तांदळाच्या पिठाची ताकातील उकड

Submitted by प्रमोद् ताम्बे on 19 April, 2014 - 00:35

तांदळाच्या पिठाची ताकातील उकड
 पिठीची ताकातील उकड.jpg
साहित्य : अर्धी वाटी तांदूळाची पिठी, कढिपत्त्याची १०-१२ पानं, चवीनुसार मीठ, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर,आंबटपणासाठी एक वाटी किंचित आंबट ताक,फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, चवीप्रमाणे हिरव्या मिरच्या तुकडे करून, एक चमचा आले-लसणाची पेस्ट
कृती : प्रथम एका बाऊलमध्ये तांदळाची पिठी घेऊन त्यात ३ वाट्या पाणी घाला. आंबटपणासाठी एक वाटी किंचित आंबट ताक घाला. पिठाच्या गुठळ्या रहाणार नाहीत इतपत मिश्रणात एकजीव करून घ्या. मग त्यात चमचाभर आले-लसणाची पेस्ट,चवीनुसार मीठ, साखर घाला.बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. मिश्रण अधेमधे ढवळत रहा. अन्यथा पिठाच्या गुठळ्या होतील.एका निर्लेपचा फ्राय-पॅनमध्ये तेल घेऊन मध्यम आचेवर तेल तापत ठेवा. तेल चांगले कडकडीत तापल्यावरच त्यात मोहरी घाला. मोहरी तडतडल्यानंतर त्यात अनुक्रमे हिंग, हळद, कढिपट्ट्याचा पानं, मिरचीचे तुकडे घालून परता. मग त्यात तांदळाच्या पिठीचे मिश्रण घाला व डावाने ढवळत रहा,लवकरच मिश्रण घट्ट होऊ लागेल. उकड अजून थोडी पातळ हवी असेल तर त्यात गरजेनुसार पाणी घालून परत मिश्रण एकसारखे करून घ्या.
परत एकदा चव पाहून चवीनुसार मिरची, मीठ, साखर, ताक ह्यापैकी जे आवश्यक असेल ते घाला.
गरम गरम उकडीवर वरून साजूक तूप घालून खायाला द्या.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उकडीला झाकण ठेवून दणदणून ३-४ वेळेला वाफ द्यावी लागते, तुकतुकीत चकाकी येईतोवर. तेही लिहा. महत्वाचे आहे, चव त्यामुळेच येते. वरून तेल घ्यायचीही पद्धत आहे. बाकी ठीक.

आमच्याकडे सरबरीत लागते उकड, शिवाय आलं न घालता लसूण जास्त प्रमाणावर घालतो आम्ही. असो Happy

सर,

हा अप्रतिम पदार्थ दिल्याबद्दल धन्यवाद! पौष्टिकही असतो आणि सकाळी सकाळी खायला मजाही येते. ह्याच्याबरोबर लसणाच्या दोन पाकळ्या आणि वरून चमचाभर गोडेतेल घ्यायचे, वर परत लाल तिखट भुरभुरायचे.

मस्त!

आम्ही तूप जिरे मिरची अशी फोडणी करतो, कच्चा लसूण ठेचून डायरेक्ट उकडीत घालतो, सरबरीतच / आसट लागते आम्हाला पण.

वा, माझा आवडता पदार्थ फक्त मी साखर घालत नाही आणि मिरची,लसूण यांचे तुकडे घालते, आलं मी क्वचितच घालते. दाताखाली आलेकी चावायला आवडतात आणि वरून तेल घेतात आमच्याकडे.

हल्ली बऱ्याचदा मी मायक्रोवेव्हमध्ये करते उकड, छान होते.

आमच्याकडे नेहमी होते. आजसुद्धा केली होती. मी फोडणीत भरपूर लसूण आणि लाल मिरची देखिल वापरते.

हो एका वाटी तां. पिठीस ३ वाट्या पाणी + ताक (निम्मे निम्मे) अथवा पूर्ण कमी आंबट ताक हे जमते