सामाजिक उपक्रम २०१४ - आवाहन (सार्वजनिक धागा)

Submitted by सुनिधी on 10 March, 2014 - 09:57

नमस्कार,
सामाजिक उपक्रमाचे हे पाचवे वर्ष. हा उपक्रम आता तसा आपल्याला नवा नाही. तरीही नवीन सभासदांना माहिती व्हावी ह्यादृष्टीने ही थोडक्यात ओळख.

ह्या उपक्रमात दरवर्षी अशा गरजु संस्थांना वस्तुरुपात मदत केली जाते ज्यांना सरकारकडुन जास्त मदत मिळत नाही (वा मिळतच नाही) किंवा संस्था मुख्यकरुन फक्त देणगीदारांवर चालते. त्याकरता देणग्या मागवण्याचे हे आवाहन आहे.

देणग्या मार्च-एप्रिल ह्या २ महिन्यात मागवण्यात येतात. नंतर एकुण जमा झालेल्या निधीतुन संस्थांच्या प्राधान्यानुसार वस्तु खरेदी करुन त्यांना पोचवल्या जातात व त्याची रीतसर नोंद इथे दिली जाते.

ही झाली थोडक्यात ह्या उपक्रमाची ओळ्ख.

आतापर्यंत ज्या संस्थांना मदत केली गेली आहे व ज्या संस्थांची ह्यावर्षी नावे कळली आहेत त्यातल्या काही संस्थांनी त्यांना ज्या गोष्टींची गरज आहे ते आधीच कळवलेले आहे. काही नंतर कळवतील.

वरील संस्थांची ओळख ह्याच धाग्याच्या पहिल्या प्रतिसादात करुन देत आहे (जेणेकरुन मुख्य धागा फार मोठा होणार नाही).
ओळख - प्रतिसादाची लिंक
http://www.maayboli.com/node/48057#comment-3056644

त्याचप्रमाणे मायबोली अ‍ॅडमिन टीमच्या सुचनेनुसार ह्यावर्षीपासुन देणगी मागवायच्या धोरणात बदल केला आहे तो असा,
देणगीदारांनी आपली देणगी आता थेट संस्थेच्या ८०जी खात्यावर पाठवायची आहे. त्यात नक्की काय करायचे आहे ते ह्याच धाग्याच्या दुसर्‍या प्रतिसादात सविस्तर लिहिले आहे.
देणगी पाठवायची पद्धत - प्रतिसाद दुसरा लिंक
http://www.maayboli.com/node/48057#comment-3056645

पैसे जमा करण्याकरता सर्व संस्थांच्या बँक खात्यांची माहिती खालीलप्रमाणे आहे

bank accounts list.jpg

आशा आहे हा उपक्रम मागील वर्षापेक्षा जोरदार होईल.

सामाजिक उपक्रम टीम चमु - अकु, मो, स्वाती२, केदार, सुनिधी, जाई, कविन, असामी.
संस्थेशी व्यवहार करताना मदत करणारी मंडळी - साजिरा, नीधप, हर्पेन, जिज्ञासा

धन्यवाद.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१) निवासी अपंग कल्याण केंद्र, सटाणा, जि. नाशिक

md2014-su2 copy.jpg२) सावली सेवा ट्रस्ट

md2014 su3.JPGmd2014 su4.JPG३) मैत्री संस्था, पुणे

मैत्री, ३२ कल्याण, नटराज सोसायटी, कर्वेनगर, पुणे५३२.
वेबसाईट : http://maitripune.net
नोंदणी क्रमांक : ई/२८९७ पुणे.

‘मैत्री’ – ‘100 दिवसांची शाळा, मेळघाट’ उपक्रम

1997 पासून मेळघाटामध्ये ‘मैत्री’ ने काम सुरु केले ते ‘कुपोषण आणि बालमृत्यू’ या समस्यांवर. आरोग्यासेवा उपलब्ध करुन देणे हा तातडीने करायचा उपचार आपण केलाच. मात्र या समस्यांना मुळापासून उखडून टाकण्यासाठी आरोग्याबरोबरच शिक्षण, शेती, रोजगार, संघटन अशा सर्व पातळ्यांवर कामाची गरज आहे हे लवकरच लक्षात आले. स्थानिक लोकांना सक्षम बनवणे हा या मागचा कळीचा मुद्दा. तेव्हापासून टप्प्याटप्प्याने ‘मैत्री’ ने काम सुरु केले. मेळघाटातील चिलाटी या दुर्गम ठिकाणी ‘मैत्री’ चे तीन कार्यकर्ते निवासी स्वरूपात काम करु लागले. आजूबाजूच्या गावांशी संपर्क वाढवणे, आदिवासी लोकांसाठी असलेल्या योजनांची लोकांना माहिती देणे, रोजगार हमीची कामे सुरु करण्याबाबत पाठपुरावा करणे असे अनेक उपक्रम चालू झाले.
याबरोबरच पावसाळ्याचे तीन-चार महिने चालणारी ‘धडक मोहीम’ ही तर ‘मैत्री’ ची खास ओळख झाली. दुर्गम भागामध्ये पावसाळ्यात स्वयंसेवकांच्या तुकड्या पाठवून तत्काळ आरोग्यसेवा पुरवणे व बालमृत्यू रोखणे हे या मोहिमेचे वैशिष्ट्य. 1997 पासून मेळघाटाच्या वेगवेगळ्या भागांमध्ये ‘मैत्री’ धडक मोहीम राबवते. 2/3 वर्षे एका भागात स्वयंसेवकांच्या मदतीने काम करणे, आरोग्यमैत्रिणी तयार करणे, त्यांना प्रशिक्षण देणे व त्यांच्याकडे मुलांच्या, गरोदर महिलांच्या आरोग्याची जबाबदारी सोपवण्याइतक्या त्या तयार झाल्या की दुस-या भागात ‘धडक मोहीम’ घेणे असे स्वरूप ठेवल्यामुळे आज 75 हून अधिक गावांमध्ये बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यात आपण यशस्वी झालो आहोत.

