मंदारमाला : एक प्रयास

Submitted by भारती.. on 25 September, 2013 - 02:47

मंदारमाला : एक प्रयास

(गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गा ,अक्षरे २२ , अनिश्चित यती ४,१०,१६,२१
वृत्तलक्षण - साता त-कारीच मंदारमाला गुरू एक त्याच्याहि अंती असे )

येथे दिसे की सुखाच्या मिषाने झळाळे भ्रमाचीच रंगावली
जी रोषणाई दिसे घाटमाथ्यास ती काजव्यांचीच दीपावली

आघात नी घात उत्पात हे नित्य वृत्तात चित्तात घोटाळती
संवेदनांचे मृत:प्राय तंतू कसे जाणिवेलाच वेटाळती

आक्रंदुनी जात निद्रेत अस्तित्व माझी मला मी न ये ओळखू
बाजार आवार हे एक झाले निके सत्व येथे कसे पारखू

मी विस्मरावी कुरूपे जगाची ढिगार्‍यात मेंदूत जी साचली
ते दंभ आवेश ती मत्सराची कडूझार वाणी कधी बोचली

नि:संग निभ्रांत निस्सीम होऊन आकाशवृत्ती धरावी कशी
सार्‍या किनार्‍यास रेखून घेई अशी पूर्णता पांघरावी कशी

आसक्त आरक्त हव्यास-रंगी नभाच्या कडा रंगलेल्या इथे
चित्रे विचित्रात एकत्र होती किती साधना भंगलेल्या इथे

वार्‍यावरी श्वास जे गीत गातात आतील आनंद ओसंडुनी
वार्‍यावरी जी विराली विराणी व्यथेची कथा आर्त ओथंबुनी

त्या गूढ गर्भात जेथून येतात ही अमृताची मधुस्पंदने
वैय्यर्थ सूक्ष्मार्थ भव्यार्थ माझे मला तेथ आहे स्वत: शोधणे..

- भारती बिर्जे डिग्गीकर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही च्या काहीच कहर आहे हो हे सगळं..
<<काहीच्या काही उच्च आहे हे !
अतीव आदर ! >> ++१११११
इथले प्रतिसाद पण खूप छान आहेत. भारती दीदीची कविता आणि त्यावरील मान्यवरांचे प्रतिसाद हा समॄध्द करणारा एक वाचनानुभव आहे.

अवांतरः
मंदारमालेचं वॄत्तलक्षण पाठ केलं की २ मार्कस मिळतात एव्हढच माहीती होतं. कींबहुना सगळीच वॄत्ते,अलंकार ही अशी २-२ मार्कात संपून गेली. गुरुजनांनी त्यांच्या परीने गोडी निर्माण करण्याचा खूप प्रयत्न केला पण मराठीत मार्कस मिळत नाहीत,त्यापेक्षा गणित्,विज्ञान कींवा तत्सम career च्या दृष्टीने महत्वाचे विषय यांच्यामूळे मायबोली बिचारी उपेक्षितच राहीली. शाळेत असताना कीतीतरी सुंदर कविता निव्वळ गाळलेल्या जागा भरुन मार्कस मिळावेत म्हणून पाठ केल्या नि विसरुन गेलो,आणि आयुष्यभर पुरणार्‍या या आनंदाच्या शिदोर्‍या रिक्तच राहील्या Sad Sad
आता आठवलं की वाईट वाटंतं.
विषयांतराबद्द्ल क्षमस्व.

श्रीयू....तुमचा वरील प्रतिसाद म्हणजे विषयांतर नक्कीच नाही....उलटपक्षी मराठी भाषेबद्दल समाजात निर्माण झालेल्या औदासिन्यतेचा तो आरसाच होय. याला शासनाचे धोरण जबाबदार की पालकांनी पाल्यासाठी शालेय शिक्षण म्हणजे केवळ 'गुणात्मक धोरण' अशीच पाटी रंगवून ठेवल्याचा परिणाम...यावर खल होऊ शकतो. पण त्याची काही आवश्यकता नाही....कारण मुलांनाच मराठी भाषेविषयी आत्मियता राहिलेली नाही तिथे कवितेतील जादूविषयी तरी ते कितपत समजून घेतील ?

भारतीसारख्या कवयित्री आपल्या परीने हा प्रांत जिवंत ठेवण्याचा यत्न करीत आहेत हीच आनंददायी बाब.

अशोक पाटील

<<भारतीसारख्या कवयित्री आपल्या परीने हा प्रांत जिवंत ठेवण्याचा यत्न करीत आहेत हीच आनंददायी बाब.>> +११
आणि काका तुमचे अभिप्राय्,प्रतिसाद पण खूप छान असतात. भारती दीदीची कविता आणि त्यावरील तुमचे माहीतीपूर्ण विवेचन हा खूपच छान वाचनानुभव असतो.

