चंदेरी पडद्यावरच्या माझ्या आवडत्या स्त्री-व्यक्तीरेखा

Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 March, 2014 - 23:18

chanderi.jpg

रुपेरी पडद्यावर दिसणार्‍या काही व्यक्तीरेखा आपल्या मनात कायमचं घर करतात, आपलं आयुष्य त्या त्या काळापुरतं का होईना व्यापून टाकतात. आजवर या चंदेरी पडद्यावर कित्येक ताकदीच्या स्त्री व्यक्तीरेखा साकारल्या गेल्या आहेत. स्त्रीच्या वैशिष्ट्यांचे कित्येक कंगोरे त्या व्यक्तीरेखांच्या रुपात आपल्यासमोर आले आहेत, स्त्रीची हळवी, भावनिक बाजूही दिसली आहे, तसंच वेळप्रसंगी कणखर, सबला रुपातदेखील तिला आपण पाहिलं आहे. ती व्यक्तीरेखा निर्भय पोलिस अधिकारी स्त्रीची असो किंवा अन्यायाविरुद्ध उभ्या राहणार्‍या सामान्य स्त्रीची असो, किंवा आयुष्यातल्या वादळांमधून धडपडत वाट काढणार्‍या निश्चयी कौटुंबिक स्त्रीची असो; आपल्याला त्या भारावून टाकतात, काहीतरी शिकवून जातात. खळखळत्या हास्याच्या साथीने आयुष्याला सामोरी जाणारी स्त्री असो किंवा चेहेर्‍यावर ठाम गंभीर मुखवटा घेऊन जबाबदार्‍या निभावणारी स्त्री असो. प्रत्येक व्यक्तीरेखेच्या वैशिष्ट्यांनी आपल्याला आजवर बरंच देणं दिलंय.

यंदाच्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण सगळे मिळून या स्त्री-भूमिकांच्या आठवणी जाग्या करुया. आपल्याला आवडलेली ही चंदेरी व्यक्तीरेखा का आवडली, तिच्या व्यक्तीमत्त्वाचे कुठले पैलू आवडले, हे इथे लिहूया. स्त्री भूमिकेबद्दल लिहीताना त्या त्या चित्रपटाची थोडी पार्श्वभूमीदेखील लिहू शकता. कुठल्याही भाषेतल्या, कुठल्याही देशातल्या चित्रपटातील स्त्री व्यक्तीरेखेबद्दल इथे लिहायला हरकत नाही. आपल्याला आपले प्रतिसाद याच धाग्यात लिहायचे आहेत. शब्दमर्यादा नाही.

लिहायला सुरुवात करुया?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

.

हा धागा आवडला संयोजक! धन्यवाद!

सर्वांनाच अनेक व्यक्तिरेखा आवडलेल्या असणार. मी मला आवडलेल्या काही व्यक्तिरेखा लिहून पाहतो.

===============

आपल्या परंपरेप्रमाणे (?) कर्तृत्व, शौर्य, अन्यायाचा विरोध वगैरे गुण चित्रपटवाल्यांनी प्रामुख्याने चित्रपटातील नायकालाच सादर करायला लावले. स्त्रीचे सहसा सौंदर्य व शरीर हेच भांडवल मानले गेले, अर्थात काही प्रमाणात अभिनय असल्याशिवाय भूमिका मिळणारच नाही हे खरेच! तसेच, स्त्रीवादी किंवा स्त्रीपात्राला प्राधान्य असणारे चित्रपटही अनेक आले पण त्यात 'एक स्त्री असूनही' हे विशेषण सर्वत्र ग्लोरिफाय करण्यात धन्यता मान्यता गेली. तरीही काही व्यक्तिरेखा त्यापलीकडे भावल्या:

१. जख्मी औरत हा चित्रपट तसा गल्लाभरूच ठरावा. आला काय आणि गेला काय अशी ह्याही चित्रपटाची गत झाली होती. पण ज्या आवेगाने डिंपलने ह्या चित्रपटात अभिनय केलेला आहे तो मात्र मनावर कोरला जाणारा ठरला. त्याचप्रकारे सत्तामधील रवीना टंडनची भूमिकाही भावली. चालबाझ मधील रजनीकांतची प्रेयसी असलेली श्रीदेवीही अश्याच काहीश्या कारणाने आवडली. (व्यक्तिशः श्रीदेवी आवडणे मला 'अदरवाईज' शक्य नाही) (तसेच सीता और गीतामधील हेमामालिनी नाही आवडली).