2011 पासून मेळघाटात ‘मैत्री’ ने शिक्षण या मूलभूत गोष्टीवर भरीव, दीर्घकालीन परिणाम करणारे, टिकाऊ व स्वयंनियंत्रित काम करण्याचे ठरवले. पहिल्या वर्षी ने मेळघाटातील चिलाटी या ठिकाणी शाळाबाह्य 40 मुलांसाठी 100 दिवसांची निवासी शाळा चालवली. शाळा संपल्यानंतर त्या सगळ्यांना आश्रमशाळेत दाखल करुन खंडित झालेला त्यांचा शिक्षणप्रवाह पुन्हा सुरु केला. त्यानंतरच्या वर्षी म्हणजे 2012 मध्ये 3 गावांमध्ये असलेल्या जिल्हापरिषदेच्या शाळांबरोबर आपण 100 दिवस काम केले व सुमारे 70 मुलांपर्यंत आपण पोहोचलो. दोन्ही वर्षांचे हे उपक्रम स्वयंसेवकांच्या मदतीनेच पार पडले. त्यामुळे ‘धडक मोहीमे’ प्रमाणेच ‘100 दिवसांची शाळा’ हा पण मेळघाटातील ‘मैत्री’ चा चेहरा बनला.

तीन गावांमध्ये उपक्रम संपताना पालकांच्या बैठकी घेतल्या, तेव्हा सर्व पालकांनी सांगितले की, “वर्षभर आमच्या मुलांना असे काही मार्गदर्शन मिळाले तर जास्त उपयोग होईल. आमच्या गावात शाळा नीट चालतील. गावाच्या शाळेचे शिक्षक कित्येक दिवस, महिने गैरहजर असतात त्यामुळे मुलांचे नुकसान होते. त्याकरता तुम्ही काहीतरी करा”. पालकांकडून आलेल्या या मागणीमुळे नक्कीच हुरुप वाढला आणि यावर्षी म्हणजे 2013 जून पासून स्वयंसेवक व स्थानिक तरुण यांच्या एकत्रित सहभागातून आपण वर्षभर शाळेला ‘पूरक वर्ग’ असा उपक्रम सुरु केला. त्याची थोडक्यात रूपरेषा अशी आहे.

• 11 गावांमधून 10 वी, 12 वी किंवा पदवीधर तरुण ‘गावमित्र’ म्हणून निवडले.
• दररोज शाळेच्या आधी एक ते दोन तास गावमित्रांनी मुलांना शाळेत जमा करुन मराठी व गणित यामधील मूलभूत कौशल्ये त्यांनी शिकवायची. येथील स्थानिक भाषा आहे कोरकू व शाळेचे माध्यम आहे मराठी त्यामुळे भाषा शिकवण्यावर विशेष भर द्यावा लागतो.
• दर महिन्याला चिलाटीमध्ये एक शिबिर/ कार्यशाळा असते. यावेळी स्वयंसेवकांचा गट तेथे जातो. सर्व गावमित्र पण मुक्कामी येतात. स्वयंसेवक त्यांना पुढच्या महिन्यात काय शिकवायचे याचे प्रशिक्षण देतात. तसेच गावागावांमध्ये जाऊन स्वयंसेवक स्वत: शिकवतात.
• चिलाटीमध्ये रमेश व अशोक हे आपले स्थानिक कार्यकर्ते स्वयंसेवक नसताना गावांना भेटी देणे, गावमित्रांना मदत करणे, त्यांच्या अडचणी सोडवणे इ कामे व एकूणच स्थानिक पातळीवर या उपक्रमाचे समन्वयक म्हणून काम करतात.
• स्वयंसेवक वर्षभरात एकूण 100 दिवस मेळघाटात शिकवण्याच्या कामी मदत करतात म्हणून उपक्रमाचे नाव आपण ‘100 दिवसांची शाळा’ असेच ठेवले आहे.

गावमित्रांना बरोबर घेऊन हा कार्यक्रम केल्याचे अनेक फायदे जाणवतात ते असे.
• मुख्य म्हणजे वर्षभर मुलांना मार्गदर्शन मिळते.
• गावमित्रांना सतत प्रशिक्षण मिळाल्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढतो तसेच शिकवण्याचे कौशल्य पण वाढते.
• कोरकू भाषिक गावमित्राबरोबर शाळेत येणारी लहान मुले पटकन संवाद साधू शकतात.
• सातत्याने राखल्याने मुलांना कसा फायदा होते हे पालकांना समोरच दिसते आणि यातूनच त्यांच्याकडून शिक्षकावर काही प्रमाणात दबाव यऊन त्याच्या उपस्थितीमध्ये वाढ होते.

