दातांची काळजी कशी घ्यावी - मोठ्यांसाठी

Submitted by वेल on 6 January, 2014 - 08:00

लहान मुलांच्या दाताबद्दल अजूनही बोलायचे आहे, पण त्याआधी थोडं मोठ्यांच्या दाताबद्दल,

दातांच्या काळजीबद्दल वाचण्यापूर्वी चला एकदा स्वतःच्याच दाताचं आरशात निरिक्षण करूया.

दात प्रकाश परावर्तित करताना चमकत आहेत का?

दात घासताना दातातून रक्त येते का?

दात हलत आहेत का?

थंड - गरम आंबट ह्याचा ठणका लागतो का? तो खूप वेळ राहातो का?

तोंडाला खूप जास्त वास येतो का?

काही कडक खाल्लं की दाताला ठणका लागतो का?

जर पहिल्या प्रश्नाचे उत्तर नाही आणि बाकी सगळ्या प्रश्नांचे उत्तर हो असे असेल तर.. तर हा लेखवाचून तुम्ही दातांची काळजी व्यवस्थित प्रकारे घेऊ शकाल.

जवळ जवळ सगळ्यांनाच माहित असेल की मोठ्या माणसांना ३२ दात असतात. वरच्या आणि खालच्या जबड्यात प्रत्येकी -
सर्वात समोरचे चार पटाशीचे दात - मधले दोन सेण्ट्रल इनसायझर. त्या दोघांच्या बाजूचे दोन लॅटरल इनसायझर. त्यांच्या बाजूला प्रत्येकी एका बाजूला एक असे दोन सुळे - कनाईन, त्याच्या पुढे दोन्ही बाजूला दोन दोन उपदाढा - प्रीमोलर. त्यांच्या पुढे दोन्ही बाजूला दोन दोन दाढा - मोलर्स. आणि सर्वात शेवटची दाढ अक्कलदाढ - विस्डम टूथ - सगळ्यांनाच अक्कलदाढ असते असे नाही. सर्व मिळून एका जबडयात १४-१६ दात.

दातांची व्यवस्थित स्वच्छता राखली, आणि काळजी घेतली तर आपल्यावर फार कमी वेळा दाताच्या डॉ कडे जाण्याची वेळ येते. त्यामुळे सर्वात प्रथम आपण दाताची स्वच्छता कशी राखायची हे पाहू. पेस्ट वापरून ब्रश करने महत्त्वाचे. पेस्ट वापरण्याचे कारण हे की पेस्ट्मुळे तोंडात फोम तयार होतो ज्यामुळे अडकलेले अन्नकण दातापासून लवकर मोकळे होतात. ब्रश करताना शक्यतो बारीक डोक्याचा आणि मऊ केसांचा ब्रश वापरावा - उदा. कोलगेट अल्ट्रा सॉफ्ट (कोलगेट अल्ट्रा सॉफ्सारखा कोणताही ब्रश वापरलात तरी चालेल. मी कोलगेट कंपनीची जाहिरात करत नाही आहे.) तोंडात फोम तयार होण्याला वेळ मिळावा म्हणून आधी सर्व दातांना पेस्ट लावून घ्यावी, एखादे मिनिट थांबावे आणि मग दातांवरून ब्रश फिरवावा. दातांवरून ब्रश फिरवताना हिरड्यांकडून दाताच्या टोकाकडे अशा दिशेनेच ब्रश करावे. उलटे ब्रश करू नये. वरचे दात आणि खालचे दात वेगवेगळे साफ करावे. दात साफ करताना, दाताच्या मागच्या बाजूनेदेखील हिरड्यांकडून दाताच्या टोकाकडे ब्रश फिरवणे महत्वाचे. दाढांचा चावण्याचा सर्फेस साफ करताना मागेपुढे असा ब्रश फिरवावा. दातांचा ओठाकडील, गालाकडील आणि जिभेकडील सर्फेस साफ करताना कधीही आडवा ब्रश फिरवू नये.

