दातांची काळजी कशी घ्यावी - मोठ्यांसाठी

Submitted by वेल on 6 January, 2014 - 08:00

लहान मुलांच्या दाताबद्दल अजूनही बोलायचे आहे, पण त्याआधी थोडं मोठ्यांच्या दाताबद्दल,

दातांच्या काळजीबद्दल वाचण्यापूर्वी चला एकदा स्वतःच्याच दाताचं आरशात निरिक्षण करूया.

दात प्रकाश परावर्तित करताना चमकत आहेत का?

दात घासताना दातातून रक्त येते का?

दात हलत आहेत का?

थंड - गरम आंबट ह्याचा ठणका लागतो का? तो खूप वेळ राहातो का?

तोंडाला खूप जास्त वास येतो का?

काही कडक खाल्लं की दाताला ठणका लागतो का?

जर पहिल्या प्रश्नाचे उत्तर नाही आणि बाकी सगळ्या प्रश्नांचे उत्तर हो असे असेल तर.. तर हा लेखवाचून तुम्ही दातांची काळजी व्यवस्थित प्रकारे घेऊ शकाल.

जवळ जवळ सगळ्यांनाच माहित असेल की मोठ्या माणसांना ३२ दात असतात. वरच्या आणि खालच्या जबड्यात प्रत्येकी -
सर्वात समोरचे चार पटाशीचे दात - मधले दोन सेण्ट्रल इनसायझर. त्या दोघांच्या बाजूचे दोन लॅटरल इनसायझर. त्यांच्या बाजूला प्रत्येकी एका बाजूला एक असे दोन सुळे - कनाईन, त्याच्या पुढे दोन्ही बाजूला दोन दोन उपदाढा - प्रीमोलर. त्यांच्या पुढे दोन्ही बाजूला दोन दोन दाढा - मोलर्स. आणि सर्वात शेवटची दाढ अक्कलदाढ - विस्डम टूथ - सगळ्यांनाच अक्कलदाढ असते असे नाही. सर्व मिळून एका जबडयात १४-१६ दात.

दातांची व्यवस्थित स्वच्छता राखली, आणि काळजी घेतली तर आपल्यावर फार कमी वेळा दाताच्या डॉ कडे जाण्याची वेळ येते. त्यामुळे सर्वात प्रथम आपण दाताची स्वच्छता कशी राखायची हे पाहू. पेस्ट वापरून ब्रश करने महत्त्वाचे. पेस्ट वापरण्याचे कारण हे की पेस्ट्मुळे तोंडात फोम तयार होतो ज्यामुळे अडकलेले अन्नकण दातापासून लवकर मोकळे होतात. ब्रश करताना शक्यतो बारीक डोक्याचा आणि मऊ केसांचा ब्रश वापरावा - उदा. कोलगेट अल्ट्रा सॉफ्ट (कोलगेट अल्ट्रा सॉफ्सारखा कोणताही ब्रश वापरलात तरी चालेल. मी कोलगेट कंपनीची जाहिरात करत नाही आहे.) तोंडात फोम तयार होण्याला वेळ मिळावा म्हणून आधी सर्व दातांना पेस्ट लावून घ्यावी, एखादे मिनिट थांबावे आणि मग दातांवरून ब्रश फिरवावा. दातांवरून ब्रश फिरवताना हिरड्यांकडून दाताच्या टोकाकडे अशा दिशेनेच ब्रश करावे. उलटे ब्रश करू नये. वरचे दात आणि खालचे दात वेगवेगळे साफ करावे. दात साफ करताना, दाताच्या मागच्या बाजूनेदेखील हिरड्यांकडून दाताच्या टोकाकडे ब्रश फिरवणे महत्वाचे. दाढांचा चावण्याचा सर्फेस साफ करताना मागेपुढे असा ब्रश फिरवावा. दातांचा ओठाकडील, गालाकडील आणि जिभेकडील सर्फेस साफ करताना कधीही आडवा ब्रश फिरवू नये.