त्यामुळे पुढील वर्षी आपण याच पद्धतीने आताची गावे व नवीन 2/3 गावे या उपक्रमामध्ये घेणार आहोत. नवीन गावांमध्ये ‘गावमैत्रिणी’ शोधण्यावर आपला भर असेल कारण घरातील आई शिक्षणाच्या प्रवाहात आली तर तिच्यामार्फत इतर अनेक चांगल्या गोष्टी आपण घरोघर पोहोचण्याचा प्रयत्न करु शकतो जसे दैनंदिन स्वच्छता व आरोग्याच्या सवयी, परसबाग लागवड, पोषक आहार इत्यादी. पुढील वर्षी काही नवीन कार्यक्रम या उपक्रमामध्ये करण्याचे आपण ठरवले आहे. त्याचा थोडक्यात तपशील याप्रमाणे -

 ’एक गाव – एक वाचनपेटी’ – प्रत्येक गावामध्ये एक वाचन पेटी तयार करणे ज्याचा उपयोग लहान मोठी मुले, तरुण मुलेमुली तसेच मोठी मंडळी पण करु शकतील. यातून वाचन संस्कृती तयार होऊ शकेल व त्याचा शिकण्याकरता नक्की फायदा होईल. याकरता पुढील साहित्य लागेल.

o स्टीलची पेटी – पुस्तके ठेवण्याकरता (परतवाडा, अमरावती भागात अशा पेट्या बनवण्याचा व्यवसाय चालतो. साधारण रु. 1600 ते 1800 मध्ये ब-यापैकी मोठ्या आकाराची पेटी मिळू शकते.

o पुस्तके –

 अगदी लहान मुलांसाठी मोठी चित्रे असलेली
 वाचायला शिकू लागलेल्यांकरता मोठ्या अक्षरांमधील लहान लहान गो असणारी मराठी पुस्तके
 मोठ्या मुलांना आवडतील अशी पुस्तके
 तरुण मुले व मोठ्या माणसांना वाचता येतील अशी पुस्तके

 ‘फिरती विज्ञान पेटी’ – विज्ञान प्रयोगांचे काही मूलभूत साहित्य असलेली पेटी चिलाटीमध्ये असेल. स्वयंसेवक वेगवेगळ्या गावांमध्ये हे साहित्य नेऊन मुलांना प्रयोग करुन दाखवतील, करायला देतील. यातून विज्ञानातील संकल्पनांची तोंडओळख मुलांना होईल आणि त्यातूनच जिज्ञासा वाढेल. याकरता पुढील साहित्य लागेल.

o स्टीलची पेटी – विज्ञान साहित्य ठेवण्याकरता

o विज्ञान प्रयोग साहित्य
 परीक्षानळ्या, चंचूपात्र, स्पिरीट दिवा, लिटमस पेपर, भिंग, आरसा, प्रिझम, काही रसायने, चुंबक इ. – साधारण 20 मुलांना पुरेल असे.
 आपले शरीर कसे काम करते हे दाखवण्याकरता काही नमुने (उदा. दातांची रचना, पोटाची रचना, फुफ्फुस इ.)
 आर्किमिडीज स्क्रू, सोपे पंप, हवेचा दाब वा तत्सम काही प्रयोगांचे सामान
o मायक्रोस्कोप

 ‘बालकदिन’ – या वर्षी आपण 11 गावातील मुलांच्या विविध क्रीडा स्पर्धा गावांमध्ये घेतल्या. नंतर चिलाटीत एकत्रित स्पर्धा घेतल्या. सुमारे 100 मुले यावेळी चिलाटीत राहिली. असा बालकदिन पुढील वर्षी पण आपण घेणार आहोत. याकरता पुढील साहित्य लागेल.

o क्रीडासाहित्य
o बक्षिसे देण्याकरता वस्तू
o मुलांसाठी पोषक खाऊ

 ‘अभिव्यक्ती शिबिरे’ – वर्षातून दोन वेळा 10 दिवसांचे शिबिर स्वयंसेवकांच्या मदतीने आपण घेणार आहोत. यामध्ये स्वत:ला व्यक्त करण्याची संधी देणा-या व सर्जनशील प्रवृत्तीला उत्तेजन देणा-या गोष्टी जसे विविध हस्तकौशल्ये, नृत्य, नाट्य, गायन, वादन इ. चा समावेश आपण करणार आहोत. याकरता पुढील साहित्य लागेल.
o चित्रकला, रंगकामाचे साहित्य – रंग, ब्रश, खडू, चित्रांची पुस्तके इ.
o विविध प्रकारचे कागद – कार्डशीट, ओरीगामी कागद, पुट्ठे, रंगीत स्टीकर पेपर, जिलेटीन पेपर इ.
o मातीकाम, कातरकाम, ठसेकाम इ. साहित्य
o मुलांना त्यांचे साहित्य ठेवण्याकरता फाईल, पिशवी

