वटपौर्णिमेच्या निमित्ताने

Submitted by मनीमोहोर on 11 June, 2014 - 13:16

उद्या जेष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा. वडाच्या झाडाला भेटण्याचा निदान त्याचे स्मरण करण्याचा दिवस. वडाचा थँक्स गिव्हिंग डे म्हणा ना. नीट डोळसपणे बघितले तर हे असे दिवस आपल्याला निसर्गाजवळ जाण्याची , आपली त्यांच्याप्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतात हे ही तितकेच खरे.

वडाचे झाड माझे खूप आवडते. कुटुंबातील एखाद्या बुजुर्ग सभासदा सारखं, आश्वासक, आधार देणारं वाटत हे झाड मला. खूप मोठा विस्तार, पारब्यांचा पसारा, गर्द सावली, भरभक्क्म खोड, नेहमी त्यावर असलेलं पक्ष्यांच वास्तव्य ह्या मुळे वाटत असेल तसं कदाचित. साधारणतः ह्याचा मोठा वृक्षच असतो. म्हणजे लहान झाड असेल, पण ते मोठं झाल्याशिवाय आपलं त्याकडे लक्ष जात नाही कि काय कोण जाणे. सरळसोट वाढणार्‍या एकांड्या माडापेक्षा माडाचं बन जास्त आवडत मला. पण वडाच तसं नाहिये. एखाद्या उजाड माळरानावर एखादा जरी वड असला तरी तो इतर झाडांची उणीव भरुन काढतो. किंवा प्रवासात असताना भर दुपारच्या वेळी अचानक दुशीकडे मोठे मोठे वड दृष्टीस पडतात आणि दुरुन पाहताना आपल्या स्वागतासाठी त्यानी जणु कमानीच उभारलेल्या आहेत कि काय असं वाटून उगाचचं आपण कोणीतरी मोठे असल्यासारखं वाटतं

मुळात वडाचे झाड वृक्ष ह्या व्याखेत मोडणारे आणि पारंब्यांपासून दुसरं झाड निर्माण होण्याच्या वैशिष्ट्यामुळे ती विस्ताराने खूपच मोठी होतात. मी सर्वात विस्तीर्ण असा पाहिलेला वड म्हणजे पुणे विद्यापीठ परिसरातला. कॉलेजमध्ये असताना काही कामानिमित्त विद्यापीठात जाणं झालं तर तिकडे गेल्याशिवाय रहावायच नाही. एकातून एक इतकी झाड तयार झाली होती की मूळ वृक्ष कोणता ते शोधावच लागे. एक प्रकारचं मेझच बनलं होतं म्हणा ना.

वडाची पान असतात हिरवीगार आणि थोडीशी जाड. त्यांचा आकार म्हणजे अगदी चित्रात पान काढतात तसा. गोलसर आणि थोडसं लांबट आकाराच. मधोमध एक जाड ठळक शिर आणि त्याच्या दोन्ही बाजूला शेवटपर्यंत गेलेल्या जरा कमी ठळक शिरा. गावाला खूप पूर्वी जेव्हा आमच्या कडे ताटं वाट्या नव्हत्या ना तेव्हा वडाच्या पानाचा मुख्य उपयोग म्हणजे पत्रावळी आणि द्रोण लावण्यासाठी. एका हार्‍यात म्हणे पानं आणि चोया ( पानं जोडण्यासाठी लागणार्या काड्या ) ठेवलेल्याचं असत. जरा वेळ मिळाला कि लावा पत्रावळी !! माझे एक चुलत सासरे नेहमी पत्रावळीवरच जेवत असत. ते स्वतःची पत्रावळ स्वतःच लावत. चमच्या ऐवजी वडाच्या पानाच्या कोन करुन साबुदाण्याच्या पापड्या घालतात काही ठिकाणी. त्यांना पानवडया असं म्हणतात.

शिशिरात होते पानगळ वडाची पण इतर झाडां एवढी नाही होत. थोडं हातचं राखूनच गळतात वडाची पानं त्यामुळे वडाच झाड नेहमी हिरव दिसत. कायम सावली देतं. त्यात चैत्र वैशाखात त्याला येतात छोटी छोटी लाल लाल फळं कम फुलं. झाडाच्या मानाने फळांचा आकार अगदीच लहान. हिरवगार झाड आणि लाल लाल फळं !! उगीच नाही बहिणाबाईंनी वडाला पोपटाची उपमा दिलीय.

