वटपौर्णिमेच्या निमित्ताने

Submitted by मनीमोहोर on 11 June, 2014 - 13:16

उद्या जेष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा. वडाच्या झाडाला भेटण्याचा निदान त्याचे स्मरण करण्याचा दिवस. वडाचा थँक्स गिव्हिंग डे म्हणा ना. नीट डोळसपणे बघितले तर हे असे दिवस आपल्याला निसर्गाजवळ जाण्याची , आपली त्यांच्याप्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतात हे ही तितकेच खरे.

वडाचे झाड माझे खूप आवडते. कुटुंबातील एखाद्या बुजुर्ग सभासदा सारखं, आश्वासक, आधार देणारं वाटत हे झाड मला. खूप मोठा विस्तार, पारब्यांचा पसारा, गर्द सावली, भरभक्क्म खोड, नेहमी त्यावर असलेलं पक्ष्यांच वास्तव्य ह्या मुळे वाटत असेल तसं कदाचित. साधारणतः ह्याचा मोठा वृक्षच असतो. म्हणजे लहान झाड असेल, पण ते मोठं झाल्याशिवाय आपलं त्याकडे लक्ष जात नाही कि काय कोण जाणे. सरळसोट वाढणार्‍या एकांड्या माडापेक्षा माडाचं बन जास्त आवडत मला. पण वडाच तसं नाहिये. एखाद्या उजाड माळरानावर एखादा जरी वड असला तरी तो इतर झाडांची उणीव भरुन काढतो. किंवा प्रवासात असताना भर दुपारच्या वेळी अचानक दुशीकडे मोठे मोठे वड दृष्टीस पडतात आणि दुरुन पाहताना आपल्या स्वागतासाठी त्यानी जणु कमानीच उभारलेल्या आहेत कि काय असं वाटून उगाचचं आपण कोणीतरी मोठे असल्यासारखं वाटतं

मुळात वडाचे झाड वृक्ष ह्या व्याखेत मोडणारे आणि पारंब्यांपासून दुसरं झाड निर्माण होण्याच्या वैशिष्ट्यामुळे ती विस्ताराने खूपच मोठी होतात. मी सर्वात विस्तीर्ण असा पाहिलेला वड म्हणजे पुणे विद्यापीठ परिसरातला. कॉलेजमध्ये असताना काही कामानिमित्त विद्यापीठात जाणं झालं तर तिकडे गेल्याशिवाय रहावायच नाही. एकातून एक इतकी झाड तयार झाली होती की मूळ वृक्ष कोणता ते शोधावच लागे. एक प्रकारचं मेझच बनलं होतं म्हणा ना.

वडाची पान असतात हिरवीगार आणि थोडीशी जाड. त्यांचा आकार म्हणजे अगदी चित्रात पान काढतात तसा. गोलसर आणि थोडसं लांबट आकाराच. मधोमध एक जाड ठळक शिर आणि त्याच्या दोन्ही बाजूला शेवटपर्यंत गेलेल्या जरा कमी ठळक शिरा. गावाला खूप पूर्वी जेव्हा आमच्या कडे ताटं वाट्या नव्हत्या ना तेव्हा वडाच्या पानाचा मुख्य उपयोग म्हणजे पत्रावळी आणि द्रोण लावण्यासाठी. एका हार्‍यात म्हणे पानं आणि चोया ( पानं जोडण्यासाठी लागणार्या काड्या ) ठेवलेल्याचं असत. जरा वेळ मिळाला कि लावा पत्रावळी !! माझे एक चुलत सासरे नेहमी पत्रावळीवरच जेवत असत. ते स्वतःची पत्रावळ स्वतःच लावत. चमच्या ऐवजी वडाच्या पानाच्या कोन करुन साबुदाण्याच्या पापड्या घालतात काही ठिकाणी. त्यांना पानवडया असं म्हणतात.

