बाल्कन युरोप - क्रोएशिया - भाग १ - झदार, प्लिटवित्से नॅशनल पार्क

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

युरोपातली टिपीकल/ऐतिहासिक शहरं बरीच बघून झाली म्हणून यावेळी स्प्रिंगमध्ये थोड्या वेगळ्या ठिकाणी जायचं ठरवलेलं. एका मित्राच्या फेसबूकवर त्याच्या क्रोएशियाच्या ट्रीपचे फोटो बघितले होते म्हणून क्रोएशियाबद्दल (विशेषतः डालमेशिया भागाबद्दल) माहिती गोळा करू लागलो. काही फोटो बघताच आणि थोडी माहिती घेउन लगेच तिकडं जायचं फ्लाइट टिकीट बूक करून टाकलं. क्रोएशियाबद्दल माहिती घेतानाच अचानक माँटेनेग्रो या देशातील काही ठिकाणंपण कळाली. खरंतर तोपर्यंत माँटेनेग्रो नावाचा देशपण अस्तित्वात आहे हेच माहिती नव्हतं. पण कोटोर, माँटेनेग्रोचे फोटो/वर्णन वाचलं आणि तिकडंपण जायचं ठरवलं. प्लॅन अशाप्रकारे केला की झदार, क्रोएशियाला जायचे आणि परत येताना पोडगोरिचा, माँटेनेग्रोहून परत यायचं.
हे दोन्ही देश अमर्याद निसर्गसौंदर्यानं नटलेले आहेत. क्रोएशियामधे (स्थानिक भाषेत हर्वात्स्का(Hrvatska)) तसं बघितलं तर पर्यटन हाच सगळ्यात महत्त्वाचा व्यवसाय आहे. माँटेनेग्रो हा युरोपतला सगळ्यात तरूण देश, २००६ साली स्वतंत्र झालेला. या दोन्ही देशांना अतिशय सुंदर अ‍ॅड्रियाटिक समुद्रकिनारा लाभला आहे.

आम्ही ब्रसेल्सहून झदारच्या छोट्याश्या विमानतळावर उतरलो. विमानतळाहून हॉटेलकडं जाताना जणूकाही गोव्यात असल्याचा फील येत होता. झदारच्या आजूबाजूला पाहण्यासारखं बरंच आहे पण आमच्या प्लॅनप्रमाणं आमच्याकडं तिथं फक्त एकच संध्याकाळ होती. दुसर्‍या दिवशी सकाळी उठून प्लिटवित्से नॅशनल पार्कला जायचं होतं.

झदार - हे जवळजवळ ३००० वर्ष जुनं शहर. बराच काळ शहरावर रोमन्स आणि व्हेनेशियन्सनी राज्य केलं. एकेकाळी हे डालमेशियामधलं सगळ्यात श्रीमंत शहर होतं.

सेंट डोनॅटस चर्च आणि रोमन फोरमचे अवशेष-

समुद्रकिनारा -

इथं समुद्राकाठी 'सी ऑर्गन' नावाचा अद्भूत प्रकार आहे. समुद्राकाठी संगमरवरी फरशीच्या पायर्‍या आहेत. या पायर्‍यांचा आत पाइप्स/ट्यूब्ज बसवल्यात. या ट्यूब्ज पायर्‍यांच्या पृष्ठभागावर उघडतात. या ट्यूब्जमधून समुद्राच्या लाटांमुळे आवाज येतो (एखाद्या वाद्द्यातून आल्यासारखा). तिथंच 'सन सॅल्यूटेशन' नावाचे सौर ऊर्जेवर चालणारे लाइट्स आहेत. आम्ही गेलो त्या दिवशी ढगाळ वातावरण असल्यानं खूपच थोडे लाइटस लागले होते.

डालमेशियातल्या इतर शहरांप्रमाणे जुनं झदारपण मोठ्या भिंतीनं वेढलेलं आहे. या सगळ्या शहरांनी शत्रूच्या (मुख्यतः टर्की ओट्टोमान) हल्ल्यापासून बचावासाठी सभोवती मोठाल्या भिंती उभ्या केल्या होत्या. या भिंती अजूनही शाबूत आहेत.

