श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ८ - तरी जयाचे चोखटे मानसी....

Submitted by पुरंदरे शशांक on 25 December, 2013 - 02:31

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ८ - तरी जयाचे चोखटे मानसी....

अध्याय नववा - राजविद्याराजगुह्ययोगः

ज्ञानेश्वरीत नवव्या अध्यायाला विशेष महत्व आहे. स्वतः माऊलींनीच त्याचे गुणगान गायले आहे. असे म्हणतात की जेव्हा माऊलींनी संजीवन समाधी घेतली तेव्हा नवव्या अध्याय म्हणत म्हणतच ते त्या पायर्‍या उतरत होते - इतका हा अध्याय त्यांच्या आवडीचा होता.

दहाव्या अध्यायाच्या सुरुवातीला या नवव्या अध्यायाचे महात्म्य सांगणार्‍या या गोड ओव्या पहा -

तिये आघवांचि जें महाभारतीं | तें लाभे कृष्णार्जुनवाचोक्तीं | आणि जो अभिप्रावो सातेंशतीं | तो एकलाचि नवमीं ||३१|| ( कृष्णार्जुनवाचोक्तीं=कृष्णार्जुन संवाद; सातेशती = गीतेचे सातशे श्लोक आहेत त्याला उद्देशून; नवमी=नववा अध्याय)
अवघ्या महाभारतात जे काही तत्वज्ञान सांगण्यात आलेले आहे ते कृष्णार्जुन संवादाच्यारुपाने या सातशे श्लोकात (भगवद्गीतेच्या) समाविष्ट झाले आहे ते सारेच्या सारे तत्वज्ञान या एकट्या अध्यायात (नवव्या) एकत्र केले गेले - इतके या नवव्याचे महात्म्य ...

म्हणौनि नवमींचिया अभिप्राया | सहसा मुद्रा लावावया | बिहाला मग मी वायां | गर्व कां करूं ? ||३२||
म्हणोनि त्यांतील । अभिप्राय नीट । सर्वथा प्रकट । करावया ॥७०॥
कृपेविण मज । नाहीं झालें धैर्य । मी तों वायां काय । गर्व करूं ॥७१॥ (अभंग ज्ञानेश्वरी)

हें ऐसें अध्याय गीतेचे | परि अनिर्वाच्यपण नवमाचें | तो अनुवादलों हें तुमचें | सामर्थ्य प्रभू ||३५||
असे हे गीतेचे अध्याय पण नववा अध्यायाचे काय महात्म्य सांगावे... ते केवळ शब्दातीत आहे - त्या अध्यायावर मी काही निरुपण केले हे केवळ तुमचे सामर्थ्य आहे गुरुराजा...

अनुर्वाच्यपण नवमींचे असे जे त्यांनी म्हटले आहे त्या अध्यायातील हा तेरावा श्लोक. दैवी प्रकृतीचा आश्रय केलेले महात्मे मला कसे भजतात हे भगवान सांगत आहेत.

महात्मानस्तु मां पार्थ दैवीं प्रकृतीमाश्रिताः | भजन्त्यनन्यमनसो ज्ञात्वा भूतादिमव्ययम् ||१३||
(दैवी संपत्ति जोडूनि महात्मे भजती मज । अनन्य-भावे जाणूनि मी विश्वारंभ शाश्वत ॥ १३ ॥ -गीताई)

इथे महात्मे या शब्दावर माऊलींचे जे अप्रतिम निरुपण आहे ते असे .........
तरी जयाचे चोखटे मानसीं | मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी | जया निजेलियातें उपासी | वैराग्य गा ||१८८||
(क्षेत्रसंन्यासी =एकाच क्षेत्रात आयुष्यभर रहाणारे संन्यासी)
या महात्म्यांचे मन इतके चोख (निर्मळ, पवित्र) आहे की तिथे मी क्षेत्रसंन्यासी होऊन रहातो. या महात्म्यांचे वैराग्य एवढे थोर आहे की हे महात्मे झोपलेले असतानाही ते त्यांना सोडून जात नाही. (हे महात्मे अखंड वैराग्यशील असतात - सर्व दृष्य, अदृष्य पदार्थांविषयी ते अतिशय विरक्त असतात - कारण एक ब्रह्मच आनंदरुप असून इतर कुठल्याही गोष्टी पासून हा आनंद मिळत नाही हे त्यांच्या अनुभवाला पूर्णपणे आलेले असते.)