शिशिरात होते पानगळ वडाची पण इतर झाडां एवढी नाही होत. थोडं हातचं राखूनच गळतात वडाची पानं त्यामुळे वडाच झाड नेहमी हिरव दिसत. कायम सावली देतं. त्यात चैत्र वैशाखात त्याला येतात छोटी छोटी लाल लाल फळं कम फुलं. झाडाच्या मानाने फळांचा आकार अगदीच लहान. हिरवगार झाड आणि लाल लाल फळं !! उगीच नाही बहिणाबाईंनी वडाला पोपटाची उपमा दिलीय.

From mayboli

हे आहे आमचे वडाचे झाड. माझ्या आजे सासर्‍यानी दूर दृष्टीने लावलेले. पत्रावळीच्या पानांसाठी. आम्ही त्या भोवती दगडाचं कुंपण बांधून काढलं आहे. आमच्या गावात तशी वडाची झाड आहेत बरीच पण वडपौर्णिमेला सगळ्याजणी ह्याच वडावर येतात. जेष्ठ महिन्यातली पौर्णिमा, अधून मधून येणार्‍या पावसाच्या हलक्या सरीं, त्यामुळे वातावरणातला थोडा कमी झलेला उष्मा, आकाश तसे ढगाळलेलेच, पावसामुळे ओली झालेली जमीन , त्यातून नुकतेच उगवू लागलेले हिरवे अंकुर, वातावरणात सगळीकडे रानाचा म्हणून एक ओला गंध असतो तो भरुन रहिलेला, शांत वातावरण, अशा वेळी तुम्ही, स्वखुशीने गावाबाहेरच्या वडावर आला आहात. तिथे तुमच्या मैत्रीणी अगोदरच येऊन पोचल्या आहेत , त्यांची चिल्ली पिल्ली ही बरोबर आहेत. आज मुलांना सूर पारंब्या खेळायला मनाई असल्याने मुलं तिथेच काहीतरी पकडापकडी वैगेरे खेळताहेत, मैत्रीणीं बरोबर तुम्ही ही गप्पा मारण्यात दंग आहात, वडाच्याच पानावर एकमेकीना दिलेल्या आंब्यागर्‍यांच्या वाणावर आणि प्रसादावर मुलं ताव मारतायत. एक प्रकारचं गेट टुगेदरच म्हणा ना. मला तरी हे चित्र खूप लोभसवाणं वाटत पण मी आत्तापर्यंत कधीही न अनुभवलेलं. Sad Sad Sad

From mayboli

हे आहे आमचं वडाच बोन्साय. माझ्या आजे सासर्‍यांच्या पणतुने म्हणजे माझ्या पुतण्याने लावलेले. जवळ जवळ वीस बावीस वर्षांचं असेल आता. ह्याला आता पारंब्या ही लागल्या आहेत. मी घरी जाते तेव्हा (आमचं गावाला असलेलं ते घर आणि आमची मुंबई पुण्याची ती बिर्‍हाडं अशी व्याख्या आहे आमच्याकडे) घरच्या माणसांइतकीच आगरातल्या झाडापानांना भेटण्याची ओढ असते मला. त्यामुळे घरातल्यांना भेटुन झालं की लगेचच जाते आगरात फेरफटका मारायला. बच्चेकंपनी असते बरोबर मला अपडेट्स द्यायला. मग का़कू, " चल आपण मध पिऊ या " म्हणून कोरांटीची फुलं चोखून होतात, किंवा " बघ किती छान आहे " म्हणून कच्चा दोडा तुरट पेरू मला खायला दिला जातो किंवा कधी कधी "काकू, तिकडे जाऊ नको, तिकडे मुंग्या आहेत," म्हणुन मला सावध ही केलं जातं. अशा तर्‍हेने फिरत फिरत गप्पा मारत मारत आम्ही ह्या बोन्सायशी येऊन पोहोचतो. त्यावरुन हात फिरवायला खूप छान वाटतं. खोडावरून हात फिरवून त्याच्या बळकटपणाचा अंदाज घेता येतो. त्याच्या थोड्या जाडसर असलेल्या कोवळ्या पानांवरुन हात फिरवताना तर लहान बाळाच्या तळव्यावरुन हात फिरवत असल्यासारखं वाटत. बोन्साय असल्यामुळेच हे शक्य होतं. एरवी वड केवढा आणि आपण केवढे? एखाद्या वर्षी वडपौर्णिमेच्या दिवशी जर खूप पाऊस असेल तर आमच्या घरातल्या बायका आयडिया करतात. हे वडाचं बोन्साय माजघरात आणून वडाची इनडोअर पूजा करतात.

