सुखाची चाहूल... आगमन ... अवर्णनीय !

Submitted by तुमचा अभिषेक on 23 March, 2014 - 04:52

शेवटच्या सोनोग्राफीला एक एप्रिल तारीख दिली गेली तेव्हा आमच्याकडचे सारेच त्या तारखेला न झाले तरच बरे असे म्हणत होते. कारण काय, तर एप्रिल फूलच्या दिवशीच झाले तर नशिबी आयुष्यभराची चिडवाचिडवी. मी मात्र या उलट मताचा. एखाद्या स्पेशल दिवशी होतेय तर चांगलेच की, चिडवाचिडवी एंजॉय करायची की झाले. पण होणारे मूल मात्र नशीबात याही पेक्षा स्पेशल दिवस घेऊन येणार आहे याची कल्पना मात्र तेव्हा आम्हा कोणालाच नव्हती.

तब्बल दोनेक आठवडे आधी म्हणजे अठरा मार्चलाच दुपारी बाराच्या सुमारास फोन खणखणला. पाणी कमी झालेय, बाळाची हालचाल मंदावली आहे, आज संध्याकाळीच अ‍ॅडमिट व्हायला सांगितले आहे. बायोलॉजीचा ‘ब’ सुद्धा माहीत नसलेलो मी, बाप होत असलो तरी याबद्दल जेमतेमच जाणकारी राखून होतो. बायकोने फोनवर ‘जेवलास का आणि भाजी कशी झाली होती’ असे विचारावे त्या थाटात ही बातमी दिली आणि मी कामाच्या वेळी कमीच बोलतो हे माहीत असल्याच्या सवयीने फोन कटही केला. तिच्या आवाजातून चिंतेचे कारण काय अन किती हे देखील समजले नाही. माझे दिवसभराच्याच नाही तर पुढच्या आठवडाभराच्या कामाची प्लॅनिंग मी एक एप्रिल या तारखेच्या हिशोबाने केली होती. त्यातही आजच्या दिवसाचे काम रात्री नऊ पर्यंत चालणार होते. पण आता काय किती बोंबलले याचा हिशोब करायचा प्रश्नच नव्हता. लागलीच लाईन मॅनेजरला कल्पना दिली. त्यालाही अगोदरच याबाबत माहीत असल्याने फारसा काही गोंधळ न घालता त्याने माझ्या हातात असलेले काम दुसर्‍या कोणाला तरी हॅण्डओवर करून मला निघायला सांगितले. पुन्हा बायकोला फोन लाऊन परिस्थितीची कल्पना घेतली, तर संध्याकाळी सावकाश अ‍ॅडमिट झाले तरी हरकत नाही असे समजले. त्यानंतर उद्या वा परवा, किती लवकर पुन्हा ऑफिसचे तोंड बघायला मिळेल याची कल्पना नसल्याने संध्याकाळपर्यंत वेळ घेऊन निदान माझ्यावाचून अडणारी कामे तरी आटोपून घेऊया असे ठरवले. पण बस्स ठरवलेच.! फोन ठेवताक्षणीच जाणवले की आपली छाती तूफान वेगाने धडधडू लागलीय अन श्वास थंड. इथून पुढे कामात लक्ष लागणे कठीणच होते. कामावरची निष्ठा दाखवायची हिच ती वेळ असे मनाला बजावत संध्याकाळपर्यंत जमेल तसे आटोपले आणि निघालो.

तिथे तिची एव्हाना अजून एक डॉक्टरवारी करून झाली होती ज्यात संध्याकाळ ऐवजी दुसर्‍या दिवशी सकाळी अ‍ॅडमिट व्हायचे ठरले होते. डॉक्टरकडून येताना ती मला परस्पर बाहेरच भेटली तेव्हा तिने मला या बदललेल्या वेळापत्रकाबद्दल सांगितले. मात्र उद्या अ‍ॅडमिट झाल्यावर तिथून पुढे काय करणार आणि फायनल रिझल्ट कधीपर्यंत हाती येणार याची मला तोपर्यंत काहीही कल्पना नव्हती. पण त्या आदल्या संध्याकाळी पाणीपुरी खायचा तिचा शेवटचा डोहाळा पुरवताना मला दुपारपासून मनावर आलेले दडपण तेवढे निवळताना जाणवले.

