्टर सचिनला भारतरत्न दिले गेले तेव्हा सर्वाधिक आनंद होणार्‍यांच्या यादीत मी वरचे नाव राखून होतो. मराठी आणि मुंबईकर या सामाईक फॅक्टरबरोबरच तेंडुलकर आणि साळसकर यावरूनही एक आपलेपणाचा अभिमान होताच. त्या भारतरत्नाच्या मागे राजकारण शोधणार्‍यांनाही चार खडे बोल सुनावून झाले, काय करणार त्यावेळी भावनाच तश्या होत्या. ज्याने गेले वीस-पंचवीस वर्षे एक वेड लावणारा खेळ बघायचा छंद जडवला त्याच्या एक्झिटलाच हे दिले गेले होते. पुढे त्याच्यानंतरही क्रिकेट चालू राहिले, जे राहणारच होते. पण त्यामुळे ना त्याला कोणी विसरले ना विसरू शकणार. भारतरत्नाची हवा मात्र ओसरली, त्यावरचे वाद थंडावले. मध्यंतरी पुन्हा एकदा वॉस्सअपवर एक मेसेज आला. सचिनला भारतरत्न देणे हि सत्ताधार्‍यांची चाल होती हे दाखवून द्यायला म्हणून कोणीतरी नेहमीसारखेच हॉकीचे जादूगर मेजर ध्यानचंद यांच्याशी त्याची तुलना केली होती. मोठा आणि सविस्तर मेसेज होता, ध्यानचंद यांच्याबद्दल चार गोष्टी ज्या या आधी माहीत नव्हत्या त्याही त्यातून समजल्या. साहजिकच अभिमान सुद्धा वाटला. ध्यानचंद यांनाही भारतरत्न दिले पाहिजे होते असे वाटून गेले, मात्र सचिनला डावलून नाही तर सचिनबरोबरच...

असो, ते वाटणे तितक्यापुरतेच राहिले. पण हल्ली मात्र क्रिकेटच्या जगतात एक नवीन युवा खेळाडू उगवला आहे. विराट कोहली. तसा केव्हाचाच उगवला आहे आणि सचिनबरोबर त्याची तुलना सुरू होऊनही फार काळ लोटला आहे. पण आपल्या कामगिरीत सातत्य राखत त्याने ते यश क्षणभराचे नसून तोच आपला क्लास आहे हे आता देशोविदेशांच्या खेळपट्ट्यांवर आणि गोलंदाजांना खेळून सिद्ध केले आहे. सचिनच्या विकेटला जी किंमत प्रतिस्पर्धी संघ आणि भारतीय क्रिकेटप्रेमी द्यायचा तीच आता विराटच्या विकेटलाही देऊ लागला आहे. मागच्याच सामन्यात त्याने आपले एकदिवसीयमधील एकोणीसावे शतक झळकावले. जिथे इतर चाचपडत असतात तिथे हा पट्ठ्या येऊन गली क्रिकेट खेळत असल्यासारखे धावा जमवायला सुरुवात करतो, हे एकदोनदा नाही तर नेहमीच होते आणि इथेच त्याचे वेगळेपण अधोरेखित होते. क्रिकेट हा टेंपरामेंटचा खेळ आहे, दडपणाखाली कोण कसा खेळते याला जास्त महत्व आहे, इथे तुमचे चांगले खेळणे नाही तर मॅचविनर असणे जास्त मॅटर करते वगैरे वगैरे निकषांवर तर तो इतरांच्या आणखी पुढे जाऊन बसतो. त्याची धावांची भूक आणि ते मिळवण्याचा वेग पाहता सचिनचे विक्रम मोडणारा तो एकच आहे आणि तो ते मोडणारच हे सांगायला तुम्हाला नवज्योतसिंग सिद्धू असण्याची गरज नाही. इतकेच नाही तर त्याचा आक्रमक स्वभाव आणि अ‍ॅटीट्यूड पाहता येत्या काळात तो आणखी एका बाबतीत सरस होऊ शकतो जे खुद्द क्रिकेटच्या देवालाही नाही जमले आणि ते म्हणजे एक यशस्वी कर्णधार ..