आज वडपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळेच वडाचं आणि एकूणच निसर्गाच संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निश्चय करु या. जाता जाता सगळ्यांना हॅप्पी वडा पाव डे. Happy Happy Happy

नवीन --- ही वडाची लालचुटुक फळं

From mayboli

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनीमोहर अगदी नजर लागण्यासारखे देखणे लिहीलय.:स्मित: वडाचा फोटो पण मस्त.

पुण्याजवळ अजून बरीच वडाची झाडे आहेत. रस्ता रुन्दीकरणात ती नष्ट झाली नाही म्हणजे मिळवले.:अरेरे:

गडकरी म्हणजे नेहेमीच पावसाळ्यात ट्रेक करणार्‍या मायबोलीकरानी फिरायला जाताना गडान्वर वा टेकड्यान्वर छोटी रोपे लावली तर खूप उत्तम होईल. ट्रेकात वृक्ष लागवड पण होईल मग पावसाळ्या नन्तर बहर येईल.:स्मित:

//नीट डोळसपणे बघितले तर हे असे दिवस
आपल्याला निसर्गाजवळ जाण्याची ,
आपली त्यांच्याप्रति असलेली कृतज्ञता
व्यक्त संधी देतात हे ही तितकेच खर/ >>>>>> +1

छान लेख

मनीमोहर लेख आवडला. पहिली तीन वाक्य खासच, वडाची मानसपूजा. खूप चाम्गली कल्पना.

आशिका - खूप छान लिहिलस.

रीया - वडाची फांदी लावण्याचं काम खूप चांगलं पण बाकी लोक तसं करत नाहीत. उद्या ह्या सगळ्या घरी पुजलेल्या फांद्या कचर्‍याच्या डब्यात असतात. म्हणून मलाही वाटते फांद्या तोडू नयेत. आणि तोडल्यात तर इथे तिथे टाकू नयेत. सगळ्या झाडांचा बड्डे मस्त कल्पना आहे ग तुझी.

माझ्या घराजवळ एक वडाचं झाड आहे उंच आणि पसरलेलं. असं वाटतं ते झाड एखादा देवदूत आहे आणि आपले दोन्ही हात पसरून सगळ्या छोट्या छोट्या जिवांना एखाद्या आईसारखं हात पसरून आलिंगन देण्यासाठी उचलून घेण्यासाठी तिथे रस्त्यात उभं आहे. मला जेव्हा जेव्हा खूप थकल्यासारखं वाटतं तेव्हा त्याचा मोबाईलमधला फोटो बघत बसते आणि इमॅजिन करते त्या झाडाखाली उभी आहे मी. खूप आवडतं मला ते झाड.

काही असो, सकाळी उजेडात छान छान वाटतं,
रात्री मात्र हेच झाड खुपच भयानक दिसतं...! अन रात्री त्यावर भुतं राहतात असं लहानपणा पासुन ऐकुन आहे. Sad

हेमाताई तिथे खूप वड आहेत, देऊळ आणि तळे आहे, म्हणून गूढ वाटतं पण भीती वाटत नाही, आश्वासक हा तुमचा शब्द करेक्ट आहे, गावाला गेलात की जमलं तर जा आमच्या गावाला तिथे थोटमवाडीत हे माणदेवाचे देऊळ आहे, माझं पण क्वचित जाणे होते तिथे.

