११) ऑटीझम व ओसीडी ( ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर)

Submitted by Mother Warrior on 30 June, 2014 - 20:22

autismquote

ऑटीझम कमी की काय म्हणून बर्‍याचदा ऑटीझमबरोबर ओसीडी येतो. माझ्या मुलात बराच काळ असं काही दिसले नाही परंतू गेल्या वर्षभरात हळूहळू ओसीडीने शिरकाव केला आहे.

ओसीडी म्हणजे काय? तर ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह डिसॉर्डर. नाव बोलकं आहे. कुठल्या तरी गोष्टीचे तसेच विचारांचे ऑब्सेशन तर त्या ऑब्सेशनच्या बरोबरीने येणारी एखादी कम्पल्सिव्ह कृती. अगदी क्लासिक उदाहरण म्हणजे, काही लोकांना घराबाहेर पडताना कुलूप लावलं की नाही याची खात्रीच वाटत नाही. त्यामुळे ते सारखे कुलूप लागले ना हे चेक करत राहातात. चुकून कुलूप लागले नाही तर हा विचार ऑब्सेशन व त्या ऑब्सेसिव्ह विचारापाठोपाठ येणारी कम्पल्सिव्ह कृती म्हणजे कुलूप ओढून ओढून पाहणे.

तुम्ही म्हणाल ३ अन ४ वर्षाच्या मुलात काय ओसीडी असणार? तेही ऑटीझम असलेल्या मुलाला? तर असू शकते. आमच्याकडे, मुलाने रात्री नीट झोपण्यासाठी मी रोज एकच टीशर्ट घालावा लागतो. तो शर्ट नसेल तर मुलाला अजिबात सुदींग वाटत नाही, झोपणं तर लांबची गोष्ट. सारखा तोच शर्ट वापरून व धूवून त्याचे अगदी मातेरं-पोतेरं झाले आहे. त्यामुळे मुलाला झोपवले की मी दुसरे कपडे घालते. कधी मुलाने रात्री उठून पाहीले तर तो ठराविक शर्ट दिसेस्तोवर झोपत नाही.
आपण देखील काही गोष्टी नकळतपणे सवयीने करत असतो. परंतू त्याची सवय या मुलाला अशी व इतकी लागेल याची कल्पना मला कधीच नाही आली. मुलाला कारसिटमध्ये बसवताना मी त्याला उजव्या दारातून बसवते. का? माहीत नाही कदाचित मलाही ते सोपे जात असावे. परंतू मुलाला इतकी सवय झाली आहे त्याची, की तो आता डाव्या सईडने बसूच शकत नाही. Sad घराकडे जाताना अमुक एक रस्त्याने जायची इतकी सवय की, कधी चुकून दुसरा रस्ता घेतला की मागून आरडाओरडाअ सुरू होतो. इव्हिनिंग वॉकला रस्ता वेगळा घेतला की तँत्रम्स सुरू होतातच.
मुलाच्या समोर घरातील आर्टवर्क, खोटी झाडे हलवणे , त्यांच्या जागा बदलणे म्हणजे अगदी पाप. जोरजोरात किंचाळत तो त्या वस्तू आधीच जागेवर ठेऊन देईल. बर्‍याचदा त्याच्या वयाला / वजनाला झेपणारे नसते झाड वगैरे. पण इतकी त्याला निकड भासत असते त्या आधीच्या जागांवर वस्तू असण्याची.
चादर विस्कटणे, फरशीवर दुध्/पाणी सांडणे, लॉड्री बॅगचे झाकण नीट लावलेले नसणे, पाण्याच्या जारचे झाकण नीट नसणे या काही अजिबात सहन न होणार्‍या घटना आहेत माझ्या मुलाच्या दृष्टीने.
चित्र काढणे माझ्या मुलाला खूप आवडते. मग तो व्हाईट बोर्ड असो, भिंत असो वा हातपाय. अगदी तल्लिन होऊन चित्रकारी करतो. परंतू २ मिनिटात स्वच्छता मोहीम चालू. व्ह्हाईटबोअर्ड, भिंत हे ठिक आहे. परंतू हात पाय लगेच वेट वाईप्स (स्वतः) आणून पुसायचा प्रयत्न करतो. जमले नाही तर आम्हाला मदत मागतो.
हेच प्रतिबिंब त्याच्या खाण्यातही आले असावे. तो जे ४-५च पदार्थ खातो त्याचे कारण हेच ओसीडी असावे. अमुक एकच पदार्थ, अमुक एकच रस्ता, अमुक एकच पद्धत. अत्यंत रिचुअलिस्टीक वागणं.

