वटपौर्णिमेच्या निमित्ताने

Submitted by मनीमोहोर on 11 June, 2014 - 13:16

उद्या जेष्ठ पौर्णिमा म्हणजेच वटपौर्णिमा. वडाच्या झाडाला भेटण्याचा निदान त्याचे स्मरण करण्याचा दिवस. वडाचा थँक्स गिव्हिंग डे म्हणा ना. नीट डोळसपणे बघितले तर हे असे दिवस आपल्याला निसर्गाजवळ जाण्याची , आपली त्यांच्याप्रति असलेली कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी देतात हे ही तितकेच खरे.

वडाचे झाड माझे खूप आवडते. कुटुंबातील एखाद्या बुजुर्ग सभासदा सारखं, आश्वासक, आधार देणारं वाटत हे झाड मला. खूप मोठा विस्तार, पारब्यांचा पसारा, गर्द सावली, भरभक्क्म खोड, नेहमी त्यावर असलेलं पक्ष्यांच वास्तव्य ह्या मुळे वाटत असेल तसं कदाचित. साधारणतः ह्याचा मोठा वृक्षच असतो. म्हणजे लहान झाड असेल, पण ते मोठं झाल्याशिवाय आपलं त्याकडे लक्ष जात नाही कि काय कोण जाणे. सरळसोट वाढणार्‍या एकांड्या माडापेक्षा माडाचं बन जास्त आवडत मला. पण वडाच तसं नाहिये. एखाद्या उजाड माळरानावर एखादा जरी वड असला तरी तो इतर झाडांची उणीव भरुन काढतो. किंवा प्रवासात असताना भर दुपारच्या वेळी अचानक दुशीकडे मोठे मोठे वड दृष्टीस पडतात आणि दुरुन पाहताना आपल्या स्वागतासाठी त्यानी जणु कमानीच उभारलेल्या आहेत कि काय असं वाटून उगाचचं आपण कोणीतरी मोठे असल्यासारखं वाटतं

मुळात वडाचे झाड वृक्ष ह्या व्याखेत मोडणारे आणि पारंब्यांपासून दुसरं झाड निर्माण होण्याच्या वैशिष्ट्यामुळे ती विस्ताराने खूपच मोठी होतात. मी सर्वात विस्तीर्ण असा पाहिलेला वड म्हणजे पुणे विद्यापीठ परिसरातला. कॉलेजमध्ये असताना काही कामानिमित्त विद्यापीठात जाणं झालं तर तिकडे गेल्याशिवाय रहावायच नाही. एकातून एक इतकी झाड तयार झाली होती की मूळ वृक्ष कोणता ते शोधावच लागे. एक प्रकारचं मेझच बनलं होतं म्हणा ना.

वडाची पान असतात हिरवीगार आणि थोडीशी जाड. त्यांचा आकार म्हणजे अगदी चित्रात पान काढतात तसा. गोलसर आणि थोडसं लांबट आकाराच. मधोमध एक जाड ठळक शिर आणि त्याच्या दोन्ही बाजूला शेवटपर्यंत गेलेल्या जरा कमी ठळक शिरा. गावाला खूप पूर्वी जेव्हा आमच्या कडे ताटं वाट्या नव्हत्या ना तेव्हा वडाच्या पानाचा मुख्य उपयोग म्हणजे पत्रावळी आणि द्रोण लावण्यासाठी. एका हार्‍यात म्हणे पानं आणि चोया ( पानं जोडण्यासाठी लागणार्या काड्या ) ठेवलेल्याचं असत. जरा वेळ मिळाला कि लावा पत्रावळी !! माझे एक चुलत सासरे नेहमी पत्रावळीवरच जेवत असत. ते स्वतःची पत्रावळ स्वतःच लावत. चमच्या ऐवजी वडाच्या पानाच्या कोन करुन साबुदाण्याच्या पापड्या घालतात काही ठिकाणी. त्यांना पानवडया असं म्हणतात.

शिशिरात होते पानगळ वडाची पण इतर झाडां एवढी नाही होत. थोडं हातचं राखूनच गळतात वडाची पानं त्यामुळे वडाच झाड नेहमी हिरव दिसत. कायम सावली देतं. त्यात चैत्र वैशाखात त्याला येतात छोटी छोटी लाल लाल फळं कम फुलं. झाडाच्या मानाने फळांचा आकार अगदीच लहान. हिरवगार झाड आणि लाल लाल फळं !! उगीच नाही बहिणाबाईंनी वडाला पोपटाची उपमा दिलीय.

