तीन तिघाडा

Submitted by ललिता-प्रीति on 29 May, 2014 - 02:34

वैभवी आणि मुक्ताची मैत्री झाली हे एक आश्चर्यच होतं. मुळात, त्यांच्या ओळखीला मैत्री म्हणणं हेच एक आश्चर्य होतं. पण इतरांना त्याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. इतरांच्या मते त्या दोघी पंचवीस वर्षांपूर्वीपासूनच्या मैत्रिणी होत्या.
समोरच्या व्यक्तीशी आपल्या आवडी-निवडी जुळणं, सूर जुळणं, त्या व्यक्तीपाशी आपलं मन मोकळं करावंसं वाटणं, त्या व्यक्तीकडेही आपल्यासाठी वेळ असणं, आपल्या एका हाकेसरशी त्या व्यक्तीचं आपल्याला सर्वतोपरी मदत करायला तयार असणं यालाच मैत्री म्हणत असतील, तर मग मुक्ता आणि वैभवीनं हे सग्गळं केलं होतं... तब्बल तीन महिने, कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला असताना. तेवढ्या तुटपुंज्या भांडवलावर त्या एकमेकींच्या मैत्रिणी बनल्या. म्हणजे इतरांनी त्यांना एकमेकींच्या मैत्रिणी बनवलं. कधी कुणी हे विचारायच्या फंदात पडलंच नाही, की बाबा, ही अशी अशी वैभवी म्हणून मुलगी आहे, ती तुला मैत्रीण म्हणून पसंत आहे का? किंवा, मुक्तासारख्या मुलीची तू मैत्रीण म्हणून निवड केलीयेस, पण हा तुझा निर्णय पूर्ण विचारांती घेतला गेलेला आहे का? पण मैत्रीत हे पसंती किंवा पूर्ण विचारांती असं काही नसतंच. मैत्री ही मैत्री असते; ती होते किंवा होत नाही; एकदा झाली, की सहसा मोडत नाही; मोडली, तर खुशाल असं समजावं, की मुळात ते नातं मैत्रीच्या योग्यतेचंच नव्हतं. या दोघींची मैत्री "झाली" आणि "मोडली" या दोहोंच्या अधेमधे कुठेतरी लटकणारी होती. पण या विश्लेषणाशीही इतरांना काही देणंघेणं नसावं. नाहीतर, रि-युनियनच्या पार्टीत सूत्रसंचालन करणार्‍या विनय काटदरेनं "आपल्या बॅचची एक फेमस जोडी" असं म्हणून दोघींना एकत्रच स्टेजवर कशाला बोलावलं असतं?
मुक्ता तर विनय काटदरेचं नावही विसरून गेली होती. चेहरा अंधूक आठवत होता. पार्टीच्या ठिकाणी सकाळी आल्या आल्या तो समोर दिसल्यावर तिच्या डोळ्यांसमोर ‘त्याचं नाव’ म्हणून काही अक्षरं नाचून गेली, म्हणा. पण तरीही तिला पक्कं आठवत नव्हतं. विनय काटदरेच कशाला, तिला वैभवीलाही ओळखायला वेळच लागला थोडा!
तरीही त्या दोघी, इतरांच्या मते, मैत्रिणी होत्या; त्यांची जोडी "फेमस" होती.
असेल बुवा...
आधीची विशेष ओळख नसताना तेव्हा, म्हणजे कॉलेजच्या दुसर्‍या वर्षाला असताना, मुक्ताच्या एका विनंतीवरून वैभवी तिच्या एकांकितेत तिला मदत करायला तयार झाली, त्यामुळे असेल;
किंवा त्यानंतर पुढचे तीन महिने त्या कामापायी दोघी सतत एकमेकींसोबत दिसत, त्यामुळे असेल;
तेव्हाच्या दोघींच्या प्रयत्नांमुळे त्यांच्या कॉलेजला त्या वर्षी प्रथमच आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धेत सर्वोत्कृष्ट एकांकिकेचं पारितोषिक मिळालं, म्हणूनही असेल.
मुक्ताला मात्र वैभवीशी आपली मैत्री आहे अथवा नाही याच्याशी काही देणंघेणं नव्हतं. ना तेव्हा, ना आता.
ही देणंघेणं नसण्याची सवय तशी जुनीच होती तिची. कायम स्वतःतच मश्गूल, स्वतःच्याच विचारांत असणारी मुक्ता. ती आपल्याच मस्तीत जगत असते, सगळे म्हणायचे.
कॉलेजमधे सव्वीस वर्षांपूर्वीच्या त्या एका सकाळी जगदीशनं अचानक समोर येऊन तिला प्रपोझ केल्यावर, तिनं तिथल्या तिथे त्याला फटकन्‌ नकार देऊन टाकला होता तो त्या मस्तीतच.
सगळे असंच म्हणायचे.

