श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ५

Submitted by पुरंदरे शशांक on 5 December, 2013 - 00:18

श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास - भाग ५

म्हणौनि सद्भाव जीवगत | बाहेरी दिसती फाकत | स्फटिकगृहींचे डोलत | दीपु जैसे ||४७६ अ. १३||

अमानित्वमदम्भित्वमहिंसा क्षान्तिरार्जवम् |
आचार्योपासनं शौचं स्थैर्यमात्मविनिग्रहः ||अ. १३-७ ||

नम्रता दंभ-शून्यत्व अहिंसा ऋजुता क्षमा । पावित्र्य गुरू-शुश्रूषा स्थिरता आत्म-संयम ॥ गीताई ॥

हा तेराव्या अध्यायातील सातवा श्लोक. ज्ञानाची लक्षणे सांगणारा. आत्मज्ञान झाल्याचे सर्वसामान्यांना समजायचे कसे ? ज्ञान झाले म्हणजे नुसते ज्ञानाची बडबड करतोय, वागणुकीत काहीही नाहीये अशी गोष्ट नाहीये. जर ज्ञान झाले असे असेल तर ती लक्षणे दिसली पाहिजेत ना इतरांना ? नाहीतर दिव्याखाली अंधार असे व्हायचे.

तेव्हा शौच म्हणजे शुचित्व यावर विवरण करत असताना माऊली लिहितात - म्हणौनि सद्भाव जीवगत | बाहेरी दिसती फाकत | स्फटिकगृहींचे डोलत | दीपु जैसे || या अशा ओव्या माऊलीच लिहू जाणे.... काय सुरेख वर्णन केले आहे पहा ना - एखाद्या कंदीलाची काच इतकी स्वच्छ केलेली असावी की तो आत लागलेल्या ज्योतीचा प्रकाश जसाच्या तसा बाहेर यावा - त्यात काहीही बदल न करता - जसाच्या तसा...
अंतरात सद्भाव आहे, ज्ञान झालेले आहे हे इंद्रियव्यापारद्वारा बाहेर असे प्रकट होताहेत की मुद्दाम कोणाला सांगायची काही गरज नाही - ते कोणाही तिर्‍हाईतालाही सहज जाणवताहेत. यात अंतरात ज्ञान होणे व बाहेरचा प्रकृतीस्वभावही त्या ज्ञानाला परस्परसंयोगी असे लोकविलक्षण मिश्रण आहे.

स्फटिकगृहात | लाविला जो दिवा | डोलत दिसावा | बाहेरी तो ||
तैशा अंतर्यामी | उद्भवता वृत्ती | त्याचि प्रकटती | बाहेर ही || अभंग ज्ञानेश्वरी ||

या ओव्या वाचताना असे वाटते की स्वामी स्वरुपानंदांनी जे हे वर्णन केले आहे ते जणू त्यांचे स्वतःचेच आहे - आत्मज्ञानाने अंतर उजळलेल्या या महापुरुषाची बाह्य प्रकृतीही शोधित सत्वगुणी अशी असल्यामुळे हे जणू त्यांचेच तंतोतंत वर्णन. स्वामीजी हयात असताना त्यांचा कोणी एक मुंबईस्थित भक्त त्याच्या मित्राशी बोलत होता. मित्र म्हणत होता की आजकाल कुठे असे संत दिसतात - माऊलींसारखे, तुकोबांसारखे की ज्यांच्याकडे पाहिले की प्रत्यक्ष भगवंताला पाहिल्यासारखेच वाटेल ???
यावर तो स्वामीभक्त म्हणाला की तुला पाह्यचे आहेत का असे भगवतरुप संत - चल पावसला ...
पावसला जेव्हा स्वामीजींचे दर्शन त्या मित्राने घेतले तेव्हा तो म्हणालाही की अरे, खरंच भगवंतच आहेत हे..

रामकृष्ण परमहंस यांचे दर्शन घेतल्यावर केशवचंद्रसेन हे देखील म्हणाले होते की हे इतके पवित्रतम आहेत की असे वाटते की जणू ही मूर्तिमंत पवित्रता - इतकी पवित्र व्यक्ति मी आजपर्यंत पाहिली नव्हती - न जाणो या जगाच्या विचित्र रहाटणीत ही मलिन होईल - काचेच्या पेटीत बंद करुन ठेवायला पाहिजे इतके पवित्र ....

