प्रारंभ - हितगुज दिवाळी अंक २०१३

Submitted by संपादक on 23 September, 2013 - 02:39

हितगुज दिवाळी अंक २०१३ प्रकाशित झाला आहे.

Masooda poster.jpg

रसिक मायबोलीकरहो,
नमस्कार!

हितगुज दिवाळी अंक २०१३च्या कार्याचा शुभारंभ करताना आम्हांला अतिशय आनंद होतो आहे. आपल्या मायबोलीवर दर्जेदार साहित्य आणि कलाकृतींनी नटलेला ई-दिवाळी अंक प्रकाशित करण्याची अनोखी परंपरा गेली तेरा वर्षे अखंड चालू आहे. तो वारसा जपण्यासाठी आणि नेटानं पुढे नेण्यासाठी आम्हांला हवी आहे साथ, तुमची.

यंदाच्या हितगुज दिवाळी अंकात असणार आहेत कथा, लेख, ललित, कविता, हलकंफुलकं साहित्य, अविस्मरणीय आठवणी आणि विविध क्षेत्रांत कार्यरत असणार्‍या व्यक्तींशी साधलेला संवाद. तसंच, दर्जेदार लिखित साहित्याच्या बरोबरीनंच दृक्श्राव्य विभागासाठीही तुमच्या कलाकुसरींचं, रेखाटनांचं, पाककृती सादरीकरणाचं आणि इतर विशेष गुणप्रदर्शनाचं स्वागत आहे!

यंदा आपल्या अंकात मायबोलीकरांच्या लेकरांच्या कलागुणांचा दृक्श्राव्य आविष्कार असावा, असा मानस आहे. आपल्या लेकरांच्या विशेष नैपुण्याचं चित्रीकरण किंवा ध्वनिमुद्रण (रेकॉर्डिंग) आम्हांला पाठवा. यासंदर्भात आपण संपादक मंडळाशी सदस्यखात्यातून संपर्क साधून पुढील कार्यवाही करावी, ही विनंती.

हितगुज दिवाळी अंक २०१३च्या विशेष संकल्पनांविषयी सविस्तरपणे इथे वाचा-
संकल्पना-१ - वैद्यकशास्त्र
संकल्पना-२ - वेध भविष्याचा

आपले साहित्य आणि कलाकृती आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी सविस्तर सूचना आणि नियम खाली दिलेले आहेत. तसंच प्रताधिकारांसंबंधित नियम आणि सूचनाही दिलेल्या आहेत, त्या व्यवस्थित वाचून त्यांचे योग्यप्रकारे पालन करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांचीच आहे.

आपले साहित्य आम्हांला या दुव्यावर पाठवा.

साहित्य पाठवण्याची मुदत आता २० ऑक्टोबर, २०१३पर्यंत वाढवण्यात आली आहे.

तर मग आपण आता लेखणी सरसावून... आपलं की-बोर्ड झटकून कामाला लागा कसे!

आपले साहित्याभिलाषी,
संपादक मंडळ
हितगुज दिवाळी अंक २०१३

साहित्य आणि कलाकृती पाठवण्याविषयी सूचना आणि नियम
मालकीहक्कांबाबत सूचना आणि नियम

*

मामी घोषणा वाचा की नीट... विशेष संकल्पना नंतर जाहिर करणार आहेत..

प्रारंभ तर जोरात आहे... अंकपण जोरात होणार म्हणजे..

याबरोबरच विशेष संकल्पनेवर आधारित लेखनविभागसुद्धा असणार आहेत. त्याविषयीची सविस्तर घोषणा आम्ही लवकरच करत आहोत.

>>>>> हो की! हे वाक्य माझ्या डोळ्याच्या गाळणीतून गाळलं गेलं होतं. Happy

थीमव्यतिरिक्तही लेख/कथा पाठवायच्या का?>>

प्राची, तुम्ही तुमच्या आवडत्या विषयावरील आवडत्या साहित्यप्रकारातील लेखन हितगुज दिवाळी अंक २०१३साठी पाठवू शकता Happy

नमस्कार संपादक,
दिवाळी अंकासाठी शुभेच्छा.

अंकासाठी साहित्य पाठविण्याच्या आवाहनाच्या जाहिरातीमुळे विशेषकरून बरेचसे गप्पांचे धागे वर आलेले
दिसत आहेत. हे स्वाभाविक असलं तरी यामुळे दिवाळी अंकाबाबत सूचना/संकल्पना इ. चा धाग्यांचा शोध
फार मागे जाऊन घ्यावा लागतो आहे. मी थोड्या वेळापूर्वी हा धागा सहाव्या पानावर जाऊन शोधला.

यासंदर्भाने एक विनंती : साहित्य पाठविण्याच्या जाहिरातीखाली/वर किंवा जाहिरातीच्या इमेजलाच दिवाळी अंकाच्या धाग्याची लिंक द्यावी, ज्यायोगे त्या धाग्यावर सहगत्या पोहोचता येईल.
(जाहिरातीवर धाग्याचा क्र. आहे तरीसुद्धा लिंक सुलभ होईल असे वाटते. )

दिवाळी अंकात पाककृती देउ शकते का? २०१२च्या दिवाळी अंकात पाककृती दिसली नाही म्हणुन विचारत आहे. ही पाककृती पूर्णपणे नवीन असुन मायबोलीवर या आधी प्रकाशीत झालेली नाही.

@ मुग्धा.रानडे,
हितगुज दिवाळी अंकासाठी पाककृती सादरीकरणाचे चित्रीकरण (व्हिडियो रेकॉर्डींग) करून पाठवू शकता. लेखी पाककृती नकोत.
साहित्य आणि कलाकृती निवडीबाबत अंतिम निर्णय संपादक मंडळाचा असेल.

@abhishruti, तुम्हाला यासंदर्भात संपर्कातून ईमेल पाठवली आहे.

@मुग्धा.रानडे, यंदाच्या दिवाळी अंकात लेखी पाककृतींचा समावेश नसेल.

Pages