प्रत्येक दाताला ५ सर्फेस असतात. प्रत्येक सर्फेस व्यवस्थित स्वच्छ झाला पाहिजे. ब्रशिंग मुळे दाताचा ओठाकडचा आणि जीभेकडचा आणि दाढेचा गालाकडचा, जिभेकडचा आणि चावण्याचा सर्फेस स्वच्छ होतो. दोन दातांच्या मधले दोन्ही सर्फेस ब्रशने साफ होऊ शकत नाहीत. काहीजण त्याकरता टूथपीक वापरतात. पण त्यानेही पूर्ण स्वच्छता होत नाही. दोन दातांच्या मधले सर्फेस स्वच्छ करण्यासाठी फ्लॉसिंगचा दोरा वापरावा. (केवळ फ्लॉसिंगचाच दोरा वापरावा. शिवणकामाचा दोरा वापरून प्रयोग करू नयेत). हा दोरा निर्जंतुक केलेला असतो शिवाय तो स्ट्राँग असतो. त्या दोर्‍याने दोन दातांच्या मधला सर्फेस स्वच्छ करताना तो दोरा हिरडीकडून दाताच्या टोकाकडे असा सर्फेसला घासून बाहेर काढावा. लगेच धुवून दुसरी फट साफ करावी. फ्लॉसिंग नंतर व्यवस्थित चुळा भराव्यात.

तोंडाला वास येत असेल तर माऊथवॉश वापरण्यास हरकत नाही. परंतु एका वेळी सलग फक्त पंधरा दिवस माऊथवॉश वापरावा (भारतातले माऊथवॉश वापरताना तरी) त्यानंतर १५ दिवसाचा ब्रेक घ्यावा. ह्यापुढे तोंडाला वास येत नसेल तर माऊथवॉश वापरू नये.

न चुकता जिभलीने जीभ साफ करावी, कधी कधी जीभेवर चिकटलेले अन्नकण देखील तोंडात कीड वाढवू शकतात.

दिवसातून कमीतकमी तीन वेळा दात घासावेत. कमीत कमी अशा करता की आपली भारतीयांची सकाळी उठल्या उठल्या - खाण्यापूर्वी ब्रश करण्याची सवय पाहाता दोन वेळा हे कमीच आहे. सकाळचा चाहा-दूध नाश्ता केल्यानंतर ब्रश करणे जास्त महत्वाचे. त्यामुळे सकाळी उठल्या उठल्या ब्रशिंग झाले असले तरी चहा, दूध नाश्ता केल्यावर लगेच ब्रश, फ्लॉस करने जीभ घासणे महत्वाचे आहे. शक्य झाले तर दुपारच्या जेवणानंतरही दातांवर ब्रश फिरवावा.

असे केल्याने दातातील ९५% अन्नकण निघून जातात. राहिलेले ५% अन्नकण हिरडी आणि दात ह्यातल्या फटीत अडकून असतात. काही वेळा फ्लॉसिंगने दोन दाताम्च्या मधल्या फटीतल्या हिरडीतले अन्नकण निघून जातात परंतु दातावरची आणि मागची हिरडी आणि दात ह्यात अडकलेले अन्नकण साफ करायला दाताच्या डॉक्टरची मदतच घ्यावी लागते. दाताचे डॉक्टर ओरल प्रोफायलॅक्सिस म्हणजेच स्केलिंग म्हणजेच इंस्ट्रुमेंटस वापरून दाताची स्वच्छता करतात. काही डॉ हॅण्ड इंस्ट्रुमेंटस वापरून स्केलिंग करतात काही डॉ. मशिन वापरून करतात. अर्थात मशिनने केलेले स्केलिंग जास्त इफेक्टिव्ह असते.
स्केलिंग केल्यामुळे दात आणि हिरड्या ह्यात अडकलेले अन्नकण केवळ सफ होत नाहीत तर चहा सिगरेट ह्याने पडलेले डागही कमी होतात. ह्यामुळे हिरडीचे आणि हिरड्यांच्या आतील हाडाचे निरोगी पण टिकते आणि आयुष्य वाढते. ह्याशिवाय दातात अन्नकण अडकल्याने आपल्याला न कळलेली दाताला लागलेली कीडदेखील लगेच कळून येते आणि त्यावर ट्रीटमेण्ट करता येते.