जेव्हा अंतरात ज्ञान होते तेव्हा ते सहजच अंगप्रत्यंगातून प्रकट होते - सहज आविर्भाव - मुद्दामहून दाखवलेला नाही - अशा शुचित्वाचे वर्णन करताना माऊलींच्या प्रतिभेला बहर आलेला आहे -

म्हणे शुचित्व गा ऐसें| जयापाशीं दिसे| आंग मन जैसें| कापुराचें ||४६२||
कापुर कसा आत-बाहेर शुद्धच असतो तसे ज्याचे मन व शरीर शुद्ध/ पवित्र असते तेच खरे शुचित्व.

कां रत्नाचें दळवाडें| तैसें सबाह्य चोखडें| आंत बाहेरि एकें पाडें| सूर्यु जैसा ||४६३||(सबाह्य्=आतबाहेर; चोखडे= निर्मळ; एके पाडे=एकसारखे; दळवाडे=स्वरुप)
रत्न जसे आत-बाहेर निर्मळ किंवा जसा सूर्य म्हणजे आतबाहेर केवळ प्रकाशच तसे शुचित्व.

बाहेरीं कर्में क्षाळला| भितरीं ज्ञानें उजळला| इहीं दोहीं परीं आला| पाखाळा एका ||४६४||(क्षाळला=धुणे, स्वच्छ करणे; भितरी= आत, अंतरात; पाखाळा=शुद्धता)
बाहेर उत्तम कर्मांनी शुद्ध झालाय (बाह्यशुद्धी) आणि आत ज्ञानाने उजळलाय (अंत:शुद्धी) अशा दोन्ही प्रकारे पूर्ण शुचित्वाला प्राप्त झालाय.

मृत्तिका आणि जळें| बाह्य येणें मेळें| निर्मळु होय बोलें| वेदाचेनी ||४६५||
माऊलींच्या काळात कुठले आलेत साबण नि शांपू - त्याकाळी लोक अंगाला माती लावत व मग पाण्याने स्वच्छ स्नान करीत - त्याचा दाखला देत माऊली म्हणतात - वेदोच्चार करीत अशा प्रकारे (माती आणि पाणी) स्नान करुन बाह्यशुद्धी प्राप्त केलेला ...

भलतेथ बुद्धीबळी| रजआरिसा उजळी| सौंदणी फेडी थिगळी| वस्त्रांचिया ||४६६||(बुद्धीबळी=बुद्धीच्या आधारे; रज्=धूळ; सौंदणी=परीटाकडे असणारे कपडे धुण्याचे भांडे; थिगळी=डाग)
किंवा आरसाही जसा मऊ धूळीने स्वच्छ करतात किंवा मलिन वस्त्रे जशी भट्टीत (सौंदणी) घालून स्वच्छ करतात तसा

किंबहुना इयापरी| बाह्य चोख अवधारीं| आणि ज्ञानदीपु अंतरीं| म्हणौनि शुद्ध ||४६७||
असा बाहेरुन स्वच्छ झालेला आणि अंतरात ज्ञानदीप लागलेला - असा अंतर्बाह्य शुद्ध झालेला असतो.

एऱ्हवीं तरी पंडुसुता| आंत शुद्ध नसतां| बाहेरि कर्म तो तत्त्वतां| विटंबु गा ||४६८||
नाहीतर हे अर्जुना अंतरात जर शुद्धता नसेल (ज्ञान झाले नसेल) तर बाह्य कर्मे ही केवळ विटंबनाच होईल - कशी तर -

मृत जैसा शृंगारिला| गाढव तीर्थीं न्हाणिला| कडुदुधिया माखिला| गुळें जैसा ||४६९||
मृत शरीर शृंगारले आहे, गाढवाला तीर्थाने स्नान घातले आहे, कडु दुध्याभोपळ्याला बाहेरुन गुळाने चोपडले आहे

वोस गृहीं तोरण बांधिलें| कां उपवासी अन्नें लिंपिलें| कुंकुमसेंदुर केलें| कांतहीनेनें ||४७०|| (वोस्=ओसाड; कांतहीन्=विधवा)
किंवा ओसाड घराला तोरण बांधले आहे, उपवासी माणसाच्या पोटावर बाहेरुन अन्नाचे लिंपण केले आहे, विधवा असून जिने कुंकुमतिलक लावला आहे

