“ पुणे ते पानिपत ” भाग १२ : कुरुक्षेत्र - वाघा बॉर्डर - सुवर्णमंदिर आणि पाऊस

Submitted by सारन्ग on 29 October, 2012 - 17:07

“ पुणे ते पानिपत ” भाग १ - http://www.maayboli.com/node/35449

“ पुणे ते पानिपत ” भाग २ - http://www.maayboli.com/node/35521

“ पुणे ते पानिपत ” भाग ३ - http://www.maayboli.com/node/35727

“ पुणे ते पानिपत ” भाग ४ - http://www.maayboli.com/node/35805

“ पुणे ते पानिपत ” भाग ५ - http://www.maayboli.com/node/35884

“ पुणे ते पानिपत ” भाग ६ - http://www.maayboli.com/node/35939

“ पुणे ते पानिपत ” भाग ७ - http://www.maayboli.com/node/36194

“ पुणे ते पानिपत ” भाग ८ - http://www.maayboli.com/node/36408

“ पुणे ते पानिपत ” भाग ९ : http://www.maayboli.com/node/36732

“ पुणे ते पानिपत ” भाग १० : http://www.maayboli.com/node/38586

“ पुणे ते पानिपत ” भाग ११ : http://www.maayboli.com/node/38694

१५ जानेवारी २०१२

आजचा प्रवास : कुरुक्षेत्र – लुधियाना – जालंधर – वाघा सीमा – अमृतसर - सुवर्ण मंदिर

आज सकाळी ५ वाजताच “ ऊठा, रे, किती वेळा उठवायचं तुम्हाला ? एकदा सांगितलेलं कळत नाही का तुम्हाला ?” अशा शब्दांनी जाग आली.
दररोज आम्हाला गुरुजींचा आवाज ऐकायची सवय, आज हे एवढ्या उर्मट भाषेत कोण उठवतंय बघण्यासाठी पांघरुनाचा एक कोपरा किंचित बाजूला करून किलकिल्या डोळ्यांनी बघितलं, तर पुण्याहून काल पानिपतला आलेले एक काका उठवत होते.
मला देखील त्यांनी उठवलं,
मी शांतपणे, पहाटे ०३३० वाजता आलोय काका, आमची सॅक पानिपतमध्येच विसरली होती. काहीच झोप झालेली नाही, कसेबसे मोजून तास-दीड तास झोपलो असेन मोहिमेला निघू द्या पुढे, आम्ही येतो मागून असे सांगितले.
ते काही नाही, सगळेजण तुझ्यासारखीच कारणे द्यायला लागतील, असे म्हणतं त्यांनी चक्क माझ्या अंगावरचे पांघरून ओढले.
माझ्या रागाचा पारा एकदम वर आणि तेवढ्यात “सारंग, आयुष्यात सर्वच ठिकाणी काही चांगले लोक मिळत नाहीत, तेव्हा लोकांशी जमवून घ्यायला शिक” हे बाबांचे शब्द एकदम आठवले आणि मी शांतपणे उठून अंथरूणाची घडी घातली. तरी पण घडी घालता घालता, आज संध्याकाळच्या सभेत बघून घेऊ, मी स्वागत आणि अमरला म्हणालो. एकंदरीत त्यांच्या या उर्मट बोलण्यावर सगळेजणच नाराज असल्याच कळलं.
बर झालं, सुरवातीपासून नव्हते बरोबर नाहीतर एकदा तरी झालीच असती……….. खडाजंगी.
आज देखील अंघोळीला कडक गरम पाणी होतं, हे म्हणजे अतीच झालं चक्क सलग तिसऱ्या दिवशी अंघोळ, लय भारी,
नेहमीप्रमाणे चक्रासन आटोपलं, अंघोळ केली आणि परत सामानाची आवराआवर करायला सुरवात केली.
अरे मोहीम निघाली पण ,,,,,कोणीतरी ओरडलं.
मग आम्ही देखील पटापट आटोपलं आणि निघालो.
बाहेर आलो तोच आझाद आणि नीलम भेटले. त्यांची आज सकाळची ट्रेन होती. मग त्यांना निरोप दिला, पुण्याला भेटूच रे म्हणत आम्ही गाडी बाहेर काढली.
स्वाग्या, सॅक आता तुझ्याकडेच ठेव, परत कुठं विसरलास तर बघ. मी सुरवातीलाच स्वागतला सांगितलं.
हो रे, तू पहिल्यांदा मोहीम कुठे गायब झालीये ते बघ.,,,,,,स्वागत

आज मोहीम फारच वेगात निघाली होती. आज अमृतसरचं सुवर्ण मंदिर गाठायचं होत ते देखील वाघा सीमा बघून. कुरुक्षेत्र ते वाघा सीमा अंतर ३३० किमी आहे. म्हणजे ४० किमी/तास या वेगात गेलो तरी ९ तास लागणार होते. वाघ सीमेवरील परेड संध्याकाळी ४ वाजता सुरु होते अस कळलं होत, त्यामुळे शक्य होईल तितक्या लवकर कुरुक्षेत्र सोडावे लागणार होते. त्यामुळे कुरुक्षेत्रावरील महत्वाची ठिकाणे बघून लगेच वाघा सीमेकडे निघू, मोहिमेबरोबर उशीर होईल यावर आमचे एकमत झाले.

कुरुक्षेत्राविषयी थोडेसे :
या शहराला एक अनन्यसाधारण असे ऐतिहासिक आणि अध्यात्मिक महत्व आहे. पूर्वी हा प्रदेश पंजाब मध्ये होता. आत्ता तो हरयाणा राज्यामध्ये येतो. महाभारताची ऐतिहासिक लढाई ( ई.स.पू. ३१०२) याच ठिकाणी झाल्याचे मानले जाते. ऋग्वेद आणि यजुर्वेद या वेदांमध्ये या ठिकाणाचा अनेक वेळा उल्लेख आढळतो. जेव्हा कुरु राजा या ठिकाणी आला तेव्हा हे शहर उत्तर्वेदी या नावाने ओळखले जात असे. या शहरावर अनेक राजांनी राज्य केले. सरस्वती आणि द्रिशद्वती या दोन नद्यांच्या मध्ये असलेली ४८ एकर भूमी राजा कुरुने सोन्याच्या नांगराने नांगरली.कुरु राजावर प्रसन्न होऊन विष्णूने त्याला २ वर दिले. पहिला हा की हि भूमी कायम स्वरूपी पवित्र भूमी म्हणून तुझ्या नावाने ओळखली जाईल आणि दुसरा असा की या ठिकाणी मरण पावणारा स्वर्गात जाईल. भरत वंश या ठिकाणी आला आणि स्थिरावला. कुरु हा भरत वंशातील. ई.स.पू. १९०० पासून या ठिकाणी वाहणारी सरस्वती नदी आटल्याचे सांगतात.
पूर्वीची नावे : उत्तर्वेदी, ब्रह्मवेदी आणि
धर्मक्षेत्र – कुरुने या ठिकाणी धर्माचे बीज रोवले म्हणून धर्मक्षेत्र
सम्राट अशोकाने, त्याच्या कारकीर्दीत हे विद्येचे केंद्र म्हणून जगभरातील लोकांसाठी खुले केले. पुढे मोघलांच्या हल्ल्यानंतर या भूमीचे महात्म्य नष्टप्राय झाले.

