कातरवेळ – २

Submitted by अमृतवल्ली on 7 February, 2014 - 01:06

-------------------------------------------------------------
खरतर बर्याच दिवसांनी कातरवेळचा पुढचा भाग टाकते आहे. काही गोष्टी वेळच्या वेळी पूर्ण कराव्या हेच खर! पण गोड मानून घ्या.
पहिल भाग :
http://www.maayboli.com/node/45045
------------------------------------------------------------------------------------------------------
घड्याळाने ४ चा टोल दिला. या खोलीतली तिची एकमेव वस्तू. रोज नियमाने तिला साद घालणारी. अगदी याच वेळेला. प्रत्येक टोलाबरोबर येणारा एक प्रश्न “ किती दिवस टाळणार आहेस?’
‘तो नाही’ हे जेव्हा उमजल तेव्हा काही दिवस तिने घराचे सगळे दरवाजे बंद करून घेतले. अजूनही तिच्या भोवती रेंगाळणारे चुकार क्षण, निसटते स्पर्श, कुजुबुजते बोल जगून घेतले. मित्र मैत्रिणींच्या गप्पातून, फोटोमधून त्याला टिपून घेतलं. तिच्या त्याच्या आवडीच्या आणि नावडीच्या सगळ्या जागा धुंडाळून झाल्या. हा खेळ तिच्या शहरातल्या घरात किती तरी दिवस चालला. पण हा खेळ तरी किती दिवस पुरणार? हळूहळू त्याची प्रत्येक आठवण त्याच्या नसण्याची जाणीव गडद करून जाई. कधीतरी झटका आल्यासारखं ती भानावर येई. सैरभैर झालेल्या मनाला जोजावत ती पुन्हा स्वतःला कामाला जुंपी. नवीन माणसांशी बोलायला जाई , अश्या काही जागा, माणस ज्याचा त्याच्याशी काही एक संबंध नाही. पण मग कुठेतरी दुमडलेले पान किंवा पुस्तकखुण सापडे त्याने अर्धवट वाचलेल्या पुस्तकात.. कधी शाईचे चार रेघोटे टीश्यु पेपर, मॅगझीन वर ... किंवा सीडी प्लेयरवर एखादी रेंगाळलेली सुरावट आणि पुन्हा सुरु होई तिचा खेळ. तीन दिवसापूर्वी निकाराने ती या घरी आली. तो नसताना पहिल्यांदा. एकदा या सगळ्याचा सोक्षमोक्ष लावायचा असं मनाशी पक्क करून. तिच्या या खेळातून बाहेर काढणारा हा ४ चा टोल. त्याच एकच सांगण “तो नाही” हे मान्य करून एकदा तळ्याकाठी जा.. ‘त्या’च्या जागी जा..
रोज सकाळच्या आन्हीकापासून ती ठरवते “आज नक्की”. मग घर इतके दिवस बंद असल्याने रोजची थोडी थोडी साफसफाई, आठवणीने केलेला २ च माणसांचा स्वयंपाक, बायाजाबाईला हाकारून तिच्याकडून थोडी बागेची काम आणि मग तिच्यासोबतच जेवण. इतक सगळ झाल्यावर मात्र दुपार खायला उठायची. जसजशी दुपार उलटायची तसतसा तिचा ‘पण’ डळमळायचा. या आधाराच्या क्षणांशिवाय जगू कशी?.. सगळ्या रिलेशनशिपची एक्सपायरी डेट असते असं म्हणायचा न तू.. आपल्याही आहे का रे?

