“ पुणे ते पानिपत ” भाग १३: गोठवणारी थंडी, दाट धुकं आणि चहा

Submitted by सारन्ग on 28 October, 2013 - 20:07

“ पुणे ते पानिपत ” भाग १ - http://www.maayboli.com/node/35449

“ पुणे ते पानिपत ” भाग २ - http://www.maayboli.com/node/35521

“ पुणे ते पानिपत ” भाग ३ - http://www.maayboli.com/node/35727

“ पुणे ते पानिपत ” भाग ४ - http://www.maayboli.com/node/35805

“ पुणे ते पानिपत ” भाग ५ - http://www.maayboli.com/node/35884

“ पुणे ते पानिपत ” भाग ६ - http://www.maayboli.com/node/35939

“ पुणे ते पानिपत ” भाग ७ - http://www.maayboli.com/node/36194

“ पुणे ते पानिपत ” भाग ८ - http://www.maayboli.com/node/36408

“ पुणे ते पानिपत ” भाग ९ : http://www.maayboli.com/node/36732

“ पुणे ते पानिपत ” भाग १० : http://www.maayboli.com/node/38586

“ पुणे ते पानिपत ” भाग ११ : http://www.maayboli.com/node/38694

“ पुणे ते पानिपत ” भाग १२ : http://www.maayboli.com/node/38842

१७ जानेवारी २०१२
आजचा प्रवास :
फतेहगढ साहिब -अंबाला- हरिद्वार – नजीबाबाद – मुरादाबाद – रामपूर – बरेली

स्वाग्या, ऊठ रे आज ५०० किमी कापायचं.
निख्याचा फोन झालाय, मोहीम निघालीये हरिद्वार वरून.
ह्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म्म .......... इति स्वागत
अमरया, ऊठ बे
माझ काय बे, आपण उठलो कि निघालो ह्यांनाच आवरायला उशीर होतो. इति अमर
शेवटी कसेबसे सगळे उठले, आवरणं वगैरे प्रकार आमच्यात नसतो. आम्ही आपले उठलो कि सुटलो. आज लवकर उठलो आणि चक्क सात वाजताच गुरुद्वारा सोडला. मी मनातल्या मनात आज बारा तास बाईक चालवली तर मोहिमेला गाठता येईल असा विचार करत होतो. मोहीम जेवढी लवकरात लवकर गाठता येईल तेवढं बरं असा माझा विचार.
पण ह्या कार्ट्यानी माझा हा आनंद काही जास्त वेळ टिकू दिला नाही. कारण जशी गाडी गुरुद्वाराच्या बाहेर पडली स्वाग्याने, साऱ्या, कुठंतरी चहा मारून निघू अशी धमकीवजा विनवणी केली. मला पुढंच चित्र साफ दिसायला लागलं.
स्वागत अगोदर स्नेहलनीच गाडी एका छोट्याशा हॉटेल मध्ये घातली. मग चहा झाला मग ज्यांना भूक होती त्यांनी छोले भटोरे खाल्ले, ज्यांना नव्हती त्यांनी छोले भटोरे आणि पराठे खाल्ले. वरून “आयला, आता पंजाब सोडलं कि पराठे मिळायचे नाहीत” वगैरे कारणं देखील सांगितली. अशा प्रकारे सगळ्यांची पोटं तुडुंब भरल्यावर आम्ही गाड्यांचीपण पोटं तुडुंब भरली आणि साडेआठ वाजता आम्ही गाड्या हरिद्वारच्या दिशेने भरधाव सोडल्या.
आता जो कोणी गाडी थांबवेल त्याला तिथल्या तिथे पायताणानी हाणायचं असे स्फोटक विचार माझ्या मनात चालू असतानाचं गाडी मुख्य हायवेला लागली.
रुप्याला गाडी हायवेला लागताच अशा मस्त धुक्यात फोटो किती मस्त येतील याच स्वप्न पडलं आणि परत एकदा आमच्या तिन्ही गाड्या हायवे लगत थांबल्या. तुरळकच वाहतूक असल्याने मग प्रत्येकाने आपली फोटो काढायची हौस भागवून घेतली. मग कधी बाईकवर झोपून तर कधी हायवे वर अशा प्रकारे एखादी व्यक्ती बाईक बरोबर जितक्या वेगवेगळ्या पोझ देऊ शकते तितक्या प्रकारे प्रत्येकाचे सोलो फोटोशूट झाले. मग कॅमेराला दिलेल्या टायमर या तंत्रज्ञानाचा वापर करून ते बंद पडेपर्यंत ग्रुप फोटोशूट झाले.

धुक्यात हरवलेला रस्ता :
13DSCN3684.JPGसभोवताली दिसणारा हिरवागार निसर्ग :
13DSCN3687.JPG

शेवटी एकदा आम्ही हरिद्वारच्या दिशेने निघालो. वाटेमध्ये अंबाला लागते पण अंबालामध्ये बघण्यासारखे देखील जास्त काही नाहीये आणि त्यातच आम्हाला उशीर पण झाला असल्याने आम्ही वाटेत कुठे थांबण्याच्या भानगडीत पडलो नाही. फोटोशूट नंतर अमरची गाडी मी घेतली आणि अमर स्वागतच्या मागे बसायला आला. ह्यामागचा माझा एकमेव उद्देश म्हणजे शक्य होईल तितकी गाडी पुढं ठेवायची आणि त्यामुळे निदान दुसरे तरी वाटेत कुठे जास्त वेळ थांबणार नाहीत हा होता. राष्ट्रीय महामार्ग ७३ पकडायचा हा थेट हरिद्वारला जातो.
एकदा फतेहगढ वरून निघाल कि राष्ट्रीय महामार्ग ७३ सोडायचा नाही. हा सरळ हरिद्वारला जाऊन मिळतो. मस्त गुलाबी थंडी पडली होती. हेल्मेटचा आतमध्ये वारंवार बाष्प जमा होतं असल्याने हेल्मेटचा पुढचा भाग उघडला होता. सर्वत्र धुकं पसरलं होतं आणि रस्तापण रिकामा असल्यामुळे मी गाडीचा सगळ्यात वरच गिअर टाकला. बाईकने ७०-८० चा वेग घेतला होता. गार वाऱ्याने हात चांगलेच गारठू लागले होते. पण मनाला एक प्रकारचा उत्साह जाणवत होता. हा रस्ता आणि हे क्षण संपूच नये अस वाटत होतं. आरशांमध्ये बघत आम्ही सगळेजण एकमेकांबरोबर असल्याची खात्री करत होतो. आज काहीही करून बरेली गाठायचं एवढंच सगळ्यांच्या मनात होतं. तर अंबाला पर्यंत आम्ही सगळे मागे पुढेच होतो. चांगला आणि मोकळा रस्ता मिळाला तर ४५० किमी सहज जाऊ अस आमच्या मनात होतं. पण अंबाला मध्ये ट्राफिक लागलं आणि मग मात्र मला तरी आमच्यातल कोणी दिसलं नाही, नेहमीप्रमाणे विचारत विचारत निघालो होतो. जोगधरी, सहारनपूरपर्यंत तरी मी बरोबर होतो. पण माझा बहुतेक शहापूर फाट्यावर रस्ता चुकला आणि मी रुरकी मध्ये घुसलो.