From mayboli

हे आहे आमचे वडाचे झाड. माझ्या आजे सासर्‍यानी दूर दृष्टीने लावलेले. पत्रावळीच्या पानांसाठी. आम्ही त्या भोवती दगडाचं कुंपण बांधून काढलं आहे. आमच्या गावात तशी वडाची झाड आहेत बरीच पण वडपौर्णिमेला सगळ्याजणी ह्याच वडावर येतात. जेष्ठ महिन्यातली पौर्णिमा, अधून मधून येणार्‍या पावसाच्या हलक्या सरीं, त्यामुळे वातावरणातला थोडा कमी झलेला उष्मा, आकाश तसे ढगाळलेलेच, पावसामुळे ओली झालेली जमीन , त्यातून नुकतेच उगवू लागलेले हिरवे अंकुर, वातावरणात सगळीकडे रानाचा म्हणून एक ओला गंध असतो तो भरुन रहिलेला, शांत वातावरण, अशा वेळी तुम्ही, स्वखुशीने गावाबाहेरच्या वडावर आला आहात. तिथे तुमच्या मैत्रीणी अगोदरच येऊन पोचल्या आहेत , त्यांची चिल्ली पिल्ली ही बरोबर आहेत. आज मुलांना सूर पारंब्या खेळायला मनाई असल्याने मुलं तिथेच काहीतरी पकडापकडी वैगेरे खेळताहेत, मैत्रीणीं बरोबर तुम्ही ही गप्पा मारण्यात दंग आहात, वडाच्याच पानावर एकमेकीना दिलेल्या आंब्यागर्‍यांच्या वाणावर आणि प्रसादावर मुलं ताव मारतायत. एक प्रकारचं गेट टुगेदरच म्हणा ना. मला तरी हे चित्र खूप लोभसवाणं वाटत पण मी आत्तापर्यंत कधीही न अनुभवलेलं. Sad Sad Sad

From mayboli

हे आहे आमचं वडाच बोन्साय. माझ्या आजे सासर्‍यांच्या पणतुने म्हणजे माझ्या पुतण्याने लावलेले. जवळ जवळ वीस बावीस वर्षांचं असेल आता. ह्याला आता पारंब्या ही लागल्या आहेत. मी घरी जाते तेव्हा (आमचं गावाला असलेलं ते घर आणि आमची मुंबई पुण्याची ती बिर्‍हाडं अशी व्याख्या आहे आमच्याकडे) घरच्या माणसांइतकीच आगरातल्या झाडापानांना भेटण्याची ओढ असते मला. त्यामुळे घरातल्यांना भेटुन झालं की लगेचच जाते आगरात फेरफटका मारायला. बच्चेकंपनी असते बरोबर मला अपडेट्स द्यायला. मग का़कू, " चल आपण मध पिऊ या " म्हणून कोरांटीची फुलं चोखून होतात, किंवा " बघ किती छान आहे " म्हणून कच्चा दोडा तुरट पेरू मला खायला दिला जातो किंवा कधी कधी "काकू, तिकडे जाऊ नको, तिकडे मुंग्या आहेत," म्हणुन मला सावध ही केलं जातं. अशा तर्‍हेने फिरत फिरत गप्पा मारत मारत आम्ही ह्या बोन्सायशी येऊन पोहोचतो. त्यावरुन हात फिरवायला खूप छान वाटतं. खोडावरून हात फिरवून त्याच्या बळकटपणाचा अंदाज घेता येतो. त्याच्या थोड्या जाडसर असलेल्या कोवळ्या पानांवरुन हात फिरवताना तर लहान बाळाच्या तळव्यावरुन हात फिरवत असल्यासारखं वाटत. बोन्साय असल्यामुळेच हे शक्य होतं. एरवी वड केवढा आणि आपण केवढे? एखाद्या वर्षी वडपौर्णिमेच्या दिवशी जर खूप पाऊस असेल तर आमच्या घरातल्या बायका आयडिया करतात. हे वडाचं बोन्साय माजघरात आणून वडाची इनडोअर पूजा करतात.

