चंदेरी पडद्यावरच्या माझ्या आवडत्या स्त्री-व्यक्तीरेखा

Submitted by संयोजक_संयुक्ता on 7 March, 2014 - 23:18

chanderi.jpg

रुपेरी पडद्यावर दिसणार्‍या काही व्यक्तीरेखा आपल्या मनात कायमचं घर करतात, आपलं आयुष्य त्या त्या काळापुरतं का होईना व्यापून टाकतात. आजवर या चंदेरी पडद्यावर कित्येक ताकदीच्या स्त्री व्यक्तीरेखा साकारल्या गेल्या आहेत. स्त्रीच्या वैशिष्ट्यांचे कित्येक कंगोरे त्या व्यक्तीरेखांच्या रुपात आपल्यासमोर आले आहेत, स्त्रीची हळवी, भावनिक बाजूही दिसली आहे, तसंच वेळप्रसंगी कणखर, सबला रुपातदेखील तिला आपण पाहिलं आहे. ती व्यक्तीरेखा निर्भय पोलिस अधिकारी स्त्रीची असो किंवा अन्यायाविरुद्ध उभ्या राहणार्‍या सामान्य स्त्रीची असो, किंवा आयुष्यातल्या वादळांमधून धडपडत वाट काढणार्‍या निश्चयी कौटुंबिक स्त्रीची असो; आपल्याला त्या भारावून टाकतात, काहीतरी शिकवून जातात. खळखळत्या हास्याच्या साथीने आयुष्याला सामोरी जाणारी स्त्री असो किंवा चेहेर्‍यावर ठाम गंभीर मुखवटा घेऊन जबाबदार्‍या निभावणारी स्त्री असो. प्रत्येक व्यक्तीरेखेच्या वैशिष्ट्यांनी आपल्याला आजवर बरंच देणं दिलंय.

यंदाच्या महिला दिनाच्या निमित्ताने आपण सगळे मिळून या स्त्री-भूमिकांच्या आठवणी जाग्या करुया. आपल्याला आवडलेली ही चंदेरी व्यक्तीरेखा का आवडली, तिच्या व्यक्तीमत्त्वाचे कुठले पैलू आवडले, हे इथे लिहूया. स्त्री भूमिकेबद्दल लिहीताना त्या त्या चित्रपटाची थोडी पार्श्वभूमीदेखील लिहू शकता. कुठल्याही भाषेतल्या, कुठल्याही देशातल्या चित्रपटातील स्त्री व्यक्तीरेखेबद्दल इथे लिहायला हरकत नाही. आपल्याला आपले प्रतिसाद याच धाग्यात लिहायचे आहेत. शब्दमर्यादा नाही.

लिहायला सुरुवात करुया?

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बेफि, स्मिता पाटीलचा मंडी हा वेश्याव्यवसायावर पिक्चर होता त्याबद्दल म्हणताय का तुम्ही?

बादवे, मनिषा कोईराला माझीही अत्यंत आवडती हिरोइन आहे Happy

मि अ‍ॅन्ड मिसेस अय्यर मधली - कोंकणा सेन.
माय बेस्ट फ्रेंड्स वेडींग - ज्युलिया रॉबर्ट्स. ह्या व्यक्तीरेखेला कोपरापासुन दंडवत.इतकच लिहिन.
हॅरी पॉटर - हारमायिनी.
रेनकोट - एश्वर्या
आठवेन तस लिहीते.

'करेज अण्डर फायर'मधली मेग रायन.

मुळात मला मेग रायन आवडते. तिचा चेहरा आणि डोळे अतिशय बोलके आहेत.

