बाल्कन युरोप - क्रोएशिया - भाग १ - झदार, प्लिटवित्से नॅशनल पार्क

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

युरोपातली टिपीकल/ऐतिहासिक शहरं बरीच बघून झाली म्हणून यावेळी स्प्रिंगमध्ये थोड्या वेगळ्या ठिकाणी जायचं ठरवलेलं. एका मित्राच्या फेसबूकवर त्याच्या क्रोएशियाच्या ट्रीपचे फोटो बघितले होते म्हणून क्रोएशियाबद्दल (विशेषतः डालमेशिया भागाबद्दल) माहिती गोळा करू लागलो. काही फोटो बघताच आणि थोडी माहिती घेउन लगेच तिकडं जायचं फ्लाइट टिकीट बूक करून टाकलं. क्रोएशियाबद्दल माहिती घेतानाच अचानक माँटेनेग्रो या देशातील काही ठिकाणंपण कळाली. खरंतर तोपर्यंत माँटेनेग्रो नावाचा देशपण अस्तित्वात आहे हेच माहिती नव्हतं. पण कोटोर, माँटेनेग्रोचे फोटो/वर्णन वाचलं आणि तिकडंपण जायचं ठरवलं. प्लॅन अशाप्रकारे केला की झदार, क्रोएशियाला जायचे आणि परत येताना पोडगोरिचा, माँटेनेग्रोहून परत यायचं.
हे दोन्ही देश अमर्याद निसर्गसौंदर्यानं नटलेले आहेत. क्रोएशियामधे (स्थानिक भाषेत हर्वात्स्का(Hrvatska)) तसं बघितलं तर पर्यटन हाच सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय आहे. माँटेनेग्रो हा युरोपतला सगळ्यात तरूण देश, २००६ साली स्वतंत्र झालेला. या दोन्ही देशांना अतिशय सुंदर अ‍ॅड्रियाटिक समुद्रकिनारा लाभला आहे.

आम्ही ब्रसेल्सहून झदारच्या छोट्याश्या विमानतळावर उतरलो. विमानतळाहून हॉटेलकडं जाताना जणूकाही गोव्यात असल्याचा फील येत होता. झदारच्या आजूबाजूला पाहण्यासारखं बरंच आहे पण आमच्या प्लॅनप्रमाणं आमच्याकडं तिथं फक्त एकच संध्याकाळ होती. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून प्लिटवित्से नॅशनल पार्कला जायचं होतं.

झदार - हे जवळजवळ ३००० वर्ष जुनं शहर. बराच काळ शहरावर रोमन्स आणि व्हेनेशियन्सनी राज्य केलं. एकेकाळी हे डालमेशियामधलं सगळ्यात श्रीमंत शहर होतं.

सेंट डोनॅटस चर्च आणि रोमन फोरमचे अवशेष-

समुद्रकिनारा -

इथं समुद्राकाठी 'सी ऑर्गन' नावाचा अद्भूत प्रकार आहे. समुद्राकाठी संगमरवरी फरशीच्या पायर्‍या आहेत. या पायर्‍यांचा आत पाइप्स/ट्यूब्ज बसवल्यात. या ट्यूब्ज पायर्‍यांच्या पृष्ठभागावर उघडतात. या ट्यूब्जमधून समुद्राच्या लाटांमुळे आवाज येतो (एखाद्या वाद्द्यातून आल्यासारखा). तिथंच 'सन सॅल्यूटेशन' नावाचे सौर ऊर्जेवर चालणारे लाइट्स आहेत. आम्ही गेलो त्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यानं खूपच थोडे लाइटस लागले होते.

डालमेशियातल्या इतर शहरांप्रमाणे जुनं झदारपण मोठ्या भिंतीनं वेढलेलं आहे. या सगळ्या शहरांनी शत्रूच्या (मुख्यतः टर्की ओट्टोमान) हल्ल्यापासून बचावासाठी सभोवती मोठाल्या भिंती उभ्या केल्या होत्या. या भिंती अजूनही शाबूत आहेत.