ती रात्र ती तिच्या घरी होती आणि मी इथे माझ्या. रात्री झोपताना आई म्हणाली, उद्या होवो किंवा परवा, दोन्ही चांगले दिवस आहेत. उद्या शिवजयंती तर परवा संकष्टी...
आणि पुन्हा एक अनामिक हुरहूर मनी दाटून आली. म्हणजे उद्या किंवा परवाच,, होणारही होते तर..

सुखाची चाहूल अनुभवण्यातही एक सुख असते हे त्या रात्री जाणवत होते. धडधडत्या छातीने आणि थंड पडत चाललेल्या श्वासांनी, येणार्‍या सुखाच्या वाटेवर डोळे लाऊन बसणे.. कमिंग सून कमिंग सून असे स्वताच स्वताच्या मनाला बजावणे.. ती रात्र माझी तशीच गेली. शिवजयंती की संकष्टी,, मुलगा की मुलगी.. नॉर्मल की सिझेरीअन,, तिच्यासारखे की माझ्यासारखे.. आपल्या मनात काय आहे.. आपल्या मनासारखे होईल का.. जर मुहुर्तच साधायचा असेल तर शिवजयंतीचाच साधू दे, मुलगा वा मुलगी काहीही माझेच असले तरी माझ्या मनासारखी मुलगीच होऊ दे.. याच विचारांत गेली..

परीणामी सकाळी उशीराच उठलो. पाहतो तर वाजलेला अलार्म चुकून झोपेतच बंद केला होता. अरे देवा, आता पुन्हा शिव्या पडणार तर. गेल्या सोनोग्राफीच्या वेळी तिच्याबरोबर जायला न जमल्याच्या शिव्या ताज्या होत्या आणि आज महत्वाच्या दिवशी सुद्धा ... सुदैवाने तिलाही घरून निघायला थोडाफार उशीरच झाला होता. तरीही माझ्याआधीच घरच्यांना बरोबर घेऊन ती अ‍ॅडमिट झाली होती. पण आजचा तिचा मूड वेगळाच होता. माझ्या उशीरा येण्यापेक्षा माझ्या येण्याला तिच्याठायी जास्त महत्व होते. मी पोहोचलो तेव्हाच बाईसाहेब मस्त हाताला सलाईन लाऊन बेडवर पहुडल्या होत्या. आता पुढे चार-पाच तासांतच कळा सुरू होऊन पुढे आणखी तासभरातच... ईति तिच्या बहीणींनी पुरवलेली वैद्यकीय माहिती आणि मी एक नजर घड्याळावर टाकली. याचा अर्थ फार तर फार दुपारी दोन वाजेपर्यंत मी बाप होणार होतो. हि वेळ इतक्या समीप आलीय यावर माझा अजूनही विश्वास बसत नव्हता. माझ्या डोक्यातून अजूनही ती एक एप्रिलची तारीख बाहेर पडली नव्हती. गेले नऊ महिने एकेक करत मोजत असलेले दिवस आठवू लागले. महिन्याभरापूर्वी ती माहेरी गेल्यापासून या दिवसाच्या प्रतीक्षेत होणारे आमचे रोजचे फोनवरचे बोलणे आठवू लागले. किंबहुना लग्नानंतरचा तो प्रत्येक एक क्षण आठवू लागला ज्यात दडलेल्या भावना कळतनकळत आजच्याच दिवसाची वाट बघत होत्या. येत्या काही तासांतच आमच्या नात्याला आणखी घट्ट करणारी एक कायमस्वरूपी गाठ बांधली जाणार होती.