आणि 'करेज..' मधली तिची व्यक्तिरेखा तर एकदम 'सटॅक' आहे. सिनेमाची सुरूवात झाल्यावर थोड्याच वेळात आपल्याला कळतं, की नायिका तर ऑलरेडी मेलेली आहे. त्यामुळे उत्सुकता वाढते. आणि मग डेन्झेल वॉशिंग्टनच्या चौकशीतून समोर येणारे तिच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू, जोडीला फ्लॅशबॅक दृष्यांमधून होणारं तिचं दर्शन... मांडणी सगळी भारी आहे.
शत्रूसोबतच्या चकमकीत एका कठीण क्षणी घ्यावा लागलेला निर्णय... तिचा तो निर्णय योग्य होता की अयोग्य, तिचा त्यामागे काय दृष्टिकोन असावा... हे सगळं इतरांच्या साक्षींमधून आपल्या समोर येत असतं. तिचे काही सहकारी तिचं कौतुक करतात, काही शिव्या घालतात. त्यामुळे काळे-गोरे-करडे सगळे रंग मिसळून आपल्या मनात तिची एक प्रतिमा तयार होत असते.
मी सिनेमाबद्दलच जास्त बोलतेय का? पण सिनेमाची मांडणीच अशी केली आहे, की केवळ तिचीच व्यक्तिरेखा अंतिमत: लक्षात रहावी.
आणि त्या आर्मी कॅप्टनच्या वेषात ती कस्सली शोभून दिसते. तिचा गोजिरवाणा चेहरा या भूमिकेला अडसर ठरणार नाही याची तिनं पुरेपूर खबरदारी घेतलेली आहे.

ही व्यक्तिरेखा मला आवडण्याची अजूनही एक-दोन कारणं असू शकतात. मी हा सिनेमा टी.व्ही.वर पाहिला. रात्री ११:०० नंतर वगैरे. आदित्य तेव्हा ८-१० महिन्यांचा. त्यादिवशी त्याचा झोपण्याचा अजिबात मूड नव्हता. तो जागा, त्यामुळे मी पण जागी. घरातले बाकी सगळे झोपून गेलेले ("नवर्‍याला सांगायचं" - हा मुद्दा इथे काढू नये. तो फिरतीवर होता Wink ) मला जाम फ्रस्ट्रेशन आलेलं... मग आदित्यचा किल्ला लढवता लढवता एकीकडे टी.व्ही. लावला. तिथे हा सिनेमा नुकताच सुरू झालेला होता. या पार्श्वभूमीवर मला ती स्क्रीनवरची मेग रायन असली वाटली ना एकदम... म्हटलं, हे सालं कर्तृत्त्व, पोरं काय कुणीही जन्माला घालतं (हे तात्कालिक होतं, समजून घ्या :फिदी:)

बर्‍ञाच भूमिक -व्यक्तीरेखा आहेत, किती लिहिणार? तरीही, काही खास आत्ता लगेच आठवलेल्या.

इथे व्यक्तीरेखा सदर्भामध्ये लिहिताना, त्या व्यक्तीरेखेला साकारताना अभिनेत्रीने केलेला अभिनय मी गृहित धरलेला नाही. एकूण चित्रपटाच्या कथेमध्ये त्या व्यक्तीरेखेला असलेला वाव, तिचा प्रवास आणि त्यामध्ये दाखवलेले काही नवीन कंगोरे एवढ्याच निकषांवर लिहितेय.

मुघलेआझममधली अनारकली. मुळात मुघलेआझम ही सलिम आणि अनारकलीच्या प्रेमाची कहाणी नाही, तरी अनारकलीच्या महात्त्वाकांक्षेची, त्या महत्त्वाकांक्षेपायी तिने अवघ्या भारताचा शहेनशहा असलेल्या बादशहासमोर ठेवलेल्या आव्हानाची. याबद्दल लिहिता लिहिता आठवली आशुतोष गोवारीकरची जोधा. मनाविरूद्ध झालेल्या लग्नामध्ये राहूनसुद्धा स्वत:चं स्वत्व अपरंपार जपणारी. या सिनेमामधला जलाल तलवारबाजी करत असताना जोधा त्याला लपून बघते हा प्रसंग खूप सुंदररीत्या घेतला आहे, जोधाचं जलालकडे हळूहळू ओढलं जाणं अगदी मनापासून.

नुकत्याच पाहिलेल्या हंसी तो फंसी मधली मीरा पण एकदम वेगळी व्यक्तीरेखा. गीक, नर्डी (तरी चष्मा न लावता दोन वेण्या च्प्प न बांधलेली) सायंटिस्ट जी आपल्याच बहिणीच्या होणार्‍या नवर्‍याला "मैं कबसे सिरोह तुम्हारे बारे ए सोच रही हू" हे वाक्य भेटल्यावर लगेच ऐकवू शकते. "क्या लॉजिक है इस प्यारमे" असा (कूठल्याही प्रेम त्रिकोणाला न पडलेला) प्रश्न विचारू शकते.

