खाऊन पिऊन वजन कमी करा

Submitted by शरद on 26 March, 2014 - 09:19

मथळा वाचून आश्चर्य वाटले ना! मलाही ते पुस्तक वाचण्यापूर्वी असेच वाटत होते. पण हे शक्य आहे, नव्हे, कुठलेही विपरीत परिणाम न होता वजन कमी करण्याची हीच एक शास्त्रीय पद्धत आहे. कशी तेच या लेखातून मी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे.

तसे पाहिले तर तिची माझी ओळख नव्हती आणि नाही. कधी टी.व्ही. वर कुठला पुरस्कार घेताना तिला पाहिले असेल तेवढेच! पण एक पुस्तक हाती आले आणि ती जणु माझी मैत्रिणच झाली. तिचं नाव आहे ऋजुता दिवेकर. (इथे ऋषी मधील ऋ कसे लिहायचे ते ठाऊक नाही म्हणून रु असे लिहिले होते. सध्या कॉपी-पेस्ट केले आहे. कसे लिहायचे कुणी सांगेल का?) अजून हे नाव घरा घरात पोचलेले नाही; पण झिरो फिगर वाली करिना कपूर आणि ४२ कि.मी.ची मॅरॅथॉन पूर्ण करणारा एकमेव 'कॉर्पोरेट जायंट' अनिल अंबानी यांची ती 'डायेट कन्सल्टंट' आहे, एवढीच तिची ओळख पुरेशी आहे. वीस लाख प्रती खपलेल्या तिच्या त्या पुस्तकाचे नाव आहे 'डोन्ट लूज युवर माईंड, लूज युवर वेट'. हे पुस्तका पूर्णतः बंबैय्या इंग्रजी भाषेत लिहिले आहे, त्यामुळे समजायला सोपे आहे. संवादात्मक शैली असल्याने पुस्तक वाचताना जणु आपण गप्पाच मारतोय असे वाटते. आणि मग प्राप्त होते खाऊन पिऊन वजन कमी करण्याचे अद्भुत ज्ञान.

हा लेख म्हणजे पुस्तक परीक्षण नाही. कारण यात माझे काही विचार घालून (जे माझ्या आणि माझ्या परिचितांच्या अनुभवातून आले आहेत) मी काही तत्वे मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र त्यांचा पाया 'डोन्ट लूज युवर माईंड, लूज युवर वेट' हे पुस्तकच आहे.

१. वजन कमी करण्यासाठी औषधांचा वापर करू नका. फॅट 'जाळणार्‍या' बर्‍याच औषधांमुळे चरबी खरोखरच नाहीशी होते. पण त्यामुळे तिथल्या त्वचेवर परिणाम होतो. त्वचेला सुरकुत्या पडतात. जितके औषध 'स्ट्राँग' तितक्या जास्त सुरकत्या. काही औषधांमुळे तर जख्ख म्हातार्‍यांप्रमाणे त्वचा होते. दुसरे म्हणजे औषधे चालू असतानाच परिणाम होतो; बंद केले की परत 'ये रे माझ्या मागल्या'! तिसरे म्हणजे उत्साह रहात नाही, मरगळल्यासारखे वाटते. आपल्याला आरोग्य, उत्साह हवा; आणि कुठल्याही अन्य परिणामांशिवाय वजन कमी हवे.

२. व्यायामाला पर्याय नाही. वजन कमी करायचे असेल, तर 'डायेटिंग' किवा उपवास हा उपाय होऊ शकत नाही. व्यायामाला पर्याय नाही हे त्रिकालाबाधित सत्य आहे. कुणी म्हणत असतील की फक्त औषधे घेऊन आणि व्हिटॅमिनच्या गोळ्या घेऊन वजन कमी होईल, तर ती व्यक्ती चक्क खोटे बोलत आहे असे समजावे. व्यायाम हवाच. दिवसातून किमान ४ किलोमीटर भरभर चालणे इतका व्यायाम हवा (सामान्य व्यक्तीला यापेक्षा जास्त व्यायाम जमत नाही आणि त्याची आवश्यकतासुद्धा नाही.) व्यायामाला प्राणायामाची जोड मिळाली तर जास्तच चांगले. बाबा रामदेवांचे दोन प्रमुख प्राणायाम (अनुलोम-विलोम आणि कपालभाती), तीन अन्य प्राणायाम (भर्स्त्रिका, भ्रामरी आणि बाह्य प्राणायाम) आणि इतर सर्व प्राणायाम जमतील तसे करावे. मात्र अनुलोम-विलोम आणि कपालभाती रोज हवेतच.