महत्वाची स्थळे :
ज्योतिसर : ज्या ठिकाणी कृष्णाने अर्जुनाला गीता सांगितली ते ठिकाणं.
ब्रह्मसरोवर : दरवर्षी सोमवती अमावस्येला आणि सूर्य ग्रहणाच्या वेळी लाखो भाविक या सरोवरात पापमुक्त होण्यासाठी आणि जन्म-मृत्यूच्या फेरयामधून सुटका होण्यासाठी स्नान करतात. या सरोवराचा महाभारतात तसेच वामन पुराणामध्ये उल्लेख आढळतो. हे प्रचंड मोठे सरोवर आहे आणि याच ठिकाणी कृष्ण अर्जुनाला गीता सांगत असतानाचे रथातील प्रचंड मोठे शिल्प आहे. हे शिल्प पुण्यातील शिल्पकार श्री. सुतार यांनी २००७ मध्ये बनवले आहे.
सन्निहत सरोवर : या सरोवरात स्नान कारणे पवित्र मानले जाते. “अश्वमेध यज्ञ” केल्याने जी पुण्यप्राप्ती होते, तीच पुण्यप्राप्ती अमावस्येला किंवा ग्रहणात येथे स्नान केल्यास होते असा समज आहे.
भद्रकाली मंदिर : हे भारतातील ५२ शक्ती पीठांपैकी १. आणि हरियाणा राज्यातील एकमेव शक्तीपीठ.
याचा इतिहास असा की शंकराने दक्षाच्या मुलीबरोबर म्हणजेच सतीबरोबर, दक्षाच्या इच्छेविरुद्ध विवाह केला. त्यामुळे नाराज झालेल्या दक्षाने घरच्या यज्ञकार्यात सती आणि शिवाला बोलावले नाही, तरी देखील घराचे कार्य म्हणून सती घरी गेली. दक्षाने सर्व पाहुण्यांसमोर शिवाची निर्भत्सना केली, त्यामुळे अपमानित झालेल्या सतीने यज्ञात प्राण त्यागले. हा आघात सहन न झाल्याने दक्षाचा वध केला आणि यज्ञाचा विध्वंस केला आणि सतीचे शव हाती घेऊन त्याने तांडव सुरु केला. या तांडवामुळे घाबरलेले देवं विष्णूला शरण गेले. विष्णूने सुदर्शनचक्र वापरून सतीच्या शवाचे ५२ तुकडे केले. हे तुकडे ज्या ज्या ठिकाणी पडले त्या ठिकाणांना शक्तीपीठ म्हणतात. येथे सतीचा “घोटा” पडला असे म्हणतात.
महाभारतातील युद्धाला सुरवात होण्यापूर्वी पांडवांनी या देवीची पूजा केली होती. हि देवी “जागृत” असल्याचे मानले जाते. ( सर्वच शक्तीपीठे जागृत आहेत )
याच्याच जवळ स्थानेश्वर मंदिर आहे.
स्थानेश्वर मंदिर : असे म्हणतात की महाभारताच्या युद्धाअगोदर कृष्ण आणि अर्जुनाने या ठिकाणी शंकराची उपासना करून आशीर्वाद मिळवला होता. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे गुरुद्वारा आणि मंदिर यांच्यामध्ये एक सामाईक भिंत आहे.
या मंदिरामुळे या भागाला थानेसर असे नाव पडले. ही सम्राट हर्षवर्धनाची राजधानी होती.
शेख चेहलीचा मकबरा : हा भाग भारतीय पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. हा मुघल काळात सुफी संत शेख चेहलीची आठवण म्हणून बांधला. शेख चेहली हा मुघल राजपुत्र दारो शिखाचा अध्यात्मिक गुरु होता. अर्थात हा समज खोटा आहे असे म्हणतात. मुघल राजपुत्र दारो शिखाचा खरा अध्यात्मिक गुरु लाहोरचा हजरत शेख मियाँ मीर साहीब होता असे म्हणतात.
( हा शेख चेहली आणि आपला शेख चिल्ली एकच का ? आणि एकच असेल तर, हा तर संत होता, आमचा शेख चिल्ली म्हणजे झाडाच्या फांदीवर बसून तीच फांदी तोडणारा :))
कुरुक्षेत्र परिसरात चार प्राचीन इतिहास सांगणारी संग्रहालये आहेत.
ट्रेकर्ससाठी : कुरुक्षेत्रापासून काही किमी अंतरावर अमीन नावाचे गाव आहे जिथे अभिमन्यूच्या किल्ल्याचे अवशेष आज देखील बघावयास मिळतात.

ब्रह्मसरोवर :
12DSCN3551.JPG12DSCN3558.JPGज्योतिसर :
12DSCN3553.JPG12DSCN3563.JPG

वाटेत एका ठिकाणी असणारी कृष्णाची मूर्ती :
12DSCN3579.JPG

ज्योतिसर येथे फडकणारा तिरंगा :
12DSCN3588.JPG

हेच ते शिल्प, पुण्यातील शिल्पकार श्री. सुतार यांनी २००७ मध्ये बनवले आहे.
12DSCN3599.JPG12DSCN3605.JPG12Kurukshetra.JPG

माग मी म्हणाल्याप्रमाणे सगळा भारत पालथा घालायचा म्हटलं तरी १ जन्म कमी पडेल. आम्हाला काहीही करून संध्याकाळी ४ च्या आत वाघा सीमा गाठायची होती. त्यामुळे आम्ही ज्योतिसर आणि ब्रह्मसरोवर बघून कुरुक्षेत्राचा निरोप घेतला.

हेच ते प्रवेशद्वार ज्याच्या दर्शनासाठी आमचे डोळे त्या रात्रभर आसुसलेले होते :
12DSCN3610.JPG

इतक्या सकाळी उठून पटापट आवरून निघालो तरी कुरुक्षेत्र सोडता सोडता ०८४५ वाजले होते. साधरण ३३० किमी चा पल्ला गाठायचा होता त्यामुळे गाडी मुख्य रस्त्याला लागताच सुसाट सोडली. आत मोहिमेला थेट मुक्कामाच्या ठिकाणी भेटू असं ठरलं. मोहिमेचा वेग बघता मोहीम काही ४ च्या आत वाघा सीमेवर पोहचणार नाही याची आम्हाला खात्री होती.

गाडी मध्ये पेट्रोल टाकावे लागणार होते, त्यामुळे जसा पेट्रोल पंप दिसला तशी मी गाडी पंपावर घातली. तिथेच बाजूला PUC काढून मिळत होते, मग अनायसे आलोच आहे तर घ्या काढून, या हिशेबाने ते देखील काढले. पाऊस उघडलेला होता. पेट्रोल, PUC झाल्यावर तिथल्याच एका टपरीवर चहापान कार्यक्रम उरकला आणि आता कुठे थांबू नका रे, असं स्नेहल-रुपेश ला सांगत आम्ही वाघा सीमेच्या दिशेने निघालो.

कुरुक्षेत्रापासून लुधियाना १६० किमी वर आहे. त्यामुळे दुपारी १ वाजेपर्यंत सहज लुधियाना गाठू असं माझा अंदाज होता.

कुरुक्षेत्रापासून ३०-४० किमी पुढे आलो तोच पावसाची रिपरिप सुरु झाली. कॅमरा, मोबाईल, पाकीट इत्यादी महत्वाच्या वस्तू प्लास्टिकच्या पिशवीमध्ये व्यवस्थित गुंडाळून सॅक मध्ये ठेवल्या गेल्या. अगोदरच ठरल्याप्रमाणे नोकियाचा ११०० बाहेर आला. फोन असावा तर असा. Happy

पावसाने रिमझिम रूप सोडून मुसळधार रूप धारण करायला सुरवात केली होती. हेल्मेटच्या काचेतून बाहेरचं दिसेनासं व्हायला लागल्यावर मात्र गाडी एका छोट्या हॉटेल जवळ थांबवली. पाऊस कमी झाल्याशिवाय निघण्यात अर्थ नव्हता. योगायोगाने संग्राम-रोहन पण तिथेच थांबलेले दिसले. मोहीम अजून बरीच मागं होती. तोच जयदादाची गाडी दिसली, बहुतेक त्याला आम्ही थांबलेलो दिसलो असू. मग त्याने पण गाडी बाजूला घेतली. काही वेळाने पाऊस कमी झाला आणि आमच्या तीनही गाड्या परत वाघा सीमेच्या दिशेने दौडू लागल्या. आता मात्र ३०-४० किमी/तास या वेगाने जाण्याशिवाय पर्याय नव्हता. रस्त्याचं काम पण चालू होतं. परत काही वेळाने पाऊस सुरु झाला, संग्राम-रोहन दिसेनासे झाले होते, पण जयदादाची आणि आमची गाडी एकमेकांबरोबरच होत्या. घड्याळात बघितलं, १२३० वाजत आले होते, लुधियाना अजून ८० किमी वर होतं. सकाळपासून काही खाल्लं देखील नव्हतं, त्यामुळे आता जेवण करूनच पुढे निघू म्हणतं दोन्ही गाड्या एका हॉटेल शेजारी उभ्या केल्या. पावसाचा जोर देखील बराचं वाढला होता. संग्राम-रोहनला फोन केला तर साहेब लुधियानापासून ५०-६० किमीवर होते. तुम्ही निघा पुढे, आम्ही जेवण करून घेतोय, तुम्हीदेखील ढकला पोटात काहीतरी, लुधियानामध्ये भेटू म्हणत फोन ठेवला.