खर तर मला माझ्या या भन्नाट जागेवरून अजिबात हलायचं नव्हत, तर याने खालून हाक मारायचा सपाटा चालू केलाय. मागच्या वेळेस इथे आले तेव्हाच याच्या बरोबर कमाल भांडले होते.
“भैताड आहेस का तू?
का?
मग काय नवीन खूळ काढलय? हे असलं आडरानातल घर विकत घेणार आहेस तू?
असा वाटतंय मला!
का पण? आपल्या शहरातल्या घरात बूड टेकवायला आपल्याला वेळ नसतो. आणि इथे घर विकत घेऊन काय करणार आहेस? मला ते लहानपणीचे क्षण वगैरे सांगू नकोस. असले अट्टहास म्हणजे शुद्ध मूर्खपणा आहे. बारा गावच पाणी पिलेल्या तुला..तुझ्या वडिलांच्या बदलीच्या कुठल्या तरी गावी एक घर घ्यायचं आहे??? तुझा हा स्वभाव आहे का? इथे कोणी ओळखत ही नाही तुला. इथे काय करायचं आहे तुला?
अं????
मी सांगते..इथे बाग करायची आहे, बागेत एक लहान टेबल आणि आरामखुर्ची. टेबलावर पाय टाकून, कुल्ले वर करून तू बसणार.. एक विहिरीवर रहाट आणि त्याला एक घागर.. वगैरे वगैरे’.. हातातून निसटलेले हे लहानपणीचे क्षण पुन्हा पकडण्याचा किती तो अट्टाहास. हल्ली सगळ्यांना असच वाटत की आपण जसे लहानपणी सुखात होतो तसे आता नाही , मग लहानपणी आपल्याला आनंदात ठेवणार जे वातावरण होत तसं पुन्हा स्वत:भोवती विणायच. घरात होत तस्स वृंदावन किंवा तश्शी गोधडी. आणि या नादात हा विणलेला कोश नव्या अनुभवांना जीव लावून जगूच देत नाही. शिवाय इतक सगळ करूनही तू आधी जितका आनंदात होता तसा आनंदात राहशील का? हळूहळू वृंदावन वगैरे तुमच्या सोईच होऊन जाईल आणि परत तुम्हीही पाहिल्यासारखे अस्वस्थ. पारिजाताकाला चांगला बहर यावा म्हणून अस्तनीतले निखारे त्याच्या मुळाशी ठेवतात म्हणे. बहर येईल झाडाला कदाचित.. पण झाड तेच राहील का.. निखाऱ्याने पोळलेल झाड आधीच्या उमेदीने फुलेल का.. ?? नाही ना.. तसच आहे ना रे आपलं... “

बोलायला लागले तर मी कोणाला ऐकत नाही हेच खर! तरी पण तोंड भरून हसून या आडवाटेवरच्या गावाकडे त्याने गाडी वळवली होती.

“अग बाये, शांत झाली असशील तर सांगतो.. तू म्हणालीस तसं काही नाहीये. फ्रेम ऑफ रेफेरन्स नावाची एक गोष्ट असते. ती मला बदलायची आहे. त्याच त्याच ठिकाणी राहून तेच तेच पाहून, जगून .. सगळ्या गोष्टींचे तस्सेच अर्थ लागायला लागतात. नवीन काही वाचल पाहिलं तरी संदर्भ ‘मागच्या पानावरून पुढे चालू’ असेच असतात. मुळात मला त्याचा कंटाळा आलाय.
अस्स! उद्या माझा कंटाळा आला म्हणशील तेव्हा??
अं???? ”

या असल्या वादानंतर मी उपरयासारखी त्याच्या घर घेण्याच्या धावपळीकडे पाहत राहिले. शेवटी हे घर मिळाले. लहानखुर, एक मजली, कौलारू, बैठ घर ,घराभोवतालची उन्मळून पडलेली बाग आणि गांजा पिलेल्या माणसासारखं तारवटलेलं चाफ्याचं खुरटं झाड. मागची विहीर मात्र एकदम सुबक आणि बांधीव. घरात शिरताना एक लहानशी ओसरी, आणि आत तीन खोल्या. दिवाणखाना, स्वयंपाकघर, आणि त्याला लागून झोपायची खोली. घराच्या मागच्या बाजूने गोलाकार जीना वर जाण्यासाठी. त्यावर कुठलीतरी अजस्त्र वेल. जणू वेलीला घरून जीना वर जातोय अस वाटावं अशी..