प्रत्येक दाताला ५ सर्फेस असतात. प्रत्येक सर्फेस व्यवस्थित स्वच्छ झाला पाहिजे. ब्रशिंग मुळे दाताचा ओठाकडचा आणि जीभेकडचा आणि दाढेचा गालाकडचा, जिभेकडचा आणि चावण्याचा सर्फेस स्वच्छ होतो. दोन दातांच्या मधले दोन्ही सर्फेस ब्रशने साफ होऊ शकत नाहीत. काहीजण त्याकरता टूथपीक वापरतात. पण त्यानेही पूर्ण स्वच्छता होत नाही. दोन दातांच्या मधले सर्फेस स्वच्छ करण्यासाठी फ्लॉसिंगचा दोरा वापरावा. (केवळ फ्लॉसिंगचाच दोरा वापरावा. शिवणकामाचा दोरा वापरून प्रयोग करू नयेत). हा दोरा निर्जंतुक केलेला असतो शिवाय तो स्ट्राँग असतो. त्या दोर्‍याने दोन दातांच्या मधला सर्फेस स्वच्छ करताना तो दोरा हिरडीकडून दाताच्या टोकाकडे असा सर्फेसला घासून बाहेर काढावा. लगेच धुवून दुसरी फट साफ करावी. फ्लॉसिंग नंतर व्यवस्थित चुळा भराव्यात.

तोंडाला वास येत असेल तर माऊथवॉश वापरण्यास हरकत नाही. परंतु एका वेळी सलग फक्त पंधरा दिवस माऊथवॉश वापरावा (भारतातले माऊथवॉश वापरताना तरी) त्यानंतर १५ दिवसाचा ब्रेक घ्यावा. ह्यापुढे तोंडाला वास येत नसेल तर माऊथवॉश वापरू नये.

न चुकता जिभलीने जीभ साफ करावी, कधी कधी जीभेवर चिकटलेले अन्नकण देखील तोंडात कीड वाढवू शकतात.

दिवसातून कमीतकमी तीन वेळा दात घासावेत. कमीत कमी अशा करता की आपली भारतीयांची सकाळी उठल्या उठल्या - खाण्यापूर्वी ब्रश करण्याची सवय पाहाता दोन वेळा हे कमीच आहे. सकाळचा चाहा-दूध नाश्ता केल्यानंतर ब्रश करणे जास्त महत्वाचे. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या ब्रशिंग झाले असले तरी चहा, दूध नाश्ता केल्यावर लगेच ब्रश, फ्लॉस करने जीभ घासणे महत्वाचे आहे. शक्य झाले तर दुपारच्या जेवणानंतरही दातांवर ब्रश फिरवावा.

असे केल्याने दातातील ९५% अन्नकण निघून जातात. राहिलेले ५% अन्नकण हिरडी आणि दात ह्यातल्या फटीत अडकून असतात. काही वेळा फ्लॉसिंगने दोन दाताम्च्या मधल्या फटीतल्या हिरडीतले अन्नकण निघून जातात परंतु दातावरची आणि मागची हिरडी आणि दात ह्यात अडकलेले अन्नकण साफ करायला दाताच्या डॉक्टरची मदतच घ्यावी लागते. दाताचे डॉक्टर ओरल प्रोफायलॅक्सिस म्हणजेच स्केलिंग म्हणजेच इंस्ट्रुमेंटस वापरून दाताची स्वच्छता करतात. काही डॉ हॅण्ड इंस्ट्रुमेंटस वापरून स्केलिंग करतात काही डॉ. मशिन वापरून करतात. अर्थात मशिनने केलेले स्केलिंग जास्त इफेक्टिव्ह असते.
स्केलिंग केल्यामुळे दात आणि हिरड्या ह्यात अडकलेले अन्नकण केवळ सफ होत नाहीत तर चहा सिगरेट ह्याने पडलेले डागही कमी होतात. ह्यामुळे हिरडीचे आणि हिरड्यांच्या आतील हाडाचे निरोगी पण टिकते आणि आयुष्य वाढते. ह्याशिवाय दातात अन्नकण अडकल्याने आपल्याला न कळलेली दाताला लागलेली कीडदेखील लगेच कळून येते आणि त्यावर ट्रीटमेण्ट करता येते.