मस्तपैकी थंड वातावरण असल्यामुळे, चिकनवर ताव मारायला मजा आली. जेवण वैगरे होऊन निघायला २ वाजले. आता जेवल्यानंतर मी गाडी चालवायला घेतली. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १ चं काम चालू होतं.
गाडी ४० किमी/तास च्या वेगात आरामात चालली होती.

……………………………………………………..आणि स्वागतने, एकदम मागून पाठीवर थोपटलं.
डोळे उघडले तर गाडी रस्ता सोडून डाव्या बाजूला दुभाजकाच्या मध्ये आली होती. गाडी इकड का घालतोयस ?
अरे, खालच्या रस्त्यावर घेतोय, तिकडं रहदारी नाहीये.........मी एकंदरीत परिस्थितीचा अंदाज घेत उत्तर दिलं.
प्रत्यक्षात हेल्मेट, जर्किन आणि इतर साधनांमुळे, अंग गरम झालं होतं आणि बाहेर गारठवणारी थंडी, रात्रीची कशीबशी दीड तासाची झोप आणि वरून तंदुरी चिकनचा फडशा. अशा परिस्थितीत डोळ्यावर झापडं न येईल तरचं विशेष.

मनातल्या मनात देवाशे शतशः आभार मानले. हेल्मेटची काच उघडली. जसा थंड वर चेहऱ्यावर आला तशी झोप उडाली. स्वागतला अजूनदेखील त्यादिवशी काय झालं हे माहित नाही. अजून लेक्चर ऐकायची माझी मुळीच इच्छा नव्हती.
गुपचूप परत गाडी मूळ रस्त्यावर आणली. जयदादा-दिपक बरोबरचं होते. लुधियाना गाठता गाठता ३ वाजले होते. सगळेजणं पूर्णपणे भिजून गेलो होतो. चिखलामुळे पॅन्टची अवस्था तर विचारूच नका. गुडघ्यापासून खालपर्यंत पूर्णपणे चिखलाने भरली होती. लुधियानामध्ये परत एकदा पावसाने आमची परीक्षा घ्यायला सुरवात केली.
मोहिमेला फोन केला तर पावसामुळे मोहीम मार्ग बदलून फतेहगढ साहिबच्या रस्त्याला लागणार होती. आता आम्ही इकडे पूर्णपणे संभ्रमात होतो. मोहीम उद्या याच वाटेने पुढे जाईल, तर मोहिमेला सकाळी भेटू असे ठरले. राहण्यासाठी लॉज बघितला. सगळ्यांचेच कपडे पूर्णपणे भिजलेले होते म्हणून मग कपडे खरेदी करू म्हणून तिथल्या एका कपड्याच्या शो-रूम मध्ये घुसलो. आमचा अवतार बघूनच तिथल्या मालकाबरोबर कुठून आला ? कुठे निघालात इत्यादी प्रश्न-उत्तरे झाली. त्या सदगृहस्थाने आम्हाला गरमागरम कॉफी आणून दिली. हे बहुतेक थंडीमुळे थडथड उडणाऱ्या दिपककडे बघून दिली असावी. दीपकची थंडीमुळे फारच वाईट अवस्था झाली होती.संग्राम-रोहनला फोन केला तर ह्या लोकांनी जालंधर गाठले होते. जालंधर अजून ६० किमी होते. आम्ही आज इथेच राहणार आहोत उद्या सकाळी मोहिमेबरोबर निघू, तुम्ही आज तिकडेच मुक्काम करा, कार्यक्रमात काही बदल झाला तर कळवतो म्हणत फोन ठेवला.

आणि इतक्यात निखिलचा फोन आला, मोहीम उद्या फतेहगढ साहिबवरून हरिद्वारला निघणार होती. अमृतसर-वाघा सीमा कार्यक्रम रद्द करण्यात आला होता. निख्या, सांगतो तुला काय होत ते ? म्हणत फोन कट केला. पटकन सॅक मधून ठिकाणे आणि अंतरे लिहिलेला कागद काढला.
स्वाग्या, इथून वाघा सीमा १७० किमी आहे आणि वाघा ते हरिद्वार ४४० किमी आहे, म्हणजे उद्या मोहिमेला अमृतसर-वाघा सीमा बघून गाठायचं असेल तर उद्या कमीत कमी ६१० किमीचा पल्ला कापावा लागेलं. पाऊस आणि इतर सगळ बघता हे अवघड आहे असे वाटतयं रे, उगाच रिस्क नको. मी एका दमात बोललो.
जयदादाची कपडे खरेदी झाली होती, त्याला देखील सगळं सांगितलं. गाड्या फतेहगढ साहिबच्या दिशेने वळवण्यातच शहाणपणा होता. स्वागत आणि मला, आम्हा दोघांनाही फार वाईट वाटलं, सुवर्णमंदिर आणि वाघा सीमेवरची परेड हुकणार होती.
जाऊ दे रे, स्वाग्या .......लेह-लडाख ला येताना नक्की करू, प्रॉमिस, म्हणत मी स्वागतच मन वळवण्याचा प्रयत्न केला.
ठीक आहे. तो देखील तयार झाला आमच्यापुढे दुसरा कुठला मार्ग नव्हता. प्रत्यक्षात आजचा प्रवास
कुरुक्षेत्र – लुधियाना – जालंधर – वाघा सीमा – अमृतसर - सुवर्ण मंदिर असा तर उद्याचा
अमृतसर – सरहिंद - फतेहगढ साहिब -अंबाला- हरिद्वार असा होता.
असू दे, जे झालं ते झालं म्हणत परत आम्ही गाड्या फतेहगढ साहिबच्या दिशेने सोडल्या. फतेहगढ साहिब ते लुधियाना अंतर ६० किमी आहे. पावसाचा जोर आता कमी झाला होता पण रिपरिप चालूच होती. वाटेतच एका ठिकाणी माझी नजर एका ढाब्याच्या बाहेर तळल्या जाणाऱ्या कोंबडीकडे गेली, मग अर्थातच थंडीचा फायदा उठवण्यात आला आणि कोंबडीला पोटात ढकलेले. सरहिंदच्या इथे डाव्या बाजूला वळायचे होते, मागे बघितले तर जयदादा-दीपक दिसत नव्हते. मग एका ठिकाणी गाडी बाजूला घेऊन त्यांची वाट बघत बसलो. थोड्याच वेळात ते देखील आले, मग चहा घेऊन पुढे निघालो. साधारण ७ च्या सुमारास फतेहगढ साहिब गुरुद्वारामध्ये पोहचलो.

फतेहगढ साहिब विषयी थोडफार :
फतेहगढ साहिब, पंजाबच्या उत्तर-पश्चिमेला असलेला एक जिल्हा. शीख लोकांसाठी या शहराला एक वेगळेच महत्व आहे. या ठिकाणी सरहिंदचा सेनापती वजीर खान याने १२ डिसेंबर १७०५ रोजी, शीखांचे दहावे गुरु गुरु गोविंद सिंग यांच्या २ कोवळ्या मुलांना, साहीबजादा फतेह सिंग आणि साहीबजादा जोरावर सिंग यांना या ठिकाणी भिंतीमध्ये चिणून मारले. बहुतेक यामुळेच या ठिकाणाचे नाव फतेहगढ साहिब असे पडले असावे. सर्वात हृदयद्रावक गोष्ट अशी की साहीबजादा फतेह सिंग अवघ्या ६ वर्षाचा पण नव्हता ( जन्म : १६९९) तर साहीबजादा जोरावर सिंग फक्त ८ वर्षाचा होता. (जन्म : १६९६). आणि या दोघांचा गुन्हा काय तर यांनी धर्मांतराला नकार दिला. लिहिताना पण अंगावर काटा आलायं.
या ठिकाणी १७१० मध्ये शिखांनी बंडा बहादूर याच्या नेतृत्वाखाली बालबनच्या वर विजय मिळवला.
गुरुद्वारा ज्योती स्वरूप साहीब हा फतेहगढ साहिब पासून १ किमी अंतरावर आहे. येथे माता गुजरी, गुरु गोविंद सिंग यांची आई आणि साहीबजादा फतेह सिंग आणि साहीबजादा झोरावर सिंग यांना पुरण्यात आले होते. वजीर खानने साहीबजादा फतेह सिंग आणि साहीबजादा झोरावर सिंग यांना मारल्यानंतर त्यांच्या अंतिम विधी करण्यास जागा देण्यासाठी त्या जमिनीवर सोन्याची नाणी पसरून मागितली होती. त्यावेळेस राजा तोडर मल याने सोन्याच्या नाण्यांची जमीन झाकून जागा घेतली होती. त्यामुळे तोडर मलविषयी शीखांमध्ये खूप आदर आहे. पुढे तोडर मलला “ दिवान” हा किताब देण्यात आला.
ह्या शहराभोवती चार ऐतिहासिक दरवाजे आहेत. प्रत्येक दरवाजा हा शिखांच्या इतिहासात विशेष महत्व असणारया व्यक्तीच्या स्मरणार्थ उभारला आहे.
१. दिवान तोडर माल ‘
२. नवाब शेर मोहम्मद खान
३. बाबा बंडा सिंग बहादूर
४. बाबा मोती राम मेहरा
हे चौघेही जरी वेगवेगळ्या जाती-धर्माचे असले तरी हे त्यावेळच्या सर्वधर्मसमभावाची साक्ष देतात.