२. दाग द फायर ह्या चित्रपटात शबाना आझमीची व्यक्तिरेखा आवडली. निदान ह्या व्यक्तिरेखेत कुठेही कथालेखक वा दिग्दर्शकाला असे म्हणायला वाव नव्हता की 'एक स्त्री असूनही' असे असे वगैरे! नाजूक विषय साकारणे हे आव्हान तिने पेलले.

३. माझी खूप आवडती अभिनेत्री मनीषा कोईराला हिच्या अनेक भूमिका आवडल्या. अग्निसाक्षी, अकेले हम अकेले तुम, एक छोटीसी लव्ह स्टोरी, बॉम्बे, १९४२ अ लव्ह स्टोरी, गुप्त ह्या त्या भूमिका! ह्यातील प्रत्येक भूमिकेमध्ये सौंदर्य व किमान अभिनय ह्यापलीकडे एक घटक नक्कीच होता त्यामुळे त्या आवडल्या.

४. शोलेमधील गंभीर जया भादुरी मनावर कोरली गेली.

५. वेश्या किंवा तवायफची भूमिका म्हंटली की ते पानाने ओठ रंगलेले असणे, तोंडात सतत 'स्साला' वगैरे शिवीस्वरूप शब्द घुसडणे आणि पदर कायम सरकलेला असणे ह्या टिनपाट गृहीतकाला बाजूला ठेवून बहुधा स्मिता पाटील ह्यांनी एक भूमिका केली होती. ती कोणाला आठवत असल्यास कृपया नोंदवावे.

(अवांतर - बुनियाद ह्या मालिकेत लाजो ची भूमिकाही फार सुरेख व प्रभावी होती).

धन्यवाद!

माझी सर्वात आवडती भूमिका म्हणजे उंबरठा मधली सुलभा महाजन.
स्मिता पाटील ने त्या भूमिकेचे सोने केले.
शेवटी तिचे घर सोडून जाणे ही त्या भूमिकेला योग्यच.
तो सुखांत दाखवला असता तरच पटल नसतं.

'जब वी मेट' ची गीत आवडली. अवखळ आणि इम्पल्सिव गीतचं हळुहळू मॅच्युअर होत जाणं छान दाखवलं आहे.

लोकहो, छान लिहीताय. एक विनंती, आपल्याला आवडलेली व्यक्तीरेखा का आवडली हे देखील जरा सविस्तर लिहीले तर आम्हाला वाचायला आणखी छान वाटेल. :).

उंबरठा मधली स्मिता पाटिलन साकारलेली सुलभा महाजन आवडती व्यक्तिरेखा .

आतल्या आवाजाला प्रमाण मानून त्यानुसार निर्णय घेणारी , वेळप्रसंगी कर्तव्य कठोर होणारी , घेतलेल्या निर्णयाच जबरदस्त मोल चुकवाव लागेल हे दिसत असूनही आपल्या भूमिकेवर ठाम राहणारी , कोणत्याही दबावाला बळि न पड़णारी आपल्या मुलीच्या नवर्याच्या आठवनीने हळवी होणारी आई , वसतिगृहातल्या मुलींवर माया करणारी पण मुलींच काही चुकत आहे हे कळताच त्यांना जरबेने समजावून सांगणारी सुलभा महाजन खूप आवडते