ब्रशिंग, फ्लॉसिंग, स्केलिंग बद्दल काही समज आपल्यात असतात.
१. ब्रशिंग जोरात केले तरच दात साफ होतात - असे अजिबात नाही. उलट जोरात ब्रशिंग करून आपण दातावरचे इनॅमल कमी करतो. ज्यामुले दातांना सेन्सिटिव्हिटि चा त्रास होऊ शकतो. दात हलक्या हाताने घासावेत.
२. दात घासायला खूप वेळ लागतो - वर दिलेल्या टेक्निकने दात घासले तर दात घासायला दोन ते तीन मिनिटे पुरतात.
३. फ्लॉसिंगमुळे दातात फटी वाढतात. - फ्लॉसचा दोरा खूप बारिक असतो त्याच्यामुळे फटी अजिबात वाढत नाहीत. दात सरकून फटी वाढायला दातांवर कायम असा खूप जोर असावा लागतो. ऑर्थोच्या ट्रीट्मेण्ट मध्ये असतो तसा.
४. जीभ घासणे, फ्लॉसिंग करने हे फक्त अ‍ॅडल्टसनी करायचे असते - वयाच्या चार पाच वर्षापासून मुलांना जीभ घासण्याची, फ्लॉसिंगची सवय लावावी.
५. स्केलिंगने दातात फटी वाढतात - अजिबात नाही. स्केलिंगमुळे दातात फटी झाल्यासारखे वाटत असेल तर - दातात मुळातच फटी होत्या. अन्नकण दातात अडकून त्या फटी बुजल्या होत्या. स्केलिंगनंतर अन्नकण निघून गेल्याने त्या फटी दिसायला लागल्या आहेत एवढेच. फार मोठ्या मोठ्या फटी नसतील तर त्यावर ट्रीटमेण्टची गरज नसते. तरीही तुम्हाला त्या फटी नको असतील तर कॄपया दात काढून तिथे दुसरा कृत्रिम दात बसवू नका. दाताचे रूट कॅनाल करून / न करून दातावर कॅप बसवू नका. फटी कमी करण्यासाठी वेगळे उपचार असतात. त्याकरता नैसर्गिक दात काढून तिथे खोटा दात बसवणे, कॅप बसवणे हे अयोग्य आहे.
६. स्केलिंग केल्याने दात कमकुवत होऊन हलतात - स्केलिंग नंतर दात हलतात हे खरे असले तरी सगळ्यांच्या बाबतीत हे खरे नाही. ज्यांच्या हिरड्यांमध्ये बराच काळ अन्नकण साठून त्याचा दगद झालेला असतो, त्यांचे दात स्केलिम्ग केल्यावर हलतात कारण स्केलिंग करून तो अन्नकणांचा दगड काढला जातो. ह्या अन्नकणांच्या दगडामुळे दाताखालचे हाडदेखील झिजायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे अन्नकणांचा दगड काढणे मस्ट आहे. अशा अडकलेल्या अन्नकणांमुळे दाताम्खालचे हाड कमकुवत होऊन दात हलतात व पडतात. जर व्यवस्थित काळजी घेतली- नीट ब्रशिंग केले, वरचे वर - वर्षातून एक / दोन वेळा स्केलिंग करून घेतल्यास हिरड्या, दाताखालचे हाड कमकुवत होणार नाही आणि दात पडणार नाहीत.