भाऊकाका व्यंगचित्र नेहेमीप्रमाणे मस्तच.

रिया, रश्मी , वेल, मस्त लिहिलय तुम्ही. आवडलं

अंजू, खरचं आता गावाला गेले की जाईन माणदेवाला नक्की. आमच्या पासून जवळच तर आहे तुझं गाव

मस्त लेख.
वटपौर्णिमा म्हटले की वर्षानुवर्षे छानपैकी नवारी(?) साडी नेसून, नथ वगैरे घालून हा सण साजरी करणारी माझी आईच डोळ्यासमोर येते.

गेले दोनचार दिवस व्हॉट्सपवर वटपौर्णीमेचे मेसेज फिरताहेत, अर्थात सारेच सो कॉल्ड पीजे कॅटेगरीतले. पहिल्यांदा हसायला येतेही पण दहा ठिकाणी तोच दिसला की....

शेवटी काल संध्याकाळी एका मित्राला वैतागून विचारलेच, काय रे जवळ आलाय का हा सण, जो तो उठसूठ यावरचेच जोक्स पाठवतोय.

तर तो बॅचलर पार्टीवाला म्हणाला, हे तर आता तुम्हालाच माहीत..
अर्थात या सणाची सुट्टी वगैरे नसल्याने मी उठून कॅलेंडर बघायच्या भानगडीत पडलो नाही..

आणि रात्री बारा-साडेबाराच्या सुमारास बायकोचा हॅपी वटपौर्णिमा करणारा मेसेज..

मला म्हणाली, ये उद्या संध्याकाळी..

मला शक्य नसल्याने टाळायला म्हणालो, अग यायलाच पाहिजे असे गरजेचे नसते. ते चाळणीतून चंद्र बघणे, मग नवरा बघणे, मग चक्कर यायच्या जस्ट आधी पाणी पिऊन उपवास सोडणे हे सारे करवा चौथच्या प्रथा झाल्या. वटपौर्णिमेला फक्त वडाची पूजा करणे पुरेसे असते, त्यातच आपला नवरा शोधायचा असतो.. आणि हे चक्क तिला पटलेही.. थँक्स टू वड .. सर्व विवाहीतांना आजच्या दिवसाच्या शुभेच्छा Happy

अवांतर - हा प्रतिसाद टंकताना मध्येच बायकोचा फोन आला, हे सांगायला की केली रे पूजा.. हा वडाचा महिमा, निव्वळ योगायोग की आता पुढचे सात जन्म कन्फर्म झेलायचेच याचा शुभ-अशुभ संकेत. Sad

मस्त लेख. Happy
पुण्याजवळ अजून बरीच वडाची झाडे आहेत. रस्ता रुन्दीकरणात ती नष्ट झाली नाही म्हणजे मिळवले.>>>>>>>>>>>पूर्वी पौडरोडवर पूर्ण रस्त्याच्या कडेला वडाची अनेक झाडे होती. पण रस्ता रुंदीकरणात सगळ्यांची कत्तल झाली. Sad एकाही झाड शिल्लक नाही. Sad

लेख मस्त आहे.

तनिष्क वाल्यानी पिंचिं मधे वडाची पूजा आयोजित केली होती, मला निदान १० वेळ फोन केला या म्हणून (सोने घेतल्याचा परिणाम).

पूजा करतच नाही म्हटल्यावर, या सुटीला काय करता असे विचारले! मी भंजाळलेच.. वटपोर्णिमेची सुटी असते का?
बहुधा अनेक बायका घेत असाव्यात...