From mayboli

हे आहे आमचे वडाचे झाड. माझ्या आजे सासर्‍यानी दूर दृष्टीने लावलेले. पत्रावळीच्या पानांसाठी. आम्ही त्या भोवती दगडाचं कुंपण बांधून काढलं आहे. आमच्या गावात तशी वडाची झाड आहेत बरीच पण वडपौर्णिमेला सगळ्याजणी ह्याच वडावर येतात. जेष्ठ महिन्यातली पौर्णिमा, अधून मधून येणार्‍या पावसाच्या हलक्या सरीं, त्यामुळे वातावरणातला थोडा कमी झलेला उष्मा, आकाश तसे ढगाळलेलेच, पावसामुळे ओली झालेली जमीन , त्यातून नुकतेच उगवू लागलेले हिरवे अंकुर, वातावरणात सगळीकडे रानाचा म्हणून एक ओला गंध असतो तो भरुन रहिलेला, शांत वातावरण, अशा वेळी तुम्ही, स्वखुशीने गावाबाहेरच्या वडावर आला आहात. तिथे तुमच्या मैत्रीणी अगोदरच येऊन पोचल्या आहेत , त्यांची चिल्ली पिल्ली ही बरोबर आहेत. आज मुलांना सूर पारंब्या खेळायला मनाई असल्याने मुलं तिथेच काहीतरी पकडापकडी वैगेरे खेळताहेत, मैत्रीणीं बरोबर तुम्ही ही गप्पा मारण्यात दंग आहात, वडाच्याच पानावर एकमेकीना दिलेल्या आंब्यागर्‍यांच्या वाणावर आणि प्रसादावर मुलं ताव मारतायत. एक प्रकारचं गेट टुगेदरच म्हणा ना. मला तरी हे चित्र खूप लोभसवाणं वाटत पण मी आत्तापर्यंत कधीही न अनुभवलेलं. Sad Sad Sad

From mayboli

हे आहे आमचं वडाच बोन्साय. माझ्या आजे सासर्‍यांच्या पणतुने म्हणजे माझ्या पुतण्याने लावलेले. जवळ जवळ वीस बावीस वर्षांचं असेल आता. ह्याला आता पारंब्या ही लागल्या आहेत. मी घरी जाते तेव्हा (आमचं गावाला असलेलं ते घर आणि आमची मुंबई पुण्याची ती बिर्‍हाडं अशी व्याख्या आहे आमच्याकडे) घरच्या माणसांइतकीच आगरातल्या झाडापानांना भेटण्याची ओढ असते मला. त्यामुळे घरातल्यांना भेटुन झालं की लगेचच जाते आगरात फेरफटका मारायला. बच्चेकंपनी असते बरोबर मला अपडेट्स द्यायला. मग का़कू, " चल आपण मध पिऊ या " म्हणून कोरांटीची फुलं चोखून होतात, किंवा " बघ किती छान आहे " म्हणून कच्चा दोडा तुरट पेरू मला खायला दिला जातो किंवा कधी कधी "काकू, तिकडे जाऊ नको, तिकडे मुंग्या आहेत," म्हणुन मला सावध ही केलं जातं. अशा तर्‍हेने फिरत फिरत गप्पा मारत मारत आम्ही ह्या बोन्सायशी येऊन पोहोचतो. त्यावरुन हात फिरवायला खूप छान वाटतं. खोडावरून हात फिरवून त्याच्या बळकटपणाचा अंदाज घेता येतो. त्याच्या थोड्या जाडसर असलेल्या कोवळ्या पानांवरुन हात फिरवताना तर लहान बाळाच्या तळव्यावरुन हात फिरवत असल्यासारखं वाटत. बोन्साय असल्यामुळेच हे शक्य होतं. एरवी वड केवढा आणि आपण केवढे? एखाद्या वर्षी वडपौर्णिमेच्या दिवशी जर खूप पाऊस असेल तर आमच्या घरातल्या बायका आयडिया करतात. हे वडाचं बोन्साय माजघरात आणून वडाची इनडोअर पूजा करतात.

आज वडपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळेच वडाचं आणि एकूणच निसर्गाच संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निश्चय करु या. जाता जाता सगळ्यांना हॅप्पी वडा पाव डे. Happy Happy Happy

नवीन --- ही वडाची लालचुटुक फळं

From mayboli

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहीलय! झाडांविषयीची माया डोकावत्ये वाक्या-वाक्यातून!
आज वडपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळेच वडाचं आणि एकूणच निसर्गाच संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निश्चय करु या. >> हीच खरी वटपौर्णिमा!
सगळ्यांना हॅप्पी वडा पाव डे!