----------

‘रिजन्सी’त बसल्या बसल्या जगदीशची जराशी चुळबूळ होत होती. अ‍ॅपल ज्यूसचा एक ग्लास रिता करून झाला होता. मोबाईलवरची एक गेम खेळून झाली होती. काही निरर्थक एस.एम.एस. पाठवून झाले होते. हे त्याचं चाललं होतं वेळ घालवायला. त्याला प्रतिक्षा होती मुक्ताची. फोनवरच्या नुसत्या एका मोघम निरोपावर ती लगेच भेटायला येईलच याची त्याला खात्री वाटत नव्हती. फोनवर बोलतानाचा सूर, हॉटेलचा पत्ता विचारतानाचा तिचा आवाज पाहता, खरंतर ती न येण्याचीच शक्यता जास्त होती. पण तरीही साडेसातपर्यंत वाट पाहण्याचं त्यानं ठरवलं होतं. काहीतरी स्टार्टर्स्‌ मागवावेत, तेवढंच बसल्या बसल्या तोंड हलवायला बरं, म्हणून वेटरला बोलावण्यासाठी तो वळला आणि त्याला मुक्ता हॉटेलच्या प्रवेशद्वारातून येताना दिसली. त्यानं एक सुटकेचा निःश्वास टाकला. काचेचा दरवाजा ढकलून ती आतल्या थंड वातावरणात शिरली. त्यानं लांबून हात उंचावून तिचं लक्ष वेधलं. ती त्यावर हसून प्रत्युत्तर देईल असं त्याला वाटलं होतं. पण तसं काही झालं नाही. तिच्या चेहर्‍यावर केवळ अपेक्षित असलेली बस येताना दिसल्यासारखे किंवा वाहनांच्या भाऊगर्दीत आपली पार्क केलेली गाडी सापडल्यासारखे इतपतच भाव पसरले.
टेबलजवळ आलेल्या वेटरला त्यानं काहीतरी ऑर्डर दिली.
"हॅलो," त्याच्या समोरच्या खुर्चीत येऊन बसत ती म्हणाली. "अगदी फोन वगैरे करून इथे का बोलावून घेतलंस?"
तिनंच थेट विषयाला हात घातला ते बरं झालं; नाहीतर बोलायला सुरूवात कशी करायची हा त्याच्यापुढे जरासा प्रश्न होताच.
दीर्घ श्वास घेत पुढे होऊन त्यानं दोन्ही कोपरं टेबलवर टेकवली, हातांची बोटं एकमेकांत गुंफली आणि तिच्या चौकशीला बगल देत तो म्हणाला, "मला एक सांग, तू आज जी आहेस, ती तशी नसतीस, तर कोण झाली असतीस?"
"म्हणजे?" तिनं गोंधळून जाऊन विचारलं. तिच्या कपाळावर एक बारीकशी आठीही अवतरली.
"म्हणजे, सव्वीस वर्षांपूर्वीचा एक प्रश्न," तो उत्तरला.
चेहर्‍यावर अजूनही प्रश्नार्थक भाव असले, तरी ते ऐकून तिचे डोळे जरासे भिरभिरायला लागले होते--पुढ्यातल्या प्लेटवर, काट्या-चमच्यावर, तिथून त्याच्या मागच्या भिंतीवरच्या फ्रेममधे लावलेल्या चित्रावर, त्यावर प्रकाश टाकणार्‍या मंद दिव्यावर, मग त्याच्या एका बोटातल्या हिर्‍याच्या आणि दुसर्‍या बोटातल्या सोन्याच्या अंगठीवर...
तिचा मेंदू फ्लॅशबॅकमधे गेलाय इतकं त्याच्या नक्की लक्षात आलं होतं. "हॅलो, काही ट्यूब पेटतेय का?" त्यानं विचारलं.
स्टार्टर्स्‌ घेऊन वेटर आला होता.
"Of course," वेटरनं प्लेटमधे वाढलेल्या हरा-भरा कबाबच्या गोल चकतीवर नजर स्थिरावत ती एकदम म्हणाली. " एक अनुत्तरित गहन प्रश्न! तुझ्या अजूनही लक्षात आहे ते?"
हॉटेलमधे शिरताना तिच्या चेहर्‍यावर ज्या उत्साहाची वानवा होती, ती तेवढ्यापुरती भरून निघाली.
"अर्थातच," तो उत्तरादाखल म्हणाला. "९ डिसेंबरला प्राथमिक फेरी झाली होती. तिथेच सर्वांनी अंदाज बांधला होता, की इस मुक्‍ताकी तो निकल पडी; जे खरं ठरलं १३ जानेवारीला."
"I don't believe this! तू तारखाही लक्षात ठेवलेल्या आहेस??"
"मग! वाटलं काय तुला! तेराला रात्री तू सर्वांना आईस्क्रीम पार्टी दिली होतीस."
"अरे, पण इतकं कसं काय लक्षात तुझ्या? तू तर...," कशाचा तरी अदमास घेत असल्याप्रमाणे तिनं आपलं वाक्य अर्धवटच सोडलं.
"बस्स काऽऽ!"
"म्हणजे, एस.वाय.पासूनच तू..."
"एफ.वाय., एफ.वाय.पासूनच."
"I don't at all believe this!!" आता मात्र तिला खरंच आश्चर्याचा धक्का बसला होता. तिच्या आवाजातून जाणवत होतं ते.
हरा-भरा कबाबच्या शेजारी आता व्हेज-क्रिस्पीही दाखल झालं होतं. त्याचा एक तुकडा तोंडात टाकत तो अचानक गंभीरपणे म्हणाला, "मुक्‍ता, तू ‘नाही’ म्हणालीस त्यानंतरचा तो अख्खा दिवस, रात्री उशीरापर्यंत मी ही स्वतःशी हेच बोलत होतो, I don't believe this! I don't at all believe this!"
ते ऐकताच तिनं हातातला काटा ताडकन पुन्हा प्लेटमधे ठेवला आणि त्रासिकपणे विचारलं, "जगदीश, तू हे सांगायला इथे बोलावलंयस मला?"
तिच्या आवाजात त्याला एक जरब जाणवली. "Sorry," डाव्या हाताचा पंजा तिच्यासमोर नकारार्थी हलवत तो वरमून जाऊन म्हणाला, "तोंडातून निघून गेलं ते, very sorry."
खाली ठेवलेला काटा तिनं परत उचलला.
"मी तुम्हाला इथे बोलावलंय, माझ्या नवीन प्रोजेक्टच्या संदर्भात," घोटभर पाणी पिऊन मागे रेलत तो म्हणाला.
"तुम्हाला?"
"हो, वैभवीही येईल इतक्यात."
"वैभवी??"
"सांगतो, सांगतो. एका नवीन सिनेमाचा विचार चालू आहे. डायरेक्शनही करावं म्हणतोय."
".........."
पुन्हा पुढे होऊन हाताची कोपरं टेबलवर ठेवत तो म्हणाला, "अजून नक्की काहीच नाही, पण तुमच्या एकांकिकेवर आधारित सिनेमा काढायचं डोक्यात आहे माझ्या."
या वाक्यावर ती काय म्हणतेय याबद्दल त्याला उत्सुकता होती. पण त्याला अपेक्षित अशी एकही प्रतिक्रिया व्यक्‍त न करता शांतपणे आणि काहीश्या बेफिकीर सुरात तिनं विचारलं, "मग माझी परवानगी वगैरे मागतोयस की काय त्यासाठी?"
"परवानगी वगैरे नकोय," तो गडबडीनं म्हणाला. "मला तुझं लेखन हवं आहे. तेव्हासारखंच in full form!"
"कायऽऽ??" पुन्हा आठ्या.
"होय. या सिनेमाची कथा तू लिहावीस अशी माझी इच्छा आहे."
"अरे, पण..."
"हे बघ, मी आत्ता ताबडतोब तुझा निर्णय मागितलेला नाही. तू विचार कर, अन्‌ मग काय ते मला सांग."
प्रसंग निराळा, काळ-वेळ निराळी, पण वाक्य तेच, सव्वीस वर्षांपूर्वीचं; "तू विचार कर, अन्‌ मग काय ते मला सांग."
तिच्या दृष्टीनं त्यात विचार वगैरे करण्यासारखं काहीही नव्हतं. जे तेव्हा केलं, तेच आताही करायचं होतं.
त्याला स्पष्ट नकार द्यायचा होता.

