मंदारमाला : एक प्रयास

Submitted by भारती.. on 25 September, 2013 - 02:47

मंदारमाला : एक प्रयास

(गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गा ,अक्षरे २२ , अनिश्चित यती ४,१०,१६,२१
वृत्तलक्षण - साता त-कारीच मंदारमाला गुरू एक त्याच्याहि अंती असे )

येथे दिसे की सुखाच्या मिषाने झळाळे भ्रमाचीच रंगावली
जी रोषणाई दिसे घाटमाथ्यास ती काजव्यांचीच दीपावली

आघात नी घात उत्पात हे नित्य वृत्तात चित्तात घोटाळती
संवेदनांचे मृत:प्राय तंतू कसे जाणिवेलाच वेटाळती

आक्रंदुनी जात निद्रेत अस्तित्व माझी मला मी न ये ओळखू
बाजार आवार हे एक झाले निके सत्व येथे कसे पारखू

मी विस्मरावी कुरूपे जगाची ढिगार्‍यात मेंदूत जी साचली
ते दंभ आवेश ती मत्सराची कडूझार वाणी कधी बोचली

नि:संग निभ्रांत निस्सीम होऊन आकाशवृत्ती धरावी कशी
सार्‍या किनार्‍यास रेखून घेई अशी पूर्णता पांघरावी कशी

आसक्त आरक्त हव्यास-रंगी नभाच्या कडा रंगलेल्या इथे
चित्रे विचित्रात एकत्र होती किती साधना भंगलेल्या इथे

वार्‍यावरी श्वास जे गीत गातात आतील आनंद ओसंडुनी
वार्‍यावरी जी विराली विराणी व्यथेची कथा आर्त ओथंबुनी

त्या गूढ गर्भात जेथून येतात ही अमृताची मधुस्पंदने
वैय्यर्थ सूक्ष्मार्थ भव्यार्थ माझे मला तेथ आहे स्वत: शोधणे..

- भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारती....

सुंदर रचना...."मंदारमाला" चे लक्षण आणि गण यांची माहिती होती; पण अभ्यासाच्या दृष्टीने खोलवर गेलो नव्हतो. आज तुमची ही रचना वाचल्यावर संस्कृतप्रचुर भाषेचे अप्रतिम सौंदर्य किती उलगडून तुम्ही सांगितले आहे याची जाणीव होते.

"आक्रंदुनी जात निद्रेत अस्तित्व माझी मला मी न ये ओळखू
बाजार आवार हे एक झाले निके सत्व येथे कसे पारखू ...."

यातील 'बाजार आवार एक झाले....' भाव तात्काळ नजरेसमोर आला..... {"निके" म्हणजे निखळ का ?}.

दोनचार दिवसापूर्वी श्री.शशांक पुरंदरे.... भानस....आणि गीता यांच्या 'गदिमा कविता' संदर्भात गिरीश यांचेही नाव निघाले होते. मी त्या अनुषंगाने ती कविता गिरीश यानी लिहिली असेल का [तसा तिथे उल्लेख होता] म्हणून त्यांच्या साहित्याच्या धांडोळा घेत असता "मंदारमाला" वृत्तात गिरीश यानी रचलेली एक अशीच सुंदर कविता मिळाली.

"छाया तरुंच्या किती रंगलेल्या तुझ्या भोवती थाटुनी राहती
स्वर्गांतुनी पाझरे तेज खाली, फुले, पर्णराजे, तृणे नाहती...."

अशी रचना आहे त्या श्रीशारदावंदनेत.

...तीन दिवसापूर्वी ती वाचत असताना आनंद झाला होताच, पण योगायोग म्हणजे तुम्ही स्वत:च आज त्याच वृत्तात सादर केलेली वरील कविता समोर आली.....

[शीर्षक "भ्रमाची रंगावली..." शोभले असते....हे अर्थातच माझे वैयक्तिक मत]

अशोक पाटील

येथे दिसे की सुखाच्या मिषाने झळाळे भ्रमाचीच रंगावली

नि:संग निभ्रांत निस्सीम होऊन आकाशवृत्ती धरावी कशी
सार्‍या किनार्‍यास रेखून घेई अशी पूर्णता पांघरावी कशी

त्या गूढ गर्भात जेथून येतात ही अमृताची मधुस्पंदने
वैय्यर्थ सूक्ष्मार्थ भव्यार्थ माझे मला तेथ आहे स्वत: शोधणे..

व्वा! भिडला आशय!

