खाऊन पिऊन वजन कमी करा

Submitted by शरद on 26 March, 2014 - 09:19

मथळा वाचून आश्चर्य वाटले ना! मलाही ते पुस्तक वाचण्यापूर्वी असेच वाटत होते. पण हे शक्य आहे, नव्हे, कुठलेही विपरीत परिणाम न होता वजन कमी करण्याची हीच एक शास्त्रीय पद्धत आहे. कशी तेच या लेखातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे.

तसे पाहिले तर तिची माझी ओळख नव्हती आणि नाही. कधी टी.व्ही. वर कुठला पुरस्कार घेताना तिला पाहिले असेल तेवढेच! पण एक पुस्तक हाती आले आणि ती जणु माझी मैत्रिणच झाली. तिचं नाव आहे ऋजुता दिवेकर. (इथे ऋषी मधील ऋ कसे लिहायचे ते ठाऊक नाही म्हणून रु असे लिहिले होते. सध्या कॉपी-पेस्ट केले आहे. कसे लिहायचे कुणी सांगेल का?) अजून हे नाव घरा घरात पोचलेले नाही; पण झिरो फिगर वाली करिना कपूर आणि ४२ कि.मी.ची मॅरॅथॉन पूर्ण करणारा एकमेव 'कॉर्पोरेट जायंट' अनिल अंबानी यांची ती 'डायेट कन्सल्टंट' आहे, एवढीच तिची ओळख पुरेशी आहे. वीस लाख प्रती खपलेल्या तिच्या त्या पुस्तकाचे नाव आहे 'डोन्ट लूज युवर माईंड, लूज युवर वेट'. हे पुस्तका पूर्णतः बंबैय्या इंग्रजी भाषेत लिहिले आहे, त्यामुळे समजायला सोपे आहे. संवादात्मक शैली असल्याने पुस्तक वाचताना जणु आपण गप्पाच मारतोय असे वाटते. आणि मग प्राप्त होते खाऊन पिऊन वजन कमी करण्याचे अद्भुत ज्ञान.

हा लेख म्हणजे पुस्तक परीक्षण नाही. कारण यात माझे काही विचार घालून (जे माझ्या आणि माझ्या परिचितांच्या अनुभवातून आले आहेत) मी काही तत्वे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांचा पाया 'डोन्ट लूज युवर माईंड, लूज युवर वेट' हे पुस्तकच आहे.

१. वजन कमी करण्यासाठी औषधांचा वापर करू नका. फॅट 'जाळणार्‍या' बर्‍याच औषधांमुळे चरबी खरोखरच नाहीशी होते. पण त्यामुळे तिथल्या त्वचेवर परिणाम होतो. त्वचेला सुरकुत्या पडतात. जितके औषध 'स्ट्राँग' तितक्या जास्त सुरकत्या. काही औषधांमुळे तर जख्ख म्हातार्‍यांप्रमाणे त्वचा होते. दुसरे म्हणजे औषधे चालू असतानाच परिणाम होतो; बंद केले की परत 'ये रे माझ्या मागल्या'! तिसरे म्हणजे उत्साह रहात नाही, मरगळल्यासारखे वाटते. आपल्याला आरोग्य, उत्साह हवा; आणि कुठल्याही अन्य परिणामांशिवाय वजन कमी हवे.

२. व्यायामाला पर्याय नाही. वजन कमी करायचे असेल, तर 'डायेटिंग' किवा उपवास हा उपाय होऊ शकत नाही. व्यायामाला पर्याय नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कुणी म्हणत असतील की फक्त औषधे घेऊन आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या घेऊन वजन कमी होईल, तर ती व्यक्ती चक्क खोटे बोलत आहे असे समजावे. व्यायाम हवाच. दिवसातून किमान ४ किलोमीटर भरभर चालणे इतका व्यायाम हवा (सामान्य व्यक्तीला यापेक्षा जास्त व्यायाम जमत नाही आणि त्याची आवश्यकतासुद्धा नाही.) व्यायामाला प्राणायामाची जोड मिळाली तर जास्तच चांगले. बाबा रामदेवांचे दोन प्रमुख प्राणायाम (अनुलोम-विलोम आणि कपालभाती), तीन अन्य प्राणायाम (भर्स्त्रिका, भ्रामरी आणि बाह्य प्राणायाम) आणि इतर सर्व प्राणायाम जमतील तसे करावे. मात्र अनुलोम-विलोम आणि कपालभाती रोज हवेतच.

वरील दोन गोष्टी ध्यानात आल्या की मगच आपण खाऊन पिऊन वजन कमी करण्याविषयी आपण बोलू शकतो.