----------

बसस्टॉपवर उभ्याउभ्या वैभवीचं लक्ष पुनःपुन्हा घड्याळाकडे जात होतं. तिला चांगलाच उशीर झाला होता. नेमकी आजच तिनं तिची स्कूटी सर्विसिंगला दिली होती. मुक्‍ता आणि जगदीशला ‘रिजन्सी’त भेटून मग पुढे सर्विस-सेण्टरला जाऊन स्कूटी घेऊन घरी जायचं असं तिनं ठरवलं होतं. पण हॉटेलमधून निघून, रिक्षा पकडून सर्विस-सेण्टरला पोहोचेपर्यंत ते बंद झालेलं होतं. मग तितक्या लांबून घरापर्यंत यायला एकही रिक्षावाला तयार होईना. शेवटी नाईलाजास्तव ती बसस्टॉपवर येऊन उभी राहिली होती आणि बसचा काही पत्ता नव्हता.
बसस्टॉपवरची एक कॉलेजवयीन मुलगी तिची चाललेली चुळबूळ कधीची बघत होती. तिनं तीन-चार रिक्षावाल्यांना थांबवून ‘कॅण्टोनमेण्ट?’ असं विचारलेलंही तिनं ऐकलं होतं. शेवटी ती मुलगीच आपणहून तिच्याजवळ गेली आणि म्हणाली, "आण्टी, मला रागिणी टॉकीजजवळ जायचंय. शेअर रिक्षा करूया का? रागिणी टॉकीजला तुम्हाला दुसरी रिक्षा ईझ्झिली मिळेल."
ते ऐकून ती आधी गोंधळली. नीरजा कॉलेजमधून अशीच एक-दोनवेळा शेअर रिक्षा करून घरी आली होती, तेव्हा तिनं त्याबद्दल उघडउघड नाराजी व्यक्‍त केली होती. नीरजानं स्वतःची बाजू सांगायचा प्रयत्न केल्यावर तिला आवाज चढवून गप्प केलं होतं. त्यावरून मायलेकींची वादावादीही झाली होती. ते आठवून ती जराशी वरमली. पण काही न बोलता पुढ्यात थांबवलेल्या रिक्षात चढली.
पलिकडे सरकून ती त्या मुलीला जागा देणार इतक्यात दुसर्‍या बाजूनं अजून एक मुलगी डोकावली. ‘रागिणी टॉकीज ना?’ असं विचारत आत चढली. तिला मग नाईलाजास्तव मधल्याच जागेवर बसावं लागलं. आता तिच्या दोन्ही बाजूला जणू एक-एक नीरजा बसल्या होत्या. तिनं त्या दोघींचं आळीपाळीनं निरीक्षण करायला सुरूवात केली.
नंतर चढलेल्या मुलीनं रिक्षा सुरू झाल्याझाल्या खांद्यावरच्या बॅगेतून मोबाईल फोन आणि हॅण्डस्‌-फ्रीची वायर काढली. वायरचा गुंता सोडवून इअरप्लग्ज्‌ कानात खुपसून ती गाणी ऐकायला लागली. तिनं मोबाईल पुन्हा बॅगेत ठेवून देण्यापूर्वी वैभवीनं नकळत त्यातल्या स्क्रीनकडे डोकावून पाहिलं. पण ती मुलगी कुठलं गाणं ऐकत होती ते ती तेवढ्या वेळात वाचूच शकली नाही.
तिच्या डावीकडची मुलगी रिक्षात बसल्यापासून कुणाशीतरी फोनवर सतत बोलत होती, अगदी हळू आवाजात. आजूबाजूला रहदारीचा इतका गोंगाट असताना कसं काय जमतं हे, या विचारानं वैभवीला नवल वाटलं. रिक्षा सिग्नलला थांबल्यामुळे फोनवरच्या संभाषणातली काही वाक्यं तिला ऐकू आली. " ...उनका तो ब्रेक-अप हो गया...तेरे को नहीं मालूम?...पुरानी हो गयी वो बात!" ती मुलगी म्हणत होती.
"ब्रेक-अप"!
वैभवीच्या कॉलेजच्या दिवसांत हा शब्द विशेष कुणाला ठाऊक नव्हता. "त्यांचं जमलं" किंवा "त्यांचं तुटलं" अशा भाषेत बोलायचे सगळे. त्यातही "तुटलं" हे कुजबुजत सांगितलं जायचं; जाहीरपणे चर्चिली जाण्याची बाब नसायची ती. मुक्‍तानं जगदीशला नकार दिला हे ही तिला असंच कुणीतरी कुजबुजतच सांगितलं होतं. ते ऐकल्यावर तिनं खरंतर सुटकेचा नि:श्वासच टाकला होता. कारण तिला चिंता होती त्यांच्या एकांकिकेची. त्याची तयारी तेव्हा अगदी ऐन जोमात होती. मुक्‍तानं जगदीशला "हो" म्हटलं असतं, तर एकांकिकेतून तिचं लक्ष नक्कीच उडालं असतं. रांगेतल्या इतर एक-दोन एकांकिका मग तयारी, सादरीकरण, दर्जा या सर्वच बाबतींत पुढे निघून जाण्याची दाट शक्यता होती. त्यापायी प्रथमच काहीतरी आगळंवेगळं करण्याची मिळालेली संधी वैभवीच्या हातून निसटली असती. पण मुक्‍तानं जगदीशला नकार दिला आणि तिला सर्व प्रश्न सुटल्यासारखे वाटले.
पात्रता फेरीचे निकाल जाहीर झाल्यावर दोघी अक्षरशः गळ्यात गळे घालून नाचल्या. मात्र जोडगोळी म्हणावी अशी त्यांची मैत्री कधीच झाली नाही. कॉलेज संपल्यावर पुढे एकमेकींबद्दलच्या ज्या काही आठवणी राहिल्या, त्या सगळ्या प्रामुख्यानं त्या एकांकिकेच्याच संदर्भातल्या होत्या. त्या देखिल नंतर नंतर पुसट झाल्या. कारण दोघींनी नंतर एकमेकींशी विशेष संपर्क कधी ठेवलाच नाही.
अर्थात, त्यानं काही फरक पडला असता असंही वैभवीला वाटलं नाही. कारण पंचवीस वर्षांनंतरही मुक्‍ताच्या स्वभावात काडीचाही बदल झालेला नव्हता हे ती आजही अगदी सहज सांगू शकत होती...

----------

अनिकेतशी ठरवलेलं सगळं बोलून झालं होतं. मुक्‍ता आता चॅट विण्डो बंद करण्याच्या बेतात होती. तितक्यात अनिकेतलाच अचानक काहीतरी आठवलं -

hey aai, hw was ur reunion prty?

Masta hoti. sagale june friends bhetle.

u ppl met aftr 25 yrs, right?

ho

grt! so u must hv had a blast

blast??

means dhamaal g... sujay kaka n asmita maushi were also thr?

ofcourse! 'sagale friends' cha artha kay hoto?

hmm...

chal, tu zop ata. barach ushir zalay

ok, bye... cheers!