ब्रशिंग, फ्लॉसिंग, स्केलिंग बद्दल काही समज आपल्यात असतात.
१. ब्रशिंग जोरात केले तरच दात साफ होतात - असे अजिबात नाही. उलट जोरात ब्रशिंग करून आपण दातावरचे इनॅमल कमी करतो. ज्यामुले दातांना सेन्सिटिव्हिटि चा त्रास होऊ शकतो. दात हलक्या हाताने घासावेत.
२. दात घासायला खूप वेळ लागतो - वर दिलेल्या टेक्निकने दात घासले तर दात घासायला दोन ते तीन मिनिटे पुरतात.
३. फ्लॉसिंगमुळे दातात फटी वाढतात. - फ्लॉसचा दोरा खूप बारिक असतो त्याच्यामुळे फटी अजिबात वाढत नाहीत. दात सरकून फटी वाढायला दातांवर कायम असा खूप जोर असावा लागतो. ऑर्थोच्या ट्रीट्मेण्ट मध्ये असतो तसा.
४. जीभ घासणे, फ्लॉसिंग करने हे फक्त अ‍ॅडल्टसनी करायचे असते - वयाच्या चार पाच वर्षापासून मुलांना जीभ घासण्याची, फ्लॉसिंगची सवय लावावी.
५. स्केलिंगने दातात फटी वाढतात - अजिबात नाही. स्केलिंगमुळे दातात फटी झाल्यासारखे वाटत असेल तर - दातात मुळातच फटी होत्या. अन्नकण दातात अडकून त्या फटी बुजल्या होत्या. स्केलिंगनंतर अन्नकण निघून गेल्याने त्या फटी दिसायला लागल्या आहेत एवढेच. फार मोठ्या मोठ्या फटी नसतील तर त्यावर ट्रीटमेण्टची गरज नसते. तरीही तुम्हाला त्या फटी नको असतील तर कॄपया दात काढून तिथे दुसरा कृत्रिम दात बसवू नका. दाताचे रूट कॅनाल करून / न करून दातावर कॅप बसवू नका. फटी कमी करण्यासाठी वेगळे उपचार असतात. त्याकरता नैसर्गिक दात काढून तिथे खोटा दात बसवणे, कॅप बसवणे हे अयोग्य आहे.
६. स्केलिंग केल्याने दात कमकुवत होऊन हलतात - स्केलिंग नंतर दात हलतात हे खरे असले तरी सगळ्यांच्या बाबतीत हे खरे नाही. ज्यांच्या हिरड्यांमध्ये बराच काळ अन्नकण साठून त्याचा दगद झालेला असतो, त्यांचे दात स्केलिम्ग केल्यावर हलतात कारण स्केलिंग करून तो अन्नकणांचा दगड काढला जातो. ह्या अन्नकणांच्या दगडामुळे दाताखालचे हाडदेखील झिजायला सुरुवात झालेली असते. त्यामुळे अन्नकणांचा दगड काढणे मस्ट आहे. अशा अडकलेल्या अन्नकणांमुळे दाताम्खालचे हाड कमकुवत होऊन दात हलतात व पडतात. जर व्यवस्थित काळजी घेतली- नीट ब्रशिंग केले, वरचे वर - वर्षातून एक / दोन वेळा स्केलिंग करून घेतल्यास हिरड्या, दाताखालचे हाड कमकुवत होणार नाही आणि दात पडणार नाहीत.
७. दातातून रक्त येत असताना ब्रशिंग करू नये.- मुळात दातातून रक्त येत नाही, रक्त हिरडीतून येते. हिरड्या कमकुमत झाल्याचे ते लक्षण आहे, कारण एकच दाताची स्वच्छता नीट झालेली नाही (किंवा हार्ड ब्रशने खूप जोरात ब्रशिंग केले.) हिरडीतून रक्त येत असल्यास लगेचच डेंटिस्टला दाखवावे. पायोरिया ह्या हिरड्यांच्या आजाराची ही सुरुवात असू शकते. स्केलिंग करून घ्यावे. स्केलिंग करूनही आठ दिवसात हिरड्यतून रक्त येणे थांबले नाही तर गरज पडल्यास डेंटिस्ट तुम्हाला हिरड्यांची सर्जरी करण्याचा सल्लाही देऊ शकतो. ही फारशी दुखवणारी ट्रीटमेण्ट नाही. ह्यात तोंडात दात काढताना देतात तसे इंजेक्शन देऊन हिरडीचा वरचा भाग हलकेच उघडून त्यातील अन्नकण साफ केले जातात. हिरड्या साफ करून घेतल्याशिवाय दातावर कॅप लावून घेऊ नये किंवा ऑर्थो ट्रीटमेंटही करू नये. हिरड्या आनखी कमकुवत होतील आणि दात पडतील.
८. पेस्ट एइवजी दंतमंजन वापरले तरी चालते - दंतमंजन किती वारीक आहे ते पाहावे. जाड दंतमंजन असेल तर त्याने इनॅमल कमी होत जाते.
९. दात सेन्सिटिव्ह झाले की सेन्सिटिव्ह टूथपेस्ट स्वतःच्या मनाने वापरली तर चालते आणि कायम वापरावी लागते. - डेंटिस्टला ला विचारूनच मग सेन्सिटिव्ह टूथेपेस्ट वापरावी. किती दिवस वापरायची हेही विचारून घ्यावे.
१०. दात दुखत असेल तर एखादी पेनकिलर / अ‍ॅण्टिबायोटिक घेऊन काम चालते - दात दुखतो आहे ह्याचा अर्थ कीड मुळापर्यंत गेली आहे. ती कीड रूट कॅनाल प्रोसिजरनेच काढावी लागते. पेनकिलर घेऊन दूख दाबण्यात अर्थ नाही. ती कीड आणि इन्फेक्शन आजूबाजूच्या दातातही पसरू शकते. पेनकिलर अँटिबायोटिक स्वत:च्या मनाप्रमाणे घेऊ नये किंवा केमिस्टने दिले म्हणूनही घेऊ नये. अँटिबायोटिक घेताना डेंटिस्टच्या सल्ल्यानेच घ्यावे. पेन्किलर आणि अँटिबायोटिक तुमच्या वजनाप्रमाणे तुम्हाला अ‍ॅसिडिटिचा त्रास आहे की नाही, कोणत्याही औषधाची अ‍ॅलर्जी आहे की नाही हे विचारूनच मग डॉ प्रीस्क्राईब करतात. शिवाय अँटिबायोटिक हे सांगितले तितके दिवस घेतली गेलीच पाहिजे नाहीतर मेडिसिन रेझिस्टन्स येऊन मग कोणतीच अँटिबायोटिक तुम्हाला लागू पडणार नाही अशीही वेळ येऊ शकते.
११. दात दुखण्यावर दात काढणे हाच उपाय आहे, दात तुटला असेल तर दात काढावाच लागतो. दात काढला तरी हरकत नाही इम्प्लाण्ट करून नवीन दात बसवता येतो. - आधुनिक तंत्रज्ञानात दात काढण्याऐवजी रूट कॅनाल, तुटलेल्या दाताला पूर्वीप्रमाणे बनवणे - पोस्ट अँड कोअर, कॅप करणे हे उपाय आहेत. केवळ इम्प्लांट जास्त आधुनिक आहे म्हणून नैसर्गिक दात काढून त्याठिकाणी कृत्रिम दात बसवणे योग्य नाही.

दात व हिरड्या साफ करून घेणे ही दंतस्वच्छतेची शेवटची ट्रीटमेण्ट नव्हे तर सर्वात पहिली प्रोसेस आहे. हिरड्या साफ असतील तरच तोंडात अगदी शेवटपर्यंत दात टिकतील.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"Gag reflex" ya shatruwar kashi maat karaychi? Khoopach tras sahan kelay tya muLe!
Dhanyavad!

गॅग रीफ्लेक्स हे मोस्टली अ‍ॅङ्झायटीमुळे किंवा न्युरल सेन्सिटिव्हिटिमुळे होतं.

गॅग रिफ्लेक्ससाठी तर लोकल अ‍ॅनेस्थेशिया असलेले माऊथ वॉश येतात. त्यामुळे तोंडाच्या आतला भाग वरचे वर सुन्न होतो ज्यामुळे डेंटल चेकप किंवा एक्स रे व्यवस्थित काढता येतात.

तुम्हाला गॅग रीफ्लेक्स कशामुळे होतय हे तुम्ही डेंटिस्टला ला विचारा. जर अ‍ॅङ्झायटी मुळे होत असेल तर सायकिअ‍ॅट्रिस्टला भेटून अँटिअ‍ॅङ्झायटी औषधे घेतल्यास खूप फायदा होतो. हा त्रास लहान मुलांपासून मोठ्यां पर्यंत कोणालाही होऊ शकतो. त्यावर अँटिअ‍ॅङ्झायटी औषधे खूप मदत करतात. अँटिअ‍ॅङ्झायटी औषधे ही फक्त आणि फक्त सायकिअ‍ॅट्रिस्टच्या सल्ल्यानेच घ्यावीत.

keshar - oral B floss is good. I don tknow about toothbrush. i dont use oral b toothbrush because i have not found ultra soft toothbrush with small head. I personally prefer ultra soft toothbrush with small head coz those toothebrushes reach the extreme corners of mouth, ie behind wisdom teeth and do not hurt gums. oral B kids brush may be good option even of adults.

मला दातांचा एक्सरे काढताना गॅग रिफ्लेक्स येईल अशी भिती वाटते. शिवाय टोचल्यासारखे होऊन खोकलाही येतो. इंजेक्शन परवडले, एक्सरे नको असे वाटते ! पण बर्‍याचदा एक्सरे हीच पहिली पायरी असते कुठल्याही ट्रीटमेंटची Sad

माहिती छान देते आहेस वेल !

१२ वीत असतांना एक्दा दातावर कपाटाचं दार लागलं होतं समोरच्या दाताला (वरचा जबडा) त्याला सरळ उभी चीर गेली आहे. डॉ. कडे गेल्यावर तो म्ह्णाला काही करु नका कारण पुर्ण दात स्केल करुन क॓प बसवावी लागेल. हसतांना बरं दिसत नाही. काही उपाय असेल तर सुचवा.
अजुन एक, दाताचा पिवळे पणा कसा घालवावा.?

खुप धन्यवाद वेल.
माझ्या डॉ.ने सांगितले होते की दाताला १ मिनीट मसाज(फक्त बोटाने) करायचा. त्यामुळे खाल्यावर (खास करुन चहा, कॉफी ) घेतल्यावर जो थर बसतो दातावर तो निघुन जातो. हे खरेय का?

दाताचा पिवळेपणा जाण्यासाठी प्रथम स्केलिंग पॉलिशिंग करून घ्यावे ह्यामुळे चहा कॉफी कोल्डड्रिंक तंबाखू हळद ह्याने दातावर पडलेले पिवळे डाग निघून जातात. बरेचदा दातावरचा पिवळेपणा दातावर किटण (प्लाक) असल्यामुळे देखील असतो. स्केलिंग पॉलिशिंग केल्यावर दाताचा मूळ रंग दिसू लागतो. दाताचा मूळ रंगच जर पिवळा असेल आणि तो पिवळेपणा कमी करायचा असेल तर दाताचे व्हाईटनिंग करण्याला पर्याय नाही. परंतु व्हाईटनिंग करण्यापूर्वी दात आणि हिरड्या निरोगी असाव्यात. दात सेन्सिटिव्ह असू नयेत. दातात असलेल्या कॅव्हिटि भरलेल्या असाव्या. दात व्हाईटनिंग करण्यापूर्वी देखील स्केलिंग पॉलिशिंग करून घ्यावे.

दाताला धक्का लागल्यामुळे दाताची कपची उडणे किंव दाताला वरचेवर चीर पडणे हे काँपोझिट सिमेंट वापरून दुरुस्त करता येते. दात तुटला असेल किंवा चीर खोलवर असेल तर त्या दाताचे रूट कॅनाल करून त्यावर कॅप बसवणे हा चांगला उपाय आहे कारण त्यामुळे नैसर्गिक दात जागेवर राहातो आणि कॅपमुळे त्याला स्ट्रेंथ मिळून तो व्यवस्थित वापरता येतो. जर दाताला मूळामध्ये आडवे किंवा तिरपे किंवा उभे फ्रॅक्चर झाले असेल तर तो दात काढावा लागतो.

दातावर काय ट्रीटमेण्ट करावी हे प्रत्यक्ष पाहिल्याशिवाय आणि एक्सरे पाहिल्याशिवाय सांगता येत नाही.

चहा कॉफी प्यायल्यावर दाताला बोटाने मसाज केल्याने चहा कॉफीचा दातावर होणारा परिणाम नक्कीच कमी होतो. हलकेच ब्रश करता आले तर अधिक चांगले. पण बोटानेही मसाज करता न आल्यास चहा कॉफी प्यायल्यावर कोमट किंवा रूम टेंपरेचरचे पाणी प्यावे. त्यासोबत ज्या ज्या दातांवर शक्य असेल त्या दातांवर ब्रश केल्यासारखी जीभ फिरवावी. व खुळखुळून चूळ भरावी किंवा पाणी प्यावे. जिभेच्या खरखरीत पणामुळे दातावर चढलेला थर थोड्या प्रमाणात तरी निघून जातो.