सुंदर लिहिलंय. दरवर्षी त्या वटसावित्रीच्या व्रतावरून येणार्‍या तथाकथित विनोदी लेखांपे़क्षा हा लेख खूप भावणारा आहे. वडाचं बोन्साय आणि इन्डोअर पूजा Proud पण मला वडाचं पिंपळाच्यं आंब्याची माडाची झाडं आसपास असणं हे फार सुखवस्तू जीवन वाटतं.

माझ्या मते, वडाची फांदी विकत घेऊन आणणारे आणि त्याची घरात पूजा करणार्‍या बायांना हा सण समजलेलाच नसतो. अत्यंत विकृत पद्धत आहे ती.

ममो किती छान लिहितेस.. अगदी जीव ओतून म्हणूनच इथपर्यन्त पोचतं तुझं लिखाण..

वाचल्यावरही खूप वेळ गोड गोड वाटत राहातं.. Happy

हेमाताई सुंदर आणि ओघवतं लिहिलंय.

माझ्या सासरच्या गावाला 'माणदेवाचे' (शंकर) देऊळ आहे तिथे देवळाजवळ अशी भरपूर वडाची झाडे आहेत, एकातून दुसरे अशी आहेत. तिकडे गेलं की अगदी वातावरण गूढ वाटते. हा लेख वाचताना मला त्याची आठवण झाली.

खुप छान वाटलं वाचून.
वडाची काही झाडे अगदी लक्षात राहिली आहेत. एक म्हणजे कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळाजवळचे, मालवणला एस्टी थांब्याजवळचे, म्हापसा ते पणजी मार्गात लागणारा "वडाकडे" या स्टॉपवरचे, पर्वरी गावातले... ! कोल्हापूर गावात शिरताना दुतर्फा लागतात ती.. आणि पुर्वीच्या पुणे सातारा मार्गावरची.. पण आता नसलेली !

मनेमोहोर, छान लिहिलेय.

------------------------
>>अत्यंत विकृत पद्धत आहे ती<<
नंदीनी,
विकृत?? अतिशय विचित्र कमेंट आहे.
आता ज्या लोकांना सुखवस्तू जीवन(तुमच्या भाषेत वड, पिंपळ दारात नसणारे) नसेल तर आपल्या भावना व्यक्त करायला जी काही पद्धत आहे ती अवलंबून केली तर चक्क विकृत म्हणणे हा कुठला चांगलेपणा आहे? भावनेच्या आहारी जावून काही गोष्टी दुर्लक्षित होतातच व हानी सुद्धा होते पण ती टाळू शकतो ह्याचा विचार करणे जरूरी आहे हे विसरतात लोकं. व अशी भयानक नावं ठेवली मग ते काय चांगले?

मी झाड तोडण्याचे समर्थन नाही करत आहे. आणि नसेल त्यांची पद्धत बरोबर, होत असेल झाडाची हानी... पण त्यांच्या भावनेला व्यक्त करायला काही वावच नाही व नसेल त्यांचे जीवन सुखवस्तु तर अशी नावं ठेवणं ते हि ह्या भाषेत? .. कठिण आहे.
मुंबई-पुण्यात नसतात अंगणात झाडं व पावलोपावली वड, पिंपळ.. पण विकृत पद्धत आहे तर तुम्ही सांगा मग कुठली चांगली पद्धत आहे हि भावना जपण्याची?

व्यक्तिशः मला ह्या प्रथेत विश्वास नाही, आवडही नाही व करत सुद्धा नाही. पण विकृत वगैरे मी म्हणणार नाही कारण दुसर्‍याच्या भावना आहेत निगडीत. काहीहि अर्थ नसेलही ह्या प्रथेत काळानुसार(असे काहींना वाटु शकते) पण त्या त्या भागात सर्वांनी मिळून एखादे झाडच लावले जमेल तसे जवळच्या बागेत, मिळेल त्या सार्वजनिक जागेत तर चांगला उपक्रम ठरु शकेल ह्या निमित्ताने.
नुसता वडच नाही पण इतरही झाडे सोसयटीत आम्ही लावलेली अश्याच चर्चेने. व म्हटले,आता करा तुमच्या भावना व्यक्त. तशा करतात काही बायका ज्यांचा विश्वास आहे ह्या प्रथेवर आमच्या जुन्या सोसायटीत.

-------------------
मनीमोहोर, सॉरी. पण विकृत हा शब्द एकदमच खटकण्यासारखा वाटला म्हणून हि सरबराई.

मी घरी जाते तेव्हा (आमचं गावाला असलेलं ते घर आणि आमची मुंबई पुण्याची ती बिर्‍हाडं अशी व्याख्या आहे आमच्याकडे) घरच्या माणसांइतकीच आगरातल्या झाडापानांना भेटण्याची ओढ असते मला. >>>>>> ही झाडापानांविषयीची ओढ लेखातून पुरेपूर जाणवत्येय .... Happy

अप्रतिम लेख ....