वर्षभरात पोरगं तिकडची भाषा बोलायला लागलं, लॉगआऊट करता करता मुक्‍ताच्या मनात आलं. मात्र सुजयकाका, अस्मिता‘मौशी’ यांची नावं अनिकेतच्या लक्षात होती याचं तिला कौतुकही वाटलं. तिला आठवलं, काही वर्षांपूर्वी हाच मुलगा, तिनं तिच्या कॉलेजची एखादी आठवण सांगायला सुरूवात केली, की "आई किती पकवतेय" असा चेहरा करून बसायचा.
त्यादिवशी ‘रिजन्सी’त आपला चेहराही नंतर नंतर तसाच झाला असावा, तिला वाटलं.
सुरूवातीलाच जगदीशला आपण "नाही" म्हणायला हवं होतं, त्यादिवशी रिजन्सीत जायलाच नको होतं, असं आता तिला वाटायला लागलं होतं. त्यादिवशी, तत्क्षणी तिनं नकाराचा निश्चय केलेला असला, तरी महिना-दीड महिना उलटून गेल्यावरही तो स्पष्ट नकार अजूनही तिच्या तोंडून बाहेर पडलेला नव्हता. अर्थात, नकार देणं जमलं नसलं, तरी आपली निरिच्छा प्रकट करण्याची एकही संधी तिनं दवडली नव्हती.
पण तरीही जगदीशची चिकाटी कायम होती.

बॅच-रियुनियनच्या वेळेसच त्याला ती एकांकिका आठवली असणार आणि त्यावर सिनेमा काढण्याचा विचार त्याच्या मनात आला असणार याची तिला पक्की खात्री होती. रि-युनियनच्या पार्टीत जेव्हा कळलं, की ‘राज्यपुरस्कारविजेता सिनेमॅटोग्राफर एस.जगदीश’ यातलं ‘एस.’ म्हणजे जगदीश श्रीखंडेतलं ‘एस.’ आहे, तेव्हा तिच्यासकट अनेकांना आश्वर्याचा धक्काच बसला होता. कारण तो अशा एखाद्या क्षेत्रात शिरेल असं कुणालाही वाटलं नव्हतं, अगदी कॉलेजमधल्या त्याच्या जवळच्या मित्रांनाही. त्याला मुळात इंजिनीयर व्हायचं होतं. पण अगदी योगायोगानं तो या क्षेत्रात आला होता, असं त्यानंच त्यादिवशी आपला परिचय देताना सांगितलं होतं. अर्थात आश्चर्याचा धक्का वगैरे बसला, तरी पुढे होऊन त्याच्याशी बोलावं, असं तिला अजिबात वाटलं नव्हतं.
ते तर कॉलेजमधेही कधी वाटलं नव्हतं.
मुक्‍ताच्या नकारानंतरही सुजय आणि अस्मिता पुढे कितीतरी दिवस जगदीशवरून तिला चिडवायचे. ती आधी आधी त्याकडे दुर्लक्ष करायची. शेवटी एक दिवस तिचं त्या दोघांशी जवळजवळ भांडणच झालं. तेव्हा कुठे तिच्या नकाराचा खरा अर्थ जणू त्या दोघांना कळला. जगदीशनं मात्र त्या मुद्द्यावरून नंतर तिला कधीही छेडलं नाही. तो नियमितपणे कॉलेजमध्ये येत राहिला; तिला दिसत राहिला. तिचा नकार त्यानं कसा झेलला किंवा पचवला किंवा अजून काही; पण ते जाणून घेण्याची तिला ना कधी गरज वाटली, ना स्वतःला तिनं कधी अपराधी वगैरे वाटून घेतलं.

तिनं लॅपटॉप बंद करून टाकला. आठवणींमधूनही लॉग-आऊट करून टाकलं.
आजचा आख्खा दिवस तिला तसा मोकळा होता. गौतम रात्री उशीरा परतणार होता. त्यामुळे तिनं बाहेरची काही कामं, थोडीफार खरेदी उरकायचं ठरवलं होतं. स्वतःचं आवरून, स्वयंपाकघरातली झाकपाक करून, कपाटांना कुलुपं लावून तिनं टी-पॉयवरचं आन्सरिंग मशीन सुरू केलं आणि शेजारची गाडीची किल्ली आणि मोबाईल उचलला.
एक नवीन मेसेज आलेला होता. जगदीशचा होता - ‘Free after 12, coffee somewhere?’
तिनं तो डिलीट करून टाकला आणि घराचं दार ओढून घेऊन लिफ्ट बोलावली.

----------

कुणालाही असंच वाटलं असतं, की मुक्‍ताला पुन्हा भेटल्यामुळे जगदीशच्या डोक्यात नव्या चित्रपटाच्या कथाकल्पनेचा किडा वळवळला. पण त्याचा विचार असा अचानक आलेला, म्हणून अचानक विरून जाणारा नव्हता. पहिलाच दिग्दर्शकीय प्रयत्न करतेवेळी एखादं निराळ्या वाटेवरचं कथानक निवडायचं, किंबहुना असं कथानक सापडेपर्यंत दिग्दर्शनाचा प्रयत्न करायचाच नाही असं त्यानं पक्कं योजलं होतं. कधीचंच. त्याच्या या विचारांनी नव्यानं उचल खाल्ली ती आठ-दहा महिन्यांपूर्वी. नक्की सांगायचं, तर त्याला राज्यपुरस्कार मिळाल्यानंतर.
एका टी.व्ही.चॅनलवर त्याची प्रदीर्घ मुलाखत झाली होती. त्या मुलाखतीत त्याला एक प्रश्न विचारला गेला होता, "आज तुम्ही एक यशस्वी सिनेमॅटोग्राफर आहात. ते तसे नसतात, तर दुसरे कोण झाले असतात?".........
तोच तो एक गहन प्रश्न. एकांकिकेच्या कथानकात मुक्‍तातल्या लेखिकेनं तीन प्रमुख पात्रांना विचारलेला. तिन्ही पात्रांना वाटतं, "हॅ! किती फालतू प्रश्न, सोप्पंय याचं उत्तर!" पण त्यांना वाटतं तेवढा तो प्रश्न सोपा नसतो. ते आपांपसांत त्या प्रश्नावर चर्चा सुरू करतात. गप्पांच्या ओघात हळूहळू त्यातल्या दोघांच्या लक्षात येतं, की आपण आयुष्यात जे करायचं ठरवलं होतं, त्यातलं काहीच करू शकलेलो नाही. त्यांच्या डोक्यात विचारांचं काहूर उठतं. गप्पा अर्धवटच राहतात. आपापल्या घरी परतताना एक पोकळीच जणू ते सोबत नेतात. त्यांचं आयुष्य ढवळून निघतं. दिनचर्येवर, कामावर, आहार-विहारावर त्याचा परिणाम व्हायला लागतो. दोघांतला एक त्यातून वेळीच भानावर येतो. दुसरा मात्र नैराश्याची शिकार बनतो. तिसरा या सगळ्यापासून काहीसा अलिप्‍तच राहतो. कारण आपल्या आयुष्याचं एक विशिष्ट असं ध्येय त्यानं कधीच ठरवलेलं नसतं. शेवटी त्या तिसर्‍याच्या मुखातून नियती प्रेक्षकांसमोरही एक प्रश्न टाकते, की सर्वसामान्य, मध्यमवर्गीय द्विमितीय आयुष्याकडे सकारात्मकतेनं पाहण्यासाठीचा सर्जनशील, त्रिमितीय दृष्टीकोन तुम्हाला सापडलाय का? त्याची तुम्हाला गरज वाटते का? तुम्ही तो शोधणार आहात का?...आणि पडदा पडतो.
कॉलेजच्या प्रेक्षागृहाच्या रंगमंचावर एकांकिकेची तालीम चालायची. ती पहायला कॉलेजमधली बरीच उत्साही मंडळी जमायची. त्यात जगदीशही असायचा. त्याला एकंदर कथानक, सादरीकरण काही झेपलंच नव्हतं सुरूवातीला; पण मुक्‍तासाठी तो येत राहिला, तालमी पाहत राहिला. जसजसा तो विषय त्याला उमगत गेला, तसतसं त्याला मुक्‍ताच्या कल्पनाशक्‍तीचं अधिकाधिक आश्चर्य वाटत राहिलं.........
आणि आज तीच मुक्‍ता त्याच्या नव्या प्रस्तावाला तयारी दर्शवत नव्हती. पण तिनं आपले हट्टी, एकांगी विचार झुगारून द्यावेत यासाठी पुरेपूर प्रयत्न तो करणार होता; किमान I don't believe this म्हणून सोडून तर नक्कीच देणार नव्हता.