ट्रक बाहेरचं उभा होता. परत एकदा मोहिमेतले लोक भेटले. सर्वांचाच मूड गेला होता पण इलाज नव्हता. बॅगा घेऊन राहण्याच्या ठिकाणी गेलो. कपडे बदलले. अशा वेळी घरची हमखास आठवण येते. आता इथे हातात गरमागरम चहाचा कप देणारी आई नव्हती. अशाच एखाद्या क्षणी आपल्याला त्या माउलीची किंमत कळते. खोलीमध्ये गुरुजी सर्वांना पानिपतच्या युद्धाचे वर्णन सांगत होते. मग आम्ही देखील खोलीत घुसलो आणि अंगावर पांघरून घेऊन वर्णन ऐकू लागलो. आपल्या लोकांमध्ये परत आल्याचा एक वेगळाच आनंद वाटत होता. मग शिवाजी महाराजांपासून - पेशव्यांपर्यंत सर्व विषयांवर चर्चा झाली. प्रामाणिकपणे सांगायचं तर रात्री गुरुद्वारामध्ये जेवायचा मूड नव्हता, मग बाहेर जाऊन काहीतरी खाऊन येऊ असं ठरलं. मी कुणाशीतरी कुठल्यातरी विषयावर बोलत बसलो आणि खाली येऊन बघतो तो आमचा ग्रुप गायब. स्वागतला फोन केला तर अरे गुरुद्वाराच्या बाहेर येऊन पहिल उजवं वळण घे, वाटेतच एका ठिकाणी बरेच खाण्याचे गाडे उभे आहेत, तिथेच आहोत सगळे. गाडी बाहेर काढली आणि पहिलं उजवं वळण घेतलं, पावसाला पण बरोबर याच वेळी यायचे होते, काही क्षणातच मुसळधार पाऊस सुरु झाला आणि मी ज्या रस्त्याला लागलो होतो तो तर एकदम निर्जन, दोन्ही बाजूला दाट झाडी होती, आपण चुकीच्या रस्त्याला लागलो आहोत याची एव्हाना खात्री झाली होती. रस्त्यावर चिटपाखरू नव्हतं. बर, विचारणार तरी कुणाला? मनातल्या मनात सगळ्यांना येथेच्छ शिव्या घातल्या. साले, ५ मि. थांबू शकत नाहीत का ? इतक्यात दुरवरुन एक दुचाकी येताना दिसली. बाईक थांबवून बाईकचा अप्पर-डीप्पर मारतं राहिलो. पाऊस चालूच होता. थांबले तर बघू, पण चक्क थांबले. रस्ता विचारला असता, भाईजान, आप गलत रस्ते लग गये हो, हमारे पिछे आ जाओ. त्या भल्या गृहस्थांनी अगदी हे सगळे जिथे थांबले होते तिथपर्यंत पोहचवले. त्यांचे आभार मानले आणि मोर्चा भुर्जीच्या गाड्याकडे वळवला.

बादवे उर्फ रच्याकने – उत्तर भारतात, विशेषतः उत्तर प्रदेशात लोकांना अप्पर-डीप्परचा अर्थ माहित नाही कि काय देव जाणे, पण आपण कितीही अप्पर-डीप्पर मारले तरी हे आपले अप्पर मारूनच चालले असतातं. शिवाय यांचे दोन्ही आरसे बाईकच्या आतील भागात वळवलेले असतात, त्यामुळे मागून कोण येत आहे आणि मागचा काय करत आहे याचा या लोकांना पत्ताच नसतो, तरी लोकांनी उत्तर भारतात गाड्या, विशेषतः बाईक चालवताना योग्य ती खबरदारी घ्यावी.

पोटभर भुर्जी पाव खाऊन परतलो. रात्रभर अमृतसरला जायचे का नाही ? या विषयावर अनेक जणांमध्ये अनेक चर्चा झाल्या आणि नेहमीप्रमाणे त्यातून काहीच निष्पन्न न होता सर्वजण झोपी गेले.
आजचा प्रवास : २३९.२ किमी
उद्याचा प्रवास :
फतेहगढ साहिब- लुधियाना – जालंधर – वाघा सीमा – अमृतसर - सुवर्ण मंदिर- फतेहगढ साहिब
१६ जानेवारी २०१२

चला उठा, चला उठा, वाघा सीमेवर जायचंय, वाघा सीमेवर जायचंय असा आवाज कानावर पडताच खाडकन डोळे उघडले. बघतो तो “स्वयंघोषित कार्यकर्ता” त्याच्या नावाला साजेशी दवंडी पिटत होता. चौकशी अंती काहीजण वाघ सीमेवर जाणार असल्याचं कळलं, जे वाघ सीमेवर जाणार होते ते आज परत मुक्कामाला फतेहगढ साहिब मधेच येणार होते आणि नंतर मोहिमेला पुढे भेटणार होते.
आणि अचानक मला काय स्फुरण चढले देव जाणे, पण आज काहीही करून वाघ सीमा आणि अमृतसरच सुवर्णमंदिर बघूनच यायचं मी ठरवलं. एका दिवसात इतक्या लांबचा पल्ला अशक्य नव्हता पण फार रिस्की होता, फतेहगढ साहिब ते वाघ सीमा – २३० किमी आहे, म्हणजे जाऊन येऊन ४६० किमी होणार होते, त्यात पाऊस चालूच होता. त्यामुळे येथून एखादी गाडी घेऊन जावी आणि त्यानेच आज रात्री परत यावे असं ठरले. मी पटकन बाईक काढली, रुपेश आणि मी, गाडी घेऊनच येतो, फक्त ८ जण तयार राहा.
फतेहगढ साहिबच्या बाजारात गेलो. गाडी शोधायला जास्त वेळ लागला नाही. पण मांडवली करायला मात्र बराचं वेळ गेला. चक्क ६,००० म्हणत होते. आता आम्हाला किती किमीला किती घेतात, चालकाला किती पैसे द्यायचे असतात, रात्रीचा चार्ज काय असतो, गाडी किमीवर घेतली तर बरी पडते का दिवसावर याचा चांगलाच अभ्यास असल्याने जास्तीत जास्त ३५०० रु. मध्ये सगळं भागलं पाहिजे होते, पण शेवटी अडला हरी ..... या न्यायाने मी ४००० रु मध्ये गाडी ठरवली आणि टोल आम्हीच भरणार होतो. गाडी घेऊन गुरुद्वारा मध्ये आलो. सगळेजण तयार होते, असं म्हणालो असतो तर तो आमचा ग्रुप कसला? मग सगळ्यांना एक एक करून गोळा करून आणले. त्यात अमर मोहिमेच्या मागे एकाला सोडायला गेला होता, त्याला अजून अर्धा तास लागला आणि अशी सगळी साग्रसंगीत जमवाजमव आटपून आम्ही १० वाजता फतेहगढ साहिब सोडले.
६०-७० किमी पुढे आलो असतानाच, गाडीचा ड्रायव्हर तुम्हाला तिथे सोडून मी परत येणार, नुसते जायचेच ४००० रु. आहेत, परत यायचं झालं तरी तेवढेच लागतील असं म्हणायला लागला. आता मात्र सगळ्यांचच डोक सरकलं. पण भांडून फायदा नव्हता. मी सगळ्यांना शांत राहायला सांगितलं. नशीब, त्यला मराठी कळतं नव्हतं. नाहीतर लोकांनी वापरलेले शब्द याला कळाले असते तर तो आम्हाला तेवढ्याच पैशात, वाघाच काय लाहोर पर्यंत घेऊन जायला तयार झाला असता. Happy