७. दातातून रक्त येत असताना ब्रशिंग करू नये.- मुळात दातातून रक्त येत नाही, रक्त हिरडीतून येते. हिरड्या कमकुमत झाल्याचे ते लक्षण आहे, कारण एकच दाताची स्वच्छता नीट झालेली नाही (किंवा हार्ड ब्रशने खूप जोरात ब्रशिंग केले.) हिरडीतून रक्त येत असल्यास लगेचच डेंटिस्टला दाखवावे. पायोरिया ह्या हिरड्यांच्या आजाराची ही सुरुवात असू शकते. स्केलिंग करून घ्यावे. स्केलिंग करूनही आठ दिवसात हिरड्यतून रक्त येणे थांबले नाही तर गरज पडल्यास डेंटिस्ट तुम्हाला हिरड्यांची सर्जरी करण्याचा सल्लाही देऊ शकतो. ही फारशी दुखवणारी ट्रीटमेण्ट नाही. ह्यात तोंडात दात काढताना देतात तसे इंजेक्शन देऊन हिरडीचा वरचा भाग हलकेच उघडून त्यातील अन्नकण साफ केले जातात. हिरड्या साफ करून घेतल्याशिवाय दातावर कॅप लावून घेऊ नये किंवा ऑर्थो ट्रीटमेंटही करू नये. हिरड्या आनखी कमकुवत होतील आणि दात पडतील.
८. पेस्ट एइवजी दंतमंजन वापरले तरी चालते - दंतमंजन किती वारीक आहे ते पाहावे. जाड दंतमंजन असेल तर त्याने इनॅमल कमी होत जाते.
९. दात सेन्सिटिव्ह झाले की सेन्सिटिव्ह टूथपेस्ट स्वतःच्या मनाने वापरली तर चालते आणि कायम वापरावी लागते. - डेंटिस्टला ला विचारूनच मग सेन्सिटिव्ह टूथेपेस्ट वापरावी. किती दिवस वापरायची हेही विचारून घ्यावे.
१०. दात दुखत असेल तर एखादी पेनकिलर / अ‍ॅण्टिबायोटिक घेऊन काम चालते - दात दुखतो आहे ह्याचा अर्थ कीड मुळापर्यंत गेली आहे. ती कीड रूट कॅनाल प्रोसिजरनेच काढावी लागते. पेनकिलर घेऊन दूख दाबण्यात अर्थ नाही. ती कीड आणि इन्फेक्शन आजूबाजूच्या दातातही पसरू शकते. पेनकिलर अँटिबायोटिक स्वत:च्या मनाप्रमाणे घेऊ नये किंवा केमिस्टने दिले म्हणूनही घेऊ नये. अँटिबायोटिक घेताना डेंटिस्टच्या सल्ल्यानेच घ्यावे. पेन्किलर आणि अँटिबायोटिक तुमच्या वजनाप्रमाणे तुम्हाला अ‍ॅसिडिटिचा त्रास आहे की नाही, कोणत्याही औषधाची अ‍ॅलर्जी आहे की नाही हे विचारूनच मग डॉ प्रीस्क्राईब करतात. शिवाय अँटिबायोटिक हे सांगितले तितके दिवस घेतली गेलीच पाहिजे नाहीतर मेडिसिन रेझिस्टन्स येऊन मग कोणतीच अँटिबायोटिक तुम्हाला लागू पडणार नाही अशीही वेळ येऊ शकते.
११. दात दुखण्यावर दात काढणे हाच उपाय आहे, दात तुटला असेल तर दात काढावाच लागतो. दात काढला तरी हरकत नाही इम्प्लाण्ट करून नवीन दात बसवता येतो. - आधुनिक तंत्रज्ञानात दात काढण्याऐवजी रूट कॅनाल, तुटलेल्या दाताला पूर्वीप्रमाणे बनवणे - पोस्ट अँड कोअर, कॅप करणे हे उपाय आहेत. केवळ इम्प्लांट जास्त आधुनिक आहे म्हणून नैसर्गिक दात काढून त्याठिकाणी कृत्रिम दात बसवणे योग्य नाही.

