लव्ह - ट्रँगल (Love-Triangle)

Submitted by बोबो निलेश on 4 April, 2014 - 13:33

-----------------------------------------------------------------------------------

रिचाचं आणि माझं तसं सारं व्यवस्थित चाललं होतं, रिचा दिवसातला बराच वेळ मला देत असे. त्या व्यतिरिक्त नित्यनियमाने फोनवर बोलणे होत असे . कधी ती फोन करत असे तर कधी मी. पण गेल्या जवळ जवळ वर्षभरात हे चित्र बदललं होतं.आता फक्त मीच फोन करत होतो. आणि पूर्वी तासन तास फोन वर बोलणारी रिचा मात्र फोन उचलल्या पासून "ठेवू का?" चा घोष लावत असे.
आजसुद्धा तिच्या फोनची वाट पाहून शेवटी मीच तिला फोन लावला. तिने फोन उचलला, पण पहिलेच वाक्य -"अरे जरा बिझी आहे, नंतर बोलूया का?" मी विचारले "कुणी बरोबर आहे का?" "हो, राकेश आहे. मी तुला नंतर फोन करेन." असे म्हणून मी पुढे काही बोलायच्या आत तिने फोन ठेवला. "राकेश!!" मी काहीसं चिडूनच फोन खाली ठेवला. आजकाल जवळ जवळ सारा वेळ रिचा राकेशबरोबर घालवू लागली होती. रिचा आणि माझ्यामध्ये राकेश कडमडला होता. पूर्वी आतुरतेने आणि तत्परतेने उचलले जाणारे माझे फोन कॉल्स आता मिस्ड कॉल्स मध्ये जमा होऊ लागलं होतं. रिचाचं माझ्यावर अतोनात प्रेम आहे याची मला एके काळ खात्री होती. पण आता त्या प्रेम कहाणीचं रुपांतर लव्ह ट्रायंगल मध्ये रुपांतर झाल्याची चिन्हे दिसू लागली होती.
रिचाचं आणि माझं बोलणं बरेचसे जुजबी होऊ लागलं होतं.थोडं फार बोलणं होई त्यात ती राकेश बद्दल जास्त बोलू लागली होती.इतके दिवस ती कायम माझे कौतुक करत असे. पण आता राकेशचे कौतुक होऊ लागलं होतं.रिचाचं माझ्याकडे होणारे दुर्लक्ष मला बरेच जाणवू लागलं होतं.
कालचाच प्रसंग. आज (म्हणजे काल रात्री १२ वाजल्यापासुन) माझा वाढदिवस. आमची ओळख झाल्यापासून रिचाने कधी माझा वाढदिवस चुकवला नव्हता. सर्वात आधी शुभेच्छा, ते सुद्धा आदल्या रात्री बरोबर १२ च्या ठोक्याला रिचा देत असे.आणि दुसर्‍या दिवशी जंगी पार्टीचं प्लानिंग सुद्धा तीच करत असे. पण काल रात्री मात्र रिचाकडून शुभेच्छा मिळाल्या नाही. कदाचित ती बिझी असल्याने विसरली असेल अशी मी मनाची समजूत घातली.कदाचित तिला सकाळी आठवेल आणि ती सकाळी मला शुभेछा देण्यासाठी ऑफिसमध्ये फोन करेल आणि काल रात्री शुभेच्छा द्यायला विसरल्याबद्दल माझी माफी मागेल, असं मी स्वतःला समजावलं. पण सकाळ संपली दुपार होऊन गेली, संध्याकाळची चाहुल लागली तरी तिचा ऑफिसमध्ये फोन काही आला नाही. आता मात्र मी पुरता वैतागलो. मनाशी चरफडलो. तेवढ्यात माझ्या फोनची रिंग वाजली. पाहतो तर की, चक्क रिचाचा फोन. एका क्षणात माझा सारा राग,वैताग नाहीसा झाला. रिचाबद्दल आतापर्यंत मी काय काय विचार केले ते आठवून स्वतःची लाज वाटली.
"बोल", मी माझी उत्सुकता माझ्या आवाजात दिसू न देण्याचा प्रयत्न करत होतो.
तिच्या मधुर आवाजात वाढदिवसाच्या शुभेच्छा ऐकण्यासाठी माझे कान पुरते आतुरले होते.
"जतीन, वाढदिवसाचा काय प्लान?", मला आधी वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्याऐवजी रिचाने सरळ मुद्द्याला हात घातला हे पाहुन मी चक्रावलो.