मी माझ्या घरी फोन करून दुपारी दोनची वेळ कळवून घरच्यांना त्याआधी यायला सांगितले, तिचे घर जवळच असल्याने तिच्या घरचे सारे हजेरी लाऊन गेलेलेच वा गरज पडेल तसे कधीही हजर होतील अश्या हाकेच्या अंतरावरच होते. जवळपास सर्वांनीच रजा टाकल्या होत्या. आपापले सारे कार्यक्रम रद्द केले होते. त्यामागे कारणही तसेच होते. दोन्ही घरांमध्ये कित्येक वर्षांनी, तब्बल एका पिढीनंतर आज पहिल्यांदाच बाळाचा रडण्याचा आवाज घुमणार होता, म्हणून हा दिवस सर्वांसाठीच स्पेशल होता. आणि आता सुरू झाले होते ते काऊंटडाऊन .. टिक टिक वन.. टिक टिक दोन.... दोन वाजताची प्रतीक्षा !

रूमवर टाईमपास करायला टिव्ही होता. पण त्याचा रिमोटही हातात घ्यायला कोणाला सुचत नव्हते. घड्याळाचे काटे पुढे सरकताना बघणे हाच सर्वात मोठा विरंगुळा होता. मात्र तो काटा बाराला पार करून दिवसाच्या दुसर्‍या सत्रात पोहोचला तरी अजून काहीतरी घडतेय अशी चिन्हे दिसायला मागत नव्हती. मी पुन्हा माझ्या घरी फोन करून अजून थोडे उशीरा आलात तरी चालेल असे कळवले पण होणार्‍या बाळाच्या आजीआजोबांचा पाय आता घरी टिकणे शक्य नव्हते. रूमवर फारच गर्दी होत असेल तर तिथेच आजूबाजुला भटकू पण आम्ही येतो असे म्हणत ते घरून निघाले. पण ते पोहोचले तरी अजून कश्याचा काही पत्ता नव्हता. दुपारी दोन वाजता तिला चेकींगसाठी मात्र तेवढे नेले. त्यात फारशी प्रगती न दिसल्याने आता संध्याकाळच उजाडेल एवढेच काय ते समजले. मिनिटे मोजायचा उत्साह अजूनही मावळला नव्हता मात्र मनावर आलेले दडपण कमी व्हावे म्हणून आता होईल तेव्हा होईल म्हणत वेळ बघणे थांबवले. दुपारी बाहेर जाऊन जेवण करून आलो, बसल्याबसल्या जागेवरच तासभर पेंगून घेतले, थोडाश्या इकडतिकडच्या गप्पा यांत संध्याकाळ उजाडली देखील. एव्हाना पोटात दुखायला सुरुवात झाली होती मात्र ते दुखणे केवळ छळण्यापुरतेच होते. संध्याकाळी सहाच्या सुमारास केलेल्या चेकींगच्या वेळीही पुढच्या चेकींगची वेळ रात्री आठ-साडेआठ वाजताची एवढाच निष्कर्ष निघाला. एखादा क्रिकेटचा सामना पावसामुळे थांबावा, अधूनमधून पंचांनी खेळपट्टीची पहाणी करावी आणि सामना सुरू कधी होईल हे सांगण्याऐवजी पुढची पहाणी अमुकतमुक वाजता होईल असा क्रिकेटरसिकांना टांगणीवर लावणारा निर्णय द्यावा अश्या धाटणीचा खेळ चालू होता. हाडाचा क्रिकेटप्रेमी असल्याने मी आजवर हे बरेचदा अनुभवलेय पण आजच्या अनुभवाची त्या कशाशीही तुलना नव्हती.