दात व हिरड्या साफ करून घेणे ही दंतस्वच्छतेची शेवटची ट्रीटमेण्ट नव्हे तर सर्वात पहिली प्रोसेस आहे. हिरड्या साफ असतील तरच तोंडात अगदी शेवटपर्यंत दात टिकतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप उप्युक्त माहीती ! अक्कल दाधेचा चावन्यासथी उपयोग होतो का ? त्या लौकर किडतात का ? माउथ वाश रोज वपरु नये का ?

स्वप्नाली - चावण्यासाठी अक्कलदाढ फारशी वापरली जात नाही. केवळ ५% वापरली जाते.

अक्कलदाढा एकदम कोपर्‍यात असल्याने तिथली स्वच्छता फारशी होत नाही. गाल आणि अक्कलदाढ ह्यामधल्या भागात अन्नकण अडकून राहतात आणि त्यामुले अक्कलदाढा लवकर किडू शकतात. ह्याच कारणाने बारीक डोक्याचा ब्रश वापरावा. लहान मुलांसाठीचा लहान ब्रश मोट्यांनी वापरण्याचाही फायदा होतो.

समज १२.

वयोमानाप्रमाणे दात पडणे / काढायला लागणे, कवळी लागणे हे नैसर्गिक आहे - कवळी जिथे मुळात कृत्रिम आहे तिथे कवळी लागणे नैसर्गिक कसे? दात वयोमानामुळे पडत नाहीत किंवा काढायला लागत नाहीत. केवळ आणि केवळ दातांच्या स्वच्छतेकडे केलेले दुर्लक्ष (आणि डेंटिस्टने दिलेला चुकीचा सल्ला) ह्यामुळे दात काढावे लागतात. केवळ दात किडला / सडला आहे / तुटला आहे म्हणून दात काढण्याचा सल्ला कोणी देत असेल तर दुसर्‍या डेंटिस्टचा सल्ला नक्की घ्या. दात वाचवण्याचा काही उपाय आहे का हे डेंटिस्टला नक्की विचारा.

समज १३.

दाताची ट्रीटमेंट करताना / केल्यानंतर खूप दुखतं. ट्रीटमेंट करताना हादरे बसतात. - दाताची ट्रीटमेंट करताना खूsssप नाही थोडं दुखतं. खूप दुखणारी ट्रीटमेंट जिथे असते - रूट कॅनाल थेरपी, दात काढणे, डीप स्केलिंग, हिरड्यांची सर्जरी अशावेळी डेंटिस्ट इंजेक्शन देतात. जुअमुळे तो भाग बधीर होतो. आता तर इंजेक्शन सुद्धा फारसे दुखत नाही. कारण इंजेक्शन देण्यापूर्वी बरेच डेंटिस्ट अ‍ॅनेस्थेटिक स्प्रे मारून तो भाग आधीच वरचेवर बधीर करतात. त्यामुळे इंजेक्शनची सुई टोचण्याची वेदनादेखील जाणवत नाही. अर्थात इंजेक्शन दुखणार की नाही हे त्या डॉच्या स्किलवरही अवलंबून आहे. पूर्वीच्या काळी दाताची ट्रीटमेण्ट ज्या खुर्च्यांवर होत असे त्या खुर्च्यांच्या इंस्ट्रुमेंटची टेक्नॉलॉजी थोडी वेगळी होती त्यामुळे दात साफ करण्यासाठी पोखरला जात असताना थोडे जास्त हादरे बसत. आता नवीन टेक्नॉलॉजीमुळे फारसे हादरे बसत नाहीत. याशिवाय दाताची ट्रीटमेण्ट करताना डॉ ज्या गोळ्या देतात त्या न विसरता योग्य वेळेत घेतल्यास वेदना फारशा जाणवत नाहीत.

समज १४.