हे जर असं त्याच्या मनाप्रमाणे नाही झाले तर टँट्रम्सना सामोरे जावे लागते. ट्रस्ट मी, ऑटीझम मुलाचे टँट्रम्स ही अतिशय सहन न होणारी गोष्ट आहे. आधीच बोलता येत नसल्याने संवाद खुंटला. त्याला काय सांगायचे आहे ते सांगण्यासाठी नुसतेच कर्कश ओरडणे व रडणे हातात उरते. त्याच बरोबर सेन्सरी इंटिग्रेशन इत्यदी मुळे जरा जवळ घेऊन, मिठी मारून समजावायला जावे तर अगदी शक्य नाही. कारण मूल जवळच येत नाही, अंग वेडेवाकडे फेकून द्यायचे, हात पाय झाडायचे.. ओचकारणे,चावणे हे ही होऊ शकते. मग समजवायचे कसे?

उपाय?

मला नक्की ठाऊक नाही. परंतू शक्य आहे तितके टँट्रमच्या रोलर कोस्टर राईडवर जाऊच नये. कारण साईन वेव्हप्रमाणे ती फेज सुरू झाली की पार सगळा डोंगर पार पाडेपर्यंत थांबावे लागते. विशेष काही करणे तेव्हा उपयोगाचे नसतेही.. एक तुम्हाला नक्की करता येईल. डोकं अत्यंत शांत ठेवणे. तितकाच शांत व न्युट्रल आवाज. या दोन गोष्टी इन फॅक्ट स्किल्स डेव्हलप केलेच पाहीजेत. त्याचा वापर करून जरातरी परिस्थिती आटोक्यात आणता येते.
तसेच एबीए थेरपिस्ट फ्लेक्झिबिलिटीवर रोज काम करतात. हळूहळू त्याचा उपयोग होईल.. फ्लेक्झिबल जसा जसा होत जाईल तो तसं तसं ओब्सेशन्स कमी होतीलच. तसेच औषधेही असतीलच यावर. आम्ही अजुन तरी त्या वाटेला गेलो नाही आहोत.
पण सगळ्या सोपं, साइड इफेक्ट्स नसणारं व फुकट एक सोल्युशन आहे. संवाद!
मी बर्याचदा आधीपासून त्याच्याशी बोलत जाते. आता आपण लेफ्टला जाणार इत्यादी. त्याला लेफ्ट राईट कळतं का मला माहीत नाही, पण मी त्याला सांगत असते. माझी खात्री आहे की त्याला सगळंच कळतं. त्यामुळे एकतर्फी का असेना भरपूर संवाद असणे हे गरजेचे आहे. समोरून काहीच न रिस्पॉन्स आल्याने कंटाळून, हळूहळू संवाद बंद होऊ शकतो. माझ्याकडूनही ही चूक सुरवातीला काही महिने होत होती. पण एबीए थेरपिस्टच्या मदतीने मी हळूहळू ती चूक सुधारली. आता मी इतकी बडबड करते माझ्या लेकाबरोबर. तोही कधीतरी जॉइन होईलच की माझ्या या जगावेगळ्या संवादात, या आशेवर... उम्मीदपे दुनिया कायम वगैरे वगैरे.. Happy
http://marathi.journeywithautism.com/