मल ह्या कवितेवर प्रतिसाद द्यायचा मूड अजून आला नाही यावेळी असे का झाले माहीत नाही
त्याबद्दल क्षमस्व भारतीताई
सर्व प्रतिसादकांशी सहमत इतकेच बोलून थांबतो
Happy

वैभव,तुमची अनुपस्थिती जाणवत होतीच.आशा करते की सर्व ठीक आहे.
श्रीयु ,>>मंदारमालेचं वॄत्तलक्षण पाठ केलं की २ मार्कस मिळतात एव्हढच माहीती होतं. किंबहुना सगळीच वॄत्ते,अलंकार ही अशी २-२ मार्कात संपून गेली >>
हे वाचून पुलंची आठवण झाली 'प्रफुल्ल होऊन सुपुष्प ठेले '- ठेले म्हणजे ठाकले !ठो -ठो अशा शब्दात फुलाबद्दलची काही आनंददायी बातमी आहे याचा पत्ताच लागू दिला जात नव्हता '' Happy असं अजूनही आहे खरं .शिक्षणपद्धतीबद्दल भाष्य वर अशोकजींनी केलेच आहे..माझ्यात कवितेची आवड जोपासणारे माझे वडीलही शिक्षकच होते..असेही अपवाद असतातच .

सुरेख आहे कविता. नादमय आहेच, आशयसंपन्नही आहे.
खूपच आवडली.
वाचत असतांना कुसुमाग्रजांची ' पृथ्वीचे प्रेमगीत ' आठवली एकदम. (ती सुमंदारमालेत आहे.) एक चांगली कविताच दुसर्‍या चांगल्या कवितेकडे नेऊ शकते. Happy

----------------------------------------------

एक किरकोळ शंका- ' मृतःप्राय ' असे लिहावे लागेल ना, बहुधा?

धन्यवाद ज्ञानेश, बरोबर आहे, मृत:प्राय करावे लागेल, संपादित करत आहे.
सुमंदारमालेचा व पृथ्वीच्या प्रेमगीताचा उल्लेख आवडला ..
मंदारमालेत सुरुवातीला एक लघु अक्षर वाढवून २३ अक्षरांचे सुमंदारमाला वृत्त होते..
(लगागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गागाल गा )

''मराठी असे आमची मायबोली जरी आज ती राजभाषा नसे
नसो आज ऐश्वर्य या माउलीला यशाची पुढे दिव्य आशा असे ''
ही सुमंदारमाला Happy

"Genuine poetry can communicate before it is understood" असं T.S.Eliot ने एका ठिकाणी म्हटल्याचं आठवतंय.त्याचीच आज प्रचिती आली .(इथे मात्र extragenuine म्हणावे लागेल असे वाटते आहे) ..या कवितेतील बर्याच ओळी समजून घेण्या अगोदरच खूप काही बोलून गेल्या ..म्हणून खरंतर ते वाक्य आठवलं .मनापासून धन्यवाद भारतीताई, असं काहीतरी वाचलं की समृध्द वाचनानुभव घेतल्याचा आनंद होतो .

ताकदीचा आशय ,वृत्ताची सुरेख लय आणि तितकीच अप्रतिम हाताळणी ,उत्तम आणि उत्कट शब्दयोजना या सगळ्यांचा या कवितेत सुरेख संगम झाला आहे .अशा कविता दुर्मिळच .
कवितेवरचे प्रतिसादही अतिशय अभ्यासपूर्ण आणि वाचनीय .

धन्यवाद !

धन्यवाद सुशांत या उत्कट प्रतिसादासाठी. या लेखनाची प्रेरणा ज्या स्वामी निश्चलानंदांकडून घेतली, त्यांचंच हे श्रेय.

वा! किती सुंदर कविता आहे ही!! केवळ वृत्तबद्ध नाही, तर कितीतरी भाषिक अलंकारांनी युक्त आणि पदलालित्यपूर्ण अशी ही कविता वाचकांना अनेकार्थांनी आनंद देऊन जाते. खूपच छान.

सुंदर कविता. वृत्तबद्ध कविता लिहिणे फारच अवघड. आणि अलीकडे तर दुर्मीळ. त्यातून ती आशयघन असणे अधिकच दुर्मीळ.
२०१३ सालची कविता, पण आजपर्यंत वाचनात आली नव्हती.
जाता जाता : मृतप्राय शब्दात त च्या पुढे प्रा हे जोडाक्षर आल्यामुळे त गुरु च झाला आहे. विसर्ग देऊन गुरू करण्याची आवश्यकता नव्हती. तसेही, मूळ शब्द मृतप्राय असाच आहे.

Pages