रूट कॅनाल केल्यानंतरही थोड्या वर्षांनी त्यात इन्फेक्शन होऊन दात काढावा लागतो. - रूट कॅनाल व्यवस्थित झाले असेल, इन्फेक्शन पूर्ण गेले असेल. रूट कॅनाल झाल्यावर डॉ कडे फॉलोअप झाला असेल. त्या दातावर कॅप बसवली असेल तर सर्वसाधारणपणे रूट कॅनाल ट्रीटमेण्ट फेल होत नाही.
डॉ रूट कॅनाल ट्रीटमेण्टच्या आधी - मध्ये आणि नंतर एक्स रे काढत आहे की नाही ह्यासंबंधाने ट्रीटमेण्ट सुरू करण्यापूर्वी डॉला प्रश्न विचारावे. डॉ ने नाही असे उत्तर दिले तर का विचारण्याला स्वतःचा आगाउपणा वाटून घेऊ नये. दाताम्च्या मुळांच्या आत, खाली डॉ ला नजरेने दिसत नसते. त्यामुळे इन्फेक्शन किती कुठे पसरले आहे. जो दात दुखतो असा वाटतो आहे त्याच्याच खाली इन्फेक्शन आहे की रेडियेट होणारी वेदना आहे, दाताचे रूट कॅनाल किती आणि कुठे आहेत हे समजण्याकरता डॉ ने एक्स रे काढणे महत्त्वाचे आहे. तसेच रूट कॅनाल झाल्यावर पूर्णपणे सगळे कॅनाल साफ झाले की नाही आणि व्यवस्थित भरले गेले की नाही ह्यासाठी एक्स रे काढला जाणे आवश्यक. जर एक्स रे काढला गेला नाही तर होणारे काम अंदाजपंचे असते.
डॉ ने काढलेले एक्स रे त्यांच्या रेकॉर्डला ते ठेवत असतील तरी आपण त्याची कॉपी काढून ठेवावी. (एक्स रे ला एक्स रे व्युअर वर ठेवून , एक्स रे व्युअरचा दिवा लावून मोबाईलच्या कॅमेरातून फ्लॅश शिवाय फोटो काढून त्याला व्यवस्थित नाव देऊन तारीख घालून ठेवावे.) डॉ ते स्वतःच्या रेकॉर्डला ठेवत नसतील तर तुम्ही स्वतःकडे ठेवावे. त्या एक्स रेला व्यवस्थित नाव देऊन तारीख घालून ठेवावे.

प्रेग्नंसी , डिलिव्हरी चा दातांवर इफेक्ट होतो काय?
कॅल्शियम कमी झाल्याने होत असावा..
दात प्रेग्नंसी , डिलिव्हरी च्या आधि जितके मजबुत वाटायचे तितके नाही वाटत आता..
डिलिवरी नंतरच बरेच प्रोब्लेम सुरु झाले..

_आनंदी_ - प्रेग्नन्सी मध्ये हार्मोनल बदलांमुळे दातावर परिणाम होऊ शकतो. दाताच्या मजबूतीवर फारसा परिणाम होत नाही. जास्तीत जास्त वेळा हिरड्यांचे प्रॉब्लेम्स येतात. त्याकरता एकदा स्केलिंग करून घेतलेले चांगले, दात मजबूत होण्यास मदत होते. बाकी कॅल्शियम चालू ठेवावे. गरज पडतेच. पेस्ट ब्रशवर न लावता दातावर लावल्याने जास्त फायदा होतो.

सामी - टूथपेस्ट कोलगेट, पेप्सोडण्ट, प्रॉमिस, क्लोजअप कोणतीही वापर काही फरक पडत नाही. फक्त अ‍ॅम्वेच्या टूथपेस्टचा अनुभव असा की कालांतराने दात सेन्सिटिव्ह्यट होतात याचे कारण त्याची पार्टिकल साईज थोडी मोठी आहे असा अंदाज आहे . बबुल हिमालया विको ह्या पेस्टचा अभ्यास आम्ही केला नाहीये. त्यामुळे त्याबद्दल सांगू शकत नाही.

वल्लरी, खूप चांगली माहिती.

मला रुट कॅनलची प्रचंड भीती वाटते. दोन वेळा रु.कॅ केलं होतं दोन्ही वेळा बधीर करायचं इंजेक्शन पहिल्यांदा दिल्यावर काहीही परिणाम झाला नव्हता. मला वेदना होत होत्या. पुन्हा एक इंजेक्शन द्याव लागलं होतं दोन्ही सिटींगच्या वेळी दोन्ही रु.कॅ ना Sad दातदुखीची आणि दातांच्या डॉ कडे जायची मला भीतीच वाटते आता.