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कठीण आहे खरंच ते टीशर्ट प्रकरण.
तुमचे लेख वाचून जाणवतंय की घरात स्पेशल नीड्सचं मूल असेल तर आयुष्य पूर्ण त्यांच्याकरता वाहिलेलं हवं. अशात आयांना गरज असल्यास नोकरी करता येते का? इथे काही वेळा असंही दिसतं की वडील पिक्चरमध्येच नसतात त्यामुळे अर्थार्जनाकरता आईला बाहेर पडणं गरजेचं असल्यास कसं मॅनेज करत असतील?

तुझं किती कौतुक करावं तितकं थोडंच आहे.
आमच्या मुलांनी एक दिवस चेंगटपणा केला की धरून बदडायची इच्छा होते आणि क्वचित काही वेळा ती अंमलातही येते.
आणि तू वर्षानुवर्षे याला धीराने तोंड देत आहेस.
ग्रेट!

सायो + १. हे म्हणजे एक संपूर्ण वेगळी जीवनशैली समजून घेऊन आत्मसात करण्यासारखं आहे.

आईन्स्टाईन, मोझार्ट, न्युटन वगैरे ऑटिस्टिक होते हे माहित नव्हतं. याबद्दल अजून वाचण्याची इच्छा आहे.

मला नक्की ठाऊक नाही. परंतू शक्य आहे तितके टँट्रमच्या रोलर कोस्टर राईडवर जाऊच नये. कारण साईन वेव्हप्रमाणे ती फेज सुरू झाली की पार सगळा डोंगर पार पाडेपर्यंत थांबावे लागते. >>>>> हे वाक्य अतिशयच चपखल आहे. दहा वाक्यांतून जे समजावून सांगता आलं नसतं ते या एका वाक्यातून अगदी डोळ्यापुढे आलं.

___/\___

आईनस्टाईननन्यूटन हे ऑटीस्टीक नव्हते...त्यांचा या ऑटिझमशी काही संबंध नाही...
ते ऑटीस्टीक होते म्हणजे स्वमग्न रराहायचे... गुंतून राहायचे....इतर ज गापासून वेगळे ...

सायो, साती, मामी धन्यवाद! Happy

विज्ञानदास, मी खूप तपास केला नाही, परंतू तुम्ही जी व्याख्या दिली आहे ती ऑटीझमचीच व्याख्या आहे. आमची मुलं अजुन जरूरीपुरती बोलत नाहीत, व त्यांनी महान लोकांसारखे अजुन काही करून दाखवले नाही इतकेच. Happy

आधी मी तुमच्या लेखाची मालिका आहे हे पाहीलं नव्हतं.शिवाय याआधीही...त्यामुळे झटकन प्रतिसाद दिला गेला.त्यासाठी क्षमस्व...तेव्हा दिवसभर जसा वेळ मिळेल तसे ते लेख वाचले आणि अरे बाप रे,हॅट्स ऑफ किंवा मानलं तुम्हाला असले काही बोलायचं नाही असं ठरवलं.सर्वात जास्त तुमचा नऊ क्रमांकाचा लेख फारच कौतुकास्पद आहे.तो आवडला म्हणणं बरोबर का मला कळत नाही.

वरती मी न्युटन आणि आईन्स्टाईन विषयी जे म्हटलं ते मागे मात्र घेत नाही.कारण ते सत्य आहे.पण लेखमालिका वाचल्यानंतर कुठलंही स्पष्टीकरण द्यावंसं वाटत नाही. कदाचीत तुमच्या मुलास माईल्ड ऑटीझम असू शकेल आणि तसच असावं असं तुमचे लेख वाचल्यावर वाटतं जो या दोघा शास्त्रज्ञांना होता.जाता जाता अ‍ॅस्पर्गस सिंड्रोमबद्दल जरुर वाचा कदाचित तो माहीती असेल आपणास. स्पेक्ट्रम डिसऑर्डर असल्याने लक्षणांचं व्हॅरीएशन असेल.काय म्हणायचंय कळलं असावं.बाकी तुम्ही भारतात नाही आहात हे उत्तम.

