भाग 2. विपश्यना ध्यान शिबिरात भुताटकी ?

Submitted by शशिकांत ओक on 8 July, 2014 - 15:52

भाग २ .
प्रस्तावना
धन्यभागी आहे...
नुकताच कोल्हपुरजवळच्या विपश्यनाध्यान शिबिरात साधना कोर्स करून आलो.
अहोभाग्यम कि मला चिन्मय, माझ्या मुलाने तेथे जायला आग्रह धरला. मित्र व नातलग शरदने मला याबाबत काही माहिती सांगितली. वृद्ध आईने माझ्याप्रकृतीची काळजी नको जरूर जा. असे म्हटले तर पत्निने आनंदाने जायला परवानगी दिली. आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आपल्या प्रोत्साहनामुळे मला ही प्राचीन ध्यानसाधना करता येणे शक्य झाले. पुन्हा एकवार धन्यवाद....

 एत अनुभव शीर्षक.png2. विपश्यना ध्यान शिबिरात भुताटकी ?

आता खात्रीच झाली की आवाजाचा आभास नाहीत... नक्कीच कोणीतरी मदतीची हाक देत आहे....अर्ध्याचड्डीतील साधक एकदम बाहेर आला.... असा काही तीव्र आवाज काढला अन डोळे फाडून पहात जणू काही म्हणाला, 'समझता नहीक्या बे? चल भाग जा!.... सुरवातीला अशी काही माझी बोबडी वळली की काही विचारू नका!.... चोरदरोडेखोरांना देखील शिबिरातून साधना करायला देतात म्हणून ऐकलं होतं.....ही इमारत शेवटची! त्यात माझी खोली शेवटची! नंतरकुंपणापल्याड सर्व जंगल!...त्यात काही डाव होता की काय?....

ती रात्र होती सहाव्या दिवसाची...