छान व औचित्यपूर्ण !
<< कुटुंबातील एखाद्या बुजुर्ग सभासदा सारखं, आश्वासक, आधार देणारं वाटत हे झाड >> अगदीम खरंय, वड व पिंपळ यांच्या बाबतीत !
'बोन्साय' छानच आहे.

avatapurnimaa.JPG

<< वडाची काही झाडे अगदी लक्षात राहिली आहेत.>> दिनेशदा, वेंगुर्ल्याजवळच्या दाभोली गांवात [ बहुतेक, खालची दाभोली, भद्रकाली देवळाजवळ ] एक वडाचं एक झाड पाहिलंय; त्याच्या पारंब्यांचा विस्तार इतका प्रचंड आहे व पारंब्यांचीच झालेलीं झाडंच इतकीं आहेत की आपण वडाच्या झाडांच्या जंगलातच शिरल्यासारखं वाटतं.

खूप छान लेख !
माझे सासर पुण्यातलेच , माहेर सुद्धा पुण्यातलेच , अगदी आई चे माहेर पण पुण्यातच , त्यामुळे गाव असे नाहीच . तसे माहेरच्या आधीच्या पिढ्या कोकणातल्या , आज्जीच माहेर पण देवरुख चे पण आता तिथे कोणीच नाही म्हणजे माझा कधीच सबंध आला नाही कोकणाशी . आपल्याला पण एक गाव हवे होते असे नेहेमी वाटते ,ते हि कोकणातले . तुमचा लेख वाचून परत ' गाव नाही ' हे खूपच जाणवल . खरेच तुम्ही खूप भाग्यवान आहात .
अजून असेच लेख येऊ देत .
//नीट डोळसपणे बघितले तर हे असे दिवस आपल्याला निसर्गाजवळ जाण्याची , आपली त्यांच्याप्रति असलेली कृतज्ञता व्यक्त संधी देतात हे ही तितकेच खर//// हे अगदी पटते

धन्यवाद सगळ्यांना. हा लेख टाकताना मी जरा साशंक होते कारण एक तर वट पौर्णिमे कडे हल्ली थोडी विनोदाने किंवा थोड्या वेगळ्या दृष्टीकोनातुन बघितले जाते.
मी काय करते, ऑफिस मध्ये पोचले की दोन मिनिटे स्वस्थ बसते. मग मैत्रीणीना घेऊन मनाने आमच्या वडावर पोचते. कल्पनेतच वरच वातावरण अनुभवते. वडाची मानस पूजा एक प्रकारची. खूप छान वाटतं. ह्या वर्षी तुम्हाला ही सामील करुन घेण्यासाठी हा लेखनप्रपंच.
मला वाटतं वडाच्या चित्राची पूजा करणं हा फांदीची पूजा करण्याला चांगला पर्याय आहे. पण हे हळूहळुच घडेल. समाज मन एका दिवसात बदलत नाही.

दिनेशदा, किती ठिकाणची झाडं लिहिलीत तुम्ही. ग्रेट.

अंजू, खरं आहे तुझं, वडाखाली थोडसं गूढ मला ही वाटत पण तरीही आश्वासक.

भाऊ, नेहमी प्रमाणे व्यंगचित्र फर्मासच.

मस्त आहे लेख...

मला वाटत वडाच्या चित्राची पूजा करण हा फांदीची पूजा करण्याला चांगला पर्याय आहे पण हे हळूहळुच घडेल. समाज मन एका दिवसात बदलत नाही.>>++११

मनीमोहोर, खूप छान लिहिलंय. शिवजयंतीला शिवरायांबद्दल लिहितात तसे वटपौर्णिमेला वडाबद्दल.

मला स्वतःला असे वाटते की वृक्षसंवर्धनाचे महत्व ठसवण्यासाठीच वटपौर्णिमेला वित्रीची आठवण म्हणून वडाची पूजा सांगितली गेली असावी. वडाच्या झाडाची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते तसेच वडाच्या झाडाच्या परिसरात इतर छोटी-मोठी झाडेही पाण्यावाचुन जगतात, कारण वडाच्या मुळांनी धरुन ठेवलेले पाणी, जमिनिची धूप कमी होते, या साठीच तो जोपसला जावा म्हणून त्याची पूजा सांगितली असावी.