आता कदाचित रात्रीच्या मुक्कामाचीही तयारी ठेवावी लागेल म्हणत दिवसभराची मरगळ झटकून ताजेतवाने होण्यासाठी एकेक करून ब्रेक घेण्याचे ठरवले. संध्याकाळच्या सुमारास चहापाण्याच्या निमित्ताने जवळच असलेल्या सासुरवाडीला माझी देखील एक फेरी झाली. पण चहा आणि पाण्याव्यतिरीक्त आणखी काही घ्यायची इच्छा झाली नाही. धावत गेलो आणि पळत आलो असे केले. मधल्या काळात हिच्या पोटातल्या दुखण्याने बर्‍यापैकी जोर पकडला होता. मी परतलो तेव्हा बाईसाहेब पुन्हा चेकींगसाठी गेल्या होत्या. यावेळची स्थिती तुलनेत आशादायी असली तरी एव्हाना ती पार कंटाळली होती. एकीकडे दुखणे वेगाने वाढत होते मात्र सकाळपासूनची प्रगती पाहता आणखी तास दोन तास थांबून काही चमत्कार घडेल अशी आशा तिला स्वताला तरी वाटत नव्हती. सिझेरीयन झाले तरी चालेल पण यातून मला एकदाचे सोडवा या मनस्थितीला ती पोहोचली होती. पण डॉक्टरच म्हणाले, थांबा, शक्य आहे तोपर्यंत नॉर्मलच करूया, जरा कळ काढा..

जरा कळ काढ, या वाक्यप्रचाराचा उगम मी आज माझ्या डोळ्यासमोर अनुभवत होतो. तिची अवस्था आता मलाही बघवत नव्हती. तिच्यासाठी मी काय करू शकत होतो तर ते फक्त तिचा हात हातात पकडून बसू शकत होतो. जितके असह्य व्हायचे तितक्या जोरात ती माझा हात घट्ट आवळायची, याने मी तिच्या वेदना मापू शकत होतो पण त्यांना कमी करू शकत नव्हतो. त्या कमी व्हायचे इंजेक्शन दिले होते मात्र ते निकामी ठरत होते. विज्ञानाने वा वैद्यकीय शास्त्राने कितीही प्रगती केली तरी कोणाचे शारीरीक दुखणे वाटून घेण्याचा शोध लागेल तेव्हा ती खरी क्रांती. होणारे मूल दोघांचे असताना त्रास हा फक्त आईलाच होतोय या विचाराने दाटून आलेल्या अपराधीपणाच्या भावनेवर हा नक्कीच अक्सर इलाज ठरला असता.

आता दर दुसर्‍या मिनिटाला कळ निघत होती. माझ्याही हातावरचा दाब वाढत होता. डॉक्टरने पुढच्या आणि कदाचित शेवटच्या चेकींगची दिलेली वेळ अजून तासाभराने होती, तेव्हाही नक्की काय होणार होते, काय डिसीजन घेतला जाणार होते हे ठाऊक नव्हते. जर तोपर्यंत थांबूनही सिझेरीयनच करावे लागणार होते तर का उगाचच थांबायचे हा प्रश्न छळत होता. पुर्ण दिवस निघाला असला तरी हा तास निघणे फार कठीण होते. होणारा त्रास पाहता फक्त आणखी अर्धा एक तासच सहन करायचे हा खरा खोटा दिलासा तरी तिला कसा द्यावा हा प्रश्न होता. त्यामुळे सारेच शांत होते, ज्या धीराची तिला गरज होती तो शब्दांतून नाही तर फक्त स्पर्शातून दिला जात होता.

आजवर सिनेमांमध्ये बघितलेले बाळंतपणाचे सारे प्रसंग डोळ्यासमोर येत होते. दिवसभर एकच प्रार्थना करत होतो की ते सारे तितकेसे खरे नसून अतिरंजीत असावेत, ती केवळ नाटक सिनेमांमधील ओवरअ‍ॅक्टींग असावी, पण आता मात्र हे सारे हळूहळू नजरेसमोर अनुभवायला सुरुवात झाली होती. आता मी देखील घड्याळाकडे पाठ करून बसलो होतो, मागे काटे वेगाने पळत असतील अशी स्वताच्या मनाची समजूत काढत. खरेच तसे होत होते का याची कल्पना नाही पण वेळ मात्र सरकत होती. साडेदहाची वेळ दिली होती, पावणेअकरा वाजता पुन्हा डॉक्टरांचे आगमन झाले. चेकींगसाठी म्हणून तिला पुन्हा ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन गेले. आम्ही सारे बाहेरच जमलो होतो, कारण याच चेकींग नंतर ऑपरेशन करायचे का नाही याचा निर्णय घेऊन त्याची लागलीच अंमलबजावणी होणार होती.