----------

गाडी अशी अचानक बंद का पडली ते मुक्‍ताला लक्षात येईना. बटण-स्टार्टही होईना म्हणताना खाली उतरून गाडी रस्त्याच्या कडेला घेऊन तिनं मधल्या स्टॅण्डला लावली. दोन-चार मिनिटं किक-स्टार्ट करण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यानंही ती घामेघूम झाली. पर्समधून छोटी क्लिप काढून तिनं आधी आपले केस वर बांधले. दोन खांद्यांवरची ओढणी एका खांद्यावर घेऊन दुसर्‍या बाजूला कमरेपाशी तिची गाठ मारली. गाडीला पुन्हा आठ-दहादा किक्स्‌ मारल्या. पायातल्या उंच टाचांच्या सॅण्डल्स्‌मुळे गैरसोयच जास्त होत होती. घरातल्या अनेक चपलांच्या जोडांमधून नेमके आज हेच घालण्याची दुर्बुध्दी कशी झाली कोण जाणे! ती जराशी वैतागली. मुळात असले सॅण्डल्स्‌ विकत घ्यावेतच कशाला? तिनं स्वतः तर कधीच घेतले नसते. गौतमनं तेव्हा आग्रह केला म्हणूनच केवळ. त्याला असल्या गोष्टींची अतोनात हौस. अमूक ड्रेसवर अमूक सॅण्डल्स्‌ छान दिसतील, त्या साडीवर ते तमूक कानातलं-गळ्यातलं छान दिसेल, दोन-तीन निरनिराळ्या मापाची, डिझाईनची मंगळसूत्रं करून घेऊ या तुझ्यासाठी, या-या साड्यांवर ती अशी-अशी छान वाटतील, एक ना हजार! आता, असा खर्च केला, वस्तू घरात आल्या म्हटल्यावर त्या न वापरता तशाच पाडून ठेवायची तिची वृत्ती नव्हती. त्यामुळे त्यातलंच एक मंगळसूत्र आत्ता तिच्या गळ्यात होतं. कायम ती घालायचीच असंही काही नव्हतं. पण हे बरेच दिवस घातलेलं नव्हतं म्हणून. सॅण्डल्स्‌ही त्याच विचारानं घातले गेले असावेत.
घामेजलेले तळवे रुमालाला पुसून तिनं पुन्हा गाडी सुरू करायचा एक प्रयत्न केला, जरा पुढे झुकून, जीव खाऊन; तर गळ्यातलं मंगळसूत्र गाडीच्या हॅण्डलमध्ये अडकलं. वैताग, वैताग नुसता!
"मॅडम, कुछ हेल्प चाहीये?" अचानक एक अनोळखी आवाज आला. तिनं त्या दिशेला वळून पाहिलं. एक सडकछाप मनुष्य तिच्या अगदी मागेच येऊन उभा राहिला होता. तिला आठवलं, बसस्टॉपवर उभा होता तो मगाचपासून.
"नो, थॅन्क्स्‌," अडकलेलं मंगळसूत्र सोडवून घेत तिनं त्याला वाटेला लावायचा प्रयत्न केला.
"मॅडम, आगे कॉर्नर पे गॅरेज है। उधरसे किसीको बुलाके लाव। ये गाडी स्टार्ट नहीं होगी लगताय।"
तुला सल्ला विचारलाय का रे? आं? बाईची गाडी बंद पडलेली दिसली, की येतात लगेच चोंबडे. आत्ता माझ्याजागी एखादा पुरूष असता, तर आला असतास का रे बोलायला तरी?? तुम्ही पुरूष स्वतःला कोण समजता? वाहनं चालवणार्‍या बायकांची फजिती पाहण्यात मजा वाटते तुम्हाला? अरे, पण बाई जे जे करते, त्यातलं दमडीएवढं तरी कराल का रे धड? आम्ही असला चोंबडेपणा करत नाही म्हणून, नाहीतर जीणं नकोसं करून सोडलं असतं तुमचं---हे सगळं आपल्या उजव्या पायात जणू एकवटून तिनं गाडीला एक असली सणसणीत किक मारली म्हणता, की ती आपले नखरे विसरून, नाक मुठीत धरून, भकाभक धूर ओकत सुरूच झाली एकदम! तिच्या नजरेचा एक थंड, जळजळीत कटाक्ष त्या माणसाला भेदून पलिकडे गेला. त्याच कटाक्षानं त्याला परत बसस्टॉपची वाट दाखवली.
सीटवर बसत गाडी स्टॅण्डवरून काढता काढता तिनं वळून पुन्हा त्या माणसाकडे पाहिलं. काहीच झालं नाही अशा थाटात तो स्टॉपवरच्या गर्दीत उभा होता. गर्दीत पुरूषच जास्त होते, बायका दोन-तीनच--तिच्या मनानं नोंद घेतली. पाठोपाठ ते करवादून उठलं, का असतो असा फरक? इतका फरक? लहानपणापासूनच्या तिच्या मनातल्या प्रश्नानं पुन्हा एकदा उचल खाल्ली. "तो" आणि "ती" हा भेद का आणि कुठवर? तिला उशीर झाला होता, भूकही लागली होती; गाडी बंद पडल्यामुळे जी थोडीशी चिडचीड झाली असती, ती त्या माणसानं संतापावर नेऊन पोहोचवली. संतापासोबत तिच्या हाती लागत असे बंडखोरीचं शस्त्र. पण लहानपणी तिनं त्यालाही आवर घातला होता; घातला होता म्हणण्यापेक्षा तिला घालावा लागला होता.
हा उशीर-ही चिडचिड, ही चिडचिड-हा संताप; तो संताप-ती बंडखोरी, ती बंडखोरी-तो आवर;
तो आणि ती; ती आणि तो; सगळीकडे तोच फरक, तसाच दृष्टीकोन; आणि आवर घालणार तरी किती, सहनशक्ती साथ देईल तोपर्यंतच; कारण तोच संस्कार केला गेलेला;
ती सहनशक्ती, तो संस्कार!
घरात साध्यासाध्या बाबतींत केला जाणारा भेदभाव, "त्याच्या"शी केली जाणारी तिची तुलना, "त्याला" दिलं जाणारं सततचं झुकतं माप, त्यामुळे तिची पदोपदी होणारी घुसमट;
"तो" भेदभाव - "ती" घुसमट; इथेही तेच;
ती आणि तो; "तो" आणि "ती"; तो महेश आणि ती मुक्‍ता; तो भाऊ - ती बहीण;
ती बाई आणि तो पुरूष!!
असा फरक का? भेदभाव का? का? का?? लहानपणी ती असेच अनेक "का?" घेऊन तिच्या परिनं आईशी वाद घालायची, वडिलांशी भांडायची. पण तिचे सडेतोड वगैरे प्रतिवाद कायम तिच्या वयाच्या मर्यादेतच राहिले. मुलगा-मुलगीच्या भेदाला कधीच भेदू शकले नाहीत ते. तिचं मन आक्रंदायचं--मी मुलगी म्हणून जन्माला आले यात माझी काय चूक? त्यावर तिला कधीच काही उत्तर मिळालं नाही. पण बारीक सारीक गोष्टींत "त्याला" झुकतं माप देण्याचंही कधी कमी झालं नाही.
लग्नानंतर काही दिवसांनी एकदा तिनं सगळं गौतमला सांगितलं. त्याला ऐकून आश्चर्य वाटलं. उदाहरणादाखल त्याला काही किस्से ऐकायचे होते म्हणे. असे हाताच्या बोटांवर मोजत ती कुठकुठले म्हणून किस्से ऐकवणार होती त्याला?
"त्याच्या" शाळेतल्या व्रात्यपणाचं कौतुक, खोड्यांचं कौतुक; पण हिच्या सुंदर हस्ताक्षराबद्दल तोंडातून कधी एक अवाक्षरही नाही.
"त्याच्या" कॉलेजच्या प्रवेशाच्या वेळी घराजवळचं कॉलेज, चांगलं कॉलेज याचा उहापोह, प्रत्यक्ष जाऊन कॉलेजची पाहणी; तिच्या प्रवेशाच्या वेळी मात्र तिच्या सोबत आई-वडिलांपैकी कुणीच नाही.
घरात सणासुदीला "त्याच्या" आवडीची पक्वान्नं हमखास केली जायची; पण तिची आवड कुणी कधी विचारात घेतलीच नाही.
तिनं घरातली कामं करायची, "त्यानं" मात्र नाही, कारण भविष्यात तो या घराचा मालक असणार आणि मालक कधी कामं करत नाही.
तिच्या एकांकिकेला बक्षीस मिळालं, त्यादिवशी "त्यानं" कॉलेजमधे काहीतरी जबरी मारामारी केली. प्रकरण पोलिसांपर्यंत गेलं. ते निस्तरण्याच्या नादात तिचं कौतुक करण्याचं कुणाच्याच ध्यानी आलं नाही.
आख्खं आयुष्यच उदाहरणार्थ हजर होतं. काय आणि किती सांगणार? ती हळूहळू कोषात गेली. रक्ताचं नातं एक घाव दोन तुकडे करू देत नव्हतं. पण भेदभाव, दुय्यम वागणूक तिच्या तनात, मनात कणाकणानं झिरपत होती. एक ठसठसणारी जखम बनून राहिली होती, जिच्यावर काळाचा लेपही कुचकामी ठरला होता.
गौतमचा कशावर विश्वासच बसेना. "त्याच्या" मखरात आता गौतमही आयुष्यभर पुढ्यात बसणार का, या विचारानं तिचा थरकाप उडाला होता. गौतमच्या प्रतिक्रिया होत्याच तशा. पण अखेर तिला समजून, सांभाळून घेतलं होतं ते गौतमनंच. त्यानं तो विषय पुढे फारसा कधी काढला नाही, वाढवला नाही. "त्याच्या"शी त्याचे विशेष सूरही कधी जुळले नाहीत. "त्याचं" तरी आढ्यता, माज यांच्याशिवाय कधी कुठे कुणाशी नातं होतं?
अनिकेत ??
ती घरी पोचेस्तोवर तिच्या फोनवर अनिकेतचे तीन मिस्ड्‌ कॉल्स्‌ आलेले होते. तिला कळेना, की तो पुन्हा का फोन करत असेल? सकाळीच तर चॅटिंग करून झालेलं त्याच्याशी; त्याच्या ‘ओके,बाय,चिअर्स’च्या वेळी इथे दहा वाजत आले होते. म्हणजे त्याचे रात्रीचे साडे-अकरा. याचा अर्थ तो अर्ध्या रात्रीत उठून पुन्हा फोन करत होता. या विचारानं ती सटपटलीच. तिथे काही गडबड झाली असेल का? अनिकेतला काही मदत हवी असेल का? पण इथून काय अन्‌ कशी मदत करणार? गौतमही इथे नाहीय. आधी अनिकेतला फोन लावावा, की गौतमला? तिला काही सुचेना.
हातातल्या पिशव्या, पर्स, किल्ल्या, फोन सोफ्यावर टाकून सॅण्डल्स्‌ काढेपर्यंत तिचं आन्सरिंग मशीनकडे लक्ष गेलं. त्याचा छोटा लाल दिवा लुकलुकत होता.

----------

"Oh God! मुक्‍ता, प्लीज असं एका दमात नाही नको म्हणूस," जगदीश अजिजीनं बोलत होता, "ती मूळ कल्पना तुझ्या डोक्यातून निघाली होती. तशी निर्मितीप्रक्रिया पुन्हा घडवून आणता येत नाही."
"तू मला भरीला घालणारच. तुला फायदा दिसत असेल ना त्यात," मुक्ता त्यावर तुटकपणे त्याला म्हणाली.
वैभवीला तिचा तो सूर जरासा खटकलाच. ती म्हणाली, "मुक्‍ता, सॉरी, पण इतक्या कडवटपणे बोलायची काही गरज होती का?"
"वैभवी, तुला आठवतं?" त्या टिप्पणीकडे दुर्लक्ष करत मुक्‍तानं तिला विचारलं. "एकांकिका मी प्रथम तुला वाचायला दिली होती, तेव्हा तू एक निरीक्षण नोंदवलं होतंस."
मुक्‍ताचा प्रश्न ऐकून जगदीश आळीपाळीनं दोघींकडे बघायला लागला. अशा प्रकारे काहीएक चर्चा घडावी, एकांकिका बनतानाच्या आठवणी निघाव्यात हेच तर त्याला सुरूवातीपासून अपेक्षित होतं.
वैभवीच्या चेहर्‍यावरही प्रश्नचिन्ह होतं काहीवेळ. मुक्‍ता तिच्याकडे एकटक बघत होती.
"स्त्री-पात्रांबद्दल?" अचानक काहीतरी आठवून वैभवीनं विचारलं. जगदीश ते ऐकून चमकला. एकांकिकेबद्दल? स्त्री-पात्रांबद्दल? काय बरं असेल? त्याला प्रश्न पडला. स्त्री-पात्र म्हटल्यावर खरंतर त्याला कॉलेजमधली तालमींच्या वेळची मुक्‍ताच आठवली. त्याचं तिच्याशिवाय इतर कुणाकडे फारसं लक्षच नसायचं. प्राथमिक फेरी झाली, त्यादिवशी मात्र तो त्या दिशेला फिरकलाही नव्हता. कारण प्रयोगाच्या वेळी अर्थातच ती रंगमंचावर असणार नव्हती.
"There you are!" टेबलवर हातांची बोटं आपटत मुक्ता म्हणाली. वैभवीनं अपेक्षित उत्तर दिलं याचा आनंद तिच्या कृतीत असला, तरी तिच्या चेहर्‍यावर त्याला काही निराळेच भाव दिसले; चोख प्रत्युत्तर दिल्यासारखे? समोरच्याला निरुत्तर केल्यासारखे? अद्दल घडवल्यासारखे? कुरघोडी केल्यासारखे? कुठले? ते तो ठरवू शकला नाही.
"एकांकिकेत एकही स्त्री-पात्र कसं काय नाही, असं तू दुसर्‍या दिवशी येऊन मला विचारलं होतंस," ती वैभवीशी बोलत होती. "काय उत्तर दिलं होतं मी त्यावर? आठवतंय?"
वैभवीनं हो-नाही अशी काहीतरी अनिश्चित मान हलवली.
"मी तेव्हा काहीच उत्तर दिलं नव्हतं, कारण तेव्हा मलाच माहीत नव्हतं ते. पण आता लक्षात येतंय त्याचं कारण," ती म्हणाली.
अचानक त्याच्या डोळ्यांत डोळे घालून तिनं विचारलं, "जाणून घ्यायचंय ते?"
तिच्या नजरेत अस्वस्थता भरून राहिली होती. मनात खूप काही खळबळ माजल्यासारखी वाटत होती. तिला बरंच काही सांगायचं होतं. पण निर्णय होत नव्हता. त्याला तर कारण जाणून घ्यायचं होतंच. आताही आणि तेव्हाही. तिच्या नकाराचं काहीतरी कारण असेल; तिनं एकदा, किमान एकदा तरी ते सांगावं, नजरेतून-देहबोलीतून एकदातरी काहीतरी सूचित करावं असं त्याला तेव्हा खूप खूप वाटलं होतं. पण पुन्हा तिच्या पुढ्यात जाऊन तिला थेट विचारण्याचं धारिष्ट्य मात्र तो कधीच दाखवू शकला नव्हता.
ती आता खुर्चीत मागे टेकून बसली होती. डाव्या हातानं समोरचा ज्यूसचा ग्लास गोल गोल फिरवत होती. ती डावखुरी असल्याचं त्यानं तालमींदरम्यानच टिपलं होतं ते त्याला आठवलं.
"तेव्हा स्त्री-पात्रविरहित एकांकिका मी लिहिली," तिनं पुढे बोलायला सुरूवात केली, "कारण त्यामागची प्रेरणा," ती थांबली आणि विषण्णपणे हसली. "त्याला प्रेरणा तरी का म्हणायचं, म्हणा! प्रेरणा चांगल्या गोष्टींकडून घ्यायची असते. driving force म्हणू आपण त्याला, driving force! स्त्री-पुरूष भेदभावाचे पदोपदी आलेले कटू अनुभव हा त्यामागचा driving force होता. रोजच्या जगण्यात जर माझ्यासारख्या स्त्रीला इतक्या बारीकसारीक समस्यांना तोंड द्यावं लागत असेल, तर निदान एकांकिकेत तरी पुरुषांना भेडसावू देत त्यातल्या काही समस्या, त्यांनाही निराश होऊ देत, लावू देत आपल्या नशिबाला बोल, चरफडू देत, असा विचार होता त्यामागे हे मला तेव्हा उमगलंच नाही. पण आता उमगलंय, चांगलंच उमगलंय!" तिचे डोळे डबडबले होते. मान नकारार्थी हलत होती. ग्लास फिरवण्याचं तिनं आता थांबवलं होतं. अर्धा तास होऊन गेला, तरी तो तिनं अजून तोंडालाही लावला नव्हता.
जगदीश आणि वैभवीच्या गोंधळल्या नजरांनी एकमेकांना प्रश्न घातले. थोडावेळ तिथे शांतता पसरली. वेटर टेबलपाशी एक-दोन चकरा मारून गेला.
"काहीही कारण नसताना ‘त्यानं’ गेल्या आठवड्यात अनिकेतला फोन लावला, अर्ध्या रात्री," अचानक उस्मारून तिनं पुन्हा बोलायला सुरूवात केली.
काट्यात खोचलेला इडलीचा तुकडा वैभवीच्या तोंडाशीच अडला. तिनं जगदीशकडे पाहिलं. "त्यानं" म्हणजे कुणी ते त्याच्याही लक्षात आलेलं नव्हतं.
"बाबांशी, आपल्याच जन्मदात्या पित्याशी झालेला बेबनाव ‘त्याला’ अनिकेतपर्यंत नेण्याची काय गरज होती?" ती पुढे बोलत होती."अनिकेतनं मग उलट फोन करून मला धारेवर धरलं, मामाला माझा नंबर कशाला दिला, आता दरवेळी अशी कटकट होणारे का, असं मलाच सुनावलं सगळं. माझा काय संबंध होता? पण गुपचूप ऐकून घेतलं मी, याहीवेळी. दुसरं केलंय काय लहानपणापासून!" शेवटचं वाक्य बोलताना तिचा आवाज कापला.
"मामाला" हा उल्लेख झाला, तेव्हा कुठे वैभवीला कळलं, की मुक्ता आपल्या भावाबद्दल बोलते आहे. हातातला काटा-चमचा खाली ठेवत तिनं पुन्हा जगदीशकडे पाहिलं. मुक्‍ताच्या बोलण्याची संगति लावण्याचा तोही आटोकाट प्रयत्न करत होता. "मुक्ता, घरी काही प्रॉब्लेम झालाय का? तसं असेल तर, take your time. आपण पुन्हा केव्हातरी बोलू. मला घाई नाहीये," तो समजुतीनं, हळूवारपणे म्हणाला.
"नाही जगदीश," मुक्‍ता जोरजोरात मान हलवत म्हणाली, "मी तुझं प्रपोझल मान्य नाही करू शकत."
"अगं पण..."
"मी आज जी आहे," त्याचं वाक्य अर्धवट तोडत तिनं आपलं बोलणं पुढे चालू ठेवलं, "मी आज जी आहे, ती तशी नसते, तर दुसरी कोण झाले असते, हाच प्रश्न विचारला होता ना मी एकांकितेत? आजही, हा प्रश्न मला कुणी विचारला...मला," जगदीशवरून तिची नजर आता वैभवीकडे वळली. "प्रेक्षकांच्या आधी लेखिका म्हणून माझ्याकडे स्वतःपुरतं त्याचं उत्तर तयार असलं पाहिजे ना? हो ना?" तिनं जाब विचारल्याच्या सुरात वैभवीला विचारलं.
वैभवीनं किंचित मान हलवून एक अनिश्चित होकार दिला. काटा आणि इडलीचा तुकडा दोघांनी पुन्हा सांबारात तोंड लपवलं होतं.
"तर माझ्याकडे ते उत्तर तयार आहे," मुक्ता पुढे म्हणाली, "मी आज एक स्त्री आहे. स्त्री! पण..." अवघ्या एका सेकंदाचा एक जीवघेणा अवकाश; "पण मला पुरूष म्हणून जन्म हवा होता! नकोच होतं मला स्त्री होणं. पण नुसतं वाटून काय उपयोग आहे? त्यावरची अंमलबजावणी तर शक्य नव्हती. आजही शक्य नाहीय. आणि म्हणून त्या अनुत्तरित, गहन प्रश्नावर काही भाष्य करण्याचा दांभिकपणा आता मला करायचा नाही. नाही जमणार मला ते."
हे बोलताना तिचा आवाज पुन्हा कापला. ओठांची विचित्र थरथर झाली.
तिच्या सुरात अजिजी नव्हती. ती आर्जव किंवा विनंतीही करत नव्हती. तिनं जाहीर केला होता आपला नकार. एक ठाम नकार! जगदीशला इतक्या वर्षांनी पुन्हा एकदा निरुत्तर करणारा. पण यावेळी त्या नकारात बेफिकिरी नव्हती, तर एक निग्रह, निर्धार होता.
थोडावेळ कुणीच काही बोललं नाही. तिनं आपला ग्लास उचलला, तोंडाला लावून एका श्वासात संपवून खाली ठेवला आणि जगदीश किंवा वैभवी दोघांपैकी कुणालाही काहीही कळायच्या आत ती तडक उठून तिथून निघून गेली.
पण जाताना आपला निर्धार मागे ठेवून गेली. तो निर्धार स्वतःहूनच आता कामाला लागला.
तिथे निश्चल बसून राहिलेल्या वैभवीनामक मध्यमवयीन सर्वसामान्य स्त्रीला त्यानं हाताशी धरलं; जगाला सर्जनशील आयुष्याची त्रिमितीय स्वप्नं दाखवणार्‍या जगदीशलाही साथीला घेतलं. आत्ता जी इथून तडक उठून गेली, ती त्यांची ‘मैत्रीण’ आहे, अगदी जवळची मैत्रीण, हे त्यांना पटवून दिलं; या मैत्रिणीला आधी नैराश्याच्या गर्तेतून बाहेर काढण्याचं काम करणं अत्यंत आवश्यक आहे, हे पटवून दिलं.
"पण सिनेमाचं काय? त्याच्या लेखनाचं काय?" जगदीशच्या मनानं निर्धाराला विचारलं.
"तुला कॅमेराच्या लेन्समधून पाहण्याची सवय. कायम एकच एक दृष्टीकोन तुझा; तो आधी बदल; मुक्ताच्या मानसिक अवस्थेकडे सर्व कोनांतून बघ, त्यावर काही उपाय मिळतोय का ते शोध," निर्धारानं त्याला सूचना केली.
"त्यानं काय होईल?" वैभवीच्या मनाकडून प्रश्न आला.
निर्धारानं तिला सुनावलं, "दिग्दर्शक व्हायचंय ना याला? मग दृष्टीकोनांमधे सर्वसमावेशकता नको यायला? एखाद्या बाबीकडे, घटनेकडे चहूबाजूंनी पाहता नको यायला? ते नाही केलं, तर कसा बनणार हा उत्तम दिग्दर्शक? कोण म्हणेल याला दिग्दर्शक?"
वैभवीला सुनावून निर्धार पुन्हा जगदीशच्या जवळ गेला आणि कुजबुजत त्याच्या कानात म्हणाला, "हा सिनेमा होणार, नक्की होणार, विश्वास ठेव माझ्यावर आणि त्याचा एकांकिकेपेक्षा एक निराळाच शेवट असणार..."
"I don't believe this!" ते ऐकून जगदीश स्वतःशीच म्हणाला.
सिनेमॅटोग्राफर ते दिग्दर्शक या प्रवासाची सुरूवात अशी होईल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं.