आणखी एक आवडणारी व्यक्तिरेखा म्हणजे दिलसे मधली मनीषा कोईराला

राजीव गांधीन्च्या हत्येमुळे भारतात आत्मघातकी दहशतवादाच भयानक रूप दिसल
त्यांची हत्या करणारी धानू ह्या स्त्रीच्या जवळपास जाणारी व्यक्तिरेखा मनीषाने साकारली आहे यात
आत्मघातकी स्त्रीच स्वरूप तिने व्यवस्थित दाखवल
आपल्या विचारसारणी पुढे सुरक्षित असे प्रेम झिडकारणारी , मनस्वी अशी स्त्री तिने छान साकारली आहे

ह्या टिनपाट गृहीतकाला बाजूला ठेवून बहुधा स्मिता पाटील ह्यांनी एक भूमिका केली होती. ती कोणाला आठवत असल्यास कृपया नोंदवावे. <<
मंडी चित्रपटाबद्दल म्हणताय का?

मंडी चित्रपटाबद्दल म्हणताय का?<<< मंडीच होता का तो? मला आठवत नाही आहे, पण मला वाटते मंडीमध्ये स्मिता पाटीलही तशीच भडक वगैरे दाखवली गेलेली होती बहुधा! काहीतरी चुकत असावे माझे!

सत्यजीत रे यानी पडद्यावर आणलेली रविन्द्रनाथ टागोरांची नायिका "चारुलता".....खुद्द रे यांच्याच शब्दात सांगायचे झाल्यास त्यांच्या चित्रपटनिर्मितीतील त्याना सर्वात जास्त आवडलेली कलाकृती....आजही भारतीय चित्रपटसृष्टीचा इतिहास लेखन करणार्‍याला "चारुलता" ह्या व्यक्तिरेखेची मोह पडतेच.

माधवी मुखर्जी आणि "चारुलता" अलग नाहीत.....चारुलताचा अर्थ आहे 'अमरवेल' आणि सर्वार्थाने ही स्त्री आणि तो चित्रपट अमर ठरलेले आहेत. कथानक इंग्रजी राजवटीतील....एका श्रीमंत घराण्यातील, राजवाड्यासम प्रासादात राहाणारी ही चारुलता....एका नियतकालिकाच्या मालकाची संपादकाची सुखी पत्नी.....पण ती खर्‍या अर्थाने सुखी आहे का ? नक्कीच आहे...पतीचे प्रेम आहे...घरात नोकरचाकर आहेत....मनोरंजन, भावाच्या बायकोबरोभर पत्ते खेळत बसणे, कपडेलत्ता, दागदागिने, गाडी घोडे आदी सार्‍या सुविधा हात जोडून ह्या अप्सरेसम देखण्या चारुलतेसमोर उभ्या आहेत....तरीही ही परी कुठेतरी अस्वस्थ आहे. तिला भूक आहे ती अशा एका व्यक्तीची की ज्याच्यासमवेत ती आपले विचार, आपली प्रतिभा वाटू शकेल....त्याच्यासमोर वादविवाद घालून आपल्या बुद्धीची पातळी तपासून पाहील.....पतीवर ती जीवापाड प्रेम करीत आहे....तोही तिच्याशिवाय राहू शकत नाही....पण त्याच्या संपादन कार्यातून त्याला जितका वेळ देता येणे गरजेचे आहे तितका तो उपलब्ध करू शकत नाही. चारुलतेची त्याबद्दलही काही तक्रार नाही.....वेळ वेळ आणि वेळच आहे तिच्याकडे...आणि तो ज्याच्यासोबत घालवायला हवा तो हक्काचा माणूस मिळत नाही तिला.....म्हणून ती काय बंड करणार आहे का ? बिलकुल नाही....कारण तिला माहीत आहे की नवर्‍याच्या प्रेमापुढे ती काही करू शकत नाही....मग वरच्या मजल्यावरून भर दुपारी कडाडलेल्या उन्हातून पोटासाठी कामाला जाणारे लोक, तसल्या भाजक्या वातावरणात एका माकडाला खेळ करायला लावणारा डोंबारी....पूजेला चाललेला वा आलेला एक पुजारी...हाश्शहुश्श करायला लावणारे वातावरण....आणि ते कुतूहलाने दुर्बिणीतून टिपणारी चारुलता.