शहापूर फाट्यावर रस्ता चुकला
13DSCN3691.JPG

बरोब्बर दुपारी तीन वाजता मी उत्तराखंड मध्ये प्रवेश केला.

13DSCN3693.JPG

धुकं, धुकं आणि फक्त धुकं :
13DSCN3702.JPG

Zero Visibility Happy
13DSCN3703.JPG

माझ्या अंदाजाप्रमाणे या सर्वांपुढे माझीच गाडी असल्याने साधारण ०४००-०४३० पर्यंत हरिद्वार गाठू आणि बाकीच्यांची तिथंच वाट पाहू अशी माझी एकंदरीत योजना होती.
उत्तराखंडमध्ये प्रवेश करतानाच रूरकी २२ किमी, हरिद्वार ५४ किमी तर दिल्ली १९५ किमी असा फलक नजरेस पडला. म्हणजे माझा अंदाज बरोबर होता तर.
रूरकी मध्ये गाडी घुसताच एकजण जोर जोरात हॉर्न वाजवत माझ्या मागे आला. मला क्षणभर कळेना, बर साईड हवी म्हणावं तर रस्ता मोकळा होता. त्यांनी हात वगैरे दाखवत गाडी बाजूला घ्यायला सांगितली.
मी पण काय म्हणतोय ते तर बघू म्हणतं गाडी बाजूला घेतली.
गाडी बाजूला थांबवली व नीट एकू येण्यासाठी हेल्मेट काढलं.
अरे गिर गये थे क्या ? आपका जाकेट फट गया है.
मी हसून “ हा बाईक थोडा स्लीप हो गयी थी”
हमारे पीछे आव, अस म्हणून त्याने गाडी सुरु देखील केली.
मी पण बघू तर कुठे घेऊन जातो म्हणत त्याच्या मागे बाईक नेऊ लागलो.
साधारण १० मि. गल्लीबोळातून घेऊन गेल्यावर त्याने एका ठिकाणी बाईक लावली. मी पण त्याच्या मागोमाग बाईक लावली.
त्याने तिथेच शेजारी असलेल्या एका शिंप्याच्या दुकानातील माणसाला आवाज दिला.
सलाम वालेकुम मुल्ला भाई, ये छोकरा का उतना जाकेट सिलवा के दे दो. मै थोडा जल्दी मै हू, आता हू शाम को, पैसा मत लेना इससे
इतक बोलून तो त्याची बाईक घेऊन निघून पण गेला.
मी माझं जर्किन काढून त्याला दिलं.
त्यांनी ते उलट सुलत करून बघितल्यावर, मुश्कील है, देखता हू अस म्हणत शिवायला घेतलं.
जर्किन काढल्यामुळे आता arm guard पण सर्वाना दिसायला लागले. येणाऱ्या जाणारयाबरोबर परत एकदा नेहमीचा प्रश्नोत्तराचा खेळ सुरु झाला.
त्याने १५ मि. मध्ये जर्किन एकदम पूर्वी होतं तसं शिवून दिलं.
भैय्या, कितना हुवा ?
अरे नही नही, आपसे पैसा लेंगे क्या ? अल्ला ताला नाराज होगा हमसे.
मी त्याला शक्य होईल तेवढी पैसे घेण्याविषयी विनवले. तो काही केल्या कबुल होईना.
शेवटी धन्यवाद म्हणून गाडी बाहेर काढली.
एका मिठाईच्या दुकानात गेलो, थोडी मिठाई घेतली. दुकानाच्या बाहेर उभ्या असलेल्या एका मुलाला दुकानात नेऊन दे म्हणून सांगितलं. मुलगा दुकानात मिठाई घेऊन गेला, मालकाने माझ्याकडे बघताच हात दाखवला आणि हरिद्वारच्या दिशेने निघालो.
साधारण पाच वाजता हरिद्वार मध्ये घुसलो. एकदम सुरवातीलाच थांबाव म्हणू एका छोट्याशा हातगाड्याजवळ थांबलो. शहर बऱ्यापैकी आतमध्ये दिसत होते. बाहेर तितकीशी वर्दळ देखील नव्हती. प्यायचा म्हणून चहा पिला. स्वागत, अमर, रुपेश, स्नेहल सगळ्यांना फोन करून झाले, कुणाचाच लागत नव्हता. त्या हातगाड्याजवळ उभे असलेले लोक पाहून मला पहिल्यांदाच थोडीशी असुरक्षिततेची जाणीव झाली. लगोलग बाईक सुरु केली आणि पुढे निघालो. तिथून निघून थोडं आत शहरामध्ये जाऊन थांबावं म्हणून मी परत बाईक सुरु केली. साधारण १०-१५ मिनिटांतच ट्राफिक सिग्नल लागला. शेजारीच पोलीस चौकी पण होती. सिग्नलला सगळ्याचं गाड्या स्लो होत असल्याने इथेच गाडी बाजूला लावू आणि यांची वाट बघत बसू अस म्हणत मी बाईक बाजूला घेतली. स्वागतला फोन लागला पण रिंग वाजून वाजून बंद झाला. गाडी चालवत असेल, थांबून तो पण करेलच परत अस विचार करत फोन बंद केला. तेवढ्यात चौकीवरचा पोलीस माझ्याकडे येताना दिसला. बहुतेक माझा असा अवतार बघून त्याला शंका आली असावी.
कहासे आये हो ?
महाराष्ट्रसे ............. मी
इतनी दूर ? बाईक पे ?
हा ......................
बाईक लगावो, मेरे साथ चलो.
भाईसाब मेरे दोस्त आ रहे है पीछे से उनका वेट कर रहा हू.
त्यांनी त्याच्या सहकाऱ्याला आवाज दिला.
अरे कोई महाराष्ट्रकी बाईक दिखे तो रोकना.
चलो आप मेरे साथ
कहा ??????? मी अगदी, आता कुठे नेता मला अशा अविर्भावात
साब से मिलो.
चलो.
आता शक्य होईल तितक्या लवकर याला कटवू अस म्हणून त्याच्याबरोबर शेजारच्या पोलीस चौकीमध्ये गेलो.
त्याने त्याच्या साहेबाला “ साब ये लडका महाराष्ट्रसे बाईक पर आया है! “
आता त्याच्या साहेबाने माझा ताबा घेतला. मग परत एकदा माझ्या सगळ्या प्रवासाची उजळणी झाली. आणि मध्ये त्याने त्याच्या सहकाऱ्याला “ अरे जरा वो अमित को बुलाना ” असा आदेश दिला.
खाना खाया ?
हा, बीच मे खा लिया था थोडासा!
चलो, चाय पिते है!
मग हा मला एका हॉटेल मध्ये घेऊन गेला.
आणि मग चहा- बिस्किटे खाता खाता तुला अशी भीती नाही का वाटतं? आणि हे सगळं अंगावर घातलयस ते कितीला येते ? तुझे बाकीचे मित्र कुठे आहेत वगैरे वगैरे अशा गप्पा चालू असतांनाच
अरे अमित इधर..............!
अस त्याने कुणाला तरी आवाज दिला.
तिकडे बघितलं तर तो अमित आणि त्याच्याबरोबर एक छायाचित्रवाला आमच्याकडे येतं होते.
मग त्या अमितशी आणि त्याच्या मित्राशी ओळख झाली.
तो अमित “ अमर उजाला ” का अशाच कोणत्या तरी वृत्तपत्रासाठी काम करत होता.
मग परत प्रश्नांची सरबत्ती सुरु झाली. आणि मोहीम कालच निघून गेली आम्ही मागे राहिलो होतो असे म्हटल्यावर, अरे साब, ये बहोत बडा opportunity मिस किया हमने. चलो कोई नही अगली बार आओगे तो हमे जरूर बताना!
असा संवाद चालू असतानाच फोन वाजला.
हा स्वाग्या, कुठाय रे ?
अरे साऱ्या, रुपया बोलतोय. अरे आम्ही हरिद्वारच्या पुढे आहे. अरे रस्ता फारच सुनसान आहे. तू कुठे आहेस?
अरे मी हरिद्वार मध्ये आहे. तुम्ही तिथेच थांबा मी आलोच.
बर, बर सावकाश ये. आम्ही थांबतोय.
मी त्या साहेबांना आणि अमितला चलो साब, चलता हू! असे म्हणताच
मिल गये आपके दोस्त लोग ? किधर है ?
मग त्याला ते हरिद्वारच्या पुढे वाट बघतायत सांगितल्यावर
आरामसे जाना, बरेली लगबग २५० किमी है. आगे पथारी और चीडीयापूर जंगल का थोडा हिस्सा है. डरना मत और बिचमे किसिकेलीये मत रुकना असा सल्ला दिला.
मी मनातल्या मनात “डरना मत और बिचमे किसिकेलीये मत रुकना ” व्वा, याला म्हणतात मिश्र वाक्य.
हॉटेलवाल्याला मी पैसे देऊ लागताच “ अरे साब, आप हमारे मेहमान है ” असे म्हणत तिथल्या एकाला “ जा रे एक पानी का बोतल दे साब को ” असे म्हणत नको, नको म्हणत असतानाच बाटली माझ्या हातात कोंबली.