तर सहज याच पार्श्वभूमीवर एक प्रश्न पडला, आणखी दहा-पंधरा वीस वर्षांनी जेव्हा विराट कोहली जागतिक क्रिकेटमधील एक नवा विक्रमादित्य बनून, एक आणखी उंचावरचे शिखर गाठून निवृत्त होत असेल वा झाला असेल, तेव्हा त्यालाही भारतरत्न पुरस्काराने गौरवताना बघण्याचे भाग्य याची देही याची डोळा आपल्या नशिबी येईल का...
आणि जर विराट कोहलीसारख्यालाही (इथे मी ‘कोहलीसारख्यालाही’ असे का म्हणालो यावर कोणाला संदेह वा कुठल्याही प्रकारचे मतभेद असू नयेत) तर विराट कोहलीसारख्यालाही जर त्याच्या खेळाच्या कामगिरीवरून भारतरत्न दिले जाणार असेल तर भारतरत्नाचे निकष पुन्हा पडताळून पाहायची गरज नाही वाटत...

खेळाच्या मैदानात, क्रिकेट
- रिपोर्टींग अंड्या साळसकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विराट कोहली हा एकच अत्यंत भरवशाचा खेळाडू वाटतो सध्या. आशा आहे की विजय, धवन, रहाणे, पुजारा त्याच्या छायेत मोठे होतील.

प्रत्येक पुढचा सामना, प्रत्येक सत्र, प्रत्येक षटक व प्रत्येक चेंडू यावरच फक्त लक्ष केंद्रीत करावं, हा खेळाडूंसाठी असलेला कानमंत्र प्रेक्षकानाही लागू होत असावा. सध्यां फक्त 'आशिया कप' पहावा, त्याचा आनंद /दु:ख अनुभवावं हें उत्तम ! Wink

लेख आवडला.
मला तर वाटते भारतरत्न हा पुरस्कार फक्त खेळाडू नि चित्रपट क्षेत्रातील लोकांनाच देण्यात यावा.

सन्नी लिऑनने देखील जगभरातील रसिकांना आपल्या कलेद्वारे आनंद दिला आहे.>>+१

उदयन .. बदलून नाही तर आडनाव लाऊन, अंड्या तरी टोपणनाव बोलू शकतो हे तर खरेखुरे आडनाव आहे Happy

सन्नी लिऑनने देखील जगभरातील रसिकांना आपल्या कलेद्वारे आनंद दिला आहे.
>>>>
काय राव, आम्हाला नाही दिला आनंद
(कदाचित आमच्या अपेक्षा जास्त असाव्यात Proud )
असो, विषयांतर नको.

उदयन __ हो रे, अंड्या म्हटले की लोक सिरीअसली नाही घ्यायचे, त्याचे ऑमलेट केले तर घेतील म्हणून हा प्रयोग Happy

विषयावर बोल ना Proud

विषयावर बोल ना >>>>>>> ही रिक्वेस्ट आहे की आदेश यावर अवलंबुन आहे..

आदेश तर मी कुणाचा मानत नाही ....

आणि रिक्वेस्ट मी स्वीकारत नाही Biggrin

असो.........

विराट जो पर्यंत डोके शांत ठेवुन खेळतोय तो पर्यंत माझा सपोर्ट ...... परंतु उगाच अग्रेसिव्हपणा नको तिथे त्याने दाखवु नये.. आता तो १९ वर्षाखालील संघाचा खेळाडु नाही आहे... हे लव्कर त्याने लक्षात घ्यावे ...

मित्रहो, माफ करा, कोहली हा दूरदूरपर्यंत सचिन नाहीये.

तो एकदिवसीय मधील रनमशीन आहे हे मान्य पण कसोटीसाठी लागणारे डिफेन्सिव टेकनिक आणि टेंपरामेंट यात तो कच्चा आहे. खास करून सध्या चालू असलेल्या ईंग्लंड मालिकेत तो जसा कॅज्युअल खेळतोय त्यानुसार त्याला यावर मेहनत करायचीही गरज वाटत नाहीये.

आता त्याच्या दुर्दैवाने कितीही २०-२० आणि आयपीएलचा जमाना आला तरी खरे क्रिकेट हे कसोटी क्रिकेटच गणले जाणार असल्याने तो सचिनची जागा कधीही घेऊ शकणार नाही.

कोहलीला त्याच्या एकदिवसीय पन्नास शतकांसाठी शुभेच्छा !
आभारी आहे,
ऋन्मेऽऽष

ऋन्मेष अरे काय हे.. एका आयडी ने विराट चे कौतुक आणि दुसऱ्या आयडी ने प्रतिवाद?.
>>>>>>

मी माझ्या प्रत्येक आयडीने विराटच्या फलंदाजी कौशल्याचे कौतुक आणि त्याच्या उद्धट उर्मट स्वभावावर टिकाच केली आहे.
जे आवडते ते आवडते, जे खटकते ते नावडते
माणसाने चाहता बनावे, भक्त बनू नये.

आधी होतो
पण आता पासवर्ड विसरलोय