दुसर्‍या दिवशी जॉनी टॅक्सीतून आम्ही प्लिटवित्से नॅशनल पार्कला गेलो. जाताना जॉनी सर्बियन युद्धाबद्दल माहिती देत होता. त्याचे वडील युगोस्लाव सैन्यातून लढले होते. जाताना वाटेत काही घरं लागली जी सर्बियाबरोबरच्या युध्दात उध्वस्त झाली होती. नशिबानं सर्बियन फौजांनी प्लिटवित्स नॅशनल पार्कचे नुकसान केले नव्हते नाहितर जग एका अतिशय सुंदर निसर्गसौंदर्याला मुकलं असतं. प्लिटवित्से नॅशनल पार्क तिथल्या तळ्यांसाठी आणि धबधब्यांसाठी प्रसिध्द आहे. एकूण १६ तळी एकमेकांशी जोडली गेलीत. ही तळी टॅव्हर्टाइनपासून बनलेल्या बांधांनी वेगळी झालीत. या तळ्यांमधील पाण्याचा रंग हे इथलं खास वैशिष्ठय. शिवाय प्रदूषण जवळ्जवळ नसल्यानं पाणी एकदम पारदर्शक. बर्‍याच ठिकाणी तळ स्पष्ट दिसतो. पार्कमधे फिरण्यासाठी सगळीकडे लाकडी किंवा नैसर्गिक वॉकवेज आहेत. व्यवस्थित आखून दिलेल्या बर्‍याच ट्रेल्स आहेत, आपण त्यापैकी आपल्याला पाहिजे ते रूट्स आपण घेउ शकतो. आम्ही अप्पर लेक्स आणि लोअर लेक्स दोन्ही थोडक्यात कव्हर (४-६ तासात) होतिल असे २ रूटस केले. या नॅशनल पार्कचे काही फोटो -

हा तिथला सगळ्यात मोठा धबधबा.

हे सगळे पूर्ण करण्यासाठी आम्हाला जवळजवळ ८ तास लागले. एकूण ७-८ किलोमिटर्स चालणं झालं असेल. मुलींनीही पार्कमध्ये फिरणं चांगलंच एंजॉय केलं. इथून आम्ही मुक्कामासाठी स्प्लिटला (क्रोएशियातले दुसर्‍या क्रमांकाचे शहर) गेलो.

भाग दुसरा - http://www.maayboli.com/node/48718
भाग तिसरा - http://www.maayboli.com/node/48810
भाग चौथा - http://www.maayboli.com/node/49119

मस्त. मॉटेनिग्रो जेम्स बाँड च्या सिनेमात बघून माहिती होते. एक धबधबा राजकपूरच्या सिनेमातला वाट्तो आहे. तिथे खायला प्यायला काय असते?

अहाहा!!! काय अप्रतिम निसर्गसौंदर्य आहे. Happy

कृपया या देशांबद्दल आणि ठिकाणांबद्दल अजून माहिती लिहा ना.

जबरी !!!!!!

पूर्व युरोपात फिरायला जायचं आहे नक्की.. बरय तू फिरून घे म्हणजे नंतर फर्स्टहँड माहिती मिळेल.. Happy

पुढचे भाग पटापट टाक... Happy

सुंदर Happy वर्णन हवंच.
युगोस्लावियन यादवीच्या काही खाणाखुणा आता तिथे दिसत नाहीत का?

धन्यवाद मंडळी. लवकरच पुढचे भागपण टाकतोय. हे नॅशनल पार्क खूपच सुंदर आहे. इथल्या समर आणि फॉलमधे तर अजूनच सुंदर दिसतं असं ऐकलंय आणि फोटोत बघितलंय. आम्ही प्री-सीजन गेल्यानं आणि त्या दिवशी ढगाळ हवा असल्यानं फोटो तेव्हढे चांगले आले नाहित.