जयाचिया आस्थेचिया सद्भावा | आंतु धर्म करी राणिवा | जयाचें मन ओलावा | विवेकासी ||१८९||
सद्भावाविषयी या महात्म्यांच्या ठिकाणी असणारी आस्था पाहिली की जणू येथे धर्मच राज्य करतोय असे वाटावे. यांच्या मनाला जी ओल आहे ती विवेकाचीच.
सद्भाव आणि विवेक हे संतांचे विशेष गुण माऊलींनी येथे अधोरेखीत केलेत. सत् म्हणजेच परमात्म्याची सतत जाणीव व विवेकयुक्त वर्तन यामुळेच त्यांना महात्मा म्हणायचे.

जे ज्ञानगंगे नाहाले | पूर्णता जेऊनि धाले | जे शांतीसी आले | पालव नवे ||१९०||
ज्यांच्या ठिकाणी ज्ञान भरभरुन असते (जे ज्ञानरुपच असतात), जे कायमच पूर्णतृप्त असतात आणि त्यांच्याकडे पाहिले असता शांतिला जणू नवी पालवी फुटली आहे असे वाटावे.
(ज्ञान, पूर्णतृप्तता आणि शांती हे या महात्म्यांचे अजून विशेष गुण. इथे ज्ञान म्हणजे आत्मज्ञान)

जे परिणामा निघाले कोंभ | जे धैर्यमंडपाचे स्तंभ | जे आनंदसमुद्रीं कुंभ | चुबकळोनि भरिले ||१९१||
हे महात्मे म्हणजे जणू ब्रह्माला आलेले कोवळे कोंबच, हे जणू धैर्यरुपी मंडपाचे खांब, हे म्हणजे जणू आनंदसागरातले कुंभच.
(यांच्या रुपाने ब्रह्म जणू साकार झाले आहे. हे मूर्तिमंत धैर्य. -साधकांना ज्याची विशेष गरज असते ते जे धैर्य - ते ज्यांच्याकडे पाहूनही कळते इतके ते धैर्यशील असतात. आनंद त्यांच्या आंत-बाहेर भरुन असतो.)

जया भक्तीची येतुली प्राप्ती | जे कैवल्यातें परौतें सर म्हणती | जयांचिये लीलेमाजीं नीति | जियाली दिसे ||१९२||
भक्ति यांच्या ठिकाणी इतकी भरुन असते की जे त्यापुढे मोक्षालाही तुच्छ लेखतात. यांचे सहज वर्तन हे म्हणजे जिवंत नीतीच असते.

जे आघवांचि करणीं | लेईले शांतीचीं लेणीं | जयांचें चित्त गवसणी | व्यापका मज ||१९३||
यांच्या सर्व कर्मात एक शांतीच भरुन असते - जणू यांनी शांतीरुप अलंकारच परीधान केले आहेत. यांचे चित्त माझ्याठिकाणी कायमच रत असल्याने ते जणू मला गवसणी घातल्यासारखे व्यापक आहे.

ऐसें जे महानुभाव | दैविये प्रकृतीचें दैव | जे जाणोनियां सर्व | स्वरूप माझें ||१९४||
असे जे हे महानुभाव हे दैवी प्रकृतीचे भाग्यच कारण यांनीच माझे स्वरुप जाणले आहे.

मग वाढतेनि प्रेमें | मातें भजती जे महात्मे | परि दुजेपण मनोधर्में | शिवतलें नाहीं ||१९५||
असे हे महात्मे मला चढत्या-वाढत्या प्रेमाने भजतच असतात, यांच्या मनाला द्वैत (दुजेपण) स्पर्शही करु शकत नाही - हे माझ्याशी एकरुप होऊन मला भजतात (शिवो भूत्वा शिवं यजेत)

आता या सगळ्या ओव्या परत नीट चालीत वाचूयात .... म्हणजे यातली खरी गोडी लक्षात येईल ....