लांबीमुळे लयीत गुरफटायला होत आहे म्हणून अर्थापासून सुटत चाललोय असे एक वाचक म्हणून प्रामाणिकपणे वाटले.

कृगैन.

व्वाह... अफाट...!
लांबीमुळे लयीत गुरफटायला होत आहे म्हणून अर्थापासून सुटत चाललोय>>+१

पण तीच मजाही आहे.

भारतीजी,
प्रयास काय ! मस्तच सांभाळलंय वृत्त. आणि आशयही छानच.

खालील ओळी सर्वात विशेष वाटल्या.

“येथे दिसे की सुखाच्या मिषाने झळाळे भ्रमाचीच रंगावली”

“ते दंभ आवेश ती मत्सराची कडूझार वाणी कधी बोचली”

“वार्यावरी जी विराली विराणी व्यथेची कथा आर्त ओथंबुनी”

Amazing!...
नि:संग निभ्रांत निस्सीम..
वैय्यर्थ सूक्ष्मार्थ भव्यार्थ..
गहिरा आशय आणि खूप काही चमकून जातं.
आणि वाचताना पावसाच्या झडीचा आवाज यावा असा ताल.. आहाहा!

व्वा, सुंदर रचना

आघात नी घात उत्पात हे नित्य वृत्तात चित्तात घोटाळती
संवेदनांचे मृतप्राय तंतू कसे जाणिवेलाच वेटाळती

मी विस्मरावी कुरूपे जगाची ढिगार्‍यात मेंदूत जी साठली
ते दंभ आवेश ती मत्सराची कडूझार वाणी कधी बोचली

नि:संग निभ्रांत निस्सीम होऊन आकाशवृत्ती धरावी कशी
सार्‍या किनार्‍यास रेखून घेई अशी पूर्णता पांघरावी कशी

आसक्त आरक्त हव्यास-रंगी नभाच्या कडा रंगलेल्या इथे
चित्रे विचित्रात एकत्र होती किती साधना भंगलेल्या इथे

त्या गूढ गर्भात जेथून येतात ही अमृताची मधुस्पंदने
वैय्यर्थ सूक्ष्मार्थ भव्यार्थ माझे मला तेथ आहे स्वत: शोधणे..

अप्रतिम.....

आशयघन तरीही अप्रतिम शब्दसौंदर्य लाभलेली सुघड रचना.

लयदार अशी की वाचताना किणकिणत जाणारी मधुमधुतर रचना.

त्या गूढ गर्भात जेथून येतात ही अमृताची मधुस्पंदने
वैय्यर्थ सूक्ष्मार्थ भव्यार्थ माझे मला तेथ आहे स्वत: शोधणे.. >>> हा तर सर्वार्थाने कळसच ..

_________/\_________

माझे वृत्तबद्ध लेखनाचे पूर्वसूरींच्या प्रेरणेने चाललेले हे प्रयोग, प्रयास.. ही नादबद्ध कविता समकालीनही असावी, नव्याने वाचनात यावी, आनंददायी वाटावी हा एक हेतू. जो तुम्हा सर्वांचे प्रतिसाद वाचता थोडा साध्य झाला असे वाटतेय. जसे की सईने म्हटलेय >>वाचताना पावसाच्या झडीचा आवाज यावा असा ताल.. आहाहा >> Happy

दुसरा हेतू आजवर केवळ उत्स्फूर्तपणे लिहिलेल्या कवितेचं एक वेगळं , अभ्याससिद्ध , साधनासिध्द रूप माझं मलाच अनुभवावंसं वाटलं .

विदिपा , शाम , खरंच का लांबीमुळे अर्थान्वयन कठीण जातंय ?सभोवतालात सर्व निराशा असताना स्वत:च्याच निर्मितीक्षम अस्तित्वकेंद्रावरच विश्वास ठेवावा, निदान त्यामुळे आस्तिक्यभावना वाटावी, आत्मशोधाला दिशा मिळावी असे काहीसे कवितेतून म्हणायचे आहे ..