 ‘आमचीच भाषा, आमचीच पुस्तके’ – ’मराठी आणि कोरकू’ अशा दोन भाषेत मजकूर असलेले आणि प्राथमिक शाळेतील मुलांना सहज समजेल असे चित्रांनी नटलेले पुस्तक उपलब्ध झाले तर? आजपर्यंत तरी असे पुस्तक मेळघाटात नाही. मान्यवर शिक्षण तज्ज्ञ ‘वर्षा सहस्त्रबुद्धे’ यांच्या मार्गदर्शनाखाली मूलगामी प्रकाशनाने टाटा ट्रस्ट च्या मदतीने नंदूरबार जिल्ह्यातील भिलोरी व पावरी भाषिक मुलांसाठी अशी पुस्तके तयार केली. तोच धागा धरून वर्षाताईंच्याच मार्गदर्शनाखाली मूलगामी प्रकाशनाकडूनच मेळघाटातील कोरकू मुलांसाठी पण त्यांच्या भाषेमध्ये पुस्तके आणण्याचे “मैत्री” ने ठरवले आहे. वर्षाताई, माधुरी पुरंदरे, मूलगामी प्रकाशन याकरता विनामोबदला काम करणार आहेत. मात्र पुस्तक छ्पाई व वितरणाकरता खर्च येणार आहे. यासाठीचे एक निवेदन सोबत जोडले आहे. याकरता आपण काही मदत करु शकलात तर नक्कीच उपयोग होईल.

 ‘मैत्री’ च्या कार्याचे स्वरूप हे साधारण असे आहे. आपल्याला शक्य असेल त्या मार्गाने आपण यात जरूर सहभागी व्हा, तसेच वस्तू रूपाने अथवा पैसे देऊन हातभार लावा.

 एकूण मैत्रीविषयी सविस्तर जाणून घेण्यासाठी http://maitripune.net पहा.

 ‘मैत्री’ ही नोंदणीकृत संस्था आहे व तिला दिलेल्या देणगीकरता भारतीय आयकर नियमांनुसार 80G अंतर्गत आयकरात सवलत मिळते. वस्तूरुपाने दिलेल्या देणगीची किंमत सांगितल्यास तशी पावती ‘मैत्री’ कडून मिळू शकेल.

४] अस्तित्व प्रतिष्ठान

१. संस्थेचे नाव:- अस्तित्व प्रतिष्ठान
संस्थेचे कार्य:
संस्था गुरुकुल चालवते ते खूप गरीब, एकच पालक असलेल्या मुलामुलींसाठी निवासी शाळा म्हणून. बहुतेक मुलेमुली शाळाबाह्य व बालमजूर असून, काही पालक HIV +ve आहेत. या मुलामुलींसाठी संस्था निवासी शाळा चालवीत आहे. या मुलांनी स्वतःच्या पायावर आत्मविश्वासाने उभे राहावे यासाठी त्यांना व्यवसाय प्रशिक्षणही दिले जाते.
संस्थेच्या माध्यमातून बचतगट, सेंद्रिय शेती इ. विषयावर प्रशिक्षण दिले जाते. शहराकडे होणारे स्थलांतर कमी होऊन गावांचा विकास व्हावा हे मुख्य ध्येय आहे
२. नोंदणी :- ट्रस्ट अंतर्गत : क्रमांक :- ई ४१०४ पुणे
३. वेबसाईट चे काम सध्या सुरु केले आहे.
४. मदत :- संस्थेला कुठलीही सरकारी मदत मिळत नाही. काही लोकांकडून थोडीफार वस्तुरूप मदत मिळते आहे.
५. आयकरात सवलत ८०G अंतर्गत आहे. शिवाय आता FCRA (परदेशी मदतीसाठीची मान्यता) मिळाली आहे त्यामुळे तीही अडचण येणार नाही.
६. संस्थेच्या नितांत गरजा :- संस्थेच्या मुलांसाठी पाणी शुद्धीकरण साठी एखादे उपकरण, Fridge इ. साठी गरजेची आहे. शेतीमध्ये ठिबक सिंचनासाठी देखील आर्थिक मदतीची अत्यंत गरज आहे.
मला वाटते गरजा तर खूप आहेत, पण तुमच्यातर्फे मिळणारी कोणतीही मदत आमच्या दृष्टीने मोलाचीच आहे. कारण ती अत्यंत आत्मीयतेने मिळणार आहे.
७. संपर्क व्यक्ती:- गीतांजली देगावकर,
अध्यक्ष,
०९८९०६९०५१३,
e-mail :-astitvapune२८@gmail. com
geet.astitva@gmail.com

१. Water Purifier - Rs. ५५,०००/-
२. Inverter - Rs. ६०,०००/-
३. Fridge - Rs. २७,०००/-
४. Uniform for Karate - Rs. ३५,०००/-
५. Drip Irrigation System - Rs. ५०,०००/-
६. Television for E-learning - Rs. ५०,०००/-
अस्तित्व गुरुकुलसाठी अनेक शालेय वस्तूंची गरज कायमच असते. शिवाय हे निवासी असल्यामुळे निवासासाठीच्या अनेक वस्तूंचीही कायमच आवश्यकता असते.