"काय म्हणजे? जाऊ की मंत्रामध्ये नेहमीप्रमाणे.” मी माझ्या आवडत्या हॉटेलचं नाव सुचवलं.
"हॉटेल मध्ये कशाला? काही तरी वेगळं प्लान करू. हा वाढदिवस राकेशसाठी स्पेशल आहे!!"
माझ्या कानाला काही तरी खटकलं.
"वाढदिवस राकेशसाठी स्पेशल? तू नक्की माझ्या वाढदिवसाबद्दल म्हणतेयस की… ?" पटकन माझ्या तोंडून निघालं.
"अरे मी तुझ्या नाही, राकेशच्या वाढदिवसा बद्दल बोलते आहे " रिचा हे बोलली खरी आणि त्याच वेळी तिच्या डोक्यात १०० वॅट्सचा उजेड पडला. "ओ माय गॉड , जतीन आज तुझा वाढदिवस आहे आणि मी चक्क विसरले. आय एम सो सॉरी." रिचा आणखी बराच काही पुढे बोलली, पण मी ते ऐकत नव्हतो. ती माझा वाढदिवस विसरली हे जाणवून मी दुखावला गेलो होतो.
रिचाचं माझ्याकडे दुर्लक्ष होत होतं हे मला कळत होतं, पण आज त्याचा कळस झाला होता. तिच्याशी बोलायचं म्हणून काहीतरी बोलून मी फोन ठेवला.रिचाच्या आयुष्यात माझं महत्व आता कमी झालं होतं हे आता मला ढळढळीतपणे जाणवलं होतं. यातून कसा मार्ग काढायचा त्याचा विचार मी करू लागलो. लव्ह ट्रायांगल्स चित्रपटातच बरे, आयुष्यात ते परवडत नाही, हेच खरं. माझं डोकं पुरतं भणाणून गेलं, पण काय करावं ते सुचेना. दूर कुणाच्या तरी कॉम्प्युटरवर गाणं लागलं होतं .. क्या हुवा तेरा वादा..
माझं कामात लक्ष लागेना. कॉम्प्युटर लॉक केला.
कंपनी समोरच्या टपरी वर जाऊन सिगारेट घेतली. हवेत धूर सोडला. पण धुराची वलयं सुद्धा त्रिकोणी दिसू लागली. मनातच चरफडत सिगारेट पायाखाली चिरडली.
ऑफिसमध्ये परतलो. कसं बसं कामात गुंतवून घ्यायचा प्रयत्न केला. ७ वाजले. डेस्क आवरलं. कॉम्प्युटर बंद केला आणि ऑफिस्मधून बाहेर पडलो. ऑफिसच्या समोरच बस थांबा होता. तिथे आलो. नेहमीची बस पकडली. नेहमीप्रमाणे तासभर ट्राफिकमध्ये काढून ८ वाजता इमारतीच्या समोरच्या बस थांब्यावर उतरलो. विषण्ण मनाने जिन्याच्या पायऱ्या चढलो. बेल वाजवली. थोडा वेळ वाट पहिली, पण दार काही उघडलं नाही. ह्या वेळेला घरातले कुठे बाहेर गेले म्हणून चरफडत माझ्याकडची चावी शोधली आणि त्या चावीने दार उघडलं. संध्याकाळ झाल्यामुळे आत काळोख होता. दरवाज्याच्या बाजूच्या भिंतीवरचं दिव्याचं बटण शोधू लागलो. दिवा लावणार तेवढ्यात आपोआप घरातले सारे दिवे लागलं. आणि पाहतो तर काय घरात कोण जत्रा.. घरात माझे मित्र आणि माझे सारे नातेवाईक जमलेले. आणि साऱ्यांच्या पुढे माझी लाडकी पत्नी "रिचा" जी कधी नव्हे तो आज माझा वाढदिवस विसरली होती (असा माझा समज झाला होता) आणि तिच्या कडेवर आमच्या आगळ्या प्रेम त्रिकोणातला तिसरा कोन म्हणजे आमचा चिमुकला "राकेश". रिचाच्या माझ्यावरील प्रेमातला नवा भागीदार. पुढच्या आठवड्यात पठ्ठ्याचा पहिला वाढदिवस. त्याच्यासाठी, खरं तर आम्हा सर्वांसाठीच स्पेशल. मला पाहताच त्याच्या ओठांवर मिश्कील हसू आलं आणि तो माझ्या कडे झेपावला. सगळेच लव्ह ट्रायांगल्स काही वाईट नसतात, हेच खरं.
साऱ्यांनी एका सुरात "हॅप्पी बर्थडे - जतीन" चा घोष केला.
दूरवर कुठे तरी रेडिओवर प्रशांत दामले गात होतं "मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असते?"