आज वडपौर्णिमेच्या दिवशी आपण सगळेच वडाचं आणि एकूणच निसर्गाच संरक्षण आणि संवर्धन करण्याचा निश्चय करु या. जाता जाता सगळ्यांना हॅप्पी वडा पाव डे. Happy Happy Happy

नवीन --- ही वडाची लालचुटुक फळं

From mayboli

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< बाकी चर्चा चालु दे. त्यातुन काहीतरी चांगलेच बाहेर येईल.>> विषय वडाचा - व तोही वटपौर्णिमेला काढलेला- म्हटल्यावर त्याभोवतीं धागा असा गुंडाळला जाणारच ना ! Wink

मनीमोहोर;खूपच उशिरा लिहीते आहे खूप मस्त लिहितेस खूप चर्चा झाली ;पण तुझ्या लिहिण्यात विचार प्रवर्तन वगेरेपेक्षा भावनाना हात घालण्याचं सामर्थ्य नक्कीच आहे ,मी तर जाम खुष तुझ्या लेखावर! पण इतकी चर्चा होणं ही सकस लेखनाची पावतिच! लिखते रहो;प्रतिक्रिया वाचायला झक्कास वाटतंय

आणि ममो;कोकणातला पाऊ स व पावसाळ्यातलं कोकण तुझ्या शब्दातून पोचव आमच्यापर्यंत;आम्हि चिंब होण्याची वाटच बघतोय। आमचा मनमोर नाचुदे त्या पावसात!

मीरा दी, देरसे आए दुरुस्त आए
उशीरा दिला म्हणून काय झालं? तुझा प्रतिसाद मला खूप आवडला. अगदी मनापासून लिहिल्यासारखा.
तुमच्या प्रतिसादामुळे मला खूप उत्साह वाटतो आहे.
मनापासून धन्यवाद

गेल्यावर्षी अष्टविनायक सहलीला गेले होते . तिथे एका वडाच्या झाडाला लाल चुटुक फळे लागली होती. त्याचा फोटो वर देत आहे.

हा लेख मी वाचला का नव्हता माहित नाही. बहुतेक शिर्षकात वटपौर्णिमा आहे म्हणून असेल.
खूप मस्त लिहिलं आहे. मनीमोहोर, तुमचे कोकणातले लेख वाचायला एकदम मस्त वाटतं.

धन्स सायली सायो.
तुमचे कोकणातले लेख वाचायला एकदम मस्त वाटतं.>>> कोकण आहेच सुंदर !!

छान लेख.

अजुन हिरवी नसलेली ( म्हणजे जुनी ) फांदी टोचुन वड वाढतो. कुंडीत लावला खुप हळुहळू वाढतो पण वाढतो. माझ्याकडे एक बोन्साय आहे तीन वर्षाचं. ते असे फांदीपासुन केले आहे. ( कॉपर वायर्स वगैरे लावत नाही, नुसते कुंडीत लावुन छाटत रहाते) या बोन्सायची छाटलेली फांदी पुन्हा लावली आहे कुंडीत , तीही जगली आहे. तीला योग्य जागा शोधतेय. Happy

खूपच सुंदर लेख आणि प्रतिक्रिया पण.
व्यक्ती तीतक्या प्रकृत्ती - प्रत्येकाचे विचार वेगळे,
मी पण केली काल वाडा पूजा, पण गेल्याच वर्षी कुंडीत छोटं वडाच रोप लावलाय त्याची, फांदी आणून त्याची पूजा केली होती गेल्या वर्षी नाही आवडल, पटल नाही मनाला ज्याची पूजा करायची त्यालाच त्रास द्यायचा, मग कुंडीतच लावला रोपट , पळसाची पान येतात हार फुलं बांधून रोज त्यावरच वाण पण पुजला, पान तोडायची गरज नाही पडली.
पर्यावरणाची काळजी आपण घेतली तरच तो पण आपली काळजी घेईल. :आदरमो::

मुंबईत केम्प्स कॉर्नर,(मलबार हिल) येथे डुंगरवाडी म्हणून एक ठिकाण आहे. तिथे पारशांचा शवमनोरा (टॉवर ऑव्ह साय्लेन्स) आहे. त्याच्याच जवळपास वडाचे एक दाट बन आहे. मुख्य झाड कोणते आणि पारंब्यांची बनलेली झाडे कोणती ते अजिबात ओळखू न येण्याइतके हे वृक्ष वाढले आहेत. इथे सहसा प्रवेश नसतो. पण एखादा प्रसिद्ध वनस्पतितज्ज्ञ बरोबर असेल तर तो घेऊन जातो. त्याचे नेहमी जाणेयेणे असल्यामुळे आजूबाजूचे लोक अटकाव करीत नाहीत. मुंबई विद्यापीठाच्या बहि:शाल विभागातून वृक्षनिरीक्षणाच्या सहली असतात. त्याद्वारे हे ठिकाण पाहायला मिळते.
पुण्यात सूस रोड जिथे एन एच ४ बायपासला मिळतो तेथे उड्डाणपुलानजीकच सात आठ वर्षांपूर्वी वडाची दहापंधरा रोपे लावली होती. आता तिथे छोटेसेच पण छान बन तयार झाले आहे.
भारतातला सगळ्यात मोठा वटविस्तार मला वाटते कलकत्त्याच्या वनस्पतिउद्यानात होता. अजूनही असेल.
कोल्हापुरात ताराराणी विद्यापीठात अशी मोठमोठ्या पारंब्यांची झाडे खूप वर्षांपूर्वी पाहिली होती. आता काय परिस्थिती आहे माहीत नाही.