तुम्ही चार थेरपीज दिल्या आहेत.याबाबत डायट थेरपीविषयी ऐकलंय का?मॅग्नेशियम असणारे पदार्थ वगैरे. ऑटीझमवर ही थेरपी वापरतात.माझ्याकडून यात काही डिटेल्स मिळाले तर नक्की देतो.पण आता परत सगळं वाचावं लागेल.शिवाय खाली एक साईट देतो तिथे पहा.मी चेक केलेली नाही आहे प्लीज आपणच पहा.कदाचीत ती माहित असावी..
http://www.bostonhigashi.org

achyut.godbole@gmail.com इथे गोडबोलेसरांशी संपर्क साधा.आणखी माहिती मदत मिळू शकेल.

शक्य आहे तितके टँट्रमच्या रोलर कोस्टर राईडवर जाऊच नये. कारण साईन वेव्हप्रमाणे ती फेज सुरू झाली की पार सगळा डोंगर पार पाडेपर्यंत थांबावे लागते >>
फार भावलं हे वाक्य...
माझी लेक प्रचंड हट्टी आणि रागीट आहे आणि माझ्यात patience कमी आहे. पण ही लेखमाला सूरू केल्यापासून माझ्यात पुष्कळ सुधारणा झालीये. तिला न रागावता, न मारता (याआधी क्वचित एखादा फटका द्यायचे patience संपला की) शांततेने समजावून घेते तिला .. तुम्हाला मनापासून धन्यवाद Happy

जे काही तुम्ही करताय ते करायला एखादी ग्रेट व्यक्तीच असायला हवं!

तुम्ही ग्रेट आहात! केवळ ग्रेटच!

खर तुमच्यातल्या पेशन्सला सलाम. उत्तम लेख.

विज्ञानडास या लेखाचा/लेख्मालेचा मूळ उद्देश लक्षात घेतल्यास आपल्या वैज्ञानिक वृत्तीला थोडा आवर घातल्यास चालेल Happy

तुमचे लेख वाचून जाणवतंय की घरात स्पेशल नीड्सचं मूल असेल तर आयुष्य पूर्ण त्यांच्याकरता वाहिलेलं हवं. >> +१.

तुम्हाला मनापासून सलाम.

एवढे सगळे प्रॉब्लेम्स असूनही तुमची अभ्यासू, विश्लेषण बुद्धी वापरुन तुम्ही जी काय सोलूशन्स काढत आहात त्याला सलामच ....

___/\___

आभार सर्वांचे..

सायो, तुमच्या प्रश्नाचे उत्तर राहीले. मी नोकरी करत नाही ह्याबद्दल मी आभारच मानते देवाचे. कारण मी कल्पनाही करू शकय नाही जॉब असताना किती ओढाताण होईल.
कित्येक आयांनी नोकर्या सोडल्या आहेत. मी काहीच करत नाही इतक्या एकसे एक क्रिएटिव्ह व डेडिकेटेड / कमिटेड आया मला भेटल्या वाचनातून. तसेच रिसर्च करणं , पूर्णपणे वाहून घेऊन ऑटीझमवर विचार करणारे बाबालोकं व्हर्चुअल जगात मला कमी आढळले. नोकरी करणं गरजेचे असणार्या तसेच सिंगल मॉम्स बद्दल खरंच वाईट वाटते.

तुम्ही हा रोजरोजचा लढा इतक्या धीराने आणि समजुतदारपणे लढता आहात! हॅट्स ऑफ!
जागृतीचं फार मोठं काम (अवेअरनेस) तुमच्या लेखांतून होतं आहे. त्यासाठी मनापासून धन्यवाद!