अशोकजी, >>''बाजार आवार हे एक झाले....'' भाव तात्काळ नजरेसमोर आला..... {"निके" म्हणजे निखळ का ?}.>>
अगदी सूक्ष्म निरीक्षण , आणि होय, निके म्हणजे निखळच. पण नकारात्म नोटवर सुरू झालेली ही कविता वर लिहिल्याप्रमाणे एका सकारात्म शेवटाकडे जाते म्हणून 'भ्रमाचीच रंगावली ' हे शीर्षक औदासिन्याचे वाटेल . तुम्ही दिलेल्या कवी गिरीशांच्या ओळी नितांतरमणीय .शारदावंदनाचे वातावरण क्षणात निर्माण करू शकणाऱ्या. शब्दांचे हे सौंदर्य अक्षरगणवृत्तांमधून अक्षरश: पाझरते.
शशांकजी, कधीतरी पूर्वी तुम्ही अक्षरगणवृत्तांवर लिहायची विनंती केल्याचं आठवतंय,कदाचित तिथूनच हे मनात राहून गेलं असेल.
सुहास्य, उल्हासजी , जो एस ..खूप आभार Happy

मनाच्या तळाशी असलेल्या जाणिवांना अतिशय प्रासादिक भाषेत, परिपक्व रुपात लेखणीवर उतरवले आहे. काही वेळा अश्या कविता वाचताना कारागिरीचा संशय येऊ लागतो हे आंतरजाल व इतर अनेक छापील पुस्तकांमधील कवितांमुळे मनावर चढलेले आवरण! अशी अस्सल कविता वाचतानाही आपल्यातील वाचकाची भूमिका अशी प्रभावित व्हावी हे दुर्दैव!

अनेक ओळी आवडल्या. अश्याच वृत्तात माझी एक गझल होती पूर्वी, तिचा मतला देण्याचा मोह होत आहे.

उत्तीर्ण होणार नाहीस अभ्यास चिक्कार केला तरी
तू मोक्षकोड्यात फिरशील हा जन्मही पार केला तरी

अर्थात, हा मतला येथे देऊन तुमच्या कवितेच्या रसास्वादात आणलेला उपद्रवकारक व्यत्यय जाणवून क्षमाही मागतो.

शीर्षकामध्ये 'एक प्रयास' असे का म्हंटले आहे समजले नाही. 'प्रयास' यापेक्षा बरेच काही पुढचे आहे. किंबहुना, ही रचना वाचून काहींनी अधिक प्रासादिक, गंभीर व आर्त लिहिण्याचा प्रयास करावा अशी ही रचना आहे.

अभिनंदन व धन्यवाद!

-'बेफिकीर'!

बेफिकीर, मी आभार आणि तुम्ही क्षमा कशाला मागायची !कवितेवर प्रेम करणार्‍यांबरोबर आपल्या शब्दांच्या पुनःप्रत्ययाचा आनंद घ्यावासा वाटणे अगदी नैसर्गिकच. तुमच्या ओळींमध्ये याच वृत्ताने गझलचा अंदाज धारण केल्याचे पाहून वृत्ताची लवचिकताही जाणवली..

कारागिरीचा प्रश्न फार वेळा चर्चिला जातो. पण सौंदर्यपूर्ण शब्दात कवितेचा आकृतीबंध सगळे नियम पाळून पेलणे सोपे नाही. त्याला सवय , अभ्यास तर लागतोच, शिवाय कवितेवरची अनन्य निष्ठाही लागते, तेव्हा शब्द, अर्थ वगैरे घटक स्वत;च सहकार्य करू लागतात Happy

विदिपा , शाम , खरंच का लांबीमुळे अर्थान्वयन कठीण जातंय ?>>>

ह्यावर पुन्हा काय उत्तर द्यावे हे समजत नाही, क्षमस्व!

अशी अस्सल कविता वाचतानाही आपल्यातील वाचकाची भूमिका अशी प्रभावित व्हावी हे दुर्दैव!>>>

अर्थापासून दूर गेल्यासारखे वाटणे ही वैयक्तिकरीत्या अनुभवायची गोष्ट आहे असे म्हणावेसे वाटते. अर्थ लावायला एफर्टस घ्यावे लागत आहेत असे अजूनही म्हणावयाचे आहे. कवितेच्या अस्सलपणावर किंवा प्रासादिक शब्दयोजनेवर काही म्हणायचे नाहीच आहे कारण त्याबद्दल मनात काही शंका नाही. सरळ अर्थ लागलेल्या आणि आशयाच्या अंगाने प्रभावी वाटलेल्या ओळींचा उल्लेख केलेला आहेच.

अशा परीस्थितीत भूमिका प्रभावित होणे म्हणजे काय हे नेमकेपणाने समजले नाही.

अशा परीस्थितीत भूमिका प्रभावित होणे म्हणजे काय हे नेमकेपणाने समजले नाही.<<<

विजयराव, मी प्रभावित होणे हे तुमच्या किंवा इतरांच्या प्रतिसादांना उद्देशून म्हणालेलो नाही. Happy

माझ्याच स्वतःच्या प्रतिसादाला उद्देशून म्हणालेलो आहे.