तसेच वडाचे झाड जितके वाढते तितके ते जमिनिकडे, जिने जन्म दिला, तिथे झुकत जाते, म्हणजेच निरहंकारी वृत्ती, आपणास जन्माला घातललेल्या माता-पित्यांचे कायम स्मरण ठेवणे, या गोष्टी यातुन दर्शवल्या जात असाव्यात असे मला वाटते.
या साठी वड पूजनीय असावा.

वटपौर्णिमेला आम्बे दान करण्याची पद्धत आहे.
माझ्या लहानपणी ते आम्बे कुणाला देऊ नको, म्हणून मी आई कडे हट्ट करत असे.. Biggrin

मनीमोहोर, लेख आवडला, लिहित रहा Happy

ज्यांना वडाच्या पुजेसाठी वडापर्यंत जायची सवड नाही त्यांनी पूजा करूच नये आणि करायचीच असेल तर त्या झाडाच्या फांद्या तोडण्यापेक्षा चित्रा/फोटोची पूजा करणे नक्कीच श्रेयस्कर.....भोंडल्याला हत्तीचे काढतात तसे चित्र हाताने रेखाटावे....

तोडलेल्या फांदीची पूजा केली तर पाप लागते आणि पापाची फळे, सांप्रत काळी म्हणजे कलीयुगात ह्याच जन्मी भोगायला लागतात हे विसरू नये Wink

हो भाऊ.. गोव्यात बसस्टॉपची नावेच वडाकडे, पिंपळाकडे अशी आहेत. बहुतेक गावात पुर्वी वड असायचाच आणि त्याला छान पारही बांधलेला असायचा. त्याखाली गावकरी, येणारे जाणारे विसाव्याला बसत. ज्योतिषी वगैरेही बसत. एखादी घुमटीही असायची.
झाडावर माकडे, खारी आणि धनेश, कावळे असे अनेक पक्षी असायचे. त्याला फळे लागली तर नुसती झुंबड उडायची पक्ष्यांची. ( हा भूतकाळ नाही... माझ्या आठवणी त्या काळातल्या आहेत. अजूनही वडाच्या झाडावर अशीच झुंबड उडत असेल. )
आफ्रिकेत मात्र वड दिसला नाही पण वडासारखाच विस्तार असणारे एक झाड असते. त्याला पारंब्या नसतात त्यामूळे त्या झाडाखाली शक्यतो गाड्या उभ्या केल्या जातात. एकावेळी आठदहा गाड्या उभ्या करता येतील
एवढा विस्तार असतो.

मस्त लेख! लकी यू Happy

झंपे, अगदीच अनुमोदन!

माझी आई आणि मावश्या हीच 'विकृत' पद्धत वापरतात कारण आमच्या आसपास वडाचं झाड नाही.
ते शोधत फिरण्या एवढा वेळ नसतो कारण पुजा करून ऑफिसला/ शाळेत जायचं असतं....
पण हो! हीच विकृत मंडळी त्या फांद्या आसपासच्या शाळंमध्ये आवारात लावायला नेऊन देतात. मला वाटतं कोणीतरी लावलेल्या वडाच्या झाडाला दोरा गुंडाळण्यापेक्षा बेटर पद्धत आहे ही. आणि शाळांमध्ये लावलेले वड मुलं फार मनापासुन जोपासतात. पुढच्या वर्षी त्या वडाची पुजा करायला जमणार्‍या गर्दीमुळे शाळा डिस्टर्ब होते खरी पण उपाय नाही. तेंव्हा माझी आई आणि मावशी तरी ते करणं टाळतात आणि फांदी घरी घेऊन येतात, पुजतात आणि मग पुन्हा एखाद्या शाळेत, कंपनीच्या आवारात लावण्यासाठी नेऊन देतात

मला आठवतंय लहानपणी आम्ही वटपौर्णिमा याचा अर्थ वडाचं एक झाड लावायचं पण त्याआधी त्याची पुजा करायची (सायकल आणली की वापरण्याआधी त्याची पुजा केली जाते तशी) असाच समजायचो.इतर झाडं लावताना त्यांची पुजा का नाही केली जात याचं उत्तर स्वतःच शोधलं होतं कारण तोदिवस वडाचा हॅपी बड्डे असतो Proud म्हणून त्याचं औक्षण करतात. त्याला नवे कपडे (धागे) घेतात आणि मग त्याला लावतात. Proud

आणि बाकी झाडांचा बड्डे कोणाच्या लक्षात राहीला नाहीये म्हणून त्यांची पुजा केली जात नाही Proud
मी सोसायटीमधल्या चिल्ल्या पिल्ल्यांना गोळा करून असा गुलाब, मोगरा वगैरेचा पण बड्डे साजरा एक्ल्याच आठवतंय Lol

बाकी विकृत शब्द फारच खटकलाय पण असोच!

Pages