दुसर्‍या दिवशी जॉनी टॅक्सीतून आम्ही प्लिटवित्से नॅशनल पार्कला गेलो. जाताना जॉनी सर्बियन युद्धाबद्दल माहिती देत होता. त्याचे वडील युगोस्लाव सैन्यातून लढले होते. जाताना वाटेत काही घरं लागली जी सर्बियाबरोबरच्या युध्दात उध्वस्त झाली होती. नशिबानं सर्बियन फौजांनी प्लिटवित्स नॅशनल पार्कचे नुकसान केले नव्हते नाहितर जग एका अतिशय सुंदर निसर्गसौंदर्याला मुकलं असतं. प्लिटवित्से नॅशनल पार्क तिथल्या तळ्यांसाठी आणि धबधब्यांसाठी प्रसिध्द आहे. एकूण १६ तळी एकमेकांशी जोडली गेलीत. ही तळी टॅव्हर्टाइनपासून बनलेल्या बांधांनी वेगळी झालीत. या तळ्यांमधील पाण्याचा रंग हे इथलं खास वैशिष्ठय. शिवाय प्रदूषण जवळ्जवळ नसल्यानं पाणी एकदम पारदर्शक. बर्‍याच ठिकाणी तळ स्पष्ट दिसतो. पार्कमधे फिरण्यासाठी सगळीकडे लाकडी किंवा नैसर्गिक वॉकवेज आहेत. व्यवस्थित आखून दिलेल्या बर्‍याच ट्रेल्स आहेत, आपण त्यापैकी आपल्याला पाहिजे ते रूट्स आपण घेउ शकतो. आम्ही अप्पर लेक्स आणि लोअर लेक्स दोन्ही थोडक्यात कव्हर (४-६ तासात) होतिल असे २ रूटस केले. या नॅशनल पार्कचे काही फोटो -

हा तिथला सगळ्यात मोठा धबधबा.

हे सगळे पूर्ण करण्यासाठी आम्हाला जवळजवळ ८ तास लागले. एकूण ७-८ किलोमिटर्स चालणं झालं असेल. मुलींनीही पार्कमध्ये फिरणं चांगलंच एंजॉय केलं. इथून आम्ही मुक्कामासाठी स्प्लिटला (क्रोएशियातले दुसर्‍या क्रमांकाचे शहर) गेलो.

भाग दुसरा - http://www.maayboli.com/node/48718
भाग तिसरा - http://www.maayboli.com/node/48810
भाग चौथा - http://www.maayboli.com/node/49119

मस्त आहेत फोटो आणि वर्णन. विशेषतः धबधबे आवडले. माँटनेग्रो म्हणजे काळा पर्वत्/डोंगर असा काही आहे का तेथे?

माँटनेग्रो म्हणजे काळा पर्वत्/डोंगर असा काही आहे का तेथे? >> माझाही तोच अंदाज आहे. तिकडे सगळीकडे हिरवेगार (काळ्या रंगाजवळ जाणारे) डोंगर भरपूर आहेत.

सशल.. इव्हानइसेव्हिच स्प्लिटमधे रहातो. त्याची टेनिस अ‍ॅकेडमी आहे बहुतेक आता तिथे ('जॉनी'ने सांगितलेली माहिती) Happy
क्रोएशिया तसा छोटा देश आहे पण तिथे स्पोर्टस कल्चर चांगलंच रूजलंय. या देशाने आतापर्यंत ऑलिंपिकमधे २३ पदकं जिंकलीत.

मनीष तुमची ही सिरीज अतीशय देखणी आहे. खरच मन भरत नाही, परत बघावेसे वाटते. तुम्ही तिथे किती दिवस आहात? जर अजून वेळ असेल तर भरभरुन पाहुन घ्या. कारण भारतात परत आल्यावर परत लवकर कुठे जाणे होतेच असे नाही. आमचा तोच अनूभव आहे. पण निदान तुमच्या फोटोन्मुळे अर्धे जग तरी बघीतल्यासारखे वाटले.:स्मित:

तुम्हाला पुढच्या ट्रिपसाठी अनेक शुभेच्छा.:स्मित:

धबधबे आहेत की काय आहे हे... मस्त फोटो.
असं पेंटिंग पाहिलं असतं तर वाटलं असतं असे कधी धबधबे असतात का.. Happy

Pages