मला असे म्हणायचे आहे की अश्या कविता वाचताना (अनेक गझला रचल्यामुळे व अनेक गझलकारांना भेटल्यामुळे, तसेच आंतरजालावर अनेक प्रकारचे कवी भेटल्यामुळे) आपोआपच मनात असे येते की अरे भलतीच इंप्रेसिव्ह कारागिरी केलेली दिसतीय या कवितेत. पण अश्या अस्सल कवितांच्या बाबतीत आपल्या मनात असे येते हे आपले दुर्दैव, हे मी मला उद्देशून म्हणालो आहे. Happy

कृ गै न

बेफि,

माझा खरेच गैरसमज झाला होता त्याबद्दल क्षमस्व! तुमचा प्रतिसाद भारतीताईंच्या 'खरेच असे होतेय का?' ह्या प्रतिसादाच्या लिंकमधेच पुढे वाचल्यामुळे तसे झाले.

आपण समजून घ्यालच ही अपेक्षा!

ताई, तू महान आहेस!!! अप्रतिम काव्य केलेस... तुझी शब्दांची निवड अचंबित करणारी आहे.. जणू हुकूमत गाजवतेयस शब्दांवर.. तुला हवे तेंव्हा हवे तसे हात जोडून उभे राहतात ते समोर आणि अगदी लवचिकपणे तुला हव्या त्या वृत्तात, कवितेत, हायकूत इतकेच कशाला, गद्यातही स्वत:ला सामावून घेतात, तेही लय बिघडू न देता.. Happy
बायदवे, वैय्यर्थ म्हणजे काय?

खुप उच्च आहे हे. दहावीसाठी वृत्त अभ्यासली होती, त्यानंतर मुद्दाम असे काही वाचलेच नव्हते.
भारती या नावानेच, उत्तम आशयाची ग्वाही मिळते.

दिनेश....

"....भारती या नावानेच, उत्तम आशयाची ग्वाही मिळते...." अत्यंत समर्पक आणि सत्य अशा या कौतुकासाठी तुम्ही स्वतःही अभिनंदनास पात्र आहात.

अशोक पाटील

पियू,हर्पेन , रमा, आनंदयात्री ,अमेय,सानी खूप धन्स ..
सानी, वैय्यर्थ म्हणजे व्यर्थता. या निमित्ताने कवितेचे जुने फॉर्म्स तू वाचते आहेस म्हणून आनंद होतोय.
विदिपा, 'खरंच का ' असं अगदी सहज लिहिलं होतं, त्यानंतर एक स्पष्टीकरण देण्याआधीची प्रस्तावना करणारं वाक्य होतं ते.
माझ्या कुठल्याही कवितेतले अर्थबंध थोडे गहन वाटू शकतात याची मला कल्पना आहे.
दिनेशदा, अशोकजी _/\_ ..

पुन्हा पुन्हा वाचावी अशी... नादबध्द.. Happy पहिल्यांदा वाचली तेंव्हा नादच पोहोचला अगोदर..अर्थ समजून घेतेय.

दंडवत..!!

"....अर्थबंध थोडे गहन वाटू शकतात याची मला कल्पना आहे....."

~ पण म्हणून ते सहजसोपे वाटावेत अशी तुम्ही रचना करावी असेही कुणी म्हणणार नाहीत.

मोरोपंतांची प्राकृत भाषेतील 'केकावली' मधील हा श्लोक...........

"सुसंगति सदा घडो, सुजनवाक्य कानी पडो.
कलंक मतिचा झडो, विषय सर्वथा नावडो.
सदंघ्रिकमळी दडो, मुरडिता हटाने अडो,
वियोग घडता रडो, मन भवच्चरित्री जडो..."

य सुप्रसिद्ध रचनेतील अर्थबंध गहन नाहीत ? तरीही भाषेने जशीच्यातशी स्वीकारली आहेच. कवीने जनमनाचा मतकानोसा जरूर घ्यावा....पण कागदावर उतरावे ते स्वतःच्या भाषेनेच.

अशोक पाटील

वैय्यर्थ म्हणजे व्यर्थता>> ओह! अच्छा.. धन्स ताई.... Happy

शाळेतच हे सगळं-वृत्त वगैरे शिकले होते. हल्ली कविता लिहीतांना वृत्त वगैरेचा विचार करुन कोणी फारसे लिहितांना दिसत नाही, त्यामुळे आता दूर्मिळ झालेली अशी वृत्तबद्ध, लयबद्ध कविता वाचायला खुप छान वाटले.

Pages