MAZYA DATAMADHE KHUP GAP PADLI AHE ME KONTI TREETMENT KARU -

सर्वच दातांमध्ये गॅप असेल तर ताराम्ची ट्रीटमेंट केली जाते. दाताच्या एखाद दोन जोडीमध्ये गॅप असल्यास कॉम्पोझिट बिल्टप करून गॅप बंद करता येते. अर्थात, तुमचे दात तपासणारे डेंटिस्ट योग्य सल्ला देऊ शकतील.
हिरड्या निरोगी असतील आणि दाताखालच्या हाडाची झीज झाली नसेल तर कोणत्याही वयात तारांची ट्रीटमेंट करता येते. अगदी पन्नास वर्षे ह्या वयाला देखील. फक्त डेंटिस्टने सांगितलेली पथ्ये आणि सूचना तशाच्या तशा फॉलो केल्या गेल्या पाहिजेत. रिटेशन प्लेट इत्यादी व्यवस्थित लावले गेले पाहिजे.

माऊथवॉश हा प्रकारसुद्धा डेंटिस्ट च्या सल्ल्याने वापरायचा असतो. त्यात औषधे असतात. त्याची सवय लागू नये आणि मेडिसिन रेझिस्टन्स येऊ नये म्हणून माऊथवॉश उगाच वापरू नये. त्याने तोंड कोरडे पडण्याचीही शक्यता असते. (Details to follow)

कृत्रिम दाढा कधीही बसवता येतात. >>> दात पडून गेल्यावर हळूहळू तिथे बोनलॉस होत जातो त्यामुळे दात नसलेली पोकळी काही वर्षं तशीच राहिली तर इंप्लांट करता येत नाही असे वाचले होते. तसे नसते का ?

दात पडून गेल्यावर हळूहळू तिथे बोनलॉस होत जातो त्यामुळे दात नसलेली पोकळी काही वर्षं तशीच राहिली तर इंप्लांट करता येत नाही असे वाचले होते.>>

अगो तुझे बरोबर आहे. पण दात बसवणे म्हणजे फक्त इंप्लांट नव्हे.

कवळी हाही एक ऑप्शन आहे.

आजूबाजूच्या दातांचा सपोर्ट घेऊन ब्रिज करता येतो.

बोनलॉस किती आहे, आजूबाजूचे दात किती आहेत ह्यावर अवलंबून आहे कोणता ऑप्शन घ्यायचा.

इंप्लाण्ट करताना त्याचे तोटे प्रथम समजून घ्यावेत. (तोटे प्रत्येकाचे आहेत.)

<< green tea ने दात पिवळे पडतात का? >> माहित नाही ग. पण साध्या चहाने होतात, तसे ग्रीन टीने सुद्धा होत असणार . ग्रीन टीचा डाग रुमालावर पडला तर निघत नाही. चाहा प्यायल्यावर लगेच चूळ भरावी जमल्यास दात घासावे.

कृत्रिम दात म्हणताना इंप्लांटचाच पर्याय आठवला Happy
कवळी, ब्रिज माहीत आहेत.

इंप्लाण्ट करताना त्याचे तोटे प्रथम समजून घ्यावेत. (तोटे प्रत्येकाचे आहेत.) >>> ह्याबद्दल लिहिशील का थोडं जमलं तर ?

जास्त अमाल्गम फिलिन्ग्स असतील तर त्याचा शरीरावर वाईट परीणाम होतो का? बरेच डेन्टीस्ट आता अशी फिलिन्ग्ज करीत नाहीत. असलेली अमाल्गम फिलिन्ग्ज बदलून घ्यावीत का?

कवळीचा तोटा - गॅग रिफ्लेक्स असू शकतो. काही जणांना कवळी आवडत नाही. काही जणांना प्लास्टिकची कवळी नको वाटते त्यांना वायरमेशवर बसवलेली कवळी बनवता येते.
एका दाताची कवळीही बनते. ती लावण्याचे ठरवल्यास कोणत्याही दाताचे रूट कॅनाल करावे लागत नाही किंवा हाडात ड्रिलिंग करावे लागत नाही त्यामुळे हा सर्वात सेफ आणि स्वस्त उपाय आहे. कवळी बसली नाही तर दुसरी कवळी बनवणे किंवा ब्रिज करणे हा ऑप्शनही असतोच. बोनलॉस असेल तर मात्र कवळी बसायला प्रॉब्लेम येऊ शकतो. बोनलॉसमध्ये कवळी बसवायला प्रॉब्लेम येतो. कधी कधी बसवताही येत नाही. (पण तसे इंप्लांटही बसवता येत नाही) अशा वेळी बाजूच्या दातांचा सपोर्ट घेऊन मेटल किंवा सिरॅमिकचा ब्रिज करता येतो.