रंग दे बसंती मधील सोहा अलि खानने साकारलेली व्यक्तीरेखा. एकाच वेळेला क्रांतीकारकाची पत्नी आणि दुसरीकडे प्रियकर गमावलेली असहाय्य आणि तरीही पेटून उठलेली आजची तरूणी.

जब वी मेटमधली करीना कपूरने साकारलेली गीत. ही व्यक्तीरेखा लिहितानाच अफलातून लिहिलेली आहे. तिचा सुरूवातीचा जोश, उत्फुल्लता आणि हसरेपणा जितका भिडतो त्याहूनही जास्त तिचं दु:खाचं बळ पेलताना एकाकी होत जाणं आणि तरीही आपला सच्चे पणा हरवू न देणं जास्त भिडतं. अगदी कठिण रडायच्या प्रसंगीसुद्धा "तुम्हे क्या लगता है अब तुम्हारा चान्स है?" असं विचारू शकणारी गीतच.

गीत नावावरून मला प्रीटी झिन्टाची "रीत ओबेरॉय" आठवली. संघर्ष हा सायलेन्स् ऑफ द लॅम्ब्ज (या सिनेमाबद्दल लिहत बसले तर प्रबंध होइल) वरून उचललेला सिनेमा. तरी यामधली रीत जास्त व्ह्ल्नरेबल जास्त इन्सेक्युअर्ड होती.

प्रीटी झिन्टाचीच अजून एक वेगळी व्यक्तीरेखा होती कुंदन शहाच्या क्या कहनामधली प्रिया. टीनेज प्रेग्नन्सीवर असलेला सिनेमा, तेव्हा तुलनेने नवोदित असलेल्या प्रीटीने एकटीच्या बळावर पेलला होता. प्रियाचं स्वतःच्या मनावर विसंबून निर्णय घेणं तो निर्णय निभावण्यासाठी तिने स्वतःला, कुटूम्बाला आणि पर्यायाने समाजाला समजावणे हे प्रसंग खूप छान घेण्यात आले होते.

हम तुममधली रानी मुखर्जीने साकारलेली व्यक्तीरेखा देखील अशीच वेगळी आणि मला भावलेली. या व्यक्तीरेखेच्या आयुष्यात जेवढी स्थित्यंतरे येतात तेव्हडी नायकाच्या येत नाहीत. आणि तरेही नायिका शेवटपर्यंत तिच्या दृष्टीकोनातून ठाम राहते. या सिनेमाच्या टायटल साँगनंतर जेव्हा नाय्क म्हणतो की आता आपण लग्न केलं पाहिजे. तेव्हाचं तिचं उत्तर हे मुळातून ऐकण्यासारखं आहे. एका कॉलेजतरूणी पासून ते एक मध्यमवयीन विधवेपर्यंतचा व्यक्तीरेखेचा हा प्रवास खूप ताकदीने लिहिण्यात आला होता.

इथे या सिनेमाचं नाव आलेलं बघून आश्चर्य वाटेल पण फिर भी दिल है हिंदुस्तानी मधली जुही चावलाने साकारलेली व्यक्तीरेखा माझ्या आवडीची आहे, पूर्णपणे करीअर माईण्डेड असलेली मुलगी बातम्या मिळवण्यासाठी काय वाट्टेल ते करताना दाखवलेली आहे. फिर भी दिल... सिनेमा आला, तेव्हा इल्केट्रॉनिक मीडीया एवढा आपल्यावर राज्य करत नव्हता, आज तो सिनेमा पाहिला तर शंभर टक्के पटतो.

जुहीच्या कॉमि़ टायमिंगवरून श्रीदेवीच्या अनेक व्यक्तीरेखा आठवल्या, त्यातही चालबाझमधली बेवडी आणि रजनीकांतला वाट्टेल ते बोलणारी व्यक्तीरेखा अफलातून होती.