शिवाय... पूजा का करत नाही?
मी सांगितले " हा सातव जन्म आहे आमचा एकत्र, पुढच्या जन्मापासून आम्ही सामोपचाराने वेगवेगळा चॉईस करायचे ठरवले आहे..
तनिष्क टेलेकॉलर शॉक्ड्‌!

पुण्यातल्या, फर्ग्युसन कॉलेज रस्ता, सिंहगड रस्ता, विद्यापीठ रस्ता, सगळीकडचीच वडाची झाडं रस्तारुंदीकरणात केव्हाच तोडली गेली आहेत.

माझ्या आठवणीनुसार सगळ्यात जास्त वडाच्या झाडांची तोड, पुण्यात राष्ट्रकूल स्पर्धांच्या तयारीच्या निमित्ताने झाली. दिल्लीतल्या मुख्य स्पर्धेच्या अगोदर दोन वर्षं युवकांची स्पर्धा पुण्यात झाली होती त्यावेळेस... अतीव दु:ख झाले होते मला त्यावेळेस....

ही माझ्याकडची काही, संतोषगड नामक पर्वतीवर जाऊन झाल्यावर (यमाईवाल्या) औन्धाकडे जाताना घेतलेली प्रकाशचित्रे....

254178_1998087666357_6244755_n.jpg247308_1998094706533_463891_n.jpg

वा! मनिमोहोर, मस्त लेख ! तुझ्या लिखाणातील वाचणा-याला खिळवून ठेवण्याची स्टाईल खासच .:)

छान लेख मनीमोहोर!
बाकी बर्‍याच प्रतिक्रिया पण छान. हर्पेन, फोटो मस्त रे! किती देखणी झाडं आहेत!!

<< बहुतेक गावात पुर्वी वड असायचाच आणि त्याला छान पारही बांधलेला असायचा.>> दिनेशदा, खरंय. यावर विचार केला तेंव्हां कित्येक गांवा-शहरातले असे वड- पिंपळ आठवले [ उदा. मालवणच्या टोपीचाला शाळेजवळचा मोठ्ठा गोल पार बांधलेला चौक, परुळ्याच्या बाजारांतला मोक्याच्या जागीं बांधलेला पार इ.इ.]
<< वडाचे झाड माझे खूप आवडते. कुटुंबातील एखाद्या बुजुर्ग सभासदा सारखं >> सहज मनात आलं, मराठीतल्या 'वडील' शब्दाची व्युत्पत्ति 'वडा'शीं तर जोडलेली नाही ना ! Wink

>> माझ्या मते, वडाची फांदी विकत घेऊन आणणारे आणि त्याची घरात पूजा करणार्‍या बायांना हा सण समजलेलाच नसतो. अत्यंत विकृत पद्धत आहे ती.

नंदिनीने ही पद्धत विकृत आहे असं म्हटलं आहे ना? ते करणारे लोक विकृत असं म्हटलं नाहीये ना? त्यात एवढं खटकण्यासारखं काय आहे?

वडाच्या फांद्या तोडून पुजणं काय, आपट्याची पानं ओरबाडून वाटणं काय आणि निर्माल्यविसर्जन किंवा गणेशविसर्जन काय! विकृतीकरण झालंच आहे की या प्रथांचं. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, थर्मोकोल-प्लॅस्टर ऑफ पॅरिससारख्या मटेरिअल्सचा वापर अशी अनेक कारणं आहेत त्याची. मूळ चांगल्या हेतूच्या विरुद्ध आचरण म्हणजे विकृतीकरणच. उगाच डिफेन्सिव्ह होण्यापेक्षा त्यातून काही सकारात्मक मार्ग काढायचा विचार का करू नये?

बाकी फांद्या टोचून वड वाढतो का खरंच? मला काही कल्पना नाही.