-------------------------------------------------

'माहेर' मासिकाच्या २०१२-दिवाळी अंकात प्रकाशित झालेली कथा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

ललितादेवी,

कथा सुंदर आहे. माझ्या एका मैत्रिणीने असंच मुक्तासारखं बाईचा जन्म नको म्हणून म्हंटलं होतं. पण ते चालू जन्मासंबंधी नसून पुढल्या जन्मासंबंधी होतं. सुदैवाने ती निराश नाहीये.

'स्त्रीजन्माची व्यथा' या संज्ञेचं मूळ ही कथा वाचून कळतं.

आ.न.,
-गा.पै.

मस्त! आवडली.

काटा आणि इडलीचा तुकडा दोघांनी पुन्हा सांबारात तोंड लपवलं होतं. >>> हा स्ट्रेसबस्टर एकदम अचूक जागी आलाय. त्या जागेपर्यंत बराच ताण वाढत गेलाय तो कमी झाला नसता तर 'मुक्ताची व्यथा' इतकीच कथा राहिली असती. 'एका चित्रपटाची सुरुवात' हा भाग ठळकपणे पुढे नसता आला. पण त्या हलक्याफुलक्या जागेमुळे 'तिची व्यथा' आणि 'त्या व्यथेत सापडलेले चित्रपटाचे बीज' हे दोन्ही भाग मस्त समजून येताहेत.

कारण पंचवीस वर्षांनंतरही मुक्‍ताच्या स्वभावात काडीचाही बदल झालेला नव्हता हे ती आजही अगदी सहज सांगू शकत होती >>> इथे २६ हवे होते ना?

वा, काय मस्त कथा आहे !
मध्यावर थोडी भरकटतेय की काय असं वाटत होतं पण शेवट खास आहे अगदी. 'कसं सुचलं असेल हे ?' असं वाटलं पूर्ण कथा वाचल्यावर Happy

Pages