श्रीदेवी आठवली की माधुरी आठवलीच पाहिजे... मला माधुरीच्या इतर कूटह्ल्याही व्यक्तीरेखांपेक्षाही आजा नचले मधली दिया फार आवडली होती. आयुष्यामध्ये सगळं काही सुखासुखी चालू असताना निव्वळ्ळ आपल्या गावासाठी, तिथल्या कलेसाठी झटणारी दिया आजची स्त्री म्हणून जितकी अस्सल तितकीच आजची कलावंत म्हणूनदेखील अस्सल. गाईडमधली रोझीदेखील अशीच मनस्वी कलावंत. जसं तिचं स्टेजवरचं वावरणं प्रसन्न तसं तिचं प्रत्यक्ष आयुष्यातलं तुफान वागणं. स्पष्टपणे आअपल्या नवर्‍याला सुनावणारी, राजूला सोडनारी रोझी ही व्यक्तीरेखा फार गुंतागुंतीची आहे.

कलाकार स्त्रीची एक भन्नाट व्यक्तीरेखा होती, अभिनेत्रीमधली अंजना. शास्त्रज्ञ नवरा, आणि नृत्यसंगीत निपुण अशी ही बायको, अशी ही विजोड जोडी. त्यातही लग्नानंतर स्टेजसंन्यास घेतलेली आणि मग कंटाळून परत कामाकडे वळलेली ही अंजना.

अंकुर मधली शबाना - मूकपणे बरंच काही देहबोलीतून बोलून जाणारी. परिस्थितीने पिचलेली, कष्टाळू.
लाडला मधली श्रीदेवी - तडफदार, मोडेन पण वाकणार नाही असा तोरा, देखणी, कॉन्फिडन्ट बॉडी लँग्वेज.
खूबसूरत मधली दिना पाठक - कडक, शिस्त्रप्रिय आण अतिशय स्मार्ट.
खूबसूरत मधली रेखा - मिष्किल, खोडकर, प्रेमळ, कुटुंबप्रिय
फॅशन मधली प्रियांका - पहिल्यांदा डाऊन टू अर्थ, नंतर डोक्यात यशाचं वारं शिरून जमिनीवर आलेली आणि मग फिनिक्स पक्षासारखी पुन्हा आकाशात झेप घेणारी.
कल हो ना हो मधली सोनाली बेंद्रे आणि रिमा लागू - दोघी ही सपोर्टिव्ह आणि केरिंग.

पिंजरमधील उर्मिला मातोंडकरने साकारलेली पुरो.... उर्मिलाने खूप छान ताकदीचा अभिनय केलाय ह्यात वादच नाही! पण पुरोची संपूर्ण व्यक्तिरेखाच मनात ठसत जाते. एका सुरक्षित जगातून आकस्मिकपणे असुरक्षेच्या, बदनामीच्या आणि अनोळखी लोकांच्या, असहायतेच्या, सूडाच्या विश्वात फेकली जाणारी पुरो... स्वतःची स्वप्ने बेचिराख होताना त्यांबरोबर आतून जळणारी पुरो... आणि तरीही हळूहळू रशीदमध्ये मनाने अडकत जाणारी पुरो... फाळणीच्या वेळी होणार्‍या दंगलींमध्ये हरवलेल्या लाजोला - आपल्या भावजयीला रशीदच्या मदतीने शोधणारी पुरो... लाजोला पळवणार्‍या लोकांच्या तावडीतून तिची सुटका करण्यासाठी आपल्या जीवावर खेळणारी पुरो... शेवटी रामचंद्रबरोबर परत एक सुरक्षित, सुस्थित आयुष्य सुरु करण्याची संधी मिळूनही रशीदकडे परत जाणारी पुरो...

अमृता प्रीतमने पुरोची व्यक्तिरेखा मुळातच विविध कंगोरे असलेली लिहिली आहे. आणि तरी पुरो ही त्या भूमीची, तेथील लोकांची, वाताहात झालेल्या कुटुंबांची आणि आयुष्ये उद्ध्वस्त झालेल्या स्त्रियांची कहाणीच स्वतःच्या माध्यमातून सांगते आहे असे वाटत राहाते. उर्मिला त्या व्यक्तिरेखेला पडद्यावर ताकदीने उभी करते. आपल्या परिवारापासून अलग झालेली, एकटी पडलेली पुरो आधी मनाने खचते, परिस्थिती अव्हेरते... पण मग जे आयुष्य वाट्याला आले आहे त्यात आनंद शोधायचा प्रयत्न करते. हातातून जे स्वप्न निसटलं त्याबद्दल तिचं मन आक्रंदन करतं... आपलं बालपण, कोवळं यौवन आणि त्या वयातील निरागस, गोड स्वप्नं फाळणीच्या आवर्तात जळताना तीही त्यांच्या बरोबरीने जळते.