कडाक्याची थंडी, जीवाभावाचे मित्र आणि गरमागरम चहा, अजून काय हवंय आयुष्यात :
13DSCN3725.JPGहरिद्वार :
हरिद्वारचा अर्थ हरीचे ( काहींच्या मते विष्णूचे) म्हणजेच ईश्वराचे द्वार असा होतो. हिंदू धर्मीयांमध्ये हरिद्वार हे अतिशय पवित्र असे तीर्थक्षेत्र मानले गेले आहे. हिंदू धर्मानुसार अतिशय पवित्र असलेल्या ७ तीर्थक्षेत्रांपैकी हे एक होय. ज्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होतो अशा ठिकाणांपैकी हे एक.
गरुड पुराणामध्ये अतिशय पवित्र असलेली ७ तीर्थक्षेत्रे खालीलप्रमाणे :
१. अयोध्या
२. मथुरा
३. मायापुरी – हरिद्वार
४. काशी – वाराणसी
५. कांची – कांचीपुरम, तामिळनाडू
६. अवंतिका – उज्जैन
७. द्वारावती – द्वारका

३१३९ मी उंचीवर असलेल्या गंगोत्री या गंगेच्या उगमापासून सुमारे २५३ किमी अंतर पार करून गंगा नदी मैदानी प्रदेशात प्रवेश करते म्हणून याला गंगेचे प्रवेशद्वार असे देखील म्हटले जाते.
पौराणिक कथेनुसार जेव्हा गरुड समुद्रमंथनातून निर्माण झालेले अमृत घड्यामधून घेऊन जात होता तेव्हा त्या घड्यामधून अमृताचे ४ थेंब वेगवेगळ्या ठिकाणी पडले. त्यामधील एक हरिद्वार. बाकीची ३ स्थाने म्हणजे उज्जैन, नाशिक आणि प्रयाग म्हणजेच अलाहाबाद. प्रत्येक ३ वर्षांनंतर या ठिकाणी कुंभमेळा भरतो. आणि १२ वर्षानंतर महाकुंभमेळा अलाहाबादला भरतो.
येथूनच चारधाम यात्रेची सुरवात होते. बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री हे ते उत्तराखंडमधील चारधाम.

पाहण्यासारखी ठिकाणे :
१. हर-की-पौडी : ज्या ठिकाणी अमृताचा थेंब पडला होता त्याला “हर-की-पौडी” ( शंकराच्या पाऊलखुणा ) या नावाने ओळखले जाते. या ठिकाणी असलेले ब्रह्मकुंड प्रसिद्ध आहे. हा घाट इ.स.पूर्व १ ल्या शतकामध्ये राजा विक्रमादित्याने त्याचा भाऊ भर्तारी याच्या स्मरणार्थ बांधला.
२. चंडी देवी मंदिर : हे मंदिर काश्मीरचा राजा सूचत सिंग याने १९२९ मध्ये बांधले. आदि शंकराचार्यांनी या मंदिराची ८ व्या शतकामध्ये स्थापना केली होती.
चंडीघाटापासून मंदिरपर्यंत साधारण ३ किमी चालावे लागते. रोप-वे ची सुविधा देखील उपलब्ध आहे.
३. मनसा देवी मंदिर : हे मंदिर बिल्व टेकडीवर स्थित आहे. हे मंदिर तिथे असणाऱ्या केबल कार मुळे यात्रेकरूंमध्ये विशेष प्रसिद्ध आहे. मनोकामना पूर्ण करणारी म्हणून मनसा अशी या नावाची व्युत्पत्ती आहे. या मंदिरावरून हरिद्वार शहराचा रम्य देखावा दिसतो.
४. राजाजी राष्टीय उद्यान
५. पतंजली योगपीठ

