पत्र सांगते गूज मनीचे ---- जाई.

Submitted by जाई. on 18 September, 2013 - 11:28

पत्र क्रमांक एक

प्रिय अभ्यास,

खुप दिवसापासून तुला पत्र लिहायच मनात होत. तशी तुझी आणि माझी ओळ्ख पाच सहा वर्षापासूनचीच आहे. पहिल्यांदा आपण भेटलो ते मी पहिलीत गेल्यावर. घरातले सगळेजण आई, बाबा, आजी, आजोबा तू येणार येणार असे म्हणत होते. मलाही बरच कुतुहल होत तुझ्याबद्द्ल. खुप अभ्यास करायचा म्हणजे नेमक काय करायच ?? किती कराय़चा तो ?? गेम आणि कार्टून का नाही खेळायचे मग ?? ताई करते तिच्याएवढा करायचा की तिच्यापे़क्षा जास्त ??

हळुहळू तुझी ओळख होत गेली. तू भेटत गेलास दरवर्षी वाढत गेलेल्या दप्तराच्या वजनाच्या रुपात... आणि आता खर सांगू का तू मला मुळीच आवडत नाहीस.अजिबात नाही. अगदी त्या डेसिमल चाप्टरमध्ये शिकवलेल्या पॊईन्ट झिरो ईतकापण नाही. कंटाळा येऊ लागलाय तुझा मला...

आता मी सहावीत गेलोय.रोज मला शाळा असते. सकाळी सात वाजता शाळा असते आणि दोन वाजता सुटते. शाळेत नुसता अभ्यास एके अभ्यास.. मला आवडणारे पीटी आणि ड्रॊईंगचे तास तर आठवड्यातून फ़क्त दोनदाच. मधली सुट्टी अर्ध्या तासाचीच. डबा न खाता खेळायला गेलो तर आई ओरड्ते. शाळेत पण खूप बोअरिंग शिकवतात. सगळ्यात जास्त कंटाळा तर ईतिहास भूगोलाच्या तासाला येतो. किती ते लढाया, त्याची वर्षे लक्षात ठेवायच ?? पृथ्वी ,तिच तापमान, वेगवेगळे प्रदेश...वैताग येतो नुसता.काय उपयोग त्या घडून गेलेल्या गोष्टीबद्द्ल आता अभ्यास करुन.. गणिताच्या तासाला तर डोकच चालत नाही. केवढ हार्ड आहे ते. भागाकार गुणाकारात तर दांडीच गुल होते. पाढे, वर्गमूळ पण असतात पाचवीला पुजल्यासारखे. सायन्सचे सर पण फ़ार्फ़ार डोक दुखवतात. खरतर मला पुर्वीच्या टीचर आवडायच्या. हे सर मात्र नुसतच वाचून दाखवतात. मध्ये मध्ये बॊलून प्रश्न विचारु नको म्हणतात हा ईंग्लिश आणि मराठीच्या तासाला मजा येते. त्या तासाला छान गोष्टी ऎकायला मिळतात. पण कविता आणि व्याकरणाचा कंटाळा येतो. पण माझा मित्र सुजय म्हणतो की ते स्कोरिंग असत म्हणून...

शाळेतून आल्यावरपण तुझ्यापासून सुटका नसते. ९५ % मिळायला हवेत म्हणून आई बाबांनी कंपलसरी ट्युशन लावलीये. मग तिकडे जाव लागत. शाळेतला होमवर्क काय कमी असतो , त्यातच क्लासचा होमवर्क पण करावा लागतो. माझी बोट किती दुखतात लिहून लिहून. जेव्हापासून आईच्या ऒफ़िसातल्या मैत्रीणीच्या मुलाला ९५% मिळालेत तेव्हापासून माझ्या हात धूवून पाठीच लागलीय ती. बाबापण तिचेच ऎकतात. सारखी अभ्यास कर , कर म्हणून पाठी लागलेली असते. किती म्हणून करायचा अभ्यास ?? कितीही केला तरीही त्यांच समाधानच होत नाही. खेळाय़ाला पण पाठवत नाही आता जास्त. अर्ध्या तासातच आता पुरे, किती टाईमपास करशीलचा धोशा चालू होतो. बाबा पण आता तू मोठा झालास गधड्या , आता लागा अभ्यासाला असे बोलतात.

फ़क्त आजी आजोबा माझी बाजू घेतात. आई नसली की खेळायला सोडतात. पण ते कधीतरीच असत. आणि अभ्यास रोजचाच असतो. त्यात माझी शाळा पण मँडच आहे. दर दोन आठवड्याने टेस्ट ठेवते. पुढे सहामाही वैगरे असतच. माझी आजी तर मला घाण्याला जुंपलेला बैल म्हणते. अभ्यास एके अभ्यास नुसता. Angry
आणि मला आता जास्त टीव्ही पण बघू देत नाही.डोरेमॊन , टॊम ऎन्ड जेरी सगळे बंद केलेत. माझ्या ताईची आता दहावी आहे. ती सतात कोणत्या ना कोणत्या क्लासला जात असते. बाबा म्हणतात की तिला डॊक्टर बनवायचे आहे , मग एवढा अभ्यास करावाच लागेल. ती पण वैतागते सतत अभ्यास करुन. पण काही बोलत नाही. शांत राहते. मी मात्र दंगा करतो. वस्तू फ़ेकतो. मग आई आणि बाबा ओरडतात. आजी समाजावते आणि आजोबा चॊकलेट देतात.