५] भगीरथ ग्राम विकास प्रतिष्ठान संस्था

वेबसाइट : http://www.bhagirathgram.org/

१. वाचनालय सुरु करण्यासाठी १ लाख रुपयांची गरज
२. शाळेतील विद्यार्थिनींच्या ट्रेनिंगसाठी सायकल्स : एका शाळेसाठी ३५०० रुपये : एकूण १० शाळा.
३. खेड्यातील गर्भवती स्त्रियांसाठी कॅल्शियम आणि आयर्न सप्लिमेन्ट्स खर्च : १५०० रुपये एका स्त्रीसाठी, ९ महिन्यांसाठी

६] संस्थेचे नावः राधाबाई हार्डीकर प्राणिजात मंगल संस्था

पत्ता:12152, Kanchanshree, Shirole Road, Opp. Fergusson College, Shivajinagar, Pune-411001. Tel:25531881

चालवत असलेले उपक्रमः सुमती-बालवन शाळा, पाखरमाया अनाथाश्रम

संस्थेबद्दल माहिती: २००१ साली संस्थेची स्थापना झाली. संस्थेतर्फे कात्रजच्या पुढे असलेल्या गुजर-निंबाळकरवाडी ह्या गावात आर्थिक दृष्ट्या हालाखीची परिस्थिती असलेल्या मुला-मुलींकरता सुमती बालवन ही शाळा चालवली जाते. तसेच गरजू आणि अनाथ मुलांकरता पाखरमाया अनाथाश्रम चालवला जातो. शाळेत सध्या साधारण १५० विद्यार्थी शिकत आहेत आणि त्यातील साधारण १५% मुलं ही वसतिगृहात राहतात. विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच, लघूउद्योगाचे शिक्षण देऊन लवकर स्वावलंबी बनविण्याकडे शाळेचा कल आहे. अनाथाश्रम आणि वसतिगृहातील मुलांचा राहण्याचा, शाळेचा खर्च, सकस आहार, वैद्यकीय मदत हे सर्व संस्थेमार्फत केले जाते.

रेजिस्टेशन नंबरः Maharashtra/846/2001/Pune, dated July 26, 2001.

निकडीच्या वस्तू:

1.Handmade paper A4 size--200
2.Chart papers-100
3.Crape papers-50
4.Glitter pens-all colours
5.Pattern scissors-5
6.Scissors-5
7.Quilling instruments
8.Quilling papers.
9.Ruled papers-5 rims.
10.A4 size computer papers
11.Drawing papers-100
12.Painting brushes.
13.Wall mounted cupboards-2

७] शबरी सेवा समिती

वेबसाईट :

http://shabarisevasamiti.org/

शबरी सेवा समितीने त्यांची गरज / गरजेच्या वस्तू कळवल्या आहेत. विज्ञान दिनाला संस्थेने कर्जत व जव्हार तालुक्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी काही विज्ञान उपक्रम केले तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की ह्या भागातील विना-अनुदानित छोट्या आकाराच्या शाळांमधील सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना वैज्ञानिक प्रयोग, प्रयोगांसाठी लागणारी साधने, ती हाताळायला मिळणे, इत्यादींपासून पुरेशा सामग्री अभावी व निधी अभावी वंचित राहावे लागते. तेव्हा संस्थेचा मानस आहे की कर्जत, जव्हार व नंदुरबार येथील ३ जिल्ह्यांमध्ये स्वयंसेवकांमार्फत फिरत्या विज्ञान प्रयोगशाळा किंवा फिरते विज्ञान प्रयोग उपक्रम राबवायचे. त्यासाठी त्यांना खालील साधनसामग्री आवश्यक आहे असे त्यांनी सांगितले.

(सर्व साधनांचे एकूण ३ सेट्स प्रत्येकी)

Item cost in Rs
1) Concave mirror 3” 90.00
2) Concave lens 2” 25.00
3) Convex lens 2” 25.00
4) Convex mirror 50.00
5) Spirit lamp 60ml 130.00
6) Compass/ magnetic needle 50.00
7) Filter paper 1 pack 30.00
8) Focal length app 390.00
9) Wire gauge 15.00
10) Thermometer 110 deg 45.00
11) P H paper 1 pack 75.00
12) Litmus paper 1 pack 60.00 (red and blue)
13) Measuring cylinder plastic 45.00
14) Measuring cylinder glass 110.00
15) Earth globe large size 1335.00
16) Periscope 165.00
17) Kalidoscope 165.00
18) Newton’s colour disc 450.00
19) Rain gauge 450.00
20) Geometrical figures wooden 490.00
21) Models Ear 250.00
22) ---,,---- Heart 250.00
23) ---,,---- Brain 250.00
24) ---,,---- Eye 250.00
25) ---,,--- Digestive system 350.00
26) ---,,--- Nervous System 350.00
27) ---,,--- Respiratory system 350.00
28) ---,,-- Kidney 250.00
29) ---,,--- Torso 1200.00
30) Skelton 24” 500.00
31) Glass prism 125.00
32) Bar magnet 125.00
33) U shape magnet 3” 150.00
34) Spring Balance 100 Grams 60.00
35) Weight box up to 100 gms 360.00
36) Reflation of soiund 500.00
37) Pulleys ( Kappy)
38) White screen 50.00
39) Disc magnet 50.00
40) Solar eclipse model 1450.00
41) Vernier calipers 145.00
42) Micrometer 245.00
43) Solar fan 500.00
44) Stop watch 900.00
45) Model Teeth 350.00

--------------------------------------------------
Total -------- 13105.00
-----------------------------------------------------

शबरी सेवा समितीच्या कशेळे येथील केंद्रासाठी स्थानिक भागातील मुलांना व्यायाम करण्यास उपयुक्त असे व्यायामशाळेचे साहित्य त्यांना आवश्यक असल्याचे संस्थेने कळवले आहे. अगदी प्राथमिक स्वरुपातील हे साहित्य असेल. (उदा. डम्बेल्स इ.) ह्या साहित्याची किंमत साधारण रुपये ६००० पर्यंत आहे. तरी ज्यांना कोणाला हे साहित्य संस्थेसाठी प्रायोजित करायचे असेल तर त्यांनी तसे कळवावे.

