विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. सामान्य माहिती भाग 1

Submitted by शशिकांत ओक on 5 April, 2014 - 04:48

You are here
स्वगृह » विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग 1
विपश्यना ध्यान शिबिर धम्मालय, कोल्हापुर. भाग 1
प्रेषक, शशिकांत ओक, Thu, 20/03/2014 - 00:51

1 एत अनुभव शीर्षक.png कोल्हापुर.jpg
कोल्हापुरच्या धम्मालयाचा पॅगोडा

विपश्यना ध्यान शिबिर - सामान्य माहिती

“या धम्मालयाचे आकर्षण होते, सोनेरी कळसाचा पॅगोडा!पॅगोडा म्हणजे काय? त्याच्या आत काय असते? तेथे जायला आम्हाला परवानगी मिळणार का? असा सुरवातीला पडलेला पेच नंतर सुटला, कारण प्रत्येकाने तेथे जाऊन ध्यान करायला सांगितले गेले”...

आचार्य सत्यनारायण गोएन्काजींचे नाव, त्यांच्या मधुर वाणीतील विपश्यनेचे काही विचार दूरदर्शनच्या मुलाखतीतून खूप वर्षांपासून ठाऊक होते. हळु हळू विविध कारणांनी ध्यानधारणा करायसाठी प्रयत्न सुरू झाले. पण बूड 10 मिनिटांपेक्षा स्थिर राहिना. नाडीग्रंथातून म्हटले गेलेले कथन की ‘जीवनात अशी एक वेळ येईल की त्यामुळे आवश्यक साधना न घडण्याने मनाला अस्वस्थता येईल. नाडीग्रंथांच्या संबंधीचे लेखन, चिंतन, वार्ता अनेकदा अशा लोकांच्या समोर जाईल की त्यामुळे नाहक बोल ऐकायला लागतील. त्यासाठी लक्षात ठेवावे की काही लोकांच्या जन्मजात स्वभावातच तो गुण असल्याने जे कर्म तुला प्रेमभाव, आदर, श्रद्धा भाव जागृत करते ते नेमके काहींना निंदा, तिरस्कार वा द्वेष करायला प्रवृत्त करते. तो मनुष्य स्वभाव आहे. प्रमुदितता व कृतज्ञता भाव असेल तर अशा लोकांत सद्भावना जागृत होईल. तेंव्हा मन शांत ठेवावे. अपराधी भावना करायची गरज नाही.’
अशा मनोधारणेत असताना एक दिवस चिरंजीवांनी मला खडसावले, ‘बाबा, बास झाले, लेखन-बिखन. आता साधना केलीत तरच काही अपेक्षित होण्याची शक्यता आहे, नाहीतर पात्रता असूनही संधी गमावल्याची हळहळ राहील. तेंव्हा विपश्यना केंद्रात जायची तयारी करा. शुभ कार्य शीघ्र’.
‘आत्ताच्या आत्ता’ असे पुटपुटत कपडे चढवले व पुण्याच्या विपश्यना केंद्रात दाखल झालो. माहिती घेतली व नेटवरून बुकिंग करून कोल्हापुरजवळच्या धम्मालय केंद्रात 20 जूनला दाखल झालो. हातकणंगले रेल्वे स्टेशनवर आणखी तीन जण भेटले व रिक्षा करून आम्ही 5 किमी लांब वेडीवाकडी वळणे घेत धम्मालयच्या गेटपाशी आलो. एकांनी आपण जरा आधी पोहोचला आहात. लोक दुपारपासून यायला लागतील, तोवर आराम करा म्हणून एक-दोन खोलीनंबर सांगून थांबायची सोय केली. दुपारचे जेवण झाले व जरा डुलकी लागली, तोवर गलका वाढला म्हणून पुन्हा गेटवर आलो. पाहतो तो ही गर्दी...
साधारण 50 - 60 जण पुरुष व 35-40 बायका, विविध वाहनांनी येत होते. रिक्षांची लगबग विशेष होती. अनेक गाड्यातून जीन्स कुडत्यातील तरुण मंडळी उतरत होती तर रिक्षाने पांढरा सदरा, विजार व डोक्याला गांधी
टोपीवाले गावाकडचे लोक पण हजर होत होते. एक फॉरेनर पुरुष चकोट करून आला होता तर एक विदेशी बाई अजागळ कपड्यात वावरताना दिसत होती. होता होता आपापले रूम क्रमांक, पांघरायला रग, आंथरायला चादर व उशीचा अभ्रा असे काखोटीला मारून, मोबाईल, पैसे व अन्य किमती वस्तू जमाकरून आपापल्या रुमकडे जात होते. रात्री 8 नंतर मौनाला प्रारंभ होईल असे सांगण्यात आले. दुसऱ्या दिवशीच्या सूचना मिळाल्या व ती रात्र सरली. पहाटे मोठया परातीवर ठोका पडून होतो तसा आवाज झाला. चार वाजल्याने डोळे किलकिले करून उठायची सुरवात झाली. आता हातात मोबाईल वा घड्याळ नसल्याने वेळ सूचक ठणठणाटाची सवय होणार होती. तोवर आरतीतील घंटी घेऊन इमारतीच्या रस्त्यांवरून, ‘उठा उठा हो सकळिक’ असा किणकिणाट सूचित करत होता. 4:30 झाले व आम्ही धम्मालयातील ध्यानकक्षात प्रवेशलो.