मी पिंजर अनेकदा पाहिला. प्रत्येक वेळेला पुरोची व्यथा आणि तिच्या व्यक्तिरेखेतील उत्कटता, असहायता मनाला भिडतेच. ही व्यक्तिरेखा मला 'आवडली' असेही मी म्हणू शकत नाही. पण तिला विसरू शकत नाही.

मला पेज-३ मधली कोंकणा सेनची स्त्री पत्रकाराची भुमिका खुप भावली. या पत्रकाराचा प्रवास तिने खुप ताकदीचे पेश केलाय. छाप सोडून जाते ती !

कहानी मधली विद्या, जितक्या सहजतेने ति या भुमिकेत शिरलिय आणि पूर्ण चित्रपटच तिने स्वतःच्या खा.न्द्यावर फार सक्षम पने पेललाय त्याला तोड नाही.. अगदी मैलाचा दगड अशी भुमिका वठवलिय..

वर उल्लेख केलेल्या काही स्त्री व्यक्तिरेखांमधल्या अनेक उगीच ग्लोरिफाय केलेल्या वाटल्या, अजिबात पटत नाहीत. हिंदी सिनेमांमधे स्त्री व्यक्तिरेखा बहुतांश मेल गेझच्या दृष्टीकोनातून्च रंगवलेल्या असतात. म्हणजे वर वर मनस्वी, कणखर पण त्यांच्या प्रवासात पुरुषांची भावनीक, शारिरीक सोबत गृहित धरलेली. त्यांच्या महत्वाच्या निर्णय प्रक्रिया या सगळ्या पुरुषांच्या मदतीनेच पार पडलेल्या. चिरफाडच करायची अशा व्यक्तिरेखांची तर मी आधी गाईडमधल्या रोझीचे उदाहरण घेईन. मनस्वी आहे, कलावंत आहे, एका क्षणाला कला आपलीशी करुन नवर्‍याला सोडून देणारी आहेस, पण बाई गं, हे सगळं कधी? तर राजू गाईड तुझ्या आयुष्यात आल्यावरच ना? आधी नुसतीच भांडत बसलीस. आणि शिवाय नंतरही आयुष्यात लॉजिक, खर्‍या खोट्याचं तारतम्य, माणसांना ओळखणं जमेना तिला. असो, अशी अनेक उगीच ग्लोरिफाईड केलेली कॅरेक्टर्स आहेत. एरवी लोभस वाटली तरी उगीच 'स्वतंत्र-कणखर स्त्री' अशा लेबल्स खाली तिला बसवणं मला जमणार नाही. अर्थात ही कॅरेक्टर्स अशी रंगवण्यात दोष डायरेक्टरच्या पुरुषी दृष्टीकोनाचा असल्याने इलाज नाही.

मला पटणार्‍या कॅरेक्टर्स आहेत काही. उदाहरणार्थ डोर सिनेमातली झीनत. गुल पनागने अप्रतिम रंगवली आहे. पहाडी प्रदेशातली, मुस्लिम असूनही स्वतंत्र बुद्धीने निर्णय घ्यायचं, स्वतःच्या हिमतीवर आयुष्य जगायची ताकद बाळगलेली झीनत. तिने नवर्‍याला त्याच्यावर झालेल्या अन्यायातून, जीवावरच्या शिक्षेतून वाचवण्याकरता केलेला प्रवास, त्या प्रवासात अजून एका स्त्रीला तिच्यावरच्या बंधनातून मुक्त करण्याकरता दिलेला मदतीचा हात योग्य समतोलातून रंगवले गेले.

इजाजतमधली सुधाही मला आवडते (माया डोक्यात जाते). जो सच है, सही है त्याची साथ देणारी सुधा. आपल्या इमोशनल फूल नवर्‍याला आणि त्याच्या अस्थिर मनोवृत्तीच्या मैत्रिणीला जितकं शक्य होईल तितकं समजून घेण्याचा प्रयत्न करणारी, आपल्या हाताबाहेर जात आहे असं वाटल्यावर शांतपणे निघून जाऊन स्वतःचं आयुष्य नव्याने उभारणारी स्वाभिमानी, नात्यांची डिग्निटी जपणारी सुधा मला पटते. अर्थात तिने ते शेवटी महेनच्या पायाला स्पर्श करुन इजाजत वगैरे मागणे हास्यास्पद होते. गुलझार असला तरी त्याला या खुळचटपणाबद्दल माफी नाही.