ब्रिजचा तोटा - बाजूचे दात सपोर्ट घेताना तासावे लागतात. जर सिरॅमिकचा ब्रिज असेल तर बाजूच्या दाताचे रूट कॅनाल करावे लागते. खर्च तिप्पट होतो. (चांगल्या क्वालिटिच्या कम्प्युटराइज्ड इंप्लाण्टचा खर्च त्याहून जास्त येतो.) जर सिरॅमिकचा ब्रिज करताना रूट कॅनाल केलम नाही तर पुढे सपोर्टच्या दातात कॅव्हिटि - इन्फेक्शन होऊन पुन्हा ब्रिज काढणे इत्यादी काम करावे लागते आणि त्यात खर्च वाढतो आणि त्रासही वाढतो. रूट कॅनालची जास्तीत जास्त खराब कंडिशन म्हणजे ते रूट कॅनाल फेल होऊ शकते पण त्यावर पुन्हा रूट कॅनाल करण्याचा ऑप्शन अ‍ॅव्हेलेबल असतो. शिवाय पुन्हा ब्रिज करण्याचा ऑप्शनही असतो.

इंप्लाण्ट - मुळातच खर्चिक प्रकरण.
इंप्लाण्ट बसवताना मुळात पेशण्ट इंप्लाण्ट्साठी एलिजिबिल आहे का हे पाहावे लागते. हाड किती शिल्लक आहे, किती स्ट्राँग आहे ऑस्टिओपोरॉसिस किंवा त्याच्या जवळपास जाणारी कंडिशन तर नाही ना, दाताची ठेवण काय आहे, पूर्वीचे दात किती वेडेवाकडे होते, तोंड कसे बंद होते हा सगळा अभ्यास खूप काळजीपूर्वक करावा लागतो. मगच पेशण्ट ईम्प्लांटला एलिजिबल आहे की नाही ठरवता येते. त्यासोबत पेशण्टला हार्टचा काही त्रास नाही ना, डायबिटिस कंट्रोल्ड आहे की नाही हेही पाहावे लागते.
इंप्लाण्ट करताना हाडामध्ये ड्रिल करून त्यात स्क्रू बसवतात. तो हाडात सेट झाल्यावर त्यावर कॅप करतात. (कोणीही कितीही जाहिरात केली तरी इम्प्लांट एका दिवसात पूर्ण होऊ शकत नाही) वरकरणी पाहाता बाजूच्या दाताला काही करावे लागत नसल्याने हा उपाय खूप चांगला वाटतो. परंतु नैसर्गिक दाताखाली पेरिओडोंटियम टिश्यु असतो तो इंप्लाण्ट स्क्रू खाली नसतो. पेरिओडोंटियम टिश्यु खाताना जे फोर्सेस दातावर हाडावर येतात त्या फोर्सेसचे शॉक अ‍ॅब्सॉर्ब करतो. स्क्रूचा अँगल काय असावा किती मोठा स्क्रू असावा तो स्क्रू हाडाच्या आत किती असावा बाहेर किती असावा, दात एकमेकावर तेकल्यावर त्यात किती अंतर राहाते ह्यावरून कॅपची साईज काय असावी हे सगळे गणित करावे लागते. ह्यातले कोणतेही गणित चुकले, विशेषतः स्क्रूचा अँगल जरा जरी चुकला तर केलेले काम फुकट जाते किंवा त्यावरच कॅप बसवली तर तो दात चावण्यात येत नाही. किंवा त्यावर फोर्सफुली चावायचा प्रयत्न केला तर तिथे वेदना होऊ शकतात. अँगल चुकला तर तो स्क्रू काढून तिथली जखम भरण्यासाठी बोन जनरेशन ही वेळ्काढू आणि खर्चिक पद्धत अवलंबवावी लागते. त्यानंतर पुन्हा तिथे लगेच इंप्लाण्ट करणे योग्य नाही.
काही ठिकाणी स्क्रूच्या अँगलचे कॅल्क्युलेशन कम्युटराईज्ड पद्धतीने केले जाते शिवाय हाड ड्रिल करत असताना कम्प्युटरची मदत घेतली जाते. तो इंप्लाण्टचा ऑप्शन सर्वात चांगला असतो (आणि सर्वात खर्चिक - त्यात एका दाताच्या ५० कवळ्या होतील) . परंतु तिथे सुद्धा पेरिओडोंटियम टिश्यु नसतोच.