आज दुसर्यांदा घरी आले ते डागडुजीचं काम चालू आहे म्हणून. आता मगाशी दुपारी वर आले तर हा वेल काटूनछाटून अगदी नाजूक केली होती आणि जिन्याच्या वरच्या टोकाला दरवाजा ही दिसत होता.गोलाकार पायऱ्या चढून मी आत आले तेव्हा मात्र हरखले. उतरत्या कौलांना लागुनच एक पडवी होती. तिला लाकडाच्या खांबांनी आधार दिला होता. सगळी जाळी जळमट काढून कामवाल्या बाईने..बायजाबाई कि काय त्यांच नाव... स्वच्छ केली होती. भिंतीना चुन्याचा कात मारला होता. पडवीच्या मधोमध एक मोठ्ठा बसका शिसवी पलंग मांडला होता आणि त्यावर एक पांढरी शुभ्र चादर. बास बाकी त्या खोलीत काही नाही. वरच्या कौलांच्या उतरणीवर एक दोन खिडक्या होत्या. दुपारची लांबट उन्हं त्यातून आत आली होती. नुकत्याच झाडल्याने उडालेले धुळीचे कण पिंगा घालत होते. एकदम आठवलं, लहान असताना कशी ‘माझी प्रायव्हसी जपली जात नाही’ म्हणून मी एकदा धिंगाणा घातला होता. नंतर ४-५ धपाटेही खाल्ले होते आणि त्यानंतर ती मिळावी म्हणून कित्येक दिवस ‘तप’ करण्यासाठी घरात जागा शोधत होते. ती जागा अशी मिळाली.. आता??

याच पडवीच्या एका कोपर्यात भिंत संपून कौलाच्या अगदी खाली २ फारश्या बसतील इतकी खोबणीची जागा तयार झाली होती. मी आता जिथे बसली आहे ना तिथं.. इथे बसलं की घरासमोरून तळ्याकडे जाणारी वाट शेवटपर्यंत लख्ख दिसते. खेळणपाणीच्या खेळात माझ्याकडे एक लाकडी लाल रंगाचा लहानस घर होत. लुटुपुटुच जेवण झाल कि झोपायला घरात. पण इतकुश्या घरात मी मावणार कशी. मग मस्त मांडी ठोकून मी त्या घरावर जाऊन बसायचे स्टुलावर बसल्यासारखी. आता या मस्त खोबणीच्या जागेत बसलं की “घरावर” बसल्यासारख वाटतंय..
असल्या भन्नाट जागेवरून फक्त याच्या सतराशे साठ हाकांमुळे मला उठाव लागतंय.
खाली गेले तर नुकत्याच गिलावा केलेल्या दिवाणखान्याच्या भिंतीवर टांगलेल हे आजीच पुरातन घड्याळ दिसलं. लहानपणीसुद्धा मला ते घड्याळ इसविसनपूर्व कुठल्यातरी शतकातल वाटायचं. मोराच्या पिसासारखं लंबक कुठल्या घड्याळाला असतो का.. आजीने या घड्याळाला १२ चा गजर लावला होता. बरोबर १२ वाजता आजोबा कितीही कामात असले तरी जेवायला माजघरात यायचे. माजघरातला हलका अंधार, त्यांच्यासाठीच्या गरम पोळीचा खमंग वास आणि आजीच्या बांगड्यांची किणकिण इतकच काय ते जाणवायच.. या पठ्याने कधी हे घड्याळ मिळवलं कोण जाणे..त्या घड्याळाचा मग याने ४ चा गजर लावला.. तळ्याकाठी जायला..

अजिब्बात शक्य नसलेल्या कम्फर्ट झोन मध्ये अडकायचं नाही असा मी वाद घातला न याच्याशी? मग आता ??? काय सोडायचं आता.... कम्फर्ट झोन की फ्रेम ऑफ रेफेरन्स???

....गिलाव्याच्या खडबडीत भिंतीवरून हात फिरवताना थोडीशी माती नखात गेलीच म्हणायची..

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान