उमा कुलकर्णी यांचं व्याख्यान

Submitted by ललिता-प्रीति on 30 December, 2013 - 02:19

वर्तमानपत्राच्या पुरवणीच्या एखाद्या पानावर कोपर्‍यात स्थानिक कार्यक्रमांची माहिती देणारी यादी बर्‍याचदा येते. ती वाचून त्यातल्या एखाद्या कार्यक्रमाला हजेरी लावण्याचा नुसता विचार जरी शिवून गेला, तरी मनाला बरं वाटतं. प्रत्यक्षात तसं फार क्वचित घडतं, हे देखील तितकंच खरं. त्याच यादीत गेल्या शुक्रवारी ‘लेखक-वाचक थेट भेट. उमा कुलकर्णी यांचे व्याख्यान’ या मथळ्यावर माझी नजर पडली. मथळ्यामुळेच खालचा मजकूर लक्षपूर्वक वाचला गेला. कार्यक्रम दुसर्‍या दिवशी संध्याकाळी होता. ठाण्यातच होता. वेळही जमण्यासारखी होती. पण शनिवार सकाळपासून नेमकी एक-एक कामं अशी लागोपाठ निघत गेली, की मला दुपारचं जेवायलाच तीन वाजून गेले. कार्यक्रमाला जायचं, तर संध्याकाळचं स्वयंपाकघर लगेच खुणावायला लागलं आणि जाण्याचा बेत मी जवळपास रद्दच करून टाकला. पण तरी एखादा कार्यक्रम घडायचा असला, की घडतोच. मी स्वतःलाच जरा दटावलं, की सकाळपासून धावपळ झाली आहे, म्हणून दिवसातली उर्वरित कामं तू बाजूला सारणार आहेस का? मग हाच कार्यक्रम का म्हणून? मुकाट्यानं कार्यक्रमाला जा. मग चरफडत रात्रीची पोळी-भाजी केली आणि गेले मुकाट्यानं कार्यक्रमाला.