तरी जयाचे चोखटे मानसीं | मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी | जया निजेलियातें उपासी | वैराग्य गा ||१८८||
जयाचिया आस्थेचिया सद्भावा | आंतु धर्म करी राणिवा | जयाचें मन ओलावा | विवेकासी ||१८९||
जे ज्ञानगंगे नाहाले | पूर्णता जेऊनि धाले | जे शांतीसी आले | पालव नवे ||१९०||
जे परिणामा निघाले कोंभ | जे धैर्यमंडपाचे स्तंभ | जे आनंदसमुद्रीं कुंभ | चुबकळोनि भरिले ||१९१||
जया भक्तीची येतुली प्राप्ती | जे कैवल्यातें परौतें सर म्हणती | जयांचिये लीलेमाजीं नीति | जियाली दिसे ||१९२||
जे आघवांचि करणीं | लेईले शांतीचीं लेणीं | जयांचें चित्त गवसणी | व्यापका मज ||१९३||
ऐसें जे महानुभाव | दैविये प्रकृतीचें दैव | जे जाणोनियां सर्व | स्वरूप माझें ||१९४||
मग वाढतेनि प्रेमें | मातें भजती जे महात्मे | परि दुजेपण मनोधर्में | शिवतलें नाहीं ||१९५||

हे असे वर्णन करणे, त्या सुरेख पद्धतीने उपमा वापरणे - हे केवळ माऊलीच करु जाणे - दुसर्‍या कोणी या महात्म्यांचे वर्णन - निर्मळ मनाचे, वैराग्यशील, विवेकी, ज्ञानी, शांतीरुप असे साधे शब्द वापरुन केले असते तर ते आपल्या वाणीत, चित्तात इतके ठसले नसते जितके माऊलींनी ते मधु-मधुतर करुन ठेवले आहे....

एखादी व्यक्ती भगवंताशी इतकी कशी एकरुप होऊन राहील असा आपल्या सारख्या सामान्य माणसांना प्रश्न पडेल त्यामुळे एक उदाहरण देतो ज्यामुळे हे कळायला सोपे जाईल.
खूप वर्षांपूर्वी एकदा (भारतरत्न) भीमसेन जोशी एका सांगितिक मैफिलीसाठी मुंबईहून कलकत्याला रेल्वेने निघाले होते. त्यांनी रेल्वेच्या बोगीत पाऊल ठेवले तर समोरच प्रख्यात गायक उ. बडे गुलाम अलि खाँ साहेब त्यांच्या सहकार्‍यांसोबत बसलेले. भीमसेनजी अतिशय खूष झाले - कारण त्याकाळी तो प्रवास जवळजवळ अडीच-तीन दिवसांचा. इतका मोठा काळ खाँ साहेबांचा सहवास मिळणार ही पंडितजींच्या दृष्टीने एक पर्वणीच..
हे सर्व भीमसेनजींनीच लिहून ठेवले आहे.. तर ते पुढे लिहितात - गाडीत बसल्यावर खाँ साहेबांच्या तंबोर्‍याची गवसणी जी निघाली ती पार कलकत्ता स्टेशन येईपर्यंत... खाँ साहेब सतत गाण्यात मश्गूल होते - अधून मधून खाणे-पिणे, बाजूच्या मंडळींशी गप्पा चालू होत्या -पण खाँ साहेबांचा मुख्य भाग होता संगीत - ते जणू त्यांच्या श्वासाश्वासात भरुन राहिल्यासारखे प्रगट होत होते - ते कायमच संगीतात बुडालेले होते - खाणे-पिणे-गप्पा याकरता तेवढ्यापुरते त्यातून ते बाहेर आल्यासारखे वाटायचे पण मधूनच एखादी तान, मींड अशी घेत होते की कोणाच्याही सहज लक्षात यावे की संगीताने यांना आंत-बाहेर व्यापून टाकले आहे.....
आता आपल्या लक्षात येईल की कोणत्याही महात्म्याबाबत नेमके असेच असते - परमेश्वराच्या ओढीने, त्याच्या अस्तित्वाने त्या महापुरुषाला आत-बाहेर व्यापून टाकलेले असते - त्यामुळे तो आपल्या सारखे जरी व्यवहार करताना दिसला तरी, आत परमेश्वराच्या अखंड अनुसंधानातच तो असतो -आणि मग सहाजिकच ती शांती, ते वैराग्य, तो आनंद, ते नीतीयुक्त आचरण असे सगळे दैवी गुण त्याच्या ठायी सहज प्रकट झालेले दिसतात.
अशा महात्म्याचे - "तोही नेत्री पाहे | श्रवणी ऐकतु आहे | परी तेथीचा नोहे | नवल देखे ||" असे नेमके वर्णन माउलींनी ज्ञानेश्वरीतच केलेले आहे.....