Aarchimay, अशीच बेसुमार कत्तल आंबा आणि आपट्याच्या झाडांची होते. आपट्याच्या जागी अलीकडे कांचनाची पानेही पाहिली. आपटा निदान एकाच सणाला-दसर्‍याला तोडला जातो. आंबा मात्र गुढीपाडवा, गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळीचे तीनही दिवस असा सररास तोडला जातो. दिवाळीच्या दिवसांत नुकता कुठे मोहर येऊ लागलेला असतो. पण त्याची कत्तल होतेच. हे शहरीकरणाचे-महानगरीकरणाचे तोटे आहेत. गावाकडे पन्नास घरांसाठी तोडल्या जाणार्‍या टहाळ्या भरून काढण्यासाठी आणि नंतरचा कचरा रिचवून घेण्यासाठी आजूबाजूचे पर्यावरण समर्थ असते. शहरात मात्र लहान जागेत टनांनी कचरा निर्माण होतो. ट्रक भरभरून टहाळ्या आणल्या जातात. त्यातल्या थोड्या खपतात. उरलेला ढीग दुसर्‍या दिवशी महानगरपालिकेच्या कचरागाडीत जातो. उरलेल्या सर्व ढिगाची किंमत या थोड्या खपामधून वसूल करायची असल्यामुळे आपल्यालाही आपट्याच्या टहाळ्यांची मोठी जुडी गरज नसताना घ्यावी लागते आणि तीही जास्त किंमतीत. गौरी, गणपती, हरताळका, नागपंचमी, मार्गशीर्ष गुरुवार या सणांना लागणार्‍या पत्रीसाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात रानझुडुपे तोडली जातात. इतकी की आता आघाडा वगैरे शहरांच्या सीमेवर दिसतच नाही. तेरड्यासारख्या काही वनस्पतींचा अर्धनागरी भागातून वंशछेद झाला आहे. नागकांडी(अग्निशिखा) वगैरे ठाणे-रायगड भागात विपुल होती. आता ती शोधावी लागते. ही सर्व रानफुले सप्टेंबर मध्ये फुलणार असतात. काही फुललेली असतात. अशावेळी बीजप्रसार होण्याआधीच ती तोडली जातात.
आता उच्चवर्गामध्ये (फक्त मराठी) बर्‍याच प्रमाणात जागृती झाली आहे पण बहुजनसमाजामध्ये मात्र हे सणावाराचे म्हणजे समारंभाने सण साजरे करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. प्रबोधन उलट दिशेने होते आहे.

धागा मीच वर काढतेय.
वाचा आणि अनुभवा ही अनोखी आभासी वटपौर्णिमा ☺

माझ्या माहितीप्रमाणे वडाच्या झाडातून मिळणाऱ्या ऑक्सिजनचा लाभ बायकांना मिळावा व या सणाच्या निमित्ताने त्यांना घराबाहेर पडता यावे म्हणून वटपौर्णिमा साजरी केली जाते.

चित्राची किंवा तोडलेल्या फांदीची पूजा करून ही ऑक्सिजनवाली गरज / हेतू पूर्ण होत नाही. त्यामुळे वड नसेलच तर जवळपास जे कुठले मोठे देशी झाड असेल त्याच्या सानिध्यात थोड्या वेळ जावे. त्याला जमल्यास लोटीभर (ऑफिसच्या वाटेवर असेल तर बाटलीभर) पाणी घालावे. आणि इच्छा असल्यास नमस्कार करावा. काही नाही तर तिथला ऑक्सिजन श्वासात भरून घ्यावा आणि निघावे.