साधनेच्या कार्याला आता जारीने सुरवात झाली होती. पुज्य गोएंकांच्याम धुरवाणीतून व साधनेतील खाचा खोचा सांगितल्या जात होत्या.पाली वाणीतून अनेक श्लोक व अभंग सादर ते करत. आता पालीभाषेतील 'अनिच्छ' म्हणजेच 'अनित्य'. 'सव्व' म्हणजे 'सर्व' अशा शब्दांशी जवळीक साधली जात होती. 'क्षणोक्षणी घडून संपणारे हे जग अनित्य आहे. मग सुख व दुःखदेखील असेच अनित्य आहे तर असा अनित्य जीवन प्रवास शरीराद्वारे होतो.त्यातून निघणाऱ्या संवेदना ही अशाच अनित्य आहे याची जाणीव क्षणोक्षणी होऊनकाही केल्या झोप येत नव्हती...
...एरव्ही न सुचणाऱ्या अनेक विचारांचे काहून माजले होते. पहाटे पहाटे जरा झापड आली असावी. इतक्यात... इतक्यात एकदम जोरात ओरडल्याचा आवाज झाला...काय असावे? असे क्षणभर वाटले. पण नंतर सामसूम होती. म्हणून मी जरा साशंकपणे काय झाले असेल कि मलाच आभास झाला असावा असा विचार करत असता, पुन्हा जोरात ओरडल्याचा आवाज झाला. आता खात्रीच झाली की आवाजाचा आभास नाहीत... नक्कीच कोणीतरी मदतीची हाक देत आहे. मी मच्छरदाणीतून बाहेर आलो.बॅटरी हात घेऊन माझ्या खोलीचे दार उघडून बाहेर आलो. खरे तर खोलातील माझ्याबरोबर राहणाऱ्याला ही उठवावे काय असे वाटले पण मौनाचे बंधन होते. मग कशाला उठवा असे मनात म्हणत मी शेजारच्या खोलीच्या पायऱ्या चढून दरवाज्याशी थांबलो. एकदा वाटले की जर कोणी साप किंवा असे काही कॉट खाली लपून जातानापाहून ओरडले असेल तर त्याला मदत हवी पण आवाज केला तर ते पळून जाईल म्हणूनआतला आवाज शांत असावा...
मौनाचा भंग न व्हावा पण मी बाहेर मदतीला आहे असे सूचित करायला मी खाकरून दरवाज्यावर हळूवार टकटक केली व वाट पहात राहिलो. तो एकदम अचानक आतून दरवाजा झटकन उघडला गेला....
कोण? ... कोण आहे?...असे म्हणत तेथील अर्ध्याचड्डीतील साधक एकदम बाहेर आला. बॅटरीच्या प्रकाशात पाहात मला म्हणाला, 'छे!, छे! ' कुठे काय? सर्वठीक आहे!'
तो जागा झाला आहे व घाबरलेला नाही असे पाहून त्याला खालच्या स्वरात मी म्हटले, 'आपल्याला काही आवाज आला का? कारण मला या खोलीतून दोनदा ओरडल्याचा आवाज आला म्हणून विचारायला आलोय'.
'असं? म्हणत आश्चर्य करत मला विचारले,
'किती वाजलेत'? त्याच्या एकंदरीत आवेशावरून कदाचित त्याला वाटले असावे की मी काही कारणाने घाबरून गेल्यामुळे धास्तावल्याने जरा तंद्रीत आहे. मला जरा ताळ्य़ावर आणायला त्याने विचारले असावे. 'किती वाजलं?
चारला काही मिनिटे कमी नसलेल्या घड्याळात पहात मी म्हणता, 'जागे आहेत बर का' याची खात्री वाटून ते म्हणाले, 'बर! बर!'
त्यांनी पटकन दार बंद करायच्या आधी मी त्यांच्या खोलीतील दुसऱ्या साथिदाराच्या कॉटकडे पहात होतो त्यावर ते म्हणाले, 'ते काय झोपलेत ना'
'ठीकआहे' असे म्हणत मी पुन्हा रूमवर आलो व खोलीत येऊन जरा आडवा झालो तोवर...
टंण्ण... टंण्ण.... थाळावर ढोल वाजायला लागले व डोळ्यावरील झापड उतरवत साधकांची हालचाल सगळीकडे व्हायला लागली. 'किण किण... किण किण' ....बारीक आवाजाची घंटा त्या नीरव शांततेत आपले अस्तित्व दाखवून दुर्लक्ष करून पुन्हा जरा पांघरुणात घुसलेल्यांना सताड जागे करायला पुरेशी होती.
तो आवाज व ती घटना मी नंतर विसरलो होतो. पण ते प्रकरण तसे थांबणारे नव्हते! शिवाय मला ही त्या प्रकरणाचा तलास लावायची उत्सुकता होतीच. अगदी परतायच्या एक दिवस आधी एकदम रागावलेल्या स्वरात कोणी बोलतेय की काय असे वाटायला लागले. आता तर दिवसा हा आवाज! तो ही मलाच फक्त येतोय की काय? असे वाटून मी सावधपणे त्यावर लक्ष ठेवायला लागलो. तर तो आवाज वाढतच होता. एकाचे दोन आवाज झालेले... आता दोन आवाज येतायत बापरे ... पण मग आधीचा पहिला आवाज जरा मऊ झालेला आहे, त्याला कारुण्याची झाक आहे असे वाटायला लागले.बुद्धाच्या भूमीतील साधना शिवारातील भुतेपण कारुण्य भावनेने ओथंबलेली असतात की काय असे वाटून मी आश्चर्य करीत होतो व पुज्य सत्यनारायण गोएंकाजींच्या प्रभावी वाणीने भुतांचा स्वरही कातर झाल्याचे वाटून माझा भगवान गौतमबुद्धांबद्दल आदर दुणावला.
आता हे आवाजाचे गूढ मला फार आव्हानात्मक झाले. काय आहे त्याचा साक्षमोक्ष लावलाच पाहिजे असे वाटून मी खोलीच्या बाहेर आलो. अन पहातो तो काय एक पांढऱ्या रंगाचा दांडगा रानबोका आपली शेपटी ताठ करून, त्यावरी सर्व केस फिस्कारून भलताच रोमँटिकमूड मधे होता! उदी रंगाच्या मैत्रिणीशी जवळीक करायच्या बेतात असावा! त्यावेळी मी नेमका पोहोचल्याने त्याने मला पाहून असा काही तीव्र आवाज काढला अन डोळे फाडून पहात जणू काही म्हणाला, 'समझता नही क्या बे? चल भाग जा! असा सल्ला रागीट सुरात देऊन शेपटीचा पिसारा झाडून तिच्या कातर आवाजाला साद द्यायला लागला.