देणगीदारांनी आपली देणगी थेट संस्थेला पाठवायची आहे. पण हा उपक्रम देणगी दिल्यानंतर संपत नाही.

वर लिहिल्यानुसार, आलेल्या निधीतुन नंतर आपल्यातर्फेच ती वस्तु विकत घेतली जाते व प्रत्यक्ष संस्थेपर्यंत पोचवली जाते व त्याची खात्रीही केली जाते. त्यामुळे जेव्हा वेगवेगळ्या संस्थांना थेट देणगी पाठवायचे धोरण निश्चित केले गेले तेव्हा सामाजिक उपक्रम टीम सदस्यांनी वर लिहिलेल्या सर्व संस्थांना संपर्क केला. जेव्हा ह्या उपक्रमांतर्गत वरील संस्थांना देणग्या पोचतील तेव्हा त्या संस्था ठरलेली (त्यांनी कळवलेली गरजेची) वस्तू विकत घेतील व आपल्याला पोच देतील याची टीम सदस्यांनी खात्री करून घेतली.

आता मुख्य प्रश्न, कोण देणगीदार कोणत्या संस्थेला देणगी पाठवणार?
ह्यात गोंधळ होऊ शकतो म्हणुन खालील सुरु करत आहोत.
१) ज्यांना देणगी द्यायची त्यांनी सुनिधी, अकु, मो, स्वाती२, कविन, केदार, जाई ह्यातल्या कोणालाही फक्त तुम्ही किती देणगी देणार आहात फक्त ते कळवायचे आहे. ह्यासाठी ३१ मार्च ही मुदत ठेवत आहोत.
२) एप्रिलमधे किती देणगी मिळत आहे ते पाहुन सर्व संस्थांना साधारण समान निधीवाटप करण्यात येईल. त्याचवेळेस त्या निधीतुन त्या संस्थेसाठी काय सामान घेता येईल, ते कुठुन घेता येइल वगैरे ठरवले जाईल.
३) देणगीदारांचे गट करुन कोणी कोणत्या संस्थेला देणगी पाठवायचे हे त्यांना कळवण्यात येईल व मगच तुम्ही देणगी पाठवायची आहे. संस्थेच्या अधिकृत टॅक्स खात्याची माहिती इथे लिहिण्यात येईल.
४) देणगीदारांनी त्यावेळेस अकु, सुनिधी, मो, स्वाती२, कविन, केदार, जाई ह्यापैकी कोणालाही त्याबद्दल कळवणे. हे करणे फार महत्वाचे आहे नाहीतर आम्हाला त्याबद्दल काहीच कळु शकणार नाही.
४) सर्व देणगीदारांनी देणग्या पाठवल्याचे आम्हाला कळवले की प्रत्येक संस्थेकडुन खातरजमा केली जाईल.
५) सर्व जुळले की मग वस्तु विकत घेण्यासाठी पाऊल उचलले जाईल.
६) वस्तु खरेदी झाली व संस्थेला पोचली की इथे सांगितले जाईल.

ही पद्धत गुंतागुंतीची वाटेल पण देणगीदारांनी योग्य त्या संस्थेला फक्त योग्यवेळी देणगी पाठवायची आहे बाकी काम उपक्रमाचे सभासद करतील.

तर वर लिहिल्याप्रमाणे पहिले पाऊल म्हणुन फक्त आपण किती रक्कम देणगी देऊ इच्छित आहात ते आम्हाला संपर्कातुन वा इथेच लिहिणे.

जेव्हा ह्या उपक्रमांतर्गत वरील संस्थांना देणग्या पोचतील तेव्हा त्या संस्था ठरलेली (त्यांनी कळवलेली गरजेची) वस्तू विकत घेतील व आपल्याला पोच देतील याची टीम सदस्यांनी खात्री करून घेतली. >>> हे छान केलेत.

अद्याप शबरी सेवा समिती यांच्याकडून त्यांच्या गरजेच्या वस्तूंची यादी यायची आहे. ती आल्यावर इथे त्याबद्दल माहिती देऊच!

तसेच स्नेहालय संस्थेचे नावही विक्रम देशमुख यांनी सुचविले होते. या संस्थेला देणगी द्यायची असल्यास http://www.maayboli.com/node/47551 ह्या धाग्याला भेट द्यावी व संस्थेशी संपर्क साधावा.

नक्कीच छान सिस्टीम! गेल्या वर्षी सुनिधी च्या माध्यमातून एका संस्थेला दिलेली देणगीची पोचपावती, मुलांची प्रगती सर्व व्यवस्थित पोचलं आमच्यापर्यंत. देणगीपेक्षा देखिल हे सभासद जे अपार मेहेनत घेतात त्याचे मोल खूप अधिक आहे.
(याही खेपेस थोडीफार मदत करायचा विचार आहे.. कळवतोच.)

खुप धन्यवाद सर्वांना.

अंधशाळेला ह्यावर्षी मदत नाही का अशी विचारणा केली गेली आहे. त्याचे उत्तर इथेच लिहीत आहे म्हणजे सर्वांना उपयोग होईल.
अंधशाळेसाठी मागच्या वर्षीचा निधी अजुन आहे. ते जेव्हा पुढील स्टॉकची गरज कळवतील तेव्हा तो निधी वापरणार आहे. त्यामुळे ह्यावर्षी अंधशाळेचे नाव लिहिले नाही.