<< दोन्ही वेळा बधीर करायचं इंजेक्शन पहिल्यांदा दिल्यावर काहीही परिणाम झाला नव्हता. मला वेदना होत होत्या. पुन्हा एक इंजेक्शन द्याव लागलं होतं >> कविन, हे असं होतं ग. कधी कधी दोन वेळा इंजेक्शन द्यावे लागते. इन्फेक्शन जास्त असेल तर असे होऊ शकते. अजूनही खूप कारणे आहेत. पण दात काढण्यापेक्षा हे बरे ना? आणी त्याहूनही चांगले म्हणजे आपल्यावर रूट कॅनाल करण्याची वेळच येऊ नये.

त्याकरता योग्य पद्धतीने ब्रशिंग, फ्लॉसिंग केलं पाहिजे. वर्षातून एकदा तरी दात क्लीन करून घेतले की दाताला किड लागायला सुरुवात झाली आहे ह्या स्टेजलाच डॉला कळते आणि मग इन्जेक्शनची वेळच येत नाही. वेळ पैसा त्रास सगळेच वाचते ना. दाताला लागलेली किड काही आठ दहा महिन्यात दात सडेल, रूट कॅनाल करावे लागेल इतकी पसरत नाही, मोठ्यांची तरी नक्कीच नाही.

परवाच एका बाईला पाहिलं. दाढ मस्त तुटली होती दोन बाजूंनी. एक्स् रे वर सुद्धा दिसत होत कॅव्हिटी खूप खोल वर गेलीय पण तरीही तिने सांगितलं, "दुखत नाहीये ना मग ट्रीटमेण्ट नको, तो दात तुटलाय तो जरा तासून द्या म्हणजे त्याची धार जिभेला लागणार नाही." तिला समजवायचा प्रयत्न केला अग बाई उशीर केलास तर रूट कॅनाल करावे लागेल, कशाला दुर्लक्ष करतेस, पण तिचं तुणतुण चालूच होतं. शेवटी तिला मनोमन नमस्कार केला आणि म्हटलं बाई दुसर्‍या डॉकडे जा.

दुखत नाही म्हणून दाडॉकडे जायचं नाही, आज जाऊ उद्या जाऊ करायचं असं करून आपण आपलच नुकसान करून घेतो आणि प्रचंड दात्दुखी सहन करावी लागते. (नको ग आठवण त्या दातदुखीची, शाळेत असताना भरपूर त्रास सहन केलाय. आणि दोन दाढा काढल्या सुद्धा आहेत. आता त्या दाढा काढणार्‍या डॉची आठवण आली तरी राग राग येतो.)

हो हो मलाही. (डॉ.बरोबर माझं भांडण वगैरे झालं नव्हतं बरं) मला एकदा तीन वेळा इन्जेक्शन द्यावं लागलं होतं आणि तिसरं इन्जेक्शन बरच दुखलं होतं कारण ते जास्त स्ट्राँग आणि कुठेतरी टाळूजवळ दिलं होतं.

त्याशिवाय मला दोन दाढाच नाहीत इथे http://www.maayboli.com/node/46580 ज्याबद्दल लिहिलय ना त्याच... १४व्या वर्षी काढल्या .. Sad

हो गं मी असा दाढ काढण्याचा वेडेपणा केलाय गेल्याच वर्षी रु.कॅ ला घाबरुन Sad डॉ मला सांगून थकलेले रु.कॅ करु म्हणून. मी लहान असल्यापासून कधी काही दाताचा प्रॉब्लेम झाला की त्यांच्याच कडे जातेय. (माहेरचा डेंटिस्ट :फिदी:) पण तरीही त्या रु.कॅ च्या वेदना आठवून मी काढून टाका प्लीज असं सांगितलेलं त्यांना Sad

आता तू दिल्येस ना माहिती आता जरा शहाण्यासारखं वागायचा प्रयत्न करेन ह्या बाबतीत

वेल....अभ्यासू लेख तर आहेच, शिवाय सर्वसामान्यांनाही समजेल अशा मेडिकल टर्म्सचा वापर केल्यामुळे 'दातदाढ' संदर्भात जी एक अनामिक भीती मनी वसलेली असते ती निश्चित्तच दूर होते.