....अशा या भारतीय नारीच्या जीवनात एक युवक येतो "अमल"....तो असतो नवर्‍याचा पुतण्याच....परीक्षेसाठी आणि अभ्यासासाठी म्हणून आलेला....पण मुळात उत्साहाने थबथबलेला....दंगाधोपा करणारा, अथक बडबड तसेच वाचन कविता प्रेमी....त्याच्या आगमनाने प्रासादातील वातावरण कमालीचे बदलून गेले आहे....आणि चारुलतेला वाटू लागते की "हाच तो....ज्याची मी वाट पाहात होते..."..... त्याच्या सहवासात ही लता फुलू लागते....दोघात कसलेही शारीरिक आकर्षण नाही....किंबहुना तो किंतूही कुणाच्या मनी येत नाही....फक्त अमलसमवेत विविध विषयावर गप्पा....आणि लेखन वाचनाची भूक भागविणे....इतपत सुखातच रंगलेली चारुलता.

प्रसंगी उदास, पण वेळ आल्यावर त्याहीपेक्षा जास्त आल्हादाने वावरणारी....रुसणारी, चिडणारी....आपल्या बुद्धीची चमक दाखविणारी.....आणि एके दिवशी अमल घरातून कायमचा निघून गेल्यावर मनाने उद्ध्वस्त होणारी चारुलता....अशी ही स्त्री प्रतिमा साकारण्याचे भाग्य माधवी मुखर्जी याना लाभले....ते त्यानी विलक्षण ताकदीने पेलले....अमरवेलीप्रमाणेच.

अभिलाषा चित्रपटातील मीनाकुमारी यांनी पडद्यावर साकार केलेली संजय खान (दत्तक) व काशिनाथ घाणेकर (सख्या) या दोन पुत्रांची आई मनाला फार भावली. या चित्रपटात सुलोचनाने नायिकेच्या आईची भूमिका केलीये. तिला जेव्हा कळते की संजय खान हा मीनाकुमारीचा सख्खा मुलगा नाही तेव्हा ती चक्क त्याऐवजी काशिनाथ घाणेकर चे (सख्या मुलाचे) माझ्या मुलाशी लग्न लावून द्या असा हट्ट मीनाकुमारीपाशी धरते. योगायोगाची गोष्ट म्हणजे प्रत्यक्षात काशिनाथ घाणेकर हे सुलोचना यांचे जावईच होते.

याशिवाय सुलोचना यांनी मुनिमजी या चित्रपटात खलनायक प्राणची आई साकार केलीये त्याला तोड नाही. स्वत:च्या मुलाला मालक बनवून बिघडवते त्याच्या लाथा खाते आणि खरा मालक असलेल्या मुलाला स्वत:चा मुलगा बनवून त्याला चांगले संस्कार देते. या भूमिकेला काहीशी नकारात्मक छटा असली तरीही शेवटी तिला उपरती येते आणि ती प्रेक्षकांची सहानुभूती मिळवते.

आई मिलन की बेला चित्रपटात धर्मेन्द्र व राजेन्द्र कुमार या जुळ्या मुलांची आई सुलोचना यांनी फारच चांगल्या रीतीने रंगविलीये. दोन्ही मुलांवर प्रेम करतानाच हे दोघे सख्खे भाऊ आहेत हे रहस्य कुणाला न सांगण्याचं वचन ती फार कसोशीने पाळते ते पाहून डोळे भरून येतात.

आताच्या घडीला आठवत असलेल्या चित्रपटांतील स्त्री व्यक्तिरेखांपैकी ह्या काही आवडलेल्या...