आता कधी महात्मा असा शब्द जरी आपल्या कानावर आला, वाचनात आला तर हे सगळे, सगळे वर्णन पुन्हा पुन्हा आपल्याला आठवत राहील ते माऊलींच्या अद्वितीय, रसाळ भाषेमुळेच....
...... .. तरी जयाचे चोखटे मानसीं | मी होऊनि असें क्षेत्रसंन्यासी | जया निजेलियातें उपासी | वैराग्य गा ||१८८||
जयाचिया आस्थेचिया सद्भावा | आंतु धर्म करी राणिवा | जयाचें मन ओलावा | विवेकासी.....
...

ही ती ज्ञानेश्वरीची करामत ..... हे ते माउलींचे न संपणारे देणे .....

हरि ॐ तत् सत् ||

-----------------------------------------------------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/46338 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग १

http://www.maayboli.com/node/46384 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग २

http://www.maayboli.com/node/46475 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ३

http://www.maayboli.com/node/46591 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ४

http://www.maayboli.com/node/46666 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ५

http://www.maayboli.com/node/46874 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ६

http://www.maayboli.com/node/46911 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ७
--------------------------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -

१] http://abhangdnyaneshwari.org/

२] http://sanskritdocuments.org/marathi/

३] http://www.gharogharidnyaneshwari.com/

-------------------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

अतिशय सुंदर.

गितेतच एक श्लोक आहे: शनै शनै रुपरमेद बुद्ध्या धृती गृहितया...

माझ्यासारख्या सामान्यांचे मन कायम अस्थिर असते. कोणतिही साधना घेतली तरी मन चंचलच असते. ते साधना सोडून सतत भरकटत असते. त्यावर भगवान धीर देऊन म्हणतात 'काही काळजी करू नकोस. तू फक्त एकच काम करायचे - भरकटलेले मन अलगद (जोर-जबरदस्तीने नाही) पकडून त्याला परत योग्य मार्गावर आणायचे'

सामान्यांना हे सतत जाणीवपूर्वक करावे लागते. हे जागेपणीच शक्य असते. झोपल्यावर विवेकाचा लगाम सुटतो आणि मन षट्रिपूंच्या आधीन होते. कारण शेवटी आपण प्रकृतीत जगत असतो आणि इथे त्यांचीच सत्ता असते.

पण हे महाभाग इतके एकचित्त असतात की ते झोपलेले असतानाही षट्रिपूंना त्यांच्यावर मात करता येत नाही. त्यांच्या मनात सतत धर्माचेच राज्य असते आणि प्रकृतीत राहूनही ते परमेश्वराचे स्वरूप जाणू शकतात. प्रकृती, जी जीवांना परमेश्वरापासून दूर ठेवणारी म्हणूण हिणवली जाते, तिच्यासाठी हे महाभाग तिचे दैव उजळवणारे ठरतात. कारण ते इतरांना दाखवून देतात की प्रकृती वाईट नाही. तिच्यात राहूनही इश्वरप्राप्ती करता येते.

_/\_ _/\_

खुप सुरेख विवेचन केलय शशांकदा. आवडलेच.
नवव्या अध्यायातल्या खालील ओळी प्रकर्षाने आठवल्या.

पाहें पां दूध पवित्र आणि गोड । पासीं त्वचेचिया पदराआड ।
परि तें अव्हेरुनि गोचिड । अशुद्ध काय नेघती ॥

कां कमलकंदा आणि दर्दुरीं । नांदणुक एकेचि घरीं ।
परि परागु सेविजे भ्रमरीं । जवळिलां चिखलुचि उरे ॥

नातरी निदैवाचां परिवरीं । लोह्या रुतलिया आहाति सहस्त्रवरीं ।
परि तेथ बैसोनि उपवासु करी । कां दरिद्रें जिये ॥