त्या सगळ्यांचा निरोप घेऊन मी गाडी ठेवलेली त्या ठिकाणी आलो. मगाशी ड्यूटीवर असलेल्या मित्राचा पण निरोप घेतला आणि बरेलीच्या दिशेने मार्गस्थ झालो.
हे सगळं होता होता ५ वाजून गेले होते,
२५० किमी बरेली, अशक्य आहे, आता वाटेतच थांबू कुठेतरी असा मी मनातल्या मनात विचार केला.
हरिद्वार सोडताच जंगलाच अस्तित्व जाणवू लागल. गारठादेखील पडू लागला होता.
सूर्यास्त होण्याच्या मार्गावर होता. मोरांचे आवाज कानी पडू लागले आणि मनातल्या मनात आता हे सगळे कधी एकदा भेटतात असे झाले. १५-२० मि, झाले तरी या पोरांचा पत्ता नाही.
रस्ता पण बऱ्यापैकी निर्मनुष्य झालेला. आता यांना मी नक्की कुठे आहे ते तरी कसं सांगणार ?
वाटेत एक मोठा पूल लागला आणि मी निश्वास सोडला.
स्नेहलला फोन लावला, मी मोठ्या पुलाच्या इथे आहे सांगितलं.
अरे ५ मि. मध्ये पोहोचशील ....स्नेहल
आणि २-३ मि. मधेच यांच्या गाड्या रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दिसल्या आणि त्याहीपेक्षा यांचे हसण्या खिदळण्याचे आवाज कानावर आले आणि आमची जीव नावाची वस्तू भांड्यात पडली. Happy
गाडी थांबवली. परत एकदा आळोखे पिळोखे दिले.
आणि देवाच्या कृपेने पुढच्या एखाद्या छोट्याशा शहरामध्ये मुक्काम करू यावर सर्वांच एकमत झालं. कारण २५० किमी अंतर हा रस्ता काय आम्हाला सहजासहजी पार करू देईल असे वाटत नव्हते. माझ्या मनात मुरादाबाद पर्यंत तरी जाऊ अस होत. कारण बरेली मुरादाबादपासून ९० किमी आहे. परत उद्या एवढा लोड घेता येणार नाही अस नाही पण तरीही रोजचं बायकिंग एवढं झालं तर मग जास्त काही बघताही येणं शक्य नव्हतं.
एव्हाना अंधार पडला होता, घड्याळात बघितलं तर सहा वाजून गेले होते,
पटापट गाड्या काढल्या आणि निघालो. दिवसभर गाडी चालवून कंटाळा आला होता मग अमरला गाडी दिली आणि मी मागे बसलो. रस्त्यावर जास्त अशी वर्दळ नव्हती.
हरिद्वार पासून राष्ट्रीय महामार्ग ७४ पकडायचा, नंतर नजीबाबाद लागते, त्यानंतर धामपुर फाट्यावर डावीकडे न वळता सरळ मार्ग पकडायचा. डावीकडे राष्ट्रीय महामार्ग ७४ जातो.
त्या रस्त्याला बघितल्यावर याला राष्ट्रीय महामार्ग का म्हणत असावेत असा एक गहन प्रश्न मला भेडसावू लागला होता.
रस्ता म्हणजे अतिशय बकवास, बर त्यात वाटेत हत्तींच्या कळपापासून सावधान इत्यादी प्रकारचे बोर्ड लावले होते.
आता आपल्या बाईक पंक्चर नाही झाल्या तर मिळवले. कोणीतरी नको ते बोललं. मला राहून राहून एखादा तरी हत्तींचा कळप रस्ता ओलांडताना दिसावा असं सारखं वाटतं होतं, अधून मधून ट्रक, टेम्पो सारखी वाहने येत-जात होती. रस्ता छोटा असल्याने गाड्या सारख्या खाली उतरायला लागायच्या. बर, अप्पर – डीप्पर मारून फायदा नव्हता, त्या वाहनचालकांना त्या गोष्टीचा अर्थच माहित नसावा. अमर आणि स्वागतचे हात अप्पर – डीप्पर देऊन घाईला आलेले. पण हि वाहन काय त्यांची रस्त्यामधील जागा सोडायला तयार व्ह्यायची नाहीत. “गरज हि शोधाची जननी आहे” या पार्श्वभूमीवर अप्पर – डीप्पर देऊन वैतागल्याने आम्ही रुप्याला त्यांची गाडी आमच्या बऱ्यापैकी पुढे ठेवायला सांगितली. स्वागत आणि अमरने गाड्यांचे वेग जुळवले आणि अप्पर चालू केले. आता पुढून येणाऱ्या वाहनांना आमच्या दोन बाईक पण चार चाकी सारख्याच भासू लागल्या आणि वाहने पण रस्ता सोडून खाली उतरू लागली. Proud
आम्ही मग ए आता आपला ट्रक, आता मारुती, आता अजून काय असे पाचकळ जोक मारत मारत गाड्यांमधील अंतर कमी जास्त करत होतो आणि येणारा ट्रक रस्त्याच्या खाली उतरला कि जोरजोरात हसत होतो. एकंदरीत अशा प्रकारामुळे नजीबाबाद आलेलं आम्हाला कळलंच नाही.
आमचा हा जुगार चांगलाच यशस्वी झाला. एवढच काय कि पुढील प्रवासात देखील या युक्तीचा आम्हाला खूप उपयोग झाला.