2 विस्तीर्ण ध्यानकक्ष
 ध्यान कक्ष.jpg

साधारण 200 लोक आरामात दाटीवाटीने न करता बसतील असा मोठा प्रशस्त हॉल होता. समोरच्या आसनावर उपधर्माचार्य पांढऱ्याशुभ्र वेषात आसनस्थ झाले. त्यांच्या उजव्या हाताला टेप रेकॉर्डर, लॅपटॉप, रिमोट अन् प्रकाश योजना कमी जास्त करायची बटण लीलया हाती येतील अशा तऱ्हेने ठेवलेली होती.त्यांच्या मागे आणखी एक आसन तयार होते. त्याच बरोबर एक फोल्डिंगस्क्रीन पुज्य कै. गोएन्काजींच्या प्रवचनाच्या व्हीडिओ टेप दाखवायसाठी सज्ज होता. स्त्रिया व पुरुषांच्या बैठकांमधे एक हिरव्या रंगाचे कार्पेट होते. प्रत्येकाला 2’बाय 2’चे गादीवजा बस्कूर, त्यावर एक उशी त्याला एका निळ्या चादरीचे आच्छादन, अशी आसने प्रत्येकाच्या नावासह तयार होती, खोकले, खाकरे, जांभया, चुटक्या वा आळस दर्शक बोटांचे कडा-कडा आवाज निषिद्ध होते.
मौनाशिवाय हालचाली हळुवार व इतरांच्या साधनेत खंड पडू न देण्याच्या दक्षतेची वागणूक अपेक्षित होती.
सुरवातीला नाकातून आत व बाहेर जाणाऱ्या श्वासावर लक्ष द्यायची कला अवगत करायसाठी प्रयत्न करायला सुचना झाली. काहींनी श्वास आला – गेला असा ताल धरला तर काहींनी मनात आवडता जप करायच्या नादावर आपला श्वास नियमित करायला सुरवात केली. पण ते या साधनापथात अपेक्षित नाही. श्वासाचे फक्त आवागमन होत आहे याचा अनुभव घ्यायला अपेक्षित आहे असे सांगितल्यावर आपली साधना फुकट गेली की काय असा भाव मनात आला. त्यावर सांगण्यात आले, असे अनेकदा होईल कारण मनाला अजून वळण नाही. प्रयत्नशील रहा.
असे करता करता सकाळचे साडेसहा झाल्याचे सूचक टोले झाले. उपधर्माचार्यांनी आता नाश्ता करा. नंतर आठला हजर व्हावे अशी सूचना केली. आम्ही जवळ असलेल्या जेवणखाणाच्या हॉलकडे निघालो. तिकडे स्त्रियांसाठी वेगळी सोय होती. प्रत्येकाने आपापली ताट-वाटी-पेला-चमचा आपापल्या क्रमांकाच्या जाळीदार खाने असलेल्या स्टँड मधून काढून रांग लाऊन, आपापले वाढून घेऊन डायनिंग टेबलावर जाऊन, प्लास्टिक खुर्चीत बसून आरामात नाश्त्याचा आस्वाद घ्यायचा होता. सुरवातीला जरा जास्त वाढून घ्यायला वाटे. नंतर नंतर वाटले तर धम्मसेवक आपल्याला हवा तो पदार्थ वाढतील असा शिरस्ता होता. दूध वा चहा असा पर्याय होता. काहींना दोन्हीचा आस्वाद घ्यावासा वाटल्याने दोन वाट्यातून दोन्ही द्रव पदार्थाची त्यांनी चव घेतली! फिरता मेनू होता. कधी उप्पिट वजा सांजा तर कधी विवाहासाठी स्थळ पहायला करतात ते पोहे, कधी गव्हाचेपॉरिज तर कधी इडली-सांभार चटणी, कधी ढोकळा-इमली चटणी असा विविध व चवदार फराळ होता.
आठ ते अकरापर्यंत मांडी घालून ध्यानाला बसायला लागे. रग लागली, कळा यायला लागल्या तर तो ध्यानातील प्रगतीचा भाग असल्याने, शरीराला काय कटकट असा त्रागा करायला जागा नव्हती. शरीराने असे अंगावरील संवेदनांचे जाणणे अनुभवायला तर आलोय असे मनात म्हणून खमाटून बसणे गरजेचे होते. काहींना सवय नव्हती त्यांनी खुर्चीवजा आसनाचा पर्याय निवडला तर कांहींनी पाठीला भिंतीचा आधार शोधला. असो.

पुढे चालू ..पॅगोडा ध्यान पद्धती व अन्य बाजू....भाग 2

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users