वरील दोन गोष्टी ध्यानात आल्या की मगच आपण खाऊन पिऊन वजन कमी करण्याविषयी आपण बोलू शकतो.

आपल्या शरिरात अन्नपचन होते म्हणजे नक्की काय होते ते सामान्यज्ञान आहे. आपण जेव्हा काही खातो तेव्हा चावत असतानाच त्यात लाळ मिसळते आणि पचनाला सुरवात होते. खाल्लेले अन्न जठरात पोचते तिथे काही ग्रंथींपासून पाचक रस मिसळतात. मग ते अन्न लहान आंतड्यामध्ये जाते. खरे अन्नपचन तिथे होते. पचलेल्या अन्नापासून विशिष्ट प्रकारची साखर निर्माण होते, ती रक्तात मिसळते आणि फुफ्फुसांमध्ये तिचा प्राणवायूशी संयोग होऊन उर्जा मिळते. पचलेले अन्न सोडून उरलेला चोथा मल बनून मोठ्या आंतड्यात जातो आणि शरिरातून बाहेर पडतो.

ज्याप्रमाणे मेंदू, हृदय, फुफ्फुसे अविरत काम करतात; त्याचप्रमाणे पचनेंद्रियेसुद्धा अविरत कार्यरत असतात; आणि ती तशी असावीत हीच अपेक्षा असते; नाहीतर मग पचनासंबंधी आजार होतात.

जर शरिरात अन्न नसेल तर काय होते? शरिराला उर्जा मिळत नाही, थकवा येतो, शरीर मरगळून जाते. मात्र पाचकरस निर्माण होतच असतात. त्यांचा विपरीत परिणाम होतो; त्यालाच आपण 'अ‍ॅसिडिटी' किंवा 'पित्त वाढणे' म्हणतो. 'डायेटिंग' किंवा उपवासामध्ये असे होण्याची शक्यता आहे; म्हणून शरिरात सदैव अन्न असले पाहिजे. मात्र ते इतके नको की अपचन होईल.

जर पोट पूर्णतः रिकामे असेल तर दोन महत्वाच्या गोष्टी घडतात. एक म्हणजे पचनसंस्थेकडून मेंदूला सिग्नल जातो, "शरिरात अन्न नसल्याने शरिराची उपासमार होत आहे". मेंदूकडून लगेच प्रतिसाद जातो, "येणार्‍या अन्नाला प्रतिबंध करू नका. मिळेल ते अन्न साठवून ठेवा." मग याचा दुसरा परिणाम म्हणजे नंतर जेव्हा अन्नग्रहण करतो तेव्हा आपण खातच राहतो -- आणखी एक पोळी, आणखी थोडा भात वगैरे वगैरे. मेंदू कडून तशी ऑर्डर अगोदरच मिळालेली असते. शिवाय त्यातील जास्तीत जास्त अन्नाचे चरबीमध्ये रुपांतर होते कारण ती ऑर्डरसुद्धा अगोदरच मिळालेली असते. कधी कधी तिसरा - अपचनाचा - परिणामसुद्धा दिसून येतो. 'डायेटिंग' करणार्‍या व्यक्तींचा हाच प्रॉब्लेम होतो. 'डायेटिंग' बंद केले की मग चक्रवाढ व्याजाच्या दराने वजन वाढायला सुरवात होते. म्हणून अन्न खाल्ले तर पाहिजेच - काय खावे, कसे खावे, किती खावे आणि किती वेळा खावे हे मग महत्वाचे ठरते.

काय खावे ? आपले लहानपणापासून खात आलेले अन्न सोडू नये. अर्थातच पिझ्झा, बर्गर ही आपली अन्नसंस्कृती नव्हे. कधी कधी चेंज म्हणून , कधी मजा म्हणून ठीक आहे. पण ज्याला आपण नियमित आहार म्हणतो तो आपल्या घरच्या खाद्यसंस्कृतीप्रमाणेच असला पाहिजे. तेलाचे पदार्थ, भात वगैरे खायला हरकत काहीच नाही; मात्र ते पचवण्यासाठी व्यायाम असेल तरच! नाहीतर मग असे 'वजन वाढवणारे' पदार्थ कमी खाल्लेलेच चांगले.