IMG_20200605_105952-1203x1606.jpg

हा वड माझ्याच वयाचा आहे. एका दगडी बांधात उगवलेलं छोटंसं रोप बाबा घरी घेऊन आले होते. त्याचा बोन्साय करून आज हे झाड जवळजवळ ३० वर्षे आमच्याकडे आहे. काही लोकांच्या मते बोन्साय करणे म्हणजे झाडाची वाढ खु़ंटवणे....in short खुप मोठं पाप. पण दरवर्षी झाडाच्या फांद्या ओरबाडून आणून त्यांची पूजा करण्यापेक्षा हे रास्त वाटतं आम्हाला. शिवाय आता हे फक्त झाड नाहीये...फॅमिली मेंबरच आहे नाही का.

सुंदर लेख, मद्रास म्हणजे आत्ताच्या चेन्नईमध्ये अडयार या भागात चारशे वर्षंपूर्वीचं वडाचे झाड अजून उभं आहे,त्याच्या पारंब्या आत रुजून अनेक झाडं झाली आहेत. त्याची आठवण झाली

आज कायप्पावर मैत्रिणीने,तिने पूजा केलेल्याचा फोटो पाठवला.५ फळांच्या जागी ५ फळांच्या फ्लेवरची पेपरमिटे! असले काही करण्यापेक्षा थंड बसा ना!

मला असे वाटते की झाडाच्या फान्द्या तोडून आणून किंवा अगदी गडबड असताना देखिल कसे बसे जमवून वडाच्या झाडाची पुजा करण्यापेक्षा दिवाळीला नवर्‍याला औक्षण केले जाते, राखी पौर्णीमेला भावाच्या हातावर एक नाजूक धागा बांधून हा सण साजरा केला जातो तसेच वट्पौर्णीमेलाही करावे. नवर्‍याला औक्षण करून त्याच्या बरोबर सात जन्म हवे म्हणून एक छान रेशमी धागा त्याच्या मनगटावर बांधावा आणी वट्पौर्णीमा साजरी करावी.
वडाच्या झाडाला बायका ईतके दिवे लावतात की त्यामुळे अनेकदा झाडाला आग लागल्याच्या बातम्या वाचल्या आहेत. सर्वच जणी तोडून आणलेल्या फांन्द्या कुंडीत लावून त्यांचे जतन करत नाहित. जागे अभावी अथवा फांदी जळून गेल्या मुळे त्याचे नुकसानच होते.

वर एका प्रतिसादात लिहिले आहे की यातून ऑक्सिजन मिळते म्हनून हा पायंडा पडला असावा. परंतु यात आता बदल करणे आवश्यक आहे. त्या करिता वेगवेगळ्या गोष्टी माणसे करू शकतात.

अजुनही करोना नाहिसा झाला नसताना आणि बायकांनी बाहेर पडून वट्पौर्णीमेनिमित्त गर्दी करू नये असे सांगितलेले असताना देखिल काही जणींनी थाटात पुजा केलेले आपले फोटो व्हॉट्सअप वर बघितले आणी वाईट वाटले.

चित्राची किंवा तोडलेल्या फांदीची पूजा करून ही ऑक्सिजनवाली गरज / हेतू पूर्ण होत नाही. त्यामुळे वड नसेलच तर जवळपास जे कुठले मोठे देशी झाड असेल त्याच्या सानिध्यात थोड्या वेळ जावे. त्याला जमल्यास लोटीभर (ऑफिसच्या वाटेवर असेल तर बाटलीभर) पाणी घालावे. आणि इच्छा असल्यास नमस्कार करावा. काही नाही तर तिथला ऑक्सिजन श्वासात भरून घ्यावा आणि निघावे.
>>> पियू : अतिशय उत्तम विचार.

दरवर्षी झाडाच्या फांद्या ओरबाडून आणून त्यांची पूजा करण्यापेक्षा हे रास्त वाटतं आम्हाला. शिवाय आता हे फक्त झाड नाहीये...फॅमिली मेंबरच आहे नाही का.
>>>मी चिन्मयी : फॅमिली मेंबर झाडाची कल्पना आवडली.

अजुनही करोना नाहिसा झाला नसताना आणि बायकांनी बाहेर पडून वट्पौर्णीमेनिमित्त गर्दी करू नये असे सांगितलेले असताना देखिल काही जणींनी थाटात पुजा केलेले आपले फोटो व्हॉट्सअप वर बघितले आणी वाईट वाटले.
>>> अतिशय खरं. सणासुदीचा उद्देश जनरली आपल्या शारिरीक, मानसिक, कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्याची जोपासना करण्याचा असतो. यापैकी एकही घटक धोक्यात आणून साजरा केलेला सण म्हणजे मूळ उद्देशाची अवहेलनाच.