आपल्या शरिरात अन्नपचन होते म्हणजे नक्की काय होते ते सामान्यज्ञान आहे. आपण जेव्हा काही खातो तेव्हा चावत असतानाच त्यात लाळ मिसळते आणि पचनाला सुरवात होते. खाल्लेले अन्न जठरात पोचते तिथे काही ग्रंथींपासून पाचक रस मिसळतात. मग ते अन्न लहान आंतड्यामध्ये जाते. खरे अन्नपचन तिथे होते. पचलेल्या अन्नापासून विशिष्ट प्रकारची साखर निर्माण होते, ती रक्तात मिसळते आणि फुफ्फुसांमध्ये तिचा प्राणवायूशी संयोग होऊन उर्जा मिळते. पचलेले अन्न सोडून उरलेला चोथा मल बनून मोठ्या आंतड्यात जातो आणि शरिरातून बाहेर पडतो.

ज्याप्रमाणे मेंदू, हृदय, फुफ्फुसे अविरत काम करतात; त्याचप्रमाणे पचनेंद्रियेसुद्धा अविरत कार्यरत असतात; आणि ती तशी असावीत हीच अपेक्षा असते; नाहीतर मग पचनासंबंधी आजार होतात.

जर शरिरात अन्न नसेल तर काय होते? शरिराला उर्जा मिळत नाही, थकवा येतो, शरीर मरगळून जाते. मात्र पाचकरस निर्माण होतच असतात. त्यांचा विपरीत परिणाम होतो; त्यालाच आपण 'अ‍ॅसिडिटी' किंवा 'पित्त वाढणे' म्हणतो. 'डायेटिंग' किंवा उपवासामध्ये असे होण्याची शक्यता आहे; म्हणून शरिरात सदैव अन्न असले पाहिजे. मात्र ते इतके नको की अपचन होईल.

जर पोट पूर्णतः रिकामे असेल तर दोन महत्वाच्या गोष्टी घडतात. एक म्हणजे पचनसंस्थेकडून मेंदूला सिग्नल जातो, "शरिरात अन्न नसल्याने शरिराची उपासमार होत आहे". मेंदूकडून लगेच प्रतिसाद जातो, "येणार्‍या अन्नाला प्रतिबंध करू नका. मिळेल ते अन्न साठवून ठेवा." मग याचा दुसरा परिणाम म्हणजे नंतर जेव्हा अन्नग्रहण करतो तेव्हा आपण खातच राहतो -- आणखी एक पोळी, आणखी थोडा भात वगैरे वगैरे. मेंदू कडून तशी ऑर्डर अगोदरच मिळालेली असते. शिवाय त्यातील जास्तीत जास्त अन्नाचे चरबीमध्ये रुपांतर होते कारण ती ऑर्डरसुद्धा अगोदरच मिळालेली असते. कधी कधी तिसरा - अपचनाचा - परिणामसुद्धा दिसून येतो. 'डायेटिंग' करणार्‍या व्यक्तींचा हाच प्रॉब्लेम होतो. 'डायेटिंग' बंद केले की मग चक्रवाढ व्याजाच्या दराने वजन वाढायला सुरवात होते. म्हणून अन्न खाल्ले तर पाहिजेच - काय खावे, कसे खावे, किती खावे आणि किती वेळा खावे हे मग महत्वाचे ठरते.

काय खावे ? आपले लहानपणापासून खात आलेले अन्न सोडू नये. अर्थातच पिझ्झा, बर्गर ही आपली अन्नसंस्कृती नव्हे. कधी कधी चेंज म्हणून , कधी मजा म्हणून ठीक आहे. पण ज्याला आपण नियमित आहार म्हणतो तो आपल्या घरच्या खाद्यसंस्कृतीप्रमाणेच असला पाहिजे. तेलाचे पदार्थ, भात वगैरे खायला हरकत काहीच नाही; मात्र ते पचवण्यासाठी व्यायाम असेल तरच! नाहीतर मग असे 'वजन वाढवणारे' पदार्थ कमी खाल्लेलेच चांगले.

कसे खावे? जेवताना पूर्ण लक्ष फक्त जेवणाकडेच असावे. लहानपणी म्हणायचे 'एक घास बत्तीस वेळा चावून खावा', याचा अर्थ तोच आहे. नाहीतर मग 'खाल्लेले अंगाला लागत नाही' व अपचन होते.

किती खावे? जेवताना एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला वाटते की 'पोट भरले'. त्या क्षणी खाण्याचे बंद केले पाहिजे. नाहीतर मग वर लिहिल्याप्रमाणे 'आणखी एक पोळी, आणखी थोडा भात' हे पालुपद चालूच राहते. उरलेले 'संपवायचे आहे' म्हणून कधीच खाऊ नये.