साधारण तासाभरातच आम्ही नजीबाबाद सोडलं. बरेली अजून जवळपास २०० किमी होतं. संध्याकाळचे साडेसहा वाजून गेले होते. थंडी देखील बरीच पडली होती. मी मागे बसल्यामुळे तसा मी उबदार वातावरणामध्ये होतो.
अमर अधून मधून साऱ्या, जाम थंडी वाजतेय रे, असलं काहीतरी सांगून मला गाडी चालवायला उद्युक्त करत होता. पण आता असल्या गोष्टीचा मला सराव झाला होता. त्यामुळे अमरया, तू कितीही रडलास तरी मी काही आता बाईक चालवत नसतो. मी त्याला वारंवार सांगत होतो आणि परत १०-१५ मि. झाले कि तो मला त्याचं पालुपद ऐकवत होता.
आता थंडीमुळे सगळ्यानांच भुका लागल्या होत्या. छोट्या छोट्या वस्त्या, गावं लागल्याने कुठे चहाची टपरी देखील नजरेला पडेना. बऱ्याच वेळा गावांमध्ये वीज नसायची, आम्हाला अशा वेळी खऱ्या भारताच दर्शन होतं होत. अजून देखील आपला भारत १९ व्या शतकामधेच असल्याचं आम्हाला पुरेपूर पटलं.
थोड्याच वेळात धामपूर लागलं. आमच्या अगोदर स्नेहलने गाडी थांबवली होती. आम्ही पण गाड्या बाजूला घेतल्या. गावामध्ये वीज नव्हतीच. एक छोटसं हॉटेल होतं, आम्ही सगळ्यांना ग्लास भरून चहा सांगितला. जी काही बिस्कीट त्याच्याकडे होती त्याचा फडशा पडला आणि त्यांच्या भट्टीवर मस्तपैकी हात शेकले.
मग त्याच्याबरोबर पण आता पुढे एखाद राहण्यासारखं गाव कधी येईल, रहायची व्यवस्था होईल का ? इत्यादी प्रश्नोत्तरांचा तास झाला.
मी स्वाग्याला, बघ स्वाग्या निघताना टेंट घेतला असता तर बरं झालं असतं कि नाही, मस्तपैकी जंगलामध्ये झोपलो असतो अस म्हणताच
नालायक, तुला हि छोटी sack घ्यायचं जीवावर येतंय आणि टेंट घेतला असता म्हणे, असं म्हणत स्वागतने त्याच्या पाठीवरची ती जडशी sack माझ्याकडे दिली. मी पण आपल, दे दे म्हणे फार जड आहे, अस तोंडदेखल्या म्हणत जराशा नाखुशीने ते लोडण पाठीवर घेतलं.
त्या मालकाने सांगितल्याप्रमाणे आता मुरादाबाद मध्ये मुक्काम करायचं नक्की झालं होतं.
कारण मुरादाबाद सोडलं कि पुढे बरेलीशिवाय दुसरं शहर नव्हतं.
मुरादाबाद मध्ये गेल्या गेल्या पहिल्यांदा रेल्वे स्थानक शोधा, कारण राहण्याची सगळ्यात स्वस्त सोय रेल्वे स्थानकाशेजारी सहज होते आणि त्याचं बरोबर बाईक पार्किंगला पण तिथे जागा असते. असे सगळ्यांनीच एकमेकांना सल्ले दिले आणि बघ, बाईकवर फिरून आम्हाला किती माहित झालाय असा अविर्भाव चेहऱ्यावर आणत आम्ही मार्गस्थ झालो.
मुरादाबादमध्ये पोहचता पोहचता दहा वाजले होते. आता पुढच्या ८ तासांसाठी पाठ टेकवायला जागा शोधायची होती.
एका ठिकाणी पाच जणांसाठी एक रूम मिळाली.रूमच भाडं त्याने ५०० रु. सांगितलं होतं. आम्ही त्या लॉज मालकाला जेवून आलोच असे म्हणतं अजून १-२ ठिकाणी रूम बघू आणि कुठेतरी पेट-पूजा उरकून घेऊ आणि झोपायला जाऊ अस म्हणतं आम्ही तिथून निघालो. अजून २-३ ठिकाणी रूम बघितल्यावर त्याचं लॉजवर राहायला जाऊ असं ठरलं आणि आम्ही जेवायला हॉटेलमध्ये घुसलो.
तिथल्या पोऱ्याने, त्याने पाठ केलेलं मेनू कार्ड म्हणून दाखवलं. तिथली स्वच्छता लक्षात घेता, आम्ही छोले-भटुरे अशी ऑर्डर दिली.
इतक्यात माझं लक्ष बाहेर गेलं.
शैल्या................
अरे हे बघ हे पण इकडेच आलेत.
आमच्या मोहिमेमधील अजून ३-४ जण आम्हाला दिसले.
मग त्यांच्याबरोबर, आता कुठे थांबलाय? हरिद्वार बघितलं का?
मोहीम बरेली मध्ये आहे अशा वेगवेगळ्या विषयांवर गप्पा झाल्या. त्यांनी पण १ रूम घेतली होती. हे सर्वजण हरिद्वार मध्ये गंगेमध्ये स्नान वगैरे करून आले होते. तुम्ही केल का रे गंगेमध्ये स्नान ?
नाही ना रे ...मी
अरे करायचं ना, पवित्र असतं......
अरे करणार होतो, पण मग तुम्ही गंगा घाण केली ना, म्हणून आम्ही नाही केली.
........ आम्ही सगळेजण खिदळलो. Proud
आमच्या मध्ये एक बर होतं, कि आमच्यापैकी कुणालाच तीर्थक्षेत्र, देवधर्म इत्यादी गोष्टींमध्ये रस नव्हता. काशी सारख्या ठिकाणाची परिस्थिती आम्ही बघितली होती.
सगळीकडे चालणारा पैशाचा बाजार, शंकराच्या पिंडीभोवती झालेला हळद, कुंकू, तांदूळ, फुलं, दही, दुध इत्यादींचा चिखल. त्याचा येणारा उग्र वास. अशा ठिकाणी माझा पाय क्षणभर देखील टिकत नाही. कसलं पुण्य आणि कसलं काय?
बाजार...............एवढ एकच नाव आहे या गोष्टीला.
तरी देखील मी गर्दी वगैरे नसेल तर अशा ठिकाणी जातो. काय असतं आणि तिथे बघण्यासारखं तरी.
दूरवर एखाद्या नदीकिनारी अथवा जंगलाच्या आतमध्ये अनुभवता येणारी निरव शांतता येते अनुभवता ?
तेवढं सोडा, साधं सुवर्ण मंदिरामध्ये अथवा मोनास्ट्री मध्ये गेल्यावर जसं फिलिंग येत ना तेवढ आलं तरी पुरे.
मी बघितलेलं मला मकरंदगडावरच मंदिर आठवलं. अतिशय शांत वातावरण, कुठलाच गोंगाट नाही, कि कुणी नारळ आणि फुले घेऊन मागं लागत नाही. तिथे ना हळद होती ना कुंकू.
फक्त शंकराच्या पिंडीवर पाण्याचा अभिषेक होत होता.
चकचकीत मार्बल नसेलही कदाचित पण ते मस्तपैकी शेणाने सारवलेलं होतं. अशा ठिकाणी नक्कीच देव असेल तर तो रहात असेल.
असो अशा विषयावर लिहायला लेख कमी पडेल.

जमलं तर उद्या सकाळी बरोबरच निघू म्हणत आम्ही त्यांचा निरोप घेतला. भूक असली तरी सगळ्यानीच आज जेवण आटोपत घेतलं. अर्थात त्याला तिथली कमालीची स्वच्छता हे महत्वाच कारण होतं. Wink
कारण एकदा का पोटाने त्रास द्यायला सुरवात केली कि नको तो ताजमहाल आणि नको ती वाघा सीमा असे विचार मनात येतात. मोहिमेमधील बऱ्याच जणांना (माझ्यासकट) हा अनुभव होता त्यामुळे पुढे सोने जरी वाढून ठेवलं तरी आता प्रत्येकजण भुकेपेक्षा २ काय ४ घास कमी खात असे. त्यामुळे लवकरच जेवण आटपून आम्ही गाड्या रेल्वे स्थानकामध्ये लावल्या आणि लॉजच्या दिशेने निघालो.
लॉज मालकाला, मघाशी रूम घेतली होती त्याचे पैसे कुणाकडे द्यायचे असे विचारातच
वो तो गयी .......... त्याचे उत्तर
४-५ लोग बाईक पे आये है, उन्होने ली है !
आणि मग आम्हाला त्याच्या लॉजच्या बाहेर उभ्या असलेल्या MH passing असलेलेल्या बाईक दिसल्या आणि त्यावरचे भगवे झेंडेसुद्धा. Angry
आता जास्त वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. ११ वाजून गेले होते. आम्ही मिळेल त्या लॉज मध्ये घुसलो. ३ रूम घेतल्या. जेमतेम १ बेड आणि थोडीशी उभी राह्यला जागा अशा रूम होत्या. पण आम्हाला काय तिथे आयुष्य काढायचं नसल्याने आम्ही आतमध्ये घुसलो.
स्वागत आणि रुपेश मात्र रूम बघून जास्त खुश नव्हते. स्वाग्याने, साऱ्या दुसरीकडे बघू, अरे चांगल्या मिळतील इत्यादी सुरु केलं. मी, अमर आणि स्नेहल मात्र आता कुठेही नको, सकाळी ५ ला तर निघायचंय, आता ६ तासासाठी ताजचा प्रेसिडेन्शिअल सूट जरी कुणी फुकट देत असेल तरी नको असे म्हणतं आतमध्ये घुसलो.
स्वागत आणि रुपेश मात्र दुसरीकडे जाऊन आम्ही बघतो असे म्हणत तिथून बाहेर पडले. सकाळी ५ ला निघायचंय रे, तेव्हा लवकर उठा आणि नुसतं उठू नका निघा पण. म्हणत आम्ही त्यांचा निरोप घेतला.
आमच्या स्वाग्याच हे असं असत, माग एकदा या साहेबांना मी “नाणेघाट-जीवधन-शिवनेरी-लेण्याद्री-भीमाशंकर” अशा ट्रेक ला घेऊन गेलो होतो. आता या ट्रेक मध्ये नाणेघाटाच्या गुहेमध्ये झोपण्यासारखं दुसर कुठलं सुख आहे का या जगात, पण नाही नालायाकाने मला ती रात्र जुन्नरमधल्या कुठल्यातरी हॉटेलच्या रूम मध्ये काढायला लावली. बर कुणाला सांगायचं म्हटलं तरी पंचाईत. समस्त गिर्यारोहण समुदायाने वाळीत टाकलं असतं मला.
मग स्नेहलनी एका रूम मध्ये, अमर आणि मी एका रूम मध्ये अशी ताणून दिली.
स्नेहलची तब्बेत जरा ढासळली होती, थोडासा ताप होता म्हणून त्याला नीट झोपता याव म्हणून दुसरया रूम मध्ये पाठवलं.
आईला फोन केला. आईला मी मोहिमेबरोबर नाहीये हे कळताच, मी कसा जास्त शहाणपणा करतो ? कसं कुणाचं ऐकत नाही ? मोहीम सोडायची काय गरज होती का ? वगैरे लेक्चर सुरु केलं.
मी अगदी शांत डोक्याने बरं, बरं............ काळजी करू नको, आम्ही १०-१५ जण आहोत अशा थापा देत फोन ठेवला.
झोपताना मग अमर आणि माझ्या गप्पा सुरु झाल्या.
अमरया, स्नेहलला तिकडे का पाठवलं माहितेय का ?
का ?
आता समजा मला कुणाचा फोन आला आणि मी सांगितलं अरे आता नाही बोलता येणार स्नेहल झोपलाय, तर माझ्यावर कुणीतरी विश्वास ठेवेल का ? कि मी स्नेहल नावाच्या मुलाबरोबर आहे म्हणून . Blush
असे काहीतरी फालतू विनोद मारत, कॉलेज-शाळा, पहिलं प्रेम वगैरे गप्पा मारता मारता आम्हाला झोप कधी लागली कळलंच नाही.