"मैत्री" आणि "स्नेहालय" याना यथाशक्ती मी यापूर्वीच देणगी दिलेली आहेच. तरीही आत्ताचे हे जाहीर निवेदन वाचून वेगळी देणगी देण्यासाठी जाई यांच्याशी स्वतंत्रपणे संपर्क साधत आहे.

धन्यवाद,

अशोक पाटील

देणगी उचलून देणे खरंच सोपे आहे. पण स्वयंसेवक ज्या सातत्याने आणि शिस्तबद्धपणे काम करत आहेत त्याला तोड नाही !

अगो....

"...पण स्वयंसेवक ज्या सातत्याने आणि शिस्तबद्धपणे काम करत आहेत त्याला तोड नाही !..." ~ १०० टक्के सहमत....आणि या स्वयंसेवकांना मनोभावे नमस्कार....जरी ते माझ्यापेक्षा वयाने कितीही लहान असले तरीही.

कॅल्शियम आणि आयर्न सप्लिमेन्ट्स खर्च : १५०० रुपये एका स्त्रीसाठी, ९ महिन्यांसाठी <<
हे खेड्यातल्या गर्भवती महिलांसाठी आहे.

मो ने दिलेली सुमति बालवन संस्थेबद्दलची माहिती वर प्रतिसादात अपडेट केली आहे.

खुप महत्वाची माहिती आणि कार्यही. स्वतःचे व्याप सांभाळत ही उठाठेव करणे खायची गोष्ट नाही, तळमळ लागते. सर्वजणांचे कौतुक Happy
माझ्यासाठी योग्यवेळी आयती हातात आलेली माहिती आहे ही.

भगीरथ आणि सुमती बालवनचे काम प्रत्यक्ष पाहिले आहे, त्या दोन संस्थांना यादीत बघून खुप बरं वाटलं. मैत्रीबद्दलही मला नाही, पण नव-याला चांगली माहिती आहे. हा धागा सगळ्या ओळखीच्या लोकांसाठीही उपयोगी होईल. सर्व स्वयंसेवकांना मनापासून धन्यवाद.

आता पर्यंत देणगीबद्दल इमेल केलेल्या सगळ्यांचे आभार.
ज्यांना मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी वरीलपैकी कोणत्याही स्वयंसेवकाशी संपर्क साधल्यास चालणार आहे. आपली मदत योग्य प्रकारे गरजू संस्थांपैकी पोहोचवण्याची व्यवस्था स्वयंसेवक करतील.
मागच्या वर्षीसारखा भरघोस प्रतिसाद ह्यावेळीही मिळेत अशी अपेक्षा आहे. Happy

ज्यांनी देणगी देण्यासाठी ईमेल केले त्या सर्वांना ईमेलने पोच दिली आहे. तरीही कोणाला आमच्यापैकी कोणाचेही ईमेल आले नसल्यास असे समजावे की आम्हाला तुमचे ईमेल मिळाले नाही व पुन्हा एकदा पाठवावे ही नम्र विनंती.

स्वयंसेवकांना प्रोत्साहन दिल्याबद्दल सर्वांचे आभार. अशोकसर 'स्वयंसेवकांना मनोभावे नमस्कार' असे म्हणुन प्लीज लाजवु नका. Happy खरच विशेष काही करत नाही आहोत, आवड म्हणूनच करत आहोत. Happy

शबरी सेवा समितीने कळविल्यानुसार त्यांच्या गरजेच्या वस्तू - वैज्ञानिक प्रयोगांसाठी लागणारी सामग्री वर प्रतिसादात अपडेट केली आहे.

आवर्जून इमेलद्वारे देणगी देण्याची इच्छा व्यक्त करणार्‍या प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार! Happy

ज्यांना देणगी देण्याची इच्छा आहे ते आमच्यापैकी कोणालाही इमेलने तसे कळवू शकता.

सुनिधी....

१. मला ई-मेल आलेले नाही....तथापि जाई समवेत माझी संदेशांची देवाणघेवाण झाली आहे, त्यानुसार मी तिला सांगितलेल्या रकमेची दप्तरी नोंद झाली असेलच.

२. तुम्ही मंडळी आवड म्हणून जे काही समाजोपयोगी कार्य करत आहात त्याबद्दल माझ्यासारख्या सेवानिवृत्ताने नमस्काराने का होईना पण कौतुक हे केलेच पाहिजे.