इतक्यात आतून तिच्या ओरडण्याचा आवाज येऊ लागला. चेकींग हा प्रकार देखील खूप त्रासदायक आहे असे ती संध्याकाळी म्हणाल्याचे आठवले. थोड्याच वेळात एक मदतनीस आतून वेगाने बाहेर आली शेजारच्या रूममधून काही औजारे घेऊन पुन्हा आतल्या दिशेने गायबली. तिच्यापाठोपाठ आणखी एक जण आत गेली. हा प्रकार एक-दोन वेळा घडला आणि कल्पना येऊ लागली की आत काही तरी घडायला सुरुवात झाली आहे. दोनचार वेळा उघडणार्‍या दरवाज्यामधून मी दबकत आत डोकावून बघायची हिंमत दाखवली खरी पण तिथून काहीच दिसत नव्हते याचा खरे तर दिलासाच वाटला. सुरुवातीलाच आलेला तिचा ओरडायचा आवाज त्यानंतर पुन्हा आला नव्हता. आता हे चांगले की वाईट हे मात्र समजत नव्हते ना कसलेही वेडेवाकडे अर्थ लावायच्या मनस्थितीत मी होतो. जेमतेम सात आठ मिनिटे झाली असावीत, तोच लहानग्या बाळाचा रडण्याचा आवाज आला आणि बाहेरच्या तंग झालेल्या वातावरणात कुजबूज सुरू झाली. काही चेष्टा पण किती क्रूर असतात, हा आवाज अगदी विरुद्ध दिशेला असलेल्या एका रूममधून येत होता मात्र तरीही बेसावध मनाने त्याचा पटकन आपल्या सोयीने अर्थ काढला होता. इतकेच नव्हे तर हट्टाने हा आवाज आपलाच आहे हे पटवून द्यायची चढाओढ लागली होती. तो आवाज विरला आणि पुन्हा मिनिटभराची शांतता. वातावरणातील ताण निवळावा म्हणून काही जणांचे तेच पुराने घीसेपीटे विनोद मारणे सुरू झाले, की काही चांगलेही होते, कोणास ठाऊक, पण त्यावेळी मला हसवण्याचा प्रयत्न करणे हेच मुळात माझ्या दृष्टीने हास्यास्पद होते. पण लोकांच्या भावनांची कदर करत ना कोणाला काही बोलता येत होते ना कोणावर काही चिडता येत होते. अन्यथा मला ताटकळत उभा राहण्याऐवजी बसून घे जरा असा सल्ला देणार्‍यांनाही ओरडून शांत राहा सांगावेसे वाटत होते. बाप होतोयस तर आता बापाची जबाबदारी घ्यायला शिक हे वाक्य गेल्या काही महिन्यात कित्येकदा ऐकले होते आणि हसून टाळले होते, पण आता ऑपरेशन थिएटरच्या आत असलेल्या माझ्या बायकोची आणि होणार्‍या मुलाची त्याच्या जन्माआधीपासूनच लागलेली चिंता, हे दडपण, बापाची जबाबदारी घेण्यास मी तयार आहे हे स्वताच स्वताला पटवून देत होते.