अशा वेळी भांडून उपयोग नव्हता, मी त्याला अतिशय सौम्य शब्दात, देखो भाई, सबसे पहले आप ४००० रु. मै राजी हो गये थे, टोल हम भरणे वाले थे. हमारा फतेहगढ साहिब से वाघा बॉर्डर और फिर वापस, ऐसा डीसाईड हो गया था. कोई नही, मेरी सुनने मी गलती हो गयी होगी, आप हमे वापस फतेहगढ साहिब ले चलो, आप की गड्डी जिधर खडी थी वहा पे और भी लोग थे, हम लोग उन्हमेसे किसी की गाडी ले लेंगे. सुना था, सरदार बहोत जबान के पक्के होते है. छोडो अभी, आप घुमावो गड्डी वापस...
तुम लोग आज रात वही रुकने वाले हो क्या ?
नही यार ...मी
अच्छा, फिर तो मै आप लोगोको लेके आ जाता हू ! मुझे लगा आप उधर रुकने वाले हो !
बहुतेक शेवटच्या वाक्याचा परिणाम असावा. शिवाय आम्ही गाडी परत घेऊन गेलो तर तिथल्या बाकीच्या लोकांनीच त्याला शिव्या घातल्या असत्या. कारण त्यांच्या समोरच सगळ काही ठरलं होतं. हा आपला, लुटता आल तर लुटावं या न्यायानी त्याने प्रयत्न करून बघितलं.
आता पाऊस चांगलाच वाढला होता. त्यात साहेबांच्या गाडीचा वायपर काम करत नव्हता. मग तो दुरुस्त करण्यात अर्धा तास मोडला. डॉक्टरांनी आणलेल्या भडंगावर मात्र सगळ्यांनीच ताव मारला. वाटेत जेवायला देखील आम्ही कुठे थांबलो नाही.
तरी देखील वाघा सीमेवर पोहचता पोहचता संध्याकाळचे ५ वाजलेच. गाडी लावली आणी खाली उतरलो नेमकी त्यावेळी परेड संपली होती. खूप वाईट वाटलं, एवढी धावपळ करून आलो तरी परेड चुकली होती. विशेषतः बाकिच्यांसाठी. माझ्यासारखा भटका काय ती कधीतरी परत बघेलच. पण आमच्या बरोबर काही वयस्कर देखील होते, की त्यांना परत यायला मिळेल का नाही देव जाणे? परेड चुकली तरी वाघा सीमेपर्यंत पोहचल्याच एक वेगळं समाधान होतंच. मोहिमेमधील अजून काही लोक तिथे भेटले. तिथं काही फोटो काढले आणि परत अमृतसरच्या दिशेने निघालो.

12DSCN3628.JPGवाघा सीमेविषयी :
हा भारतामधून पाकिस्तान मध्ये जाण्याचा एकमेव मान्यताप्राप्त मार्ग. हा रस्ता अमृतसर आणि लाहोर या दोन शहरांना जोडतो. या रस्त्याला “Grand Trunk Road” म्हणून ओळखतात. १९४७ मध्ये वाघा हे गाव फाळणीनंतर विभागले गेले. आता वाघा हे पाकिस्तान मध्ये आहे. आपल्या बाजूला अटारी हे गाव आहे. त्यामुळे या सीमेला अटारी सीमा देखील म्हणतात.
येथे तुम्हाला भारतमाता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्थान जिंदाबाद अशा आसमंत दुमदुमून टाकणाऱ्या घोषणा ऐकायला मिळतील. जाताना जमलं तर तिरंगा घेऊन जावा.
दररोज सायंकाळी होणारी परेड बघण्यासारखी असते. परेड उन्हाळ्याच्या दिवसात ५ ला तर थंडीच्या दिवसांमध्ये सायंकाळी ४ ला सुरु होते. परेड बघण्यास प्रचंड गर्दी होत असल्याने, दुपारी ३ वाजता ठिकाणं गाठल्यास उत्तम.
६ वाजले होते. तासाभरातच अमृतसर गाठले. शूज वैगरे काढून ठेवले. कुपन्स घेतली आणि सुवर्णमंदिराकडे निघालो. तिथे जवळच जालियनवाला बाग आहे पण ते देखील बंद झालं होतं.

जालियनवाला बागेविषयी :
१३ एप्रिल १९१९ रोजी, डॉ. सत्यपाल आणि डॉ. सैफुद्दीन किचलू या दोन स्वातंत्र्य सैनिकांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी आणि रॉलेट अॅक्टचा निषेध करण्यासाठी एक सभा घेण्यात आली.
काय होती रॉलेट अॅक्ट :
८ मार्च १९१९ रोजी ब्रिटीश सरकारने हि अॅक्ट लागू केली. भारतीयांच्या क्रांतिकारी भावनेला चिरडण्यासाठी आणि राष्ट्रीय भावनेला संपण्यासाठी ब्रिटीश सरकारने “ सिडनी रॉलेट” याच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली. समितीने सुचवल्यानुसार केंद्रीय विधानमंडळावर फेब्रुवारी मध्ये, २ विधेयके लागू करण्यात आली.
या अॅक्टचा निषेध करताना महात्मा गांधीनी ब्रिटीश सरकारला “सैतानी लोक” असे उद्देशले. रॉलेट अॅक्ट “काळा न्याय” या नावाने देखील प्रसिद्ध होती.
या अॅक्टला देशभरातून विरोध होऊन देखील हि विधेयके लागू करण्यात आली. या विधेयाकांनुसार मॅजिस्ट्रेटला, कोणत्याही संशयास्पद व्यक्तीला अटक करण्याचा आणि त्याच्यावर खटला दाखल करण्याचा अधिकार देण्यात आला. अशा प्रकारे सरकार कोणत्याही निर्दोष व्यक्तीला अटक करू शकत होती. या कायद्यानुसार आरोपीला न्यायालयात नेल्याशिवाय तुरुंगात डांबू शकत होती.
त्यानंतर तासाभराने हिंदू आणि शीख बांधव बैसाखी सण साजरा करण्यासाठी, सुमारे १५ ते २० हजार लोक एकत्र जमले होते, पण त्याचवेळी मार्शल लॉ लागू करण्यात आला होता आणि ५ किंवा अधिक जणांच्या जमावाला बंदी होती. यावेळी अचानक इंग्रजांचा ब्रिगेडियर जनरल डायर याने ६५ गुरखा आणि २५ बलुची सैनिकांना घेऊन अमृतसर येथील जालियानवाला बागेमध्ये जमलेल्या निशस्त्र लोकांवर रायफलींच्या १६५० फैरी झाडल्या. अधिकृतपणे मृतांचा ३७९ तर जखमींचा ११०० असा आकडा जाहीर करण्यात आला तर प्रत्यक्षात १,००० हून अधिक लोक मृत्युमुखी पडले.
जालियानवाला बागेमध्ये प्रवेश करण्यास असलेले अरुंद प्रवेशद्वार डायरने बंद केले होते. बाकीची बहुतांशी द्वारे वापरत नसल्याने लोकांना पळण्यास मार्ग सापडला नाही. अनेकांचा विहिरीमध्ये पडून मृत्यू झाला. हल्ल्यानंतर विहिरींमधून सुमारे १२० मृतदेह बाहेर काढण्यात आले. कर्फ्यू लागू केल्याने जखमींना मदत करण्यास कोणीही पुढे आले नाही वं अनेक जखमींचा त्या रात्री मृत्यू झाला.
या घटनेची सफाई देताना डायरने “ गोळीबार हा सभा तहकूब करण्यासाठी नाही तर, आदेश न पाळणाऱ्या भारतीयांना धडा शिकवण्यासाठी केला” असे म्हटले. या घटनेनंतर डायरला पदावरून हटवण्यात आले आणि त्याला सक्तीने निवृत्ती देण्यात आली. इंग्रजांच्या भारतातील वास्तव्याला सुरुंग लावण्यामध्ये या घटनेने मोलाचा वाटा आहे.
डायर इंग्लडमध्ये परतल्यावर त्याचा मोठा सत्कार करण्यात आला आणि त्याला २६,००० पौंड रक्कम बक्षीस म्हणून देण्यात आली.
या हल्ल्याची चौकशी करण्यासाठी हंटर समिती नेमण्यात आली होती. पण वरिष्ठांचा सहभाग असल्यामुळे डायर सुटला.