नंदिनी, स्वाती_आंबोळे +१

वडाच्या फांद्या तोडून पुजणं काय, आपट्याची पानं ओरबाडून वाटणं काय आणि निर्माल्यविसर्जन किंवा गणेशविसर्जन काय! विकृतीकरण झालंच आहे की या प्रथांचं. >> जोरदार अनुमोदन आणि ती फांदी मिळवण्यासाठी कुठेतरी कोणतेतरी झाड तोडलेले असतेच. दुसर्‍या कोणत्यातरी झाडाच्या बारक्या फांद्या वड म्हणून खपवणारे महाभाग देखील असतात. Happy त्यामुळे अगदी पूजा करायचीच असेल तर फांदीपेक्षा चित्राची बरी.

>>बाकी फांद्या टोचून वड वाढतो का खरंच? >> माझ्यामते नाही लागत असा वड. मुळं थोडीतरी असावी लागतात.
दुसर्‍या दिवशी पूजलेल्या ९९% फांद्या कचर्‍यात असतात.

खूपच छान लेख. आजच्या दिवसाच मह्त्व - वडाची पूजा - पट्वून देणारा लेख. आणखीन अनेक सणावर असेच लेख अपेक्षित. आजच्या पिढीची गरज.

वडाच्या फांद्या तोडून पुजणं काय, आपट्याची पानं ओरबाडून वाटणं काय आणि निर्माल्यविसर्जन किंवा गणेशविसर्जन काय! विकृतीकरण झालंच आहे की या प्रथांचं>>>+१

मला भारतात राहात असताना एवढं स्तोम वाटलं नव्हतं ह्या दिवसाचं/पूजेचं/प्रथेचं. हल्ली हल्लीच वाढलय का?

हवाई मधे maui नावाच्या आयलंडवर एक वडाच झाड आहे. खूप मोठ.. Second largest Banyan Tree in the world. पहिल बहूतेक भारतात आहे. कुठे ते माहित नाही. १८७३ मधे झाड लावल तेंव्हा म्हणे फक्त ८ फुट होत. आता ते ६० फुट उंच आहे आणि २०० फुट एरिआ मधे विस्तारलेले आहे.
banyan tree.jpg

छानच लिहिलं आहे. इथे वडाची महती वाचून असच दिसतं की आपल्या काही काही परंपरांना scientific background किंवा logical background असावी. जी आपल्याला माहीत नसेल. पण इथे सगळ्यांचे विचार वाचून बरीच माहिती मिळते.

चिनार वृक्षाचीपण बरीच महती आहे. काश्मीरमध्ये govtच्या परवानगीशिवाय ही झाडं नष्ट करता येत नाहीत असं तेथे एकाने सांगितलं. खरं खोटं माहित नाही.

इथल्या commentsवरून विचारावस वाटलं की जे x-mas tree घरात आणून x-mas साजरा करतात त्यातले किती सुंदर दिसते म्हणून fresh tree आणतात आणि नंतर १० दिवसांनी कचर्‍यात टाकतात?

लेख आणि लेखाचा उद्देश चांगलाच आहे!!

आर्च, x-mas trees ह्या बहुतांशी farming केलेल्या असतात. कोणी रस्त्यावर आहे म्हणून x-mas tree तोडून आणत नाहीत generally.

पण हे १० दिवसांनंतर कचर्यात टाकण्याचे समर्थन नक्कीच नाहीये!!

बाकी फांद्या टोचून वड वाढतो का खरंच? <<< बहुतेक लागतो, पण त्याची काळ्जी घ्यावी लागते.... इतक्या वर्षामध्ये एवढ्या फांद्या आसपास टोचल्यावर आणि त्यांची झाडं झाल्यावर पूजेसाठी जवळपास एकतरी वड उपलब्ध व्हायला हरकत नसावी. असो!!

ती पद्धत अत्यंत विकृत आहे, आणि ते माझे ठाम मत आहे. बदलणार नाही (रामतीर्थकर टोन) ब द ल णा र ना ही!!