निघायला उशीर, ट्रॅफिक, कार्यक्रमाचं ठिकाण घरापासून जरा लांबवरचं यामुळे मी पोहोचेपर्यंत कार्यक्रम सुरू झालेला होता. बसायला मनासारखी खुर्ची शोधेपर्यंत उमा कुलकर्णींच्या हातात माईक आलेला होता. म्हणजे प्रस्तावना, स्वागत, परिचय हे सर्व होऊन गेलेलं होतं. तसा वाचक म्हणून मला उमा कुलकर्णींचा परिचय नाही असं नाही, पण मुख्य कार्यक्रमात ‘शिरायला’ या आधीच्या गोष्टी कामी येतात. तर तसं काही झालं नाही.
उमा कुलकर्णींनी माईक हातात घेताच व्यासपीठावरची इतर चार-पाच संयोजक मंडळी ताबडतोब खाली उतरून प्रेक्षकांत येऊन बसली. हे एक फार बरं झालं. पुढे जवळ-जवळ दीड तास त्यांचं बोलणं त्यामुळे अगदी मन लावून ऐकता आलं.
त्यांचं अनुवादाचं काम, ललितलेखन (‘केतकरवहिनी’) आणि टी.व्ही.मालिकांसाठी केलेलं लेखन अश्या तीन टप्प्यांत व्याख्यान विभागलेलं होतं. बाई मूळच्या बेळगावच्या. त्यामुळे कानडीशी तशी त्यांची तोंडओळख होतीच. त्यांचे पति श्री. विरुपाक्ष कुलकर्णी हे अस्सल कानडी. लग्नानंतर कामानिमित्त त्यांचं वास्तव्य पुण्यात होतं. सुरूवातीच्या काळात त्यांचं आपांपसांतलं संभाषण मराठी-कानडी असंच चाले. त्यातही मराठीचा टक्का अंमळ अधिक होता. एकदा विरुपाक्ष यांनी त्यांना अगदी कळकळीनं विनंती केली, की मला कामाच्या ठिकाणी हिंदी-इंग्लिश-मराठीच बोलावं लागतं, तर घरी आल्यावर तरी मातृभाषेतून थोडं बोलायला मिळावं असं मला वाटलं, तर त्यात काही गैर आहे का? तू पुण्यात राहतेस, शेजार-पाजार्‍यांशी मराठी बोलतेस, मराठी पुस्तकं वाचतेस, मग माझ्याशी थोडं कानडीतून बोलायला काय हरकत आहे? आणि अश्या तर्‍हेनं बाईंच्या दैनंदिन जीवनात कानडीचा खर्‍या अर्थानं प्रवेश झाला. तेव्हाच्या या सगळ्या आठवणी बाईंनी हलक्याफुलक्या स्वरूपात आणि अगदी रंगवून सांगितल्या.
संभाषणात कानडीचा शिरकाव झाला, तरी त्यांना कानडी लिहायला-वाचायला येत नव्हतंच. पुढे १९७७ साली शिवराम कारंथ यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. विरुपाक्ष यांनाही वाचनाची आवड होतीच. साहजिकच घरात कारंथांविषयी, त्यांच्या लेखनाविषयी चर्चा झाली. ती ज्ञानपीठविजेती कादंबरी नक्की आहे तरी काय हे जाणून घेण्याची इच्छा बाईंनी व्यक्त केली. त्यावर विरुपाक्ष यांनी काय करावं? त्यांनी दररोज संध्याकाळी बाईंना ती कादंबरी थोडी-थोडी वाचून दाखवायला सुरूवात केली. ते ऐकता-ऐकता त्या जवळच्या वहीत त्याबद्दल मराठीत टिपणं काढायला लागल्या. असं करता करता कादंबरीचं वाचन पूर्ण होईस्तोवर त्यांच्याजवळ कादंबरीचा मराठीतला जवळपास अनुवाद, टिपणं, नोंदी असं भरपूर काही जमा झालं. पण त्यांनी ते स्वतःजवळ, स्वतःपुरतंच ठेवलं होतं. त्या कानडी कादंबरीचा नंतर मराठीत अधिकृत अनुवाद प्रकाशित झाला. त्यांनी लगेच तो मिळवून वाचला. ते वाचताना त्यांना जाणवलं, की आपणही हेच सगळं आणि असंच केलेलं होतं. तेव्हा प्रथमच रीतसर परवानगी वगैरे घेऊन कारंथांच्या लेखनाचा मराठीत अनुवाद करण्याचा विचार त्यांच्या मनात आला.