आजचा प्रवास : ३८४.५ किमी

१८ जानेवारी २०१२
आजचा प्रवास :
मुरादाबाद – रामपूर – बरेली –शाह्जहापूर- सीतापूर - लखनऊ

सकाळी ५ च्या गजराने झोप मोडली.
Snooze नावाचं बटण ज्याने बनवलं त्या अवलियाला धन्यवाद देत मी परत झोपलो. थोड्या वेळाने दोघांचेही मोबाईल आळीपाळीने हनुमान चालीसा आणि जॉन सीना ऐकवू लागल्याने आम्ही शेवटी उठलो.
स्नेहल पण उठला होता. पहिला स्वाग्याला फोन लावला, उठलोय, लगेच निघतोय असं खोट का होईना स्वाग्यानी उत्तर देऊन फोन ठेवला.
स्नेहलची तब्बेत बरी होती. ताप देखील जास्त नव्हता.
डब्बा टाकून आलो. अमरच पण आवरलं होतं.
म्हणा आवरायचं म्हणजे काय?
त्या थंड पाण्यात हात घालण मला जीवावर आल होतं. त्यामुळे तोंड धुणे, ब्रश करणे वगैरे निरर्थक गोष्टी दुपारी करायच्या ठरल्या.

अमरया,, आमचे फादर काय म्हणतात माहितेय काय ?....मी
काय ?
सकाळी उठून ब्रश नाही केला तरी चालेल, पण रात्री झोपण्यापूर्वी ब्रश करावा.
हो का ............
म्हणून मग मी रोज सकाळी आमच्या फादरच हे वचन आठवतो आणि आजपासून रात्री ब्रश करून झोपत जाऊ अशी प्रतिज्ञा करतं दिवसाला सुरवात करतो.
मग आजपासून मी पण असचं करतो. ...अमर