ए अभ्यासा , माझी एक रिक्वेस्ट आहे तुला. आई बाबांना समाजाव ना. तू कुठेतरी दुर निघून जा, येऊच नको काही दिवसासाठी. मग मला खुप खेळायला मिळेल. कार्टुन्स बघायला मिळतील. आई बाबा फ़िरायला नेतील मला. मी माझ्या फ़्रेन्डसबरोबर गेम खेळू शकेल.आजी आजोबांकडुन लाड करुन घेईन. मला हवा तेवढाच अभ्यास करेन. ताईला पण जास्त अभ्यास न करता डोक्टर होता येईल. परीक्षेच्या आधीही आईसक्रीम खायला मिळेल. खूपच मजा येईल.

करशील ना माझ्यासाठी एवढ?? मग ना कदाचित तू मला आवडायला लागशील .नक्की कर हा

तुझ्या उत्तराची वाट पाहत असलेला,

अभ्यासाच्या ओझ्याने वाकलेला , खेळायला मिळत नसलेला

एक छोटा

*********************************************************************************************************************

पत्र क्रमांक दोन

प्रिय़ माझ्या छोट्या दोस्ता,

तुझ पत्र मिळाल.मलाही तुझ्याशी खूप सार बॊलायच होत. तुझ्याशी आणि तुझ्यासारख्याच माझ्यावर रागवून बसलेल्या छोट्या दोस्तांशी..

का रे माझा राग करता एवढा ?? मी काही ईतकाही वाईट नाहीये रे. बिलीव्ह मी. तुम्ही लोक ना माझ्याकडे नेहमीच कंटाळवाण्या नजरेने पाहता. मग मी अजूनच नीरस होतो. तुझ्या भाषेत बोरिंग होतो. आणि तुम्हाला आवडेनासा होतो.

खर सांगू का मी ऊलट मस्त आहे. मलाही तुमच्याशी बोलायला, खेळायला, तुमच्या तोंडावाटे आपल नाव ऎकायला आवडत. जेव्हा तुम्ही त्या गोड कविता म्हणता ना मला खरच खूप आनंद होतो. तुम्हाला येतय त्याचा आनंद असतो तो. तू जेव्हा ते बिनचूक पाढे , सनावळ्या म्हणतोस ना तेव्हाच्या तुझ्य़ा तोंडाकडे मी पाहत असतो. तुला ऊत्तर आल याचा अभिमान तुलाही असतोच. खर सांगायच तर मी तुला मुळीच आवडत नाही असेही नाहीये. फ़क्त मी ना तुझ्यावर चुकीच्या पद्ध्तीने लादला गेलोय. आपली जी शिक्षणपद्धती आहे ती अशीच थोडी वेडी वाकडी आहे. पाठांतर रट्टा मारणे , मार्काच्या पाठी धावण्यावर भर देणारी.परीक्षेच स्तोम माजवणारी आणि नंबर गेमला प्राधान्य देणारी... नाईलाजाने तू जेव्हा अभ्यासाला बसतोस ना तेव्हा मलाही वाईट वाटतच रे. खरतर तुझ्या वयाच्या मुलांनी खरतर खूप खेळाव, दंगा करावा, मस्ती करावी. मी तर कायम असणारेच आहे तुमच्याबरोबर. विचार तुझ्या ताईला Wink

चल तुला आज माझ एक गुपित सांगतो.. आपण ना पहिली एकमेकांशी मैत्री करुया. मग पुढचे तुझा प्रॊब्लेम चटकन सुटेल. अभ्यास तुला करावाच लागेल. त्याला ईलाज नाही.पण तो मात्र हसत खेळत करायचा. रड्तराऊतपणे नाही. कळ्ळ ??

तर आपल्या मैत्रीची पहिली पायरी म्हणजे माझ्याकडे पाहून कंटाळा करायचा नाही. रागवायच नाही की चिडायच नाही. कंटाळून अभ्यास केलास तर आपल मुळी जमणारच नाही. कितीही केलास तरी. काय पटतय ना माझ बोलण ?? आता लक्षात येतय का कितीही अभ्यास केला तरी समाधानच होत नाहीच मर्म ??

दुसर म्हणजे मार्कासाठी अभ्यास मुळीच करायचा नाही. मला, तुझ्या विषयाला समजून घे. मन लाव त्यात. कार्टुन्समध्ये लावतोस ना तसे. मग बघ मी तुला आवडायला लागेन. सोपा वाटायला लागेन. गणित , ईतिहास भूगोल सार काही समजून उमजून येईल. शाळा , त्यातले शिक्षक , ते तास सर्व आवडायला लागेल.
स्वतच टाईम टेबल स्वत बनव. आईला ते दाखव. हा पण त्यात गडबड नकोय हा. अभ्यासाच्या वेळी अभ्यास आणि खेळाच्या वेळी खेळ. दोघांची गल्लत करू नकोस.