मोनालिसा स्माइलमधली ज्युलिया रॉबर्ट्सची कॅथरिन वॉटसन ही व्यक्तिरेखाही मला या दृष्टीकोनातून अत्यंत पटते. भयंकर लॉजिकल, बुद्धीमान, स्वतंत्र, कणखर, स्पष्टवक्ती आणि आजूबाजूच्या स्त्री, निर्णय क्षमता नसलेल्या स्त्रियांना योग्य ते भान देण्याचा अथक प्रयत्न करणारी.

वरच्या मुद्द्याशी निगडीत एक दुवा - http://bechdeltest.com/

दुव्यावरून - The Bechdel Test, sometimes called the Mo Movie Measure or Bechdel Rule is a simple test which names the following three criteria: (1) it has to have at least two [named] women in it, who (2) who talk to each other, about (3) something besides a man.

महिला दिनानिमित्त उलट हिंदी सिनेमांमधल्या अशा वर वर स्वतंत्र, करियरिस्टीक, स्वाभिमानी म्हणून ग्लोरिफाय केलेल्या पण संपूर्णपणे पुरुषांवर अवलंबून असलेल्या, त्याच्या पुरुषी अहंकाराला, दृष्टीकोनाला गोंजारणार्‍या, सिनेमाच्या शेवटी काहीतरी फुटकळ लॉजिक दाखवून त्याच्या मागे जाणार्‍या स्त्री व्यक्तिरेखांची चिरफाड करण्याचा उपक्रम ठेवायला हवा होता. म्हणजे मग तथाकथित वीमेन ओरिएन्टेड फिल्म्समधल्या मेल गेझचं पितळ उघडं पडलं असतं. समाज-,मानसशास्त्रज्ञ सुधीर काकर यांचे मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून हिंदी सिनेमांमधल्या व्यक्तिरेखांकडे बघण्याची वेगळी दृष्टी देणारे अनेक लेख आहेत, जिज्ञासूंनी ते वाचावेत.

त्या लिंक वर before midnight मिळाला! पाहिलाय मी तो एका स्पेशल शो मध्ये Happy आधीचे दोन्ही Before sunrise आणि before sunset प्र चं ड आवडतात त्यामुळे हा बघायचाच होता. and yes it does pass the test!
And now that I think of it it's not a very difficult test to pass! मला उगीच अख्ख्या पिक्चर मध्ये दोन स्त्रिया मध्यवर्ती भूमिकेत आणि त्या स्टोरीत हिरो किंवा पुरुष पात्राचा संबंधच नाही असं काहीसं डोक्यात येत होतं!
ह्या नियमात बसणारा आणि चटकन आठवलेला सिनेमा म्हणजे चक दे इंडिया! ह्यात त्या सगळ्या मुली एकमेकींशी वेगळ्याच नात्याने बांधल्या गेल्या आहेत! ( धाग्याच्या विषयाला धरून नाहीये पण आवडली मला ही कल्पना!)

शर्मिला मोनालिसा स्माइल बद्दल खूप मोदक! नीधपने कुठेतरी लिहिले होते तेव्हापासून जो घुसलाय. कितिदा पाहिलाय .. तोड नाही त्या मुव्हीला.

प्रेम प्रतिज्ञा मधील माधुरी दिक्षीत... साधी डबे पोहोचवणारी पण विलक्षण स्वाभिमानी मुलगी. कोणताही मेकप आणि भरजरी गेटप न करता ज्या ताकदीने तिने साकारली त्याला तोड नाही.

एरीन ब्रोकोवीच मधील जुलीया रॉबर्टस्. अर्थात हा चरित्रपट असल्याने ती व्यक्तीरेखा मुळातच सशक्त आहे. पण एका मोठ्या कंपनीच्या विरुध्द जिद्दीने आणि नेटाने एरिनने दिलेला लढा ज्या ताकदीने तिने उभा केला आहे, त्याला सलाम !

डिंपल कापडीयाने साकारलेली रुदाली. परिस्थीतीशी झगडत सतत संघर्ष करणारी आणि सतत नाकारुनही अखेरीस रुदाली बनणारी ही व्यक्तीरेखा अप्रतिम.