सिल्वर अमाल्गम फिलिंग्ज न करण्याचं कारण असं की कॉम्पोझिट फिलिंग्ज जास्त स्ट्राँग असतात आणि ती सिल्वर अमाल्गम प्रमाणे आकसत नाहीत. सिल्वर अमल्गम फिलिंग कालांतराने आकसू शकते आणि दातात मायक्रोलिकेज होऊन फिलिम्गच्या खाली नव्याने कॅव्हिटि इन्फेक्शन होऊ शकते. तरिही काही स्पेसिफिक पद्धतीच्या कॅव्हिटिमध्ये सिल्वर अमाल्गम फिलिंग करावे लागते.

सिल्वर अमल्गम फिलिंग काढलेच पाहिजे असे नाही. ते शरिरावर कोणताही वाईट परिणाम करत नाही. (अजूनतरी तसा शोध लागलेला नाही). डॉ जर तसे सजेस्ट करत असेल तर त्यामागचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करावा.

धन्यवाद वेल.. टीप मस्त आहे. लग्न वगैरे सभारंभांमध्ये लगेच ब्रश करणे होत नाही तेव्हा लक्शात ठेवीन मी हे.

मस्त लेख. ईकडे जर्मनीत वर्षातून एकदा तरी दात क्लीन करून घेतोच आम्हि. also better from insurance point of view. तेव्हाच बाकिचे चेकिन्ग पण होते. त्यामुळे काहि प्रोबलेम असेल तर लगेच कळते.

धन्यवाद वेल.
सध्या मला या माहितीची फारच गरज होती. दोन दाढांचे रूट कॅनॉल आधीच झालेले आहे. आता ‌रूटकॅनाल केलेल्या दाढेच्या बरोब्बर खालच्या दोन दाढींमध्ये कीड लागली आहे. त्यामुळे तेथे पोकळी निर्माण झाली आहे. पाणी प्यायले तरी ठणक बसतो. त्यावर सिमेंट भरले होते, पण ते तीन दिवसांतच निघाले. तीन-चार महिन्यांपूर्वी डॉक्टरांकडे गेलो असता त्यांनी रूट कॅनाल करायचा सल्ला दिला. नंतर कामाच्या गडबडीत ते मागे राहिले. दोन-तीन दिवसांपासून फारच ठणक बसायला लागला म्हणून त्याच डॉक्टरकडे गेलो. त्यांनी सांगितले दाढेला रूट कॅनाल करायची कदाचित गरज भासणार नाही, पण हिरड्यांना खूपच सूज आलेली आहे. त्यांनी मला डॉक्सी १०० गोळ्या दिल्या आणि एक माऊथवॉशसारखे लिक्विड दिले. हिरड्या कमजोर झाल्यामुळे त्रास होतो असे सांगितले. डॉक्टर म्हणाले हिरड्या गुलाबी रंगाच्या झाल्या आहेत. त्या लाल रंगाच्या हव्यात.योग्य पध्दतीने ब्रश करीत नसल्यामुळे माझ्या दातातील अन्नकण निघत नव्हते. ते आताही निघत नाहीत. शिवाय अक्कलदाढा आडव्या वाढल्यामुळे त्यांच्या वरच्या आणि मागच्या बाजूला अन्नकण साचतात, तेथेही ब्रशने साफ करता येत नाही.त्यामुळे दातांचा पिवळेपणाही वाढला आहे.
प्रश्न- १ हिरड्यांना सूज येण्यामागे काय कारण असू शकेल?
प्रश्न २- दातांना कीड लागणे दातांच्या रचनेवर अवलंबून असते का? म्हणजे अगदी खेटून घट्ट दात असलेल्या लोकांच्या दातांना कीड लागत नाही आणि दातात फटी असलेल्या लोकांच्या दातांना जास्त कीड लागते का?

Pages