मिर्चमसाला चित्रपटातली स्मिता पाटीलने साकारलेली सोनाबाई, तिच्या जोडीला दीना पाठक, रत्ना पाठक, सुप्रिया पाठक यांनी साकारलेल्या ग्रामीण, अशिक्षित स्त्रिया, दीप्ती नवलने केलेली मुखियाच्या पत्नीची भूमिका... ह्या सर्व व्यक्तिरेखा मनात ठसणार्‍या, पकड घेणार्‍या आहेत. 'अबला' असणार्‍या या स्त्रिया एकजुटीने सुभेदाराने सोनाबाईवर आणि मसाल्याच्या कारखान्यावर केलेला हल्ला कसा हिकमतीने परतवून लावतात, तिच्या पाठीमागे उभ्या राहून स्वतःचे सबला असणेही कसे सिद्ध करतात तो प्रवास बघणे फार रोचक ठरते. पारंपारिक मानसिकता, भीती, दबावाच्या जोखडाखाली त्या पुन्हा दबतील की काय असे वाटत असतानाच त्या आश्चर्याचा सुखद धक्का देतात. स्वतःतल्या शक्तीची आणि एकजुटीच्या ताकदीची त्यांना होणारी जाण ही खूप प्रेरणादायी ठरते.

खेळकर, खट्याळ, खोडसाळ, प्रसंगी जबाबदार, प्रेमळ अशा मंजूची चित्रपट अभिनेत्री रेखाने साकारलेली 'खूबसूरत' चित्रपटातली व्यक्तिरेखा जशी मला आवडते तशीच त्याच चित्रपटातली दीना पाठक ने साकारलेली कर्तबगार, शिस्तप्रिय, कडक स्वभावाच्या परंतु मनात प्रेम असलेल्या निर्मला गुप्तांची व्यक्तिरेखा आवडते. दोघींच्या व्यक्तिरेखा ह्या 'स्वभावाने' परस्पर विरोधी असल्या तरी एकमेकींना पूरक आहेत. एखाद्या घरात ज्याप्रमाणे शिस्त, काटेकोरपणा आवश्यक असतो, कर्तव्याची जाणीव आवश्यक असते त्याचप्रमाणे तिथे थोडा विरंगुळा, खेळकरपणा, आनंदाची देवाणघेवाणही आवश्यक असते हे ह्या दोन व्यक्तिरेखांच्या माध्यमातून दाखवण्यात लेखक दिग्दर्शक यशस्वी होतात.

छान लिहिलेत मिर्चमसालाबद्दल अरुंधती! अश्याच प्रकारे स्त्रियांनी केलेला रुढीवादी व क्रूर पुरुषांचा सामना मृत्यूदंडमध्येही होता, नाही का?

नितळ चित्रपटातली दिपा श्रीराम ह्यांनी साकारलेली आजीची भूमिका/व्यक्तीरेखा मला फार भावली. ह्या आजीच्या डोळ्यांवर अॉपरेशननंतर पट्टी बांधली आहे.नातवाची घरी आलेली डॉक्टर मैत्रिण नातसून म्हणून तिला पसंत आहे! पण पुढे पट्टी काढल्यावर तिला कळतं की मुलीला कोड आहे! त्यावेळी अप्रतिम समजूतीने ती मुलीला सांगते, "तू सुंदर आहेस! सौंदर्य काय फक्त त्वचेपुरतं मर्यादीत असतं का?"
फार सुरेख काम केलयं दीपा श्रीराम ह्यांनी! ह्या चित्रपटातील बाकीच्या स्त्री व्यक्तीरेखाही तितक्याच सशक्त आणि परिणामकारक आहेत. संपूर्ण चित्रपटच सुरेख!