कळस ढिमाचे पोकळ| जळो वरील तें झळाळ| काय करूं चित्रींव फळ| आंतु शेण ||४७१||
(ढिमाचे =मुलामा; चित्रीव=कृत्रिम)
बाहेरुन सोन्याचा मुलामा केलेल्या कळसाचा पोकळ डेरा वरवर जरी किती चकचकीत दिसला तरी नुसत्या चकचकीला आग लागो! त्याकाळातही खोट्या (माती-शेणाच्या) फळांची कलाकारी करणारे असावेत - त्याचा उल्लेख केलाय की बाहेरील वरवर दिसणारा तो मुलामा, तो झळाळ आणि आत बघावे तर शेण...

तैसें कर्मवरिचिलेंकडां| न सरे थोर मोलें कुडा| नव्हे मदिरेचा घडा| पवित्र गंगे ||४७२||(न सरे= सर येत नाही, थोर मोले=मोठी किंमत असूनही; कुडा=हिणकस,वाईट गोष्ट -इथे अंतर्यामी वाईट गोष्ट)
तसे अंतर निर्मळ नसेल तर बाह्य कर्म निष्फळ आहे. हिणकस पदार्थाला कधीही मोल येत नाही वा ती खपतही नाही. दारुचा/मद्याचा घडा गंगेत नेऊन बुचकळली तरीही तो काही पवित्र होत नाही.

म्हणौनि अंतरीं ज्ञान व्हावें| मग बाह्य लाभेल स्वभावें| वरी ज्ञान कर्में संभवे| ऐसें कें जोडे ? ||४७३|| (ऐसे के जोडे=कसे शक्य आहे, असे कुठे मिळेल)
म्हणून आंत ज्ञान झाले आहे आणि बाहेरील कर्मेही सहाजिकच शुद्ध स्वरुपाची - असा हा ज्ञान आणि बाह्य शुद्ध कर्माचरण असा दुर्मिळ योग कुठे मिळेल ?

यालागी बाह्य विभागु| कर्में धुतला चांगु| आणि ज्ञानें फिटला वंगु| अंतरींचा ||४७४|| (वंगु=मळ)
म्हणून बाहेरुन कर्माने स्वच्छ झाला (उत्तम आचरणाने बाह्य शुचित्व) आहे आणि आत ज्ञानाने अंतरीचा मळ गेला आहे

तेथ अंतर बाह्य गेले| निर्मळत्व एक जाहलें| किंबहुना उरलें| शुचित्वचि ||४७५||
तेथे आतबाहेर असा भेद न रहाता एक निर्मळत्व, शुचित्वच उरले आहे.

म्हणौनि सद्भाव जीवगत| बाहेरी दिसती फांकत| जे स्फटिकगृहींचे डोलत| दीप जैसे ||४७६|| (जीवगत-अंतरीचे)

विकल्प जेणें उपजे| नाथिली विकृति निपजे| अप्रवृत्तीचीं बीजें| अंकुर घेती ||४७७||
तें आइके देखे अथवा भेटे| परी मनीं कांहींचि नुमटे| मेघरंगें न कांटे| व्योम जैसें ||४७८|| (कांटे=मळणे)
मनात विकल्प उमटतील अथवा विकृति निर्माण होईल किंवा अप्रवृत्तीची बीजे अंकुरतील असे कुठलेही विषय पाहिले, भेटले तरी याच्या मनात काहीही विकारात्मक भाव उमटत नाही (ज्ञान झाल्यामुळे किंवा निर्मळत्व प्राप्त झाल्यामुळे) जसे की आकाशात विविध रंगांचे ढग येतात पण त्याचा डागही आकाशाला लागत नाही.

एऱ्हवीं इंद्रियांचेनि मेळें| विषयांवरी तरी लोळे| परी विकाराचेनि विटाळें| लिंपिजेना ||४७९||
एरव्ही हा ज्ञानीही इंद्रियांच्यामुळे विषयोपभोग भोगताना दिसतो पण त्या विषयतल्या विकारांचा विटाळ त्याला होत नाही (कारण तो वृत्ती आत्माकार झाल्याने विषयापुरती इंद्रिये तो तो भोग घेताना दिसतात - जसे निद्रा, आहार, विहार इ.)