'हा हंतहंत! ... ‘नाही नाही, चालू देत तुमचे!’ असे मी उगीचच पुटपुटत खोलीत वळालो व हसून त्या आवाजाच्या रहस्याचा असा परदाफाश झाला असे म्हणून हवाईदलातील विमाने शत्रुपक्षाच्या नरडीचा घोट घेऊन परतताना जे समाधान व्यक्त करतात तसे उगीचच वाटले खरे....
तरी हे प्रकरण तसे संपलेले नव्हते! कारण ज्याला मी उगीचच तो साधक ओरडला असे वाटून होतो त्याला सत्य परिस्थिती सांगणे महत्वाचे होते. दहावा दिवस झाला तेंव्हा सांगण्यात आले की मौनव्रत आता फक्त शांती पठारावर व शून्यागारातील व धम्महॉल क्रमांक २ मधे लागू राहील अन्यठिकाणी तुम्हाला सकाळी १० नंतर बोलायला परवानगी आहे. दहा वाजले अन सर्वांना कंठ फुटला. मीही घसा साफ करून घेतला. तेवढ्यात शेजारच्या खोलीतील ती व्यक्ती दिसली.पांढरा शर्ट व खाली लेंगा, दहा दिवसाची दाढी वाढलेली जरा गावठीपणाची झाक...हसून त्यांना तो आवाज बोक्यांचा होता असे म्हटल्यावर, 'अस का? बर बर' म्हणून ठंडा प्रतिसाद दिला व ते गेले. त्यानंतर आपापले सामान, सेलफोन, पैसे, पर्सेस, गोळा करायची धांदल झाली नंतर अचानक शेजारच्या खोलीतील त्या ग्रहस्थांच्या बरोबर राहाणाऱ्या व्यक्तिची ओळख झाली.
ते म्हणाले, 'मी आपल्याशी बोलायला आलोय. त्यांनी केलेला खुलासा ऐकून मी थक्क झालो. नंतर विचार करत राहिलो की खरे काय? ...
.... नंतर अकराव्या दिवशी ते,- ज्यांचे नाव पुढे, ‘मी दिलीप आठवले’म्हणून त्यांनी सांगितले,- आणखी एक वयस्कर साधक अन मी, एकाच ट्रेनमधून समोरासमोर बसून गप्पा मारत होतो. त्यावेळी त्यांनी आम्हाला पुन्हा सविस्तर सांगायला सुरवात केली, ते दिलीप आठवले म्हणाले, 'सर, तुम्ही ज्याला पहाटेच्यावेळी काढलेला आवाज बोक्यांचा आवाज होता असे म्हणालात तो बोक्यांचा आवाज नव्हता! तो त्याच साधकाचा - माणसाचा - होता! अहो काय सांगू! मी शिबिरात उशीरा दाखल झालो. तोवर मौनाला सुरवात झाली होती. मला फक्त किल्ली, पाघरुणे व खोली क्रमांक सांगितला गेला. मीही गुपचुप गेले दहा दिवस काढले. पण अहो सुरवातीला अशी काही माझी बोबडी वळली की काही विचारू नका! आधीच विविध प्राण्यांच्या कळपांच्या आवाजांनी मनात धडधड व्हायची! अहो अगदी त्या निरुपद्रवी मोरांच्या केकाटणाऱ्याआवाजान भिती वाटायची राव! अहो पहिले काही दिवस मी या शिबिराला कोसत होतो! नेमके मलाच का या माणसा शेजारी राहायला दिलेगेले? त्यातही ही इमारत शेवटची! त्यात माझी खोली शेवटची! नंतर कुंपणापल्याड सर्व जंगल!'
'त्यात काही डाव होता की काय? त्यात असा सोबतीला दिला गेलेला साधक! चोरदरोडेखोरांना देखील शिबिरातून साधना करायला देतात म्हणून ऐकलं होतं.बहुतेक अशाच कोणा एकाला या कोपऱ्यातल्या खोलीत ठेवलेले असावे असा माझा पक्का संशय झाला होता! त्यांचे नाव मला काल कळले. ते होते शिरोटे म्हणून!'
' पहिल्यादिवशी रात्री झोपल्यावर असे आवाज काढायला लागले! मला आधी कळेना की कोण आवाज काढतय ते! मला पलीकडून आपण ते काढताय की काय असे कधी कधी वाटले!बरं सांगायची सोय नाही! मौनाचा खाक्या! धम्म सेवकांना सांगावे काय वाटून दोन दिवस तग धरली. ते काय आवाज काढतायत ते कळत नसे पण ते ओरडून काही बोलत असावेत!
' मग पुढे मला हळू हळू लक्षात आलं की हा 'उखने उठणे' म्हणजे झोपेत बोलणारे व कधी चालणारे म्हणून जो प्रकार असतो तसा यांचा प्रकार आहे. 'आमच्या गावाकडं आमचं एक पावणं असेच गाव चाव़डीवर जे काही दिवसा घडे ते रात्री झोपेत मोठ्यानी बडब़डत असत. त्यासनी तुम्ही असे का करता आम्हाला भ्यावाटतं म्हणून सांगितलं तर त्यांचा विश्वास बसत नसं. म्या कुठं आसं करतोय ते म्हणत. एकदा ते लग्नाच्यावराडाला मुंबईला गेले तेंव्हा परततना टेंपोवाल्याने रात्री गाडी थांबवली विश्रांतीला, तेवढ्यात हे गुल झाले! पुढे दोन दिवसांनी घरी आले! तसाच यांचा प्रकार असावा असे मला लक्षात आले'.
'मग मी जरा सरावलो. पण तुम्ही ज्या दिवशी बॅटरी घेऊन आलात तेंव्हा मात्र कहर झाला! फारच जोरात ते ओरडले होते! जे आवाज तुम्ही ऐकलेत ते मीहीऐकले! डोक्यावर पांघरुण घेऊन मी डोळे किलकिले ते पहात होतो! तुम्ही आल्या-गेल्याचं, बोलल्याचं मी ऐकत होतो. नंतर तुम्ही बोक्याचे ते आवाज होते म्हणून त्यांना सांगितल्यावर ते बरं बरंम्हणालं ते ही मी ऐकलं. पण खरा प्रकार तो असा होता! '

पुढे चालू भाग ३...

 कोल्हापुर.jpg गोएन्काजी.png

Group content visibility: 
Public - accessible to all site users

विपश्यना ध्यान शिबिराबद्दल ऐकून आहे. ईथे राहून मौन करण्याची ईतकी सवय होऊन जाते की काही गोष्टी आपण विनाकारण बोलत होतो असे वाटायला लागते (त्यावर मला बॉसने सल्ला दिला होता कि तु विपश्यना करायला अजिबात जाऊ नकोस :ड )