आम्ही training मध्ये असताना रविवारी काय करायचो माहितेय का अमरया,?
काय ?
सकाळी ८ वाजता, नाश्त्याची वेळ संपायची, बरोबर ०७५५ ला उठायचो, थेट नाश्ता.
पूर्ण ताट भरून शिरा आणि पोहे घ्यायचे, १ ग्लास भरून चहा, १ ग्लास भरून कॉफी. कारण ८ ला बरोबर counter बंद व्हायचं.
आणि मग निवांत चरत बसायचं आणि मग परत होस्टेल वर आलं कि ब्रश. Wink
असे संवांद करत आम्ही आमची हत्यार चढवली आणि बरेलीच्या दिशेने प्रस्थान केलं.
पूर्ण रस्ता धुक्यामध्ये हरवला होता. आजपण बराच लांबचा पल्ला गाठायचा होता. जवळपास ३५० किमी अंतर तोडायचं होतं.
निखीलला फोन केला तर मोहिमेने सकाळी ६ वाजताच बरेली सोडल होत. मोहीम भलत्याच वेगात निघाली होती. कालपण दिवसभर आम्ही फक्त आणि फक्त biking biking आणि फक्त biking च करत होतो.
आम्हाला कोणालाच याच वाईट वाटलं नव्हतं कि काही बघायला मिळत नाहीये अथवा नुसतंच बायकिंग होतंय.
कारण आम्ही बायकिंग करायला तर बाहेर पडलो होतो. प्रेक्षणीय स्थळांपेक्षा आम्ही इतरही बरचं काही अनुभवत होतो.
जंगल, थंडी, गारठल्या नंतरचा गरमागरम चहा या कितीतरी गोष्टी आम्हाला मनापासून आवडत होत्या. आम्ही लोकजीवन जवळून अनुभवत होतो. आम्हाला आमचं व्यवस्थापकीय कौशल्य किती तोकड आहे याची जाणीव झाली होती. प्रवास आम्हाला खूप काही शिकवत होता. आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायला, आहे त्यातून मार्ग काढायला आणि बरंच काही.
स्वागत, रुपेश चा अजून पत्ता नव्हता. आम्ही अंतर आज काहीही झाल तरी लखनौ गाठायचचं या हेतूने बाईक पळवत होतो. पण धुक्यामुळे बाईक काही वेग घेईनात.
थंडी मुळे आम्ही आज जास्तच गारठलो होतो. दर २५-३० मि. नि आम्ही गाड्या थांबून जमेल तिथे, जमेल तितका चहा ढोसून पुढे निघत होतो.
साला, हे उत्तर प्रदेश मधील रेल्वे फाटकं भलताचं वेळ खात होती. चक्क ३-३ रेल्वे गेल्यानंतर हि फाटक उघडायची. त्यामुळे ट्राफिक पण खूप खोळंबलेली असायची. आम्हाला आपण बाईक वर आहोत याच खूप बर वाटायचं. ३-३ किमी पर्यंत काही ठिकाणी रांगा लागल्या होत्या. बाईकमुळे आम्ही पटापट पुढे निघून जायचो. त्यातच रस्त्यांची पण कामे चालू होती. त्यामुळे अजूनच खोळंबा.
स्वागतला परत एकदा फोन करून झाला आणि अरे तुम्ही चला रे पुढे, आम्ही आहोत तुमच्या मागे, असं उत्तर परत एकदा ऐकवून झालं.
स्वागताच्या गाडी चालवण्यावर जरी माझा विश्वास असला तरी इथल्या रस्त्यांवर मुळीच नव्हता. स्वागत आम्हाला गाठेल याबद्दल मला काहीच शंका नव्हती आणि अशी वाहतूक पाहता तर तो नक्कीच आम्हाला गाठणार होता.
अशाच एक रेल्वे फाटकाजवळ आम्ही फाटक उघडण्याची वाट बघत होतो. बाईकला देखील पुढे सरकायला थोडीशी देखील जागा नव्हती. इतक्यात कोणीतरी जोरजोरात हॉर्न वाजवत ज्या रस्त्यावर जाण्यास बंदी होती ( काम चालू असल्यामुळे ) त्यावरून सुसाट वेगाने पुढे निघून गेले.
स्वाग्याच असणार रे तो, हे असले किडे तोच करणार. काय गरज आहे का आता ज्या रस्त्याच काम चालू आहे त्या रस्त्यावर गाडी घालायची. बर घालायची ते घालायची वरून ८०-९० ने हाणायची. पण असले उद्याग तोच करणार.
माझ्या या बोलण्यावर अमरची शून्य प्रतिक्रिया.
बहुतेक त्याने कानटोपी, मफलर, हेल्मेट अस इतक काही चढवलं होतं कि त्याला काही ऐकू जाण शक्यच नव्हतं.
मग त्याला मी नुसत्या हाताने गाडी पुढे घे म्हणून सुचवलं. कशीबशी मागेपुढे करत आम्ही पण गाडी पलीकडच्या रस्त्यावर घातली आणि पुढे फाटकाजवळ स्वागतला जाऊन मिळालो. स्नेहलपण पलीकडच्या बाजूने फाटकाजवळ पोहचला होता.
जस फाटक उघडलं तस आम्ही परत एकत्र आलो आणि पुढच्या चहाच्या टपरीवर मोर्चा वळवला. आज थंडीने कहरच केला होता. कमीत कमी २ चहाचे कप पोटात गेल्याशिवाय ऊब यायची नाही. नाश्ता कुणाचाच झाला नव्हता. मग तिथेच गरमागरम पराठे आणि लोणचं असा मस्तपैकी मन आणि पोट तृप्त करणारा नाश्ता झाला.
काय आहे का रे वाटेत बघण्यासारख? ...................स्वागत
नाही रे, विचारलं मी १-२ ठिकाणी .................... मी
आपल्या बरोबर जर का आपल्या बायका असत्या तर आपण बरेली मधून “झुमके” न घेता पुढे जाऊ शकलो असतो काय रे ? ........... रुपेश
तेच ना, बर आहे बे एकटच असलेलं. ................ अमर
आता बायको हा विषय आल्यावर स्नेहलला त्याच्या एकुलत्या एक प्रेयसीची नको एवढी आठवण झाली.
आणि जाता जाता जमलं तर तिच्यासाठी एखादं कानातलं घेऊ अस त्याच्यामधल्या एकनिष्ठ नवऱ्याने सुचवलं.
अबे, त्या गाण्यामध्ये तीच कानातलं बरेलीच्या बाजारामध्ये पडलं असं ती सांगतेय, ती असं सांगतेय का इथल्या बाजारात “झुमके” भारी मिळतात. ............... अमर उवाच
पण स्नेहलमधला नवरा त्याला स्वस्थ बसू देईना.
शेवटी सर्वानुमते स्नेहलने कानातलं घ्यावं, पण ते बरेलीमधूनच घ्याची गरज नाही. वाटेत जिथे भेटेल तिथून घ्यावं आणि ते बरेली मधूनच घेतलं आहे अस छाती ठोकून सांगाव यावर एकमत झालं.
शेवटी वस्तू नाही भावना महत्वाच्या, हे देखील आम्ही त्याला पटवून देण्यात यशस्वी झालो.
आणि आम्ही बरेलीकडे प्रस्थान केलं. Biggrin
बरेली मध्ये साधारण ११ च्या सुमारास पोहचलो. पाहण्यासारखं विशेष काही नसल्याने परत एकदा चहा पार्टी झाली.
साल्यांनो, सकाळपासून आपण फक्त १०० किमी आलोय ते पण ४ तासामध्ये.
स्नेहलने मुद्द्याला हात घातला. अजून लखनौ २५० किमी आहे. असंच गेलो तर आजपण मोहीम नाही सापडायची रे.
यावेळेस सगळेजण एखाद्या शहाण्यामुलासारखे वागले आणि आता फक्त जेवणाला मध्ये कुठेतरी थांबूया म्हणत आम्ही लखनौच्या दिशेने मार्गस्थ झालो.
चक्क ठरल्याप्रमाणे १ वाजता आम्ही एका हॉटेलमध्ये थांबलो.
अमरया, बाईक चालवशील ना अजून २-३ तास ? .............. मी
नाही, तो नाही चालवणार....................स्वागत
तुला विचारलाय का ? मी त्याच्याशी बोलतोय
अमरया, तू नाही म्हण रे, हा बैल तू हो म्हणालास कि अजून २ रोट्या हाणणार आणि मग गाडीवर तुला धरून मागे झोपा काढणार. स्वाग्याने माझ्या मनातला उद्देश सगळ्यांसमोर प्रकट केला.
खा रे साऱ्या तू बिनधास्त, चालवतो मी............ असं म्हणत अमरनी पण अजून २ रोट्या मागवल्या.
अमरकडून परवानगी मिळताच मग मी अजून २ रोट्या, जिराराइस, स्वागतला वाकड दाखवत हाणला.
जेवण मात्र मस्तंच होतं.
पण अमरयाच्या मनात काही वेगळंच होतं. जेवण झाल्यावर थोडा वेळ गप्पा झाल्या आणि आता थेट लखनौ. वाटल्यास वाटेत कुठंतरी संध्याकाळी चहा प्यायला थांबू म्हणतं आम्ही निघालो.
थोडं अंतर जाताच अमरनी गाडीचा वेग कमी केला. बाकीच्या दोन्ही गाड्या पुढं निघून गेल्या होत्या. मला पुढंच चित्र स्पष्ट दिसायला लागलं होतं.
आत्ताच तर हॉटेल सोडलं न रे, जायचं होतं तर तिकडेच जाऊन यायचं न अमरया. काय वैताग आहे. इति मी
साऱ्या, झाडं बघ कुठं दिसतायत का रे ?
थोड्याच अंतरावर शेताच्या बांधावर ३-४ डेरेदार झाडं होती, त्या शेजारी आमची गाडी थांबली.
मी गपचूपपणे पाण्याची बाटली अमर समोर धरली. जावा राजे ..............
त्याला नाही थांबलो बे ..............
मग ....................
झोपू ना मस्तपैकी तासभर. निवांत जाऊ रे, आज तुला लखनौमध्ये पोहाचवल्याशी कारण.
मला काय, गाडीवर अथवा झाडाखाली झोप मिळाल्याशी कारण
मग निवांतपैकी दोघांनी पण झाडाखाली ताणून दिली.
तासाभरानंतर उठलो. मस्तपैकी झोप झाली होती. ३ वाजले होते. दुपारची तासभर जरी अशी झोप मिळाली म्हणजे काय बरं वाटतं सांगू.
मस्तपैकी फ्रेश झालो. सकाळचा राहिलेला ब्रश केला. मग पुढच्या एका हॉटेलवर कडक चहा झाला.
आणि आमची बाईक आता सुसाट लखनौच्या दिशेने सुटली.
वाटेत एका ठिकाणी दोन ट्रकांचा अपघात झाला होता. उसाची मळी घेऊन जाणारा ट्रक उलटला होता. त्या मळीचा वास किलोमीटर भराच्या परिसरामध्ये येत होता. नेमकी त्या मळीवरून जाणारी एक टमटम आम्ही तिथे पोहोचण्याच्या अगोदर साधारण ५ मि. अगोदर उलटली होती. सुदैवाने टमटममधील सर्व प्रवासी सुखरूप होते. टमटमला सरळ करण्याचे प्रयत्न चालू होते. आम्ही पण मग खाली उतरून त्यामध्ये आमचं खारीच योगदान दिलं आणि टमटम सरळ होताच परत लखनौचा रस्ता धरला.