भेटलिया वाटेवरी| चोखी आणि माहारी| तेथ नातळें तियापरी| राहाटों जाणें ||४८०||
(चोखी=पवित्र ब्राह्मण स्त्री; माहारी=महारीण; नातळे=स्पर्श करीत नाही; रहाटो जाणे=वर्तन करणे)
एखाद्या वाटेने एखादी ब्राह्मणी (पवित्र स्त्री) गेली वा महारीण ( अपवित्र स्त्री) गेली तरी त्या वाटेच्या अंतरंगात स्पृश्यास्पृश्य भाव निर्माण होत नाही, ती वाट तर या भावापासून अलिप्तच असते.

कां पतिपुत्रांतें आलिंगी| एकचि ते तरुणांगी| तेथ पुत्रभावाच्या आंगीं| न रिगे कामु ||४८१||(कामु=कामभावना)
एकच तरुण स्त्री जी पति तसेच पुत्रालाही आलिंगन देते, पण पुत्राला आलिंगन देताना तिच्या मनात जसा कामभाव नसतो.

तैसें हृदय चोख| संकल्पविकल्पीं सनोळख| कृत्याकृत्य विशेख| फुडें जाणें ||४८२|| (सनोळख=ओळखीचे)
तसे अंतर शुद्ध झाल्यामुळे जो संकल्प-विकल्प नीट जाणतो (ओळखतो) व करण्यास योग्य व अयोग्य यातील फरकही ज्याला कळतो - कसा - तर

पाणियें हिरा न भिजे| आधणीं हरळु न शिजे| तैसी विकल्पजातें न लिंपिजे| मनोवृत्ती ||४८३|| (आधणी=उकळत्या पाण्यात; हरळु=धान्यातील बारीक खडे)
पाण्यात हिरा भिजत नाही व आधणात (उकळत्या पाण्यात) टाकलेले खडे काही शिजत नाहीत - तसा अनेक विकल्पातही ज्याची मनोवृत्ती गुंतत नाही, लिप्त होत नाही.

तया नांव शुचिपण| पार्था गा संपूर्ण| हें देखसी तेथ जाण| ज्ञान असे ||४८४||
हे अर्जुना, त्यालाच संपूर्ण शुचित्व म्हणतात व जिथे ही लक्षणे दिसतात तिथेच ज्ञान असते. (त्यालाच ज्ञान झाले असे समज)

संतांचे जीवन हे असे आंत-बाहेर निर्मळ असते. त्यात पारदर्शीपणा असतो. जसे तुकोबांनी म्हटलंय -
चंदनाचे हात पायही चंदन | परिसा नाही हीन कोणी अंग |
दीपा नाही पोटी अंधकार | सर्वांगी साखर अवघी गोड |
तुका म्हणे तैसा सज्जनापासोन | पाहता अवगुण मिळेचिना ||

शुचित्व, शुद्धता, पवित्रता हे ज्ञानाच्या प्रमुख लक्षणांपैकी एक. भगवंतांनी नुसते "शौच" एवढेच सांगितले असताना त्या शब्दाला, त्या पदाला माऊलींनी जो एक वेगळाच, अतिशय उंचीवरचा आयाम दिलाय - अंतर्बाह्य शुचिता - जो वरील ओव्यामधे स्पष्ट झालाय ते माऊलींच्या प्रतिभेचे वेगळेपण. असेच माऊलींचे विविध पैलू आपण अभ्यासण्याचा प्रयत्न करुयात.
|| हरि ॐ तत् सत् ||

------------------------------------------------------------------------------------------------
http://www.maayboli.com/node/46338 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग १

http://www.maayboli.com/node/46384 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग २

http://www.maayboli.com/node/46475 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ३

http://www.maayboli.com/node/46591 श्री ज्ञानेश्वरीचा अभ्यास -भाग ४
-----------------------------------------------------------------------------------------------
संदर्भ -

१] http://www.khapre.org/portal/url/mr/sahitya/abhang/svarup/

२] http://sanskritdocuments.org/marathi/

३] http://www.gharogharidnyaneshwari.com/

४] सार्थ श्रीज्ञानेश्वरी - श्रीगुरु साखरे महाराज सांप्रदायिक

-------------------------------------------------------------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचला हा भाग, तुम्ही छान निरुपण करता त्यामुळे समजायला सोपे जाते आणि वाचनाची गोडी वाढते.