अवघी विठाई माझी (११) - अरारुट

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

ar.jpg

या वरच्या फ़ोटोतल्या डिझायनर क्रिस्प्स दिसताहेत ना, त्या अगदी नैसर्गिक आहेत. यात कुठलाही रंग
टाकलेला नाही. तशी गरजही नसते, त्या आहेत अरारुटच्या आणि निसर्गात: अरारुट अशीच नक्षी लेउन येते.

अरारुट ची (खरे तर स्पेलिंगवरुन अ‍ॅरोरुट असा शब्द असायला पाहिजे, पण आपल्याकडे अरारुट हाच शब्द रुढ आहे, म्हणून तोच वापरतोय.) भारतात पण नक्कीच लागवड होत असणार, कारण आपल्याकडे अरारुट पावडर पूर्वीपासून वापरात आहे.

ar1.jpg

अरारूट हे असे दिसते. याची पावडर करण्यासाठी, त्याचे तूकडे करून, कुटून ते पाण्यात वारंवार धुतले जातात. हे पाणी परत परत गाळून घेतले जाते. मग याचे सत्व खाली बसते. (ते पाण्यात विरघळत नाही.) हे सत्व वाळवून त्याची पावडर करतात. हि प्रक्रिया साधारण गव्हाचे सत्व काढण्यासारखीच आहे, पण हे मिश्रण आंबवले जात नाही.

हलवायाकडे जो बदामी हलवा मिळतो, तो अरारुट पावडर वापरुनच केलेला असतो. (जरी मूळ कृतिमधे गव्हाचे सत्व असले तरी. ) अरारुट वापरल्यामूळे तो पारदर्शक दिसतो. (गव्हाचा तितका पारदर्शक होत नाही.) अरारुट मधे खुपदा भेसळ असते. कॉर्नस्टार्च किंवा बटाट्याचे तवकील त्यात मिसळलेले असते.

शुद्ध आरारुट चिमटीत घेतल्यास अत्यंत मूलायम लागते. ते कॉर्नस्टार्च च्या तूलनेतही जास्त मुलायम
असते. त्याचा रंग शुभ्र असून, त्याला कसलाच वास येत नाही. कॉर्नस्टार्च च्या तूलनेत तो शिजवल्यावरही जास्त पारदर्शक होतो. तसेच तो कमी तपमानाला घट्ट होतो. असे घट्ट झाल्यावर उष्णता देणे थांबवावे लागते, नाहीतर ते मिश्रण दुधाळ होऊ लागते.

मी थोड्या अरारुटच्या वरीलप्रमाणे क्रिस्प्स केल्या. त्यासाठी त्याचे पातळ काप करुन, ते थंड पाण्यात
धुवून घेतले, मग भर तेलात तळून त्यावर मीठ शिवरले. या क्रिस्प्स बटाट्याच्या वेफ़र्सपेक्षा थोड्या कडक होतात, पण खायला चवदार लागतात.

ar2.jpg

आपण सुरणाची उपवासाची भाजी करतो, तशी पण मी करुन बघितली. छान लागते. सुरणासारखी
याला खाज वगैरे नसल्याने, चिंच, अमसुलाची गरज नसते. आपल्याकडे उपासाला हिंग चालत नाही
(का ?) खरे तर सध्या जे पदार्थ उपवासाचे म्हणून खाल्ले जातात, त्यातला वातूळपणा कमी
करण्यासाठी, हिंग वापरला पाहिजे. मी अर्थातच वापरला आहे. शेंगदाणे पण या भाजीत आवश्यक
आहेत. (कारण या भाजीत अजिबात प्रथिने नसतात.)

पूर्व आफ़्रिकेत तसेच दक्षिण आफ़्रिकेत, वेस्ट ईंडिज, ऑस्ट्रेलिया, दक्षिणपूर्व आशिया मधे याचे उत्पादन घेतले जाते.तिथल्या लोकांच्या आहारात त्याला महत्वाचे स्थान आहे. आपल्याकडे पण हि भाजी मिळू लागली तर नक्कीच लोकप्रिय होईल.

याचे शास्त्रीय नाव Maranta arundinacea. ब्रिटिश लोकाना अरारुट फ़ार प्रिय होते.(नेपोलियन
असे म्हणाल्याचे सांगतात, कि हे प्रेम अरारुट वर नसून ते पिकवणाऱ्या त्यांच्या वसाहतीवर होते.)
अरारुटमधे ग्लुटेन अजिबात नसते. त्यामूळे ग्लुटेन न चालणारे, ते खाऊ शकतात. याचा वापर
करुन बिस्किटे, केक, जेली वगैरे करतात.

आइसक्रिमचे मिश्रण शिजवताना अरारुट पावडर वापरली, तर मिश्रण घट्ट होते, व गोठताना त्यात
बर्फ़ाचे कण तयार होत नाहित. याची लापशी पण करतात. डायरिया झाल्यावर किंवा
पोटात दुसरे काहिच ठरत नसल्यावर, हि लापशी देतात. ती पचायला अत्यंत हलकी असते.

फ़्रुट सॉस करताना पण अरारुट वारण्याचे अनेक फ़ायदे आहेत. ते कमी तपमानाला घट्ट
होत असल्याने, फ़ळांचा स्वाद टिकून राहतो. फ़ळांच्या आंबटपणाचा त्यावर काहि परिणाम होत नाही.
याला स्वत:चा स्वाद नसल्यानेही फ़ळांचा स्वाद टिकतो. (हे स्वाद नसणे फ़क्त पावडरच्या बाबतीत,
भाजीला किंचीत स्वाद असतो. ती अगदीच सपक लागत नाहि.)

करेबियन लोक, याला अरु अरु (म्हणजे जेवणात जेवण) म्हणत असल्याने, इंग्रजी भाषेत हा शब्द
आला असावा. तेच लोक विषारी बाणांमुळे झालेल्या जखमा बर्‍या करण्यासाठी पण याचा वापर करत
असल्याने देखील, हा शब्द निर्माण झाला असावा. (तसा विंचवाचा दंश, कोळ्याचा दंश, गॆगरीन यावर पण याचा वापर करत असत.)

याची पाने लंबगोल हिरवीगार असून त्यात अधूनमधून पांढरे पट्टे दिसतात. शोभेचे झाड म्हणूनही
याची लागवड होते. (मला या झाडाचा फ़ोटो मिळू शकला नाही. या मालिकेतील सर्व फ़ोटो, मी
काढलेलेच असावेत, असे बंधन घालून घेतले आहे. पण कुणाकडे असल्यास इथे जरुर टाकावा.)

विषय: 
प्रकार: 

Pages