किती वेळा खावे? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. याचे उत्तर परिच्छेद पाडून सविस्तर दिले पाहिजे.

पहिले 'जेवण' सकाळी उठल्यानंतर १५ ते वीस मिनिटात झाले पाहिजे. आश्च्रर्यचकित झालात ना? कारण सांगितल्यावर समजेल. आपण रात्री झोपतो. त्यानंतर २-३ तासात पूर्ण अन्नाचे पचन झालेले असते. त्यानंतरचे ४-५ तास पोट रिकामे असते. आपल्याला ते जाणवत नाही कारण आपण झोपेत असतो आणि शरिराची हालचाल बंद असल्याने उर्जेची जरुरी फारशी नसते. सकाळी उठतो तेव्हा रक्तातील साखर न्यूनतम झालेली असते. शरिराला अन्नाची नितांत गरज असते कारण दिवसाची कामे सुरू होणार असतात. उठल्या-उठल्या चहा घेणे हा पर्याय नाही; कारण त्याचा विपरीत परिणाम शरिरावर होतो. चहामुळे एकदम धक्का बसल्यासारखी साखर वाढते; त्याचा शरिरावर नकळत वाईट परिणाम होतो.

उठल्या उठल्या जेवताना भूक नसल्याने एकपेक्षा जास्त पोळी खाऊ शकत नाही. त्यामुळे नैसर्गिकरित्या अन्नग्रहणावर नियंत्रण येते. पुढच्या तासाभराने चहा व चहाबरोबर अर्धी पोळी चालेल. मात्र बेकरीचे पदार्थ शक्यतो टाळावेत. त्याने फक्त 'उदरभरण' होते. 'जाणिजे यज्ञकर्म' होत नाही.

त्यानंतर दर दोन-अडिच-तीन तासाने पुढचे जेवण घेत रहावे. मग आपल्या जेवणाच्या वेळेला जेवण (कमी प्रमाणात) आणि इतर वेळी एखादे फळ किंवा चहा - सरबत - दूध चालेल. मात्र दर दोन-अडिच तासाने काहीतरी खाल्लेच पाहिजे. जास्त खाण्याचा धोका नाही; कारण जास्त वेळा खाल्याने नैसर्गिकरित्या आपण कमीच खातो. त्यासाठी फारसा प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. शेवटचे जेवण मात्र रात्री झोपण्यापूर्वी दोन तास आधी झाले पाहिजे.

दिवसभरात भरपूर पाणी प्याले पाहिजे. त्याचे दोन फायदे होतात. एक म्हणजे आपल्या शरिरात दोन तृतिअंश भाग पाणी असते; त्यामुळे घामावाटे आणि मूत्रावाटे विसर्जित झालेल्या पाण्याची पूर्ती होते आणि दुसरे म्हणजे पोटात पाणी असल्याने अन्नग्रहण नियंत्रित होते.

ही साठा उत्तराची कहानी पाचा उत्तरी सकल संपूर्ण! लिहायला गेले तर खूप लिहिता येईल. पण ज्ञान पाजळणे किंवा 'बोअर करणे' हा उद्देश नसल्याने इथेच थांबतो!

(मायबोलीवरचे वजन कमी करण्याचे इतर अनुभव
वजन कसे कमी केले - एक स्वानुभव !
दिक्षीत डाएट आणि अनुभव
-वेमा)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

केदार, मनापासून अभिनंदन. खरंच एखाद्या जीमच्या जाहिरातीत लावण्यासारखाच आहे फोटो. तुमचा निग्रह शेवटपर्यंत टिकू देत हीच शुभेच्छा.

केदार जाधव, लय भारी. एरवी अशा बिफोर आणि आफ्टर फोटोंवर अजिबातच विश्वास बसत नाही पण तुमच्या फोटोवर नक्कीच बसला. चालणं, आणि नेहमीच्याच खाण्यात बदल करून, थोडं कंट्रोल करून हे रिझल्ट्स मिळालेत वाचून अगदी छान वाटलं. अजून किती कमी करायचं आहे तुम्हांला? शुभेच्छा. नवीन बीबी काढून त्यावर लिहीलंत तर उत्तम.

केदार, मोकीमी - हार्दीक अभिनंदन.
केदारने सांगितलेले डाएट करण्याजोगे आहे. पण मी प्रचंड फूडी असल्याने मनोनिग्रह होत नाही. Sad तिथेच घोडं अडतं आमचं.