======================== समाप्त ========================

पुर्वप्रसिद्ध

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा चांगली आहे, 'लव्ह ट्रँगल' च्या पुढे प्रश्नचिन्ह (?) असते तर जास्त समर्पक झाले असते. तसेच गेल्या काही महिन्यांपर्यत चांगले चालले होते त्या ऐवजी वर्षभरा पर्यंत जास्त योग्य ठरले असते.

कथा चांगली आहे पण जतीनच कॅरॅक्टर अजीबात पटले नाही. रच्याकने, आई - वडीलांची नावे एवढी स्टायलीश आणि मुलाचे नाव राकेश??? खुपच जुन्या जमान्यातल वाटतय!

सेम टू सेम शादी के साईड इफेक्ट्स....
फारशी आवडली नाही.... सॉरी!
कथाबिज रुचलं नाही..... मांडणी छान Happy

<<<<
रिया. | 5 April, 2014 - 04:30

सेम टू सेम शादी के साईड इफेक्ट्स....

>>>

ही कथा मी सप्टेंबर २०१२ला लिहिली. मे २०१३ ला ती मासिकात प्रकाशित झाली.
याउलट शादी के साईड इफेक्ट्स...हा चित्रपट 28 February 2014 ला रिलीज झाला.
शिवाय मी तो पाहिलाही नाहीय.
बाकीचा अभिप्राय स्पष्ट होता. त्या अभिप्रायाबद्दल धन्यवाद.
कुणी सांगावं, कदाचित पुढच्या कथेची केवळ मांडणीच नाही तर कथा बीज ही तुम्हाला आवडून जाईल Happy
I am keeping my fingers crossed ....

@विजय देशमुख - धन्यवाद. तुम्हाला कथा आवडेल असं वाटलं होतं. तुमचे लेख/कथा वाचल्यामुळे तुमच्याबद्दल तसं वाटलं असेल कदाचित.

@कुसुमिता१२३४ - धन्यवाद. कथा लिहित होतो तेव्हा राजेश आणि जतीन ही दोन नावं डोक्यात होती. त्या दरम्यान राजेश खन्ना यांच्या मृत्यूची बातमी ताजी होती. त्याचा परिणाम. प्रत्यक्ष लिहिताना राजेशचं राकेश झालं.

@वेदिका२१ - कदाचित पुढची कथा तुम्हाला आवडून जाईलही Happy

उत्तम कथा . मला प्रचंड आवडली . ओघवती भाषा व शेवट गोड. या कथेवरून मला एका मराठी अंकात वाचलेली भाषांतरित "मी व माझा एडीपस गंड" नावाची कथा आठवली . शुभेच्छा. Happy

ही कथा मी सप्टेंबर २०१२ला लिहिली. मे २०१३ ला ती मासिकात प्रकाशित झाली.
याउलट शादी के साईड इफेक्ट्स...हा चित्रपट 28 February 2014 ला रिलीज झाला.
शिवाय मी तो पाहिलाही नाहीय.
>>>
हो हो! माझं तसं म्हणणं नव्हतं Happy
कथा आधी आलीये मग सिनेमा हे पुर्वप्रकाशित वरुन कळतय . गै न Happy
फक्त कथा वाचुन सिनेमा आठवला म्हणून तसं लिहिलं Happy

बोबडे बोल- तुमची भाषा ओघवती आहे व वाचकांना गुंतवून टाकते. मला कथा आवडली नाही म्हणण्यापेक्षा शेवट मला आवडला नाही असं म्हणूया Happy लिहित राहा नक्कीच!