कसे खावे? जेवताना पूर्ण लक्ष फक्त जेवणाकडेच असावे. लहानपणी म्हणायचे 'एक घास बत्तीस वेळा चावून खावा', याचा अर्थ तोच आहे. नाहीतर मग 'खाल्लेले अंगाला लागत नाही' व अपचन होते.

किती खावे? जेवताना एक वेळ अशी येते जेव्हा आपल्याला वाटते की 'पोट भरले'. त्या क्षणी खाण्याचे बंद केले पाहिजे. नाहीतर मग वर लिहिल्याप्रमाणे 'आणखी एक पोळी, आणखी थोडा भात' हे पालुपद चालूच राहते. उरलेले 'संपवायचे आहे' म्हणून कधीच खाऊ नये.

किती वेळा खावे? हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. याचे उत्तर परिच्छेद पाडून सविस्तर दिले पाहिजे.

पहिले 'जेवण' सकाळी उठल्यानंतर १५ ते वीस मिनिटात झाले पाहिजे. आश्च्रर्यचकित झालात ना? कारण सांगितल्यावर समजेल. आपण रात्री झोपतो. त्यानंतर २-३ तासात पूर्ण अन्नाचे पचन झालेले असते. त्यानंतरचे ४-५ तास पोट रिकामे असते. आपल्याला ते जाणवत नाही कारण आपण झोपेत असतो आणि शरिराची हालचाल बंद असल्याने उर्जेची जरुरी फारशी नसते. सकाळी उठतो तेव्हा रक्तातील साखर न्यूनतम झालेली असते. शरिराला अन्नाची नितांत गरज असते कारण दिवसाची कामे सुरू होणार असतात. उठल्या-उठल्या चहा घेणे हा पर्याय नाही; कारण त्याचा विपरीत परिणाम शरिरावर होतो. चहामुळे एकदम धक्का बसल्यासारखी साखर वाढते; त्याचा शरिरावर नकळत वाईट परिणाम होतो.

उठल्या उठल्या जेवताना भूक नसल्याने एकपेक्षा जास्त पोळी खाऊ शकत नाही. त्यामुळे नैसर्गिकरित्या अन्नग्रहणावर नियंत्रण येते. पुढच्या तासाभराने चहा व चहाबरोबर अर्धी पोळी चालेल. मात्र बेकरीचे पदार्थ शक्यतो टाळावेत. त्याने फक्त 'उदरभरण' होते. 'जाणिजे यज्ञकर्म' होत नाही.

त्यानंतर दर दोन-अडिच-तीन तासाने पुढचे जेवण घेत रहावे. मग आपल्या जेवणाच्या वेळेला जेवण (कमी प्रमाणात) आणि इतर वेळी एखादे फळ किंवा चहा - सरबत - दूध चालेल. मात्र दर दोन-अडिच तासाने काहीतरी खाल्लेच पाहिजे. जास्त खाण्याचा धोका नाही; कारण जास्त वेळा खाल्याने नैसर्गिकरित्या आपण कमीच खातो. त्यासाठी फारसा प्रयत्न करण्याची गरज भासत नाही. शेवटचे जेवण मात्र रात्री झोपण्यापूर्वी दोन तास आधी झाले पाहिजे.

दिवसभरात भरपूर पाणी प्याले पाहिजे. त्याचे दोन फायदे होतात. एक म्हणजे आपल्या शरिरात दोन तृतिअंश भाग पाणी असते; त्यामुळे घामावाटे आणि मूत्रावाटे विसर्जित झालेल्या पाण्याची पूर्ती होते आणि दुसरे म्हणजे पोटात पाणी असल्याने अन्नग्रहण नियंत्रित होते.

ही साठा उत्तराची कहानी पाचा उत्तरी सकल संपूर्ण! लिहायला गेले तर खूप लिहिता येईल. पण ज्ञान पाजळणे किंवा 'बोअर करणे' हा उद्देश नसल्याने इथेच थांबतो!

(मायबोलीवरचे वजन कमी करण्याचे इतर अनुभव
वजन कसे कमी केले - एक स्वानुभव !
दिक्षीत डाएट आणि अनुभव
-वेमा)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे पुस्तक घरी आहे आणि दोनेक आठवडे ऋजुता म्हणते त्याप्रमाणे प्रयोगही केलेला आहे. पण सतत दोन तासांनी आता काय खावं? किंवा आता खायला काय तयार ठेवावं ह्या सततच्या किचनशी जुंपलेल्या विचाराचा अतिशय कंटाळा आला. जर कुणी आयतं खाऊ घालणारं (स्वैपाकाच्या बाई वगैरे) असेल तरच हे डाएट मला जमू शकतं.