केदार, मोकीमी, फारच प्रेरणादायी! मला ऋजुता दिवेकरचा फंडा पटतो..एकदा प्रयोग केला होता तेव्हा छान वाटलं होतं..पण तसं दरवेळी काय खायचं ह्याचं व्यवधान अंगात मुरल पाहीजे आणि तेच कठीण आहे!

काही मित्रांच्या आग्रहास्तव लेखाचे पुनरुज्जीवन केले आहे.

ज्यांना वाटते के ऋजुताचे पुस्तक हे फक्त श्रीमंतांसाठी आहे... त्यांचे म्हणण्यात फारसा तथ्यांश नसावा. कारण भाकरी, भाजी, आमटी वगैरे 'वेळेवर' ( दर दोन-तीन तासांनी ) आणि कमी प्रमाणात खाण्यासाठी श्रीमंत असण्याची गरज नाही.

फक्त इच्छाशक्ती हवी Wink

तीच गोष्ट व्यायामाची. Wink

मोकिमींनी अन्यत्र लिहिलेले वाचले होतेच. केदार : भारी कामगिरी!
वेट लॉस मेन्टेन करणेही कठीण आहे का? ते कसे केलेत तेही लिहा.

<किती खावे? जेवताना एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला वाटते की 'पोट भरले'. त्या क्षणी खाण्याचे बंद केले पाहिजे>

याबद्दल वाचल्याचे आठवते : पोट भरले आहे हा संदेश मेंदूला पोचायला काही वेळ लागतो. तोवर आपले खाणे चालूच राहते आणि आपण भुकेपेक्षा जास्त खातो. म्हणून पोटात आणखी चार घास/ एका पोळीची जागा आहे असे वाटत असतानाच खाणे थांबवावे.

मला दिवेकर चे पुस्तक एकदम पटलेले आहे. मी ६ ऑऊन्स चे बरेच डबे घेतले आहेत. रोज कामाला जाताना ते भरून घेउन जाते. सर्वच पदार्थ ताजे नसतात. दहि, फुटाणे, नट्स, ओटमील, एक भाजी-पोळी, फळे, इडली, कोशिम्बीर, बरेच पदार्थ नेता येतात. गोड कधितरी. रोज भरपूर चालते. थोडीशी शिस्त पाळली तर जमेल.

माझं वजन ९९ किग्रॅ पर्यंत वाढलं होतं. वर्षभरात ८ किलो कमी केलं. आता पंधरा दिवसाला एक किलो उतरतंय. अडीच महीन्यात १० किलो आणि पाच इंच असं टार्गेट दिलेलं आहे.

आहार आणि व्यायाम हीच गुरुकिल्ली आहे.
एक ते एक न खाणे. कार्बोहायड्रेट्स जास्त वाढणार नाही याची काळजी घेणे. सध्या भात एकदम बंद आहे.
फुलके छोटे दोन. भाज्या रोज बदलून. रात्री उशिरा (आठनंतश) शक्यतो ओट्स किंवा फळांचा रस.

सकाळी कडधान्याची उसळ / फुलके भाजी / ओट्स / मिक्स फ्रूट्स असा नाश्ता.
दहा वाजता ताक . पण ते सूट होत नसल्याने सूप घेऊन जातो आणि गरम करून पितो.
अकराच्या दरम्यान फळांच्या फोडी किंवा डाळिंबाचे दाणे, गाजराचा कीस.
एक वाजता जेवण. फुलके + पालेभाजी किंवा भोपळ्याची भाजी + सॅलड
तीन साडेतीन वाजता ग्रीन टी किंवा एक चमचा साखरेचा चहा आणि मारी बिस्कीट (पण हे स्कीप होतं )
संध्याकाळी - पावणेसहा ते सात, सव्वासात. चरबी जाळणे
पावणेआठ - सूप
रात्री - जेवण. (सकाळी फुलके घेतले असतील तर रात्री नकोत )

पहाटे पाच ला दहा किमी चालणे

सुरूवातीला जड गेलं हे शेड्युल. पण आता सवयीचं झालंय.
पुढच्या आठवड्यापासून व्यायाम वाढवणे.

मोकीमी आणि केदार,
दोघांचंही मनापासून अभिनंदन !

माझ्या वाचनात एकदा आलं होतं . . .
If you can afford only one full length mirror for your house, mount it in the bathroom. Not in the bedroom. You must see yourself as you really are, not as you want the world to see you.

हे अॅप सकाळी चालणार्‍या साठी उपयुक्त ठरेल यात GPS tracker आहे जे आपण किती अंतर पार केले आहे व किती कॅलरी बर्न केली याची अचूक माहिती देत त्याची ही लिंक

https://play.google.com/store/apps/details?id=com.fitnesskeeper.runkeepe...

Pages