कालच क्वीन पाहिला. त्यातली रानी अतिशय आवडली. साध्या घरातली साधी सुधी मुलगी. तिच्या प्रेमात पडून तिचा पाठपुरावा करून तिच्याशी लग्न जमवणार्‍या मुलाच्या स्वप्नात आपली स्वप्न बघणारी रानी. पण नंतर अचानक समोर आलेल्या विचित्र कोंडीतून स्वतःला बाहेर काढताना स्वतःतल्या स्वत्वाचा शोध घेणारी रानी. फार सकस व्यक्तीरेखा आहे ती आणि कंगनाशिवाय दुसरं कोण्णीही ही भुमिका करूच शकलं नसतं असं वाटावं अशी तिनं ती वठवलीये.

'पा' मधली विद्या बालन आणि तिची आई (अरुंधती नाग). सुशिक्षित, समंजस स्वाभिमानी प्रेमळ कर्तव्यदक्ष प्रगत विचार इ इ. विद्या प्रेग्नंट होवून आईकडे येते तो सीन खूप आवडतो. काहीही मेलोड्रामा न करता आई विचारते तुला हे मुल हव आहे कि नको. सेकंड इयर मध्ये प्रेग्नंट झाली मुलगी तर इतक्या समंजसपणे प्रश्न हाताळणारी आई सिनेमात म्हणजे भरूनच पावल. विद्यासुद्धा पुढे अमिताभची आई म्हणून एकदम परिपक्वपणे त्याचे प्रश्न हाताळते. सिनेमाचे नाव 'पा' असले तरी 'मा' लक्षात राहतात.

स्मिता पाटीलचे सगळे रोल आवडतात विशेषतः जैत रे जैत मधली 'चिंधी'. प्रेमासाठी वाट्टेल ते करायची तयारी मनाला भिडते.

चित्रांगदा 'हजारो ख्वाईशे' मध्ये खूप आवडली. आधी तीच पात्र पटत नाही, थोडी-बहुत बिघडलेली वाटते. पण नंतर आपल्या निष्ठा जपणारी म्हणून जामच आवडली. मुलाचे भविष्य वडील अधिक चांगल घडवू शकतील म्हणून मुलाला आजोबांकडे पाठवते पण स्वतःचे विचार, स्वतःचा मार्ग बदलत नाही. ७०-८० च्या दशकात खरच फार क्रांतिकारी वाटत.

इंग्लिश सिनेमात 'वेट अनटील डार्क' मधली ऑडरी हेपबर्न. आपल्यामधील कमजोरीचा वापर करून शक्तिशाली होणे म्हणजे ग्रेट!

"बाजार" मधली नज्मा, "गमन" मधली खैरून, "जैत रे जैत" मधली चिंधी (स्मिता पाटिल) - या सर्व चित्रपटातील स्मिता पाटिलचा नैसर्गिक अभिनय आणि साकारलेल्या व्यक्तीरेखा.

"स्वामी" मधली सौदामिनी (शबाना आझमी) - नवरा (गिरिश कर्नड) कि प्रियकर (विक्रम) या द्वंद्वात अडकलेली नायिका.

"उपहार" मधली मिनू/मृण्मयी (जया भादुरी) - अवखळ, खट्याळ अभिनय.

"आंधी" मधली आरती देवी (सुचित्रा सेन) - महत्वाकांक्षी राजकारणी आणि प्रेयसी.

"मुकद्दर का सिकंदर" मधली जोहरा (रेखा) - तवायफ आणि प्रियकरावर जीव ओवाळुन टाकणारी प्रेयसी.

गुलाब गँग मधली जुही चावला!

इतका मस्त अभिनय केलाय की ती जुही आहे हे विसरायला होतं. कुठेच लाऊड होत नाही, पण काय ती देहबोली, काय नजर...सगळंच एकदम वाह!