९५ % मिळवायचे म्हणून तर मुळीच अभ्यास करु नकोस. नंबर वैगरे काही नसत.पु. ल. देशपांड्यानी म्हटल होत पस्तीस मार्क पासिंग साठी लागतात म्हणुन फ़क्त चटणी भाकरी बनवायला शिकलो तर ते चालेल का ?? नाही ना .सो हे तस करु नकोस. थोडी रुची घेच माझ्यात. मग बघ अभ्यास नावाच कोड कस उलगडत ते. तुझ तुलाच कळणार नाही. कधी संपला हा अभ्य़ास. सुरुवातीला थोड जड जाईल पण एकदा का आपण मित्र झालो की तुला तुझ ते आनंदवनभुवन सापडेल. तुमच्या भाषेत आपल ट्यूनिंग जमेल. माझा राग करू नकोस रे. आई पण तुझ्या भल्यासाठीच सांगतेय. फ़क्त ती जास्तच अभ्यास करायला सांगतेय आणि ते ही खेळायला न देउन. हे बरोबर नाही. एवढ्या अभ्यासाची काही गरज नाहीच्चे. मी सांगेन तिला . डोन्ट वरी.

घोकंपट्टी सोड, भरपूर खेळ, व्यायाम कर, कार्टून बघ, अभ्यास एके अभ्यास नकोच, मजा कर.. आणि हो हे तुझ्या मित्रानांही सांग.

मला पण तुमचा मित्र व्हायला खरच खूप आवडेल.

मग करतोयेस ना माझ्याशी मैत्री???

तुझ्या मैत्रीच्या अपेक्षेत असलेला
अभ्यास

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाई, लै भारी. सुरेख विषय निवडलायस आणि एका छोट्याच्या मनातलं खूप छान मांडलंयस. उत्तरही अतिशय आवडलं. Happy

मस्त आहे हे पण पत्र.. अगदी आई, बाबा, मुलं, शिक्षक, सगळ्यांनी वाचवं आणि त्यातुन काहितरी बोध घ्यावा असं !!!

अरे वा जाई ! अगदी मूलभूत समस्या जीवनातली- पाचवीला पुजलेला अभ्यास अन त्यालाच पत्र ! त्याचं उत्तरही अगदी चीअर अप करणारं Happy

जाई....

व्वॉव.... हा असा विषयच मुळात सुचणे म्हणजे लेखिकेच्या कल्पनाशक्तीला दाद दिली पाहिजे. एक मुलगा अभ्यास या पात्राला तक्रार स्वरूपाचे पत्र लिहितो आणि अभ्यास त्याला धीर देतो हा बंध फारच मोहकरितीने लेखात उतरलाय.

"...तुझ्या विषयाला समजून घे. मन लाव त्यात. कार्टुन्समध्ये लावतोस ना तसे. मग बघ मी तुला आवडायला लागेन....." ~ हा सल्ला फार महत्वाचा आणि प्रत्येक छोट्याला तो नक्कीच भावेल असाच आहे.

पत्रलेखनातील एक सुंदर कल्पना आणि तिचा विस्तारही तितकाच देखणा.

अशोक पाटील

Jai khup chan lihilas. Aamche ase vishay hotat. Kharach paristiti khup bikat aahe. Chan patra.

मामी ; माधुरी101; manee ; साती; भारतीताई ; अशोक मामा; अवल; कल्पु ; चनस ; जागू तै ; बस्के ; कविन ; अतृप्त आत्मा

आभार्स लोक्स

पत्रलेखनातील एक सुंदर कल्पना आणि तिचा तितकाच देखणा विस्तारही.

अभ्यासाने लिहिलेले पत्र माझ्या मुलांना वाचायला देणार.

अभ्यासाने लिहिलेले पत्र माझ्या मुलांना वाचायला देणार. >>>> हे या लेखनाचे खरे यश...

अभिनव कल्पना - सुंदर सादरीकरण ....

जाई, विषय आवडला.
पण या पत्राला शिक्षकाने उत्तर दिले असते तर जास्त चांगले झाले असते.
अभ्यास आवडत नाही कारण शिकवण्याची पद्दत चुकीची असते. चांगला शिक्षक कुठल्याही विषयात गोडी निर्माण करू शकतो.

मायबोलीकर मित्र-मैत्रिणींनो, गणेशोत्सव २०१३ च्या सर्व उपक्रम आणि स्पर्धांमध्ये मध्ये भरभरुन सहभाग घेतल्याबद्दल मनःपूर्वक आभार. स्पर्धांचे मतदान सुरु झालेले आहे. तरी कृपया आपल्या आवडत्या कलाकृतींना येथे मत द्यावे.

पूर्णब्रह्म - तिखट- पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45382
पूर्णब्रह्म - गोड - पाककला स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45359
"पत्र सांगते गूज मनीचे '' स्पर्धा - मतदान - http://www.maayboli.com/node/45383