मोटार सायकलच्या अ‍ॅक्सिडेन्टनंतर चेहर्‍याच्या डाव्या बाजूला मुका मार लागला होता, त्यावर उपाययोजना करताना लक्षात आले होते की त्याबाजूच्या दोन दाढा हलत आहेत....डॉक्टरांनी त्या तात्काळ काढल्या. औषधपाण्याने तेथील जखम बरीही झाली. पण बाकीच्या दातदाढांना त्रास होऊ नये म्हणून त्यानी मला त्या दिवसापासून "सेन्सोडाईन" ही टूथपेस्ट वापरायचा सल्ला दिला....फ्रेश जेल किंवा प्रोटेक्टर....आणि मी तो अंमलात आणला आहे. खूप फायदा होताना दिसला आहे या पेस्टचा.....याच्याबरोबरच एक खास टूथब्रशही मिळतो.

बहुधा नवीनच आलेली दिसत्ये, बाजारात.

अशोकमामा तुम्ही माहिती हवी आहे मधल्या धाग्यावर लिहिले होते तुमच्या मित्राच्या मुलीच्या दातांच्या तारांसांदर्भात. तेव्हा एक मेल तुम्हाला केला होता, तुम्हाला मिळाला होता का तो?

तुम्ही पडलात तेव्हा, दात हलत होते म्हणून काढले की फ्रॅक्चर झाले होते म्हणून. कारण नुसते हलत असतील तर दात काढत नाहीत. जागेवरच राहून पुन्हा व्यवस्थित बसू शकतात. फार तर त्याला बाहेरील फोर्सची थोडी मदत घ्यावी लागते, जसे की तारा लावणे.

माझ्या पाहाण्यात मध्यंतरी एका लहान मुलगी तोंडावर पडली तेव्हा मुलीचा वरचा दात तुटून वर सरकला होता. सुदैवाने तो फ्रॅक्चर नसल्याने त्याला काढले नाही. थोडया वर्षंनंतर त्यांना तारा लावून त्याला बाहेर खेचता येईल. अजून एका लहान मुलाचेही असेच झाले होते. आता त्याची तारांची ट्रीटमेण्ट झाली आहे, दात बाहेर आला आहे. शिवाय दाताचे रूट कॅनाल करून त्यावर कॅप बसवून नैसर्गिक दात त्याच्याजागेवर राहू देण्यात यश आले आहे.

जर कोणाचा दात पडला आणि तो हाती लागला तर तो ग्लास्भर स्वच्छ पाण्यात टाकून लगेच डेंटीस्ट्कडे जावे. पंधरा मिनिटाच्या आत डेंटिस्टला भेटू शकलात तर तो दात पुन्हा जागेवत बसवता येतो. दात तुटलेला नसावा हे महत्वाचे. नैसर्गिक दात स्वतःच्या जागी असणे हे खूप चांगले. नैसर्गिक दात काढून त्याजागी इम्प्लाण्ट किंवा ब्रिज किंवा कवळी बसवणे हे दुसरा कोणताही पर्याय नसेल तरच केले जावे. (हे असे केलेले मी स्वतः पाहिलेले आहे.)

शिवाय काढलेल्या दाताच्या जागी दुसरा कृत्रिम दात बसवने गरजेचे असते.

वेल.. वेल डन यार.. तू खरंच खुप खुप खुपच उपयुक्त माहिती देते आहेस.
तुझे सर्व माबोकरांच्या वतीने खुप खुप आभार.

वेल,
मी सध्या एका दातासाठी, रूट कॅनॉल ट्रिटमेंट घेतोय. डॉकटरांनी कॅप बसवण्यासाठी सुचवेल आहे, पण सोबतच, इथे कॅप महाग पडेल, हेही म्हटले आहे. भारतात अंदाजे किती खर्च येतो, ते सांगू शकाल का, त्यावरुन मी कॅप इथे बसवायची की काही दिवस थांबायचं, हे ठरवता येइल.
धन्यवाद.

Pages