टांगा पलटी, घोडे ( ट्रक चालक) फरार :
13DSCN3732.JPG13DSCN3730.JPG

आणि टमटम उभी राहिली :
13DSCN3729.JPG

साधारण तासा-दिडतासामध्ये स्वागत-स्नेहलच्यापण बाईक दिसल्या.
साले हे अजून इतके मागे कसे काय ? मी अमरला विचारले.
काय माहिती बे ...... अमर
आम्ही पण नेहमीच्या पद्धतीने त्यांना जाऊन मिळालो आणि परत एकदा आमच्या गाड्या चहा प्यायला रस्त्याकडेला थांबल्या.
झोपला होता ना तुम्ही? ..स्वागत
आम्ही थोडं लाजत............. होय रे, पण तुम्ही इतक्या मागं कसं काय ?
तुम्हाला काय वाटतं, तुम्ही एकटेच छावे आहात काय ?
आम्ही पण झोपलो होतो. ..................रुपेश.
चहा-बिस्कीट पार्टी झाली. मी आता स्वागतच्या मागे बसलो. साडेपाच वाजले होते.
स्नेहलपण कंटाळला होता. रुपेशनी त्याची गाडी घेतली. लखनौ अजून १०० किमी होतं.
रच्याकने हरिद्वार – लखनौ हि दोन शहरं राष्ट्रीय महामार्ग २४ ने जोडली गेलेली आहेत. अतिशय सुंदर रस्ता आहे. विशेषतः शेवटचे १०० किमी तर एकदम भारी.
पण आता रस्ता चांगला होता. गाड्या सहजं ९०-१०० चा वेग पकडत होत्या. निखिलला फोन केला, मोहीम लखनौ च्या अलीकडे ५० किमी वर होती. आम्ही परत एकदा सुसाट निघालो. आता लक्ष्य मोहिमेला जाऊन मिळायचं होते.
अंधार पडू लागला होता, पण लखनौच्या महामार्गाच्या दुभाजकामध्ये असलेल्या झाडांमुळे पुढच्या गाड्यांचे प्रकाशझोत अजिबात डोळ्यावर येतं नव्हते. सगळीकडे असे रस्ते झाले तर काय मजा येईल असा विचार आमच्या सगळ्यांच्याच मनातं येऊन गेला.
लखनौ २० किमी राहिलं असताना डाव्या बाजूचे इंडिकेटर चालू असलेल्या गाड्या लांबूनच दिसू लागल्या होत्या. मोहीम आता दृष्टीपथात होती.
वाटेत १-२ जण भेटले. मोहीम हिंडोल नाका, गुरुद्वारा मध्ये पोहचली होती. पण अजून कितीतरी जण मागे होते. ट्रक ला रात्री ९ नंतर शहरामध्ये प्रवेश असल्याने ट्रक देखील बाहेरचं थांबला होता.
आता आम्ही हिंडोल नाका, गुरुद्वाराच्या शोधात निघालो. बऱ्याचं ठिकाणी गाड्यांच पासिंग बघितलं कि लोकांनी पत्ते सांगितले नाहीतं. आम्हाला हा अनुभव नवीन होता. स्वागतची पण तब्बेत थोडी डाऊन झाली होती. मला पण घशाला त्रास व्हायला सुरवात झाली होती. एका मेडिकल मधून गोळ्या घेतल्या, मेडिकलवाल्याला पत्ता विचारला, पण पता नही......... अस तोडकं उत्तर आलं.
इतक्यात एक साठीचे गृहस्थ तिथे आले.
Guys, you do one thing, go straight and then take left turn then after about 5 mins you will reach to one traffic signal. From that circle take right turn and that road only will take you to the gurudwara.
Thanks a lot uncle, thank you very much. God bless you. म्हणत आम्ही त्या सद्गृहस्थाचा निरोप घेतला.
त्याने सांगितल्याप्रमाणे बरोबर १५-२० मि. मध्ये आम्ही गुरुद्वारामध्ये पोहचलो.
पार्किंग मधेच जयदादा भेटला. आम्हाला बघताच “ चोरांनो, कुठे फिरताय रे? काय काय बघून आला ?”
आम्ही आपलं “अरे कसलं काय दादा, काहीच नाही बघितलं २ दिवस, नुसत्या गाड्या चालवतोय” वगैरे सांगून बघितलं.
तुमच्याशिवाय या मोहिमेमध्ये अजून कोणी इतकं फिरलं नाहीये असं म्हणत म्हणत दादा आम्हाला आतमध्ये घेऊन आला.
पहिल्यांदा कॅमेरा चार्जिंगला लावला. जेवणं सुरु झालीच होती. थोडफार जेवून घेतलं. आज बऱ्यापैकी मागं राहिलेले सगळेजण परत मोहिमेला येऊन मिळाले होते. सगळ्यांना परत एकदा भेटून बरं वाटलं. परत रात्री गप्पा रंगल्या.
आईला फोन करून मोहिमेमध्ये सुखरूप पोहोचल्याच सांगितलं.
काळे काकांना बघताच, अमर आणि मी एकमेकांकडे बघत दबक्या आवाजात “श्वास घ्या, श्वास सोडा.......... म्हणत टाळ्या दिल्या. Lol
उद्या रामाच्या गावाला आणि काशीला जायचं होतं.
रात्रीच्या सभेमध्ये परत आलेल्यांच स्वागत करण्यात आलं. परत थोडी चेष्टा मस्करी झाली.
गुरुजींनी जे सकाळी लवकर उठणार आहेत त्यांनीच आतमध्ये झोपा, जे उठणार नाहीत त्यांनी बाहेरच्या बाजूला झोपा असं सांगूनही, आम्ही बाहेर पडणारी थंडी लक्षात घेता आतमध्येच झोपायला पसंती दिली.
आणि निश्चिंतपणे पथारी पसरली.

आजचा प्रवास : ३६३.१ किमी

उद्याचा प्रवास : लखनौ – अयोध्या – सुलतानपूर – काशी

(भाग प्रचंड उशिरा टाकत आहे, जे काही जोडे, नासकी अंडी, टोमेटो द्याल ते नम्र पण स्वीकारेण. माफी असावी. )

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही आख्खीच्या आख्खी सिरीज मला खूपच आवडली, हा भाग यायचा होता हे पण विसरून गेलो होतो.
सगळ्याच भागांकरता धन्यवाद! आणि होतो उशीर कधी कधी; चालायचच, मात्र आता अजून जे क्रमशः आहे, ते दिवाळीच्या सुट्टीत पुर्ण करून टाकले म्हणजे झाले Happy

अरे वा, बरेच दिवसांनी दिस्तोएस....

मस्तच लिहिलंस रे .........

मलाही ही आख्खीच्या आख्खी सिरीज आवडली रे ..... Happy