बॉम्बे मधील मनिषा कोईरालाने साकारलेली शैलाबानू. व्यक्तिरेखा आवडलेली आणि मनिषाचा अभिनयही.

ललिता पवार यांनी साकारलेली राज कपूरच्या अनाडीतील मिसेस डिसा. वरकरणी कडक आणि खाष्ट भासणारी, पण अंतर्यामी अतिशय मायाळू असलेली डिसा आपली घरमालकीण असावी असं कोणाला वाटणार नाही ?

मम्मो नावाचा चित्रपट पाहीला आहे कोणी ?? यातील मम्मो ही व्यक्तिरेखा एक अशीच डोक्यात बसली आहे. फाळणीच्या वेळी नव-याबरोबर पाकीस्तानात गेलेली आणि नव-याच्या मृत्यूनंतर भारतात परतलेली सतत बडबडणारी पण प्रेमळ मम्मो एक अजब रसायन आहे. सिगारेट ओढून पाहणारी, दारुची चव चाखणारी ही इब्लीस म्हातारी जबरदस्तीने पुन्हा पाकीस्तानात हाकलली जाते तेव्हा चटका लावून जाते. अखेरीस स्वतःला मरण पावली म्हणून जाहीर करुन भारतात परतण्याचा मार्ग शोधणारी मम्मो केवळ अविस्मरणीय. भूमिकेचं सोनं करणं म्हणजे काय याचा नेमका अर्थ जाणून घ्यायचा असेल फरिदा जलालने साकारलेली ही मम्मो पाहवी.

The Bechdel Test, sometimes called the Mo Movie Measure or Bechdel Rule is a simple test which names the following three criteria: (1) it has to have at least two [named] women in it, who (2) who talk to each other, about (3) something besides a man. -
Chak de India

शर्मिला, येस्स मोनालिसा स्माइल... मधली कॅथरिन वॉटसन! माझी पण अत्यंत आवडती.
बाकी सगळ्या पोस्टबद्दल +१००००००००००००

स्पार्टाकस>>>>>>>>. मम्मो मी पाहिलाय....फरिदा जलाल चं तिच्या नातवा बरोबर च रिलेशन मस्त दाखवलय...

स्मिता पाटील द बेस्ट ....तिच्या बद्दल अजुन एक्स्प्लेनेशन ची गरजच नाही.....पण अजुन मला स्मिता पाटील नंतर आवडणारी अभिनेत्री म्हणजे सुप्रिया पाठक.....ज्याला हात लावेल त्याचे सोने करेल.....कॉमेडी असो किंवा गंभीर.... Happy

शर्मिला, मस्त पोस्ट. तुझ्याकडून ह्या विषयावर आणखी वाचायला आवडेल.

डोरमधील गुल पनागने साकारलेली व्यक्तिरेखा आवडलीच होती.

मोनालिसा स्माइल बद्दल कुणी तरी लिहायची वाट बघत होते. जुलिया रॉबर्ट्सचा अतिशय आवडलेला चित्रपट.

दोघी चित्रपटातली लालन सारंग आणि तिच्या दोघी मुली. एक सोनाली कुलकर्णी आहे आणि मोठी बहीण कोण आठवत नाही.

'इन हर शुज' मधल्या दोघी बहिणी- कॅमरुन डियॅझ आणि टोनि समथिंग (?). हा चित्रपट कधीही लागला असेल की बघितला जातो.

>>दोघी चित्रपटातली लालन सारंग आणि तिच्या दोघी मुली. एक सोनाली कुलकर्णी आहे आणि मोठी बहीण कोण आठवत नाही. >> सोनाली धाकटी बहीण आणि मोठी बहुतेक रेणुका दफ्तर्दार आहे. आणि आई उत्तरा बावकर असावी. खूप वर्षांपूर्वी पाहिला होता हा सिनेमा.

बाकी सगळ्या पोस्ट मस्तच आहेत. खूप सार्‍या आवडत्या नायिका या चर्चेत आधीच आल्या म्हणून परत लिहीत नाही.
पण उंबरठा मधली स्मिता, जब वी मधली करीना, डोर मधली गुल, पिंजर मधली उर्मिला, उमराव जानची रेखा प्रचंड आवडतात.

Pages