सायो+१. मलाही सेम असेच वाटले. मला काय खावं या किचन रिलेटेड विचारांपेक्षाही सतत खायचचं याचा ताण येत होता. Proud सवयीने जमेल कदाचित.

ऑब्विअसली फॉलो करूनच! :p
हे मात्र खरं की, दर २ तासांनी काय खायचं हा प्रश्न असतोच. तरी त्यात लिहिलेले बरेच प्रकार आजकाल ट्राय करतोय...

जेव्हंढ होईल ते ते शक्यतो करायचंच हे मात्र पक्कं ठरवलं होतच.

श्री.शरद यांच्या लेखातील (जो अतिशय उपयुक्त आहे....वजन संदर्भात) सर्वात महत्त्वाचा आणि तितका सोपा, बिनखर्चिक भाग कुठला असेल तर रोज सकाळी वा सायंकाळी किमान ४ ते ६ किलोमीटर (येता जाता) चालणे. हे चालणे सहजतेने करा अथवा ब्रिस्क वॉकिंगने....विकल्प चालणार्‍याचा उत्साहावर अवलंबून आहे. स्वानुभावाने सांगू इच्छितो की पहाटेचा हा चालण्याचा व्यायाम सर्वात योग्य आणि तोही जर एकट्यानेच केला तर जास्तच उपयोगी....कधीही मित्रांसोबत वा सहकार्‍यासोबत वा बिल्डिंगमधील कुठल्यातरी रहिवाशासमोर चालण्याचा व्यायाम करू नये या मतावर मी आलो आहे. सोबत हवीच असेल तर मोबाईल रेडिओची घ्या...निदान हळू आवाजातील गाणी ऐकत जाणे चांगले....पण गप्पागोष्टी करीत जाणे टाळावेच.

श्री अशोक यांच्या मताशी मी १०० टक्के सहमत आहे . मी पुर्वी फिरावयास जातांना, समोरुन येणारे काही जण " हरि ओम " अस्सा मोठ्याने उच्चार करीत असत त्यांची अपेक्षा की मी ही तसेच बोलावे , पण मी मात्र तेही शब्द बोलत नसे. एकटे फिरावयास जाण्यामुळे , आपण आपली चालण्याची गती पाहिजे तेव्हढी कमी जास्त करू शकतो.कानात बोळे घालुन ' काहीतरी ' ऐकण्यापेक्षा , निसर्गातील विविध आवाज ऐकावेत हे उत्तम ! !

मस्त लेख आहे. अत्यंत उपयुक्त अशा टिप्स अगदी concise रुपात दिल्या आहेत.

तिच्या पुस्तकांत या टिप्सव्यतिरिक्त काही गोष्टी अशाही आहेत ज्या पाळणे सर्वसामान्यांना शक्य नाही. करीना कपूर किंवा अनिल अंबानीसारख्या श्रीमंतांनाच ते जमू शकेल. म्हणजे तिच्या डाएट टिप्स अंमलात आणण्यासाठी तुमच्याकडे चांगला मास्टरशेफ हवा जो दिवसभर तुमच्या घरी थांबून तुम्हाला छान छान हेल्दी फूड ताजं ताजं बनवून देईल. अजून एक नोकर असेल जो बाजारहाट करुन येईल रोजच्या रोज मंडईत/ग्रोसरी स्टोअरमध्ये जाऊन. एक तिसरा नोकर असेल जो दर दोन तासांनी सिंकमध्ये पडणारी भांडी घासेल किंवा डिशवॉशर चालवेल.

पण या लेखात ज्या टिप्स दिल्या आहेत त्या मात्र कोणालाही सहज करता येण्यासारख्या आहेत. धन्यवाद Happy

माझ्या एका जावे ने दर अडीच तासांनी अर्धी पोळी आणि भाजी अशा पद्धतीने डाएट करुन बरच वजन कमी केलं होतं.