त्यांनी सांगितलेली त्यांची आजवरची अनुवादाची पध्दत म्हणजे माझ्यासाठी मोठा आश्चर्याचा धक्का होता. आजही विरुपाक्ष कानडी कादंबरीचं वाचन करतात, त्याचं रेकॉर्डिंग करतात आणि ते परत-परत ऐकून बाई त्याचा मराठीत अनुवाद करतात. (यावरून बाईंना अजूनही कानडी लिहायला आणि वाचायला येत नसावं असा निष्कर्ष मी स्वतःपुरता काढला.) बहुतेक अनुवादित कादंबर्‍यांचं त्यांनी दोन-दोनदा, तीन-तीनदा लेखन केलेलं आहे. ‘पर्व’ कादंबरीचा त्यांनी या संदर्भात विशेष उल्लेख केला. त्यांनी मराठीत अनुवादित केलेला मजकूर दरवेळी डॉ. द. दि. पुंडे आणि सौ. पुंडे हे दोघंजण बारकाईनं वाचून त्यात काही सुधारणा हव्या असतील तर सुचवतात. त्या दोघांचाही त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला.
अनुवादाच्या कामादरम्यान शिवराम कारंथ आणि नंतर एस. एल. भैरप्पा यांच्याशी त्यांचे अगदी जिव्हाळ्याचे संबंध प्रस्थापित झाले. त्या दोन व्यक्तिमत्त्वांचा त्यांच्यावर काय आणि कसा प्रभाव पडला, त्यांच्या विचारसरणीत कसे बदल घडले याबद्दल त्या अगदी भरभरून बोलल्या. आळंदीच्या साहित्यसंमेलनाच्या वेळी कारंथ पुण्यात त्यांच्याकडेच उतरले होते. संमेलनाचं उद्‌घाटन लता मंगेशकर यांच्या हस्ते होणार होतं. त्यावरची त्यांनी सांगितलेली कारंथांची मार्मिक टिप्पणी श्रोत्यांमध्ये खसखस पिकवून गेली.
पण प्रत्यक्ष अनुवादाच्या प्रक्रियेबद्दल त्यांच्याकडून काहीतरी मूलभूत आणि ठोस ऐकायला मिळेल ही माझी अपेक्षा तशी जराशी फोलच ठरली. व्याख्यानादरम्यान या मुद्द्याला केवळ स्पर्श करूनच त्या थांबल्या असं मला वाटलं. (अर्थात, संयोजकांकडून त्यांना काय-काय सांगण्यात आलं होतं हे देखील महत्त्वाचं आहेच.) एका भारतीय भाषेतून अन्य भारतीय भाषेत अनुवाद करताना मुख्य प्रश्न उद्‌भवतो, तो दोन्ही भाषांमधले एकसारखे पण निरनिराळे अर्थ असलेले संस्कृत/संस्कृतोद्भव शब्द समोर येतात तेव्हा. आपल्या डोक्यात त्यांपैकी एक अर्थ इतका पक्का बसलेला असतो, की त्याला निपटून काढून तिथे दुसर्‍या अर्थाला स्थानापन्न करणं कधीकधी फार अवघड जातं, असं त्यांनी सांगितलं. त्यासंबंधीचे दोन-तीन किस्से, एक-दोन उदाहरणं त्यांनी दिली, ती अगदी रंजक होती.

व्याख्यानाचा बहुतांश भाग अनुवादाशी संबंधित अश्या मुद्द्यांनीच व्यापलेला होता. तुलनेनं ‘केतरकरवहिनी’ आणि मराठी मालिका यांबद्दल त्या थोडक्यात बोलल्या. मराठी मालिका करण्यापूर्वी त्यांनी आकाशवाणीसाठी लेखन केलेलं होतं. त्या आधारावरच त्यांना हे दूरचित्रवाणीचं काम मिळालं होतं. त्यांनी उल्लेख केलेल्या मालिकांपैकी एकही मी पाहिलेली नाही. त्यामुळे ती नावं माझ्या लक्षात नाहीत. पण त्यांपैकी दोन अश्या होत्या, की ज्या सुरूवातीला कसदारपणे सुरू झाल्या, पण नंतर भरकटल्यामुळे त्यांनी त्यांचं काम अर्ध्यावरच सोडून दिलं. पण त्याबद्दल कुठलाही कडवटपणा न ठेवता त्यांनी सांगितलं.

बाई बोलताना सतत वेळेचं भान ठेवून होत्या. त्यामुळे त्यांचं बोलणं कुठेही पाल्हाळिक झालं नाही, रटाळ वाटलं नाही, की वाहवत गेल्यासारखंही वाटलं नाही आणि व्याख्यान संपल्यावर एक छान काहीतरी अनुभव घेतल्याच्या भावनेनं मी तिथून निघाले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उमा कुलकर्णींच्या व्याख्यानाचा छोटेखानी आढावा छान घेतला आहेस Happy

>>(यावरून बाईंना अजूनही कानडी लिहायला आणि वाचायला येत नसावं असा निष्कर्ष मी स्वतःपुरता काढला.)<< गंमत आहे .

अजुन थोडं अधिक वाचायला आवडेल. Happy

त्या कानडी कादंबरीचा नंतर मराठीत अधिकृत अनुवाद प्रकाशित झाला. त्यांनी लगेच तो मिळवून वाचला. ते वाचताना त्यांना जाणवलं, की आपणही हेच सगळं आणि असंच केलेलं होतं. तेव्हा प्रथमच रीतसर परवानगी वगैरे घेऊन कारंथांच्या लेखनाचा मराठीत अनुवाद करण्याचा विचार त्यांच्या मनात आला.>>>>>>>>>>

म्हणजे एकाच कादंबरीचा दोनदा अनुवाद, की वेगळ्या साहित्याचा?