ईतक्यात पुन्हा एक बारीकसा रडण्याचा आवाज आला. हा आवाज कदाचित अपेक्षित दिशेने आला होता म्हणून पुन्हा सर्वांनी कान टवकारले. नजरेनेच एकमेकांना शांत राहण्याच्या खाणाखुणा झाल्या. दुसर्‍याच क्षणाला तेच ते रडणे, यावेळी मात्र आधीपेक्षा कैक मोठ्या आवाजात, न थांबता येऊ लागले, आणि बाहेर एकमेकांना अभिनंदन करणे सुरू झाले. काही हात माझ्याही दिशेने सरसावले मात्र माझ्या चेहर्‍यावरची चिंतेची रेष अजूनही काही हलायला मागत नव्हती. रडण्याच्या आवाजाने बाळ कदाचित सुखरूप आहे हे नक्की झाले होते पण त्याच्या आईची खुशाली समजणे बाकी होते. ईतर अनुभवी लोकांना कदाचित ते काळजीचे कारण वाटत नसावेही पण..... मी अजूनही वाट बघत तसाच त्या ऑपरेशन थिएटरच्या दारावर उभा होतो. दार उघडले आणि एक नर्स माझ्या मुलीला घेऊन बाहेर आली. मगासच्या रडण्याच्या खणखणीत आवाजावरून कोणीतरी मुलगा आहे असा अंदाज बांधला होता, तेव्हा होणार्‍या बाळात मुलगा मुलगी असेही असते ही बाब डोक्यातच आली नव्हती. पण आता मुलगी आहे असा गलका होताच आठवले की येस्स, मला मुलगीच तर हवी होती. गर्दीच्या सर्वात पाठीमागे उभा राहून मी माझ्या मुलीला कोणाच्या तरी खांद्यावरून डोकावून पाहिले आणि आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या मुलीच्या बघताक्षणीच प्रेमात पडलो असे झाले. आजवर मी पाहिलेली सारीच नवजात पिल्ले मला एकसारखीच वाटायची. पण हे वेगळे होते. हे माझे होते. माय लिटील प्रिन्सेस. अभि’ज लिटील गर्लफ्रेंड. तिला पाहताना मला दडपणाच्या उंच कड्यावरून अलगपदणे तरंगत खाली येत असल्याचा भास होत होता. शिवजयंतीच्या मुहुर्ताला राणी लक्ष्मीबाई आली असे कोणीतरी म्हणताच घड्याळावर नजर गेली तर जेमतेम अकरा वाजून गेले होते. बाळ ज्या मुहुर्ताला सुखरुप येते तोच खरा शुभ मुहुर्त याची जाणीव झाली. मुलीचे केवळ क्षणभर दर्शन करवून, तिचे वजन मोजून, तिला पुन्हा आत घेऊन गेले. माझी नजर अजूनही त्या दरवाज्यावरच होती, माझ्यासाठी तो अजून एकदा उघडायचा होता. उघडला, आणि स्ट्रेचरवर झोपूनच माझी बायको हसतमुखाने बाहेर आली. कोण विश्वास ठेवेल की थोड्यावेळापूर्वी हिच बाई वेदनेने नुसते व्हिवळत होती, पण आता मात्र तिच्या चेहर्‍यावर एक तृप्तीचे समाधान दिसत होते. की हे मातृत्वाचे तेज होते, वा निव्वळ सुटकेची भावना. ते जे काही होते ते हळूहळू माझ्याही चेहर्‍यावर पसरत असल्याचे मला जाणवत होते. कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...

न्यू बॉर्न फादर
तुमचा अभिषेक

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अभिनंदन. माझ्या एका कलीगला पण मुलगी झा ल्याचा फोन आला म्हणून मी कालच हौसेने बाळंत विडा ख रेदी केला. मस्त पैकी एट पीसेस चा. डॉ. स्पॉक चे पुस्तक जरूर घ्या. अगदी मदत होते.

छानच लिहील आहेस!
एका बाबाच्या नजरेतून हा अनुभव वाचताना मजा वाटली!
तुम्हा उभयतांचे अभिनंदन आणि पिल्लीस आशिर्वाद!

अभिनंदन, नवनवीन समृद्ध अनुभवांनी तुम्हा उभयतांचे पालकत्व सार्थक होवो हीच सदिच्छा !

अभिनंदन! छान लिहिलंय.

>>कोण म्हणते फक्त बाळंतीण सुटते, बाहेर ताटकळत उभा असलेला एक बाप देखील हळूहळू सुटत असतो ...
नक्कीच! याचा अनुभव नाही, पण......

>>आता मात्र तिच्या चेहर्‍यावर एक तृप्तीचे समाधान दिसत होते. की हे मातृत्वाचे तेज होते, वा निव्वळ सुटकेची भावना.
'निव्वळ सुटकेची भावना! हे मात्र नक्की सांगू शकते. Happy

अभिनंदन new born father.

आवडला लेख

शेवटची ओळ 100% सहमत

Pages