"सणासुदीचा उद्देश जनरली आपल्या शारिरीक, मानसिक, कौटुंबिक व सामाजिक स्वास्थ्याची जोपासना करण्याचा असतो. यापैकी एकही घटक धोक्यात आणून साजरा केलेला सण म्हणजे मूळ उद्देशाची अवहेलनाच"
हे अगदी बोधवाक्य किंवा ब्रीदवाक्य व्हायला हवं प्रत्येकाचं.
आणि अलीकडे नोकरी किंवा रोजगारानिमित्त्य बाहेर जाणाऱ्या स्त्रीपुरुषांची मानसिक चिडचीड आणि मानसिक दमछाकही होते हे सगळं यथास्थित साजरं करताना. शारीरिक होते ती वेगळीच.
साधं नैवेद्याचं पंचामृत संपवायचाही प्रश्न पडतो. दुधात मध नको, तूप नको, दही नको वगैरे बालहट्ट असतात. गाईचं, कावळ्याचं पान कुणाला द्यायचं, कुठे ठेवायचं वगैरे किरकोळ प्रश्न अधिक सतावतात. सकाळच्या रोजच्या घाईत ही अधिकची भर.

सगळेच प्रतिसाद पर्यावरण रक्षणाला पूरक आणि वेगळा विचार देणारे...

चिन्मयी, बोन्साय आणि पूजा दोन्ही खूप छान. एकदम प्रसन्न वाटलं पूजा बघून.

एवढया प्रतिसादात एक ही पूजेचा फोटो नव्हता ती उणीव भरून निघाली

आमच्या ठाण्याच्या फ्लॅटच्या एवढ्याश्या बाल्कनीत एकच गोकर्णाच्या वेलाची कुंडी आहे. बाल्कनीला बर्ड नेट आहे पण कबूतरं ते उचकटून उचकटून कधीतरी बाल्कनीत येतात. तर काही दिवसांपूर्वी त्या कुंडीत कबुतरांच्या विष्ठेतून (हा माझा अंदाज ) वडाच बी रुजलंय. वाढ स्लो आहे पण खोड मजबूत झालय आणि पानं ही मोठी मोठी आणि तजेलदार आहेत. दोन पानं पिवळी होऊन गळून ही पडली. असो . हा वड बघायला मस्तच वाटत आहे. थोडा मोठा झाला की एखाद्या ngo ला द्यायचा विचार आहे.इथे नोंदवून ठेवत आहे एवढंच.

हा फोटो

20230711_115105~2.jpg

एक सांगावंसं वाटतं की वड पिंपळासारखे मोठे वृक्ष दाटीवाटीची वसती असलेल्या शहरांमध्ये लावूच नयेत. त्यांची मुले खूप दणकट असतात. आजूबाजूची घरे, कुंपणे, चौथरे, रस्ते, कठडे अशा सिमेंटच्या बांधकामांमध्ये घुसून/ रुजून त्यांना तडे पाडतात. plumbing lines, drainage च्या टाक्या, गटारे ह्यांची मोड तोड होते. हे धार्मिक महत्त्वाचे वृक्ष तोडायला बाहेरचे सोडा, नगरपालिकेचे मजूरसुद्धा तयार नसतात. आमच्या परिसरात एक मोठ्ठे पिंपळाचे झाड आहे. त्याच्या पिंपळफळांच्या बिया drainage pipes वर रुजून तीस चाळीस फूट आत जातात. lines तुंबतात.
मोकळ्या मैदानात किंवा गावाबाहेर लावावीत ही झाडे. वरती एका प्रतिसादात मी सूस रोड पुणे इथल्या वडाच्या बनाचा उल्लेख केला होता. त्यांची मुळे लगतच्याच हाय वे वरच्या पुलाच्या बांधकामात शिरू लागलेली दिसत होती. तीन चार वर्षांपूर्वी तो पूल कदाचित सदोष बांधकामामुळे, कोसळला. पण मला वाटते, त्या घुसखोर मुळांचाही त्यात हात असावा. असो.

हीरा , छान पोस्ट.
म्हणूनच ह्या क्षेत्रात काम करणाऱ्या एखाद्या ngo ला ते द्यायचा विचार केला आहे.

Pages