छान लिहिलं आहेस Happy
पण मला कधीच उमा कुलकर्णींचे अनुवाद आवडले नाहीत. सतत अपुरे वाटतात आणि काहीतरी महत्वाचं हातातून निसटतं आहे असं वाटत रहातं.. प्रत्येक भाषेचा एक लहेजा असतो, तो अनुवादकर्त्याला धरता आला पाहिजे असं मला वाटतं. बाईंच्या अनुवादात ते कायमच 'मिसिंग' वाटतं. मला कानडी येत नसल्याने नक्की काय खटकतं आहे हे सांगता येत नाही पण ते तसं वाटतं खरं!

मीही असंच ऐकलं/वाचलं आहे की त्यांना कानडी फक्त बोलता येते. सुरुवातीला कानडी वाचता-लिहिता येत नव्हतं ते मी समजू शकते. पण कानडी-मराठी अनुवाद करायचे/करत रहायचे असा निर्णय घेतल्यावर किंवा एकापेक्षा जास्त अनुवाद आपण करतो आहोत ते बघितल्यावरही बाईंना असं वाटलं नाही का की आपण भाषा लिहा-वाचायला शिकावी म्हणून? आपल्या व्यावसायिक कामाबद्दल इतकं कॅज्युअल कसं राहू शकतं कोणी?

छान लेख ललिता, जमले तर अधिक विस्तारवशील का ?
अलीकडेच बाईंनी केलेला भैरप्पा यांच्या 'मंद्र'चा अनुवाद वाचला होता.प्रभावित झाले.कर्नाटक महाराष्ट्र सीमेवर दोन्ही भाषांशी सोयरीक असलेली अशी रसिक व्यक्तिमत्वे आहेत म्हणून हा वाचनानंद आमच्यापर्यंत पोचतो आहे..

अगदी हेच इथे नागपुरला महिला साहित्य संमेलनात बोलल्या. मलाही खूप आवडलं. सुनंदा अमरापूरकरही आल्या होत्या त्या कोणत्याच लेखकाला भेटल्या नाहीत तर उमा सगळ्यांच लेखकांना भेटल्या आहेत. पुर्वी विरुपक्ष दोन - दोन पानं वाचायचे मग त्या अनुवाद करायच्या आता व्हॉईस रेकॉर्डर्मुळे सोय झाली. <<<<सुरूवातीच्या काळात त्यांचं आपांपसांतलं संभाषण मराठी-कानडी असंच चाले. त्यातही मराठीचा टक्का अंमळ अधिक होता. एकदा विरुपाक्ष यांनी त्यांना अगदी कळकळीनं विनंती केली, की मला कामाच्या ठिकाणी हिंदी-इंग्लिश-मराठीच बोलावं लागतं, तर घरी आल्यावर तरी मातृभाषेतून थोडं बोलायला मिळावं असं मला वाटलं, तर त्यात काही गैर आहे का? तू पुण्यात राहतेस, शेजार-पाजार्‍यांशी मराठी बोलतेस, मराठी पुस्तकं वाचतेस, मग माझ्याशी थोडं कानडीतून बोलायला काय हरकत आहे?>>>>
बेळ्गाव प्रश्न अजून सुटला नाही पण सामंजस्याने त्यांनी भाषेचा मराठी - कानडी सोडवला असं गंमतीने म्हणाल्या.:)

शैलजा,
कुणीतरी लिहिलेलं गीत, अन्य कुणीतरी दिलेलं संगीत आणि ते देवानं दिलेल्या आवाजात या बाई गातात, तर मग त्यांचा साहित्याशी आणि संमेलनाशी काय संबंध? - असा कारंथांनी प्रश्न विचारला.