धन्यवाद Rajesh K. लिखाण आपल्याला आवडलं याचा आनंद झाला.

धन्यवाद रिया, वेदिका२१

प्रसाद १९७१ - लिखाणाबद्दल तुमच्या मताचा आदर आहे. मासिकांच्या दर्जावर इथे मत व्यक्त करणं पटलं नाही. शिवाय दर्जा हा व्यक्तीसापेक्ष असतो.

धन्यवाद Rajesh K.
दोन्ही कथां मध्ये jealousy चा element आहे. माझ्या कथेत कथानायकाच्या दृष्टीकोनातून, तर तुम्ही दिलेल्या कथेत मुलाच्या दृष्टीकोनातून. कथा आवडली.
मुलाच्या मनात असलेल्या jealousy ला Oedipus Complex म्हणतात, तसं बापाच्या मनातल्या jealousy ला वैद्यकीय/मानस शास्त्राच्या भाषेत काही नाव आहे काय?
कदाचित माबोवरील तज्ञ डॉक्टर्स (त्यांनी या कथा वाचल्या असतील तर Happy )याबाबत खुलासा करतील.

<<<<<पण धुराची वलयं सुद्धा त्रिकोणी दिसू लागली

हाहा मस्त रे बोबो. लेख आवडला मला. suspense भारी होता. I honestly feel ki Love Triangle is not such a bad choice. in fact it helps in holding back that suspense. लिखते राहो !

धन्यवाद अमित M.
आधीही काही जणांना ते वाक्य आवडलंय. नायकाची मनस्थिती व्यक्त करणारं ते वाक्य आहे. स्वतःच स्तुती करू नये म्हणतात, पण मला स्वतःलासुद्धा ते वाक्य खूप आवडतं Happy

रानिपै - कथेविषयीच्या तुमच्या भावना बऱ्याच तीव्र असाव्यात. दोनदा प्रतिक्रिया दिलीत म्हणून म्हटलं Happy

अभिप्रायाबद्दल धन्यवाद आबासाहेब Happy

शलाका मॅडम, तुमच्या मताचा आदर आहे. ही मी लिहिलेली पहिलीच कथा. त्यात दोष नाहीत असा माझा बिलकुल दावा नाही.

अस वाटतंय कि बऱ्याच लोकांना हि गोष्ट मासिकात प्रसिद्ध झाली याच आश्चर्य वाटतंय. हे अभिप्राय गमतीने केलेले आहेत कि गांभीर्याने, माहित नाही. पण मला यामध्ये काही आश्चर्य वाटले नाही .
कदाचित हि एक कोणताही ट्विस्ट नसलेली साधी व सरळ लघुकथा असल्यामुळे असे वाटले असेल. पण मी अनेक मान्यवर लेखकांच्या यापेक्षा सध्या लघुकथा वाचल्या आहेत. कदाचित कथेचे नाव वाचून अपेक्षा जास्त व वेगळ्या असतील. व त्यापेक्षा कथा वेगळी असल्यामुळे असे वाटले असेल. Happy

शेवटी सचिन तेंडूलकर च नुकतच प्रसिद्ध झालेलं एक वाक्य = Criticise; don't cricify.

खरंच छान आहे कथा . इतर लोकांना का आवडली नाही ते कळल नाही . नावावरून वाचकांच्या वेगळ्या अपेक्षा असतील, त्यामुळे तसं झाले असेल कदाचित. परंतू छान लेखन आहे तुमचे….

चांगले कथाबीज आहे, आवडली.

वर काही जणांना नाही आवडली, अगदी तसे ठाम सांगण्याएवढी नाही आवडली.. अर्थात हे ज्याचे त्याचे वैयक्तिक मत आहे आणि त्याचा आदर आहेच.

पण मासिकात कशी आली असा जो तर्क आहे त्यावर मात्र सांगावेसे वाटते की तद्दन फालतू आणि बंडल कथानक असलेले सिनेमे या देशात १००+ कोटींचे धंदे करतात, त्याबद्दल किती आश्चर्य व्यक्त कराल मग Happy