डायरने चौकशीदरम्यान केलेली काही व्यक्तव्ये :
हंटर : तुला सभेविषयी केव्हा कळाले ?
डायर : दुपारी १२४० ला
हंटर : मग तू सभा थांबू शकत होतास ?
डायर : हो
हंटर : तू गोळीबार करायच्या उद्देशाने बागेमध्ये गेला होतास ?
डायर : हो, जमाव जमलेला असेल तर मी गोळीबारच करायचा या उद्देशाने तिकडे गेलो होतो. मी सभा थांबवू शकलो असतो, पण लोक परत एकत्र आले असते आणि माझ्यावर हसले असते. मी काय मूर्ख आहे का माझा अपमान करून घ्यायला ?
जस्टीस रान्कीन : जर का शस्रास्त्रांनी भरलेल्या गाड्या, आत मध्ये घुसवायला पुरेशी जागा असती तर तुम्ही मशीन गन वापरल्या असत्या ?
डायर : मला वाटतं, हो
चिमणलाल सेतलवाड : मग तर कितीतरी लोक मृत्युमुखी/जखमी झाले असते ?
डायर : अर्थात.
समिती : जखमींना दवाखान्यात हलवण्यात आले नाही ?
डायर : अर्थात नाही, ते माझे काम नाही, दवाखाने उघडे होते, ते जाऊ शकत होते.
का केला होता मार्शल लॉ लागू ?

डॉ. सत्यपाल आणि डॉ. सैफुद्दीन किचलू या दोन स्वातंत्र्य सैनिकांच्या सुटकेची मागणी करण्यासाठी एक जमाव, अमृतसरच्या डेप्युटी कमिशनरच्या घराकडे निघाला होता. पण वाटेत सैन्याच्या एक तुकडीने त्यांच्यावर बेछुट गोळीबार केला. अर्थातच या हल्ल्याचे प्रतिसाद शहरात सर्वत्र उमटले. टाउन हॉल, बँकाच्या इमारती, तारघर, रेल्वेचे गोदाम यांना आगी लावण्यात आल्या. रेल्वे गोदामाच्या इंग्रजी रक्षकाला मारहाण करण्यात आली, काही बँक कर्मचारी लावलेल्या आगीत ठार झाले, एका इंग्रजी नागरिकाचा भर रस्त्यात खून करण्यात आला. एका इंग्रजी महिलेवरदेखील प्राणघातक हल्ला करण्यात आला, पण भारतीयांनीच तिचे प्राण वाचवले. ब्रिटीश सैनिकांनी दिवसभर केलेल्या गोळीबारात सुमारे २० स्वातंत्र्यसैनिक शहीद झाले.
यानंतरचे २ दिवस अमृतसर शांत होते. पण हा उद्रेक आजूबाजुच्या शहरांमध्ये पसरला. इतर भागांमध्ये देखील हिंसा सुरु झाली. रेल्वेचे रूळ उखडण्यात आले, तारघर, डाकघर, सरकारी ईमारतींना आगी लावण्यात आल्या, ३ इंग्रजी नागरीक मारण्यात आले. ह्या प्रक्षोभक दंग्यांमुळे अखेर १३ एप्रिल रोजी पंजाबमध्ये मार्शल लॉ जारी करण्यात आला.
भारतभर या हत्याकांडाच्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. नोबेल पारितोषिक विजेते गुरू रविंद्रनाथ टागोर यांनी त्यांना १९१५ मध्ये इंग्रजांनी दिलेली 'सर' ही पदवी परत केली. या हत्याकांडाचा बदला घेण्यासाठी अनेक क्रांतीकारक जन्माला आले.
शहिद उधम सिंग (जे स्वतः या हत्याकांडामधे जखमी झाले होते) यांनी १३ मार्च १९४० या दिवशी या हत्याकांडाचे उत्तर म्हणून मिशाएल ओ'डायर (जो या हत्याकांडाचा सुत्रधार होता) याला गोळ्या झाडून ठार मारले.

येथे अजूनही गोळीबाराच्या २८ खुणा शिल्लक आहेत.
स्वाग्या, एक और पंजाब ट्रीप तो मारनीच पडेगी भिडू.......
तो पण हसला, लेह-लडाखच्या वेळेस इकडून जाऊ म्हणाला.
सुवर्णमंदिरात प्रवेश केला. थोडीफार गर्दी होतीच. पण मस्त दर्शन झालं.

12DSCN3660.JPG12DSCN3662.JPG12DSCN3664.JPGप्रवेशद्वार :
12DSCN3667.JPGसुवर्णमंदिराविषयी थोडसं :
खरं नाव श्री हरमंदिर साहीब, पण सुवर्णमंदिर म्हणूनच आता जास्त प्रसिद्ध आहे. दरबार साहीब असे अजून एक नाव. हे शीखांचे पाचवे गुरु अर्जुन देव यांनी हे सोळाव्या शतकामध्ये बांधले. त्यांनी “आदिग्रंथ” लिहून पूर्ण केला आणि त्याची गुरुद्वारा मध्ये स्थापना केली. याचे बांधकाम डिसेंबर, १५८५ रोजी सुरु झाले आणि ऑगस्ट, १६०४ रोजी पूर्ण झाले.
येथे प्रवेश करण्यास ४ प्रवेशद्वारे आहेत, याचा अर्थ असा की हे सर्व प्रकारच्या लोकांसाठी आणि धर्मांसाठी खुले आहे. सध्याचा गुरुद्वारा हा १७६४ रोजी जसा सिंग अहलुवालिया याने अगोदरच्या गुरुद्वारामध्ये डागडुजी करून बांधला. १९व्या शतकामध्ये महाराजा रणजित सिंहाने पंजाब भाग ताब्यात घेतला आणि गुरुद्वाराचा वरील भाग सोन्याच्या पत्र्याने झाकला. हि या गुरुद्वाराची वेगळी ओळख आहे आणि यामुळेच हा सुवर्णमंदिर म्हणून ओळखला जाऊ लागला.
श्री हरमंदिर साहीब हा शिखांसाठी खूप पवित्र आहे. “गुरु ग्रंथ साहिबा” हा सगळ्या गुरुद्वारामध्ये असतो. आणि याच्या पुढेच सर्व लोक माथा टेकतात. हरमंदिर साहीब याचा खरा अर्थ “ देवाचे मंदिर” असा होतो. शीखांचे चौथे गुरु, राम दास यांनी १५७७ मध्ये हा तलाव बांधला. हि जागा अकबराने दिली होती. या तलावामध्ये पाणी नसून ते अमृतच आहे असे मानतात. आणि या तलावाच्या भोवताली जे शहर वसले ते “अमृतसर” या नावाने प्रसिद्ध झाले. “सर” याचा अर्थ तलाव.

अजून एक कहाणी अशी आहे की, रामाने सीतेला त्यागल्यानंतर ती या तलावाच्या शेजारी येऊन राहिली. इथेच लव-कुशनी रामाचा घोडा अडवला आणि त्याचा पराभव केला. येथेच एक झाड आहे त्याला “दुख भंजन बेरी” म्हणतात, या झाडाखाली राम शेवटच्या घटका मोजत होता, जेव्हा लव-कुश यांना आपल्या हातून “पितृहत्ये” सारख महापातक होतंय कळलं तेव्हा त्यांनी रामाला या तलावाचं पाणी पाजलं आणि राम खडखडीत बरा झाला. तिथे साधारण ३ झाडे आहेत, त्यातले नक्की कोणते हे मला माहित नाही. हिंदुना जसे गंगेच्या पाण्यात अथवा काशी, मथुरा, नर्मदा परिक्रमा केल्यावर पुण्य मिळते, पाप नाहीसे होते, मुस्लिमांना जसे हज तसेच शिखांसाठी हा तलाव. अर्थात पाण्यात उतरून मला शुद्ध आणि तलावाला अशुद्ध करण्याची माझी इच्छा नव्हती हे एक कारण आणि दुसर त्या थंडीत मी तलावात उतरलो असतो तर मी शुद्ध तर झालो असतो पण वाटेतच काशीमध्ये माझ्या अस्थी विसर्जित कराव्या लागल्या असत्या.