स्मिता पाटीलच्या मंथन, उंबरठा,मिर्चमसाला,जैत रे जैत,चक्र,भूमिका ,अर्थ,या सर्व चित्रपटांतील स्त्री व्यक्तिरेखा आवडत्या.
अंकुर,मंडी,अर्थ,मासूम, स्वामी ---- शबाना आझमी
ममता,आंधी ------ सुचित्रा सेन
परिमा -----राखी
गॉन विथ दी विंड ------ विव्हियन ली
वेट अनटील डार्क ------ ऑड्री हेपबर्न
साऊंड ऑफ म्युझिक ----- ज्युली अ‍ॅन्ड्रूज

देवकी, साऊंड ऑफ म्युझिक ----- ज्युलिया रॉबर्टस >>> यात ज्युली अ‍ॅन्ड्युज आहे. ज्युलिया रॉबर्टस नाही.

एकूणच स्मिता. त्यातही 'भूमिका' मधली स्मिताची भूमिका .
नूतन. त्यातही बंदिनीमधली मनस्वी मुलगी ते होरपळत्या आयुष्यातही पहिल्या आणि चिरंतन प्रेमाला जागणारी अर्करूप स्त्री, आणि सरस्वतीचंद्र मधली प्रेमातला परमार्थ जगणारी प्रणयिनी.
सुचित्रा सेन. त्यातही ममता मधला डबल रोल. घायाळ आई आणि सत्य समजल्यावर उद्ध्वस्त झालेली अभिमानी कन्या.
मीनाकुमारी . बहुबेगम मधली कुलस्त्री ते कलावंतीण हा भयावह प्रवास - बहु बेगम,
दुर्दैवी स्त्री जीवनाचा उलटा तितकाच भयाण प्रवास - कलावंतिणीच्या गृहस्थाश्रमाची शोकांतिका -पाकीजा .

आपल्याला आवडलेली ही चंदेरी व्यक्तीरेखा का आवडली, तिच्या व्यक्तीमत्त्वाचे कुठले पैलू आवडले, हे इथे लिहूया. स्त्री भूमिकेबद्दल लिहीताना त्या त्या चित्रपटाची थोडी पार्श्वभूमीदेखील लिहू शकता<<<

हे कोणी वाचतच नाही आहे काय?

'आपली आवडती अभिनेत्री किंवा तिची एखादी विशिष्ट भूमिका' ह्याचे फक्त नांव सांगणे येथे अभिप्रेत नसावे. Happy

व्यक्तिरेखांची नावे आणि त्याबद्दल काहीतरी लिहा ना प्लीज.>> लिहील आधीच्या पोस्तवर पण एखादी गोष्ट फार उलगडून सांगायला जमत नाही मला. एखादी व्यक्तिरेखा पटली कि ती 'रेझोनेट' होते म्हणजे मी जरी अशा प्रसंगातून गेले नसले तरी आपल्यावर असे प्रसंग आले तर अस्सच वागायला जमल पाहिजे अस काहीतरी वाटत.

सचिन च्या "आत्मविश्वास" मधली आई ची भूमिका साकारणारी निलकांती पाटेकर..

नवरा, मुलं यांच्या लेखी घरात एक दुर्लक्ष करण्यासारखं आणि काहीच किंमत नसलेलं एक व्यक्तिमत्व... सतत दडपणात असलेलं.. आपली बालमैत्रिण दया डोंगरे हीची अनेक वर्षाने भेट होते. तिचे व्यक्तिमत्व आणि गमावलेला आत्मविश्वास लुटूपुटूच्या 'व्यक्तिमत्व अदलाबदलाच्या' खेळात बदलतो.. आणि एक खंबीर आई, कणखर , आपले घर न विकण्याच्या भूमिकेवर ठाम राहून नवर्‍याला विरोध करणारी तरी नवर्‍याची तितकीच काळजी करणारी-घेणारी बायको फार सुंदर रित्या समोर येते. मुलगा सुनील बर्वे याला त्याच्या चुकीच्या वर्तनाची शिक्षा देण्यासाठी भर रस्त्यात काठीने त्याला झोडपून काढायला ही पुढे मागे पाहत नाही.
हा सिनेमाच एकंदर आवडतो.. आणि प्रमुख भूमिकेत निलकांती पाटेकर सिनेमाला अजून रंजक बनवतात.

Pages