माझ्या मुलाच्या बाबतीत पण ओसीडी आढळून येतं बऱ्याचदा.

त्याला long drive ला जायला खूप आवडतं आणि गाडी मध्ये थांबवायची नाही. एका विशीष्ट रस्त्यानेच जायला यायला हवं. जरा रस्ता बदलला की कटकट करतो, गाडी आतून ढकलायचा प्रयत्न करतो असा निषेध करतो आणि बसायची जागा ठरलेली.

त्याच्या बाबाचा आवाज चांगला आहे आणि आमच्याकडे हार्मोनियम आहे तर तो बाबाला पेटी वाजवून गाणी म्हणायला लावतो आणि बाबाने सतत विशिष्ट दोन-तीन गाणीच म्हणायची दुसरी कुठलीही म्हणू देत नाही.

तो मोबाईलवर गाणी ऐकत बसतो. त्याला सुमन, लता, आशा, श्रीधर फडके आणि अरुण दाते ह्यांची भावगीते विशेष आवडतात आणि हिंदीत किशोर कुमारची विशीष्ट गाणी. मोबाईल चालू करता येत नाही त्यामुळे आमची मदत लागते मग स्वतःची स्वतः गाणी बदलता येतात पण त्यात पण असं आहे बाबाने मोबाईल चालू करून दिला की विशीष्ट गाण्याने सुरुवात आणि मी दिला की विशीष्ट गाण्याने सुरुवात करून द्यायची अशी त्याची गणितं ठरलेली.

संवाद हे मात्र कठीण. त्याला बोलता येत नाही आणि एवढं समजतही नाही पण मी सतत संवाद साधायचा प्रयत्न करते पण बऱ्याचदा तो कानावर हात ठेऊन दुसरीकडे निघून जातो.

तुम्ही हा रोजरोजचा लढा इतक्या धीराने आणि समजुतदारपणे लढता आहात! हॅट्स ऑफ!
जागृतीचं फार मोठं काम (अवेअरनेस) तुमच्या लेखांतून होतं आहे. त्यासाठी मनापासून धन्यवाद! >>>> प्रचंड अनुमोदन..

खूप कौतुक आणि मनःपुर्वक शुभेच्छा !
अ बिग हग

थँक्यू व्हेरी मच एव्हरीवन! Happy

विज्ञानदास, तुमचा संपादीत केलेला प्रतिसाद वाचला. स्पेक्ट्रम डिसॉर्डर असल्याने लक्षणे वेगवेगळी असतात हेच खरे. मात्र आमचा मुलगा अ‍ॅस्पर्गर्स मध्ये येत नाही कारण तो अजिबात बोलत नाही (अजुनतरी). अ‍ॅस्पर्गर्समध्ये स्पीच नॉर्मल मुलांसारखेच डेव्हलप होते. कदाचित इकोलालिया(Echolalia) होत असेल. परंतू अजिबात स्पष्ट शब्द न बोलणे हे क्लासिक ऑटीझमचे लक्षण आहे. (ऑटीस्टीक स्पेक्ट्रम डिसॉर्डर). न्यूटन्,आईनस्टाईन इत्यादींबद्दल बोलायचे झाले तर खरंतर माझे स्पष्ट मत आहे प्रत्येक माणूस स्पेक्ट्रमवर असतोच! प्रत्येकात क्वर्क्स असतातच (स्वभावविशेष). थोडं नजरेत भरेल असं वेगळं वागणं असेल तरच ते कळते. आईनस्टाईनना स्पीच डिले होता, तसेच तेव्हाच्या काळच्या मेनस्ट्रीम शाळेत शिकणं त्यांना जड गेलं ( अचाट बुद्धीमत्ता असूनही) . न्यूटन अजिबात कोणाशी, स्मॉल टॉक म्हणतो ते बोलायचाच नाही. किंवा फिजिक्समध्ये , संशोधनात इतकं बुडून जायचे की जेवणाबद्दलही भान नाही इतका एककल्लीपणा ...
ही सगळी ऑटीझम स्पेक्ट्रमचीच लक्षणं आहेत. (तशी नसतील तर त्यांची माफी मागते. )परंतू थोडी जरी सत्यता असेल यात, तर मला त्याचा किती आधार वाटतो हे मी सांगू शकत नाही. ते सोडा, लिव्हिंग एक्झाम्पल आहे - टेंपल ग्रांडीन. या तर नक्कीच ऑटीस्टीक आहेत, फर्स्ट ऑडव्होकेट आहेत त्या ऑटीझम बद्दलच्या. वेगवेगळे टॉक्स, लिखाण हे प्रसिद्ध झाले आहे. शिवाय पीएचडी केली आहे. हे सगळं आत्ताच्या निराशादायी, अजिबात लवकर आउटपुट न दिसणार्‍या काळात - बुडत्याला काडीचा आधार म्हणतात - तसे वाटते मला. कुठेतरी मला आशा दिसते. व ऑटीस्टीक लोकं आयुष्यात खरोखर काहीतरी करून दाखवू शकतात हे पटू लागते. माझ्या मुलात जर ते पोटेंशिअल असेल व ते सहजासहजी वर दिसणार नसेल तर मला प्रयत्न केले पाहीजेत. अ‍ॅटलिस्ट आशावादी तरी राहीले पाहीजे. होप यू अंडरस्टँड धिस..