त्यामुळे मी फक्त आपले नेहमी गुरुद्वारामध्ये जाताना हात-पाय धुतात त्याप्रमाणे धुतले आणि गेलो. मला मी केलेल्या पापांचा घडा रिकामा करायचा नाहीये की पुण्याचा घडा भरायचा नाहीये. तो जसा आहे तसाच ठीक आहे. पण लोक मात्र त्यांच्या पापांचा घडा रिकामा करून आणि पुण्याचे घडे भरून भरून घेऊन जात होते. ‘
१९२३ रोजी हा तलाव पहिल्यांदा पूर्णपणे कोरडा करण्यात आला. आणि त्यामधील गाळ आणि इतर माती सोन्या-चांदीच्या घमेल्यांनी, फावड्यांनी काढली असे सांगतात. त्यावेळेस गुरु गोविंद सिंगांचा पांढरा ससाणा मंदिराच्या कळसावर बसून होता असे सांगतात.

पायाचा दगड बसवला लाहोरच्या हजरत मियाँमीरने अशी लोकांमध्ये चुकीची समजूत आहे. प्रत्यक्षात शीखांचे पाचवे गुरु अर्जुन देव यांनीच पायाचा दगड डिसेंबर १५८८ मध्ये बसवला.
शीखांच्या “ग्रंथसाहीबा” मध्ये फक्त गुरु नानकांचे आणि इतर शीख गुरूंचे विचार नाहीत तर त्यामध्ये नामदेवांच्या ओव्या आहेत, बाबा फरीद, कबीराचे दोहे पण आहेत.
सुरवातीला ह्या जागी एक छोटसं तळ आणि विरळ असं जंगल होतं, जेव्हा अकबर शीखांचे तिसरे गुरु अमर दास यांना गोइंदवल मध्ये भेटला तो त्यांची आणि लोकांची जीवनशैली बघून खूप प्रभावित झाला आणि त्याने अमर दास यांची मुलगी भानी हिच्या भाई जेठा बरोबर झालेल्या लग्नात भेट म्हणून जहागीरी दिली. पुढे भाई जेठा शीखांचे चौथे गुरु राम दास झाले.

अहमद शहा अब्दालीचा सेनापती जहान खान याने गुरुद्वारा पाडला, नंतर तो १७६० मध्ये परत बांधण्यात आला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून शिखांची फौज पाठवण्यात आली आणि अमृतसरपासून ५ मैलावर त्यांची जहान खानशी गाठ पडली आणि त्यांनी जहान खानाला आणि त्याच्या सैन्याला धुळीला मिळवले.

सुवर्णमंदिराचे पावित्र्य राखण्यासाठी काही पाळावयाच्या गोष्टी :
१. आपली पादत्राणे बाहेरचं काढून ठेवा, आत जाताना हात-पाय जमल्यास तोंड धुवून आता जावा.
२. आतमध्ये दारू पिणे, कोणत्याही प्रकारचे मांस खाणे, सिगरेट ओढणे अथवा कोणत्याही मादक पदार्थांचे सेवन करणे निषिद्ध आहे.
३. डोक्यावर कायम रुमाल, ओढणी अथवा तत्सम कपडा ठेवावा.

सध्या जे संगमरवर आणि सोन्याचा पत्रा दिसतो तो १९व्या शतकामध्ये हुकम सिंग चिमनी याच्या सहाय्याने महाराजा रणजीत सिंहाने लावला आहे.
एप्रिलच्या दुसऱ्या आठवड्यात ( साधारण १३ तारखेला ) येणारा बैसाखी सन ( या दिवशी खालसा धर्माची स्थापना झाली) येथे मोठ्या उत्साहात साजरा होतो. तसेच दिवाळीला देखील येथे मोठी रोषणाई करण्यात येते. अमृतसर आणि श्री हरमंदीर साहीबला भेट न दिलेला शीख अजूनतरी मला भेटला नाही. तुम्हाला भेटल्यास जरूर सांगा.

राजा रणजितसिंहाने जेव्हा पुढे एका मुस्लीम मुलीशी विवाह केला तेव्हा त्याला अकाल तख्ताच्या प्रमुखाने चाबकांच्या फटक्यांची शिक्षा ठोठावली होती आणि त्याने देखील ती निमुटपणे सहन केली.
तिथे फिरताना हे क्षण असेच राहावेत असं वाटतं. एक वेगळचं पवित्र वातावरणाने तो परिसर भरलेला आहे. प्रसाद म्हणून शिरा देण्यात येतो. त्या साजूक तुपाचा वास नंतर कितीतरी वेळ हाताला येत राहतो. तेथील कलाकुसर, स्वच्छता ती पवित्रता अनुभवल्यानंतर तेथून खरचं पाय निघत नाही. काहीही करा पण आयुष्यात एकदा भेट द्याचं. मरण्याअगोदर बघितलंच पाहिजे अशा मोजक्या ठिकाणांपैकी हे एक. जमल्यास तेथील संग्रहालयास भेट द्या, शीखांचा इतिहास जाणण्याचा प्रयत्न करा. हिंदू धर्माचेच एक बंडखोर बाळ म्हणून शीख धर्माकडे बघण्यात येते. त्यांची श्रद्धा बघा, तिथे अब्जाधीशपण जेवण वाढत असतो, चपला ओळीत लावत असतो. स्वतःहून काम करतात ते लोक. त्यांना सांगावे लागत नाही. खूप काही शिकण्यासारखे आहे त्यांच्याकडून. एकवेळ मंदिराच्या दानपेटीत पैसे देताना माझा खिशाकडे जाणारा हात अडखळेल पण गुरुद्वारामध्ये तो कधीचं अडखळला नाही. का ? याचं उत्तर कधी मी शोधण्याचा प्रयत्न केला नाही आणि करणारही नाही.
अनेक वेळा मुस्लीम सुलतानांनी हे मंदिर जमीनदोस्त केलं आणि तितक्याच वेळा ते परत उभे राहिले. अर्थात भारतातील सर्वच मंदिरे इतकी सुदैवी ठरली नाहीत.

काही जणांना तलवारी घ्यायच्या होत्या. मलापण खूप इच्छा होती. आणि आई आठवली. जिने माझा Survival knife गुपचूप मला न सांगता माझ्या ट्रेकिंग सॅक मधून काढून फेकून दिला. कारण विचारलं तर म्हणे, तुझ्या हातात तसलं विघातक शस्त्र बघून मला भीती वाटते, मी काय तुला जामीन द्यायला येणार नाही.
नको येऊ, माझा बाप समर्थ आहे ...........माझं उत्तर
माझी सॅक का उचकलीस ? किती वेळा सांगितलं तुला, माझ्या ट्रेकिंगच्या वस्तूंना कुणी हात लावायचा नाही. ते नुसते दगड असतो नाहीतर काठ्या.
आजचं सकाळी, तुझ्या सॅक मधून कसलातरी घाण वास येत होता. ( बहुतेक उरलेल्या बटाट्याच्या भाजीचा असावा Wink ) म्हणून बघितलं आणि भाजी तरी फेकायचीस ?
आता खर खर सांग, कधी आणि कुठे फेकलास ?
आज सकाळीच फेकलाय, कचराकुंडीत
शाआआआआ ..............बाबा.............आणि मी कचराकुंडीच्या दिशेने निघालो.
तब्बल २ तास कचराकुंडीत शोधल्यावर तो Survival knife मला मिळाला. त्या भल्या सकाळी ज्यांनी मला कचराकुंडीत कचरा शोधताना बघितलं असेल त्यांच्या चेहऱ्यावर सारंग, हा धंदा कधीपासून सुरु केलास रे ? असे भाव स्पष्ट दिसत होते. आणि मी देखील “ ऐकावे जनाचे, करावे मनाचे” या न्यायाने आज सगळी कचराकुंडी पालथी घालेन पण माझा Survival knife घेऊनच जाईन या न्यायाने तो शोधला. घरी आल्यावर आई, स्वयंपाकघरातील काटे चमचे, सुरी इतकेच काय विळी पण फेकतो........ मी म्हणालो.
त्यावर आई शांतपणे ...... लगेच फेक, फक्त मग रोज डाळ-भात खायची तयारी ठेव.
शेवटी नेहमीप्रमाणे बाबांनी मध्यस्थी करून या नाट्यावर पडदा घातला.
मागे एकदा आईने बाबांचे रिव्होल्व्हरचे लायसन्स असेच फेकून दिले होते. अर्थात बाबा माझ्यासारखी प्रतिक्रिया व्यक्त करू न शकल्याने आमचा भाऊ- बहिणींचा एक मनोरंजन कार्यक्रम हुकला, तर बाबा रिव्होल्व्हर लायसन्सला मुकले आणि आमची रिव्होल्व्हर चालवायची इच्छा इच्छाच राहिली. Happy
त्यामुळे तलवारी समोर दिसत असून देखील मला एका सकाळी कचराकुंडीत मी तलवार शोधत फिरत आहे असे डोळ्यासमोर दिसले आणि मी तलवार घ्यायच्या विचारांना श्रद्धांजली दिली.