आर्च, कोकणातदेखील आंबे, फणस, काजू, नारळ इत्यादी झाडे तोडायची झाल्यास सरकारी परवानगी लागते. ही झाडे जर लावायची झाली तर सरकारकडून (बहुतेक भाट्ये नारळ संशोधन केंद्रातून) माणसे येऊन झाडांच्या जोपासनेसाठी मदत करतात. औषधे खते वगैरे पुरवले जातात.

फा.न्दी तोडुन ती स्वत: जाउन कुथे लावत असतील आणि त्याची निगाही राखुन नविन व्रुक्ष स.न्पदा तयार होत असेल तर हरकत नाही पण तस बहुधा होत नसावच तस असत वुक्ष लावा, झाड जगवा बॅनर लावत फिरावे लागले नसते.
मला वाटत वटपोर्णिमेनिमित्त पुर्ण परिवारानेच एखादे झाड लावावे( वडाचेच अस नाही) आणि त्याच्या जोपासानेकडे लक्ष द्यावे..
तिच व्रुक्ष सन्पदा पुधच्या ़पिधीला कामास येणार.. बाकि मग उपास ़करायचे का आमरस पुरिचे जेवण करायचे हे ज्याने त्याने ठरवायचे.

बर्‍याच जणांकडे प्लॅस्टिकचा ख्रिसमस ट्री वर्षानुवर्षे तोच लावतात.

जे खरं झाड आणतात ते बहुतेकदा ट्री फार्म मधून आणतात. आमच्या राज्यात न्यु इयर नंतर ते गार्डन डेब्रीज मधे उचलून काम्पोस्ट, बार्क डस्ट इ. करण्यासाठी वापरतात. हॅलोवीनचे भोपळे देखील खत बनवण्याच्या ठिकाणी नेले जातात.

भारतात असे काही सुरु झाले तर चांगलेच आहे. उद्योगीकरण करायला हरकत नाही पण सध्याच्या परिस्थितीत फांदी आणून करणे बरोबर नाही असेच वाटते.

माझ्या लेखाचा उद्देश एक म्हणजे मला वडाचं झाड का प्रिय आहे ते सांगणं. आणि दुसरं म्हणजे आमची दोन झाडं आहेत वडाची गावाला. एक आजे सासर्‍यांनी शंभर पेक्षा अधिक वर्षापूर्वी लावलेलं आणि एक अलीकडे लावलेलं बोन्साय. त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची जवळीक निर्माण झाली आहे त्याच्याशी. जेष्ठ पौर्णिमेला तिकडे असलेलं वातावरण आपल्या बरोबर शेअर करणं आणि मी मनाने त्या दिवशी तिकडे जाऊन जो आनंद घेते त्या आनंदाची अनुभुती आपल्याला ही देण हा आहे.

बाकी त्याची धर्माशी, सौभग्याशी घातली गेलेली सांगड , त्याचं अलीकडच्या काळात बदललेलं स्वरुप या गोष्टी मी जाणीवपूर्वक टाळल्या आहेत असं मला वाटत.

इतक्या सुंदर , उपयोगी झाडाची, जेष्ठातल्या सुंदर वातावरणात पूजा न सांगितली असती आपल्या संस्कृतीत तरचं नवल होतं. !!

मनीमोहोर - तुझ्या लेखावर खरंतर अशा वादाच्या प्रतिक्रिया द्यायच्या नव्हत्या. लेख खरेच उत्तम आहे. त्या कॉमेंट आवडल्या नसतील तर प्लिज सांगा. उडवून टाकेन.

नाही, तसं काही नाहीय धनश्री . प्रतिक्रिया अगदी एका सरळ रेषेत येण अशक्य आहे याची कल्पना आहे मला.
पण आपण ते वातावरण कल्पनेत दोन सेकंद तरी अनुभवाव आणि आनंद घ्यावा म्हणुन हा लेखनप्रपंच. बाकी चर्चा चालु दे. त्यातुन काहीतरी चांगलेच बाहेर येईल.

Pages