रुजुता दिवेकरचे ते गाजलेले पुस्तक म्हणजे हाईप आहे या निष्कर्षाप्रत मी आलेलो आहे. उगाचच करीना इतर नट नट्या अन अंबानी यांच्या नावाचा उपयोग केल्यासारखा आहे. मुळ पुस्तक इंग्रजीत आहे अन तिच्या मावशीने ( नक्की नाते आठवत नाही) ते मराठीत अनुवाद केला आहे. हा अनुवादही मराठीशी नाते फटकवून लिहील्यासारखा वाटतो.

वेदिका२१ ने लिहील्याप्रमाणे हे पुस्तक अन त्यातील टिप्स ह्या मोठ्या लोकांसाठीच आहे.

लेख चांगला आहे...

"वजन कसे कमी केले" ह्या बाफ वर आधी लिहिले आहे. तरी परत लिहिते.....

मी हे पुस्तक आणि तिचे अजुन एक पूस्तक "वेट लॉस तमाशा" दोन्ही कोळुन प्यायले आहे. अनेक गोष्टी पटतात अनेक नाही ... त्या मुळे स्वतःला योग्य पद्धत शोधुन काढली. ६ महिन्यात टोटल वेट लॉस २४ किलो.... अजुनही प्रय्त्न चालु आहेत. पुढचे टार्गेट १० किलो पुढील ६ महिन्यात. ( मी खुप जाडी होते)

सकाळी साडे सहा वाजता : १ पोळी ( आदल्या दिवशी जास्त करते), चहा ( साखरे विना)

८.३०: कॉर्न फ्लेक्स/ पोहे/ उपमा (तेला शिवाय) / इडली / घावन / थालिपीठ / ओट्स धिरडे/ परोठा जे काही मुलीला डब्यात दिले असेल त्याचा १ नग / १ बाउल

१०.३० : १ ग्लास ताक / टॉमॉटो ज्युस / लिंबु पाणी + एखादे फळ ( सध्या कलिंगड १ मोठा बाउल)

१२.४५ : १ ज्वारी भाकरी + भाजी + कोशिंबीर भरपूर + ताक

दूपारी ३.३० : चहा (साखरे विना) ४ मारी बिस्किटे

संध्या ६ : खुब खाओ ची ज्वारी पफ/ सोया पफ/ रोस्टेड चना/ खाकरा/ कुरमुरा चिवडा एक वाटी किंवा एखादे फळ

रात्री ९ : १ भाकरी + डाळ + भाजी + सॅलेड्+ताक

रात्री ११ वाजता गूड नाइट

भाजीत माफक गुळ असतो, शक्यतो नारळ, दाण्यचे कुट नाही. गोड फक्त सणाला. एरवी साखर अजिबात बंद. रोज एक चमचा (छोटा) तूप खाते. आठवड्यातुन ३ वेळा उसळी. चटक मटक फक्त शनिवार (उदा मिसळ, भेळ, कटलेट्स, वडा, भजी, पुलाव)

हे डायेट गेली ६ महिने फॉलो केलं आणि सकाळ संध्याकळ मिळुन एक तास चालणे+ आठवड्यातले ३ दिवस पॉवर योगा १ तास. मधे दोन महिने मसाज घेतला. त्या मुळे कातडी फर्म राहिली. पोटाचा थुलथुलित पणा जावाम्हणुन पट्टा (कॉर्सेट) वापरले.

फायदे:

१. वजन मस्त उतरलं
२. चेहेर्‍यावर छान तकाकी आली
३. कॉन्फिडन्स प्रचंड वाढला
४. जास्त खाणे झाले तर लगेच पुढचा दिवस फळे+सॅलेड्+सूप वर काढुन वजन नियंत्रित केले.
५. एक महिना फक्त मेंटेन करुन परत वजन उतरवण्याच्या उद्योगाला लागलेली आहे.
६. सगळे मेडिकल रिपोर्ट सुधारले
७. आयुर्वेदिक व्हीतॅमिन च्या गोळ्य मात्र घेत होते ( मैत्रिण डॉक्टर आहे)

दोन तासाने काय खायचे म्हणुन टेंशन घेवु नका. आपल्य किचन मधेच आपल्याला उत्तर सापडेल. कोणा कुक ची गरज नाही.