अंजू, कानावर हात? अगदी हेच करतो माझा मुलगा. Happy मी फार बोलू लागले तर किंवा जरा जास्त एक्साईट होऊन वरच्या पिचमध्ये बोलले तर कानात गच्च बोटं घालतो. सेन्सरी ओव्हरलोड होत असेल. Happy

स्वमग्नता खूप सुरेख लिहिलय. कित्ती माहिती करून घेतली आहे तुम्ही. झोकून दिलय स्वतःला. ग्रेट खरच ग्रेट आहात तुम्ही.
एक शंका म्हणुन विचारते, तुम्ही वरती टँत्रम हा शब्द वापरलाय पण ऑटिझम बाबतीत तो मेल्ट डाऊन ना? कारण टँट्रम म्हणजे पर्टीक्युअलर गोष्टीला मागून रडणे,ती मिळाली कि गप्प बसणे याउलट मेल्ट डाउन मध्ये काहीतरी कारण असलच पाहिजे अस नाही. मुल नो रिझन रडू शकत ,त्यामुळ पॅरेंट्सना तो पिरिअड झाल्याशिवाय काही करताच येत नाही.
जस्ट माहिती साठी विचारल. बहुदा मी चुकीचेपण वाचले असेल.

खुपच छान माहिती. तुमचं कौतुक करावा तितका थोडंच आहे.
अशी मुलं एक्स्ट्रॉ ऑडीनरी असतात. एक उदाहरण माझ्या माहितीत आहे मुलगा प्रचंड हुशार आहे. आई २४ तास त्याच्या बरोबर असते अगदी शाळेतही तिने व्हॉलेन्टरी काम घेतल आहे.

सीमा तुम्ही म्हणता ते बरोबर असावं. खरंतर मला मेल्टडाऊन हा शब्दच नाही आठवला. Happy
आणि तसं बघायला या मुलांना कारणं सांगता येत नाहीत व खूप कारणं असतात पण आपल्याला ती कळतीलच असं नाही. त्या अर्थाने टँट्रम्स बरोबर वाटतो मग. Happy
आम्ही थेरपिस्ट इत्यादींबरोबर चर्चा करताना टँट्रम्सच म्हणतो, त्यामुळे सवय झाली आहे.

अदिती, मलाही व्हॉलेंटियर काम करायचे आहे शाळेत. पण मुलाला माझी आधीच फार सवय आहे ती कमी होऊन सोशल व्हावा आधी असे मला वाटते. मुलं हुषार असतात हे मात्र खरे.