नमस्कार !
हे पत्र आपल्याला पाठवण्याचे कारण, आजवर या न त्या कारणाने आपला डॉ. प्रकाश आमटे यांच्या ‘लोक बिरादरी प्रकल्प- हेमलकसा, ता. भामरागड, जि. गडचिरोलीशी’ आपला संबंध आला असावा. आपण कदाचित प्रकल्पाला भेट अथवा देणगी दिली असेल, सौ. साधनाताई आमटे, डॉ. प्रकाश आमटे किंवा श्री. विलास मनोहर यांचे एखादे पुस्तक निश्चितच आपल्या वाचनात आले असेल. तसे नसतानाही आपल्याला अनवधानाने हे पत्र मिळाल्यास दिलगिरी व्यक्त करून या पत्रामागचे प्रयोजन स्पष्ट करते.
ज्येष्ठ समाजसेवक श्री. बाबा आमटे प्रस्थापित आणि डॉ. प्रकाश आमटे संचलित हेमलकसा येथील लोक बिरादरी प्रकल्पाच्या स्थापनेला आज 40 वर्षे पूर्ण झाली आहेत. हेमलकसा, ता. भामरागड, जि. गडचिरोली ह्या अतिदुर्गम भागात, लोक बिरादरी दवाखान्यामध्ये गेली 40 वर्षे माडीया गोंड आदिवासी बांधवांवर विनामूल्य वैद्यकीय ईलाज केला जात आहे. भगत/मांत्रिक ह्या सारख्या समाजकंटकांपासून आदिवासी समाजाला दूर ठेवायचा प्रयत्न लोकबिरादरी प्रकल्पाच्या दवाखान्यात डॉ. प्रकाश आमटे आणि त्यांच्या पत्नी डॉ. मंदाताई यांच्या बरोबरच त्यांचे सुपुत्र डॉ. दिगंत आणि स्नूषा डॉ. अनघा आमटे अहोरात्र करत आहेत.
ह्या दवाखान्याची ईमारत मात्रं आता खूप जुनी झाली असल्याने तिच्या पुनर्बांधणीचे काम सुरु करण्यात आले आहे. दवाखान्याचे असे काहीच उत्पन्न नसल्याने त्याकरिता लागणारा बराचसा निधी अर्थातच देणगी स्वरुपात गोळा करावा लागत आहे.
2014 हे ज्येष्ठ समाजसेवक श्री. बाबा आमटे ह्यांचे जन्मशताब्दी वर्षं. 26 डिसेंबर 2014 रोजी श्री. बाबा आमटे यांना 100 वर्षे पूर्ण होतील. ह्याच दिवशी हा दवाखाना लोकार्पण करण्याचा आमटे कुटुंबियांचा मानस आहे. यासाठी 'लोक बिरादरी मित्र मंडळ पुणे', (पुण्यातील आम्हा काही मित्रांचा ग्रुप), पुण्यातुन जास्तीत जास्त मदत पाठविण्याच्या धडपडीत आहे.
आपण श्री. अशोक हांडे ह्यांच्या 'मराठी बाणा' ह्या कार्यक्रमाबद्दल निश्चितच ऐकले असेल. लोक बिरादरी दवाखान्याच्या पुनर्बांधणीसाठी लागणारा जेवढा जमेल तेवढा निधी 'मराठी बाणा' ह्या कार्यक्रमाच्या मार्फत पाठवण्याच्या हेतूने, 'लोक बिरादरी मित्र मंडळ पुणे' तर्फे 'मराठी बाणा' या कार्यक्रमाचे आयोजन शनिवार दि. 26 एप्रिल 2014 रोजी सायंकाळी 7 ते 10 ह्या दरम्यान गणेश कला क्रीडा, पुणे येथे केले आहे.
ज्या कारणासाठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात येतोय तो हेतू लक्षांत घेता, या सगळ्या तिकिटांची विक्री होणे अवघड नाही. तरीही नुसतांच कार्यक्रम पार पाडणे हा आमचा हेतू नाही, तर ‘आमटे कुटुंबीयांचं काम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावं आणि दवाखान्याच्या पुनर्निर्माणासाठी अधिकाधिक मदत तिथे पाठवता यावी’ हा आहे. वरील कार्यक्रमाचा सगळा खर्च वजा जाता उरणारा निधी हेमलकसा, ता. भामरागड जि. गडचिरोली, येथील लोक बिरादरी दवाखान्याच्या पुनर्निमाणासाठी पाठविण्यात येणार आहे याची नोंद घेऊन आपण कार्यक्रमाला मोठ्यात मोठ्या संख्येने प्रतिसाद द्यावा, ह्यासाठी हे विनंती पत्रं. देणगी प्रवेशिकांबद्दल आपल्याला वरचे वर माहिती पोहोचविण्यात येईल. तेंव्हा आजच खालील कार्यक्रमाची नोंद करून घ्या, कार्यक्रमाच्या दिवशी भेटूच. कार्यक्रम: शनिवार, दिनांक 26 एप्रिल 2014 सायं: 7 ते 10 स्थळ: गणेश कला क्रीडा, पुणे (नोंद: कार्यक्रम स्थळी डोनेशन चेक्स स्वीकारले जातील, डोनेशन वर 80 जी नुसार कर सवलत आहे) या कार्यक्रमाचे मिडिया पार्टनर लोकप्रिय दैनिक 'महाराष्ट्र टाइम्स' आणि 'रेडियो सीटी' हे दोघे असणार आहेत.
आपल्याला अथवा आपल्या परिचयातील कोणाला जर प्रायोजक म्हणून भाग घेण्याची इच्छा असेल कृपया त्वरित संपर्क साधावा.
अधिक माहितीसाठी संपर्क: आपले विनीत-योगेश कुलकर्णी – 9822273545, शिल्पा तांबे- 9226958888 / 9850666729 'लोक बिरादरी मित्र मंडळ पुणे'
Details of Domestic Funds Transfer to Lok Biradari Prakalp:
Account Name: Maharogi Sewa Samiti, Warora (Bank of Maharashtra, Bhamragad Branch)
Saving Bank Account Number: 20244238823. IFSC: MAHB0001108
All donations have exemption under section 80 G of the Indian Income Tax Act. For the receipt – Email us Name of the Donor, Address and PAN. Email- aniketamte@gmail.com

Pages