रुजुता दिवेकर ने सांगितलेला फंडा लक्षात ठेवा. आपण जेंव्हा फायबर खातो तेंव्हा त्याचे ग्लोकोज मधे रुपांतर व्हायला जस्त वेळ लागतो. त्याच्मुळे पुढला पोर्शन कमी खाल्ला जातो. आपोआप खाण्यावर्नियंत्रण येते. म्हणुन ज्वारी, नाचणी, बाजरी, सोया, तोफु, सॅलेड, फळे खा. शक्यतो फळे न चिरता संपूर्ण खा. कलिंगडाच्या मोठ्य फोडी खा. म्हण्जे फायबरचे तंतु पण संपुर्ण पोटात जातिल.

मोकिमी मस्त.. पुस्तकची छान आहे. तिने दर दोन तासानीचे भरपुर ऑप्शन्स दिलेत. सगळेच काय शिजवुन खायचे नाहियेत त्यात. चणे फुटाणे, फळे, चिक्की इ. ऑप्शन्स पण आहेत. जसे जमेल तसे करावे. जमणार नाही म्हणुन काहीच न करण्यापेक्षा जेवढे जमेल तेव्ढे केलेले बरे.

जमणार नाही म्हणुन काहीच न करण्यापेक्षा जेवढे जमेल तेव्ढे केलेले बरे. > +१
पहिले सुरुवात तर करावीच लागते. Happy

रात्री ११ वाजता गूड नाइट

रात्री ११ वाजता गुड नाइट खायचं ? कछुआ छाप खाल्ली तर चालेल का?

Proud

मोकिमी, एकदम भारी.

>>८.३०: कॉर्न फ्लेक्स/ पोहे/ उपमा (तेला शिवाय) / इडली / घावन / थालिपीठ / ओट्स धिरडे/ परोठा>> तेलाशिवाय पोहे, उपमा की वरून तेल न लावता घावन, थालिपीठ, पराठा?

मोकीमी, अभिनंदन.
(सहा महिन्यात २४ किलो जरा ज्यास्तच वाटतय मला). पण तुम्हाला काही त्रास(थकवा, केस गळती वगैरे) नसेल तर योग्य असावे तुम्हाला.

रुजुता दिवेकरचे काही नवीन फंडे नाहीयेत असे मला वाटते. दर दोन तासानी खायचे असेल तर तश्या हालचाली हव्यात. नाहीतर दर दोन तासांनी भूक लागत नाही. व उगाच ठोसणे शक्य नाही(असे माझे झालय). रोजचे चालणे व स्वतःला योग्य व्यायाम असेलच तर ठिक आहे.(ह्या निर्णया पर्यंत आलेय).

बाकी, नोकरी करणार्‍या, मुलं, नवरा असे व्याप( :फिदी:) असताना ते "ताजं,ताजं" जेवण काही होत नाही रोज. हे दुखणे आहे सध्या त्यामुळे तिची पुस्तकं चाळून बाजूला बूक शेल्फ मध्ये कोनाड्यात पडली आहेत.

नवीन पुस्तक बरं आही फक्त वाचायला.(डोन्ट लूज ऑउट, वर्कऑउट...)

मोकीमी - तुमच्या घरी स्वयंपाबाई/ घरकामाला बाई, ड्रायव्हर इ माणसे आहेत का? प्लीज रागावू नका. जेन्युइनली विचारते आहे कारण वर म्हणल्याप्रमाणे ८-१० तास(प्रवास धरून) नोकरी, मुल, नवरा असे सगळे सांभाळून, रोज ताजे कुक करणे, व्यायाम करणे, आणि दमणूक न होता स्वतः ला प्रसन्न ठेवणे मला तरी जमत नाही. अन्न तयार असेल, नंतरची भांडी दुसरं कोणी आवरत असेल आणि ऑफिसला/जीमला येताजाता ड्रायव्हर असेल हे मला सहज शक्य आहे.

अन्न तयार असेल, नंतरची भांडी दुसरं कोणी आवरत असेल आणि ऑफिसला/जीमला येताजाता ड्रायव्हर असेल हे मला सहज शक्य आहे.

+१

द थ्री सर्व्हन्ट्स थिअरी Happy

तेच तर धनश्री. म्हणूनच ऋजुताचं डाएट फक्त सेलेब्जकरता असावं असं वाटतं ज्यांच्या उशापायथ्याशी नोकर असतील.
बारीक सारीक चेंजेस करून बघायला हरकत नाहीच अगदीच न करण्यापेक्षा.

मोकीमी, एकदम भन्नाट! भारनियंत्रणाची गाडी सुसाट सुटलीये तुमची! Happy
आ.न.,
-गा.पै.

Pages