तिथे खायला प्यायला काय असते? >> नॅशनल पार्कमध्ये काही रेस्ट एरियाज आहेत. तिथे कॉफी आणि काही स्नॅक्स, केक्स वगैरे मिळतात. बाकी क्रोएशियामधे (स्पेशली डालमेशियामधे) सीफूड प्रसिध्द आहे. आम्ही शाकाहारी असल्याने ते काही खाउन बघू नाही शकलो. पण, शाकाहारी लोकांसाठी पास्ता, पिझ्झा, सँडविचेस मिळतात. देशी रेस्तराँ फारसे नाहित (फक्त झाग्रेब मधे २-३ आहेत असं आमच्या टॅक्सीवाल्यानं सांगितलं). पण स्प्लिट आणि दुब्रॉव्निकमधे आम्हाला शुध्द शाकाहारी रेस्तराँ मिळाले. दुब्रॉव्निकमधल्या रेस्तराँमधेतर देशी पदार्थपण होते (थाळी टाइप).

बरय तू फिरून घे म्हणजे नंतर फर्स्टहँड माहिती मिळेल >> नक्की पराग.. पूर्व युरोप खूप सुंदर आहे. Happy

युगोस्लावियन यादवीच्या काही खाणाखुणा आता तिथे दिसत नाहीत का? >> आम्हाला नॅशनल पार्कच्या वाटेवर काही उध्वस्त घरं दिसली. पण यादवी संपून आता बरीच वर्षं झालीत त्यामुळं बहुतेक घरांची डागडुजी करून घेतली आहे. ज्या मॉन्युमेंटसना धक्का लागला होता ते मॉन्युमेंटसचीपण सरकारनं डागडुजी करून त्यांना पूर्वीसारखं करून घेतलंय (उदा. बोस्निया मधला मोस्टारचा पूल). शिवाय डालमेशियामधे यादवीच्या फारशा खुणा दिसत नाहीत. झाग्रेबच्या आजूबाजूला काही ठिकाणं अजूनही आहेत जिथे या खुणा दिसतील.

खूप छान फोटो.
थोडा वेगळा विषय ..पण डोक्यात प्रश्न आला...डालमेशियन कुत्र्यांचं मूळ या डालमेशियात आहे का?

डालमेशियन कुत्र्यांचं मूळ या डालमेशियात आहे का? >> हो. डालमेशियात खूप बेटं(१०००+) आहेत ज्याचं डालमेशियन कुत्र्यांवरच्या डागांशी साम्य आहे. Happy

खूपच सुंदर सर्व फोटो आणि वर्णन. समुद्राची पुळण 'मिस' केली, समुद्र दिसला की वाळू आठवतेच, इतकी सवय झालीय.

शाकाहारी लोकांचे खाण्याचे हाल नाही होत, हे मस्त आहे.

वेगळी जागा आमच्याशी शेअर केल्याबद्दल धन्यवाद.

डालमेशियन कुत्र्यांचं मूळ या डालमेशियात आहे का? >> हो. डालमेशियात खूप बेटं(१०००+) आहेत ज्याचं डालमेशियन कुत्र्यांवरच्या डागांशी साम्य आहे.
ओह....असं काही कनेकशन असेल माहिती नव्हतं.

सुंदर. आम्ही क्रोएशियाला डुब्रोव्हनिकला गेलो होतो. निसर्गाने लयलूट केली आहे तिथे. हे फोटो पण खूप सुंदर आहेत. कधीतरी भरपूर वेळ काढून जायला पाहिजे अशी जागा दिसतेय.

भारी! Happy

धन्यवाद मंडळी.

आम्ही क्रोएशियाला डुब्रोव्हनिकला गेलो होतो. निसर्गाने लयलूट केली आहे तिथे >>अगदी.. आम्हालापण दुब्रॉव्निक सगळ्यात जास्त आवडले. दुब्रॉव्निकचा भाग टाकतोय लवकरच. Happy

मस्त माहिती सुंदर फोटो .. Happy

मला तर काहीच माहित नाही क्रोएशिया बद्दल तिथला एक नुसत्या एसेस् च्या जोरावर विम्बल्डन जिंकलेल्या एका टेनिस खेळाडू व्यतिरीक्त ..

Pages