अवांतर : अमृतसरपासून २५ किमी अंतरावर शीखांचे पाचवे गुरु आणि पहिले शहीद धर्मवीर अर्जुन देव यांनी सर्वधर्मियांसाठी बांधलेले "तरणतारण" नावाचे मंदिर आहे. येताना जमल्यास तेही बघून यावे. तेथे राहण्याची-खाण्याची मोफत सोय होते.

काहींनी तलवारी घेतल्या. सर्वांचं दर्शन झाल्यावर आम्ही परतीच्या मार्गाला लागलो. रात्री ८ वाजता अमृतसर सोडले. आता सगळ्यांनाच भुका लागल्या होत्या. शिवाय आम्ही पंजाबमध्ये असल्याने नॉनव्हेज न खाता गेलो असतो तर आमच्यासारखे कमनशिबी आम्हीच.
त्यामुळे ड्रायव्हरला एखाद चांगलं हॉटेल बघून गाडी थांबवा, जेवणं करून पुढे निघू असे सांगितले. आणि मी ताणून दिली. दिवसभराच्या धावपळीने लगेच झोप लागली.

कुणाच्या तरी आरड्याओरड्याने जाग आली. स्वागत आणि ड्रायव्हरची जुंपली होती. :). एकंदरीत लक्षात आलं की ड्रायव्हरचा गाडी मध्ये कुठही न थांबता फतेहगढ साहिब गाठायच होता, पण स्वागत त्याचं नॉनव्हेजप्रेम बघता जागा राहिला होता आणि रस्त्यावर कुठे चांगलं हॉटेल दिसत का ते बघत होता, आणि ड्रायव्हर त्याला थोडं अजून पुढे चांगलं हॉटेल आहे तिथं थांबूया असं सांगत होता. असं २-३ वेळा झाल्यावर स्वागतने त्याच रौद्र रूप धारण केलं होतं. घड्याळात बघितलं तर रात्रीचे ११ वाजून गेले होते. मग लगेचच पुढच्या एका हॉटेलमध्ये गाडी थांबवली. सगळेजणच भुकेले होते. त्यामुळे सगळ्यांनीच जेवणावर आडवा हात मारला. ड्रायव्हरच जेवणं बघून हा आता गाडी कशी चालवणार असा प्रश पडला ? पण स्वागत जागाच राहणार असल्याने काही प्रश्न नव्हता. जेवण आटोपून गुरुद्वारा गाठायला १ वाजला. आमच्याच मोहिमेमधील अजून एक ग्रुप तिथे पोहचला होता. जास्त वेळ न दडवता आम्ही खोल्यांच्या चाव्या घेतल्या आणि पहाटे ६ ला निघू म्हणतं ताणून दिली.

पण आज कुणीच बाईक न चालवल्याने तसा काही जास्त थकवा आला नव्हता फक्त थोडी दगदग झाली होती. मोहिमेतील लोकांना फोन केला तेव्हा मोहीम हरिद्वारला पोहचली होती. पण जवळपास निम्म्याहून अधिक लोक विखुरले होते. काहींनी बाईक वरून अमृतसर गाठून, तिथून बाईक ट्रेन मध्ये टाकल्या होत्या.
एका दोघांनी काय गाडी आणली होती?, वायपर चालत नव्हता, मागचं दार वाजत होतं इत्यादी किरकोळ तक्रारी केल्याच. पण अशा छोट्या-मोठ्या कुरबुरी चालणारच, त्यात विशेष असे काही नाही, तो मनुष्य स्वभावच आहे. या नात्याने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. आयुष्यात “adjustment”” नावाची एक गोष्ट असते आणि ती सगळीकडे करावीच लागते. त्यात विशेष असे काही नाही. पण एकंदरीत सगळेजण खुश होते.
घरी फोन केला तेव्हा बाबांनी नेहमीप्रमाणे थंडी आहे का? आणि परत एकदा बास की भटकन, टाक ट्रेन मध्ये बाईक आणि ये परत असा सल्ला देऊन बघितला. मी देखील नेहमीप्रमाणे त्यांना जास्त काही न बोलता, आज काय काय बघितलं आणि उद्या कुठे जाणार आहोत ते सांगून फोन ठेवला.
रात्री झोपता झोपता उद्या इतका लांबचा पल्ला ( जवळपास ४७० किमी) काही आपल्याच्याने पार होणार नाही, वाटेत कुठेतरी थांबवाचे लागणार. इत्यादी विचार करता करता झोप लागली.

आजचा प्रवास : अंदाजे ५०० किमी अर्थात गाडीमध्ये निवांतपैकी बसून
उद्याचा प्रवास:
फतेहगढ साहिब -अंबाला- हरिद्वार – नजीबाबाद – मुरादाबाद – रामपूर – बरेली

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Happy

तलवारीचा किस्सा भारीच (अवांतर : चुलत भावाच्या तलवारीचे काकींनी विळ्या, चाकु इ. प्रकार बनवुन आणलेत लोहाराकडुन Wink ) Happy

सारंग, तू अगदी भारीएस रे...

कधी जालियनवाला व फतेहगढ साहिब सारखे डोळ्यात पाणी आणणारे लिहितोस..
कधी गुरुद्वाराचे भक्तिमय लिखाण....
तर कधी चालत्या गाडीवर झोपल्याचे वर्णन करतोस.....
तर कधी Survival knife / तलवारीचे किस्से.....

खूपच इंटरेस्टिंग आहे हे सगळंच लिखाण..... तुम्हा सर्व जातिवंत भटक्या लोकांचीही कम्माल आहे अगदी....

प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार
चीमुरी >>>>> Happy ,,, मी देखील त्या तलवारींना विळ्या, चाकु होण्यापासून वाचवलं.
चिखल्या >> तुझे स्वागत आहे.

सारंग, तुझे "पुने ते पनिपत" असे १२ भाग वाचले तु खुप छान लिहितोस आणि तुझि भट्कन्ति अफाट आहे. मला हि तुझ्या जोडिल भट्कायल आवडेल. लेह लढाकला केव्हा जाणार आहेस कळ्वले तर फार बरे होईल पुढिल भाग केव्हा ?

त्यामुळे तलवारी समोर दिसत असून देखील मला एका सकाळी कचराकुंडीत मी तलवार शोधत फिरत आहे असे डोळ्यासमोर दिसले आणि मी तलवार घ्यायच्या विचारांना श्रद्धांजली दिली.>>>
मला आंटि आणि भाऊकाका दिसले डोळ्यसमोर्...तलवार कचराकुंडीत फेकताना.:) ह. ह. पु. वा.

मस्त लिहिलय्स..

एवढा इतिहास कसा रे कळतो तुला...मी वाचते आवडिने पण वाचुन झाल कि कन्फुझच जास्त होते...इतिहास आणि माझ कधी जमलच नाही रे....:(