विजय देशमुख, त्याच कादंबरीचा दोनदा अनुवाद नव्हे, कारंथांच्या अन्य कादंबर्‍यांचा अनुवाद.

वरदा, अगदी! कानडी भाषा लिहिता-वाचता न येण्याबद्दल मलाही अगदी असंच वाटलं! शिवाय असंही वाटलं, की त्यांची अनुवादाची अशी पध्दत असेल, तर मग अनुवादक म्हणून सगळीकडे विरुपाक्ष यांचंही नाव टाकलं गेलं पाहिजे. कारण अनुवादाची पहिली पायरी तर त्यांच्यामुळेच पार पाडली जातेय... Uhoh

देवधर्म कर्मकांडावरही त्या बोलल्या का? नक्की आठवत नाही कारंथांशी की अजून कोणाशी झालेल्या चर्चेमुळे मी त्याकडे आता मी तटस्थपणे पाहाते.

ब्लॉगवर वाचला होता लेख पण कमेंट द्यायची राहून गेली. छान लिहिलं आहेस.

पण मला कधीच उमा कुलकर्णींचे अनुवाद आवडले नाहीत. सतत अपुरे वाटतात आणि काहीतरी महत्वाचं हातातून निसटतं आहे असं वाटत रहातं >>> +१

गिरिश कर्नाडांच्या आत्मकथेचा ( खेळता खेळता आयुष्य ) त्यांनी अनुवाद केला आहे. झक्क जमला आहे तो. ( मूळ पुस्तकच अपेक्षाभंग करणारे आहे )

बाईंच्या अनुवादात ते कायमच 'मिसिंग' वाटतं. मला कानडी येत नसल्याने नक्की काय खटकतं आहे हे सांगता येत नाही पण ते तसं वाटतं खरं!<<< बिंगो. मी शेजारच्या मुलीच्या आणी कामवालीच्या मदतीने जेव्हा कानडी पर्व वाचली तेव्हा हे प्रचंड प्रमाणात जाणवलं होतं. मुळात सरधोपट अनुवाद केलेला असतो, त्यामधे भाषा "समजल्याचा" जाणवल्याचा पंच कधीच नसतो.

'पर्व' ही मी वाचलेली उमा कुलकर्णींची एकमेव अनुवादित कादंबरी. त्यामुळे त्यांच्या अनुवादाबद्दल मी फार काही बोलू शकणार नाही.
पण अनुवाद जर सरधोपट वाटला, तर त्यामागे संबंधित संपादकांचाही बरोबरीनं हात/सहभाग/वाटा असतो इतकं नक्की म्हणू शकते. Wink

मी उमा कुलकर्णींनी अनुवादीत केलेल्यांमधली पर्व, सार्थ आणि जा ओलांडूनी ही सर्व भैराप्पांचीची पुस्तके वाचली आहेत.
मुळात कानडीचा गंध नसल्याने आपण काही मिस करतोय असे काय जाणवले नाही. जसे इंग्रजी पुस्तकांचा अनुवाद वाचताना वाटते. मुळात भैराप्पांची शैलीच इतकी जबरदस्त आहे की या गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते.
पर्व मध्ये युद्ध ज्यावेळी निकराला पोहचलेले असते तेव्हाचा एक परिच्छेद आहे ज्यावेळी संजय मरून पडलेल्या योदध्यांचे, रथांचे, घोड्यांचे, ओल्या लगामांचे आणि त्यातून फिरणार्या गिधाडांचे वर्णन करतो ते तर इतके चपखल जमले आहे की तो अनुवाद वाटतच नाही.
त्यांनीच लिहील्याप्रमाणे टपटप गारांचा पाऊस थांबल्यानंतर जी विषण्ण शांतता येते ती वाचताना पण अनुभवायला येते.

पण त्यांना कानडी लिहीता येत नाही ही गोष्ट धक्कादायक आहे. जर त्यांनी सांगितल्याप्रमाणे विरुपाक्ष त्यांना भाषांतर करून सांगत असतील तर मग खरेच त्यांचे सहअनुवादक म्हणून नाव यायला पाहीजे.